Thursday, April 19, 2012

चेहरा

त्याने तिकीट काढले आणि त्याच्या नेहमीच्या सीट वर जाऊन बसला. आज गाडीला विशेष गर्दी नव्हती. २-४ बाके भरली होती. बाकी बहुतेक बस रिकामीच होती. त्याने त्याच्या भाच्यांसाठी एक लाकडाचा घोडा घेतला होता. दर महिन्याला बहिणीकडे गेल्यावर त्याची भाचरे त्याच्या भोवती जमायची. मामा-मामा करून गिल्ला करायची. मला काय आणले म्हणून त्याच्या हाताला धरून लोंबकाळायची. गेल्या वेळी त्याने ठरवले होते की पुढच्या वेळी काहीतरी नक्की घेऊन जायचे. त्याच्या घराशेजारी एक सुताराचे दुकान होते. त्याच्या कडून त्याने एक घोडा करून घेतला. त्याला बसायला एक मऊ कापसाचे सीट करून घेतले. त्याला त्याची भाचरे त्याच्यावर बसलेली दिसायला लागली. त्यांचे निरागस चेहरे त्याला आठवले आणि तो मनातून हरकून गेला. रात्रीचा प्रवास म्हणून त्याने गाडीत बसण्या पूर्वीच जेवण आटोपून घेतले होते. आता निवांत पणे सकाळ पर्यंत झोप काढू. अशा विचाराने त्याने अंग सैल करायला सुरुवात केली. सबंध दिवस भरात काय काय घडले ते एकेक करून त्याला आठवू लागले. तो साहेब, त्याचा सेक्रेटरी, घर मालक, शेजारी राहणारा गणपा घेवारे, त्याची दिवस भर दारू पिऊन चालणारी टकळी, त्याच्या नावाने शंख करणारी त्याची बायको आणि वयात आलेली सुंदर मुलगी, गल्लीच्या तोंडावर राहणारा पांढर्या कोडाचा विजय मुद्रस. एखादा सिनेमा असावा तसे चेहरे त्याच्या समोरून सरकत होते. त्यांचे आवाज, बोलण्याच्या सवयी, त्यांच्या चेहऱ्यावरचे वांगाचे आणि कोडाचे डाग सारे स्पष्ट दिसत होते. मग तोच त्याचा चाळा होऊन बसला. एका मागोमाग एक गोष्ठी तो आठवू लागला. आणि हे करता करता त्याचा कधी डोळा लागला ते कळलेच नाही. बस निघून देखील आता बराच वेळ झाला होता. आतले-बाहेरचे दिवे कधीच बंद झाले होते. अंधार एकेक करत प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार सांगत होता. १-२ गावे येऊन गेली. गाडीतली इतर माणसे एकेक करत उतरली. आता तो अगदीच एकटा उरला होता. अचानक कसला तरी आवाज आला आणि त्याला जाग आली. त्याने खिडकीतून बाहेर पहिले तेव्हा, त्याला खूप दूर कुठे तरी लहान लहान दिवे दिसत होते. बाकी सर्वत्र अपूर्व काळोख होता. बस थांबली आणि कंडक्टर त्याच्यापाशी येऊन त्याला म्हणाला "साहेब तुमचे गाव आले. उतरा." तो म्हणाला "एवढ्यात? कसे शक्य आहे? माझे गाव तर उद्या सकाळी यायचे आहे. तेव्हा स्वच्छ उजेड असणार आहे." कंडक्टर ने शांत पणाने त्याचे सामान गाडीतून खाली नेऊन ठेवले. आणि पुन्हा त्याच्या पाशी येऊन त्याला म्हणाला "तुम्हाला उतरावे लागेल. हेच तुमचे गाव आहे. ते सामोरे दिवे दिसतात तिथे तुमची बहिण राहते. तिथे तुम्हाला आता जाता येईल."त्याच्या पुढे दुसरा इलाज नव्हता. एका हातात घोडा घेऊन तो निमूटपणाने बस मधून खाली उतरला. अर्धवट झोप होती. कुठे उतरलो याचा काहीच अंदाज लागत नव्हता. काही क्षणात त्याच्या समोरून त्याची बस त्याच्या वर धूळ उडवत निघून गेली. साराच उजेड निघून गेला. मगाशी जे दिवे दिसत होते, ते देखील आता दिसेनासे झाले. अमूर्त अशा त्या अंधारात तोही विरत चालला. एखाद्या महाकाय गुहेत शिरतो आहोत असा त्याला भास झाला आणि त्यानंतर त्याला काहीच दिसेना. कसलाही आवाज ऐकू येईना. त्याने ओरडून देखील पाहिले. पण त्याला त्याचाही आवाज ऐकू आला नाही. जीवाच्या आकांताने त्याने ज्या दिशेला बस गेली तिकडे धावायला सुरुवात केली. पण आता त्याला कसलीच दिशा दिसत नव्हती. तो धावून धावून परत तिथेच येऊन पडत होता. किती तरी वेळेला त्याच्याच सामानाला ठेच लागून पडत होता. ठेचकाळून त्याचे अनवाणी पाय रक्ताने भरले होते. पण त्याला आता कसलीच जाणीव राहिली नव्हती. तो ओरडत सुटला. आपल्याच हातानी आपलेच केस ओरबाडत सैरावैरा धावत सुटला. यातून सुटका नाही याची त्यालाही कल्पना होती. अंगावरच्या कपड्यांचा फाटून चिंध्या झाल्या होत्या. आणि जवळ जवळ विवस्त्र होऊन एका अनामिक भीतीने जडत्वा पासून स्वतःला सोडवण्याचा तो प्रयत्न करत होता. काही वेळानी त्याला भलतेच आवाज ऐकू येऊ लागले. त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी सुद्धा सर्व बाजूनी त्याला ऐकू येऊ लागला. मनातल्या जाणीवा फुलाच्या पाकळ्या सुट्या व्हाव्यात त्या प्रमाणे एकेक करून विलग होऊ लागल्या. भान सुटलेच होते आता काहीही आठवेनासे देखील झाले. तो कोण आहे, कुठे चालला, का चालला, कुठून आला, सारे बंध तुटत चालले. काही क्षणातच तो अगदी एकटा-एकटा झाला. त्याची पावले आता आपोआप चालू लागली. तोही निर्विकार पणे त्यांच्या मागून ओढल्या सारखा जाऊ लागला. आता तो ही अंधारच झाला होता. चालत असताना त्याला मधूनच फांद्यांना फुटलेले, रक्ताळलेले, विद्रूप चेहरे दिसत होते. त्यांचे शोध घेणारे भेदक डोळे त्याला पाहत होते. हे सारे काय आहे? हे कसले चेहरे आहेत? मी कोण आहे? याचा विचार त्याला अस्वस्थ करत होता. आणि अचानक त्याच चेहर्यान्मधला एक चेहरा त्याच्या कडे पाहून हसू लागला. म्हणाला "थांब मित्रा! कुठे चाललास?" त्याच्या पायातले बळच निघून गेले. जणू पाय नसल्या प्रमाणेच तो मटकन खाली बसला. तो जिथे बसला होता, तिथे जागा बरीच थंड आणि लिबलिबीत लागत होती. त्याने हाताने चाचपून पहिले तर खाली सर्वत्र साप पसरले होते. तो आकांताने किंचाळला. तो चेहरा पुन्हा हसू लागला. शेवटी त्याने त्या चेहर्याला विचारले 'तुम्ही कोण? मी ओळखले नाही आपल्याला.' चेहरा तितक्याच निर्विकार पणाने म्हणाला, 'मला ओळखले नाही म्हणतोस? तु तुला तरी ओळखतोस का? कोण तु? कुठून आलास? कुठे चाललास? कशाला चाललास? या जागी तु आत्ता या अवेळी काय करतो आहेस? तु कुठे पोचलास ते तरी तुला ठाऊक आहे का? तु कशावर बसला आहेस?' त्याला यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. उलट त्याला नवीनच प्रश्न पडू लागले. 