Monday, August 14, 2017

जना

नवीन लघुकथा 'जना' 
~निखिल कुलकर्णी 

संध्याकाळच्या वेळेला जना पडक्याच्या बोळात उभा असायचा. अंगात जुनाट लक्तरे झालेला, मळकट तांबूस गुरु शर्ट घातलेला असे. त्याच्यावर कसले कसले डाग पडलेले असत. गळ्याशी कॉलर घासून घासून फाटली होती. तिची लक्तरे त्याच्या छातीवर लोम्बत असत. एखादया साधूबुवा सारखी अक्राळ विक्राळ दाढी वाढलेली असे. पांढरट, धुरकट रंगाची दाढी त्याच्या मळकट शर्टावर विरून गेल्या सारखी दिसत असे. मिशा वाढून वाढून त्यांच्या पारंब्या झालेल्या होत्या. या दाढीमिशांच्या जंजाळात जनाचे ओठ कुठे दिसतच नसत. त्याच्या उजव्या डोळ्याच्या खाली, कवटीच्या हाडावर एक भला मोठा तीळ होता. तो तीळ मात्र त्या अक्राळ विक्राळ दाढीतून देखील उठून दिसत असे. जी गत दाढीची तीच केसांची. महिनोंमहिने वाढलेले केस अजस्त्र झाले होते. ते मानेच्याही खाल पर्यंत वाढलेले असून त्याच्या जटा झालेल्या होत्या. हातावर, पायावर आणि चेहऱ्यावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या असत. त्यातून रक्त वहात असे. त्यांच्यावर माशा फिरत असत. जनाला त्याचे काही वाटत नसे. तो आपला निश्चलपणे एका जागी उभा असे. त्याची नजर शून्यात लागलेली असायची. त्याच्या समोरून कित्येक गाड्या वेगाने, कधी कधी कर्णकर्कश्य कर्णे वाजवत जात. तरी देखील जना अविचल उभा असे. उजवा हात पाठीमागे नेऊन त्याने डाव्या हाताचे कोपर धरून तो तासनंतास उभा असायचा. रस्त्यातून येणारे जाणारे कुणीतरी जनाची चौकशी करायचे. "काय जना कसं काय?" किंवा "काय जना जेवलास का?" वगैरे प्रश्नांना जना फक्त मानेनेच उत्तर देत असे. जना जेवतो काय? पाणी कुठे पितो? झोपतो कुठे? सगळंच एक गूढ होते. त्याच्या पडक्यातून सकाळी एक २ तास आणि संध्याकाळी २-३ तास बाहेर येऊन उभा राहायचा. आणि नंतर आत जाऊन बसायचा. त्याच्या पडक्यात जायची वाट देखील अतिशय अवघड झाली होती. बाजूच्या भिंतींचे दगड, माती, लाकडाच्या चौकटी वेड्या वाकड्या पडलेल्या असत. त्याच्यात काटेरी झुडुपे उगवलेली असायची. त्या झुडुपांना अतिशय उग्रट वास येत असे. त्या झाडांची पाने देखील खरबरीत असत. जना शिवाय इतर कोणी कधी त्या वाटेने जायचे धाडस देखील करत नसे. 
जना विषयी सगळ्यांनाच एक अत्यंत भय युक्त कुतूहल होते.  गल्लीतली टगी पोरं जनाला हरेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न करत. गल्लीतली कुत्री पकडून त्यांच्या शेपटीवर रॉकेल ओतून त्यांना जनाच्या पडक्यात सोडून देत. मग ते कुत्रे अत्यंत त्रस्त होऊन त्या पडक्यातून सैरावैरा पळत सुटे. 
कधी जनाच्या अंगावर धावून जाई. त्याच्या अंगावर नखाने ओरबाडत. पण जना एका शब्दाने कधी कुणाला त्या विषयी बोलला नाही. काही काही पोरं तर जनाच्या पडक्याच्या दारात हागुन ठेवत. आणि त्याच्यावर माती टाकून ठेवत. ठेचकाळत धडपडत जेव्हा जना चालत येई, तेव्हा माती समजून तो किती तरी वेळेला त्यात पाय देत असे. मग पोरे ते पाहून खिंकाळत असत. पण जनाला त्याचे काही वाटायचे नाही. तो तसाच पाय जमिनीला पुसून तिथे उभा राहायचा. पोरं का हसतात याचे देखील त्याला काहीही वाटायचे नाही. जना उभा असताना त्याच्या समोर रस्त्यात कधी कधी छोटे मोठे अपघात होत. पण त्याचेही जनाला काहीही वाटायचे नाही.त्याची हि अविरत निश्चलता पाहून कधी कधी लोक त्याच्यावर खेकसायचे. पण जना तसूभरही हलायचा नाही आणि काही उत्तर द्यायचा नाही. त्याच्या डोक्यात नेमके काय चालू होते काही कळायचे नाही. 

