Saturday, August 12, 2017

तळवळकर सर

तळवळकर सर गेले. फार वाईट झाले. फार मोठा माणूस होता.
सरांचं आणि माझं नेमकं नातं काय याचा विचार केला. तेव्हा लक्षात आलं की त्यांनी त्यांच्या "मटा" मधून एक फार मोठा संस्कार करून ठेवला आहे.
मी शाळा-काॅलेज मधे होतो तेव्हा "गोविंद तळवळकर" या नावाला एक फार मोठे वलय होते. फार मोठा मान होता. "महाराष्ट्र टाईम्स" हे वर्तमानपत्र म्हणजे मराठी पत्रकारीतेतला मानदंड होता.
आमच्याकडे म्हणजे सांगली, मिरज, कोल्हापूर भागांत मटा संध्याकाळी पोचायचा. आमच्या घरासमोर कोडोलीकर सरकार रहायचे. खूप मोठा चौसोपी वाडा होता. त्यांच्या घरी अगदी "जनप्रवास" सारख्या लोकल पेपर पासून ते "महाराष्ट्र टाईम्स" पर्यंत जवळ जवळ सगळे मराठी पेपर यायचे. कोडोलीकर काकांचा माझ्यावर फार जीव होता. संध्याकाळी मी वाड्यात शिरलो की सोप्यात मटा वाचत बसलेले काका, लगेच दोन पाने काढून मला द्यायचे. सोप्यावर बैठकीला आणि पान-सुपारीला येणाऱ्या प्रत्येकाला सांगायचे की ते मटा फक्त माझ्यासाठी घेतात म्हणून. शिवाय मी मटा पहिल्या पानावरच्या तारीख वारापासून, ते "येथे छापून प्रसिद्ध केले" इथं पर्यंत कसा वाचतो, यांचे रसभरित वर्णन करून सगळ्यांना सांगायचे. संपादकीय तर होतेच पण इतर एक एक सदरे अफाट असायची. प्रकाश अकोलकर, अरुण टिकेकर, प्रकाश सामंत, अच्युत गोडबोले, पांडूरंगशास्त्री आठवले, प्राचार्य शिवाजीराव भोसले वगैरे म्हणजे मी वेळ काळ विसरून वाचायचो. इतकेच काय पण "वाचकांची पत्रे" सुद्धा वाचनीय असत. रविवारची मटा पुरवणी म्हणजे पर्वणी वाटायची. मग अंधार पडल्यावर काका स्वत: उठून सोप्यातला दिवा लावत तेव्हाच मी भानावर यायचो.
तेव्हा मटाची टॅगलाईन देखिल अतिशय सार्थ होती "पत्र नव्हे मित्र"!!
कधी कधी काका रंगात आले की एखादं दुसरी इरसाल मराठी-कानडी लावणी नाहीतर गाणी गुणगुणायचे. "मटा मधली एक तरी चूक काढून दाखवा" म्हणून सांगायचे. कसलीही चूक चालेल. कधी कधी तासंतास वाचून देखिल एक सुद्धा चूक सापडायची नाही. कुठेही अशुद्धलेखन नाही. विरामचिन्हांचे घोटाळे नाहीत. जागा संपली म्हणून अर्ध्यात सोडलेले मजकुर नाहीत. पानांचे क्रमांक, मथळे, मजकुर इतकेच काय पण जाहीरातीही दृष्ट लागाव्यात अशा एक संगती घेवून आलेल्या असत. कुठेही बातमी मधे आक्रस्ताळे पणा नसे. उगाच "चौकात विवाहितेचा खून:खूनी फरार" असला गर्दी खेचू प्रकार नसे. सगळेच दर्जेदार!!
मटाचे मिरजेचे वार्ताहर होते दप्तरदार म्हणून. अत्यंत सज्जन आणि लाघवी माणूस!! त्यांच्याकडे पाहून ते वार्ताहर आहेत का कुठल्याशा दत्ताच्या देवळात पुजारी आहेत असा प्रश्न पडायचा. बस स्टॅंडवर, रेल्वे स्टेशन वर कुठेही, गळ्यात लाल रूमाल बांधून, डोळ्याला चकचकीत गाॅगल लावून, कुठलाही मवाली पेपरवाला "मटा मटा" असे ओरडत नसे. किंवा अंगावर काटा आणणाऱ्या बातम्यांचे मथळे ओरडत फिरताना सुद्धा कधी कुणी दिसला नाही.