'मी कोण हे देखील मला ठाऊक नसताना मला भीती का वाटती आहे? हे चेहरे कोण हे ठाऊक नसताना त्यांच्या पासून मी का पाळतो आहे? या चेहऱ्यांची शरीरे कुठे गेली? ज्या सापांवर मी उभा आहे, वास्तविक त्यातील एकही साप मला अजून चावलेला नाही. पण मला त्यांची भीती का वाटते आहे? त्यांचा थंड, ओला, लिबलिबीत स्पर्श मला ओंगळ का वाटतो आहे?' त्याचे त्यालाच हसू यायला लागले. तो निर्धास्त मनाने त्या विद्रूप चेहऱ्याशी बोलायला लागला. 'तुम्ही कोण? मला कशाची ओढ लागली आहे? मला कशाची भीती वाटते आहे? मी कशा पासून पाळतो आहे?' बाजूचे चेहरे लक्ष देऊन त्याच्या कडे पहात होते. एक चेहरा म्हणाला, 'ओढ ही कशाची तरी असते. ओढ लागण्यासाठी काहीतरी असावे लागते. ओढ लागण्यासाठी द्वैताचे अस्तित्व सिद्ध व्हावे लागते आणि द्वैत हे स्वत्वाशिवाय सिद्ध करता येत नाही. तुझ्या जवळ काय आहे? तुला तुझेच अस्तित्व नाही. तुला तुझी ओळख नाही. तु म्हणजे नेमके काय याची व्याख्या देखील तुला करता आलेली नाही. तरी तुला ओढ लागते म्हणतोस?' तो म्हणाला 'हो. काही क्षणांपूर्वी मला भीती वाटत होती. कसली तरी ओढ वाटत होती. कुणा बद्दल तरी प्रेम वाटत होते. मला असे वाटत होते की मला माझी ओळख आहे. माझा चेहरा, माझे शरीर, त्याचे हाव-भाव यामधून मी व्यक्त होत होतो.'एका चेहऱ्याने आपले भेसूर डोळे त्याच्या वर रोखले आणि म्हणाला 'चेहरा हे जर अस्तित्व असेल तर आम्ही जिवंत आहोत का? आणि चेहरा हे जर अस्तित्व नसेल तर आम्ही कोण आहोत?' यावर सारे चेहरे पुन्हा रक्त ठिबकत हसले. तो पुन्हा विचार करू लागला. थोड्या वेळाने त्याने निरागसपणे त्या चेहर्याला विचारले 'चेहऱ्यांना अस्तित्व नसते का? चेहऱ्यांना ओळख तर असते. ओळख आणि अस्तित्व यात काही फरक आहे का?' एक चेहरा उद्वेगाने म्हणाला, 'चेहऱ्यांना स्वतःचे अस्तित्व देखील नसते आणि ओळख देखील नसते. चेहरे शरीराला ओळख देतात. आणि शरीर हे अस्तित्व मानून जगणार्यांना ते आभास देखील देतात. कपडे बदलले म्हणून माणूस बदलत नाही. तसेच हे आहे. शरीरे बदलतात आणि चेहरे त्यांना फक्त ओळख देतात. अस्तित्व हे पुन्हा वेगळेच उरते. ओळखीसाठी प्रकाश असावा लागतो. अस्तित्वासाठी कशाचीही गरज नसते. ते चिरकाल टिकणारे असते. आणि म्हणून त्याला कशाचीही गरज नसते.' यावर तो म्हणाला, 'म्हणजे अस्तित्व दुबळे नव्हे का? अस्तित्वाला ओळखीची सतत गरज लागत असणार. माझी बहिण इथेच कुठे तरी राहते. तिचे अस्तित्व तिचा चेहरा ठरवतो. तिच्या मुलांना देखील चेहरा आहे. आणि चेहरा आहे म्हणूनच ते मला ओळखतात आणि मी त्यांना ओळखू शकतो. या अंधारात जिथे माझी ओळख नष्ट झाली आहे, तिथे मी कुणालाही ओळखू शकत नाही आणि मलाही कुणी ओळखू शकत नाही. या अशा अस्तित्वाचा काय उपयोग आहे? म्हणूनच म्हणालो की अस्तित्वाला चेहरा हवाच.' 'उपयोग?' दुसरा एक चेहरा बोलू लागला. 'ज्या सापांवर तु बसला आहेस त्यांचा उपयोग काय? मित्रा इथेच तुझी गल्लत होते आहे. तु ज्याला अस्तित्व म्हणतो आहेस ती खरे तर ओळख आहे. तु ज्याला प्रेम म्हणतो आहेस, ते प्रेम तुला कुणाच्या तरी बद्दल वाटते आहे. कदाचित तो कुणीतरी कधी तुझा आप्त असेल आणि कदाचित कधी तु स्वतः सुद्धा असशील. तु ज्याला भीती म्हणतोस ती देखील तुला कशाची तरी वाटते आहे. फांद्यांना लागलेले रक्ताळलेले चेहरे तु आधी कधी पाहिले नसशील. म्हणून तुला आमची भीती वाटते आहे. थंड, ओल्या, लिबलिबीत सापांना तु आधी कधी स्पर्श केला होतास का? बहुधा नसेल आणि म्हणून तुला त्या सापांची किळस वाटते आहे. तुझ्या प्रत्येक भावने मागे कोणते तरी साध्य असते आणि मग तु तुझ्या शरीराचे साधन करून त्या साध्याच्या मागे धावत असतोस. आणि हे करण्यात तुझा चेहरा तुला हर घडी मदत करत असतो. मनाची सारी कवाडे चेहऱ्यावर तर असतात. सर्व जगाचे तथाकथित ज्ञान तुला चेहऱ्यावरचे इंद्रिय मिळवून देते. डोळ्यांनी तु पाहू शकतो. नाकाने वास घेऊ शकतोस. जिभेने चव घेऊ शकतोस. त्वचेने स्पर्श करू शकतोस आणि कानाने ऐकू शकतोस. आणि मग तुला भ्रम होतो की हा चेहरा तुला जे मिळवून देतो तेच तुझे साध्य आहे. तो जे देतो त्याची तुला गोडी लागते आणि तु त्यातच रमत जातोस. आणि मग हा चेहरा तुला जी ओळख देतो तेच तुझे अस्तित्व आहे असे देखील तुला वाटायला लागते.' यावर तो म्हणाला 'पण सुखासाठी धावणे यात काही चूक आहे का? चेहरा जे देतो ते अंतरिम समाधान नाही का?' यावर एक चेहरा म्हणाला, 'सुख शांती आणि समाधान यातला फरक तुला ठाऊक आहे का? सुख शरीराला लागते. शांती मनाला हवी असते आणि समाधान आत्मिक असते. आता यातील नेमके तु काय मिळवतोस? काहीही नाही. तु केवळ स्वतःच्या अहं-भावाची हौस पुरवतोस. कुणाला काही दान केल्याने पुण्य मिळते असा तुझा समज आहे. आणि म्हणून तुझ्या डोळ्यांना भिकारी दिसला की तु भिक देऊन मोकळा होतोस. एखादी करून किंकाळी ऐकलीस तर मदत करायला धावतोस. पण या मागे प्रेम निश्चित नाही. कारण तु स्वतःला ओळखलेले नाहीस. भिकारी जेवला असेल या पेक्षा मी भिक दिली याचा तुला अधिक आनंद होतो. एक जीव वाचला असेल या पेक्षा मी जीव वाचवला याचा तुला अधिक आनंद होतो. परंतु मित्रा हा आनंद वांझोटा आहे. त्यातून तु सुख, शांती किंवा समाधान यातील काहीही मिळवू शकत नाहीस. आज या गहन अंधारात तु जो आहेस तेच तुझे खरे अस्तित्व नाही का? तीच तुझी खरी ओळख नाही का? तुझ्या समोर कोणतेही साध्य नाही आणि तुला मागचे काहीही आठवत देखील नाही. तुझ्या अंगावरील वस्त्राची तुला पर्वा नाही की अंगातून वाहणाऱ्या उष्ण रक्ताची देखील तमा नाही. तुला कशाचाही संग शिल्लक नाही. हीच तुझी खरी ओळख आहे.' एवढे बोलून तो चेहरा बोलायचा थांबला. त्याच्या डोळ्यातून आता रक्ताचे अश्रू वाहू लागले होते. त्याचा चेहरा विद्रूप, भेसूर होऊ लागला. त्यांच्या सारखाच, रक्त ठिबकत हसू लागला आणि हलकेच त्याच्या पासून बाजूला होऊन शेजारच्या एका रिकाम्या फांदीवर जाऊन स्थिरावला.

