Sunday, June 18, 2017

ए हसीनो

ह्या फेसबुकाने एक मोठाच प्राॅब्लेम करून ठेवला आहे..
जुनी जुनी, जवळ जवळ विस्मरणात गेलेली "प्रीतीपात्रे" आयुष्यात परत डोकावत आहेत.. त्यांचे ते मेनके सारखे फोटो, त्यांच्या एकाहून एक दिलखेचक अदा, काही विचारायची सोय राहीलेली नाही. कधी पाय घसरेल काही सांगतां यायचे नाही...
शाळेत असताना दोन वेण्या घालून, तांबड्या-पिवळ्या रिबीनी, डोकीस पॅराशूट (ते एक प्रकारचे तेल होते) चोपडून शाळेला येणाऱ्या, तसेच नाकासमोर (स्वत:च्या) चालणाऱ्या या मुलींच्या अचानक मेनका, उर्वशी आणि रंभा कधी झाल्या ते कळेनासे झाले आहे.
त्यांचे नवे रूपडे पाहून त्याचे कौतुक करणे भागच आहे. परंतु अशा प्रकारच्या कौतुकाला आपल्याकडे "सांस्कृतिक" परवानगी नसल्याने उर्दूचा आधार घ्यावा लागत आहे.
ख्वाब है या जिंदगी,
आप को देखे जमाना।
जब आप देखे हमे कही,
तब जिंदगी ख्वाब बन जाये।
अर्थात सासऱे मामांनी, गडाचे दोर जवळजवळ १५ वर्षांपूर्वीच कापलेले असल्याने, "अस्मिते"ला कसलाही धक्का न लागू देतां सर्व मावळे, गडावरच लढत राहणार आहेत.
तरी एक विनंती अवश्य करावीशी वाटते. असल्या विनंत्या देखिल "सांस्कृतिक" नाहीत. त्यामुळे परत उर्दूचा आधार!!
ए हसीनो, इतनी तो खातीर करो,
देखने वालो की।
होष उड जाये तब तक तो ठीक है,
पर वे कही बेहोष ना हो जाये।
अर्थात हे अद्भूत रुपांतरण पाहून, मुलींनी त्यांच्या वयाच्या ३५ व्या वाढदिवसानंतरच शाळेत जायला सुरूवात करावी की काय असाही एक विचार मनांत आल्या शिवाय राहात नाही.

नाव नावाची गोष्ट

आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव काय ठेवावं, हा वास्तविक ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. असे किती जरी म्हटले तरी, ज्या समाजात माणूस राहतो, त्या समाजाचा मुलांच्या नावावर आणि उलटपक्षी त्या नावांचा त्या समाजावरही परिणाम होतच असतो. बऱ्याच वेळेला या आई वडिलांनी दिलेल्या नावांमुळे, "नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा" याचा प्रत्यय येत असतो. प्रत्येक नावाला एक प्रकारचे सामाजिक वलय अाणि प्रतिमा असते. मग ते नाव धारण करणाऱ्या माणसाची इच्छा असो अथवा नसो, त्याला ती समाजमान्य प्रतिमा सिद्ध करावी लागते. काही काही माणसे इतकी कर्तबगार असतात की ती त्या नावाला एका वेगळ्या उंचीवर घेवून जातात. पण काही माणसे जन्मभर त्या प्रतिमेच्या आगे-मागे घुटमळत राहतात.
परवा एक राजकीय नेते तावातावाने बोलत होते की ब्राम्हण लोकात मुलाचे "शिवाजी" असे नाव ठेवत नाहीत. आणि याचे कारण म्हणजे ब्राम्हण समाजाचा "शिवाजी" ला असलेला छुपा विरोध हे दिले होते. खरेखोटे माहीत नाही. पण माझ्या माहितीत तरी "शिवाजी जोशी", "शिवाजी लेले" किंवा "शिवाजी देशपांडे" आढळात नाही. पण जसा "शिवाजी" नाही, तसा सांप्रत काळी कुणी "बाजीराव जोशी", "बाजीराव लेले" किंवा "बाजीराव देशपांडे" देखिल आढळात नाही. अर्थात आमचे मर्यादीत वर्तुळ हे देखिल त्याचे एक कारण असू शकेल. पण त्यामुळं ब्राम्हणात "शिवाजी" नाव नसायचं कारण काहीतरी वेगळं असणार असे आमचे एक ठाम मत आहे. कदाचित ब्राम्हण समाजाला "शिवाजी" या नावाबद्दल इतका जास्त आदर असू शकतो, कि जोपर्यंत आपले "कारटे" त्या योग्यतेचं काम करत नाही, तो पर्यंत त्याला "शिवाजी" म्हणून हाका मारणं त्यांना संयुक्तिक वाटत नसावे.
"हनुमंतराव" किंवा "मारोतराव" हे असेच एक भारदस्त नाव आहे. हे नाव धारण करणारा माणूस हा घणघणीत तब्बेतीचा आणि भारदस्त आवाजाचा असावा ही एक माफक अपेक्षा असते. बऱ्याच वेळेला, या "हनुमंतरावांचा" किंवा "मारोतरावांचा" जन्म देखिल हनुमान जयंती किंवा राम नवमी या दिवशी झालेला असतो. तेव्हा आपले अपूर्ण राहीलेले पैलवानकीचे स्वप्न आपले चिरंजीव पूर्ण करतील, अशा आशेने वडिलांनी, काकांनी नाहीतर मामांनी यांचे नाव, "हनुमान", "हनुमंत", "जांबुवंत" किंवा मारुती" असे शक्तीचे आराध्य दैवत असणारे असे ठेवलेले असते. पण पुढे मग त्या मुलाच्या एकूण कर्तबगारीला अनुसरून, त्याचे एकतर, "हनुमंतराव", "मारोतराव" होते किंवा मग सरकारी आॅफिसातून आरोळ्या ऐकू येत राहतात "मारूती, ती चौदा नंबरची फाईल घेऊन ये" किंवा शेताच्या बांधावरून हुकूम सुटतात की "हणम्या, ए हणम्या रं, बैलं सोड गड्याभाऊ!!". अर्थात या "मारूती" किंवा "हणम्या" चे क्वचित प्रसंगी, त्यांच्या मुलाच्या किंवा पुतण्याच्या लग्नात, मानपानाला धरून, मुलीकडची मंडळी मांडवात असे पर्यंत, अचानक "मारोतराव" किंवा "हणमंतराव" होत असतात. पण तो त्यांचा मूळ पिंड नसल्याने, परत संध्याकाळी मिरवणूक संपली की कुणीतरी सांगत येतो की "मारत्या पिऊन गटारीत पडलय" म्हणून!! असे घनगंभीर नाव धारण करून, ते नाव सार्थ करून दाखवणारे, "खासदार जांबुवंतराव धोटे" किंवा "हिंदकेसरी पैलवान मारुतीराव माने" अशी उदाहरणे फारच कमी दिसतात.
"राजा" या नावाचाही मराठी मनावर चांगलाच पगडा आहे. राजा गोसावी, राजा परांजपे यांनी एक काळ खरेच "राजा" सारखा गाजविलेला आहे. जयसिंगपूरात एका वक्तृत्व स्पर्धेसाठी राजा गोसावी, प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. इतर वक्ते राहीले राहीले बाजूला. राजाभाऊंनी पहिल्या वाक्यात सभा जिंकून टाकली. म्हणाले, " नमस्कार मंडळी, मी राजा गोसावी. म्हटलं तर राजा नाहीतर गोसावी"..इतकी राजस वृत्ती राजाचीच असायची.
"शरद" या नावाचीही मराठी माणसाला भारी हौस. या नावाला जातीचे वावडे नाही. तळवळकर, जोशी, पवार, पाटील असा यत्र-तत्र-सर्वत्र असा वावर आहे. बर ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आभाळाएवढी मोठी आहेत. त्यांनी या नाम महात्म्यात भरच घातली आहे.
"रघुनाथ" या नावाची तऱ्हा थोडी वेगळी आहे. वास्तविक हे पुर्ण पुरुषोत्तम असलेल्या प्रभू रामचंद्राचे नाव आहे. त्यामुळे ते सर्वात जास्त प्रचलित असायला काहीच हरकत नव्हती. आता उद्या कोणी असेही म्हणेल की राम क्षत्रिय होता. म्हणून ते नाव ब्राम्हणात ठेवत नाहीत. परंतु मधल्या पेशवाईच्या काळात प्रत्यक्ष थोरल्या बाजीरावांच्या पुत्राने, राघोबादादानी हे नाव धारण करून त्याला एक वेगळेच महत्व प्राप्त करून दिलेले दिसते. ज्या मराठ्यांच्या गादीचा आपण अभिमान बाळगतो, तिचे, "मराठेशाही" मधे रूपांतर करायचे श्रेय, खरे तर बाजी-रघुनाथ या पिता-पुत्रांचे! त्यातही जरीपटका अटकेपार गेला तो तर प्रत्यक्ष रघुनाथरावांच्या अंबारीवरून!! इतका मोठा पराक्रम केल्यावर मराठी घराघरातून एक तरी रघुनाथ दिसायला हवा होता. पण कदाचित नंतर च्या पेशवाईच्या पडत्या काळात एकानेक कारणांमुळे कदाचित या नावाचा करिष्मा संपत गेला असावा.
"गोपाळकृष्ण" या नावाची गंमत वेगळीच आहे. वास्तविक गोपाळ हे विशेषण असून कृष्ण हे नाम आहे. पण "कृष्ण" पेक्षा "गोपाळ" हे निदान महाराष्ट्रात तरी अधिक प्रचलित आहे. कृष्णाचे जरासे ग्राम्य रूप "किसन" असे असले तरी "किसना" मधून कृष्णाचा खट्याळ, लडिवाळ चेहरा दिसत राहतो. या उलट "गोपाळ" नाव धारण करणारी मंडळी, लवकरच "गोपाळराव" पदाला पोचतात असेही एक निरीक्षण आहे.
मागे मी एका बॅंकेत गेलो होतो. तिथल्या शिपायाचं नाव होतं "दशरथ". हा "दशरथ" अतिशय डिमांड मधे होता. क्षणाक्षणाला त्याला हाका सुटत होत्या. "दशरथ, ते फॅारेन एक्सचेंज चे लेजर आण.", "दशरथ, या पासपोर्ट च्या दोन काॅपीज काढून आण", "दशरथ, ते डेबिट कार्ड चे रजिस्टर घेवून ये", "दशरथ, साहेबांना पाणी आण.", "दशरथ ८ नंबर वर थोडी कॅश आणून दे.". माझ्या ३० मिनिटांच्या वास्तव्यात, अगणित वेळा "दशरथ" या नावाचा पुकारा झाला. माझे ऊर अभिमानाने भरून आले. अनेक कामे लिलया पार पाडत, "इदंम् न मम" असा निर्विकार चेहरा करून झेराॅक्स मशिनपाशी उभा राहून काॅपीज काढणारा "दशरथ" पाहून मला त्याचा अपार अभिमान वाटला. ज्या महान व्यक्तीचे नाव त्याने धारण केले होते, त्या प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या वडिलांपेक्षा तो मला कर्तबगार वाटू लागला.
रामचंद्रांच्या वडिलांनी, रथात केवळ उभे न राहता, या बॅंकेतल्या दशरथाप्रमाणे, अखंड सावधानता दाखवली असती, तर कदाचित त्यांना, शत्रुचा वेढा पडला नसतां. कैकेयीची मदत घ्यावी लागली नसती. मग तिला वर द्यावे लागले नसते. त्या वरांमुळे प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला नसता. भरतावर कसलेही राजकीय आणि सामाजिक दडपण आले नसते. लक्ष्मणाचा संसार सुखाचा झाला असता. सीतेला रावण पळवून नेऊ शकला नसतां. कदाचित रामाची आणि सुग्रीवाची भेट झालीच नसती. त्यामुळे कदाचित आपल्याला हनुमान, जांबुवंत वगैरे कोण हे कळले देखिल नसते. त्यामुळे कुणीही त्यांच्या मुलाचे नाव "मारोती" किंवा "हनुमंत" ठेवलेही नसते. त्यामुळे अशा सर्व "मारोती" आणि "हनुमंत" यांचे, नावापुढे "राव" लावण्याच्या जीवघेण्या खटपटीतून कायमची सुटका झाली असती. विचार करू तेवढा थोडाच आहे.
मागे कानपूर का लखनौमधे पोलिसांनी एका पाकीटमाराला पकडल्याची बातमी वाचली. त्यात त्या पाकिटमाराचं नाव होतं, "दिलीप गुप्ता"!! मोठी गंमत वाटली. प्रभू रामचंद्रांचे एक महापराक्रमी पूर्वज होते त्यांचे नाव होते "दिलीप"...आणि भारतवर्षातली छोटी छोटी स्वतंत्र राज्ये संघटीत करून त्यांचे गणराज्य स्थापन करणारे राजघराणे होते "गुप्ता".. प्रत्यक्ष आर्य चाणक्यानी ज्याला शिकवून अखंड भारत वर्षांचा सर्व सत्ताधीश सम्राट केले, त्या चंद्गगुप्ताचे हे "दिलीप गुप्ता" वंशज!! या अशा, एक महान नाव धारण केलेल्या "दिलीप गुप्तांची" नव्या सरकार दरबारी नोंद एक पाकीटमार म्हणून होणे, हे समाजाच्या अधोगतीचे व्यवच्छेदक लक्षण नाही काय?
हे म्हणजे जिल्हे इलाही, माबदौलत, सल्तनत-ए-हिंद, शहेनशाह अकबर यांच्या सहाव्या किंवा सातव्या पिढीतील "इसरत बेगम" किंवा "फातिमा बेगम" नावाच्या सुनेने, लाल किल्ल्याच्या बाहेर वडा-पावची गाडी चालवण्यासारखेच आहे.
वास्तविक अमेरिकेला वावडे असलेल्या गोष्टींचा यादी खूपच छोटी आहे. पण त्यात "ॲडाॅल्फ" हे अगदी वाळीत टाकण्यात आलेले नाव आहे. हे नाव अमेरिकेत धारण करायला कायदेशीर बंदीच आहे. ठीकच आहे. ज्याच्या उच्चाराने लाखो माणसांच्या कत्तलीचे स्मरण होते, असले नाव ठेवायची गरज ही नाही. भारतात "नथुराम" या नावाचे देखिल हेच झाले असावे. वास्तविक सीताराम, राजाराम, सावळाराम, जलाराम तसेच नथुराम हे पण एक राम नामच..पण या राम नामाने "हे राम" चे महत्व वाढवून स्वत:चा शेवट ओढवून घेतलेला दिसतो.
अमेरिकेत येवून राहीलेल्या भारतीय, त्यातल्या त्यात मराठी लोकांमधे, कुठले कुठले संस्कृत शब्द, नाव म्हणून ठेवायची स्पर्धा लागलेली दिसते. ह्या संस्कृत शब्दांचा उच्चार थोडासा वेगळ्या पद्धतीने केला की एखादे इंग्रजी नाव वाटावे याची देखिल खबरदारी घेतलेली असते. परवा एका भारतीय मुलीची आई तिला "हे डियाना", "हे डियाना" म्हणून हाक मारत होती. आम्ही न राहवून आश्चर्याने आणि कौतुकाने, मुलीचे शुद्ध इंग्रजी नाव ठेवल्याबद्दल त्या बाईंचे अभिनंदन केले. त्यांवर त्या बाईनी आम्हाला वेड्यातच काढले. त्यांनी "डियाना" हा संस्कृत शब्द असल्याचे सांगून, हल्ली कसली कसली "असंस्कृत" माणसे अमेरिकेत येतात असा झणझणीत कटाक्ष टाकला (म्हणजे मराठीत "लूक दिला"). मी संपूर्ण शरणागतीनं त्यांना त्याचा अर्थ विचारला तर म्हणाल्या की, "तिचं खरं नाव की नाही "ध्याना" आहे. पण आम्ही सगळे तिला "डियाना" च म्हणतो. वाटतय की नाही अमेरिकन?" आम्ही चाटमचाट!! प्रश्न फक्त असा पडला होता की या अमेरिकन मराठी मुलीने "ध्याना" होण्यासाठी मेहनत घ्यायची की "डियाना"?
"सिद्धार्थ" चे "सिद" झाले आहेत. "विक्रम" चे "विकी" झाले आहेत. "अशोक" चे "एशाॅक" झाले आहेत. या मुलानी देखिल नेमके कोणाकडे पहात मोठे व्हायचे हा प्रश्नच आहे.
अामचे एक स्नेही, अर्थात संस्कृत, मराठी आणि इंग्रजी भाषा कोविद!! त्यांनी त्याच्या मुलाचे नाव ठेवलय "व्यास". ते ऐकून मला भरून आले. मत्स्यकन्येचा मुलगा, पुढे मोठी दाढी, जटा वगैरे वाढवलेले, "व्यासंग" हा शब्द ज्यांच्या नावामुळे तयार झाला असे विद्वान पुरूष, वेदमूर्ती माझ्या डोळ्यांसमोर आले. आणि अचानक आतल्या खोलीतून वहीनींचा आवाज आला की "अरे व्यास चे डायपर संपत आले आहेत. आज काॅस्टकोत जावेच लागेल."
३२,००० फुटांवर असताना आमचे कल्पना विश्व, "व्यासांचा डायपर" नामक पक्षाला धडकून, अचानक जमिनीवर आदळले. मग पुढे "व्यास आता रात्री दर ३ तासांनी उठतो", "व्यासला आम्ही एनफामिलचा फाॅर्म्युला देतो", "व्यासला शाॅट द्यायचे आहेत", "अले लब्बाड, व्याशू!!", "व्यासचे केस किती लांब आहेत", "अगं व्यासला ओकी झाली वाटतं" वगैरे वाक्ये ऐकू येत होती. पण त्याचे काहीही वाटायचे बंद झाले होते.
याहून गमतीचा प्रकार म्हणजे आमचे दुसरे स्नेही, हे देखिल, संस्कृत, मराठी आणि इंग्रजी कोविद!! (अमेरिकेचा विसा मिळवला की देशी लोक या किमान तीन भाषात आपोआप कोविद होतात.) तर त्यांनी त्यांच्या बछड्याचे नाव ठेवले आहे "भीष्म"!! ते ऐकून, आणि आमचा "महर्षी व्यासांचा" पूर्वानुभव लक्षात घेऊन, पितामहांचे डायपर, पितामहांच्या शी-शू करण्याच्या वेळा वगैरे मौलिक चर्चा सुरू होण्याआधीच तिथून लगोलग सटकलो.
परंतू सांप्रत काळात यातल्याच एखाद्या "आरव मुनींचे", "महर्षी व्यासांचे" किंवा "पितामह भीष्मांचे", चि. सौ. कां. "डियाना" हीज बरोबरच्या शुभ-विवाहाची निमंत्रण पत्रिका कधी पहायला मिळते याची उत्कंठा लागून राहीली आहे.