गल्लीतले लोक त्याला अधून मधून खायला काही काही आणून देत. पांडू बेकरी वाला कधी २-३ शिळे पाव आणून द्यायचा. चौकातला संभा परीट कधीतरी व्यंकण्णाच्या हॉटेलातून राईस प्लेट मागवून द्यायचा. यादवाड्याची विधवा कधी तरी शिळी भाकरी आणि कालवण आणून ठेवायची. त्यांच्या बरोबर देखील जना कधी बोलला नाही. जे काही आणून देतील ते बाजूला ठेवून द्यायचा. आणि संध्याकाळी परत जाताना आत घेऊन जायचा. 

गल्लीतली पुरुष मंडळी, वर्षातून २ वेळेला जनाला अंघोळ घालत. पहिली आंघोळ चैत्र पाडव्याला आणि दुसरी दिवाळीच्या पाडव्याला!! त्या दिवशी बाळबा न्हावी येऊन जनाचे केस कापीत असे. स्वच्छ गुळगुळीत दाढी करे. पडक्याच्या बोळाच्या दारात हा कार्यक्रम कित्येक तास चाललेला असे. केस कापताना त्याला ठीक ठिकाणी जखमा व्हायच्या. पण त्याच्या तोंडातून कधी शब्द बाहेर आला नाही. दाढी केल्यावर तर जना इतका रुबाबदार दिसे कि एखादा हाय कोडतातला वकील म्हणून सहज खपेल! त्याचे घारे हिरवे पाचू सारखे दिवे चमकून उठत. हजामत झाली कि मग जनाला रस्त्यातच आंघोळ घातली जायची. अंगावर मळाच्या वळ्या चढलेल्या असत. त्या काढायला कुणी दगडी कापरीने घासायला घायचा. घासून घासून त्याचे अंग रक्त बंबाळ होत असे. स्वच्छ आंघोळ केलेला बोडका जना तरीही निश्चल बसून असे. मग त्याला रुपनवंर टेलरने उरलेल्या कापडातून एक शिवलेला शर्ट आणि नविन चड्डी घालत. आता हे कपडे पुढच्या अंघोळीच्या वेळेलाच उतरत. 

नवीन कपडे घातले कि जना एक वाक्य म्हणायचा, "आई, जेवायला वाढ. " मग मंडळी त्याला पाटावर बसवून जेवायला घालत. एखादी पुरण पोळी नाहीतर गव्हल्याची खीर केलेली असे. एखादी साखर भाताची मूद असे. ते सगळे एकत्र कालवून जनाला खायला घातले जाई. जेवण चालू असताना जना थोडासा भावनिक व्हायचा. "ती समई नीट करा" म्हणायचा.  "अगं पुरे पुरे. किती तूप वाढशील" असे म्हणायचा. मधेच आपल्याशी हसे. जेवण झाल्यावर विचारे, "मी जरा झोपतो आता माझ्या आईच्या मांडीवर!!". असे म्हणून आत पडक्यात निघून जात असे. या सगळ्याची कुणालाच काही संगती लागत नसे. एकदा जना आत निघून गेला कि इतर मंडळी त्यांच्या त्यांच्या घरी निघून जात. तिथून पुढे जनाचा दिनक्रम चालू!! असे कित्येक वर्षे चालू होते. 

