Tuesday, June 3, 2014

ऋणानुबंध

खरे तर ती त्याच्या मित्राची आजी होती. मित्राच्या आईची आई. तिचे  त्याच्याशी नातं असं काहीच नव्हतं. सांगलीत गाव भागात एका जुन्या वाड्यात एक खोली भाड्याने घेऊन ती रहायची. आजोबाना जाऊन देखील खूप वर्षे झाली होती. त्यामुळे एका खोलीत तिचे अगदी छान भागत असावं. मारुती चौकात वेलणकरांचा जुना आयुर्वेदिक औषधांचा कारखाना होता. त्याच्या समोरच्या वाड्यात या आजीची खोली होती. मुख्य रस्त्यापासून बरीच आत. तिच्या खोलीत जायला एका छोट्याश्या बोळातून जावं लागायचं. बोळ कसला? छोटेखानी भुयारच होतं ते! सगळीकडे कुंद ओलं अंधारलेलं वातावरण. एका बाजूला सगळ्या बंद खोल्या. त्या खोल्यांवर गंजत चाललेली कड्या आणि कुलुपं. मोडकळीला आलेल्या, मधेच कुठे कापडात नारळ, लिंबू वगैरे बांधलेल्या तुळया, शिसवी लाकडाचे काळसर चौकोनी खांब, पोपडे धरलेल्या ओलेत्या मातीच्या भिंती. त्यातच कुठे कोनाडे नाहीतरी बंद लाकडी जिने. भिंतीला लावून एखादी गंजलेली सायकल ठेवलेली. त्या सायकलीवर देखील बोटभर धुळीचा थर बसलेला. थंड गार पडलेली शहाबादी फरशीची जमीन. सगळीकडं अनास्था आणि नैराश्य असं दबा धरून बसलेलं.

फार पूर्वी म्हणजे संस्थांनी काळात कुणी देशिंगकर म्हणून दिवाण होते पटवर्धन सरकारांचे. त्यांचा हा वाडा. कधी काळी सोन्या-नाण्यानं आणि मुला माणसांनी भरलेला. संस्थानं गेली. दिवाण गेले. आताशा नाही म्हणायला मुख्य लाकडी दरवाज्यावरची बारीक जरीबुट्टी, गेल्या श्रीमंतीची आठवण काढत उभी होती. त्यात आता विजेचे बारीक दुधी बल्ब लावले होते. जागोजागी उंबरे आणि उखडलेल्या फारश्या होत्या. अचानक एखाद दुसरी पायरी असायची. जमीनी लगत आडवे तिडवे वाहत गेले नगरपालिकेचे नळ होते. नवख्या माणसाला अगदी सहज ठेच लागायची. भिंतीला एका हाताने धरून धरून चालत आत आलं की भुयाराच्या शेवटी एक छोटी चौकोनी मोकळी जागा होती. त्यात पाय वगैरे धुवायला एक मोरी होती. त्यात एक रांजण असायचा. नंतर मग कुणा बिऱ्हाड करुनं सोयीसाठी अंघोळीचा एक दगड तिथं बसवला होता. या इथच उजव्या बाजूला आजीची खोली होती. आजीच्या खोलीत एक पलंग होता. एक रॉकेल वर चालणारा वातीचा स्टोव होता. ४-२ भांडी ठेवायला एक लाकडी पंपाळ होतं आणि कपडे ठेवायला एक मोठी पत्र्याची ट्रंक होती. भिंतीवर पांडुरंगाचा एक फोटो असायचा. आजी कधी त्याला हार घालायची तर कधी नुसतच एखादं फुल ठेवलेलं असायचं. त्याच्याच बाजूला आजोबांचा फोटो असायचा. त्याला गंध उगाळून लावलेलं असायचं. काळी गोल टोपी, तसल्याच रंगाचा काळा कोट, पांढरा सदरा आणि काळ्या जाड काड्यांचा चष्मा. आजीच्या मानाने आजोबा खूप शिकलेले, टापटीप असावेत.