एक होती आजी

आपला जन्म कुठल्या गावात व्हावा हे जसे आपण ठरवू शकत नाही अगदी तसेच आपले आई-वडील कोण असावेत हे देखील ठरवू शकत नाही. मग आजी आजोबांची गोष्टच दूर!! पण असे जरी असले तरी आजी-आजोबा आवडत नाहीत असा माणूस या पृथ्वीतलावर नावालाही सापडायचा नाही. ज्या गोष्टीवर आपले अजिबात नियंत्रण नाही, ज्याच्या मध्ये आपल्या आवडी निवडीला कसलेही स्थान नाही, त्या आजी-आजोबांच्या नात्याबाबत मात्र विलक्षण ओढ आणि निखळ प्रेम असते. कदाचित कोवळ्या वयात फक्त निखळ प्रेमाचे संस्कार व्हावेत म्हणून परमेश्वरानेच हे असे अढळ नाते निर्माण केले असावे. कोण असतात हे आजी-आजोबा? त्यांना का वाटते एवढे प्रेम? काय देतात ते आपल्याला? आणि आपण त्यांना काय देतो ? सगळेच गूढ आहे.
आयुष्य भर खस्ता खाउन त्यांनी त्यांच्या मुलांना मोठे केलेले असते. आता मुले मार्गी लागली की मग त्या खस्ता आपोआप बाजूला पडतात आणि सुरु होतो त्यांच्या आयुष्यातला आनंदोत्सव!! एखाद दुसरे नातवंड मांडीवर नाहीतर कडेवर आले की त्यांना साऱ्या कष्टांचा विसर पडतो आणि निखळ प्रेमाचा झरा, पुन्हा एकदा खळाळून वाहायला लागतो. या झऱ्याला कसलेही बंध नसतात. कसले किनारे नसतात. कसली वळणेही नसतात. हाती आलेल्या नातवंडाच्या आयुष्याची सुरुवात जास्तीत जास्त प्रेमाने करून देण्याचा हा एक ईश्वरी प्रयत्न असावा असे वाटते.
फुलांचे परागकण जपण्यासाठी, ज्याने मऊ, मुलायम पाकळ्या तयार केल्या, त्यानेच कधीतरी माणसाच्या मऊ मनाला जपण्यासाठी आजी-आजोबा तयार केले असावेत.
मग वाऱ्या-पावसात त्या परागांनी कितीही खिदळावे. कोवळ्या उन्हांशी तासंतास गप्पा कराव्यात, कधी रंगीबेरंगी फुलपाखरांना आपले गूज सांगावे. कधी घटकाभर इंद्रधनुष्याचे रंग वेचावेत नाहीतर कधी आपलाच रंग न्याहाळत बसावे. त्या परागांचे सारे विश्व त्या पाकळ्यातच सामावलेले असते. त्या परागांना सारे जग मग त्या पाकळ्या इतकेच मऊशार भासते. सोबतीला फक्त सुगंध असतो आणि वेड्या वाऱ्याचा छंद असतो.
या निष्पाप, अल्लड परागांना तेव्हा कशाचीही पर्वा नसते. ते बेभान होऊन नाचतात. पाकळ्यांच्या अंगणात, पावसात भिजून चिंब होतात. धुक्यात लपून कुंद होतात. पाकळ्यांना आपला गंध देतात आणि नकळत पाकळ्यांचा रंग घेतात.
हलकेच एका नव्या आयुष्याची सुरुवात होते.
मी वास्ततिक तिचा चौथा नातू!! पण मुलाकडून पहिलाच. त्यामुळे थोडा इतरांपेक्षा अधिक लाडका. आम्ही नातवंडे आजीला आजी आणि आजोबाना आण्णा म्हणायचो!! आण्णा त्याच्या भावंडामध्ये सगळ्यात मोठे होते. त्यांना ३ धाकटे भाऊ आणि २ बहिणी होत्या. त्यामुळे आजी घरातली पहिलीच सून आणि सगळ्यांची लाडकी वहिनी!! त्यामुळे तिला सगळे वहिनीच म्हणायचे. ते ऐकून ऐकून माझे वडील आणि आत्या सुद्धा तिला वाहिनीच म्हणायला लागले. इतके कि मी संपूर्ण आयुष्यात आजीला माझ्या वडिलांनी किंवा आत्यानी कधीच आई म्हणून हाक मारलेले ऐकले नाही. तर या वहिनीचा मान खूप मोठा होता. आता ज्या घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडायची तिथे फुकटच्या मानाशिवाय दुसरे होते काय द्यायला!! पण तिचा अधिकार होता. आजोबांचे सगळे भाऊ तिचे सगळे ऐकायचे. पुढे पुढे एक एक होत त्यांची लग्नं झाली. पायावर बसून त्याची पोटं मग हळू हळू चहु दिशांना निघून गेली. आणि मग खऱ्या अर्थाने आजीचा संसार सुरु झाला. अण्णा हेर्लेकर हे देवी डॉक्टर होते. आताच्या मुलाना "देवी" हे प्रकरण माहीतच नसते. दंडावर भयावह डाग घेऊन मिरवणारी आमची पिढी शेवटची ठरली त्याचा आनंदच आहे. तर ते भयावह डाग कोवळ्या दंडावर काढून त्या निष्पाप जीवाला "न भूतो न भविष्यती" रडवण्याचा त्यांना पगार मिळत असे. म्हणजे त्याच्यात वाईट काही नव्हते. पण आता आपल्याकडे बघून ईश्वरी प्रसाद असल्यासारखे हसणारे हे बाळ आता काही क्षणात मरणोप्राय वेदनांनी टाहो फोडणार आहे हे माहीत असूनही, मोठ्या धीरोदात्त पणे दंडावर देवीचा बत्ता घुसवणाऱ्याला कर्मयोगीच म्हटला पाहीजे.
त्यामुळे जिथे देवाची यात्रा तिथे त्यांचा मुक्काम असायचा. कधी पंढरपूरला विठोबाकडे तर कधी कार्ल्याला एकवीरा देवी कडे!! तिथे बरेच यात्रेकरू देवदर्शनाला म्हणून यायचे आणि तिथूनच एखादा रोग घेऊन पुढच्या कायमच्या प्रवासाला निघायचे. अशा वेळी अण्णांचे काम म्हणजे त्यांना रोगाची सरकारी लस देणे हे असायचे. त्या भक्ताला प्रत्यक्ष देव भेटीला न जाऊ देता देव दर्शन घेऊन घरी परत पाठवणे याच्यावर अण्णांचा भर असायचा. त्यामुळे असेल म्हणा किंवा त्यांचा पिंडच तसा होता म्हणा पण अण्णांचा देवावर फारसा विश्वास नव्हताच. त्यांच्या कामाचे स्वरूपच असे होते कि त्यांनी कुणाच्या बरोबर राहावे, काय खावे, कुठे आणि कधी झोपावे याच्यावर त्यांचा कसलाही अधिकार नव्हता. 'जेव्हा जे मिळेल तेव्हा तसे' असे त्यांच्या आयुष्याचे अगदी सोपे तत्वज्ञान होते. मिरज आणि शेजारच्या कर्नाटकात खूप छोटी-छोटी गावे आहेत. हि गावे इतकी छोटी होती कि काही काही गावांना तर जायला रस्ताच नव्हता. गावाच्या शेजारून बेळगाव रेल्वेचे, मीटर गेजचे, रूळ मात्र गेलेले असायचे. मोठ्या-मोठ्या एक्स्प्रेस तिथून जायच्या पण एकही गाडी थांबायची नाही. तेव्हा अशा गावात जाण्यासाठी सरकारने आजोबाना रेल्वेचे एक इंजिन ड्रायवर सकट assign केले होते. या इंजिन मध्ये बसून अण्णा त्या गावापर्यंत जायचे. तेवढ्या पुरते इंजिन थांबायचे. काम झाले कि परत इंजिन मधे बसून पुढे!! आजोबाना त्याचा अतोनात अभिमान होता !! पुढे देखील अण्णा किती तरी वेळा त्यांच्या या इंजिन बद्दल सांगायचे. मोठी मजा वाटायची. पण या सगळ्यामुळे त्यांचे घराकडे अतोनात दुर्लक्ष व्हायचे. त्यांचा सरकारी नोकर कधीही घरी बोलावयाला यायचा. यांची वळकटी बांधून तयारच!! गेले कि मग पुन्हा महिना-महिना घरी यायचे नाहीत. मुलांचे काय झाले, बायकोचे काय झाले याची त्यांना सुतराम फिकीर नसायची. अर्थात फिकीर नसायची हे खरे का त्यांचा आजीवर गाढ विश्वास होता हे खरे, ते नक्की सांगाता यायचे नाही. पण तो कर्मयोगी घर-दार आजीवर टाकून कुठे तरी प्लेगाच्या नाहीतर देवीच्या साथीवर निघून जायचा आणि मग आजी घराचा बाप होऊन कामाला लागायची.
अण्णांच्या नोकरीचा दुसरा प्रकार अजून वेगळा होता. तो म्हणजे सरकारी दरबार आणि महिना ५ रुपये पगार!! त्यांचे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इतके गरीब असायचे कि पायावर डोके ठेवून नमस्कार करण्यापलीकडे त्यांच्या कडे देण्यासारखे काहीही नसायचे. अण्णांचेही काही मागणे नव्हते. उलट माळ्यावर नाहीतर शेतात लपून बसलेली पोरं शोधून काढून अण्णा त्यांना लस द्यायचे. आणि लपून बसल्या बद्दल पाठीत एक रट्टा देखील द्यायचे. मिरज म्हणजे मराठी-कानडी दोन्ही जोरात!! अण्णांना दोन्ही भाषा इतक्या सफाईने बोलायला यायच्या कि यांची मातृभाषा नेमकी कोणती असा प्रश्न पडायचा. त्यामुळे त्यांचे कुठे अडायचे नाही. कुठल्याही गावी जायचे. तिथल्या बाप्याला बोलवायचे. पोरांना लशी द्यायचे. मग त्याच्या घराच्या आणि परिसराच्या स्वच्छतेबद्दल त्याची खरड निघायची. मराठी किंवा कानडी, त्याची जी भाषा असेल त्याच्या मातृभाषेत त्याच्या अस्वच्छतेबद्दल, अगदी त्याला समजेल अशा अर्वाच्य शब्दात, समज दिली कि हे चालले पुढच्या घरी!! समाज सेवाच ती!! एकूण त्यांच्या कामात ते मग्न होते एवढाच त्या कामाचा घरासाठी उपयोग होता. आजी मात्र विलक्षण होती. चतुर होती. धाडसी होती. करारी होती. धूर्त होती. घरात जे काही थोडे फार हेर्लेकर घराण्याचे म्हणून वैभव वाचले होते ते देखील गांधी हत्येनंतर लोप पावले. आजी सांगायची कि तिचे लग्न झाले तेव्हा घरात चांदीची भांडी होती. गाडी भर आंबे यायचे शेतातून वगैरे वगैरे!! पण आता म्हणजे एका प्लास्टिकच्या ग्लास मधे थोडे थोडे शेंगदाणे ठेवलेले असायचे आणि दुसऱ्या तसल्याच ग्लास मधे थोडे शेंगदाण्याचे तेल!! कोडोलीकर गल्ली मधे कृष्णराव कोडोलीकरांचा वाडा होता. त्यात रस्त्याला लागून एक दुकानासारखी खोली होती त्यात तिचा संसार चालू होता. पुढे कधी गप्पा मारताना मजेत आली कि हळूच तिच्यातला लपलेला त्रागा डोकावून जायचा. आजी म्हणायची कि 'गांधी परवडले पण नथुराम नको. तो म्हाताराही मेला. हा तरणाही मेला. फुकट आमचं घर दार मात्र धुऊन गेला!!' काही खोटे नव्हते त्याच्यात. "इनामदार हेर्लेकर कुलकर्णी" अचानक "दारोदार कुलकर्णी" झाले होते आणि त्या "दारोदार" होण्याची प्रत्यक्ष लाभार्थी होती आजी!!