एक यरगोळ्याची पांगळी म्हातारी सोडली तर कुणालाही जनाची काहीही फिकीर पडलेली नसे. यरगोळ्याच्या म्हातारीला जनाचा इतिहास ठाऊक होता. तिला फार अपराधी वाटे. पांगळी असल्याने तिला कुठे जाता देखील यायचे नाही. पण ती एकटीच बडबडत बसे. नऊवारी इरकली लुगडे गोल पातळासारखे गुंडाळून बसलेली असे. म्हातारी हेकट होती. तिचं तिच्या घरातल्या देखील कुणाशी पटायचे नाही. घरातल्या मोलकरणीवर तर सारखी गुरकायची. तिचे तिच्या सुनांशी तर पटायचे नाहीच. पण तिच्या लेकींशी पण ती फार फटकून वागत असे. तिची सेवा करायला एक बाई ठेवली होती संतराम ने अक्की नावाची. अक्कीचं आणि म्हातारीचं भारी जमायचं. कारण एक तर अक्की शिवाय तिचं हागमूत कुणी काढायचं नाही. आणि दुसरे म्हणजे अक्की ठार बहिरी होती. म्हातारी काय बोलती ते अक्कीला काही ऐकू यायचे नाही. म्हातारी दिवस भर बडबडत असायची आणि अक्की विचार मग्न चेहऱ्याने ते ऐकत असल्यासारखी करे.

म्हातारी सांगायची कि दादा आणि नमाक्काचा फार जीव होता जनावर. एकुलता एक लेक. घरात गडगंज संपत्ती. हर कामाला नोकर होते. घर कामाला बाया होत्या. घर म्हणजे तर काय, राजवाडाच तो!! दृष्ट लागावी असा जोमदार होता. या वाड्याला चारी बाजूनी तटबंदी सारखी भिंत होती. पुढच्या मुख्य दारावर नगारखान्यासारखी एक कमानीच्या खिडक्या असलेली खोली होती. दारातून आत गेल्यावर पडवी, सोपा, अंगण, गोठा, माजघर होते. दादा आणि नाना ब्याकुडकर असे दोन भाऊ. त्यांना ५ बहिणी होत्या. त्यांची लग्ने देखील कुठे कुठे मोठ्या मोठ्या जमीनदार घरामध्ये लावून दिली होती. दादा ब्याकुडकर म्हणजे तेव्हाचे निष्णात वकील. तेव्हाचे मुंबई, दिल्लीच काय, पण कराची आणि लाहोर मधल्या कोडतात देखील त्यांच्या केस चालत असत. अकाली पांढरे शुभ्र झालेले केस, त्याच्यावर काळी मखमलीची टोपी, काळा मोठा बॅरिस्टर कोट, नागाचे तोंड असलेली काठी, त्या काठीत एक गुप्ती लपवलेली असे. जाड काळ्या फ्रेमचा गोल चष्मा आणि ओठावर हूबेहूब गोपाळकृष्ण गोखल्यांसारख्या छपरी मिशा!! गावातून चालले कि लोक त्यांना अदबीने वाकून नमस्कार करत. गावात नवीन लग्न झालेली जोडपी दादांच्या दर्शनाला येत असत. दादा त्यांच्या हातावर एकेक चांदीचा रुपया ठेवत आणि नमक्का त्यांचे औक्षण करीत असे. घरंदाज श्रीमंतीची छाप सगळ्या वाड्यावर पडलेली असे. त्याकाळी त्यांची मेबॅक गाडी होती. तीची व्यवस्था करायला दोन ड्राइवर असत. गाडी लक्ख घासून पुसून ठेवलेली असे. तिची चाके देखील अशी चमकत कि त्याच्यात तोंड पाहून घ्यावे. तेव्हा गावात एक दोनच गाड्या होत्या. त्यामुळे गाडीत बसून दादासाहेब कुठे निघाले कि गावातली पोरं गाडी गाडी म्हणत त्यांच्या मागे पळत असत. गावात दसऱ्याच्या दिवशी अंबाबाई ची पालखी निघत असे. त्या पालखी पुढे गाडी आणि घोड्याचा मान म्हणून दादासाहेबांची गाडी असे. त्या दिवशी गाडीचे छप्पर उघडून, स्वत: दादासाहेब, नमाक्का आणि तान्हा जना गाडीत बसून मिरवत जात असत. नाना ब्याकुडकर त्यांच्या वडिलोपार्जित बारा बोअरच्या रायफल मधून देवीच्या स्वागतासाठी हवेत बार काढत असत. त्याच्या आवाजाने जना दचकून रडू लागत असे. मग त्याची समजूत काढे काढे पर्यंत नमाक्का ला पुरेवाट होऊन जायची. लोक त्यांच्यावरूनही लिंबलोण ओवाळून टाकत असत. न जाणो कुणाची दृष्ट लागायची!!  