त्याची शाळा गाव भागातच होती. तो आणि त्याचा मित्र न चुकता मधल्या सुट्टीत या आजी कड जायचे. तिला खूप आनंद व्हायचा. मुलं आली की त्याना पलंगावर बसवून, आजी स्टोव पेटवायला घ्यायची. मग कधी त्याच्यावर कांद्याचे पोहे, कधी उप्पीट तर कधी खरपूस भाजलेला रव्याचा शिरा व्हायचा. तो पहिल्यांदा गेलो तेव्हा आजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. खरबरीत, भेगाळलेली बोटं चेहर्यावरून फिरवत तिच्या नातवाला म्हणाली 'कोण रे हा?'. मग त्यानं त्याची ओळख करून दिली. आजी म्हणाली 'छान. आता रोज येत जा. तू मला माझ्या नातवासारखाच!'  तो देखील हो म्हणाला. मग रोजचच येणं जाणं सुरु झालं. रोज हातात भरलेली ताटली ठेवून आजी प्रेमानं डोक्यावरून तिचा तोच खरबरीत, भेगाळलेला हात फिरवायची. आणि खाऊन संपेपर्यंत शेजारी उभी राहायची. खाऊन झाल्यावर कृष्णा माईचा प्रसाद म्हणून खोबऱ्याचा एक तुकडा आणि खडीसाखर हातावर ठेवायची. 
तिचा दिवस भल्या पहाटेच सुरु व्हायचा. शुचिर्भूत मनानं ती कृष्णा-माईच्या देवळात जायची. सकाळची काकड आरती झाली की प्रसन्न मनाने ४-२ भूपाळ्या नाहीतर हरिपाठ म्हणायची. त्यानंतर मग दुपारी ११-१२ वाजेपर्यंत फुलवाती वळत बसायची. फारशी कुणाशी बोलायची नाही. कुणी अगदीच ओळखीचं गाठ पडलं तर मात्र हसून चौकशी करायची. हातावर एखादा खडी साखरेचा खडा ठेवायची. तिच्याशी ही फारसं कुणी आपणहून बोलायला जायचं नाही. तिच्या बरोबर नेहमी एक पट्ट्यापट्ट्याची नायलॉनची पिशवी असायची. त्यात थोड़ी खड़ी साखर, सुंठ, एखादं हळकुंड, रक्तचन्दनाच्या खोडाची काळी बाहुली, बुक्का अशा गोष्टी असायच्या. केव्हा कुणाला काय लागेल काही सांगता यायचं नाही. कृष्णा-माईच्या देवळात खुप मुलं यायची. एखाद दुसरं मूल खेळताना पडायचं. खोक पडायची. रक्त यायचं. रक्त पाहिलं की आजी खुळ्या सारखी करायची. धावत जावून त्या मुलाला आधी रक्तचन्दन लावायची. थोड़ी सुंठ चाटवायची. आणि मग त्या मुलाची आई आली की तिला भरपूर रागो भरायची. ती आई आणि ते मूल निघून गेले तरी आजी नंतर बराच वेळ स्वतःशीच बोलत बसायची. तिला मुलं फार आवडायची. प्रत्येक मुलामधे तिला तिचा श्रीधर दिसायचा. असाच २-३ वर्षाचा असताना आजी-आजोबा, श्रीधर आणि श्रीधरची बहिण असे चौघे त्या देवळात आले होते. दिवाळी होती. नविन कपडे घालून श्रीधर इकडं  तिकडं धावत होता. आजी-आजोबा कृष्णा माईची ओटी भरत होते. आणि तेवढ्यात कुणीतरी धावत आले. आणि विचारले, "तो लहान मुलगा तुमचा आहे का?". आजी ला काही सुचेना. ओटीचे ताट तसेच ठेउन ती धावत सुटली. पाहतो तर श्रीधर अगदी खालच्या पायरीवर निपचित पडला होता. डोक्याला खोक पडली होती. पायरीवर बरच रक्त सांडलं होतं. आजोबानी नाडी पाहिली आणि डोक्यावरची टोपी काढून खिशात ठेवली. श्रीधर बोलत का नाही म्हणून तिनं आजोबाना खुप वेळा विचारलं. पण श्रीधर चे श्वास संपले होते आणि आजीच नशीब! चांगला चाललेला संसार रुसला. आजोबा सैर भैर झाले. कुणाशी बोलेनात. त्यात कुणीतरी बुवा त्याना सन्यास घ्यायचं बोलून गेला. आणि एक दिवस खरच आजोबा घरातून नाहीसे झाले. कुठे गेले कुणालाच माहित नाही. पोटाशी तान्ही लेक आणि फाटलेलं आकाश घेउन तिनं परत नवा अध्याय सुरु केला. जगी ज्यास कोणी नाही त्यास कधी कधी देव पण लाभत नाही. समाजाच्या नजरा, अठरा विश्वे दारिद्र्य, पोटाशी तान्ही पोर, श्रीधरची खोक आणि कृष्णामाईची न भरलेली ओटी इतकं शिल्लक राहिलं. रेशमासारखं तलम आयुष्य अचानक मांजरपाटा सारखं खरबरीत झालं. आजोबा निघून गेल्यावर गाठिला होतं त्यावर थोड़े दिवस गेले. मग मात्र तांदूळ अक्षतेलाही उरले नाहीत. नवऱ्याचं होतं नव्हतं ते नातलगानी काढून घेतलं. डोक्यावरचं छप्परही गेलं. आणि मग ती पुरतीच बोडकी झाली. शिक्षण नाही. अनुभव नाही. अर्थात अशी वेळ येइल याचा कधी विचार सुद्धा केलेला नव्हता. सुखवस्तू घरात देताना तिच्या वडीलाना जग जिंकल्या सारखं झालं होतं. मिळवता नवरा, घर, शेती, भावंडं सगळं पाहून त्याना अगदी भरून पावलं होतं.