हिम्मत हरेल ती आजी कसली!! तिने एकच ठरवले होते कि पोरांना शिकवायचे. तिच्या घरासमोर त्यावेळी तात्याकाका कोडोलीकर राहायचे. मोठे जमीनदार!! २०० का ३०० वर्षे जुना चौसोपी वाडा होता. वाड्याला मोठे किल्ल्याला असते तसले भले मोठे दार होते. त्या दाराला दिंडी दरवाजा होता. तो दिंडी दरवाजा देखील इतका मोठा होता कि आम्ही लहान पोरं त्या दिंडी दरवाज्यातून न वाकता चालत जायचो. त्याच्या पुढे पडवी होती. बाजूला जनावरांचा मोठा गोठा होता. त्यात हटकून एखादी गाय नाहीतर म्हैस व्यालेली असायची. त्याचं वैरण, चारा, पेंड बाजूला रचलेला असायचा. त्याच्या पुढे सोपा होता. सोप्याला एक जुना शिसवी कडीपाटाचा झोपाळा होता. झोपाळ्या खाली भले मोठे पेव होते. झोपाळ्याच्या मागे आणि पेवात भरपूर धान्याची पोती रचून ठेवलेली असायची. त्यानंतर माजघर, त्याच्या बाजूला बाळंतीणीची अंधारी खोली होती. तिथून आत गेल्यावर मग जेवायची जागा होती. त्याच्या एका बाजूला तुळशी वृंदावन होते आणि दुसऱ्या बाजूला चुलखंड होते. मागे न्हाणीघर आणि त्याच्या मागे मोठे परसू होते. त्यात हत्ती सारखी चिंचेची झाडे होती. वरच्या मजल्यावर सगळ्या झोपायच्या खोल्या होत्या. खोल्या कसल्या महालच ते! मोठे घर. त्यात माणसे पण भरपूर रहायची. २ भाऊ, ४ बहिणी, आला-गेला, वाटेकरी, नातेवाईक, आश्रित अशी सगळी मिळून किमान पक्षी २५ ते ३० लोकं तरी पंक्तीला असायची. या पंक्तीला कधी कधी गावातली मंडळी सुद्धा असायची सहज गम्मत म्हणून!! गांधी गेल्यावर तात्या काका बंदूक घेऊन गल्लीच्या दारात उभे राहिले होते म्हणे!! त्यामुळे गल्लीतली बरीच घरे वाचली. त्यांचाही वाडा वाचला. तर त्यांच्या घरी तीन त्रिकाळ जेवणाच्या पंक्ती उठायच्या. एकेका पंक्तीला १००-१०० भाकरी लागायच्या. मग आजी त्यांच्याकडे भाकरी करायला जायची. ५० भाकऱ्या थापल्या कि काकी, काकी म्हणजे तात्या काकांची बायको, तिला २-३ भाकऱ्या आणि भाजी द्यायच्या. त्याच्यावर बाबा आणि आत्याचे जेवण व्हायचे. कृतार्थ मनाने कोडोलीकराना धन्यवाद देत सगळी रात्री झोपी जायची. पुढे मी मोठा झाल्यावर कधी कधी रात्री न जेवताच झोपायला जायचो तेव्हा आजी अगदी कळवळून डोक्यावरून हात फिरवून म्हणायची "उपाशी झोपू नये रे बाळा!!' ती असे का म्हणायची ते कळायला बराच वेळ जावा लागला. तिच्या हाताला बसलेले चटके तेव्हाही जिवंत होते.
आपल्याला हवे ते मिळणे याला जर सुख म्हटले तर आपल्याला जे मिळाले ते हवेसे वाटणे याला मुक्ती म्हणत असावेत. त्या अर्थाने आजी मुक्त होती. तिचे नाव देखील मोठे निर्गुण निराकार होते. कमल. त्याला कुठेही आकार नाही. कसला उकार नाही. वेलांटी नाही कि मात्रा नाही. ती आसक्त तर नव्हतीच. विरक्तही नव्हती. कृष्णाने गीतेत सांगितल्या सारखी ती 'अनासक्त' होती. अगदी मुक्त होती.
मुले मोठी होत होती. शाळेत जायला लागली. त्यांच्या शाळेची फी, पुस्तके, वह्या नवा खर्च उभा राहिला. तशी तिने गल्ली मधली मुले आणि मुली गोळा केली. त्यांच्या सगळ्यांच्या शिकवण्या चालू केल्या. महिन्याला ८ आणे फी! विषय गणित! वास्तविक आजी स्वत: तेव्हाची सातवी पास!! वडील शाळा मास्तर. एकूण १३ भावंडां मध्ये हि ११ वी!! वयाच्या ५ व्या वर्षीच तिची आई देवाघरी गेली आणि मग मोठ्या भावांच्या आणि बहिणींच्या आधाराने मजल दरमजल करत अगदी लग्न होईपर्यंत शिकत राहिली. अण्णा तिच्या पेक्षा चांगले १५ वर्षांनी मोठे होते. लग्न झाले तेव्हा तर जोडी अगदीच विजोड दिसत होती. पण आई विना वाढलेली पोरं!! तिचे वडील सगळ्यांचे करून करून अगदी भागले होते. जे कुणी पहिल्यांदा समोर आले ते त्यांनी जावई केले आणि एकेका पोरीला उजवून मोकळे झाले. अर्थात कुणाचे काही वाईट झाले नाही पण इथे कुणाच्या पसंतीला फारसा वाव नव्हता इतकेच!!
तर आजीने तिचे जुजबी शिक्षण अगदी हातोहात वापरून घेतले. तिचा स्वभाव अतिशय बोलका होता. कुणालाही ती अगदी काही क्षणात आपलेसे करून टाकायची. अगदी कुठेही गेली तरी तिला तिच्या ओळखीचे कुणीतरी भेटायचे. आणि कुणी ओळखीचे भेटले नाही तर हि नव्या ओळखी तयार करायची. वाघ कळपात रहात नाही कारण त्याला त्याची गरज नसते. तो एकटाच त्याच्या साठी समर्थ असतो. पण गरीब गाई, हरणे, नाहीतर शेळ्या नेहमी कळपात राहतात. त्यांना संगतीची विलक्षण ओढ असते. आजीला अशीच संगतीची ओढ होती. कुणाशीही बोलावे. कुठले गाव, माहेर कुठले, मुलगी कुठे दिली आहे, सून कुठली आहे, यातल्या कुठल्या तरी प्रश्नावरून एखादे तरी ओळखीचे गाव तिला सापडायचे आणि मग या गावात माझा भाऊ असतो, नाहीतर बहिण असते, नाहीतर दीर, भाऊजय, नणंद कुणी ना कुणीतरी असते म्हणून ज्या गप्पा सुरु व्हायच्या कि तो माणूस मुग्ध होऊन जायचा. पहिल्या भेटीत आजीच्या अगदी जीवा-भावाच्या मंडळीमध्ये तो माणूस जमा!! अर्धे मिरज तर तिला प्रत्यक्ष ओळखायचे. त्याच्यात मोठे मोठे नामांकित डॉक्टर होते. प्रथितयश वकील होते. मग गल्लीतल्या सगळ्याच पालकांनी आपली मुले अगदी खुशाल तिच्या शिकवणीला पाठवली. त्याच्यात मग श्रीमंताची मुले होती. गरीबाची होती. अगदी आमच्या गल्लीत एक मुसलमान कुटुंब होते. व्यवसायाने तांबट. म्हणजे तांब्याच्या घागरी वगैरे तयार करायचे. आणि त्यांच्या बायका तंबाखूच्या बिड्या वळून विकायच्या. शिक्षणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. पण आश्चर्य म्हणजे त्यांचा गेंगाणा सिकंदर पण आजीच्या शिकवणीला यायचा. आजी मुलांना पाढे शिकवायची. बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार असं अगदी सोपं सोपं शिकवायची. हे सगळं जरी सोपं असलं तरी माणूस आयुष्यात याच्या पेक्षा वेगळे अजून करतो तरी काय हे मला अजून तरी कळलेले नाही.
माणसाला फक्त दिवा लावायचा अधिकार आहे. एकदा ज्योत पेटली की मग उजेडाने कुठे कुठे पडावे हे उजेडच ठरवत असतो. त्याच्यावर माणसाची काहीही सत्ता नसते. आजीने समई लावली होती. आणि आता त्याच्या उजेडात काहीतरी दिसायला लागले होते. दिवस जात होते. मुले मोठी होत होती. आत्या STCPED झाली. ज्या शाळेत शिकली तिथेच शिक्षिका म्हणून तिला नोकरी मिळाली. घराला खूप मोठा आधार झाला. मग तिच्या मागोमाग वडील पण शिकत गेले. आजीचा भार हळू हळू हलका होत होता. वडील विलिंग्डन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दिवस वेगाने बदलत चालले. आजीचे वडीलही गणित शिकवायचे. मुलं मोठी करताना आजीने देखील गणित शिकवले. आणि आता आजीचा मुलगा गणिताचा PhD झाला आणि गणिताचाच प्राध्यापक!! गणित शिकवण्याचा अगदी त्रिवेणी योग होता. आत्याचे लग्न झाले. मग पुढे वडिलांचेही लग्न झाले आणि आजीचा आजी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला.
मी चौथा नातू होता. त्यामुळे मी नातू होण्याच्या आधीच आजी, तीन वेळा तरी आजी झालेली होती. मला कळायला लागल्या पासून मी आजी जवळच असायचो. सकाळ झाली कि आजी मला बखोटीला मारून कोडोलीकारांच्या वाड्यात जायची. मग हम्मा दाखवायची. हम्माला हात लावून द्यायची. मग ते हम्माचे वासरू पण कान टवकारून बघायला लागायचे. तिथेच मग भांडे भरून गाईचे निरसे दुध प्यायला मिळायचे. त्यात एखाद्या हम्माने शी-शी केली कि गम्मत वाटायची. मग तिथलेच एखादे चिपाड घेऊन मी हम्माच्या समोर धरायचो. तिला "खा खा" म्हणायचो. बऱ्याच वेळेला हम्मा काही ते खायची नाही. मग मी नाराज व्हायचो. आपण फक्त तिचे दुदु घेतले आणि तिने आपले चिपाड घेतले नाही याचे वाईट वाटायचे. हम्माच्या पिल्लाला डोक्यावर थोडे थापट केलं कि त्याची भीड चेपते आणि मग ते चिपाड खायला घेतं. हे पुढे कधीतरी कळलं. शब्दांच्या पलीकडे स्पर्शाची भाषा सुरु होते आणि त्या मुक्या जीवाना जिथे शब्दच नसतात त्यांना तर फक्त स्पर्शाचीच भाषा समजते. कळत नकळत हम्माशी मैत्री होत गेली. हळू हळू ऋणानुबंध जुळू लागले होते. हे माझे आणि आजीचे रोज सकाळी हम्मा कडे जाणे गल्लीत इतके प्रसिद्ध झाले, मोठी माणसे गमतीने आजीलाच हम्मा म्हणायला लागली. आणि याची सुरुवात अंता काकाने केली. अंता काकाची आठवण सांगायलाच हवी. त्याशिवाय हि गोष्ट पूर्ण व्हायची नाही. अंता काकाचे पूर्ण नाव अनंत सीताराम फाटक.