Tuesday, March 27, 2012

ग्रेस

बुधवार दि २८ डिसेंबर २०११. डॉ पुरुषोत्तम काळे यांचा फोन आला. "'ग्रेस' नी वेळ दिली आहे ९.३० नंतरची. लगोलग निघ." हातात फक्त ३० मिनिटे होती. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. वेळ मिळाली याचा आनंद होता. दिवसेंदिवस उन्हा-तान्हात चालणारा वारकरी वाखरी पासून पुढे खूप हळू हळू चालतो असे म्हणतात. त्याचे पाय जड होतात. मन भरून येते. आणि कसा दिसेल माझा विठ्ठल याच्या विचारात त्याची चाल मंदावते. या कवितेच्या वारकर्याला सुद्धा आता साक्षात विठ्ठल भेटणार म्हटल्यावर तसेच काहीसे झाले. शिवाय ग्रेस ची तब्बेत नाजूक आहे. फार बोलले की त्यांना त्रास होतो. कधी कधी ५-१० मिनिटात ते लोकांना निघायला सांगतात. या सर्व विचारांनी राहून राहून वाटत होते 'ग्रेस आपल्याला भेटतील का? आणि भेटले तर बोलतील का?' ज्यांना भेटण्याचे, ज्यांच्याशी बोलण्याचे स्वप्न कळायला लागल्या पासूनच्या वयापासून जपले होते, ते ग्रेस आता काही मिनिटात भेटणार होते. ग्रेसच्याच भाषेत सांगायचे तर भीतीची सावली पायापासून कण भर देखील दूर होत नव्हती. एखाद्या विचित्र रांगोळी टिंबागत ती पाया खालीच घोटाळत होती.

पुरुषोत्तम म्हणाला एखादा बुके आणि थोडे पेढे घेऊन जाऊ. पण माझ्या मनाला अजून काहीतरी ्यायचे होते. बुके आणि पेढे काय कुणाला पण देतो आपण. त्यात "ग्रेस फुल" काय? ग्रेस ला काय द्यावे? ज्याने आजवर संध्येची सूक्ते अलगद मांडली, त्या विश्वव्यापी कवीला, ज्या महाकवीने आपल्या गहीवरानी अमूर्त दुःखाची प्रतिमा साकारली त्या शब्द प्रभूला आपल्या खुज्या हातानी आपण काय देऊ शकतो? पण मग एक विचार मनात आला. ज्याने सगळ्यात मोठे तत्वज्ञान विश्वाला दिले तो कृष्णच ग्रेस ला द्यावा. मग एक कृष्णाची छान शी मूर्ती घेतली आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला गेलो. सकाळची वेळ असल्याने पेढ्याचे एकही दुकान उघडे नव्हते. पुरुषोत्तम बुके घेऊन आला आणि मी कृष्ण. पुरुषोत्तम बरोबर महेंद्र मुंजाळ देखील होता. वास्तविक महेंद्रने ही भेट ठरविण्यात खूप मदत केली होती. मी दिनानाथ मध्ये जात असतानाच वाटेत मला हे दोघे उभे दिसले. त्यांना गाडी लावतो असे सांगून पार्किंग शोधायला लागलो. खूप गर्दी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्या लावलेल्या होत्या. मनातली धाक धुक संयम खोटा करत होती. शेवटी सेवा सदन च्या अगदी दारात, खेटून, एक जागा मिळाली. कशी बशी गाडी लावून जवळ जवळ धावतच सुटलो. हॉस्पिटल पर्यंत येईतोवर चांगली धाप लागली होती. दोघांना घेऊन लगेच ग्रेसच्या खोली कडे निघालो. सहाव्या मजल्यावर एका निवांत खोलीत तितक्याच निवांत पणे ग्रेस बसले होते. पोलो टी-शर्ट, सैलशी दवाखान्याची विजार आणि डोक्याला काळी लोकरीची टोपी. डोळ्यावरचा चष्मा. हातात २-३ वेग-वेगळ्या प्रकारांची आणि धातूंची कडी. त्यांचा एका विशिष्ठ लयीत होणारा आवाज. तोच ग्रेस. दाढी, मिशा आणि केस मात्र काळ घेऊन चाललेला.

बाहेरून विचारले 'आत येऊ का सर?' त्यांनी पण अगदी आमचीच वाट पाहत असल्या सारखे आत बोलावले. म्हणाले 'या सर..' मला कसेतरीच वाटले. ग्रेस नि आपल्याला सर म्हणावे? छे!

'सर प्लीज पण तुम्ही मला सर म्हणू नका.' मी. त्यावर ग्रेस म्हणाले

'का बरे? खरे तर तुम्हाला सर म्हणण्याने मीच मोठा होत असतो. एवढी साधी गोष्ट लोकांना का समजत नाही ते मला माहित नाही.' ग्रेसना वाकून नमस्कार केला. एका मोठ्या दिग्गज कवी आणि तात्विकाला स्पर्श करताना थेट पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवल्यासारखे वाटत होते. ग्रेस म्हणाले 'बसा. पण मी असा वाकून नमस्कार फक्त माझ्या आई-वडिलांना करतो.' काय बोलावे सुचत नव्हते. खूप भारावून गेल्यावर कधी शब्द हरवून तरी जातात किंवा कधी एखादा बांध फुटावा तसे वेडे वाकडे भळाभळा वाहू तरी लागतात. शिवाय काहीतरी कमी अधिक बोललो तर ग्रेस ना काय वाटेल याची धास्ती होतीच.

"तुटलेली ओळख विणता प्राणांची फुटते वाणी, पायांतून माझ्या फिरतो अवकाश निळा अनवाणी."

मी म्हणालो 'सर कोवळ्या मनावरचे ठसे खूप खोल असतात. शाळेत असताना तुमचा 'चिमण्या' नावाचा धडा असाच एक ठसा ठेवून गेलाय. खूप खोल.' ग्रेस हसले. 'शिवाय सांगू का सर माय देशापासून हजारो मैल जेव्हा दूर गेलो तेव्हा सोबतीला होती फक्त मातृभाषा. ती आई सारखीच वाटते तिथे आणि तिचे लेखक आणि कवी वडील होऊन येतात.' ग्रेस यावर अगदी मनापासून हसले. खूप छान वाटले. पिशवीतला कृष्ण काढून त्यांना दिला. बराच वेळ ग्रेस कृष्णाकडे पहातच राहिले. त्यांना मूर्ती तर खूपच आवडलेली दिसत होती. पण कदाचित कसला तरी विचार करत असावेत. डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. अवचित म्हणाले 'तुम्ही माझा मोठाच सन्मान केलात. मला कृष्ण दिलात. माझा आजचा दिवस खूप चांगला साजरा झाला. पण एक विचारू का? तुम्ही मला कृष्ण का दिलात?' मी म्हणालो 'सर तुम्ही मराठी भाषेला जो संध्यामग्न पुरुष दिला, तुम्ही जो कृष्ण दिला तो अमर आहे. त्याचेच हे छोटेसे प्रतिक!'. त्यावर कौतुकाने मान हलवत ग्रेस पुन्हा म्हणाले 'Its great honor. You made my day!' माझ्या आयुष्यातला हा खरेच एक सफल क्षण होता. ज्याने आज वर आपल्याला मूर्तिमंत आनंद दिला, त्या फनकाराला आपण एक क्षण का होईना आनंदी केले याचे मला अतिशय समाधान वाटले.

मग ग्रेसनी सर्वाना त्यांच्या कडचा पेढा खिलविला. त्यातही त्यांनी एक अजोड योग साधला. एक लेडी डॉक्टर तिथे आल्या होत्या. त्यांना ग्रेसनी हाक मारून बोलावून घेतले. त्यांची आम्हाला ओळख करून दिली. आणि शेवटी त्यांच्या हस्ते त्यांनी तो पेढा आम्हाला दिला. आणि त्या डॉ ना म्हणाले सुद्धा 'अहो घराच्या स्त्रीने हातावर गोड ठेवण्याचा योग आहे. आता आम्ही इथे तुमच्या घरी आहोत. तेव्हा तुम्हीच थोडी मदत करा.'