पुढे पुढे नमाक्काला थोडी मदत होईल अशा हिशेबाने यरगोळ्याच्या म्हातारीला दादांनी वाड्यावर कामाला ठेऊन घेतले. संतराम देखील जनाच्याच वयाचा होता. दिवसभर जना त्यांच्या बरोबरच राहायला लागला. एकमेकांना लळा लागला. कधीतरी एखादे वेळेला नमाक्का जनाला कडेवर घेत असे. दादा साहेब बहुतेक वेळा बाहेरच असत. जेव्हा वाड्यावर येत तेव्हा काही ना काही जनाला घेऊन येत. कधी बोलक्या बाहुल्या, कधी खेळणी, कधी गाड्या काही ना काहीतरी घेऊन यायचे. एकदा तर त्यांनी मोठ्या लाकडी चौरंगावर चालणारी खरी खुरी आगगाडी आणली होती. त्याच्या इंजिन मध्ये खरे खुरे कोळसे घालावे लागत. पाणी पण भरून घ्यावे लागत असे. मग एकदा ते इंजिन चालू झाले कि अगदी खऱ्या आगगाडी सारखी झुक झुक असा आवाज काढत आणि हवेत धूर सोडत ती गाडी तिच्या रुळावरून चालत असे. मधेच तिचा हॉर्न वाजत असे. त्याच्या आवाजाने देखील जना दचकून जात असे. 

दादा साहेब घरी असले कि  नमाक्काचा उत्साह ओसंडून वाहत असे. संगमरवरी पाटा भोवती रांगोळ्या काढून पंगत सजवली जात असे. त्याच्या मध्ये खास मारवाडातून आणणेल्या चांदीच्या समया लावल्या जात. सुगंधी अगरबत्त्या आणि हैदराबादी अत्तरे शिंपडली जात. जुन्या ग्रामोफोन वरती बिस्मिल्लाह खान ची शहनाई लावली जायची. पंच पक्वान्नांनी ताट सजवले जायचे. चार भाज्या, २ कोशिंबिरी, तीन प्रकारचे भात आणि २ चटण्यांनी चांदीची पाने पान सजून जात असत. समई च्या ज्योतीने जनाचे डोळे चमकून उठत असत. मांगल्याची, परिपूर्णतेची आणि साफल्याची पंगत दादासाहेब, नमाक्का आणि जना कितीतरी वेळ आकंठ अनुभवायचे. जेवण झाल्यावर दादासाहेब कुठली कुठली गाणी आणि गझला लावत. गप्पा मारता मारता जना नमाक्काच्या मांडीवर डोके ठेऊन पडून राहत असे. नमाक्का मग त्याच्या डोक्यावर हात ठेवून कधी "कौसल्ये चा राम" म्हणायची तर कधी "ठुमकी चलतं रामचंद्र" म्हणत असे. सर्व वृत्ती शांत होत कधीतरी जना झोपी जायचा. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तृप्ती मुक्कामाला आलेली असे.  

नाना ब्याकुडकर काही फार शिकले नाहीत. त्यांच्या कडे दादासाहेबांना सारखे व्यक्तिमत्व नव्हते. किंवा कसले कौशल्यही नव्हते. तसा अगदीच माणूसघाणा माणूस! फारसे कुणाशी बोलायचे नाहीत. वडिलोपार्जित शेती करत. दादासाहेबांच्या वाटणीची शेती पण तेच करत. म्हणजे वाटेकरी काम करायचे आणि नाना फक्त हिशेब ठेवत आणि वाटेकऱ्यांवर खेकसत असत. अतिशय कोपिष्ट होते. बायको पोरांना तर चप्पले सारखे वागवत. एकदा तर जेवताना भातात एक केस आला म्हणून बायकोला ताट फेकून मारले होते. त्यांच्या समोर दादासाहेब देखील गप्प गप्प राहत. एकतर दादा साहेब ३ वर्षांनी लहान होते. त्यात त्यांचा मानमरातब मोठा होता. नाना कधी कधी भडकले कि दादांच्या शिक्षणाचा, मोठेपणाचा, मनाचा देखील उद्धार करत. 

