Thursday, January 26, 2012

माझे इंग्रजीकरण

नमस्कार मंडळी, मी निखील कुलकर्णी. मुळचा सांगली-मिरजेचा. गेल्या १० वर्षा पासून अमेरिकेत राहतो. वास्तविक मी अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी. त्यामुळे साहित्य, नाट्य, वक्तृत्व यांच्याशी संबंध येण्याचा तसा काही एक संबंध नव्हता. पण मला कविता खूप आवडायच्या. शाळेत असताना सुदैवाने अतिशय व्यासंगी शिक्षक मराठी शिकवायचे. त्यांच्या तोंडून कविता ऐकता ऐकता कधी आपसूक रडू यायचे. कधी आई ची आठवण यायची. कधी कधी अचानक खूप काही कळल्या सारखे व्हायचे. आणि कधी नुसताच आनंद व्हायचा. ग्रेस चा चिमण्या हा धडा असो किंवा कुसुमाग्रजांची 'सर नुसतं लढ म्हणा!' ही कविता असो किंवा राम जोश्यांची 'हटातटाची' लावणी असो किंवा अनंत फंदी यांचा एखादा फटका असो.. त्यांचा मनावर खूप खोल ठसा उमटला. वास्तविक हे सारे शिकून आता खूप वर्षे होऊन गेली. पण ते सारे आठवले तरी आज देखील मन तितकेच हळवे होते. थेट शाळेच्या बाकावर जाऊन बसते. आणि आतल्या आत कविता म्हणू लागते. कदाचित याच संस्कारातून मग आधी शाळेत असताना आणि मग कॉलेज मध्ये गेल्यावर भरपूर वक्तृत्व स्पर्धा केल्या. खूप पुस्तके वाचली. जी ए कुलकर्णी, वि वा शिरवाडकर, ग्रेस, मंगेश पाडगावकर, ना धो महानोर, श्री ना पेंडसे, ना सं इनामदार असे सारे जे मिळाले आणि आवडत गेले ते सारे सारे वाचून काढले. भरीस भर म्हणून मोरोपंतांची केकावली, तुकारामांची गाथा, समर्थांचा दासबोध आणि माउलींची ज्ञानेश्वरी वाचली. मध्ये कुणीतरी कुराणाचे मराठी भाषांतर दिले. ते देखील थोडे वाचले. अर्थात त्या वयात यातले समजले किती हा खरेच प्रश्न आहे. पण भाषणात वापरायला म्हणून का होईना खूप वचने, कविता, चारोळ्या अगदी तोंड पाठ केल्या होत्या. वक्तृत्व स्पर्धा करून नेमके काय मिळाले ते नक्की ठाऊक नाही. पदरचे पैसे खर्च करून केवळ आनंदासाठी केलेला तो खटाटोप होता. बक्षीस मिळायचे पण त्याच्या रकमेतून प्रवास खर्च वजा केला की उत्तर शून्य यायचे. पण खूप चांगली चांगली माणसे भेटत गेली. साहित्याशी संबंधित अनेक मित्र मिळाले. त्यांच्या कडून काय वाचावे ते कळत गेले. कसे वाचावे ते कळत गेले. खूप ऐकायला मिळाले. खूप वाचायला मिळाले. आणि कळत न कळत मराठी साहित्याचा रंग लागत गेला. मिळालेल्या बक्षिसातून नवीन मराठी पुस्तके घेतली होती. ती अजून आहेत माझ्या बरोबर!
आता अमेरिकेत येऊन देखील १० वर्षे होत आली. १०० वर्षांचे आयुष्य धरले तर त्यात १० वर्षे हा बराच मोठा काळ असतो. तरी देखील संपूर्ण वेगळा देश, त्याचे वेगळे नियम, वेगळी भाषा, वेगळी विचार सरणी या सार्यातून वाट काढत काढत १० वर्षे कशी संपली ते कळले देखील नाही. मागच्या महिन्यात भारतात आलो होतो. तेव्हा ग्रेसची भेट घ्यायची इच्छा सफल झाली. त्या निमित्ताने श्री महेंद्र मुंजाळ यांची भेट झाली. आणि त्यांनी तुम्ही परदेशात स्थाईक झाल्यावर तेथील साहित्याकडे कसे पाहता ? त्यावेळी तुम्हाला मराठी साहित्य कसे वाटते ? यावेळी कुठले साहित्य जवळचे वाटते? म्हणजेच एकूण तुमच्या वाचनात काही फरक पडतो का ? वाचनाची गरज कशी आणि किती प्रमाणात निर्माण होते? या सारख्या प्रश्नांचा परामर्ष घेणारा एखादा लेख लिहायला सांगितला. अतिशय विचार करायला लावणारा विषय वाटला. मी काही फार मोठा साहित्यिक वगैरे नाही. पण मराठी माझी मातृभाषा आहे. तिच्या विषयी मला जे वाटते ते मी या प्रश्नांच्या अनुषंगाने इथे मांडणार आहे.