मग गप्पांना सुरुवात झाली. म्हणाले 'ग्रेस म्हातारा झालेला नाही. तो तितकाच तेजस्वी आहे. त्याच्या तेजात काहीही फरक झालेला नाही. तुम्ही ग्रेस ची कोणतीही एक कविता वाचलेली असेल, कोणताही एक लेख वाचलेला असेल तर तुम्हाला तिथे ग्रेस भेटला असेल. आणि तो ग्रेस तितकाच तेजस्वी असेल जितका मी आज तेजस्वी आहे. त्याला इंग्रजी मध्ये एक फार सुंदर शब्द आहे instantaneous immortality. क्षणिक अमर्त्यता. मी आणि हृदयनाथ ने आज वर किमान २७ कार्यक्रम एकत्र केले. मी कधी कुठल्या कार्यक्रमाची तयारी वगैरे केली नाही. भाषण लिहून वगैरे काढले नाही. जो जसा ग्रेस आहे तो तसा व्यक्त करत गेलो. सारी वाक्ये सुचत जातात. एका मागोमाग एक. त्यांची संगती लागलेलीच असते. किंबहुना आता कुठले वाक्य येणार याचा योग जुळत आलेला असतो. आता आपण भेटलो हा देखील एक योग नाही का? तो योग तेजस्वी असतो. त्यात फरक पडणार नाही. माझी स्वतःची मुले डॉ. आहेत. पण मी त्यांच्या कडे जाण्यापेक्षा इथे आलो. हा योग नाहीतर दुसरे काय आहे? माझी पत्नी सुद्धा डॉ होती आणि माझ्या पेक्षा १५ वर्षांनी मोठी होती. हा देखील योगच आहे. नाही का?' आम्ही कानात प्राण आणून ऐकत होतो.

जाण्याच्या आधी एक गोष्ट नक्की केली होती की ज्याने ग्रेस ला त्रास होईल, असे कसलेही प्रश्न विचारायचे नाहीत. या मध्ये ग्रेस च्या तब्बेतीची चौकशी करायची नाही हे पण निश्चित केले होते. पण बोलता बोलता ग्रेस नी स्वतःच विषय काढला. 'आता माझा cancer. आधी घशाला झाला म्हणून इथे आलो. त्याला काढून टाकला आणि परत गेलो. सहज म्हणून डॉक्टर ना म्हटले पोटात थोडे दुखते. तर त्यांनी तिथे पण एक cancer शोधून काढला. अर्थात हे स्वतंत्र राजे आहेत. आधीच्या cancer चे मांडलिक राजे नाहीत. ते एक चांगले. पण एक महिना लागेल म्हणून मी इथे येऊन पडलो. आणि आता पुरे ५ महिने झाले. अजून हलण्याची लक्षणे नाहीत. आता एक दोन महिन्यात निघायचं विचार करतो आहे. पण तुम्हाला सांगू का? माझ्या या खोलीचे दर सदैव उघडे असते. मी मध्यात आहे आणि माझ्या भोवतीची सारी दारे मला उघडीच ठेवायची आहेत. नागपूरला असताना मी दररोज सकाळी ४ वाजता उठतो. ४.३० वाजता मी पाण्यात असतो. मग भलेही कितीही थंडी असो. आणि इतरांची चाहूल लागण्याच्या आधी मी घरी परतलेला असतो. कोणाचीही चाहूल नसते तेव्हा मी माझी प्रार्थना करतो. आता इथे आल्या पासून साऱ्यात खंड पडला आहे.'

ओघ थांबला म्हणून पुरुषोत्तम ने विचारले 'सर तुम्ही एकदा भीमाशंकर ला या. तिथे एक गेस्ट हौस आहे. तिथे तुम्ही मुक्कामाला या. एखादा छान कार्यक्रम करू. अगदी मोजके लोक बोलावू म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.' यावर ग्रेस म्हणाले 'मी जरूर येईन भीमाशंकर ला. पण डॉक्टर गर्दी हा माझ्या लेखी प्रश्नच उरत नाही. मी एकांतवासी नाही. निर्मनुष्य शांततेत मी जर एकटा असेन तर मी वेडा होईन. 'being alone' आणि 'lonliness' या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. मला स्मशान शांतता नको आहे. मला सहवासातला एकांत हवा आहे. ज्या माणसाबद्दल मला विचार करायचा आहे, त्याच्या सोबत राहणेच मी पसंत करेन. मी पक्षी नाही. प्राणी नाही. म्हणून मला त्यांच्या बरोबर राहता येत नाही. आणखी एक भाग असा आहे की I am a traveller and not a tourist. I travel within. मला एखादे ठिकाण पाहायला प्रत्यक्ष तिथे जाण्याची जरुरी नाही. मी माझ्यात बसून तिथे जाऊ शकतो. मी कुठेही जाऊ शकतो. गंगेचे वर्णन करायला मला गंगेवर जावे लागत नाही. पण मग अशी गंगा परकर घालून माझ्या पुढे उभी राहते. आणि मग मी तिचे वर्णन करू लागतो.'

थोडी उसंत पाहून मी त्यांना विचारले, "सर एकदा अमेरिकेला माझ्या कडे राहायला या. तुमच्या कवितांचा एखादा छान कार्यक्रम करू. सर तुम्ही बोला आम्ही ऐकत राहू. अमेरीका पाहू." त्यावर ग्रेस हसले. बराच वेळ काही बोललेच नाहीत. मग हातातल्या कड्यांचा विलक्षण आवाज करत म्हणाले, "सर मी अमेरिकेला जरूर येईन. खरे सांगू का? तर मला अमेरिकेला येवूनच मरायला नक्की आवडेल." मला आश्चर्य वाटले आणि मी विचारले, "मरायला कशाला सर? जगायला आलात तरी चालेल की!" यावर ग्रेस अगदी दिलखुलास हसले. म्हणाले "त्याचे असे आहे की या भूमीने मला जन्म दिला आहे. तिनेच माझे पालन पोषण केले आहे. आता तिच्यावर मरून तिच्या उपकारांची फेड अपकाराने मला करायची नाही. तिचे केवढे ऋण आहे माझ्या वर. म्हणून म्हटले की मला अमेरिकेला मरायला यायचे आहे. " अलगद ग्रेस च्याच ओळी आठवल्या

"गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही; अलगद भरुनी यावे."

ग्रेस च्या या वाक्याने सारेच मुके झालो होतो. मग ग्रेसनीच थोडा वेगळा विषय काढायचा म्हणून विचारले "बर मला एक सांगा तुमच्या अमेरिकेत महाराष्ट्र फौन्डेशन म्हणून एक संस्था आहे आणि बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणून एक संस्था आहे. माझ्या मते दोन्ही मराठी माणसांनी चालवलेल्या संस्था आहेत. त्यांच्यात नेमका फरक काय?"

आता बोलायची माझी पाळी होती आणि प्रश्न मोठाच बाका होता. एकाला चांगले म्हणावे तर दुसरा रागावतो. हे म्हणजे आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना सारखे झाले. शेवटी मनात २-४ वाक्ये जुळवून सुरुवात केली. "काय आहे सर वास्तविक या दोन्ही संस्था मराठीच आहेत. आणि माझ्या मते त्या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. आता त्याच्यातला फरक म्हणाल तर माणसाच्या आयुष्यात जी काही विसंगती आहे ती का आहे याचा शोध घेण्याचा आणि शक्य तितकी ती विसंगती कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र फौन्डेशन करत असते. आणि माणसाच्या आयुष्यात जी सुसंगती आहे ती जास्तीत जास्त वृद्धिंगत कशी करता येईल याचा प्रयत्न बृहन महाराष्ट्र मंडळ करत असते."
हुश्श!! मला हे वाक्य संपता संपता श्वास लागतो की काय असे झाले होते.

यावर देखील अगदी मोकळे पणाने ग्रेस नी दाद दिली. त्यांना विचारले की २०१३ साली बोस्टन ला बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून याल का म्हणून. ग्रेस म्हणाले "अहो तुम्ही बोलवा. मी कुठेही येईन. तुमच्या घरात वळचणीला हाडे पसरण्या पुरती जागा मला दिलीत तरी मला चालेल."

"गेले उकरून घर, नाही भिंतीना ओलावा; भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा."
"आण लिंबोणी सावल्या, नाही आढ्याला छप्पर; वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झालर "

असा पाचूचा गिलावा करणारा आणि चंद्राची झालर लावणारा महाकवी हाडे पसरण्या पुरती जागा मागत होता.
म्हणालो "सर घर तुमचेच आहे. माझी बायको तुम्हाला हवे ते करून घालेल. माझ्या मुली तुमच्याशी खेळतील. तुम्ही त्यांना कविता म्हणून दाखवा. छान मजा करू." मी मनाने ग्रेस ना घरी घेऊन गेलो होतो.