त्यांना तीन मुलगे होते. अर्थात ती मुले पण मोकाट होऊन गावातून फिरत असत. कित्येक वेळा गावातल्या कुणाशी तरी भांडण-तंटा करत. हाता-पाई करत. शिवीगाळ करत. कधी कधी त्यांना पोलीस पकडून खोड्यात घालून ठेवत असत. मग दादासाहेब जाऊन त्यांना सोडवून आणत. नानांच्या कुटुंबाचे, जाखाऊचे, तर घरात काही चालत नसे. अगदी पोतेऱ्या इतकी सुद्धा किंमत नव्हती. पोरांची हि तऱ्हा तर नवऱ्याची दुसरी तऱ्हा! त्यात नंतर तिला टीबी झाला. खोकत खोकत कांद्याच्या माडीत पडून राहायला लागली. तिच्याकडे तिची पोरे आणि नाना ढुंकूनही बघत नसत. कधी तरी अधून मधून नमाक्का, नाहीतर यरगोळ्याची म्हातारी येऊन बसून जायची. कधी कधी जना आणि संतराम पण यायचे. मग जाखाऊ, त्यांच्या डोक्यावरून चरबरीत हाताची बोटे फिरवायची. कानावर बोटे मोडून दृष्ट काढायची. मग पोरं तिला गाणी म्हणून दाखवत. कृष्णाचा नाच करून दाखवत. मग ती पोरांच्या हातावर बंदा रुपया ठेवायची. नमाक्काला भारी काळजी वाटे. कुठेतरी तिचा खोकला पोरांना झाला तर म्हणून तिचा जीव वर खाली व्हायचा. जनाला दिलेले रुपये ती लगेच काढून घेत असे. असे सगळे रुपये तिने एका पत्र्याच्या डब्यात जमा करून तो डबा तिच्या फडताळात ठेवून देत असे. जाखाऊच्या माहेरचे पण कुणी यायचे नाही. शेवटी खंगत खंगत एका संध्याकाळी तिचा श्वास संपला. सकाळी जेव्हा मोलकरीण खोली झाडायला गेली तेव्हाच कळलं कि जाखाऊ गेली म्हणून! तिच्या खोकल्याच्या धास्तीने नानांनी तिचे अंथरूण, पांघरूण आणि कपडे वाड्याच्या परड्यात नेऊन जाळून टाकले. इतकच काय पण ती ज्या कांद्याच्या मांडीत मेली,  त्या खोलीत देखील त्याने रॉकेल चा धूर आणि फिनेल मारून घेतले. आणि दाराला कायमची कडी घालून टाकली. मग पुढची कित्येक वर्षे त्या खोलीत कुणी फिरकले देखील नाही.  

जाखाऊ गेल्यावर नानाला रान मोकळे मिळाले. आधीच बाहेरख्याली होता. आता जहागीरच मिळाली. घरीच बाजार बसवायला लागला. भडवे आणि त्यांच्या बायका वाड्यावरच यायला लागल्या. बापाची हि तऱ्हा तर पोरांनी तरी का वेगळे वागावे! ती पण त्याच्यात सामील झाली. वाड्याची पार रयाच गेली. नमाक्काला काही तो प्रकार सहन होईना. वडील-वडील म्हणून दादा साहेबानी वाट पाहिली. वेगळ्या मार्गांनी समजावयाचा प्रयत्न करून बघितला. गावातले इतर प्रतिष्ठित लोक आणून त्यांना समजावयाला सांगितले. पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. उलट नानाची भेटी चेपतच गेली. उद्दाम पणा शिगेला पोहोचला. 