काही महिन्यापूर्वी मी माझ्या बालवाडी ला जाणार्या मुलीला विचारले की हम्मा कशी करते? तर ती म्हणाली 'ममुSSSSSSह'. आणि भू भू कसे करते? तर म्हणाली 'रुफ रुफ'. मला काही सुचेना. हम्मा ही नेहमी 'हम्मा' म्हणते आणि म्हणून आपण तिला हम्मा म्हणतो. पण जर तीच हम्मा जर 'ममुSSSSSSह' म्हणाली तर? चौकातला मोत्या किंवा वाघ्या नेहमी 'भू भू' करतो म्हणून आपण त्यांना 'भू भू' म्हणायचो. पण तेच भू भू जर 'रुफ रुफ' म्हणाले तर? गम्मत म्हणून मी आणि माझी मुलगी अमेरिकेतली हम्मा बघायला गेलो. आणि काय आश्चर्य! ती हम्मा खरेच 'ममुSSSSSSह' म्हणते आहे हे मला पटले. रस्त्यावरून जाताना एक भू भू भुंकायला लागले आणि काय आश्चर्य! ते भू भू देखील रुफ रुफ करते हे मला पटले.
नेमका हाच फरक मला अस्वस्थ करतो आहे. एकाच जगाच्या पाठीवर राहतो आपण. मी, माझी मुलगी, ते भू भू आणि ती हम्मा. पण ती अमेरिकेत आली की 'ममुSSSSSSह' म्हणते आणि सांगलीत 'हम्मा'. ते भू भू अमेरिकेत 'रुफ रुफ' करते आणि मिरजेत 'भू भू'!
असे म्हणतात की भाषा ही संस्कृतीच्या मुळाशी असते. अगदी खरे आहे ते. आम्ही निर्वासित जेव्हा अमेरिकेत येतो तेव्हा आमच्या जवळ असतात २ ब्याग. बस फक्त २ ब्याग. त्यात मग ५ दिवसांचे कपडे असतात. एखादी चितळ्यांची बाकरवडी असते. एखादा देवाचा फोटो असतो. एखादी लपवून आणलेली, अण्णाबुवाच्या अंगार्याची पुडी असते. आणि एखादे तरी मराठी पुस्तक असते. बर्याच वेळेला सोबतीला कुणीच नसते. इथून सुरु होतो मग नव्या वाटेचा प्रवास. सोबत असते आपली भाषा. आणि ती बोलायला सोबतीला असतो आपणच. आठवणी मध्ये अख्खा महाराष्ट्र असतो. राजगड असतो. रायगड असतो. दौलताबाद चा देवगिरी असतो. शाळा असते. कॉलेज असते. नाती असतात. गोती असतात. पण आपल्या भाषेत गप्पा मारायला असतो फक्त आपले आपण! मला असे वाटते की याच वेळी मायबोली ला मायबोली का म्हणतात ते उमजते. नाते असतेच. ते अधिक घट्ट होते. बाहेर सगळी कडे व्यवहाराची भाषा इंग्रजी. एखादा भारतीय दिसला तर त्याच्याशी सुद्धा इंग्रजी. अगदीच एखादा गुप्ता नाहीतर सिन्हा असला तर मोडके तोडके हिंदी! मराठी काही बोलायला मिळत नाही. पण ते जर मिळाले तर अगदी जग जिंकल्या सारखे वाटते. काही दिवसापूर्वी भारतात असताना फुले मंडई च्या बाजूला शुद्ध मराठी रिक्षावाल्याला हिंदीतून विचारलेला प्रश्न आठवतो 'कोथरूड जानेका क्या?' आणि आपले आपल्यालाच हसू येते.