तेव्हाच्या इतर वर्तमानपत्रांच्या तुलनेत मटाची प्रकृती म्हणजे अगदी सगळा वाडा लख्ख करून, आवरून, मस्त शालू लेवून, कडीपाटाच्या झोपाळ्यावर, हातातल्या तोड्यांचा आणि हिरव्या चुड्याचा मंद किणकिण आवाज करत, ओव्या नाहीतर श्लोक म्हणत बसलेल्या जहागीरदारीण बाईंसारखा वाटायचा. शांत, सोज्वळ, प्रेमळ तरीही करारी!!
मी नववीत होतो तेव्हा महाराष्ट्र टाईम्सच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. कोल्हापूर विभागात झालेल्या स्पर्धेसाठी सर स्वत: कोल्हापूरला येणार होते. "आईने रिटायर व्हावे का?" या विषयावर मी बोललो होतो. तेव्हाचे कोल्हापुरचे महापौर माझे भाषण ऐकून मनापासून गहिवरून गेले होते. महापौरानी अगदी मनापासून कौतुक केले. माझे भाषण ऐकून त्यांना त्यांच्या आईची इतकी प्रकर्षांने आठवण झाली की त्यांना अश्रु आवरणे अशक्य होवून गेले. राजकारण्याला इतके हळवे मन असू शकते याचा माझा पहिलाच अनुभव होता. मला भाषण कुणी लिहून दिले हा प्रश्न मी बराच वेळ टाळत होतो. शेवटी महापौरांनी परत परत विचारल्यावर न राहवून सांगून टाकले की माझे भाषण मला माझ्या आईनेच लिहून दिले होते म्हणून!!
माझा कोल्हापूर विभागात पहिला क्रमांक आला होता. इतर स्पर्धकांबरोबर त्यांचे पालक, शाळेतले शिक्षक वगैरे लवाजमा आला होता. महापौरांनी माझ्या आई-वडिलांची चौकशी केली. आम्ही जन्मजात "स्वयंभू" असल्याने बहुतेक स्पर्धांना एकट्यानेच अवतरायचो. ते ऐकून गमतीने म्हणाले की "आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिकला एकटा जावू नकोस. आई-वडिलांना घेवून जा."
५०१ रूपये आणि मोठे प्रमाणपत्र मिळाले. त्याच्यावर "गोविंद तळवळकर, संपादक, महाराष्ट्र टाईम्स" अशी ठसठशीत मराठी स्वाक्षरी बघून मला जग जिंकल्यासारखे वाटले होते. वैचारीक सुसंस्कृतपणाचा, सचोटीचा आणि प्रगल्भतेचा मानबिंदू असलेल्या गोविंद तळवळकरांच्या "महाराष्ट्र टाईम्स" ने मला प्रमाणपत्र दिले याहून दुसरे काय मागावे!!
घरी आल्यावर आईला सगळा प्रकार सांगितला. तिला पण खूप आनंद झाला. मग राज्यस्तरीय स्पर्धेला तिलाही नाशिकला घेवून गेलो. सर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिकला येणार होते. पण काही तरी झाले आणि त्यांच्या ऐवजी वनाधीपती विनायकदादा पाटील प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. चिठ्ठीमध्ये मला विषय आला होता "पाश्चात्य संगीत श्रेष्ठ की भारतीय संगीत श्रेष्ठ". अर्थात मी सगळ्या अठराच्या अठरा विषयांची खडखडीत तयारी केली होती. आणि त्यातला सर्वात चांगल्या विषयाची चिठ्ठी मला आली. मग काय विचारतां महाराजा!! धमाल बोललो. विनायकदादाना अतिशय आवडलं माझं भाषण!! श्रोते ही मुग्ध झाले होते. मटाचे नाशिकचे वार्ताहर दत्ता नागपूरे प्रत्यक्ष भेटून कौतुक करून गेले.