दादासाहेबांकडे प्रतिष्ठित लोक येत. कधी कधी त्यांच्या बरोबर त्यांची कुटुंबे असत. त्यांच्या समोर देखील नानाची थेरे चालूच असत. अगदी लाज यावी असे प्रकार चालू झाले होते. आणि या सगळ्याला पैसा देखील कापरासारखा संपायला लागला होता. ते खर्च भागवायला नानाने कुठल्या कुठल्या जमिनी खंडून द्यायला घेतल्या. त्याच्या मनानेच काही काही जमिनींचे व्यवहार देखील करायला घेतले. दादासाहेबांना हे कळायला देखील खूप वेळ लागला. मधेच कधीतरी एक वाटेकरी त्यांना भेटला आणि बोलता बोलता सगळ्या गोष्टींचा उलगडा होत गेला. दादा साहेबांनी तरी देखील आपल्याला हे सर्व ठाऊक होते असे दाखवून नानांची आणि घराची लाज वाचवली. पण तो विषय त्यांना काही गप्प राहू देईना. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी नानांना या बद्दल विचारले. दारूच्या नशेत नानांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यात त्यांना त्यांचे चिरंजीव पण सामील झाले. 
बोलता बोलता विषय वाढत गेला. आणि शेवटी नानांनी हातातला ग्लास फेकून मारला. दादा साहेबांच्या डोक्याला खोक पडली. त्यातून रक्त यायला लागलं. त्याच्या वर भरीस भर म्हणून नानांच्या मोठ्या मुलाने देखील दादासाहेबांवर हात उगारला. अतिशय संतापाने दादा साहेबानी त्यांच्या काठीत लपवलेली गुप्ती उपसून काढली आणि त्या मुलावर चालवली. एका क्षणात त्या गुप्तीचे धारदार निळसर चंदेरी पाते त्याच्या पोटातून घुसून पाठीतून बाहेर आले. रक्ताची चिळकांडी उडाली. आणि दुसऱ्याच क्षणी तो मुलगा जमिनीवर कोसळला. एका क्षणात रंगाचा बेरंग झाला होता. दादा साहेब डोके धरून खाली बसले. नाना संतापाने फणफणत येरझाऱ्या घालू लागले. 
आतला गलका पाहून वाड्याच्या बाहेर देखील गर्दी जमा झाली होती. त्यातल्याच मग कुणीतरी पोलिसांना वर्दी दिली. थोड्या वेळात पोलीस आले. घटनेचा पंचनामा केला. नानाच्या मेलेल्या मुलाला आणि दादा साहेबाना गाडीत घालून घेऊन गेले. रात्र वाढत होती. वाडा अंधारात बुडून गेला होता.
 
नमाक्का तर ते सगळे दृश्य पाहून बेशुद्धच पडली. यरगोळ्याच्या म्हातारीने त्या दिवशी संतराम आणि जनाला तिच्या घरी नेले. बरेच दिवस जना तिच्या घरीच होता. इकडे दादासाहेबांवर खटला भरला गेला. तारखे मागून तारीख मिळू लागली. तारखेच्या दिवशी नाना आणि नमाक्का  दोघेही कोर्टात वेगवेगळे जात. वाड्यात देखील आता नमाक्का तिच्या खोलीतच राहू लागली. त्या खोलीत तिचे एक लाकडी कपाट होते. त्या कपाटाला एक मोठा आरसा होता. त्याच्यावर नमाक्काची कुंकवाची  बोटे उठलेली होती. कपाटा मध्ये दादा साहेब आणि नमाक्का यांच्या अगदी मौल्यवान काही वस्तू असत. त्याच्यात दादासाहेबांच्या वडिलांच्या हातातले फावर लुबा कंपनीचे रिस्ट वाच होते. त्याच्या आईचे काही दागिने होते. एक मोठी मोत्याची नथ होती. तिच्यात हिरे आणि पाचू मढवूंन ठेवले होते. ती नथ दादा साहेबांच्या आईने नमाक्काला दिली होती जायच्या आधी. 
दादासाहेबांच्या आवडीच्या २-४ पगड्या आणि टोप्या होत्या. नमाक्काच्या आवडीची २-४ रेशमी लुगडी आणि पैठण्या होत्या. त्या कपाटात सगळ्या कुटुंबाचा जीव गुंतलेला होता. 

दादासाहेबांना धरून नेल्या पासून नमाक्काचा जीवात जीव नव्हता. एकटीच रडत बसलेली असे. कधी शून्यात नजर लावून आढ्याकडे नाहीतर खिडकीतून बाहेर बघत बसे. तिच्याच आजू-बाजूला जना घुटमळत असायचा. कधीतरी त्रागा असह्य होऊन नानांच्या समोर जाऊन घराची वाटणी मागे. 
गावातली माणसं कधी कधी भेटायला येत. तेव्हा तर मोठाच गहजब होत असे. कारण त्या माणसांना जसे दादा तसेच नाना असे वाटे. पण त्या माणसांना पाहून नमाक्काला धीर वाटत असे. मग ती वाटणीची मागणी लावून धरायची. रोजच्या कटकटीला कंटाळून एकदाची वाटणी करायची ठरले. तिला शेतीतले काही कळायचे नाही. मग त्याच्या बदल्यात नानाने तिला रोख रक्कम म्हणून काहीतरी रक्कम देऊन तिची बोलावण केली. २-४ दागिने दिले. वाड्यातल्या ३-४ खोल्या दिल्या. याच्यात जाखाऊ ची बंद केलेली खोली पण देऊ केली.  मध्ये उभी भिंत घालून टाकली. वाड्याचे मुख्य दार त्यांना बंद करून टाकले. भिंतीच्या बाजूला एक सरकारी वहिवाट होती. तिथून त्यांनी त्यांच्या खोल्यात यावे आणि जावे असे ठरले. आपल्याच घरात लक्ष्मी दारोदार झाली. जनाच्या पडक्याची हि नांदी होती. 