अचानक ग्रेस म्हणाले "तुमचा स्वेटर फारच छान आहे. मला खूप आवडला. इथे खूप थंडी असते. आणि मी काही विशेष कपडे देखील घेऊन आलो नाही. हे म्हणाले ४-५ दिवस लागतील आणि आता पुरे ५ महिने होत आलेत. असा स्वेटर इथे मिळत नाही. हा अमेरिकेचा आहे का?" मी म्हणालो "हो सर. पुढच्या वेळेला येताना मी तुमच्या साठी एक स्वेटर जरूर घेऊन येईन." खूप छान वाटत होते. उद्या एखाद्या वारकर्याला विठोबा म्हणाला की पुढच्या वर्षी येशील तेव्हा तुझ्या गावचा पेढा मला घेऊन ये तर त्या वारकर्याला काय वाटेल? माझ्या बरोबर जाताना माझ्या २-३ कविता घेऊन गेलो होतो. ग्रेस चा अभिप्राय घ्यायचा होता. "काहीही येत नाही तुला" असे जरी ग्रेसनी म्हटले असते तरी चालणार होते. पण ग्रेस नी कविता ओझरत्या वाचल्या. म्हणाले "माझ्या जवळ ठेवून जाल का? मी निवांत वाचून तुम्हाला अभिप्राय लिहून देतो." कृतकृत्य होणे म्हणजे काय याचा अनुभव मी आयुष्यात पहिल्यांदाच घेत होतो.
मग ग्रेसनी त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार वितरण कार्यक्रमाची माहिती सांगितली. त्यांची एक मुलाखत महेंद्र मुंजाळ घेणार होते. त्याची थोडी चर्चा झाली. मग त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ग्रेसनी स्वतः मला आणि पुरुषोत्तम ला दिली. पण मी ३० तारखेला अमेरिकेला परत जाणार असल्याने कार्यक्रमाला जावू शकणार नव्हतो. मग ग्रेस नी पुरुषोत्तम ला आग्रहाने कार्यक्रमाला यायला सांगितले. वर म्हणाले " डॉ भेटत चला वरचे वर. जमले तर नागपूरला एकदा माझ्या घरी राहायला या. म्हणजे मग तुम्हाला ग्रेस कसा जगतो ते अनुभवता येईल. ग्रेस नेमका कशातून निर्माण होतो ते देखील समजेल. निर्मितीच्या मागची पार्श्वभूमी पहिली की मग निर्मितीची खरी मौज कळते. तेव्हा नागपूरला जरूर या."

बराच उशीर झाला होता. ग्रेसची विश्रांतीची वेळ झाली होती. त्यांच्या पुस्तकांवर त्यांचे आशीर्वाद आणि स्वाक्षरी घेतल्या आणि एक फोटो काढण्याची विनंती केली. तेव्हा ग्रेस म्हणाले "ती माझी टोपी आणता का? त्या टोपी शिवाय ग्रेस नाही." मग ती टोपी घालून अतिशय प्रसन्न मनाने २-३ फोटो काढले. पुन्हा एकदा ग्रेस ना वाकून नमस्कार केला. आणि शक्य तितक्या लवकर ग्रेस ना अमेरिकेत घेऊन जायच्या गोष्टी मनात रंगवत ग्रेस चा निरोप घेतला.

नंतर एकदा महेंद्र शी फोन वर बोललो. ग्रेस च्या तब्बेतीची चौकशी केली. तर महेंद्र म्हणाला "तु दिलेल्या कृष्णावर ग्रेस जाम खुश असतात. त्यांनी तो कृष्ण अगदी सारखा डोळ्यासमोर राहील असा ठेवून घेतला आहे. आणि जो कोणी भेटायला येईल त्याला माझ्या अमेरिकेतल्या मित्राने माझ्या साठी कृष्ण आणला म्हणून मोठ्या अभिमानाने सांगतात. का आणला ते पण सांगतात. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात तोच १५-२० वर्षांपूर्वीचा ग्रेस दिसतो."
मला पुढचे ऐकवले नाही. ज्या स्वर्गीय कवीने माझ्या लहान पणा पासून अवघे आयुष्य पुरेल इतका आनंद भरभरून दिला, त्याला शेवटचे काही दिवस का असेना माझ्या भेटीमुळे आनंद होत होता. मला जन्म सार्थकी लागल्याचे समाधान वाटले.

गेला आठवडाभर खूप कामात होतो. रोज ठरवत होतो की आता ग्रेस घरी गेले असतील. त्यांना फोन करू. १-२ दिवसात फोन करणार होतो. आज अचानक सकाळी प्राजक्ताचा फोन येऊन गेला. तिने मेसेज ठेवला होता."ग्रेस गेले. तुझी आठवण झाली. फोन कर." दुपारी जेव्हा तिचा मेसेज ऐकला तेव्हा कसेतरीच वाटले. अमेरिकेची भेट राहिली. स्वेटर द्यायचा राहिला. मुलीना कविता म्हणून दाखवायच्या राहिल्या.

एक स्वर्गीय आनंदयात्री कायमचा कैलासाला निघाला. दुःखाचा महाकवी दुखः मुक्त झाला. अनंताचे दान देऊन मुक्त हस्ताने वैकुंठाला चालला.
"पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने; हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने."
"डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती; रक्ताचा उडाला पारा या नितळ उतरणीवरती."
"पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला? तार्यांच्या प्रहरापाशी पाउस असा कोसळला."
"संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा; माझ्याच किनार्यावरती लाटांचा आज पहारा!"

ती गेली तेव्हाही पाऊस निनादत होता. हा पाऊस ग्रेस अमर करून गेला. ग्रेसची "चन्द्रधून" दूर कुठून तरी ऐकू येत होती.

"मावळता रंग पिसाटे भयभीत उधळली हरीणे; मुद्रेवर अटळ कुणाच्या अश्रूंच्या उतरली किरणे."
"पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले; ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले."
"ते वृक्ष पांढरे झाले. ते वृक्ष पांढरे झाले."