आमच्या घरासमोरच कोडोलीकर वाड्याला लागून फाटकांचा वाडा होता. तो हि बराच मोठा होता कोडोलीकर वाड्या सारखाच!! त्या वाड्याच्या एका बाजूला मधू काका चे पडके होते आणि दुसऱ्या बाजूला अंता काका राहायचा. त्याला ३ सोन्या सारखी मुले होती. ताकदवान आणि बलिष्ठ! सगळे हनुमंताचे सख्खे भक्त!! अंता काका देखील उंच धिप्पाड होता. ६ फुट तरी असेल. पण तब्बेत अशी आडवी होती कि तो वाटायचा ५ फुटाचा!! तो कुठल्यातरी सरकारी नोकरीत Inspector होता excise का customs का असेच काही तरी. त्यामुळे त्याचा आवाज हि असा दमदार होता कि त्याने कुणाला साधी हाक जरी मारली तरी सगळ्या गल्लीला ती ऐकू जायची. गल्लीतली माझ्या वयाची पोरं तर अंता काकाला जाम टरकून असायची. वरती हिरवा किंवा करड्या रंगाचा स्वेटर आणि खाली हिरवी नाहीतरी तांबडी चड्डी घालून पाठीमागे हात बांधून हि स्वारी गल्ली भर फिरत असायची. त्यांनी कुणालाही काहीही विचारावे. आमच्या घरासमोरून खूप पोरं शाळेला जायची. कधी कधी त्यांच्या आया त्यांना शाळेत सोडायला जायच्या. मग त्यातलीच काही पोरं रडत-खुरडत चाललेली असायची. त्यांना शाळेत जायचे नसायचे. जोरजोरात भोकाडं पसरलेली असायची. आई ओढत न्यायाची आणि हि मागं खोंडासारखी ओढ देत चाललेली असायची. आया अगदी वैतागलेल्या असायच्या. पोरं म्हणजे अगदी झोंड असायची. असं एखादं पोर अंता काकाला दिसलं कि झालंच त्याचं काम!! त्याला थांबवून अंता काकाने विचारावे 'कितवी ला आहेस रे?' किंवा 'कुठल्या शाळेला जातोस?' नाहीतर 'कुठे राहतोस?' काहीही विचारावे. त्याचा अवतार बघून ते पोर आधीच अर्धमेलं झालेलं असायचं. प्रश्नाचं उत्तर राहू द्या त्याच्या तोंडातून साधा शब्द बाहेर पडायचा नाही. मग अंता काका त्याला अजून घाबरवायचा. 'रडतोस का रे? शाळेला जाणार नाहीस तर काय गुरं राखणार आहेस का?' मग ते पोर अजून जोरात पुंगळी सोडायचं. मग अंता काका अजून पेटायचा. त्याच्याकडे दोन कुत्री होती. एक होता टाग्या आणि दुसरा टाॅम्या. अंता काकाने त्यांना हाक मारायचा अवकाश ती कुत्री लगेच त्या पोराच्या बाजूला गोळा व्हायची. त्या पोराची म्हणजे अगदी बोबडी वळलेली असायची. 'शाळेला जातो पण कुत्रा आवर' अशी अवस्था व्हायची. क्षणात रडणे बंद. पोर मुकाट्याने शाळेला चालू लागायचं. पोराची आई अगदी अंता काकाला मनापासून धन्यवाद द्यायची. याचा परिणाम फक्त त्या एका पोरावर व्हायचा नाही. आजूबाजूने जाणारी ४-५ पोरं पण तो प्रकार पाहत थांबलेली असायची. मग हा प्रकार पाहून त्यांची पण शाळा नियमित सुरु!! अंता काका म्हणजे अगदी टेरर झाला होता पोरांसाठी! पण एक सांगू का, मिरजेची माणसे फणसासारखी!! बाहेरून सगळे काटेच. पण कधी आत डोकावून बघा. गोड गऱ्याची काळीजं दिसायची! अंता काकाचे तेच होते. गल्लीत कुणाच्याही घरी अगदी सकाळी सकाळी घुसावे. त्यांचे पोर उचलावे. खांद्यावर टाकावे आणि बिनधास्त गल्लीभर आपलेच पोर असल्या सारखे फिरावे. काही पोरं रडायची. काही हसायची. मी हसणाऱ्या मधला होता. मला अंता काकाची भीती कधीच वाटली नाही. उलट त्याच्या मजबूत खांद्यावर बसावे. मस्त कोवळ्या उन्हात उभे राहावे. येणाऱ्या गाड्या, माणसे उंचावरून मस्त दिसायची. मजा वाटायची. पण आजीचा जीव वर-खाली व्हायचा. ती म्हणायची 'त्या अंताला नसते शुद्ध!! गल्लीला गेला कि तो गल्लीचा. पोर पडलं तरी कळायचं नाही त्याला. नाहीतर कुठेतरी ठेऊन यायचा तसाच!!' त्यामुळे ती अंता काकाला मला घेऊन जाऊ द्यायची नाही आणि अंता काका काही मला घेतल्या शिवाय सोडायचा नाही. मग एकदा तो मला म्हणाला 'कुठे घेऊन जाते रे आजी तुला?'. मी सांगितले 'हम्मा कडे'. झाले तिथून आजीलाचा हम्मा म्हणायला सुरुवात केली त्याने!! मला विचारायचा 'हम्मा कुठे आहे?' आणि मी आपोआप आजीकडे बोट दाखवायचो. मग अंता काका खूप मोठ्याने हसायचा.
हळू हळू आजीने माझा पूर्णच ताबा घेतला. सकाळी अण्णा तीन चाकी सायकल वरून अंबाबाईच्या देवळात घेऊन जायचे आणि संध्याकाळी आजी!! कुणाबरोबर जायला जास्त आवडायचे ते सांगणे अवघड आहे. अण्णा परत येताना बाबूच्या दुकानातून ५ पैशाच्या गोळ्या घ्यायचे. नियम एकच होता की घरी पोचायच्या आधी सगळे खाऊन संपले पाहिजे. नाहीतर आजी रागवायची दात किडतात म्हणून!! आता यातलं चांगलं कुणाला म्हणायचं?
संध्याकाळी आजी बरोबर वेगळी मजा असायची. गल्लीतल्या सगळ्या म्हाताऱ्या तिथे, अंबाबाईच्या देवळात जमायच्या. बोडसांच्या वहिनी, साधनाच्या आई, सहस्रबुद्धे आजी, देवकुळे आजी, प्रकाशच्या आई, यरगोळे आजी, बोरवणकर आजी, नमाक्का वगैरे सगळ्या नऊ वारी पातळात देवळात जमायच्या. त्यांच्या कपाळावर भले मोठे कुंकू असायचे. जाताना एकमेकींना दारातूनच हाका मारत जायच्या. मोठी गम्मत वाटायची. मी आजी बरोबरच असायचो. मग देवळात गेल्यावर देवीचा धावा सुरु व्हायचा. प्रत्येक बाईची टाळ्या वाजवायची पद्धत निराळी!! कुणाचा उजवा हात अगदी उजव्या काना पर्यंत वर जायचा. कुणाचे दोन्ही हात एकदम दचकुन जागे झाल्या सारखे कुटत राहायचे. डोळे मिटून तल्लीन होऊन "अंबे धाव झणी आता" असा धावा म्हणताना त्यांना पाहिले तर कुणालाही हसू येईल. माझ्या बरोबर अजून २-३ पोरं असायची. मग देवळात सगळी पळायची. वर देवीच्या नगारखान्यात जायची. आजीचं बारीक लक्ष असायचं. त्या देवळात गर्दीत मी किती तरी वेळा चुकलो होतो. पण आजीला बरोबर ठाऊक असायचं मी कुठे आहे ते!! आता आपण हरवलो अशी मला खात्री वाटायला लागली कि आपले काहीतरी चुकले असे वाटायचे. आपोआप मनातल्या मनात मी पण देवीचा धावा म्हणायला लागायचो आणि अचानक देवासारखी आजी समोर येउन उभी रहायची. मग जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. ते कमी म्हणून मग सगळ्या बायका खडी साखर आणि फुटाणे प्रसाद म्हणून द्यायच्या. अगदी तोबरा भरून भरून फुटाणे खायचो. क्षणापूर्वी आपण हरवलो होतो याची मग आठवण सुद्धा नसायची. मग हळूच कधीतरी ABCD शिकायला सुरुवात झाली. आजी कोडोलीकारांच्या झोपाळ्यावर घेऊन बसायची अगदी तासंतास. हळू हळू पायाने झोके घेत, A for Aeroplane, B for Bat, C for Cat वगैरे चालू झाले. आजी गाणी फार सुंदर म्हणायची. कधी 'लिंबोणीच्या झाडाखाली' म्हणायची. त्यातले 'गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊ ताई' हे ऐकताना तर कोडोलीकरांची झोपलेली गाय दिसायची. पेरूच्या आणि चिंचेच्या झाडावर झोपलेल्या घरट्यातल्या चिमण्या दिसायच्या. आणि त्यातच कधीतरी झोप लागून जायची. तिचे 'एका तळ्यात होती, बदके पिल्ले अनेक' हे गाणे ऐकताना तर मला दररोज रडू यायचं. पिल्ले तीच होती, तळेही तेच होते. तरी जोवर त्या कुरूप पिल्लाचा राजहंस व्हायचा नाही तो पर्यंत मला चैन पडायची नाही. तोवर मी रडत रडत जागाच असायचो. त्याच्या नंतर कधी माधव ज्युलिअन यांची आईची कविता म्हणून दाखवायची. तेव्हा तिचा अर्थ कळला नव्हता. पण नंतर जेव्हा ८ वी का ९ वी मधे ती कविता अभ्यासाला आली तेव्हा खूप छान वाटले. आजीने आपल्याला नेमके काय ऐकवलं ते समजून आजीचे कौतुक वाटलं. ती गोष्टी पण फार सुरेख सांगायची. एकदा तिने आईच्या काळजाची गोष्ट सांगितली होती. बायको मागते म्हणून मुलगा आईचे काळीज काढून नेतो. आई पण त्याला मोठ्या कौतुकाने ते देते. ते नेत असताना वाटेत त्या मुलाला ठेच लागल्यावर त्या काळजातून आवाज येतो 'बाळ तुला लागलं तर नाही ना रे?'. खूप वाईट वाटलं होतं ती गोष्ट ऐकून!! गम्मत म्हणजे आजी आणि अण्णा त्याच्या वडिलांना बाळ म्हणायचे. त्यामुळे मला बरेच दिवस त्या गोष्टीतल्या आईच्या जागी आजीच दिसत होती. श्रावण बाळाची गोष्ट तर आजीनेच सांगावी. अर्थात गोष्टीतले सगळे खरे नसते हे कळायचे ते वय नव्हते. पण ते जरी खरे नसले तरी सत्य असते हे जेव्हा कळले तेव्हा त्या गोष्टी मग जगण्याचा भाग झाल्या. मनात खूप आत गेलेल्या गोष्टी कधी आपल्या विचार तंत्राचा भाग होतात ते कळत देखील नाही. आणि नंतर कधीतरी आयुष्यात एखाद्या वेळी त्या विचार तंत्रातून एखादी कृती घडली तर मन मात्र त्याच्या उगमाचा शोध घेत राहते. अशा आजीने सांगितलेल्या कितीतरी गोष्टी बहुतेकदा लहान पाणीच मनात खोल जाउन बसलेल्या असतात आणि पुढे जन्मभर पदोपदी सोबत करत राहतात.
पाकळ्या तरी पराग कणांना अजून दुसरे काय देतात!!