पुढे मग नानांनी पैशाच्या जोरावर रेटा लावून दादासाहेबांना फाशी नाहीतर जन्मठेप मिळण्यासाठी जोर लावला. आणि त्याची परिणती शेवटी जन्मठेपेत झाली. भरीस भर म्हणून घरच्यां पासून दूर म्हणून त्यांना पटियाळाच्या जेल मध्ये ठेवायचा हुकूम झाला. म्हणजे आता घर कायमचेच तुटले. 
दादासाहेबांना तो धक्का असह्य झाला. रोज त्यांचा जीव तीळ तीळ तुटायला लागला. जनाच्या आणि नमाक्काच्या काळजीने काळीज कुरतडून निघू लागले. आपली व्यथा बोलून दाखवायला कुणी आपल्या भाषेचा सुहृद देखील आजूबाजूला नसे. जेवण, हवा काहीही मानवेना. तशात त्यांना कावीळ झाली. बघता, बघता  ती रक्तात पसरली आणि एक दिवस दादासाहेब गेल्याची तार नमाक्काला मिळाली. अर्थात हि तार सुद्धा नानांना मिळाली आणि त्यांनी ती जाणून बुजून महिना भर दडवून ठेवली. कुठेही असले तरी दादासाहेब होते हा हि नमाक्काला खूप मोठा आधार होता. आता तो पण गेला. त्यांच्या पुढच्या संस्काराला देखील तिला जाता आले नाही. त्या धक्क्याने ती पण खंगत गेली. वातात आल्यासारखी मोठं-मोठ्याने ओरडे. शिव्या द्यायची. दोन्ही हातानी तळपट करायची. कधी एकटीच रडत बसे. कधी जनाला मांडीवर घेऊन रात्र-रात्र एका जागी बसून राही.

उरले सुरले एकेक करत नानांनी काढून घेतली. आता तिच्या कडे तिचे असे फक्त ते फडताळ राहिले होते. कधी कधी खुप वाईट वाटून घ्यायची आणि त्या फडताळाला घट्ट मिठी मारून बसायची. घरातला संवाद तर संपलाच होता. कुणाचे येणे जाणेही बंद झाले होते. तशातच एक दिवस कधीतरी नमाक्काचाही श्वास थांबला. जनाला काय करायचे ते माहीतच नव्हते. तो देखील बसून राहिला तिच्या बाजूला ३-४ दिवस. असह्य अशी दुर्गंधी सुटली. मग नानाच बघायला आला. त्याला तर वाटले कि दोघेही मेले का काय साप किरडू चावून म्हणून. बघतो जर जना जिवंत होता. 

मग गावातली ४ लोक बोलावून तिची विल्हेवाट लावली. आता जना पुरताच एकटा झाला. 
नमाक्का मेली तेव्हा यरगोळ्यांची म्हातारी उर फुटेस्तोवर रडली. जनाला सोबत घेऊन जाते म्हणाली. पण नानाने तिचे एक ऐकले नाही. वर "परत दारात दिसलीस तर पाय मोडून ठेवीन" म्हणून धमकी दिली आणि जनाला बखोटीला धरून फरफटत आत घेऊन गेला. माणसे पांगली ती कायमचीच!! नानाच्या धसक्याने कुणी जना कडे ढुंकून पाहीना. हळू हळू जना जगाच्या लेखी त्याच्या पडक्याचाच एक भाग होत गेला. 