Friday, February 24, 2012

एक होती सवाना

खुप वर्षा पूर्वी मिरजे मधे शिराळ शेठ नावाचा एक प्रकार दर वर्षी असायचा. त्याच्या मधे शेणकूटे एकावर एक रचून, एक भला मोठा माणुस तयार करायचे. त्याला अंगावर एखादे उपरणे म्हणून एखादा पंचा किंवा जुने पातळ घालायचे. डोक्यावर एखादी टोपी असायची. नारळ फोडून त्याचे खोबरे काढून त्या खोबर्याचे डोळे लावले जायचे. त्याच्या हातात एक भली मोठी काठी असायची. या काठीला कसली कसली घुंगरे लावलेली असायची. तोंडात एखादी बीडी असायची. असे ते ओंगळ ध्यान एखाद्या चौकात दिवस भर बसून असायचे. येणारी जाणारी सगळी लहान मुले त्याला घाबरायची. काही धाडसी मंडळी कौतुक म्हणून जवळ जाउन बघायची. पण त्याला हात लावायची कुणाचीच हिम्मत नव्हती. त्याचे डोळे उग्र, भीषण आणि भयाण वाटायचे. काही काही घरातली मोठी माणसे घरातून नैवेद्य आणून त्या शिराळशेठ च्या समोर ठेवायची. आणि हात जोडून म्हणायची
'देवा शिराळशेठा, नैवेद्य मानून घेशील.
लेकरे बाले तुझीच आहेत, त्याना अभय देशील.'
पुढे वर्षभर हीच मोठी माणसे घरातले एखादे मूल ऐकेना झाले, रात्री खुप रडायला लागले तर त्याला दटावायची 'रडू नको नाहीतर शिराळशेठ येइल.' मोठे आश्चर्य वाटायचे.
वास्तविक त्या शिराळशेठची खरी माहिती कुणीच कधी सांगितली नाही. सगळ्या कानोकानी ऐकलेल्या गोष्टी. माझी आजी पण एक गोष्ट सांगायची. तिच्या गोष्टीतला शिराळशेठ म्हणजे खुप मोठा राजा होता. आधी तो खुप प्रेमळ होता आणि त्याला मुले खुप-खुप आवडायची. पण काहीतरी झाले आणि एक दिवस त्याची मुले त्याच्यावर रागावून त्याला सोडून निघून गेली. मग तेव्हा पासून तो खुप कोपीष्ट झाला. आणि भ्रमिष्ट होऊं फिरत राहिला. मग आजी म्हणायची की त्याची पूजा केली तर तो आपल्या मुलाना सुखी ठेवतो. आणि नाही केली तर तो मुलाना त्रास देतो. रागाचे, द्वेशाचे, मत्सराचे आणि एकुणच सर्व मनोविकारांचे शिराळशेठ हा एक प्रतिक असावा. अर्थात त्या वेळची माझ्या बरोबरीची बहुतेक सगळी बच्चे मंडळी अनेक प्रसंगातून वाचली आणि मोठी झाली. बहुतेक माझ्या आजीची प्रार्थना शिराळशेठाने ऐकली असावी.
हे सगळे आठवायचे कारण म्हणजे तिसर्या इयत्तेत शिकणारी सवाना. सवाना अलाबामा मधे रहायची.तिची खरी आई दोन वर्षांपासून घटस्फोट घेउन वेगळी झाली होती. न्यायालयाने सवानाचा ताबा तिच्या वडिलांकडे दिला. आता सवानाच्या घरी तिची आजी, बाबा, सावत्र आई आणि सावत्र भाऊ असे चौघे रहायचे. कामाच्या निमित्ताने तिचे बाबा बर्याच वेळेला बाहेर गावी असायचे. तरी पण सवाना खुप खुश असायची. तिच्या वयाला साजेसे तिचे खेळ खेलायची. तिच्या घरीच एक छोटी घसरगुंडी होती.छोटे मोठे हट्ट करायची. गोळ्या-बिस्किटे मागायची. कागदाची फुलपाखरे करायची. त्यात रंग भरायची. ती अभ्यासात देखिल हुशार होती. सारे छान चालू होते. एका शुक्रवारी नेहमी सारखी ती शालेतून घरी आली. स्कूल बस मधून उतरून आधी तिच्या आजी कड़े गेली. सवानाला त्या दिवशी बस मधे कुणीतरी एक गोळी खायला दिली होती. ती तिने तिथेच खाल्ली. आणि घरी आल्यावर तिने तिच्या आजी ला ही गोष्ट सांगितली. सवानाची आजी खुपच रागीट होती. सवानाची आई गेल्या पासून तर ती खुपच त्रस्त असायची. सवाना कड़े तिचे खुप बारीक़ लक्ष असायचे. आई विना वाढनार्या सवाना ने सर्व गोष्टी योग्य आणि शिस्तबद्ध केल्या पाहिजेत असा तिचा कटाक्ष असायचा.
म्हणुनच सवानाने तिला न सांगता गोळी खाल्ली याचा आजीला खुपच राग आला. आणि तिने सवानाला घरा भोवती धावत फेर्या मारायची शिक्षा दिली. दुपारी ३ वाजल्या पासून सवाना ने धावायला सुरुवात केली. घराचे आवार देखिल खुप मोठे होते. दुपारचे ४ वाजले. शेजारी-पाजारी राहणारे लोक हा प्रकार पाहत होते. पण सवाना का पळते आहे याचे उत्तर त्याना मिळाले नाही. आता ती बिचारी घामा-घूम झाली होती. दुपारचे उन, आणि पोटात अन्नाचा कण शिल्लक नव्हता. आता शरीरातील पाणी देखिल कमी-कमी होत चालले होते. आत्ता आजी हाक मारेल, आत्ता आपल्याला घरात बोलावेल या आशेवर बिचारी सवाना धावत होती. कदाचित आपण मधेच धावायाचे थांबलो तर आजी अजुन रागावेल आणि आपल्याला अजुन काहीतरी शिक्षा होइल अशी तिला भीती वाटत असावी. हा अघोरी प्रकार कुणीतरी थांबवायाला हवा होता. पण तिथे सवानाला अभय द्यायला कुणीच नव्हते. आजी ही नव्हती आणि शिराळशेठ देखिल नव्हता.
कणा-कणानी सुकत चाललेले हे अबोलीचे फुल अड़खळत, ठेचकाळत धावतच होते. कदाचित या वेळात आजीने दमलेल्या सवानाकड़े खिडकीतुन पाहिले देखिल असेल. पण आजीच्या रागाने तिला आतच बसवून ठेवले. आणि अखेर संध्याकाळी ६ वाजता धावता धावता सवाना कोसळली. ती बेशुद्ध झाली. तिची हालचाल मंद होत गेली. मग आजी आणि आई धावत बाहेर आल्या. सवानाला तातडीने दवाखान्यात दाखल केले. पण आता खुप उशीर झाला होता. सवानाच्या शरीरातील पाण्याचा अंश अतिशय कमी झाला होता. तिच्या शरीरातील क्षार देखिल संपून गेले होते. निपचित पडलेली सवाना आता मृत्युच्या दारात उभी होती. डॉ नी तिला कृत्रिम श्वास दिला. आणि तिच्या वडीलाना बोलावून घायला सांगितले. एका अनवट क्षणी आजीच्या मायेची जागा शिस्तीने घेतली. आणि शिस्तीची जागा रागाने. आणि मग याच रागाच्या शिराळशेठा ने एका निरागस पाखराचा जीव घेतला. परगावी गेलेले वडिल परत आले. डॉ नी त्याना वस्तुस्थिति समजावून सांगितली आणि निरुपायाने सोमवारी सकाळी सवाना देवा घरी गेली...
आजी इतकी क्रूर वागू शकते? स्वतः च्या मुलाची मुलगी, तिच्या बाबत आजी इतकी कठोर होऊ शकते? सावत्र का असेना घरी असलेली आई तिला का वाचवू शकली नाही? सवाना स्वतः धावायची का थांबली नाही? शेजारी-पाजारी का बाहेर आले नाहीत? पोलिस काय करत होते? सवानाचे वडिल किती चुकले?सवानाच्या अनैसर्गिक मृत्युने प्रश्नांचे एक वारुळ तयार केले आहे. दोन अश्रु देऊन यांची उत्तरे मिळनार नाहीत. सवानाचा मृत्यु हा केवळ तिचा एकाटिचा मृत्यु नाही. तिच्या मृत्यु बरोबर मनुष्य प्राण्यामधली निरागसता मुकली. आजी च्या नात्यावारचा गाढ विश्वास आटला. कौटुम्बिक नात्यामधला जिव्हाला नाहीसा झाला. कदाचित सवानाच्या वडीलानी दुसरे लग्न केले नसते तर सवाना वाचली असती का? न्यायालयाने सवानाचा ताबा तिच्या खर्या आई कड़े दिला असता तर ती वाचली असती का? वडिल घरी असते तर सवाना वाचली असती का? सवानाला तिच्या मित्राने गोळी दिली नसती तर सवाना वाचली असती का? हे सगळे जर तर चे प्रश्न आहेत.
शेवटी भाबड्या मनाला असे देखिल वाटते की तिच्या आजीने शिराळशेठ ला विनंती केली असती तर? पण इथे तर आजीच शिराळशेठ झाली आहे. त्या शिराळशेठा ला एकच ओरडून सांगावेसे वाटते.
'मेल्या शिराळ शेठा, किती कोप करशील
मेले एखादे पाखरु तर, तू नरकात जाशील'