हळू हळू आजी जशी जबाबदारीतून मोकळी होत गेली तशी ती अजूनच खुलत गेली. अण्णाही रिटायर झाले होते. तिने तिची आयुष्याची लढाई जिंकली होती. आयुष्याने जे मागितले ते दान तिने हसत हसत दिले होते. आता आयुष्याकडून तिला मिळायचे बाकी होते. दोघांचेही खरे दात जाऊन मोत्यासारखे खोटे दात आले. एकदाचे ते खरे दात गेले कि माणसातले सगळे विकार संपत असावेत. आणि त्यांची जागा निखळ प्रेमाने भरून निघत असावी. तिच्या चिंता मिटल्या होत्या. स्वस्थ चित्ताने सोन्याचा घास खायचा होता. आजीचा मुळचा मिश्किल स्वभाव दिसायला लागला. कुणीही घरी येउन गेला कि त्याची अगदी हुबेहूब नक्कल करायची. मग तो बाबा असो नाहीतर बाई!! observation आणि acting यातले तिचे काय जास्त चांगले होते ते सांगणे अवघड आहे. पण आजीच्या नकला पाहून कुणालाही हसू यायचे. कधी बाबा घरी नसतील तर ती बाबांची पण नक्कल करायची. आणि मग घरातले सगळे मिळून हसायचे. वास्तविक तिने आता बसून खाल्ले असते तरी तिला काही कमी पडणार नव्हते. आशिर्वाद आणि सल्ल्याशिवाय तिच्या कडून कुणी कसली अपेक्षाही केली नव्हती. पण तिचा जीव संसारात गुंतून गेला होता. कधी तव्यावर तांदळाच्या नाहीतर बाजरीच्या भाकरी करायची. कधी रव्याचा केक, कधी लाडू, चकली नाहीतर शेव करायची. परीक्षेला जाताना हातावर हमखास खडी साखर ठेवायची आणि "जा तुझा पहिला नंबर येईल" असा आशीर्वाद द्यायची. आणि खरेच कुणी पहिले आले तर सगळ्यात मोठा आनंद आजीचा!! लगेच उठून काहीतरी गोड करायला घ्यायची. कधी गुळाच्या पोळ्या, कधी नुसताच गुळाचा सांजा, कधी सत्यनारायणाचा केळ्याचा शिरा आणि कधी वेळ झाला तर आईला हाताशी घेऊन पुरणाची पोळी!!
"माणसानं नेहमी लीन असावं" आणि "समाधानी मनुष्य खरा श्रीमंत" हे तिची दोन आवडीची वाक्यं!!
पुण्यात गेल्यानंतर ती थोडी हळवी झाली होती. सारखी मिरज मिरज करायची. कधी आत्या आली की तिला कानात खुसुखुसु सांगायची की तिला "मिरजेला जावून मरायचे आहे म्हणून"!! गल्लीतल्या बायकाना गोळा करून शेवया करणे, आंबाबाईच्या देवळातला धावा, चैत्रगौरीतले हळदी-कुंकू समारंभ, आंबेडाळ, पन्हं, नाचणीचं अंबील हे सगळं अचानक बंदच झालं. मिरजेत असताना तासगाव वेशेच्या मारुती पर्यंत फिरायला जायची. ते फिरणं देखिल पुण्यात आल्यावर बंद झालं. फर्ग्युसन काॅलेजच्या आवारात फिरायची. मिरजेत चौका-चौकात तिला कुणीतरी ओळखीचं भेटायचं. आता पुण्यात तेही बंद झालं. मग आपली एकटीच घरातल्या देवासमोर बसून धावा म्हणायची. पेटीवर एखादं गाणं वाजवायची. "ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले, मला हे दत्त गुरू दिसले" नाहीतर "आज मी दत्तगुरू पाहीले" असली दत्ताची गाणी म्हणायची. नाहीतर "भजो रे भैय्या, राम गोविंद हरी" किंवा "ठुमकी चलत रामचंद्र, बाजत पैंजनीया" अशी शास्त्रीय वळणाची भजने म्हणायची. या गाण्यात तंत्रापेक्षा तल्लीन होण्याचाच आनंद जास्त होता.
घरातल्या प्रत्येकाचे वाढदिवस तिला पाठ असायचे. प्रत्येकाला काय काय पाहीजे ते आधीच विचारून ठेवायची. अण्णांची पेंशन तिला मिळे. ती साठवून त्यातून ज्याला जे हवे ते आणून द्यायची. वाढदिवसाला नाहीतर दिवाळीच्या दिवशी, लेक, सून, जावई, नातवंडांना ओवाळायचा तिचा आग्रह असे. त्या दिवशी स्वारी अगदी सकाळ पासून खूष असे. दिवसभर सगळ्या कामांची देखरेख करून संध्याकाळच्या ओवाळणीसाठी तिची लगबग व्हायची.
दिवसामागून पान पिकत चाललं होतं. पण जगण्याचा तजेला तोच होता. नऊ वारी पातळ, त्यावर बाबांनी इटलीहून आणलेला निळा जाड जूड स्वेटर, डोक्याला आणि कानाला रुमाल, पायाला जाड पाय मोजे, त्यावर अस्मिताने अमेरिकेतून आणलेल्या कोझी चपला (आजी त्या चपलाना "गोद्या" म्हणायची!), हाताला हात मोजे असा कडेकोट बंदोबस्त करून हातात जपाची माळ घेऊन हरिपाठाचे वाचन सुरु असायचे. "हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी".. हे किती अलौकिक लिहीले आहे याची जाणीव आजीकडे पाहून व्हायची. कोडोलिकरांच्या घरी भाकरी करताना पडलेले तापलेल्या तव्याचे चटके हातावर शिक्का होऊन राहीले असतीलही पण मनाचं आकाश निरभ्रच राहीलं होतं. कुणाचा राग नव्हता. कुणाचा द्वेष नव्हता. आपल्या पोरा-बाळाना खायला करून घालायचा एक छंद सोडला, तर कशाचा लोभही नव्हता. दासबोधाची पारायणे चालू झाली होती. आजी मुळची साताऱ्याची!! त्यामुळे समर्थांवर विशेष भक्ती. माहूलीच्या देवळातल्या गोष्टी सांगायची. चाफळ, सज्जनगड, परळी वगैरे समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गावांच्या आठवणी सांगायची. जुनी जुनी गाणी, जुन्या कविता पाठ म्हणायची. तिची आई तिच्या बालपणीच गेल्यामुळे तिच्या बोलण्यात तिचे वडील खूप वेळेला यायचे. त्यांना तीची भावंडे "भाऊ" म्हणत. १३ मुलांचा संसार आई विना एकट्या भाऊंनी केला याचा तिला जबरदस्त अभिमान होता. कदाचित विपरीत परिस्थिती मधे घनगंभीर राहण्याची तिची प्रेरणा इथूनच येत असावी. कुणी खूप उशीर पर्यंत बाहेर गेलं कि दारात जाऊन वाट बघत बसायची. पुढे मी अमेरिकेत गेल्यावर अधून मधून skype वर भेटायची. तिला त्या नविन तंत्रज्ञानांचं देखिल काही वावडं नव्हतं. माझ्या पोरी पण फार जीव टाकायच्या तिच्यावर!! अर्चिस आणि रेनिसानी तिला "प आजी" असं नाव दिलं होतं.
आयुष्याच्या एका टोकाला शेणाच्या गोवऱ्या चुलीत सारत धुरानी भरलेल्या घरात केलेला मोडका-तोडका संसार होता. तर दुसऱ्या टोकाला, सर्व सुखांनी भरलेला कृतकृत्य संसार होता. मोह कशाचाच नव्हता!! एक दिवशी आईचा फोन आला की आजीला बरं नाही. दवाखान्यात नेलंय म्हणून!! काही काळजी करण्यासारखं नाही असं पण म्हणाली. पण माझा जीव काही स्वस्थ बसेना. मी रोज दोन-तीन फोन करायला लागलो. आजी छान बोलायची. थोडी जीभ जड झाली होती. पण बोलणे स्पष्ट कळत होते. "आर्चिस फार गुणी मुलगी आहे. तिची काळजी घे." असं म्हणाली. ते शेवटचेच बोलणे!!
दुसऱ्या दिवशी आई पाणी आणायला म्हणून खोलीतून बाहेर पडली आणि आजीने डोळे मिटले ते कायमचेच!! जवळ जवळ ८५ वर्षे अखंड चालू असलेला श्वास थांबला. फक्त दुसऱ्याना देण्यासाठी, गेली ८५ वर्षे मायेनं आणि ममतेनं धडधडलेलं प्रेमळ हृदय कायमचं थांबलं. पूर्ण पिकलेलं फळ जसं अलगद झाडावरून निसटतं आणि कृतार्थ जन्मासाठी धरणीला धन्यवाद देण्यासाठी आवेगानं झेपावतं, अगदी तसाच तो क्षण होता. वास्तविक तिचं राहीलं काहीच नव्हतं. तिच्यासाठी मला काही करताही आलं नाही. तरी ती गेल्याचं दु:ख झालं.
भगवद्गीतेमधे कृष्ण अर्जुनाला सांगतात की, अरे ज्यांना तू आज मारणार आहेस, त्यांना होणाऱ्या शारिरीक यातनेपेक्षा तुला होणारी मानसिक यातना मोठी आहे. आणि ती मानसिक यातना हे तुझ्या स्वार्थाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ज्या भीष्माचार्यांना आणि द्रोणाचार्यांना तू तुझ्या बाणांनी सद्गती देणार आहेस, त्यांच्या लेखी तू एक जगातला सर्वोच्च धनुर्धर आहेस. त्यांच्या लेखी तू महान योद्धा आहेस. महारथी कर्णाला धनुर्विद्येत हरविणारा पार्थ आहेस. त्यांच्या तुझ्या बद्दलच्या या भावनेची तुला पुर्ण कल्पना आहे. आणि म्हणूनच तू मनातून दु:खी झाला आहेस की यांच्या जाण्याने तुझे गुणगान गाणाऱ्या या महान प्रशंसकांचा अंत होणार आहे. तुझ्या किर्तीचे गोडवे गाणाऱ्यांची संख्या कमी होणार याचे तुला दु:ख झाले आहे. त्यांच्या बरोबर त्यांच्या हृदयामधे असणारी अर्जुनाबद्दलची अनुकंपा संपून जाणार आहे. याचे तुला दु:ख वाटते आहे. त्यांच्या बरोबरच त्यांच्या मनामधे अखंड वास्तव्य केलेली अर्जुनाची दृढ प्रतिमा देखिल नष्ट होणार आहे. त्याचे तुला दु:ख वाटते आहे. आणि हा फक्त तुझा स्वार्थ आहे.
आजी गेली तेव्हा काहीसं असच वाटत राहीलं..
कापुसलेल्या केसांची� कर्दमलेल्या शालीची� सुरकुतलेल्या मायेची� एक होती आजी ....
जुन्या पुराण्या पोथ्यांची� चुडा भरल्या हातांची� टोप पदरी लुगडयाची� एक होती आजी ....
तुकोबाच्या गाथेची� मनाच्या श्लोकांची� हरीच्या पाठाची� एक होती आजी ....
वाकलेल्या पाठीची� आजोबांच्या काठीची� सुन्ठेच्या चिमटीची � एक होती आजी ....
साखरेच्या खड्याची� खारकेच्या तुकड़याची� बोटभर गुलकंदाची� एक होती आजी ....
साठलेल्या क्षणांची� गोठलेल्या व्रणांची� सोनसावळ्या कणांची� एक होती आजी ....
एक होती आजी� आठवांच्या गाठोड्याची� आसवांच्या उशाशी� डोइवरल्या हाताची
�एक होती आजी ....
~ निखिल कुलकर्णी