मग हळू हळू याची सवय होते. सोबत आणलेले मराठी पुस्तक वाचून संपते. मग कुठे मिळेल का मराठी पुस्तक? याचा शोध सुरु होतो. त्याच दरम्यान दारात रोज फुकट पडणारा इंग्रजी पेपर वाचायची सवय होते. 'सकाळ किंवा पुढारी ची मजा यात नाही.' असे म्हणत हळू हळू इंग्रजी पेपर ला आपण राजी होतो. त्यात गावातल्या जाहिराती असतात. गावातले कार्यक्रम असतात. दुकानांची माहिती असते. संस्थांची माहिती असते. हॉटेलचे पत्ते असतात. हे सगळे अगदी जीवनावश्यक साहित्य वाचता वाचता मग कधी अग्रलेख वाचला जातो. ओबामा वर एखादा राजकीय लेख असतो. तो वाचला जातो. हळू हळू मराठी माणूस इंग्रजी वाचायला लागतो.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरीका श्रेष्ठ आहेच। पण त्या प्रचंड शोधांचा उपयोग करून घेण्यात अमेरिकेचा अगदी हातखंडा आहे. अमेरिकेत जगातील सर्वात जास्त साहित्य निर्माण होते. सगळ्यात जास्त पुस्तके इथे लिहिली जातात. सगळ्यात जास्त पुस्तके इथे विकली जातात. रोलिंग चा harry potter घरा घरात पोचतो. लहान मुले त्याच्या रममाण होतात. त्याचे पुढे सिनेमे निघतात. सिनेमांचे ही विक्रम होतात. अत्युच्च कथाकार hollywood मध्ये एका पेक्षा एक सुरस कथानक लिहून त्यावर सिनेमे तयार करतात. त्यांना ऑस्कर मिळतात. त्यांच्या लेखकांना साहित्याची नोबेल मिळतात. पुस्तकांना प्रचंड वाचक मिळतात. अमेरिकेतली वाचन संस्कृती अतिशय समृद्ध आहे. प्रत्येक जण काही ना काही सतत वाचत असतो. कुणी पुस्तक वाचत असेल, कुणी एखादे साप्ताहिक वाचत असेल, तर कुणी त्यांच्या mobile वर किंवा ipad वर एखादे छान मासिक वाचत असेल. भारतीय माणूस जसा हळू हळू अमेरिकेत रुळायला लागतो, तसा तो हळू हळू अमेरिकन माणसा सारखे सतत वाचायला लागतो. अर्थात प्रत्येकाचे वाचायचे विषय वेगळे असले, तरी साधारण पण तत्वज्ञान, व्यवस्थापन शास्त्र, रोमान्स, पाकशास्त्र, पर्यटन, मुलांचे संगोपन आणि त्याच्याशी संबधित साहित्य याची भारतीय आणि विशेष करून मराठी माणसाला विशेष आवड असते. लिहिले गेलेल्या जवळ जवळ प्रत्येक पुस्तकाचे न्यूयोर्क टाईम्स कडून परीक्षण होते. त्यात कुठले पुस्तक बेस्ट सेल्लर आहे ते ठरवले जाते. आणि जे पुस्तक बेस्ट सेलर असेल त्याच्या अक्षरशः लाखो प्रती हातोहात विकल्या जातात. अर्थात या पुस्तकात जसे अमेरिकन लेखक असतात तसे भारतीय पण असतात. नंदन निलेकणी यांनी लिहिलेले 'इमाजीनिंग इंडिया' हे पुस्तक देखील खूप कमी कालावधीत खूप प्रसिद्ध झाले. वाल्टर इझाक्सन ने लिहिलेले स्टीव जॉब्स चे चरित्र देखील खूप प्रसिद्ध झाले. स्टीफन किंग, जॉन ग्रिशम, जेम्स पीटरसन यांची पुस्तके सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. या पुस्तकांच्या कागदी प्रती बरोबरच त्यांच्या इलेक्ट्रोनिक प्रती सुद्धा उपलब्ध असतात. आणि त्या देखील हातोहात संपतात. किंडल, आय पॅड, स्मार्ट फोन आणि कॉम्पुटर वर ही पुस्तके वाचता येतात. एक अगदी ठळक पणे जाणवलेला फरक म्हणजे कविता आणि कविता संग्रह यांचे प्रमाण महाराष्ट्रा च्या तुलनेने खूप कमी आहे. पण नाट्य, कथा, कादंबरी यांनी अमेरिकेतील इंग्रजी साहित्य अतिशय समृद्ध वाटते. साहित्यात असलेले विषय सुद्धा खूप वेगळे असतात. कदाचित अमेरिकन माणूस खूप मोकळ्या स्वभावाचा आहे. त्यामुळे त्याची फार कमी गोष्टीना हरकत किंवा विरोध असतो. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यात तर अमेरीका जगातील बहुतेक सर्वच देशाहून पुढे आहे. काही सन्माननीय अपवाद वगळून! इथे कुणालाही त्याचे मत मांडता येते. ज्यांना ते मत पटते, ते त्याचे वाचन वाचत राहतात. ज्यांना पटत नाही ते सनदशीर मार्गाने विरोध व्यक्त करतात. माध्यमातून मोकळ्या मनाने चर्चा होतात. मुलाखती होतात. दोन्ही बाजूना त्यांची बाजू मांडण्याची संधी प्रसार माध्यमे उपलब्ध करून देतात. अतिशय खेळीमेळी च्या वातावरणात हे सर्व चालते.