कधी कधी जनाच्या पडक्यातून रात्री बोलल्याचे आवाज येत असत. काही टवाळ पोरं रात्री त्याच्या पडक्यात घाणेरडे धंदे करायला जात. तिथे जना एकटाच त्या फडताळाशी बोलत उभा असे. असंबद्ध आणि संदिग्ध! नमाक्काच्या कुंकुवाच्या बोटांवरून हात फिरवत बसे. कधी तिच्या लुगड्याची खोळ करून त्यात जाऊन बोलत बसे. हे सगळे नानाच्या तिसऱ्या पोराने पाहिले. त्याचे मित्र घेऊन तो त्याचे फडताळ उचलून आणायला निघाला. तेव्हा जनाने फडताळाला घट्ट मिठी मारली. त्या पोरांनी खूप प्रयत्न केला. त्यात त्या फडताळाचा आरसा देखील फुटला. त्यांनी जनाला लाथा बुक्क्या घातल्या. पण त्यांना ते जनाने नेऊ दिले नाही. बाकीची पोरं नानाच्या पोराला हसली. 
त्या दिवसा पासून नानाचे पोर डिवचल्यासारखे झाले होते. कधी एकदा जनाच्या नरडीचा घोट घेतो असे झाले होते. 

त्यानं नानाला फडताळा विषयी सांगितले. त्यात काय काय लपवले असेल या विचाराने नानाने एक निश्चित युक्ती काढली. त्यानं जनाला वेड्याच्या दवाखान्यात नेऊन ठेवायचे ठरवले. गाडी बोलावून त्याने जनाला त्यात बसविले. आणि गाडी जोरात दवाखान्याकडे घेऊन गेला. जनाला तिथे सोडून तो गेल्या पावली परत देखील आला. तिथल्या डॉक्टरांना त्यानं काय सांगितलं देव जाणे. पण त्यांनी जनाला सर्वात खतरनाक झटके द्यायला सुरुवात झाली. एका मागून एक झटके बसू लागले. प्रत्येक झटक्यानंतर जना गुरासारखा ओरडे. बांधलेले हात-पाय जगाच्या जागी जिवाच्या आकांताने तडफड करत. 

इकडे नाना आणि त्याच्या पोरांनी ते फडताळ पडक्यातून उचलून रस्त्यावर आणून ठेवले. मोठा जल्लोष केला. आता त्याच्या मधून काय काय बाहेर पडणार या उत्कंठेने, त्याच्या भोवती चौकडी जमा झाली. नानाच्या पोराने दार उघडले. आणि त्याच्यातून दोन काळे कुट्ट नाग फणफणत बाहेर आले. त्यांचे खवले अगदी दादासाहेबांच्या मखमली टोपी सारखे उन्हात चमकत होते. जिभा खाऊ कि गिळू अशा वळवळत होत्या. एकमेकांशी फेर धरून फणा काढून बसून होते. 
पोरं बिचकली. मागे सरकली. आणि परत धीर करून तिथल्या दगडांनी त्यांनी ते नाग ठेचून काढले. इकडे एक झटका असह्य होऊन जनाचा श्वास देखील थांबला होता.  

जना मुक्त झाला होता. पळत पळत तो स्मशानापाशी आला. तिथे ३ प्रेतं जळत होती. त्यानं नीट निरखून पाहिलं आणि अचानक त्याला दादासाहेब आणि नमाक्का दिसु लागले. संगमरवरी पाटा भोवती रांगोळ्या काढून पंगत सजवली होती. त्याच्या मध्ये खास मारवाडातून आणणेल्या चांदीच्या समया लावल्या होत्या. सुगंधी अगरबत्त्या आणि हैदराबादी अत्तरे शिंपडली होती. पंच पक्वान्नांनी ताट सजवले होते. चार भाज्या, २ कोशिंबिरी, तीन प्रकारचे भात आणि २ चटण्यांनी चांदीची पाने सजली होती. समई च्या ज्योतीने जनाचे डोळे चमकून उठले होते. आज दादासाहेबांनी राम नारायणाची सारंगी लावली होती. जेवण झाल्यावर जनाने नमाक्काच्या मांडीवर डोके ठेवले. नमाक्का मग त्याच्या डोक्यावर हात ठेवून "कौसल्ये चा राम" म्हणू लागली. सर्व वृत्ती शांत होत कधीतरी जना झोपी गेला. त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण तृप्ती मुक्कामाला आली होती. 
सकाळ होत होती. बाजूच्या चिताही विझून गेल्या होत्या. 

~ निखिल कुलकर्णी