रामदासजी मंत्रिमंडळात

रामदासजी आठवले यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. 

याचा अस्मादिकास यथोचित आनंदच झाला आहे. एका सच्चा, सुविद्य आणि सत्शील कार्यकर्त्याचा सन्मान पाहून मन आणि डोळे भरून आले. आपल्या घटनाकारानाही रामदासजींची ही घटनात्मक आणि संघटनात्मक घोडदौड पाहून अचंबाच वाटला असेल.
रामदासजींचे अफाट वक्तृत्व, अचंबित करणारे कर्तृत्व, त्यांच्या साक्षेपी आणि आशयघन कविता आणि एकूणच त्यांनी दिलेला सर्वव्यापी पुरोगामी विचार यांचा हा एक प्रकारचा गौरवच आहे.
अर्थात रामदासजींनी केलेल्या कार्यापुढे हा सन्मान ठेंगणा आहे हे देखील मान्य करावेच लागेल.
मंत्रीपदाची शपथ घेताना नाव विसरणे हे देखील त्यांच्या व्यासंगाचे आणि भारावलेपणाचे व्यवच्छेदक लक्षणच मानावे लागेल.
हा क्रांतिकारी बदल पाहून आम्हास असा विश्वास वाटतो की,
आता आंबेडकर नगरातून नवचैतन्याचे वारे वाहू लागणार. शिक्षण, आयु, आरोग्य, धन आणि संपदा यांनी उन्हवणे, गांगुर्डे आणि मांगाडे यांची बसकी घरे उजळून निघणार.
विक्रोळीच्या संपत गायकवाडला आणि त्याच्या कुटुंबीयांना दादरला हक्काचे सरकारी शौचालय आणि तिथे जाण्यासाठी रेल्वेचा मोफत पास देखील मिळणार.
हि म्हणजे पुढे येऊ घातलेल्या समतेच्या आणि विकासाच्या वादळाची नांदीच म्हणायला हवी.
एक प्रश्न असा पडला आहे कि हे सगळे लख्ख दिसत असून, स्वत:ला छ्त्रपतींचे प्रतिरूप मानणार्या आणि सकल समाजाच्या उन्नतीसाठी आपले अवघे आयुष्य वेचलेल्या, बारामतीच्या जाणत्या राजानी हा बदल त्यांच्या कारकीर्दीत का केला नसावा?
राजांना रामदासजींची पारख नव्हती म्हणावे की उन्हवणे, गांगुर्डे आणि मांगाडे यांची पर्वा नव्हती असे म्हणावे?

भारताचे जाॅर्ज वाॅशिंग्टन

काय मुलं म्हणजे एकेक चमत्कारिक प्रश्न विचारतात अगदी काय उत्तर द्यावे ते सुचतच नाही.
आर्चिस सध्या अमेरिकेचा इतिहास शिकते आहे तिच्या शाळेत. मग ते जाॅर्ज वाॅशिंग्टन, त्याचे सैन्य, त्याच्या वेगवेगळ्या युद्धाच्या कथा वगैरे सगळे मला घरी आल्यावर सांगत बसते. अमेरिकेने कसे लढून ब्रिटिशांना हरवले, कुठली कुठली युद्धे ब्रिटिशांना जड गेली, जाॅर्ज वाॅशिंग्टनने अमेरिकन लोकांना कसे प्रोत्साहन दिले वगैरे असे काय काय सांगत बसते. तिला जाॅर्ज वाॅशिंग्टनचा खूप अभिमान वाटतो.
बरेच आहे. त्यामुळे मलाच कित्येक नविन गोष्टी कळत आहेत.
तिला कुणीतरी शाळेत सांगितले की भारतावर देखील ब्रिटिश राज्य करत होते. मग तिला वाटलं की भारतात देखील एखादा जाॅर्ज वाॅशिंग्टन असेल. तिला कुणीतरी तिच्या मित्राने सांगितले आहे की गांधीजी हे भारताचे जाॅर्ज वाॅशिंग्टन आहेत. मग तिनं विनाकारण माझ्या चौकशा सुरू केल्या आहेत की गाधीजींनी कसे युद्ध केले म्हणून.
आता तिला काय कपाळ सांगायचं!! मला काय वाटतं आणि काय पटतं हे बाजूला ठेवून माझ्या परीनं प्रयत्न चालूच आहेत. "दे दी हमे आजादी बीना खड्ग बीना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल" हे गाणं पण तिला ऐकवून झालं आहे. तरी पण "युद्ध न करता ब्रिटिश भारत सोडून गेलेच कसे?" हा तिचा प्रश्न कायम आहे.
आता भारत स्वतंत्र का झाला किंवा भारत का स्वतंत्र झाला याविषयीच जिथे मोठे मोठे विद्वान गेली ७० वर्षे वाद घालत आहेत (अर्थात यातल्या बहुतेक विद्वानांचे वय ७० पेक्षा कमी आहे हे अजून विशेष!!) तिथं मी तिला काय उत्तर सांगणार!!
मनांत म्हटलं अगं या गांधीजींनी ब्रिटीशाना २५ वर्षे एवढं बोअर केलं की शेवटी ब्रिटीश त्याची टोपी काढून ढसाढसा रडला आणि "देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता, उघड दार देवा" असे म्हणत आंग्लदेशी निघून गेला.
आम्ही मनातच म्हणायचे!!

आरक्षण

बरेच दिवस विचार करतोय की "मराठ्यांना १६ टक्के आरक्षण" याचा व्यत्यास म्हणजे "ब्राह्मणांना ५०% आरक्षण" असा तर नाही?
वास्तविक दोन बोक्यांची, माकडाची आणि गोळ्याच्या वाटणीची गोष्ट पिढ्यानपिढ्या सांगितली जाते आहे. तरी अजून त्याच माकडाकडून वाटणी करून घ्यायची बोक्यांची हौस काही केल्या कमी होत नाही याचे जास्त नवल वाटते.
बोके दिवसेंदिवस खंगतच चाललेत आणि माकडाची चंगळ चालूच आहे.
उठाले रे बाबा!!

औक्षवंत हो, भाग्यवंत हो, शहाणा हो आणि एकदाचा पास हो!!

एवढी सगळी गदळ चालू आहे...ते कोण बुरहान वणी का कोण ते आकाशात गेले, उरी मधे हल्ला झाला आणि १८ सैनिक गेले. शरीफ म्हणतात काश्मिर आमचा..मोदी म्हणतात बलुचिस्तान वेगळा आहे..
असे म्हणतात की वाघ शिकारीला बाहेर पडला की माकडे दंगा करून रान हादरून सोडतात. इथे एवढ्या मोठ्या मोठ्या शिकारी होऊन देखील मर्कटसेना शांत कशी याचे राहून राहून आश्चर्य वाटते.
शबाना आझमी, शोभा डे, शहारूख, राज बब्बर, ओवेसी, मार्कंडेय काटजू सारेच कसे शांत शांत झाले आहेत. कमाल आहे..काहीतरी नक्कीच घडले आहे. किंवा हे लोक काहीतरी विपरीत घडायची वाट पाहत आहेत.
अमिरखान आणि किरण राव पण काही बोलत नाहीत हल्ली..सारे सारे सहिष्णू झाल्यासारखे वाटत असावे..वणीचा स्वर्गाचा मार्ग मोकळा झाला त्याचा आनंद आहेच. शिवाय बरोबरीने १८ सैनिक मेल्यामुळे, आता सहिष्णूता लवकर परत येणार याचा देखील आनंद झालेला दिसतोय दांपत्याला!!
पण मला कळत नाही कि एवढे सगळे मायंदाळ चालू असून आमचा कन्हैय्या आणि त्याचे "लाल" घेवडे मित्र, येचुरी, करात बाई असे गप्प गप्प कसे? अगदी स्टॅलिन मेल्यासारखे गप्प आहेत!! आश्चर्य आहे. "लाल" घेवडे मित्र चीनच्या आदेशाची वाट पहात असावेत. आणि आमचा कन्हैय्या, शेवटी एकदाचा अभ्यासाला लागलेला दिसतो!! आनंद आहे.
औक्षवंत हो, भाग्यवंत हो, शहाणा हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदाचा पास हो!!

राष्ट्रवादी संत - औरंगझेब...

म्हणून सांगतो माझ्यासाठी एकच लक्ष आणि एकच नेतृत्व..महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार!!
राष्ट्रवादी म्हणते की "औरंगझेब हे सुफी संत होते"..
अगदी शप्पथ घेऊन सांगतो की मी सातवीच्या इतिहासाच्या पेपर मधे हेच लिहीले होते. पण त्याच्या बद्दल भटुर्ड्या मास्तरानी माझे ५ मार्क का कापले ते मला अजून कळलेले नाही. या ५ मार्कांमुळे वास्तविक माझा ५२ वा नंबर हुकला होता. त्याच्यावरून माझे वर्ग मित्र अजूनही चिडवत असतात त्याचे फार वाईट वाटते.
माझ्या सारख्या गोरगरीब आणि "पद"दलितांवर अन्याय करायची भटांची खोड अजून गेलेली नाही याचे हे द्योत्यक आहे.
राखिव जागांचे सध्याचे धोरण बदलून १०० भटांपैकी फक्त २ भटांनाच शिक्षणाची परवानगी दिली पाहिजे. बाकीच्या ९८ भटाना ते जिथून आले तिथे परत पाठवून दिले पाहिजे असेही माझे एक ठाम मत आहे. माझी खात्री आहे की साहेबही त्याला मोठ्या मनाने सहमत होऊन लवकरच परवानगी देतील. तर ते एक असो.
पण आज हे राष्ट्रवादीचे पोस्टर आणि त्याच्या समोर बसलेले सुविद्य सत्याग्रही पाहून माझे डोळेच काय, सगळेच भरून आले आहे. शेवटी "सत्यमेव जयते" (मराठी मधे "सत्याकडे मेवा जातो" असे वाचावे) हेच खरे!!
तरी देखील माझ्या इयत्ता सातवीत केलेल्या मौलिक संशोधनाला मिळालेले हे "फिर्दौस" समर्थन पाहून आज खूप मोकळे वाटते आहे.
पेपर मधे पुढे मी "शिवाजी महाराज आग्रयाला औरंगझेबाने आयोजित केलेल्या मुशायर्याला गेले होते आणि तिथे त्यांनी अकबरावर पोवाडा सादर केला. शंभूराजे डफ वाजवत होते. आणि मदारी मेहतर तुणतुणे वाजवत होते. हा पोवाडा औरंगजेबास इतका आवडला की त्याने महाराजाना अंमळ थोडे दिवस आग्र्यात ठेऊनच घेतले आणि त्यांना भरपूर, म्हणजे पेटारे भरभरून, मिठाई खाऊ घातली." असे देखील लिहीले होते.
आता ही सगळी ऐतिहासिक सत्ये कधी सिद्ध होतात त्याची उत्कंठा लागून राहिली आहे.
पवार साहेब हयात आहेत तोवर माझे सगळे इतिहासावरचे ऐतिहासिक शोध सिद्ध होणार आणि सगळे भटुर्डे खोटे ठरणार याची मला पूर्ण खात्री आहे.
जीवेत शरद: शतम् तसेच जीवेत अजित: शतम् सुद्धा!!
("जीवेत अजित: शतम्" असे लिहिलेले ५२ फुटी फ्लेक्स महाराष्ट्राच्या अस्सल राजधानीत, म्हणजे बारामतीत, आमच्या डोळ्यानी पाहिले आहेत. उगाच भटानी संस्कृतातल्या चुका काढू नयेत.)

"कर्तृत्ववान" उमेदवार

एकूणच अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील "कर्तृत्ववान" उमेदवार आणि त्यांचे प्रात:स्मरणीय विचार पाहून गलबलून आले.
हिलरी विरूद्ध डोनाल्ड हा सामना म्हणजे अगदी राजाधिराज मुलायम सिंगांच्या विरूद्ध राजराजेश्वर लालू परशाद पंतप्रधान पदासाठी उभे आहेत असे आम्हास वाटते आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर अमेरिकेचा बिहार होणार की उत्तर परदेश याचीच काय ती उत्कंठा लागून राहिली आहे.
तस्मात आम्ही देखिल "अधेक्ष" पदाचा "फारम" भरण्याच्या विचारात आहोत. फारम कुठे मिळतात ते जर सुज्ञ अमेरिकन नागरिकांनी सांगितले तर त्याना एखादा बरा पर्याय उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.

मनमोहन सिंग संसदेत बोलले...

मनमोहन सिंग संसदेत बोलले म्हणजे भारीच की!!
"काय बोलले" याचा या सामान्य वाचकाला काही बोध झाला असतां तर अधिक समयोचीत झाले असते. तर ते एक असो..
पण ते बोलले असे वर्तमान पत्रे म्हणतात म्हणजे काहीतरी नक्कीच दणदणीत, पुरोगामी, फॅशनेबल आणि सेक्युलर बोलले असणार आणि त्याचा परिणाम देखिल Occult आणि ever lasting असणार हे नक्की..
देशात आजवर होवून गेलेल्या अग्रगण्य वक्त्यांमधे टिळक आणि सावरकरांनंतर मनमोहन सिंगांचाच क्रमांक लागतो याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नाही.
कारण २६/११ तसेच संसद हल्ल्यानंतर त्यांनी केलेले "खणखणीत" भाषण आणि त्याचा पाकिस्तान वर झालेला "दीर्घगामी" प्रभाव आणि अतिरेक्यांची "वळालेली बोबडी" हे त्याचे अगदी बोलकेच उदाहरण आहे. अर्थात २६/११ च्या "दमदार" भाषणानंतर जसा हार्ट अॅटॅक येवून गेला तसा या भाषणानंतर न येवो हीच सदीच्छा!!
तेव्हा आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करूया
"रघूराम राजन जाताना, रघूराम राजन येताना"...