आल्या वेळेला तोंड देण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. तिनं चार घरी धुणी-भांडी करायला सुरुवात केली. लेकीला पोटाशी घेउन अनवाणी पावलानी दारोदार हिंडू लागली. टीचभर पोटासाठी आणि २ वाट्या दुधासाठी पायाला भेगा पडू लागल्या. हजार जिभानी नशीब काळजाला घरं करू लागलं. अब्रू झाकायची की भूक असा प्रश्न रोज पडायला लागला. काही दिवसानी तिला एका कार्यालयात काम मिळाले. २ वेळच्या खाण्याचा प्रश्न सुटला. राहायला एक खोली मिळाली. दोन वेळच्या अन्नाला किती लागतं? कधी कधी अगदी सहज मिळतं. पण कधी कधी अगदी पायाचे शीता इतके तुकडे व्हावे लागतात. गहिवर, भावना, आठवणी साऱ्याचा विसर पडावा लागतो. अंत:करणातले सगळे अश्रू वाहून गेले की मग कधीतरी हा वैश्वानर शांत होतो. जगताना तक्रारी करून चालत नाही. पैशाला पैशा जोडत तिनं पोर मोठी केली आणि पहिल्याच मुहूर्ताला उजवून टाकली. खांद्यांवरचा एक भार हलका झाला. म्हातारीला आभाळ थोडं झालं होतं. सगळ्या गाव भर सांगून आली. मोठ्या जिकिरिनं गाडा इथवर आणला होता. पण दुर्दैव पाठ सोडेना. पहिल्याच खेपेला काहीतरी झालं आणि तिची लेक तिला सोडून निघून गेली. जाताना एक श्रीधर सारखाच नातू सोडुन गेली. त्या पोराकडं पाहून आजीचा जीव तिळतिळ तुटायचा. आता परत नव्यानं सुरुवात करायची तिची हिम्मत नव्हती. हात-पाय थकले होते. डोळे पलीकडच्या तीराला लागले होते. पण पोर म्हटलं कि जीव कासावीस व्हायचा तिचा. त्यात आई विना वाढणारं ते पोर पाहून तर तिचा घास घशाखाली उतरायचा नाही. गेल्या लेकीच्या नवऱ्यानं दुसरं लग्न करून त्याचा पुरुषार्थ दाखविला आणि पोर अगदीच निराधार झालं. परत नव्या जोमानं आजी उठली. तिला जमेल तेवढ तिनं केलं. पण त्याचं त्याला काही फारसं सोयरसुतक नव्हतं. आजी छापखान्यातून जुने तपकिरी कागद आणायची. ते दुमडून, मध्ये शिवून  त्याच्या वह्या त्याला करून द्यायची. लोकांना त्यांच्या मुलांची जुनी पुस्तकं बाजूला ठेवायला सांगायची. त्याच्यावर त्याचं शिक्षण झालं. पण तो त्याच्याच नशिबावर रुसलेला असायचा. शाळेत गेल्यावर रॉकेलचा वास येतो म्हणून पोरं त्याला चिडवायची. त्याच्या मित्रांच्या मोठ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र वह्या, नवीन कोरी वासाची पुस्तकं, अभ्यासाच्या खोल्या, खुर्च्या हे सगळं त्याला हवं होतं. होता होईल तो घरातून बाहेर राहायला लागला. नगर वाचनालयात अभ्यासाला जायचा. आजीला न सांगता बाहेर कुठे तरी काम करायला लागला. त्यातल्या पैशातून फी, पुस्तके, वह्या घेता कधी-मधी एखादी विडी ओढायला लागला. चंद्र वेगळा होत गेला आणि आजी परत एकटी होत गेली. त्याचा तो मित्र कधी मधी घरी यायचा. आजी जवळ बसायचा. तिला काहीतरी आणून द्यायचा. कधी एखादी भाजीची पेंडी नाहीतर कधी एखादी सोलापुरी चादर घेऊन यायचा. आजीला तेवढच भरून यायचं.  

आयुष्य म्हणजे सुताच्या रिळासारखं संपत गेलं. काय जोडलं, कुठं टाके घातले कधी कळलच नाही. कुठले टिकले, कुठले तुटले ते देखील तिला कधी दिसले नाहीत. आयुष्याची ऋणच इतकी जबरदस्त होती कि तिला बिचारीला बंध मोजायला सवडच झाली नाही.    

त्या दिवशी वाड्या बाहेर बरीच गर्दी जमली होती. आजी सोलापुरी चादरीत शांत झोपली होती. एका हातात तिनं चादर घट्ट धरून ठेवली होती. कृष्णामाईच्या प्रसादाला मुंग्या लागल्या होत्या. 

1 comment:

  1. वाचली तुमची पोस्ट. छान आहे. अशाच अनेक आज्या महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आहेत.

    ReplyDelete