Thursday, January 26, 2012

माझे इंग्रजीकरण

नमस्कार मंडळी, मी निखील कुलकर्णी. मुळचा सांगली-मिरजेचा. गेल्या १० वर्षा पासून अमेरिकेत राहतो. वास्तविक मी अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी. त्यामुळे साहित्य, नाट्य, वक्तृत्व यांच्याशी संबंध येण्याचा तसा काही एक संबंध नव्हता. पण मला कविता खूप आवडायच्या. शाळेत असताना सुदैवाने अतिशय व्यासंगी शिक्षक मराठी शिकवायचे. त्यांच्या तोंडून कविता ऐकता ऐकता कधी आपसूक रडू यायचे. कधी आई ची आठवण यायची. कधी कधी अचानक खूप काही कळल्या सारखे व्हायचे. आणि कधी नुसताच आनंद व्हायचा. ग्रेस चा चिमण्या हा धडा असो किंवा कुसुमाग्रजांची 'सर नुसतं लढ म्हणा!' ही कविता असो किंवा राम जोश्यांची 'हटातटाची' लावणी असो किंवा अनंत फंदी यांचा एखादा फटका असो.. त्यांचा मनावर खूप खोल ठसा उमटला. वास्तविक हे सारे शिकून आता खूप वर्षे होऊन गेली. पण ते सारे आठवले तरी आज देखील मन तितकेच हळवे होते. थेट शाळेच्या बाकावर जाऊन बसते. आणि आतल्या आत कविता म्हणू लागते. कदाचित याच संस्कारातून मग आधी शाळेत असताना आणि मग कॉलेज मध्ये गेल्यावर भरपूर वक्तृत्व स्पर्धा केल्या. खूप पुस्तके वाचली. जी ए कुलकर्णी, वि वा शिरवाडकर, ग्रेस, मंगेश पाडगावकर, ना धो महानोर, श्री ना पेंडसे, ना सं इनामदार असे सारे जे मिळाले आणि आवडत गेले ते सारे सारे वाचून काढले. भरीस भर म्हणून मोरोपंतांची केकावली, तुकारामांची गाथा, समर्थांचा दासबोध आणि माउलींची ज्ञानेश्वरी वाचली. मध्ये कुणीतरी कुराणाचे मराठी भाषांतर दिले. ते देखील थोडे वाचले. अर्थात त्या वयात यातले समजले किती हा खरेच प्रश्न आहे. पण भाषणात वापरायला म्हणून का होईना खूप वचने, कविता, चारोळ्या अगदी तोंड पाठ केल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धा करून नेमके काय मिळाले ते नक्की ठाऊक नाही. पदरचे पैसे खर्च करून केवळ आनंदासाठी केलेला तो खटाटोप होता. बक्षीस मिळायचे पण त्याच्या रकमेतून प्रवास खर्च वजा केला की उत्तर शून्य यायचे. पण खूप चांगली चांगली माणसे भेटत गेली. साहित्याशी संबंधित अनेक मित्र मिळाले. त्यांच्या कडून काय वाचावे ते कळत गेले. कसे वाचावे ते कळत गेले. खूप ऐकायला मिळाले. खूप वाचायला मिळाले. आणि कळत न कळत मराठी साहित्याचा रंग लागत गेला. मिळालेल्या बक्षिसातून नवीन मराठी पुस्तके घेतली होती. ती अजून आहेत माझ्या बरोबर!
आता अमेरिकेत येऊन देखील १० वर्षे होत आली. १०० वर्षांचे आयुष्य धरले तर त्यात १० वर्षे हा बराच मोठा काळ असतो. तरी देखील संपूर्ण वेगळा देश, त्याचे वेगळे नियम, वेगळी भाषा, वेगळी विचार सरणी या सार्यातून वाट काढत काढत १० वर्षे कशी संपली ते कळले देखील नाही. मागच्या महिन्यात भारतात आलो होतो. तेव्हा ग्रेसची भेट घ्यायची इच्छा सफल झाली. त्या निमित्ताने श्री महेंद्र मुंजाळ यांची भेट झाली. आणि त्यांनी तुम्ही परदेशात स्थाईक झाल्यावर तेथील साहित्याकडे कसे पाहता ? त्यावेळी तुम्हाला मराठी साहित्य कसे वाटते ? यावेळी कुठले साहित्य जवळचे वाटते? म्हणजेच एकूण तुमच्या वाचनात काही फरक पडतो का ? वाचनाची गरज कशी आणि किती प्रमाणात निर्माण होते? या सारख्या प्रश्नांचा परामर्ष घेणारा एखादा लेख लिहायला सांगितला. अतिशय विचार करायला लावणारा विषय वाटला. मी काही फार मोठा साहित्यिक वगैरे नाही. पण मराठी माझी मातृभाषा आहे. तिच्या विषयी मला जे वाटते ते मी या प्रश्नांच्या अनुषंगाने इथे मांडणार आहे.
काही महिन्यापूर्वी मी माझ्या बालवाडी ला जाणार्या मुलीला विचारले की हम्मा कशी करते? तर ती म्हणाली 'ममुSSSSSSह'. आणि भू भू कसे करते? तर म्हणाली 'रुफ रुफ'. मला काही सुचेना. हम्मा ही नेहमी 'हम्मा' म्हणते आणि म्हणून आपण तिला हम्मा म्हणतो. पण जर तीच हम्मा जर 'ममुSSSSSSह' म्हणाली तर? चौकातला मोत्या किंवा वाघ्या नेहमी 'भू भू' करतो म्हणून आपण त्यांना 'भू भू' म्हणायचो. पण तेच भू भू जर 'रुफ रुफ' म्हणाले तर? गम्मत म्हणून मी आणि माझी मुलगी अमेरिकेतली हम्मा बघायला गेलो. आणि काय आश्चर्य! ती हम्मा खरेच 'ममुSSSSSSह' म्हणते आहे हे मला पटले. रस्त्यावरून जाताना एक भू भू भुंकायला लागले आणि काय आश्चर्य! ते भू भू देखील रुफ रुफ करते हे मला पटले.
नेमका हाच फरक मला अस्वस्थ करतो आहे. एकाच जगाच्या पाठीवर राहतो आपण. मी, माझी मुलगी, ते भू भू आणि ती हम्मा. पण ती अमेरिकेत आली की 'ममुSSSSSSह' म्हणते आणि सांगलीत 'हम्मा'. ते भू भू अमेरिकेत 'रुफ रुफ' करते आणि मिरजेत 'भू भू'!
असे म्हणतात की भाषा ही संस्कृतीच्या मुळाशी असते. अगदी खरे आहे ते. आम्ही निर्वासित जेव्हा अमेरिकेत येतो तेव्हा आमच्या जवळ असतात २ ब्याग. बस फक्त २ ब्याग. त्यात मग ५ दिवसांचे कपडे असतात. एखादी चितळ्यांची बाकरवडी असते. एखादा देवाचा फोटो असतो. एखादी लपवून आणलेली, अण्णाबुवाच्या अंगार्याची पुडी असते. आणि एखादे तरी मराठी पुस्तक असते. बर्याच वेळेला सोबतीला कुणीच नसते. इथून सुरु होतो मग नव्या वाटेचा प्रवास. सोबत असते आपली भाषा. आणि ती बोलायला सोबतीला असतो आपणच. आठवणी मध्ये अख्खा महाराष्ट्र असतो. राजगड असतो. रायगड असतो. दौलताबाद चा देवगिरी असतो. शाळा असते. कॉलेज असते. नाती असतात. गोती असतात. पण आपल्या भाषेत गप्पा मारायला असतो फक्त आपले आपण! मला असे वाटते की याच वेळी मायबोली ला मायबोली का म्हणतात ते उमजते. नाते असतेच. ते अधिक घट्ट होते. बाहेर सगळी कडे व्यवहाराची भाषा इंग्रजी. एखादा भारतीय दिसला तर त्याच्याशी सुद्धा इंग्रजी. अगदीच एखादा गुप्ता नाहीतर सिन्हा असला तर मोडके तोडके हिंदी! मराठी काही बोलायला मिळत नाही. पण ते जर मिळाले तर अगदी जग जिंकल्या सारखे वाटते. काही दिवसापूर्वी भारतात असताना फुले मंडई च्या बाजूला शुद्ध मराठी रिक्षावाल्याला हिंदीतून विचारलेला प्रश्न आठवतो 'कोथरूड जानेका क्या?' आणि आपले आपल्यालाच हसू येते.
मग हळू हळू याची सवय होते. सोबत आणलेले मराठी पुस्तक वाचून संपते. मग कुठे मिळेल का मराठी पुस्तक? याचा शोध सुरु होतो. त्याच दरम्यान दारात रोज फुकट पडणारा इंग्रजी पेपर वाचायची सवय होते. 'सकाळ किंवा पुढारी ची मजा यात नाही.' असे म्हणत हळू हळू इंग्रजी पेपर ला आपण राजी होतो. त्यात गावातल्या जाहिराती असतात. गावातले कार्यक्रम असतात. दुकानांची माहिती असते. संस्थांची माहिती असते. हॉटेलचे पत्ते असतात. हे सगळे अगदी जीवनावश्यक साहित्य वाचता वाचता मग कधी अग्रलेख वाचला जातो. ओबामा वर एखादा राजकीय लेख असतो. तो वाचला जातो. हळू हळू मराठी माणूस इंग्रजी वाचायला लागतो.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरीका श्रेष्ठ आहेच। पण त्या प्रचंड शोधांचा उपयोग करून घेण्यात अमेरिकेचा अगदी हातखंडा आहे. अमेरिकेत जगातील सर्वात जास्त साहित्य निर्माण होते. सगळ्यात जास्त पुस्तके इथे लिहिली जातात. सगळ्यात जास्त पुस्तके इथे विकली जातात. रोलिंग चा harry potter घरा घरात पोचतो. लहान मुले त्याच्या रममाण होतात. त्याचे पुढे सिनेमे निघतात. सिनेमांचे ही विक्रम होतात. अत्युच्च कथाकार hollywood मध्ये एका पेक्षा एक सुरस कथानक लिहून त्यावर सिनेमे तयार करतात. त्यांना ऑस्कर मिळतात. त्यांच्या लेखकांना साहित्याची नोबेल मिळतात. पुस्तकांना प्रचंड वाचक मिळतात. अमेरिकेतली वाचन संस्कृती अतिशय समृद्ध आहे. प्रत्येक जण काही ना काही सतत वाचत असतो. कुणी पुस्तक वाचत असेल, कुणी एखादे साप्ताहिक वाचत असेल, तर कुणी त्यांच्या mobile वर किंवा ipad वर एखादे छान मासिक वाचत असेल. भारतीय माणूस जसा हळू हळू अमेरिकेत रुळायला लागतो, तसा तो हळू हळू अमेरिकन माणसा सारखे सतत वाचायला लागतो. अर्थात प्रत्येकाचे वाचायचे विषय वेगळे असले, तरी साधारण पण तत्वज्ञान, व्यवस्थापन शास्त्र, रोमान्स, पाकशास्त्र, पर्यटन, मुलांचे संगोपन आणि त्याच्याशी संबधित साहित्य याची भारतीय आणि विशेष करून मराठी माणसाला विशेष आवड असते. लिहिले गेलेल्या जवळ जवळ प्रत्येक पुस्तकाचे न्यूयोर्क टाईम्स कडून परीक्षण होते. त्यात कुठले पुस्तक बेस्ट सेल्लर आहे ते ठरवले जाते. आणि जे पुस्तक बेस्ट सेलर असेल त्याच्या अक्षरशः लाखो प्रती हातोहात विकल्या जातात. अर्थात या पुस्तकात जसे अमेरिकन लेखक असतात तसे भारतीय पण असतात. नंदन निलेकणी यांनी लिहिलेले 'इमाजीनिंग इंडिया' हे पुस्तक देखील खूप कमी कालावधीत खूप प्रसिद्ध झाले. वाल्टर इझाक्सन ने लिहिलेले स्टीव जॉब्स चे चरित्र देखील खूप प्रसिद्ध झाले. स्टीफन किंग, जॉन ग्रिशम, जेम्स पीटरसन यांची पुस्तके सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. या पुस्तकांच्या कागदी प्रती बरोबरच त्यांच्या इलेक्ट्रोनिक प्रती सुद्धा उपलब्ध असतात. आणि त्या देखील हातोहात संपतात. किंडल, आय पॅड, स्मार्ट फोन आणि कॉम्पुटर वर ही पुस्तके वाचता येतात. एक अगदी ठळक पणे जाणवलेला फरक म्हणजे कविता आणि कविता संग्रह यांचे प्रमाण महाराष्ट्रा च्या तुलनेने खूप कमी आहे. पण नाट्य, कथा, कादंबरी यांनी अमेरिकेतील इंग्रजी साहित्य अतिशय समृद्ध वाटते. साहित्यात असलेले विषय सुद्धा खूप वेगळे असतात. कदाचित अमेरिकन माणूस खूप मोकळ्या स्वभावाचा आहे. त्यामुळे त्याची फार कमी गोष्टीना हरकत किंवा विरोध असतो. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यात तर अमेरीका जगातील बहुतेक सर्वच देशाहून पुढे आहे. काही सन्माननीय अपवाद वगळून! इथे कुणालाही त्याचे मत मांडता येते. ज्यांना ते मत पटते, ते त्याचे वाचन वाचत राहतात. ज्यांना पटत नाही ते सनदशीर मार्गाने विरोध व्यक्त करतात. माध्यमातून मोकळ्या मनाने चर्चा होतात. मुलाखती होतात. दोन्ही बाजूना त्यांची बाजू मांडण्याची संधी प्रसार माध्यमे उपलब्ध करून देतात. अतिशय खेळीमेळी च्या वातावरणात हे सर्व चालते.