बटाटा

बटाटा हा या पृथ्वीतलावरील एक चमत्कार आहे असे आमचे मत होत चालले आहे.
जावा, बाली, सुमात्रा बेटापासून, रशिया, चीन, या सारख्या खंडप्राय देशांपर्यंत तसेच रवांडा, युगांडा, नायजेरिया, अल्जिरीया करत करत इंग्लंड, अमेरिका आणि आॅस्ट्रेलिया सारख्या विकसीत देशात देखिल मनुष्य मात्राच्या भुकेला धावून येण्याची बटाट्याची स्पृहा हि केवळ अवर्णनीय आहे.
इतक्या वेगवेगळ्या भूभागातल्या माणसांच्या ठेवणीत मुलभूत फरक आहे. तापमान वेगळे आहे. राहणीमान वेगळे आहे. भूगोल वेगळा आहेच पण त्यांचा इतिहास देखिल वेगळा आहे. त्याच्या आवडी-निवडी वेगळ्या आहेत. एका भूभागात रोज खाल्ले जाणारे प्राणी दुसऱ्या देशात अगदी निषिद्ध आहेत. आता कुठे सापाची सोल कढी करून खातात तर कुठे झुरळाचे लोणचे!! याच पृथ्वीतलावर कुठेना कुठे कासव आणि ससा दोघेही माणसाच्या पोटातच जात आहेत. कुणीही शर्यत जिंकली तरी!! कुठे कुठे तर चांगल्या तांबड्या मुंग्या जिवंतच कचा कचा चावून खातात. आधी मुंग्या आपल्याला जिभेला चावतात. मग आपण त्यांना चावायचे. डेलिकसी...दुसरे काय?
याच्या अगदी विपरीत परिस्थिती इतर ठिकाणी असते. अशा ठिकाणी "अभक्ष", "अखाद्य" किंवा "अब्रम्हण्यम्" अशा सदरातली भली मोठी यादी असते. काही काही ठिकाणी तर उच्छवासातल्या गरम हवेने, हवेतले अदृश्य कीटक मरू नयेत याची देखिल काळजी घेतली जाते. देवा-नारायणाला, पशु-पक्षांच्या इतक्या जाती-जमाती तयार करून झाल्यावर, करायला काही शिल्लक राहिले नसावे. म्हणून मग त्याने माणसा मध्ये जाती, प्रजाती, धर्म वगैरे तयार करायचा प्रोजेक्ट सुरु केला असावा.
तर अशा सगळ्या विसंवादी अन्नसंस्कृती मधे आपली मळकट, मातकट साल आणि पांढरट पिवळसर गर घेऊन, यत्र-तत्र-सर्वत्र हा बटाटा मोठ्या आत्मविश्वासानं संचार करतो आहे.
बऱ्याच वेळेला बटाट्याला कांद्याच्या बरोबरीने स्थान दिले जाते. बाजारात किंवा मंडई मधे बहुतेक वेळेला एकच बागवान, कांदे आणि बटाटे एकत्र विकताना दिसतो. फुले मंडई पासून ते अगदी वालमार्ट मधे देखील कांदे आणि बटाटे एकत्र विकायला ठेवलेले असतात. घराघरातून देखिल कांदे आणि बटाटे एकाच बुट्टीत नाहीतर टोपलीत ठेवले जातात.
ज्या मुलाला काहीही येत नाही, त्याच्या डोक्यात देखील कांदे आणि बटाटे एकत्र भरलेले असतात असा एक गैरसमज आहे. ते तसे का? हे मात्र कळायला मार्ग नाही. इतकेच नव्हे तर हा बटाट्यावरील जातीय अन्याय आहे असे आमचे मत आहे. या दोन भाज्यांचा जन्म जमिनीखाली झाला आहे एवढे एकच साम्य त्यांच्या मध्ये आहे. परंतु एखाद्याच्या जन्मस्थळावरून त्याची जन्मभराची पात्रता आणि योग्यता ठरवावी आणि ती पिढ्यांपिढ्या टिकावी हे अन्यायकारक आणि दु:खदायक आहे.
वास्तविक बटाटा हे एक पूर्णान्न असून त्याची सांस्कृतिक, वैचारिक आणि अध्यात्मिक पातळी हि कांद्याहून पूर्ण पणे वेगळी आहे. बटाटा हा सर्वस्वी आपपरभावातून मुक्त झालेला आहे. टर्की सोबत येणारा, ग्रेव्ही मध्ये आकंठ बुडालेला मॅश पोटॅटो हा देखील, साबुदाण्याच्या खिचडीतून विखुरलेल्या आणि शेंगदाण्याच्या कुटाने माखलेल्या बटाट्याच्या तुकड्यांइतकाच आनंददाई असतो. गरम बटाट्याच्या भजीची जितक्या प्रकर्षाने आठवण होते तितक्याच प्रकर्षाने मॅकडोनाल्ड मधल्या खारट fries ची देखील अवचित आठवण होते.
कोल्हापूरच्या बसस्टँड वरच्या भजीच्या गाडीवाल्याचा संसार जितका या बटाट्यावर अवलंबून आहे तितकाच मॅकडोनाल्डच्या मालकाचा संसार देखील या fries वर अवलंबून आहे. किंबहुना असे म्हणतात कि मॅकडोनाल्डने जर fries बंद केल्या तर त्यांचे valuation एका रात्रीत अर्ध्यापेक्षा कमी होईल. पेप्सी सारख्या जागतिक ख्याती असलेल्या कंपनीला त्यांच्या अंध:कारमय भवितव्यात बटाट्याचाच आधार वाटतो आहे. वर्षानुवर्षे अनेकानेक "अमृततुल्य" रसायने विकून झाल्यावर, आता एकामागून एक, बटाट्याच्या चिप्स तयार करणाऱ्या कंपन्या, विकत घेण्याचा सपाटा पेप्सी कंपनीने लावला आहे. या साक्षात्कारातच बटाट्याच्या अफाट लोकप्रियतेची आणि सामर्थ्याची प्रचिती यावी.
अशा जागतिक ख्याती असलेल्या बटाट्याची कांद्या बरोबर होणारी तुलना आणि त्यायोगे होणारी फरफट खेदजनक आहे. वास्तविक कांदा हा लसूण या उग्रट प्रवर्गातील आहे. त्याचे वागणे बऱ्याच वेळेला Rightist वाटते. कांद्यावर सूरी फिरवली असता, जमेल तितका प्रतिकार तो करतो. सुरीची दिशाभूल करणे, "चर चर" असे आवाज काढणे या सर्व क्लृप्त्या करून झाल्यावर, शेवटी आपला पराभव अटळ आहे अशी जेव्हा त्याची खात्री पटते, तेव्हा सुडाने आणि द्वेषाने कांदा पेटून उठतो आणि त्याच्या लपलेल्या विषाच्या कुप्या कापणाऱ्याच्या डोळ्यात फवारतो. कदाचित कापणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्याने तो आपल्याला कापणे थांबवेल असा त्याच्या मागील विचार असावा. इतके प्रयत्न करून देखील जेव्हा कांद्याला माणसाच्या मुख गुहेत चिरविश्रांती साठी पाठवले जाते, तिथे देखील त्याच्या रागाचा, द्वेषाचा आणि सूडाचा दर्प पुढे बराच काळ रेंगाळत राहतो. हे अतिशय दुष्ट आणि सूड बुद्धीचे लक्षण आहे.
याच्या तुलनेत बटाट्याचे वागणे अत्यंत संयमी आणि धीरोदात्त असते. बटाट्यातून सूरी फिरत असताना मुळात बटाट्याकडून कसलाही विरोध होत नाही. कुठेही मरणभयाने अश्रुंचे बांध सुटत नाहीत. जणू कापणाऱ्याच्या हाताला कसलीहि इजा न होवो असाच प्रामाणिक संकल्प बटाटा सिद्धीला नेत असतो.
बटाट्याचे पदार्थ देखील अत्यंत मवाळ, लडिवाळ आणि रसाळ असतात. बरीच स्थळे पाहून जेव्हा मुलीचे लग्न जमत नाही तेव्हा मुलीची एखादी चतुर आत्या नाहीतर मावशी पुढच्या स्थळाला बटाटे पोहे करायचे सुचवते. बाजूला बटाट्याच्या चिप्स नाहीतर बटाट्याचे तिखटा-मिठाचे वेफर्स ठेवते आणि बघता बघता लग्न जमवून टाकते. याचे जन्माचे श्रेय मात्र त्या आत्या नाहीतर मावशीला फुकट मिळून जाते आणि बटाट्याला फक्त जावई क्षुधानिवारणाचे पुण्य!!
हे जसे लग्नात, तसाच प्रकार अगदी युद्धात देखील होतो. लढाईवर जाताना सैनिक खिशातून उकडलेले बटाटे नेतात. वेळ प्रसंग काही सांगता येत नाही. एखाद्या ठिकाणी किती दिवस थांबावे लागेल ते ठाऊक नाही. अशा वेळी हे सैनिक बटाट्यावर कित्येक दिवस काढतात. अचानक एखाद्या वेळी शत्रूची गोळी लागून म्हणा कि अपघाताने म्हणा, तो सैनिक बेशुद्ध झाला कि लगेच बाकीचे लोक नाकाला कांदा फोडून लावतात. मग सैनिक शुद्धीवर आला कि पुन्हा त्याचे श्रेय कांद्याला!!
वास्तविक या कांद्याने जसे कपणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे तसेच त्याने अनेक वेळेला त्याला तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातही पाणी आणले आहे. पोती-पोती कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागला आहे तर कधी कधी पिशवी भर पैशे देऊन खिशातून कांदे आणायला लागले आहेत. आजवर असा बेभरवशी पणा बटाट्याने एकदाही केल्याचे आमच्या ऐकिवात नाही. याला देखील बटाट्याची "मा कश्चित दु:ख भाग भवेत" हि वैचारिक बैठक कारणीभूत असावी असे आमचे मत आहे.
बटाट्याचे माणसावर इतके प्रेम आहे, कि खाणाऱ्या मध्ये तो पूर्ण समरसून जातो. खाणारा देखील आपल्या सारखाच दिसावा अशी त्याची आंतरिक तळमळ असते. पण त्याच्या या प्रामाणिक तळमळीचा, मुळातच काही इतर कारणां मुळे बटाट्या सारखी दिसणारी लबाड माणसे त्यांना सोयीचा अर्थ लावतात. त्यांच्या बटाटा सदृश रुपड्याचा बोल ते बटाट्याला लावत असतात.अशा लोकांचे शरीरं बटाट्यासारखे ओबडधोबड आणि बेडौल असून त्यांचे मन कांद्या दुष्ट आणि सूडकरी असते.
अशाच लबाड लोकांनी, त्यांची थेरे चालवण्यासाठी "कांदे नवमी" सारखे भेदभाव सुरु केले आहेत. यावर तातडीचा उपाय म्हणून "बटाटे शुद्ध षष्टी" आणि "बटाटे कृष्ण षष्टी" लगोलग चालू करावी असे आम्हास वाटते.
पिढ्यांपिढ्या जमिनीखाली वाढून अखिल मानव जातीचे केवळ हीत इच्छिणाऱ्या बटाट्याचा तो उचित सन्मान होईल असे आम्हास वाटते.
लेखनसीमा

जाहीर निषेध!!

राम गणेश गडकरींसारख्या एकमेवाद्वितीय मराठी सारस्वताच्या अपमानाबद्दल अतुल पराक्रमी, सर्वार्थाने हिंदूहृदय सम्राट अशा संभाजी महाराजांचे नावाने ब्रिगेड चालावणाऱ्या भ्याडांचा, बारामतीच्या भडव्यांचा आणि आचरट नारायण राण्यांच्या पुचाट पिलावळीचा जाहीर निषेध!! 😡
गडकरींचा पुतळा नदीत फेकून तुमचा बाप बदलता येतो की काय बारामतीच्या माकडानो!!
अर्वाच्य भाषेबद्दल सुसंस्कृत लोकांची माफी!! पण आमची खात्री पटत चालली आहे की माकडांशी माकडांच्याच भाषेत बोलणे गरजेचे आहे..
आज अत्रे असते तर त्यांनी देखिल हा बारामतीचा माकडचाळा नक्कीच चाबकाने फोडून काढला असता त्यांच्या "मराठा" मधून!!😡

व्यापाऱ्याचा पुरस्कार की पुरस्काराचा व्यापार

साहेबांना "पद्मविभूषण" मिळाला. एकाच माऊलीच्या तीनही मुलाना "पद्म" पुरस्कार मिळणे म्हणजे काही साधे काम आहे की काय? आता "बाकीचे दोन कोण?" असा प्रश्न विचारून लाज काढू तसेच घालवू नये. तसेच "समर्था घरचे श्वान" असे म्हणून हिणवू देखिल नये. असते एखाद्या आडनावात धमक!!
आता महाराष्ट्रातली धरणे "स्वकष्टाने" भरून त्यातून मौलिक रत्ने काढणाऱ्या, आमच्या "प्रमप्रीय, प्रमपूजनीय" वगैरे अशा दादांना "भारतरत्न" कधी मिळतो त्याची उत्कंठा लागून राहिली आहे.
त्याच बरोबर, अत्यंत विषारी अशा "दस नंबरी" नागांशी आपल्या मानवी "सुळ्यांनी" अव्याहत टक्कर देणाऱ्या ताईना गेलाबाजार "परमवीर" नाहीतर "अशोकचक्र" कधी मिळतो त्याची देखिल उत्कंठा आहे ती वेगळीच!!
बाकी राष्ट्रवादीची गोधडी (कृपया "गधडी" असे वाचू नये) भाजपाच्या सोप्यात (म्हणजे मराठीमध्ये "लिविंगरूम" मधे) पसरून सेनेचा तक्क्या-लोड करायची किंमत "पद्मविभूषण" वर तुटली म्हणजे मोदींची कमालच म्हणायची!!
आता फिरा राहिलेले दिवस मिशीला कोकम लावून "तूप तूप" म्हणत!!
शेवटी बेपारी ते बेपारी आणि बिगारी ते बिगारी..काय म्हणतां?