नंतर परिक्षकानी उलट्या क्रमाने क्रमांक वाचायला सुरूवात केली. उत्तेजनार्थ नाही. तिसरा, दुसराही नाही. माझी अवस्था अगदी बघण्यासारखी झाली होती. कारण आता जर आपलं नाव या माणसाने घेतले नाही तर सगळे मुसळ केरात जाणार होते. मग ते भलतच काहीतरी सांगत बसले. वक्ता कसा असावा वगैरे. इकडे दुसरा आणि तिसरा क्रमांक आलेली मंडळी त्यांची पाकीटे फोडून नोटा मोजत बसलेली आणि मी बसलो होतो त्याच्या कडे बघत बारीक तोंड करून!!
शेवटी एकदा आमच्या नावाचा पुकारा झाला. पण मी इतका गोंधळून गेलो होतो की मला काय करावे ते सुचतच नव्हते. शेवटी माझ्या शेजाऱ्याने मला "अभिनंदन" म्हटल्यावर मी भानावर आलो. पुढे जावून विनायकदादांच्या हस्ते बक्षिस घेतले. वाकून नमस्कार केला. सरस्वतीचे वाहन असलेल्या मोराची चांदीची मोठी, सोन्यासारखी झळझळीत मुर्ती असलेला चषक हातात घेतला. सगळे कष्ट सुफळ झाले त्याचा आनंद होताच. पण पुण्या-फिण्याच्या सगळ्या वक्त्यांना आपण भारी पडलो याचा असुरी आनंदही होता. शिवाय १००० रूपयाचे बक्षिस पाकीटातून मिळाले. ५० रुपयाच्या कोऱ्या करकरीत २० नोटा मी नंतर किमान ५० वेळा तरी मोजून बघितल्या असतील!! आईला पण खूप आनंद झाला.
तरी सर आले नाहीत यांचे वाईटही वाटत होते. स्पर्धा झाल्यावर औरंगाबादला माझ्या आजोळी गेलो. दुसऱ्या दिवशी किमान २ मैल तरी चालत जावून क्रांती चौकात, मटा विकत घेतला. तिसऱ्या पानावर विनायकदादांबरोबर विजेत्या स्पर्धकांचा फोटो छापून आला होता. "सांगलीचा निखिल कुलकर्णी अंतिम फेरीत सर्व प्रथम" असा मथळा पाहून सगळे भरून पावले होते.
"महाराष्ट्र टाईम्स" बरोबर आयुष्यभर पुरेल अशी एक आठवण तयार झाली होती.
नंतर मिरजेला गेल्यावर कोडोलीकर काकांना जावून भेटलो. त्यांनाही जग जिंकल्याचा आनंद झाला होता. माझा फोटो मटा मधे पाहील्याचे त्यांनी सांगितले. मग काकांना मनातली खंत बोलून दाखवली. "गोविंदराव आले असते तर बरे झाले असते" असे बोलून गेलो. त्यांवर काका हसले. वास्तविक काका मितभाषी. पण त्या दिवशी काका खूप काही बोलले. गोविंदराव हे एक व्यक्ती नसून ती एक प्रकृती आहे. तो एक स्वभाव आहे. तो एक विचार आहे. ती एक जगण्याची अत्युच्च अशी शिस्त आहे. जिथे जिथे ही शिस्त आहे तिथे गोविंदराव आहेतच याची जाणीव त्या दिवशी झाली.
आता या गोष्टीलाही खूप वर्षे होवून गेली. तरी आजही शिस्त" हा शब्द म्हटला की मला माझे आई, वडील, शिक्षक, संघ, सैन्य वगैरे शिस्तीचे छापील प्रकार न आठवतां, पहिल्यांदा आठवतात ते गोविंद तळवळकर आणि त्यांचा लाडका महाराष्ट्र टाईम्स!!
एखाद्या माणसानं समाजाला याहून दुसरं काय द्यायचं असतं!!