अमेरिकेत जेम्स लेन नाहीत असे नाही. पण एक नक्की की इथे शिक्षण संस्थांची तोडफोड करणारी एकही ब्रिगेड नाही.

परवाच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यातील नाते संबंधावर एक पुस्तक प्रसिद्ध झाले. पुस्तकाचे नाव 'द ओबमाज' आणि लेखिका जोडी कांटेर. या पुस्तकाचा विषय मोठा नामी आहे. बराक ओबामा अध्यक्ष झाल्या पासून त्यांच्या कौटुंबिक संबंधावर काही परिणाम झाला आहे का याचा शोध या पुस्तकात घेतला आहे. यात लेखिकेने तिच्या मतानाही जागा दिली आहे. कदाचित यातून काही जणांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या लेखिकेची १ तासाची मुलाखत, प्रख्यात मुलाखत कार, चार्ली रोज याने घेतली. त्यात तिच्या मनात नेमके काय आहे, पुस्तकात नेमके काय आहे, ते लेखिकेला तसे का वाटले याचा उहापोह घेतला. त्यात ती लेखिका म्हणाली सुद्धा की हे पुस्तक तिने बराक आणि मिशेल ओबामा ना प्रत्यक्ष भेटून वाचायला दिले. अर्थात मिशेल ओबामाना त्यातील काही गोष्टी खटकल्या. पण तरी त्यांनी खुल्या मनाने ते पुस्तक जसेच्या तसे स्वीकारले. खरोखरीच कौतुकास्पद गोष्ट आहे. मानवी जीवनाच्या आणि मनाच्या परिपक्वतेचे हे एक चांगले उदाहरण होऊ शकते.
या साहित्यात इजिप्त वर पुस्तके आहे. इराक वर पुस्तके आहेत. भारत पाकिस्तान यातील संबंधावर पुस्तके आहेत. चीन आणि रशियावर पुस्तके आहेत. शेअर बाजारावर पुस्तके आहेत. सप्टेंबर ११ ला झालेल्या हल्ल्यावर पुस्तके आहेत. भारत आणि चीन या देशात जाणार्या कामावर आणि त्याच्या अमेरिकेवर होणार्या परिणामांवर पुस्तके आहेत. पैसा कसा मिळवावा या पासून लग्न कसे करावे इथे पर्यंत पुस्तके आहेत. कदाचित मराठी साहित्यातल्या दर्दी लोकांना हे साहित्य म्हणजे पोरकट वाटायची सुद्धा शक्यता आहे. त्याच्यात क्लिष्ट गुंते नाहीत. त्याच्या फारसे साहित्यिक मूल्य नाही असेही असेल. पण जे नाही त्या विषयी फारसा खेद नाही. जे होणार नाही त्याचा फारसा आग्रह ही नाही. पण जे आहे ते माणसाच्या रोजच्या जगण्याला अतिशय पूरक आहे. या पुस्तकातल्या साहित्याने ज्ञानात, मनाच्या आणि विचारांच्या प्रगल्भतेत वगैरे फारसा पडत नसेल कदाचित. पण त्यातली माहिती व्यवहारात जगताना खूप उपयोगी ठरते आहे. knowledge आणि wisdom याच्यात फरक असतो फक्त अनुभवाचा. आणि मला तरी असे वाटते तो जगण्याच्या उत्कट अनुभव ही पुस्तके मिळवून देत आहेत.

आज १० वर्षांनी मागे वळून पाहताना असे वाटते की इंग्रजी वाचायला लागून मी गमावले काहीच नाही. उलट मराठीने जसा अमृताचा घनु दिला, तुकोबारायांचा पांडुरंग दिला, श्यामची आई दिली आणि शिवबाचा पराक्रम दिला, तसेच इंग्रजी ने देखील आयुष्याचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवला. आयुष्याच्या वेलीला मराठीने आत्मशुद्धीच्या आसवांचे कुंपण घालायचा शिकवले. तर इंग्रजी साहित्याने त्या वेलीला कुंपणाचा आधार घेऊन ताठ मानेने उभे राहायला शिकवले.
आई ची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण आई बरोबर एखाद्या मावशीची माया मिळाली तरी माझी त्याला काही हरकत नाही.
जय हिंद! जय महाराष्ट्र!