अमेरिकेत जेम्स लेन नाहीत असे नाही. पण एक नक्की की इथे शिक्षण संस्थांची तोडफोड करणारी एकही ब्रिगेड नाही.

परवाच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यातील नाते संबंधावर एक पुस्तक प्रसिद्ध झाले. पुस्तकाचे नाव 'द ओबमाज' आणि लेखिका जोडी कांटेर. या पुस्तकाचा विषय मोठा नामी आहे. बराक ओबामा अध्यक्ष झाल्या पासून त्यांच्या कौटुंबिक संबंधावर काही परिणाम झाला आहे का याचा शोध या पुस्तकात घेतला आहे. यात लेखिकेने तिच्या मतानाही जागा दिली आहे. कदाचित यातून काही जणांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या लेखिकेची १ तासाची मुलाखत, प्रख्यात मुलाखत कार, चार्ली रोज याने घेतली. त्यात तिच्या मनात नेमके काय आहे, पुस्तकात नेमके काय आहे, ते लेखिकेला तसे का वाटले याचा उहापोह घेतला. त्यात ती लेखिका म्हणाली सुद्धा की हे पुस्तक तिने बराक आणि मिशेल ओबामा ना प्रत्यक्ष भेटून वाचायला दिले. अर्थात मिशेल ओबामाना त्यातील काही गोष्टी खटकल्या. पण तरी त्यांनी खुल्या मनाने ते पुस्तक जसेच्या तसे स्वीकारले. खरोखरीच कौतुकास्पद गोष्ट आहे. मानवी जीवनाच्या आणि मनाच्या परिपक्वतेचे हे एक चांगले उदाहरण होऊ शकते.
या साहित्यात इजिप्त वर पुस्तके आहे. इराक वर पुस्तके आहेत. भारत पाकिस्तान यातील संबंधावर पुस्तके आहेत. चीन आणि रशियावर पुस्तके आहेत. शेअर बाजारावर पुस्तके आहेत. सप्टेंबर ११ ला झालेल्या हल्ल्यावर पुस्तके आहेत. भारत आणि चीन या देशात जाणार्या कामावर आणि त्याच्या अमेरिकेवर होणार्या परिणामांवर पुस्तके आहेत. पैसा कसा मिळवावा या पासून लग्न कसे करावे इथे पर्यंत पुस्तके आहेत. कदाचित मराठी साहित्यातल्या दर्दी लोकांना हे साहित्य म्हणजे पोरकट वाटायची सुद्धा शक्यता आहे. त्याच्यात क्लिष्ट गुंते नाहीत. त्याच्या फारसे साहित्यिक मूल्य नाही असेही असेल. पण जे नाही त्या विषयी फारसा खेद नाही. जे होणार नाही त्याचा फारसा आग्रह ही नाही. पण जे आहे ते माणसाच्या रोजच्या जगण्याला अतिशय पूरक आहे. या पुस्तकातल्या साहित्याने ज्ञानात, मनाच्या आणि विचारांच्या प्रगल्भतेत वगैरे फारसा पडत नसेल कदाचित. पण त्यातली माहिती व्यवहारात जगताना खूप उपयोगी ठरते आहे. knowledge आणि wisdom याच्यात फरक असतो फक्त अनुभवाचा. आणि मला तरी असे वाटते तो जगण्याच्या उत्कट अनुभव ही पुस्तके मिळवून देत आहेत.

आज १० वर्षांनी मागे वळून पाहताना असे वाटते की इंग्रजी वाचायला लागून मी गमावले काहीच नाही. उलट मराठीने जसा अमृताचा घनु दिला, तुकोबारायांचा पांडुरंग दिला, श्यामची आई दिली आणि शिवबाचा पराक्रम दिला, तसेच इंग्रजी ने देखील आयुष्याचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवला. आयुष्याच्या वेलीला मराठीने आत्मशुद्धीच्या आसवांचे कुंपण घालायचा शिकवले. तर इंग्रजी साहित्याने त्या वेलीला कुंपणाचा आधार घेऊन ताठ मानेने उभे राहायला शिकवले.
आई ची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पण आई बरोबर एखाद्या मावशीची माया मिळाली तरी माझी त्याला काही हरकत नाही.
जय हिंद! जय महाराष्ट्र!

2 comments: