Saturday, November 29, 2014

चिंचा


चिकोडीकर वाड्याच्या परड्यात गल्लीतली १०-१५ पोरे रोज जमायची. चिकोडीकरांचा सरदारी वाडा पार ३०० वर्षे जुना होता. त्याला किल्ल्याला असते तसले लाकडाचे भले मोठे दार होते. त्याला मोठ्या मोठ्या लोखंडी पट्ट्या लावून तो इतका जड झाला होता कि तो दरवाजा उघडायला आणि लावायला ३-४ माणसे तरी लागायची. त्या दरवाज्याला भल्या मोठ्या, हत्तीच्या पायात असतात तसल्या लोखंडी साखळ्या होत्या. भले मोठे कडी कोयंडे होते. तो दरवाजा लावला कि आधी त्याच्या साखळ्या लावून घ्यायचे. त्याच्या मागे भिंतीत खोल गेलेला मोठा चौकोनी लाकडी आडणा होता. त्या आडण्याला ओढून बाहेर काढण्यासाठी लोखंडाच्या जडशीळ कड्या होत्या. एकदा दरवाजा लावला कि मग शेजारच्या भिंतीतून तो आडणा ओढून ठेवून देत. म्हणजे जरी चुकून एखाद्या वेळेस हत्तीच्या वगैरे धडकेने दरवाजाच्या कड्या उघडल्याच तरी दरवाजा आडण्यावर धडकून पुन्हा बंद व्हायचा. त्या दरवाज्याला एक दिंडी दरवाजा होता. तो दिंडी दरवाजा देखील इतका मोठा होता, कि लहान पोरंच काय पण थोडी बुटकी मोठी माणसे देखील त्याच्यातून न वाकता सरळ ताठ चालत जायची. तो दरवाजा एकदा उघडला कि त्याला अडसर म्हणून मोठे २ तोफांचे दगडी गोळे तिथे ठेवलेले असायचे. मुख्य दरवाज्यातून आत गेलं कि मोठी पडवी होती. त्यात एक जुने सुपारीचे झाड होते. त्याला सुपाऱ्या लागलेल्या कधी कुणी पहिल्या नाहीत. त्याला काही सावलीही नव्हती. उगाच आपल्या ४-२ झावळ्या उंच कुठेतरी वाऱ्यावर मिरवत बसलेल्या असायच्या. पण बरीच वर्ष झाली तरी कुणी ते झाड तोडले नाही. सुपारीच्या झाडाला लागून मोठा सोपा होता. त्या सोप्याला काळी कुळकुळीत अगदी मऊ शहाबादी फारशी घातलेली होती. सोप्याच्या एका बाजूला गुरे बांधायचा गोठा होता. वास्तविक वाडा जेव्हा बांधला तेव्हा कदाचित तिथे घोडे बांधत असावेत. सोप्यातच एक पितळी नक्षीदार साखळ्यात बांधलेला एक शिसवी झोपाळा होता. कडिपाटाच्या फळ्या एकमेकात गुंतवून त्याचा मोठा पाट केला होता. त्याच्या चार कोपऱ्यात प्रत्येकी एक असे पितळ्याचे तगारीच्या फुलासारखे एकेक फुल उलटे लावलेले असून त्या फुलातून साखळ्या ओवून घेवून त्या छताला लावलेल्या असत. सोप्याच्या खाली वास्तविक एक मोठे अंधारलेले पेव होते. पूर्वी याच्यात धान्य वगैरे ठेवत असावेत. त्या पेवाचे एक तोंड बरोबर झोपाळ्याच्या खाली उघडत असे. त्याच्यावर एक लाकडी पाट टाकून ते बंद करून घेतलेले होते. झोपाळ्यावर बसले कि त्या लाकडी पाटावर पाय लागायचा. त्या पाटाचा आणि पितळेच्या कड्यांच्या एक विशिष्ठ गोड आवाज येत राहायचा. लहान लहान तान्ही मुलं  तर झोपाळ्यावर बसली कि लगेच झोपून जायची. कित्येक आया, पोर अगदीच ऐकेनासे झाले कि त्याला झोपवायला या झोपाळ्यावर यायच्या. वाडा पोराला आवडायला लागायचा!  

सोप्याच्या पुढे एका बाजूला माजघर होतं आणि त्याच्या समोर बाळंतीणीची अंधारी खोली होती. बाळंतीणीची खोली इतकी अंधारी होती कि डोळ्यात बोट घातले तरी दिसायचे नाही. माजघराच्या एका बाजूला देवाची वेगळी खोली होती. माज घराच्या पुढे मग जेवणाची जागा होती आणि त्याला लागूनच मोठे स्वयंपाक घर होते. इथे खूप मोठी मातीची चूल होती. त्याच्या बाजूला पुरुष भर उंचीची तांब्याची घंघाळी होती. स्वयंपाक घराच्या एका बाजूला मोठे तुळशी वृंदावन होते आणि त्याच्या मागे न्हाणीघर होते. या न्हाणीघरात देखील पाणी तापवायला म्हणून तांब्याचे मोठे घंघाळ होते. लाकडाच्या धगीने तापून तापून ते काळे करंद झाले होते. त्याच्या बाजूला पाण्याचा एक मोठा हौद होता. न्हाणीघराच्या मागे परडे होते. खूप मोठी मोकळी जागा होती. एका बाजूने वैरणीच्या खोल्या होत्या. एका बाजूला खूप खोल आणि चौकोनी आड होते. त्या आडावर एक रहाट होते. बरेच दिवस न वापरल्याने ते गंजून गेले होते. आड खूप खोल होते आणि त्यात विशेष पाणी नसायचे. त्यामुळे वरून बघितले तर फक्त काळा गुढ चौकोन दिसायचा. अंत नसलेला!! या आडाला आणि वाड्याच्या भिंतीला लागून वडासारखी अजस्त्र चिंचेची झाडे होती. एकेका झाडाचा घेर प्रचंड होता. त्यांचा विस्तार देखील असा होता कि जमिनीवरून वेगवेगळी उगवलेली हि झाडे आकाशात अगदी हातात हात घालून उभी होती. यातल्या कुठल्याही एका झाडावर चढून कुठल्याही झाडावरून खाली उतरता येत असे. 

दर रोज दुपारी गल्लीतली १०-१५ पोरं तरी इथे हजर असायची. सकाळची शाळा आटोपली कि पोरं आपल्या घरी शाळेचे दप्तर टाकून तडक चिकोडीकर वाड्याच्या परड्यात हजर व्हायची. मग सुरु व्हायचा खरा दिवस!! सर्वात आधी झाडावर चढून चड्डीच्या एका खिशात थोड्या कच्च्या आणि दुसऱ्या खिशात गाभुळलेल्या चिंचा भरल्या जायच्या. मग त्या चिंचा खात खात पुढच्या खेळाची तयारी सुरु व्हायची. कधी लपंडाव, कधी सूरपारंब्या, कधी गोट्या नाहीतर कधी चिन्नी दांडूचा निश्चय व्हायचा. पण यातला सगळ्यात आवडता खेळ म्हणजे चिंचोके. या खेळाचे मुख्य भांडवल म्हणजे चिंचोके. मुबलक चिंचा खाउन त्याचे चिंचोके आधी गोळा करावे लागत. जो जास्त चिंचा खाईल त्याचे भांडवल जास्त! त्यासाठी मग पोरं बराच वेळ झाडावरच असत. पोट भरे पर्यंत किंवा चिंचोक्यानी खिशे भरे पर्यंत पोरं झाडावरच असायची. त्यात एखाद दुसरे पोर हात सुटून झाडावरून पडायचे देखील!! पण पडून लागले म्हणून इतर तसल्याच शेम्बड्या पोरांसमोर रडायची त्याची काय बिशाद होती!!कुणी झाडावरून पडले तर त्याचे स्वागत मोठमोठ्याने हसून आणि बोटे दाखवून व्हायचे. पोर पडल्या पडल्या बाकीच्या भाग्यवंतांचा झाडावरून मोठा गिल्ला व्हायचा. त्यापुढे पडल्याचा आवाज देखील दबून जायचा. पोरं मोठमोठ्यानं हसायची. खिदळायची. एकमेकांना तोंड वेडावून दाखवायची. या सगळ्याचा परिणाम म्हणून पडलेले पोरं जणू काही झालेच नाही अशा तोऱ्यात उठायचे आणि परत तडक जिथून पडले होते तिथे जावून बसायचे. हात नाहीतर पाय ठणकत असायचा पण सांगायची सोय नसायची. जोरात लागले म्हणून रडावे तर 'रडू बाई रडू कोपऱ्यात बसू' म्हणून गिल्ला व्हायचा. घरी निघून जावे तर 'भित्री भागूबाई' असा गिल्ला व्हायचा. चिडून एखादाला शिव्या घालील तर लगेच झाडावरून गाणे सुरु व्हायचे 'चिडका बिब्बा चिडला. झाडावरून जाऊन बसला. झाडाखाली सुपारी. तुझे लग्न दुपारी. लग्नाला आले पाहुणे. ते तुझे मेहुणे. मेहुण्यांनी आणले काळे कुत्रे. ते तुझे मंगळसूत्रे'. पार त्याचे काळ्या कुत्र्याशी लग्न लावून पोरं मोकळी व्हायची. या सगळ्या पेक्षा काही झालेच नाही अशा थाटात परत झाडावर चढणे आणि तितक्याच जोमाने चिंचा खायला घेणे एवढा एकच पर्याय त्या पडलेल्या पोराकडे शिल्लक असायचा. यातलं एक जरी पोर एखाद्या दिवशी खेळायला आलं नाही तर ४-२ पोरं त्याला त्याच्या घरी जाऊन त्याला उचलून घेऊन यायची.  
    
त्या झाडात एक विलायती चिंचांचे झाड होते. त्याच्या चिंचा या नागमोडी आकाराच्या असून त्यांना हिरवी नाहीतर लाल टरफले असायची. हि चिंच स्वत:भोवती गिरक्या घेत वाढायची. टरफल काढून टाकले कि आत पांढरी बुटुके असायची. हे पांढरे बुटुक थोड्या तुरट खोबऱ्या सारखे लागायचे. त्या प्रत्येक बुटुकात एक काळीकुट्ट बी असायची. त्या काळ्या बी ला एका बाजूला एक डोळा असायचा. त्या डोळ्याला थोडेसे नखलले तर हळूच काळे सालपट वेगळे व्हायला लागायचे. त्याच्या आत तपकिरी रंगांचे मखमली सारखे मऊ  कवच असायचे. ते सगळे 
काळे सालपट नखाने काढून अख्खीच्या अख्खी बी तपकीरी दिसे पर्यंत हा उद्योग चालायचा. हे बी तपकिरी करायचे प्रकरण फार नाजूक हातांनी करावे लागायचे. जरा जरी नख जोरात लागले तरी ते तपकिरी आवरण फाटायचे आणि बीच्या अंतरंगातला पिवळा गर बाहेर यायचा. बी जरा जरी पिवळी दिसली तरी सरळ गटारीत फेकून दिली जायची. अशा पूर्ण तपकिरी झालेल्या बिया हे चिंचोक्याच्या खेळातले एक चलन होते. १०० साधे चिंचोके देऊन अशी एक तपकिरी बी मिळायची. पोरं त्या तपकिरी बिया जीवापाड सांभाळून ठेवायची. कुणी कुणी तर रिकाम्या काड्याच्या पेट्या घेऊन त्यात या तपकिरी बिया ठेवायचे. 

मग पसाभर चिंचोके गोळा झाले कि पोरं झाडावरून खाली उतरून चौकात खेळायला घ्यायची. त्याच्यात देखील बेंबीच्या देठा पासून आरडायची. दगडाच्या कापरीने एखाद्याचा नेम बरोबर लागायचा आणि आखलेल्या चौकोनातून ठरलेला चिंचोका बरोबर चौकोनाच्या बाहेर पडायचा. मग चौकोनात इतर पोरांनी लावलले सगळे चिंचोके त्या पोराला मिळायचे. मग तो वेड्या सारखा नाचायचा. १०० पेक्षा जास्त चिंचोके जमा झाले असतील तर कुठल्या तरी कालच्या नाहीतर परवाच्या डावातल्या शेठाला ते देऊन त्याच्या बदल्यात एक तपकिरी बी घ्यायचा. १०० चिंचोके ठेवायचा ताप नको म्हणून!!

परड्याच्या दुसऱ्या टोकाला एक भिंत होती आणि भिंतीला लागून हिरेमठाचा पडका वाडा होता. त्या वाड्याच्या बहुतेक सगळ्या खोल्या पडायला आलेल्या होत्या. खालच्या मजल्यावर १-२ खोल्या शिल्लक होत्या त्यात कुणीतरी बिऱ्हाडकरू रहायचे. आणि वरच्या मजल्यावर एका खोलीत वाड्याची विधवा मालकीण नागव्वा रहायची. नागव्वाला तिच्या वाड्या बाहेर पडलेले कित्येक वर्षात कुणी पाहिलेले नव्हते. वाडाच काय पण ती कधी तिच्या खोलीच्या देखील बाहेर पडत नसे. खालच्या बिऱ्हाडकरू पैकी कुणीतरी तिला आठवड्यातून एकदा पीठ-मीठ, तेल, भाजी वगैरे आणून द्यायचा. वर्षानुवर्षे घरात राहून राहून नागव्वा पांढरी फटक पडली होती. सदैव खिडकीतून बाहेर बघत बसलेली असायची. तोंडाने आपल्याशीच काही काही पुटपुटायची. तिचे डोळे बेडकासारखे मोठे असून तिचा गळा सोललेल्या केळीच्या सोटा सारखा दिसायचा. नऊ वारी इरकली लुगड्याचा टोप पदर काढून, डाव्या पायाचे फतकल मारून, उजवा गुडघा छातीशी धरून, नागव्वा खिडकीतून नाहीतर दरवाज्यातून बाहेर बघत स्वतःशीच काहीतरी बरळत बसलेली असायची. दरवाजातून तिला तिचा पडलेला वाडा दिसायचा. तिच्या खोली समोर थोडे अंतर गेल्यावर लिंगाप्पाची पडकी खोली होती. त्या खोलीला कुणीतरी जुने गंजलेले कुलूप लावून ठेवले होते. पण बाजूच्या भिंती पडून गेल्याने नुसती चौकट आणि चौकटीला लावलेले कडी-कुलूप शिल्लक राहिले होते. आतल्या भिंतीतली कपाटे आणि  देवघराचे कोनाडे बाहेरून दिसायचे. त्या कोनाड्यावर लिहिलेली कानडी अक्षरे आणि नक्षी धुळीने गिळून टाकली होती. एखाद दुसरे स्वस्तिक नाहीतर गोपद्म शिल्लक राहिले होते. जागो जागी तुळया निखळल्या होत्या. दानाप्पाच्या खोलीच्या तर दारातच तुळई मोडून पडली होती. खोलीतून थोडे खाली पाहिले तर खालच्या चौकात बसवेश्वराचे छोटे चौकोनी देउळ दिसायचे. त्या देवळात तेल-फुल लागून वर्षे उलटून गेली होती. देवळात गार जुनी फरशी होती. त्याच्या गारव्याला एखादं साप किरडू हमखास गाभाऱ्यात मुक्कामाला आलेलं असायचं. देवळाच्या बाहेरच्या कोनाड्यात एक ताईबाईचा दगड होता. हा दगड बराच लांबट असून त्याला डाव्या बाजूला एक टेंगुळ आला होता. तिच्यावर कधीतरी लाल शेंदूर लावून त्याला पांढऱ्या कवड्यांचे डोळे करून बसवलेले होते. ते सगळे रूप अगदी उग्र आणि भीतीदायक दिसायचे. पोरे तर त्या बाजूला फिरकत देखील नसत. हि ताईबाई लहान पोरांना रडवायची. म्हणून एखाद्या बिऱ्हाडकरुचं पोर फारच  रडायला लागलं तर अमावास्येला त्या ताईबाईला कुणीतरी नारळ फोडायचं आणि खोबरं तिथच ठेवून निघून जायचं. असल्या नारळांची वाळलेली भकलं आणि करवंट्याचे तुकडे तिथे पडलेले असायचे. मोठ्या मोठ्या घुशी ते खोबरे कुरतडत बसलेल्या असायच्या. दिवसा देखील रात किडे फेर धरून आरडत बसलेले असायचे. वाड्यात जिकडे तिकडे रानटी गवत वाढले होते. नागव्वाच्या खोलीत जायला तर जेमतेम एक पाय वाट काय ती शिल्लक राहिली होती. नवऱ्याच्या मागे नागव्वाची पोरं तिला एका मागोमाग एक सोडून आपल्या पोटाच्या मागे निघून गेली होती. त्यांच्या आठवणी काढून काढून नागव्वा कासावीस व्हायची. लिंगाप्पा निघाला तेव्हा तिने साजूक तुपाचा दिवा बसवेश्वराच्या देवळात लावला होता. पुढं काही वर्षं लिंगाप्पा वर्षातून एखादा दिवस तरी घरी येउन जायचा पण पुढे ते देखील हळु हळु बंदच झाले. दानाप्पाच्या बाईचे आणि नागव्वाचे काही कधी जमलेच नाही. दानाप्पाने त्याच्या आवडीने एका अनाथ पोरीशी सूत  जुळवले होते. मंगसूळीच्या देवळात जावून लग्न केले. नागव्वाला काही ते पटले नाही. शिवाय दानाप्पाच्या बाईची उजव्या हाताची दोन बोटं थिटी होती. म्हणून नागव्वा तिच्या हातचे पाणी देखील प्यायची नाही. पुढं दानाप्पाला गोड पोरं देखील झाली. दानाप्पाने खूप सांगून बघितले. पण ते जमायचं नव्हतच. एक दिवस दानाप्पाची बायको काही न सांगता पोरं घेऊन निघून गेली. तिला आणायला म्हणून दानाप्पा गेला तो परत आलाच नाही. त्याच्या नंतर आठवण्याच्या पलीकडे नागव्वाच्या आयुष्यात दुसरे काही घडलेच नाही. जळून गेलेल्या निखाऱ्यासारखी नागव्वा धुमसत बसलेली असे. चिंचेवर पोरं चढली कि तिच्या रागाला पारावार रहायचा नाही. पोरांच्या अंगावार मोठ-मोठ्यानं आरडायची. कानडीतून शिव्या द्यायची. दोन हात एकमेकावर घासत तळपट करायची. तिच्या अवताराला बघून पोरं जास्तच चेकाळायची. तिला तोंडे वेडावून दाखवायची. तिच्या खिडकीच्या बाजूला जावून रिकामी पत्र्याची डबडी जोरजोरात वाजवायची. कधी कधी फटाक्याची एखाद्याची माळ झाडावर लावून द्यायची. सगळी माळ उडून झाली कि परत गिल्ला करायची. नागव्वाच्या नावाने शिमगा करायची. हा खेळ रोजचाच होऊन बसला होता. नागव्वाच्या वाड्यात राहणारा अजित देखील त्याच्यात सामील असायचा. अजित ची आई अधून मधून आजारी असायची.     

वाड्याच्या दुसऱ्या  बाजूला मुख्य रस्ता होता. मनसोक्त चिंचा  खाऊन झाल्यावर पोरं रस्त्यावर यायची आणि गोट्या, चिन्नी-दांडू खेळायची. दुपारच्या वेळेला त्या रस्त्यावरून काखेला जुनाट बोचके लावून केरी चालत जायची. हिरवे नऊ वारी विरलेले लुगडे गुडघ्या वर गेलेले असायचे. त्याला ठिकठिकाणी ठिगळे लावलेली असायची. जागोजागी दंड घातलेले असायचे. जुनाट कागवाडी खणाची चोळी असायची. ती देखील कुठे कुठे फाटलेली असायची. केरीने अंघोळ कधी केली ते तिला देखील आठवायचे नाही. लांबून देखील आंबूस मळका धुळकट वास यायचा. केसांच्या जटा झाल्या होत्या. केरी त्या जटा कापडाच्या एका खोळीत भरून ठेवायची आणि त्या खोळीला गाठ मारून ठेवायची. हाता पायाची कातडी फुटलेली असायची. कधीं कधी त्यात जखमा होऊन त्यातून रक्त येत असायचे. तिच्या कातडीला सापा सारखे खवले पडले होते. अखंड उन्हात, पावसात आणि थंडीत राहून केरी अगदी निबर दिसायची. तोंडात मिश्रि लावलेली असायची. बारीक खाचांसारखे खूप खोल गेलेले, आडासारखे  डोळे, सारखे भिरभिर फिरत असायचे. नजर कधी स्थिर नसायची. सारखे काहीतरी शोधत असायची.  कुणाकडे पाहून केरी कधी हसली तर तिचे कोळश्यासारखे काळे कुट्ट दात दिसायचे. तिच्या डोळ्याच्या बाजूला चेहऱ्यावर विलक्षण सुरकुत्या पडायच्या. कपाळाला भले मोट्ठे कुंकू लावलेले असायचे. तिच्या पायात कुठल्यातरी जुन्या बंद तुटलेल्या स्लीपर असायच्या. प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या एकातएक ओवून त्याचे बंद करून स्लीपरला बांधलेले असायचे. डाव्या बगलेत एक मोठे बोचके असायचे. त्यात असंख्य वस्तू असायच्या. केरी दिवसभर गावात चालत फिरत असायची. कुठे कुठे काय काय मिळेल ते बोचक्यात भरून ठेवायची. त्याच्यात प्लास्टिकच्या भिंगऱ्या असायच्या. काचेच्या आणि गारेच्या गोट्या असायच्या. पतंगाचा मांजा असायचा. चकचकीत सिगारेटच्या पाकिटातले कागद असायचे. लाकडी भोवरे असायचे. केरी दिसली कि मोठी मोठी पोरे तिच्या भोवती गोल करून तिला काहीतरी मागायची. केरी आधी दाद लागू द्यायची नाही. मग कुणीतरी वांड पोर गल्लीतले कुत्रे केरीच्या अंगावर सोडायची भीती घालायचं. केरी घाबरायची आणि मग पोरं काय मागतील ते बोचक्यातून काढून द्यायची. केरी कुठून तरी बाजूच्या कर्नाटकातून आली होती. कृपामयी हॉस्पिटल मध्ये वेड्यांच्या वार्डात तिला तिची लेक सोडून गेली ती परत आलीच नाही. त्यालाही आता खूप वर्षे झाली होती. वाट पाहून डॉक्टरनी तिला शेवटी घालवून दिले. अंबाबाईच्या देवळाच्या बाजूला एक धर्मशाळा होती. तिथे केरी रहायची. त्या धर्मशाळेला ना दार होते ना खिडकी! तीन बाजूनी बांधून काढलेली एक ओवरी होती. लाकडाच्या खांबाना टेकून छप्पर उभे होते. त्याच्यावर देशी मातीची कौले घातली होती. तिथेच छपराला टांगून अंबाबाईची जडशीळ पालखी बांधलेली असायची. ती पालखी इतकी जड होती कि ती उचलायला किमान आठ दहा तरी माणसे लागायची. त्या पालखीच्या खाली केरी अंग मुडपून झोपायची. रात्रभर डोळ्यासमोर तिला पालखीचे ताळ दिसायचे. दिवसा गावभर फिरून कुणी एखादी भाकरी नाहीतर वाडगाभर भात आणि पिठले दिलेले असायचे. त्यातली थोडी उद्या साठी ठेवलीच तर एखाद दुसरा भुकेला भिकारी यायचा. केरी त्याला उरलेले देऊन टाकायची. संचय असा कशाचाच नव्हता. तिला मागचे काही आठवत नव्हते. ती इथे कशी आली, तिला कुणी नात्याचे-गोत्याचे होते कि नाही, यातले काही काही आठवायचे नाही. सकाळ झाली कि निमुटपणे ती बोचके घेऊन चालायला लागायची. प्रत्येक दिवस कोऱ्या कागदा सारखा नविन करकरीत होता. गेल्या दिवसांचा आणि त्यातला आठवणींचा त्याच्यावर कसलाही गिरगोटा नसायचा. काय झाले होते कुणास ठाऊक पण कुत्र्याची भीती मात्र शिल्लक होती. दिवसा सरकारी शाळेच्या बाहेर, मधल्या सुट्टीत चिंचा, आवळे, गोट्या घेऊन विकायला बसायची. चिंचांचे कुटुन लाडू करायची. त्याच्यात मिठ आणि साखर घालून, चांगले वळून, पाच पैशाला दोन असे विकायची. वात्रट पोरं तिच्या नकळत चिंचांचे लाडू, आवळे पळवायची. केरीला त्याचे काही नव्हते. दिवसातून कधी एखादा रुपया तिला मिळायचा. त्याची थोडी मिश्रि विकत घ्यायची. त्या दिवशी वाड्यावरून जाताना पोरांनी तिला थांबवले. पोरांचे खिशे चिंचानी भरले होते. रोज केरीला कुत्र्याची भीती दाखवून पोरेही कंटाळली होती. एका पोराने केरीला विचारले "केरे आम्ही तुला चिंचा देतो तू आम्हाला गोट्या देशील का?" केरीचे डोळे चमकले. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिच्याशी सौदा करत होते. भीती शिवाय दुसरे काहीतरी पहिल्यांदाच कुणीतरी तिला देवू करत होते. केरीने सौदा मान्य केला. पोरं खिशे भर-भरून चिंचा द्यायची आणि केरी कुणाला गारेच्या तर कुणाल काचेच्या गोट्या द्यायला लागली. खिसाभर चिंचा काढून पोरे केरीची वाट बघत बसलेली असायची. गोट्यांचा खेळ जोरात चालू होता.  

नागव्वाच्या वाड्यात अजितच्या आईची तब्बेत मात्र बिघडत चालली होती. तिला कसला तरी आजार झाला होता. दिवसें दिवस अशक्त होत चालली होती. शेजारच्या गावात सरकारी दवाखान्यात उपचार चालू होते पण फारसा फरक पडत नव्हता. पाली सारखी पांढरी फट्ट पडली होती. हात पाय हलवायला देखील श्रम पडत होते. चार दोन शब्द बोलली तरी धाप लागायची. प्रवासाचा त्रास वाचेल म्हणून अजितच्या वडिलांनी शेवटी गाव सोडायचे ठरवले. सामानाची बांधाबांध करून अचानक एक दिवशी त्यांनी गाव सोडले देखील! पोरांना काही कळलेच नाही.  

नागव्वाच्या वाड्यातली उरली सुरली जाग देखील निघून गेली. आता नागव्वा तिच्या तंद्रीत अहोरात्र धुमसत बसलेली असायची. अनेक दिवस वाड्यात दिवा देखील लागायचा नाही. दिवसा पोरांचा चिंचेवरचा दंगा मात्र चालू होता. तो दंगा ऐकून तिची तंद्री तुटायची आणि तिचा तळतळाट व्हायचा. शेवटी मनाशी काहीतरी पक्के ठरवून नागव्वा पोरांना म्हणाली "तुमचं तळपट होईल शिंच्यानो!! माझ्या वाड्यातली ताईबाई गिळेल एकेकाला!! त्या अजितच्या आईला गिळली तशी!!" पोरं डोळे फाडून बघत होती. अजित गाव सोडून गेला त्याने पोरं आधीच सुन्न झाली होती. त्यात त्याच्या आईला नागव्वाच्या ताईबाईने गिळले हे ऐकून तर पोरं पार हबकून गेली. एकेक करून झाडावरून उतरली आणि आपआपल्या घराकडे निघून गेली. सगळे परडे सुन्न झाले. हापापलेल्या डोळ्यांनी नागव्वा बघत होती. तोंडाने काही काही पुटपुटत होती. बऱ्याच वर्षांचा सूड तिच्या डोळ्यातून बाहेर पडत होता. 

त्या दिवशी चिकोडीकर वाड्याच्या दाराशी, केरी बराच वेळ थांबली होती. तिने एक दोन वेळा वाड्यात डोकावून देखील पाहिले. आपआपल्या घराच्या खिडकीत बसून पोरं केरीकडे पाहत होती. सगळे सामसूम झाले होते. 

Thursday, September 18, 2014

आळ्या

डोंगरामधल्या अंधारलेल्या घळई मधे असंख्य आळ्या एकमेकांच्या अंगावरून हलत होत्या. त्यांचा रंग पिवळसर काळा असून त्यावर सुरवंटा सारखी लव होती. त्या जागेला उजेडाचा कधी स्पर्शही झालेला नव्हता. भिंतींवर बुरसट शेवाळे साचून राहिले होते. कुठेतरी डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचे थेंब टपकत असायचे. त्या ओलीने हवा अधिकच रोगट झालेली असायची. इथे कधी वारा हलला नाही कि कुठले पाखरू कधी अवचित थांबले नाही. लांबून वाहणाऱ्या नदीचा आवाज सोडला तर इतर कसला आवाज देखील कधी इथे पर्यंत पोहोचला नाही. कसला तरी सडका कुबट वास मात्र कायमचा होता. किंबहुना तो वास हि त्या जागेची ओळख होती. कधीतरी चार दोन माणसे मेलेले कुत्रे नाहीतर मांजर आणून टाकायची आणि कसलाही आवाज न करता निघून जायची. त्यावर मग पुढे बरेच दिवस जायचे. या आळ्या इथे कित्येक शतकांपासून रहात होत्या. पिढ्या मागून पिढ्या चालू होत्या. या आळ्या इथे यायच्या आधी इथे खूप सुरवंट रहात. या आळ्यामधल्या कुठल्यातरी महापराक्रमी आळीने त्या सुरवंटाना इथून हुसकून लावले होते आणि यांचे बस्तान बसवले होते. आलेल्या मेल्या शरीरावर मनसोक्त आहार करत आळ्यांच्या पिढ्या पुढे जात होत्या. त्याच्या मध्ये अगदी छोटी पिल्ले होती. तरुण मंडळी होती. आणि वयोवृद्ध शरीराने थकलेल्या आणि वळवळ जवळ थांबलेल्या आळ्याही होत्या. संपूर्ण सुरक्षित आणि अभेद्य अशा त्या कृष्ण विवरात त्यांचे विश्व होते. अहोरात्र असंख्य जन्म होत होते. जुने जीव नवीन शरीरे घेऊन नव्या अवतारात प्रकट होत होते. आणि तेवढ्याच संख्येने वृद्ध संसाराचा निरोप घेत होते. इथे जन्माचे विशेष नव्हते. नव्या आळ्या जन्म घेताना त्या संख्येने इतक्या प्रचंड असत कि कुणी त्यांचा जन्म उत्सव घालून साजरा केला नाही. आणि विशेष म्हणजे त्या विवरात मेलेली आळी कधी कुणी पाहिली नाही. आळी जेव्हा अगदी म्हातारी होऊन तिला चालणे देखील अवघड व्हायचे, तेव्हा चार दोन आळ्या तिला उचलून त्या घळई मधून अंगावरून उचलून बाहेर घेऊन जात. त्या आळीचे फुलपाखरू झाले कि मग इतर आळया घळई मधे परत येत. दिवसातून असंख्य आळ्या अशा बाहेर नेल्या जात. चार दोन चार दोन च्या गट्ठ्याने पोचवायला गेलेल्या आळ्या  परत येत. त्यामुळे आळी गेल्याचाही उत्सव साजरा करायला इथे सवड नव्हती. 

ह्या असल्या कुजत कुबट जागेत का राहायचे, असले लिबलिबीत बेढब शरीर घेऊन का जगायचे,  याचा नेमका अंत काय आणि त्याचा नेमका अर्थ काय असे प्रश्न प्रत्येक छोट्या आळीला पडत होते. शेवटी फुलपाखरू व्हायचे असेल तर हा जन्म जगालाच पाहिजे असे त्याचे उत्तर होते. 

प्रत्येक आळीला फुलपाखराचे वर्णन पाठ होते. फुलपाखराचे विविध रंग प्रत्येक आळीला खुणावायचे. पिवळसर काळ्या आळ्याना पिवळे पंख फुटल्याची आणि त्यावर काळे मोहक ठिपके गोंदल्याची स्वप्ने पडायची. एक मेकांच्या अंगावरून सरपट चालताना मधेच कधीतरी डोळ्यात फुलावरून उडत असल्याची चमक चमकून जायची. अंगाला लागलेले रक्ताचे आणि मांसाचे तुकडे पाहताना पंखाला चिकटलेले परागकण दिसायचे. स्वप्न इतकं प्रबळ होतं कि त्यामुळं किळसवाण्या वास्तवाची जाग देखील शिल्लक राहत नव्हती. जो तो एका धुंदीत जगत होता. प्रत्येक वृद्ध आळीला पोचवून येताना आता आपलाही दिवस जवळ येत आहे याचा मूक आनंद प्रत्येक आळीला होत होता. त्यामुळे अतिशय अनासक्त पणे सर्व व्यवहार निमुट्पणाने चालू होते. उद्याचा दुवा इतका प्रगल्भ होता कि त्याने आजचा दिवसच पुसून टाकला जात होता. 

वास्तविक कोणत्याही आळीने दुसऱ्या अळीचे फुलपाखरू झालेले प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. वृद्ध आळीला पोचवायला जाणाऱ्या आळ्या एका उंच डोंगराच्या टोकावर जात. त्या टोकावर त्या वृद्ध आळीला फुलपाखरू होण्यासाठी ठेवून घळई मध्ये परत जात. त्या डोंगरावर जाण्याची वाट अतिशय उभट असून तिला जागोजागी वळणे होती. पडणाऱ्या पाण्याने रस्ता निसरडा झालेला असायचा. शिवाय पोचवायला निघालेल्या आणि पोचवून परत निघालेल्या आळ्याची चिक्कार गर्दी असायची. त्यामुळे आळ्या निमुटपणे वृद्ध आळीला टोकावर ठेवून लगेचच खालच्या मानेने परत यायच्या. डोंगराच्या टोकावर देखील फुलपाखरू होण्यासाठी आलेल्या वृद्ध आळ्याची पुष्कळ गर्दी असे. त्या जवळ जवळ निपचित पडलेल्या असत. त्यांचे डोळे जवळ जवळ बंद झालेले असायचे. कसलीही हालचाल करण्याची शक्ती किंवा इच्छा त्यांच्याकडे शिल्लक नसे. उभा जन्म कुबट विवरात काढून आता त्या मोकळ्या वाऱ्यात आणि स्वच्छ प्रकाशात आलेल्या असत. आता कोणत्याहि क्षणी पंख फुटून आपण हवेवर आरूढ होणार या स्वप्नात रममाण असतानाच वाऱ्याच्या झोताने त्या हवेत उंच उडून जात. उडत असताना त्यांना पिवळे पंख फुटल्याचा भास होत असे. 

डोंगराच्या तळाशी, तसल्याच एका दुसऱ्या कृष्ण विवरात या पिवळ्या वृद्ध आळ्यांचा खच पडलेला होता. त्यावर हिरव्या आळ्या गर्दी करून चालत होत्या.   

Saturday, August 30, 2014

अमदूभाई

गुरुवार पेठेत सगळी मुसलमानाची घरं होती. मीरासाहेबाच्या दर्ग्याच्या आजूबाजूला सगळी अगदी दाटीवाटीनं राहायची. एकाला एक लागून असे मोहल्ले होते. मधेच कुठे पांढरे शुभ्र रंगवलेले मशिदीचे मिनार दिसायचे. मिनारावर सगळ्यात उंच एक चांद तारा आणी दोन बाजूला दोन असे लाऊड स्पीकर असायचे. मोठ्या पांढऱ्या शुभ्र उंच भिंतींची मशीद असायची. त्याच्यातून दिवसातून ५ वेळ न चुकता नमाज पढला जायचा. मशिदीत आत जायच्या आधी हात पाय धुवायला मोठी जागा असायची. मशिदीच्या बाजूला अगदी चिकटून चिकटून हिरव्या रंगात रंगवलेली २ किंवा ३ मजली घरे असायची. त्यावर खालच्या मजल्यावर कसली कसली दुकाने असायची. त्याच्यात अगदी सूरीला धार करून देण्यापासून ते वासाच्या अत्तरापर्यंत सगळा माल मिळायचा. त्यात एखादे अगदी मळकट पाटी लावलेले हॉटेल असायचे. हॉटेलवाला रस्त्यावरच भजी नाहीतर शेव तळत बसलेला असायचा. त्याच्या स्टोवचा आवाज आणि त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्या आवाजात हिंदी सिनेमातली गाणी लावलेली असायची. वरच्या मजल्यावर कुटुंबे रहायची. बाहेर त्यांचे कपडे वाळत घातलेले असायचे. बायका वरूनच त्यांच्या पोरांना आरोळ्या ठोकून बोलवायच्या. दोन घरांच्या मध्ये अगदी अरुंद बोळ असायचे. त्यातून माणसांची, वाहनांची गिचमिड गर्दी असायची. बहुतेक सगळ्या घरांना नावं दिलेली असायची. अमुक मंजिल, तमुक मंजिल वगैरे नावे लिहून त्याच्यावर झकपक लायटिंग लावलेले असायचे. मधेच कुठे तरी कोंबड्यांची खुराडी असायची. दारा समोर ४-२ बकऱ्या बांधलेल्या असायच्या.  त्या अगदी मरण येईपर्यंत काहीतरी चघळत बसलेल्या असायच्या. त्यांचे अखंड ब्या ब्या चालू असायचे. एखाद दुसरी भाग्याची लेकुरवाळी आपल्या पिल्लाला दुध पाजत उभी असायची. त्यांचा निसर्ग दारातच पडलेला असायचा. मधेच एखादे तांबटाचे घर असायचे. त्याच्या घरातून अखंड अव्याहतपणे तांब्याच्या, पितळेच्या नाहीतर स्टीलच्या भांड्यांवर ठोके पडल्याचा आवाज येत राहायचा. घरातली १०-१२ मंडळी त्याच धंद्यात असायची. त्यामुळं दिवसाच्या कुठल्याही वेळेला हे असे ४-५ ४-५ च्या गठ्ठ्याने ठोके ऐकू यायचे. त्या ठोक्यांचा एक अगदी विशिष्ट ताल असायचा. बाजूला एखादा हातमाग असायचा. त्याच्यावर दिवस रात्र अखंड धोटा फिरत असायचा. बाजूला एखादी प्रिंटींगची प्रेस असायची. त्याच्यावर अव्याहत कसली न कसली तरी छपाई चालू असायची. याच्या मध्ये तमाशाच्या बोर्डाच्या जाहिराती पासून ते गणॆशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकापर्यंत सगळे काही छापले जायचे. मधेच पिठाची गिरणी असायची. त्यात काम करणारा मिया तर अखंड पिठात न्हालेला असायचा. डोळ्याच्या पापण्या देखील पिठूळ झालेल्या असायच्या. त्याच्या गिरणीचा आवाज त्याच्यात सामील व्हायचा. मध्येच एखाद्या घरी बायका आणि पोरे 'युसुफ' नाहीतर 'इब्राहीम' कंपनीच्या विड्या वळत बसलेली असायची. गुरुवार पेठेत 'युसुफ' ला 'इसूब' आणि 'इब्राहीम' ला 'बाबा' म्हणायचे. कुठे एखादा बागवान चिंचेचा नाहीतर जांभळाचा ढीग लावत बसलेला असायचा. त्याच्या बाजूला स्कुटर दुरुस्तीचे दुकान असायचे. त्या दुकानात तर म्हणजे अगदी तिसरी चौथी मधली पोरे सुद्धा गाड्या दुरुस्त करत बसलेली असायची. दुरुस्त झालेल्या स्कुटर परत परत चालू करून बघितल्या जायच्या. त्याच्यातून भयंकर धूर यायचा आणि पेट्रोल च्या धुराचा खरपूस खमंग वासही!! एक पोर स्कुटरच्या किक वर उभे रहायचे आणि दुसरे त्या स्कूटरचा कान पिळायचे. एकदा का ती चालू झाली मग अगदी खुशाल मनाला येईल तितक्या वेळेला त्या स्कुटर चा कान पिळला जायचा. मग कधीतरी त्या दुकानाचा मालक तिथे येउन त्या पोरांना न भूतो न भविष्यती अशा शिव्या द्यायचा. त्याला बघून पोरं सैरावैरा ओरडत पळून जायची. एखादे पोर हातात सापडले तर मालक ते चांगले ठोकून काढायचा. तो एकदा गेला कि परत येरे माझ्या मागल्या चा खेळ सुरु!! शेजारी सिनेमाचे थेटर होते. त्याच्यात दुपारी १२ वाजता अचकट विचकट सिनेमे लागायचे. त्याच्या दारात सोडा वाटर च्या बाटल्या वाले बसलेले असत. रात्री ७ नंतर अगदी ठराविक अंतराने त्यांच्या बाटल्यांचा चित्कार चालू व्हायचा. तो थेट रात्री १-२ पर्यंत चालायचा. 

रस्त्याच्या थोड्या कडेला भरपूर सजवलेल्या रिक्षा मोठमोठ्याने गाणी लावून नुसत्याच विश्रांतीला उभ्या असायच्या. त्याच्या वर अगदी ठळक आणी भडक शब्दात चकचकीत रंगात कसली कसली नावे लिहिलेली असायची. कसल्या कसल्या नक्ष्या काढलेल्या असायच्या. रिक्षाच्या आत हिरवे, निळे, लाल वगैरे दिवे लावलेले असायचे. त्या रिक्षाला मोटारीसारखे दार असायचे. या रिक्षा फक्त उभे राहण्यासाठीच असायच्या.  
कुणी कुठे येतो का विचारल्यावर अगदी स्पष्ट शब्दात नकार दिला जायचा. 

पठाणी विजारी नाहीतर मोठ्या चौकड्याच्या लुंग्या लावलेले बहुतेक पुरुष मिशा कापून टाकून भली थोरली दाढी ठेवायचे. डोक्यावर भरगच्च केस अगदी खाली खांद्यापर्यंत लांब वाढलेले असायचे. दाढीला आणी केसाला मेंदी लावून ते गडद लाल केलेले असायचे. डोक्यावर जाळीची पांढरी गोल टोपी असायची. डोळ्याला चकचकीत गॉगल आणि गळ्याभोवती लाल नाहीतर पारव्या रंगाचे रुमाल असे बारीक घडी करून गुंडाळलेले असायचे. एकेका घराच्या बाजूला १०-१० २०-२० पोरांचा गिल्ला चालू असायचा. पोरं अगदी बिनधास्त घाणेरड्या घाणेरड्या शिव्या देत एकमेकांच्या आई-बापाचा अगदी मुक्तपणे उद्धार करत फिरत असायची. एखाद्या वेळी एखाद्याचा बाप चुकून त्या शिव्या ऐकायचा आणि त्या पोरांनी दिलेल्या शिव्या काहीच नाहीत अशा शिव्या देत त्या पोराना बुकलुन काढायचा. मग पुढच्या वेळी पोरं या नव्या शिव्यापण द्यायला घ्यायची. बायका काळे बुरखे घालून ३-३ ४-४ च्या घोळक्यात फिरायच्या. मधेच एकमेकिकडे पाहून मान हलवायच्या आणि हसायच्या. 

अत्तराच्या दुकानातून येणारा वास, भजीच्या नाहीतर शेवेच्या तळपाचा वास, शेळ्या, कोंबड्या यांचे निसर्ग, हातमागातून उडणारं गरम-गरम बारीक सूत, गिरणीतून उडणारी अनेक प्रकारची पिठं, विडयाची तंबाखू, उघड्या गटारी, त्या तुंबू नयेत म्हणून त्यातून बाहेर रस्त्यावरच काढून ठेवलेले केशरघन या सगळ्याचा मिळून एक अगदी सणसणीत उग्र दर्प सगळ्या मोहल्ल्यात भरून राहिलेला असायचा.

कुणी शांत बसून एखादे पुस्तक वाचतोय किंवा कुणी एखादे चित्र काढतोय किंवा कुणी छान गाणे गातोय वगैरे असला प्रकारच नाही. जो दिसतोय तो कसल्या तरी घाईत. भयंकर शक्ती लावून सगळ्या गोष्टी चाललेल्या असत.  प्रत्येक व्यक्तीला आणि त्याच्या प्रत्येक कृतीला स्वतःचा असा एक वैशिष्ठ्य पुर्ण असा आवाज होता!! 

गुरुवार पेठेचे विधिनिषेधच वेगळे होते. एकाच्या गोंगाटाशी दुसऱ्याला काहीही देणं घेणं नव्हतं. यातले कुणी फारसे संवादी नसले तर ते वादी हि नव्हते आणि प्रतीवादीही नव्हते. त्याला कसले एक सूत्र नव्हते इतकेच. जगण्याची रीतच वेगळी होती. 
              
या सगळ्या विसंवादी स्वरात एक स्वर्गीय स्वर मात्र त्याची ओळख जपून होता. तो स्वर होता सतारीचा. गुरुवार पेठेच्या अगदी टोकाला अगदी ब्राम्हणपुरीला लागून सतार मेकरची काही घरे होती. त्याला सतारमेकर गल्लीच म्हणायचे. हि घरे मात्र गुरुवार पेठेतल्या इतर घरांपेक्षा फार वेगळी होती. गुरुवार पेठेच्या कोपऱ्यावर ब्राम्हणपुरीला लागून अमदूभाईचं घर होतं. अमदूभाईचं खरं नाव अहमद नसीर मिरजकर. पण सुरांच्या संगतीत बापाच्या हाताखाली सतारीच्या तारा बांधताना कधीतरी त्याचा अमदु झाला आणि नंतर कधीतरी जशी केसाला मेंदी लागली तसा त्याचा अमदुभाई झाला. पांढरा नाहीतर मोतिया रंगाचा स्वच्छ कुर्ता, पांढरी आखूड विजार, धुळीच्या रापानी भरून गेलेली पायावरच्या भेगांची नक्षी, ओठावर अगदी बारीक मिशांची रेघ, गालावरून गोल कोरलेली मेंदीने रंगवलेली खुरटी दाढी, डोक्यावर वेल्वेटची काळी रामपुरी नवाबी टोपी आणि हातातल्या जवळ जवळ सगळ्या बोटात घातलेल्या सतारीच्या नख्या, तोंडात शिल्लक राहिलेले ४-२ दात आणि त्याच्या सोबतीला भिजत घातलेली सुपारीची ४-२ खांडके. एवढ्या भांडवलावरती हा माणुस बादशहा सारखा जगला. हि बादशाही सोन्या-चांदीची, हिऱ्याची-मोत्याची नव्हती. हि बादशाही होती मोठ्या मनाची. रागातल्या एकेका जागेची. भीमसेन जोशींच्या मालकंसाची. बडे गुलाम अली खान साहेबांच्या धृपद धमाराची. अमीर खान साहेबांच्या बडा खयाल ची. बाळकृष्णबुवा क्षीरसागरांच्या दरबारीची. हि बादशाही होती केसरबाई केरकारांच्या मुलतानीची. गंगुबाई हंगलाञ्च्या मल्हाराची. बादशाही कसली? खरे तर हि फकीरीच. पण फकीरीसुद्धा अब्दुल करीम खां साहेबाच्या समाधीची!! स्वर आणि ताल याला बांधून जन्माची नाव लहानपणीच सोडून दिली होती. हाताला काय लागले याचा कधी विचार केलाच नाही. कानात एकदा प्राण आणून ठेवले कि मग हातापायाला काही लागतही नाही. उभा जन्म सतारीच्या तारा लावण्यात आणि तरफा बांधण्यातच गेला. तारेच्या प्रत्येक झणत्कारात नाद ब्रम्हाचा आस्वाद घेताना तारा बांधताना फाटलेली, रक्ताळलेली बोटे कधी आठवलीच नाहीत. 

पंढरपूरच्या बाजूला कुठेतरी सतारीचे भोपळे मिळायचे. वर्षा-सहा महिन्यातून एकदा ते रिक्षातून भरून घेऊन यायचे. त्याला पुष्कळ दिवस लागायचे. तोपर्यंत तो भोपळा कसल्यातरी तेलात आणि सरसात भिजत घातलेला असायचा. त्या सरसाचा आणी तेलाचा गोड गुळमट वास घर भर पसरलेला असायचा. त्याचे २ तुकडे करून जो चांगला गोल असेल तो ठेवायचे आणी मग अर्धा कापलेला लाकडाचा लांब ओंडका त्याच्यावर ठेवून चांगला घट्ट बसेल असे करून ते एकमेकात अडकवून बांधून घालायचे. आतून बाहेरून छोट्या छोट्या पट्ट्या चिकटवून ते चांगले एक संध करून घेतले मी मग अमदु भाई त्याला साज चढवायला घ्यायचे. सुरुवातीच्या काळात बारीक हस्ती दंतांची जरी बुट्टी काढली जायची. हस्तिदंताचे मणी आणि बदके लावायचे. पण नंतर नंतर हस्ती दंतांची जागा पांढऱ्या प्लास्टिक ने घेतली. अमदुभाई ला काही ते फारसे आवडायचे नाही. कुणीतरी विचारायचे हस्ती दंत लावता का म्हणून. अमदु भाई मजेत म्हणायचे "उससे अच्छा मेराच दात लगाते है।". कुणी जुनी सतार देऊन नवीन सतार घ्यायला यायचा. त्याच्या सतारीवरचा हस्तीदंत पाहून अमदुभाई ना भरून यायचे. त्याला अगदी परोपरीने जुनी सतार विकू नको म्हणून सांगायचे. वास्तविक नवीन सतार विकली तर अमदु भाईला ४ पैसे जास्त मिळायचे. पण इथे पैशाचा सवालच नव्हता. निर्जीव भोपळ्यातून, लाकडाच्या ओंडक्यातून आणि रोज्लो च्या तारांमधून जेव्हा स्वर्गीय स्वर निघायचे तेव्हा अमदु  भाई जिंकायचा. इथे पैशाचा प्रश्न येतोच कुठे!! त्या गिऱ्हाईकाची जुनी सतार अमदु भाई ठेवून घ्यायचे. तिच्यावर एखाद्या पोटाच्या पोरासारखे उपाय चालू व्हायचे. सगळ्या तारा, तरफा बदलून बघायचे. सतारीच्या तारां वरची बदके आणि मणी बदलून बघायचे.  भोपळ्याला कुठे भोक आहे का नाहीतर भोपळ्याला जिथे सतारीची दांडी जोडलेली असते तिथे एखादा सांधा सुटलाय कि काय ते बघायचे. सतारीची घोडी बदलून पोलिश करून घ्यायचे. एखादी खुंटी निसटली आहे का ते बघायचे. जवारी काढायचे. एखादा तज्ञ सर्जन जितक्या तन्मयतेनं आपल्या पेशंट कडे बघत नसेल तितक्या तन्मयतेने हे काम दिवस रात्र चालू असायचे. तोंडाने एखाद्या रागातली बंदीश गुणगुणायचे. जेवण खाण कशाचीही शुद्ध नसे. त्या सतारीतून मनासारखा खर्ज आणि मनासारखी मिंड निघे पर्यंत हा योगी निश्चल आणि अटल योग करायचा.                   

घरची परिस्थिती गरीबच होती. इथे लक्ष्मीपेक्षा सरस्वतीला मान मोठा होता. कुणा गिर्हाइकाचा मुलगा नाहीतर मुलगी एखादे तंतू वाद्य शिकतो म्हणाला की अमदु भाई त्याला ते वाद्य अगदी फुकट आणुन द्यायचे. कधी मग ते त्याच्या कडेच तयार असायचे नाहीतर कधी आपल्याच भाऊबंदाच्या दुकानातून उधार आणून द्यायचे. याच्यात कधी सतार असायची. कधी एखादा सूर सोटा नाहीतर कछुवा असायचा. कधी वीणा असायची. कधी सूर बहार असायचा. कधी कधी तर अगदी वायोलिन सुद्धा आणून द्यायचे. पैसे किती द्यायचे विचारले तर म्हणायचे ' पहिले इसकू बजाने ते देओ। देखो कैसा जमता है।नाही जमा तो वापस देओ।'. अमदु भाई च्या मते वाद्याचं आणि वादकाचं नातं हे लग्नासारख. एकदा सुत जमलं कि झालं. जन्मासाठीच्या गाठी. तेव्हा ते जमतंय का हे बघायला ते कधी विसरायचे नाहीत. त्यांचा प्रश्न असायचा 'किसके पास जाते हो बेटा?' मग त्याच्या गुरूची, त्या गुरूच्या घराण्याची, गुरूच्या गुरूची सगळी बारीक सारीक माहिती सांगायचे. त्या गुरुकडून काय काय शिकता येईल ते पण सांगायचे. त्या घराण्याच्या काय लकबी आहेत ते सांगायचे. त्या घराण्याचे मोठे प्रसिद्ध गायक आणि वादक कोण ते सांगायचे. त्यांचे कुठले राग त्यांना आवडतात, कुठली एखादी विशिष्ठ बंदिश आवडत असेल तर ते सांगायचे. ते पोर म्हणजे अगदी भारावून जायचे. खरेतर त्याच्याहून जास्त अमदु भाई भारावून गेलेले असायचे. एक नवीन शागीर्द हिंदुस्तानी संगीत शिकायला घेतोय आणि ते पण तंतू वाद्याचे म्हटल्यावर अमदुभाई खुश!!हे सांगताना त्यांच्या डोळ्यात कसलीतरी विलक्षण चमक दिसायची. 

अमदुभाईच्या दुकानात अजून एक जण अधूनमधून यायचा. त्याचं नाव नईम. त्याचे पुर्ण नाव कुणालाच माहित नव्हते. नईम तबल्याची ऒढ काढायचा. अनाथच होता त्यात भर म्हणुन मुकाही होता. त्याला घर दार काहीच नव्हते. अशी हनुवटीच्या फक्त खाली दाढी यायची. डोळे खूप आत गेलेले असायचे. केस बरेच वाढलेले आणि विस्कटलेले असायचे. त्याचे कपडे देखील मळलेले आणि फाटलेले असायचे. त्यांच्यावर धुळीचा राप चढलेला असायचा. त्याचे दोन्ही पाय कमरे पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेला वळलेले होते. त्यामुळे त्याला ते नीट उचलता पण यायचे नाहीत. चालताना विलक्षण फेंगडी पावले जमिनीवरून खरडत ओढत तो चालायचा. खांद्याला परत एक आडवी झोळी लावून नईम लोकांच्या घरी खुरडत चालत जायचा. तबल्याची ऒढ मात्र उत्तम काढायचा. सांगली आणि मिरजेत त्याच्यासारखी ओढ काढणारा दुसरा कुणीही नव्हता. संगीतातल्या सगळ्या लोकांना नईम हमखास लागायचा. सांगलीला शिवाजी मंडईच्या जवळ एक तमाशाचे थेटर होते. त्या थेटर मध्ये नईम राहायचा. त्याबदल्यात तमाशातल्या ढोलक्यांची फुकट ओढ काढून द्यायचा. ओढ काढायचं काम फार कष्टाच होतं. बैलाच्या कातड्याची जाडी भरडी लांबच लांब वादी असायची. ती दुसऱ्या  एका तसल्याच पिळलेल्या वादीमधून ओवलेली असायची. तबला नाहीतर डग्गा असा पायात धरून ती वादी हातात धरून उर फुटेस्तोवर जोर लावून ओढावी लागायची. प्रत्येक हिसक्याला ती थोडीशी ओढली जायची. जोपर्यंत ती अजिबात ओढली जात नाही तोपर्यंत नईम ती ओढत बसलेला असायचा. घामेघूम झालेला असायचा. कधी कधी हातातून रक्त यायचं. नंतर मग त्या वाढलेल्या वादीची एक मोठी गाठ मारून, खुंट्या परत लावायचा. सगळ्या कामाचे खरेतर आधी १० रुपये ठरलेले असायचे. पण काम झाल्यावर कुणी ५ रुपयेच द्यायचे तर कुणी नुसतेच जेवून जा म्हणायचे. काय मिळेल ते घेऊन, वर एका हाताने नमस्कार करून, त्याची झोळी घेऊन नईम, खुरडत खुरडत पुढच्या घरी जायला निघायचा. तक्रार कसलीच नव्हती. अमदुभाईचा नईम वर जीव होता. एकतर मुका जीव. काय मिळवतो काय खातो कुठे झोपतो कुणास ठाऊक. अमदुभाईच्या मते नईमची संगीताची सेवा फार मोठी होती. कधी कुणी गिऱ्हाईक अमदुभाई कडे नईमची आणि त्याच्या दराची चौकशी करायचे. अमदुभाईचा जीव तिळ तिळ तुटायचा. असल्या फाटक्या तुटक्या नईम बरोबर सुद्धा दराची घासाघीस करणारी गिऱ्हाईके पाहून अमदुभाई खिन्न व्हायचे. 

अमदुभाईची पोरं पण घरीच सतारी बांधत बसायची. अमदुभाईच्या शब्दाच्या बाहेर कधी कोणी गेले नाही. शेवटचा शब्द अमदुभाईचा. अमदुभाई नी एकदा सांगितले कि षड्ज लागत नाही म्हणून की लगेच पोरे पुर्ण बांधलेली सतार उलगडायची. भोपळ्याच्या आत कुठे कुठे लाकडाच्या पट्ट्या लावायची. खुंट्या बदलायची. तारा बदलायची. आणि परत बांधून अमदुभाई ला दाखवायची. अमदुभाईच्या कानात षड्ज पक्का बसला होता. सतार जोपर्यंत तो षड्ज बोलत नाही तोपर्यंत हे अगणित वेळा चालायचे. एकेका सतारीला २-२ ३-३ आठवडे लागायचे. पण कुठेही तडजोड नसायची. अमदुभाईचा वकूब खूप मोठा होता. 

मीरासाहेबाच्या दर्ग्यात दर वर्षी उरूस भरायचा. दर्ग्याच्या आजूबाजूला खूप तंबूची दुकाने लागायची. खाऊ, रंगीबेरंगी फुगे, झोपाळे, उंचच्या उंच पाळणे, पिपाण्या, रंगीबेरंगी पिसांच्या टोप्या यांची अगदी रेलचेल असायची. रात्री दर्ग्यात शास्त्रीय संगीताच्या मैफिली असायच्या. रात्री १० पासून ते अगदी सकाळी ६ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालायचा. गायला आणी बजावायला देशातील अगदी नामवंत मंडळी आवर्जून हजर असायची. याच्यात भीमसेन जोशी येवून जायचे. विष्णू दिगंबर पलुस्कर यायचे. निवृत्तीबुवा सरनाईक यायचे. विलायतखान साहेब यायचे. आमिर खान साहेब यायचे. हरिप्रसाद चौरासिया यायचे. झाकीर हुसेन यायचे. निखिल ब्यानर्जी यायचे. रवि शंकर यायचे. गंगुबाई हनगल यायच्या. एकामागोमाग एक अशा मैफिली रंगत जायच्या. सकाळ कधी झाली ते कळायचे देखील नाही. या सगळ्या मंडळीना बोलवायचा जिम्मा असायचा अमदुभाई कडे. अमदुभाईच्या शब्दाला मान देत मंडळी लांब लांब हून यायची. स्वर्गीय स्वरांनी दर्गा आणि गुरुवार पेठ भरून जायची. येणाऱ्या कलाकारांची इतकी गर्दी असायची कि दर्ग्यात गायला मिळाले तरी नशीब अशी अवस्था असायची. छोटे छोटे कलाकार तर दोन मोठ्या कलाकारांच्या मधल्या ५-५ मिनिटात देखील त्यांची कला सादर करायचे. 'दर्ग्यात गायलो' किंवा 'दर्ग्यात वाजवून आलो' हे एक प्रशस्ती पत्रकच होते. हिंदू, मुस्लिम असला कसला हि भेदभाव नसायचा. मुसलमानांच्या दर्ग्यात एखादा हिंदू गायक अगदी बिनधास्त 'माता कालिका' सादर करायचा तर एखादा मुसलमान गायक 'आज राधा ब्रिज को चाले' सादर करायचा. आणि दर्ग्याच्या आत आणि बाहेर जमलेला हिंदू आणि मुस्लिम रसिक कानात प्राण आणुन ते ऐकायचा. टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. 'वाह वा' 'क्या बात है' 'बहोत खूब' असे आनंदाचे कारंजे उसळायचे. त्या आनंदाला ना कुठली जात होती ना कुठला धर्म!!
   
या सगळ्या मैफिलीचा पहिला सेवक होता अमदुभाई. कलाकाराला त्याची कला सादर केल्याचा जेवढा आनंद व्हायचा तेवढाच आनंद त्याला अमदुभाईला भेटून व्हायचा. सगळे कलाकार अमदु भाईची गळा भेट घ्यायचे. अमदुभाई त्यांना वाकून नमस्कार करायचे. उरुसाचा आशीर्वाद म्हणून एखादी शाल कलाकाराच्या खांद्यावर ठेवायचे. तेवढेही त्या कलाकारांना पुरायचे. कलाकारांच्या निष्ठा हि वेगळ्या होत्या आणि अमदुभाई चे प्रेमही अजब होते. पुढे वर्ष भर अमदुभाई काय काय नवीन वाद्ये तयार करून या कलाकारांच्या घरी जायचा. कुणी मुंबईला राहायचे. कुणी दिल्लीला तर कुणी कलकत्त्याला. अमदुभाई एखादी फर्मास सतार नाहीतर सूर बहार तयार करायचा आणि सरळ रेल्वेत बसून कलकत्त्याला हजर व्हायचा. त्या कलाकाराला ते वाद्य दाखवायचा आणि त्याच्या कडेच ठेवून परत यायचा. पैशाचा प्रश्नच नव्हता. 'उस्ताद आप बजाके तो देखो। अच्छी लगी तो रख लेना। नही तो मै ले के जाने को वापस आता है। ' एवढी एकच प्रेमाची बात असायची. अमदुभाईची बीबी या सगळ्या प्रकाराने फार परेशान असायची. तिला अमदुभाई चे एकच उत्तर असायचे 'देखो उस्ताद विलायत खान दिल्ली और कलकत्तेकि सितार छोड कर के  अपनी मिरज वाली सितार बजाता है। और क्या चाहिये तुझे?' ते प्रेमच वेगळे होते. एक जण निर्जीव लाकडातून जिवंत स्वर तयार करत होता आणि एक जण त्या स्वरातून भावनांचं विश्व उभं करत होता. एका फ़नकाराने तुझ्या फनकाराकडे काय मागावे!! दर्ग्यात गात गात एकेक कलाकार मोठा होत गेला. त्यांची प्रसिद्धी, पैसा, मान-पान सगळे वाढतच गेले. कुणाचा पद्मश्री झाला. कुणाचा पद्मविभूषण झाला. तर कुणाचा भारतरत्न झाला. अमदुभाईचा मात्र अमदुभाईच राहिला.     

त्या दिवशी धारवाडहून कुणीतरी बुवा गायला बसणार होते. हिंदुस्तानी आणि कर्नाटकी अशी जुगलबंदी होती. २-३ तबले आणि १ मृदुंग लागणार होता. कलाकार मंडळी एक दिवस आधीच मिरजेत पोचली. तालमीच्या वेळेला एक तबला चांगलाच उतरला होता. अमदुभाईला सांगावा गेला. अमदुभाईने नईमला सांगलीहून बोलावून घेतले. तो हि खुरडत खुरडत आला. बघता बघता त्याने सगळ्या तबल्याची, डग्ग्याची आणि मृदुन्गाचीही ओढ काढली. कलाकार मंडळी नव्या उत्साहाने तयारीला लागली. रात्री २ ला त्यांची गाण्याची वेळ होती. नईम दर्ग्याच्या बाहेर जाऊन बसला आणि अमदुभाई आत. अप्रतिम गाणे झाले. सगळ्या कष्टाचे चीज झाले. मंडळी दमली होती. गाणे झाल्यावर लगेचच्या गाडीने निघून सुद्धा गेली. नईमच्या पैशाची कुणाला आठवण देखील झाली नाही. अमदुभाईनी बाहेर येउन बघितले तर एका खांबाला टेकून नईम वाळुतच झोपला होता. अमदुभाईला काय झाले कुणास ठाऊक!! त्यांनी धावत जाउन नईमला उठवले आणि घट्ट मिठी मारली. म्हणाले 'नईम बेटा क्या तबला जमाया तूम!! वो बुवा तुम पे इतना खुश हुवा कि तेरे वास्ते मुझे सौ रूपे देके गया।' आणि अमदुभाई नईमच्या खांद्यावर हात टाकून चालू लागले.                                 

Sunday, August 24, 2014

गुंडू काका

मिरजेच्या संभा तालमी पाशी मोठा घोळका जमला होता. यात अगदी शेंबड्या पोरापासून ते थेट उभ्या उभ्या मान लकलक हलणारे म्हातारेही होते. तालीम अगदी घासून पुसून स्वच्छ केली होती. गेलेले बल्ब काढून नवे दुधी बल्ब लावले होते. आखाड्यातली तांबडी माती उकरून त्यात घागर भर ताक घालून चांगली मळून घुसळून घेतली होती. आखाड्याच्या बाजूनी निखळलेल्या शहाबादी फारश्या दुरुस्त करून घेतल्या होत्या. भिंतीचे पोपडे खरवडून काढून नवीन चुन्याचा हात दिला होता. कोपऱ्यात उत्तरेकडे तोंड करून एक दगडी मारुतीची मूर्ती ठेवलेली होती. तिला नवीन शेंदूर चढवला होता. जाळ्या-जळमटे काढून टाकली होती. छपराच्या तुळया देखील लखलखित केल्या होत्या. फुटलेली मंगलोरी कौले काढून तिथे नवीन काचे सारखी कौले बसवली होती. या कौलातून आत येणारा प्रकाश बघणाऱ्याचे डोळे दिपवून टाकत होता. तालमीत एक मोठे दगडी चाक होते. लाकडाच्या  २०-२५ गदा होत्या. शिवाय एका मोठ्या लाकडी ओंडक्याला एका बाजूला हात जाईल अशा खाचा करून घेतल्या होत्या. तो ओंडका इतका जड होता कि त्याच्या खाचेत हात घालून त्याला उचलायला म्हणजे प्रत्यक्ष मारूतीच लागायचा. आखाड्याच्या बाजूला एक छोटासा मल्लखांब होता. त्यालाही जवसाचे तेल लावून चांगला चकचकीत केला होता. तालीम अगदी लख्ख झाली होती. हि सगळी तयारी गुंडू काका साठी असायची. 

गुंडू काका कुठेतरी कोकणात राहायचा. दर वर्षी जोशांच्या घरी रहायला यायचा. जोशी काकांचा कुठूनतरी लांबचा नातेवाईक लागायचा म्हणे. पण त्याचे नेमके नाते काय होते कुणालाच ठाऊक नव्हते. दर वर्षी उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुट्टीत गुंडू काकाची स्वारी मिरजेत जोशी वाड्यात मुक्कामाला यायची. जोश्यांची सोवळी म्हातारी तर त्याला भोपळ्याचं फुल म्हणायची. त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची. त्यांला उनउन भाकऱ्या करून घालायची. रोज वाटीभर साईचं दही घालायची. वर दुपारी इवलं नाचणीचं अंबील करून ठेवायची. वाड्याच्या पडवीत एक वैरणीची जुनी खोली होती. तिथे गुंडू काकाचा मुक्काम असायचा. गुंडू काकाचे सामान म्हणजे सगळे मिळुन ४-२ कपडे . त्याच्यात २ अंगरखे, पायघोळ विजारी, एखादी पैलवानी लाल पिवळ्या फुलांची लुंगी, एखादा राजापुरी पंचा आणि ४-२ लंगोट! ते बोचके कोपऱ्यात ठेवून स्वारी दिवस भर कुठेना कुठे तरी भटकत असायची. अख्खे मिरज त्याच्या ओळखीचे. गुरुवार पेठेतल्या अमदु सतारमेकर पासून ते ब्राम्हणपुरीतल्या बेहेरे गुरुजी पर्यंत आणि दिंडीवेशेच्या महादू मालगावे पासून ते म्हैसाळवेशेच्या बसाप्पा लिन्ग्रस पर्यन्त सगळे याचे दोस्त! कुणाशी मधेच कानडीत बोलावे तर कुणाशी अस्सल गावरान मराठी मध्ये शिव्या द्याव्यात. कुणाशी अगदी पुणेरी मराठी मध्ये स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे नाहीतर कुणाशी उर्दू आणी हिंदीच्या छातीत सुरा खुपशीत निवांत चर्चा करावी. खाक्या पैलवानी!! गावातली सगळी मोठी माणसे तर त्याला पैलवान म्हणुनच बोलवायची. गुंडू काका म्हणजे साक्षात मारुतीच!! बलदंड शरीर. एकेक दंड म्हणजे असा शिसवी कांबी सारखा! पहाडी कप्प्यांची छाती, पाठीला अगदी चिकटलेले पोट, भरदार मांड्या आणि बेडकी सारख्या नाचणाऱ्या पिंडऱ्या. सगळेच ताशीव, घोटीव. मारूतीच तो! काखा फुगवून एखाद्या झोकदार तुरेवाल्या कोंबड्यासारखा चालायचा. 

गुंडू काका रोज सकाळी ४ वाजता उठायचा. लुंगी लावून केसरखान्याच्या विहिरीवर पोहायला जायचा. मोटेच्या काठावरून सरळ एखादा सूर नाहीतर गठ्ठा मारायचा. विहिरीतली पारवळे, कबुतरे घाबरून तिथल्या तिथेच फडफड करायची. विहिरीतून मोठा गिल्ला ऐकू यायचा. हिरव्या जाड पाण्यावर तास भर मनसोक्त हात मारून झाले कि विहिरीतच जोरजोरात मनाचे श्लोक म्हणायला घ्यायचा. त्यातल्या 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे' हा श्लोक म्हणताना त्याचा आवाज कमालीचा कातर व्हायचा आणि पुढच्याच ओळीला परत वर जायचा. या अशा समर्थांच्या समर्थ शिष्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे हि कोणी नव्हते. मग तिथून चालत, तोंडाने मनाचे श्लोक म्हणत तालमीकडे निघायचा. तालमीच्या एका बाजूला एक लाकडाची वखार होती. तालमीत यायला एक छोटा लाकडी दरवाजा होता. तालमीला  फक्त एक कडी लावलेली असायची. कडी काढून उंबऱ्याला वाकून नमस्कार करायचा. आणी मग आत जावून भल्या मोठ्या आवाजात भीमरूपी म्हणायचा. त्याच्या आवाजाने अख्खी गल्ली जागी व्हायची. तरणी पोरे पटापटा तालमीत जमा व्हायची. आणि मग सुरु व्हायची मारुतरायाची आरती! 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी,  करी डळमळ भूमंडळ शिंधूजळ गगनी'. मनसोक्त टाळ्या आणि झांजा वाजवत आरती व्हायची. मग नारळ फोडून त्याच्या खोबऱ्याचे तुकडे आणि सुंठ तालमीत फिरायची. मग सुरु व्हायची तालीम. गुंडू काका पारवळासारखे घुमत ५०० जोर आणि ५०० बैठका काढायचा. त्याच्या जोरात तर अशी नजाकत होती कि पोरे नुसती बघत रहायची. कधी दमलाय, कधी श्वास लागलाय असला प्रकारच नाही. एका तालात आणि एका दमात सगळा प्रकार चालायचा. घामेघूम व्हायचा आणि त्याच्याच घामात त्याचे बलिष्ठ स्नायू चमकून निघायचे. त्याची मोजायची पण एक विशिष्ठ पद्धत होती. एका कोनाड्यात गारीचे १२ खडे ठेवेलेले असायचे. ते १२ खडे तो असे काही विशिष्ठ पद्धतीने मोजायचा कि त्याचे २४, ३६ अशा सरीने १०८ कधी व्हायचे ते बघणाऱ्याला कळायचे देखील नाहीत. बैठकांचीही तीच तऱ्हा. मग तिथल्या गदा घेऊन फिरवायचा. लाकडाचा तो ओंडका तर फक्त गुंडू काकाच उचलू शकायचा. बाकीची पोरं नुसती बघायची. साक्षात मारुती जिवंत होऊन उभा राहायचा. मनसोक्त कसरत झाली कि मग गुंडू काका आखाड्यात उतरायचा आणि मग सुरु व्हायची समर्थ सेवा. 
                                          
इथे तालमीत येणारा प्रत्येक जण पैलवान! कुणी काडीचा तर कुणी दाढीचा. लहान लहान पोरं सुद्धा ओळीनं जोर काढायची. कुणी मग १० काढून ५० मोजायचा आणि मग बाकीची पोरं त्याला हसायची. एका बाजूला मोठी पोरं असायची. कुणी गदा फिरवायला घ्यायचा. कुणी बैठका काढायचा. कुणाच्यात कुस्त्या लागायच्या. आणि या सगळ्याच्या म्होरक्या असायचा गुंडू काका. एखाद्या पोराला लंगोट कशी लावायची इथे पासून ते एखाद्या कसलेल्या पैलवानाला पाट कसा काढायचा इथे पर्यंत सगळ्याचे शिक्षण अगदी मनापासून चालायचे. गुंडू काकाची दैवते २. एक मारुती आणि दुसरे समर्थ रामदास. दोघेही ब्रम्हचारी. गुंडू काकाने तालमीच्या भिंतीवर मनाचे श्लोक लिहून काढले होते. पांढऱ्या  भिंतीवर निळीने,  श्लोक आणि इतर अशीच वचने लिहून काढली होती. पण गुंडू काका रंगात आला कि म्हणायचा 'काढेङ्गा जोर तो बनिन्गा मोर'. ते पोर वर बघून हसायचं आणि गुंडू काका पाठीवर एक थाप द्यायचा. सगळा मजेचा मामला. गल्लीतली सगळी पोरं म्हणजे गुंडू काकाची मालमत्ताच झाली होती. लहान लहान पोरं तर त्याच्या हाताला लोम्बकळायची. उजव्या हाताला २ आणि डाव्या हाताला २ पोरं घेऊन गुंडू काका चालत जायचा. पोरं फार जीव टाकायची आणि गुंडू काका तर त्याची पोरं असल्यासारखा वागायचा. 

या गर्दीत तालमीत गल्लीतलं एकच पोर यायचं नाही. रंगा भटजींचा नातू सदाशिव. त्याला सगळी सदा म्हणायची. रंगा भटजी मिरजेत लोकांच्या घरी पूजा घालायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा सैन्यात होता. कुठेतरी सियाचीन का कुठेतरी गेला. सदा वर्षाचा असेल तेव्हा. गेला तो परत आलाच नाही. बरीच वर्षे वाट बघून शेवटी रंगा भटजींनी सुनेला सोवळी केली. आता घरात रंगा भटजी, सोवळी गोदा आणि मुका सदा एवढे तिघेच राहिले. घरात कुणी कुणाशी काही बोलायचंच नाही. सोवळी गोदी चुली जवळच बसून  असायची. तिथेच सदा खेळत पडलेला असायचा. रंगा भटजी कडे १८०० साला पासूनची जुनी पंचांगे होती. भटजी त्यातले कुठलेतरी पंचांग काढून मुलगा कुठे गेला याचा शोध घेत बसलेले असायचे. मधेच कुणीतरी लग्नासाठी पत्रिका जुळवायला घेऊन यायचे. रंगा भटजी अगदी मोजक्या शब्दात त्याचा फडशा करायचे आणि मग घर पुन्हा शांत होऊन पडायचे. कसला आवाज नव्हता. कसली जाग नव्हती. सकाळी भटजी लवकर उठून अंघोळ करून पवमान म्हणायचे तेवढीच काय ती जाग. नंतर दिवसभर सगळा घुसमटलेला श्वास शिल्लक राहायचा. महिन्यातून एकदा  बाळबा न्हावी गोदीच्या हजामतीला यायचा. शून्यात बसलेल्या गोदीची नजर हि मरून गेली होती आणि आडावरची तुळसही! पुढे सदा ५ वर्षाचा झाला तरी बोलेना. रंगा भटजींनी परत एकदा पंचांगे शोधायला सुरुवात केली. अशात एक दिवस गुंडू काकाला कुणीतरी सदा बद्दल सांगितले. गुंडू काकाला फार वाईट वाटले. तो तडक भटजींकडे गेला. सदा अंगणात खेळत होता. त्याच्या हालचाली विचित्र होत्या. त्याची नजर शून्यात होती. गुंडू काकाने त्याला जवळ घेतले तसे तो भोकाड पसरून रडायला लागला. गुरुजी घरात नव्हते. गोदीला बाहेर येत येईना. शेवटी गुंडू काका परत जायला निघणार इतक्यात गुरुजी घरी परत आले. गुंडू काकाला पाहून गुरुजी चकितच झाले. गुंडू काकाच्या कडेवर बसलेल्या सदा कडे पाहून गुरुजींचे डोळे भरून आले. आणि त्यांनी गुंडू काकाला बसवून घेऊन सदाची सगळी हकीकत सांगितली. कधीतरी ३-४ वर्षाचा असताना सदाला ताप आला होता. बघता बघता पार मेंदूत गेला. सदा कसा बसा वाचला. पण त्यानंतर त्याला काही कळायचेच बंद झाले. ऐकू येईना. बोलता येईना. गोदी आणि गुरुजी सोडले तर तो कुणाकडे जाईना. घरातली उरली सुरली जाग देखील संपून गेली. गुरुजी सांगत होते. गुंडू काका ऐकत होता. मधेच कधीतरी माज घरातून एक हुंदका ऐकू आला. पण नंतर लगेच जळत्या लाकडावर टाकलेल्या पाण्याच्या आवाजात तो हुंदका विरूनही गेला. कधी नव्हे ते गुंडू काकाचे डोळे ओले झाले आणि त्याने सदाला घट्ट मिठी मारली. सदाची जबाबदारी गुंडू काकाने घेतली.    

दुसऱ्याच दिवसापासून सदाला गुंडू काकाची तालीम चालू झाली. बाकीच्या पोरांची तालीम झाली कि तालमीतून कुणीतरी सदाला घेऊन यायचे आणी मग सदा आणि गुंडू काका यांची दुसरी तालीम सुरु व्हायची. गुंडू काका कसली कसली तरी चुर्ण, पाले, मुळ्या कुठून कुठून आणायचा आणि सदाला द्यायचा. सदाला काही आवडायची. काही आवडायची नाहीत. मग गुंडू काका त्याच्यात गुळ घालून नाहीतर गुलकंद घालून त्याला चाटवायचा. कसली कसली आसने शिकवायला लागला. एखादी कोंबडी धरावी तसा सदाला खाली डोके वर पाय करून धरून तासन तास भर उभा असायचा. सदाच्या डोळ्यात रक्त उतरायचे. डोकं आणि कान लाल बुंद व्हायचे. गुंडू काकाचे काही मुसलमान मित्र होते. त्यांच्या कडून कसला कसला धूप घेऊन यायचा आणि त्याची सदाला धुरी द्यायचा. हळु हळु सदा मध्ये फरक दिसायला लागला होता. तो आता माणसे ओळखायला लागला. ४-२ शब्द बोलायला लागला. सदाची प्रगती सांगायला कधी कधी गुंडू काका रंगा भटजींच्या घरी जायला लागला. भटजींना फार बरे वाटले. गोदीला उगाचच आडा जवळच्या वाळलेल्या तुळशीला पाणी घालावेसे वाटले. बाळबाची न्हाव्याची पिशवी यावेळी पहिल्यांदाच रिकामी परत गेली. 

गुंडू काका कोकणात परत गेला आणि वखार वाल्या मामूनी वखार कुठल्यातरी शेठाला विकायला काढली. शेठ येउन जागा बघून गेला. वखार आणि मुख्य रस्ता याच्या बरोबर मध्ये तालीम होती. शेठाने तालमीची चौकशी केली. कुठला तरी ट्रस्ट तालमीचा मालक होता. शेठाने सगळे ट्रस्टी शोधून काढले. अर्थात गुंडू काकासाठी सगळा व्यवहार अडून बसला. शेवटी दिवाळीच्या आधी आठ दिवस गुंडू काका परत आला. जोश्यांची सोवळी म्हातारी परत साईचे दही लावायला लागली. तालमीतल्या मारुतीला नवा शेंदूर लागला. 'सत्राणे उड्डाणे' ची आवर्तने चालू झाली. सदाची तालीम देखील परत चालू झाली. दिवाळीच्या बरोबर दोन दिवस आधी शेठ रंगा भटजीच्या घरी जावून आला आणि दुसऱ्या दिवशी गुंडू काकाचे बोचके जोश्यांच्या म्हातारीने रस्त्यावर आणून ठेवले. बोचके बघून गुंडू काकाने म्हातारीच्या खोलीची कडी वाजवून बघितली. आतून कसलाच आवाज आला नाही. खालच्या मानेने त्याने बोचके उचलले आणि तो चालू लागला. दिवाळीच्या आदल्या रात्री रंगा भटजीच्या आडात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. वाळलेली तुळस आडात पडली होती. इकडे तालमीची चौकट काढायला भाड्याची माणसे जमा झाली होती. 

Tuesday, June 3, 2014

ऋणानुबंध

खरे तर ती त्याच्या मित्राची आजी होती. मित्राच्या आईची आई. तिचे  त्याच्याशी नातं असं काहीच नव्हतं. सांगलीत गाव भागात एका जुन्या वाड्यात एक खोली भाड्याने घेऊन ती रहायची. आजोबाना जाऊन देखील खूप वर्षे झाली होती. त्यामुळे एका खोलीत तिचे अगदी छान भागत असावं. मारुती चौकात वेलणकरांचा जुना आयुर्वेदिक औषधांचा कारखाना होता. त्याच्या समोरच्या वाड्यात या आजीची खोली होती. मुख्य रस्त्यापासून बरीच आत. तिच्या खोलीत जायला एका छोट्याश्या बोळातून जावं लागायचं. बोळ कसला? छोटेखानी भुयारच होतं ते! सगळीकडे कुंद ओलं अंधारलेलं वातावरण. एका बाजूला सगळ्या बंद खोल्या. त्या खोल्यांवर गंजत चाललेली कड्या आणि कुलुपं. मोडकळीला आलेल्या, मधेच कुठे कापडात नारळ, लिंबू वगैरे बांधलेल्या तुळया, शिसवी लाकडाचे काळसर चौकोनी खांब, पोपडे धरलेल्या ओलेत्या मातीच्या भिंती. त्यातच कुठे कोनाडे नाहीतरी बंद लाकडी जिने. भिंतीला लावून एखादी गंजलेली सायकल ठेवलेली. त्या सायकलीवर देखील बोटभर धुळीचा थर बसलेला. थंड गार पडलेली शहाबादी फरशीची जमीन. सगळीकडं अनास्था आणि नैराश्य असं दबा धरून बसलेलं.

फार पूर्वी म्हणजे संस्थांनी काळात कुणी देशिंगकर म्हणून दिवाण होते पटवर्धन सरकारांचे. त्यांचा हा वाडा. कधी काळी सोन्या-नाण्यानं आणि मुला माणसांनी भरलेला. संस्थानं गेली. दिवाण गेले. आताशा नाही म्हणायला मुख्य लाकडी दरवाज्यावरची बारीक जरीबुट्टी, गेल्या श्रीमंतीची आठवण काढत उभी होती. त्यात आता विजेचे बारीक दुधी बल्ब लावले होते. जागोजागी उंबरे आणि उखडलेल्या फारश्या होत्या. अचानक एखाद दुसरी पायरी असायची. जमीनी लगत आडवे तिडवे वाहत गेले नगरपालिकेचे नळ होते. नवख्या माणसाला अगदी सहज ठेच लागायची. भिंतीला एका हाताने धरून धरून चालत आत आलं की भुयाराच्या शेवटी एक छोटी चौकोनी मोकळी जागा होती. त्यात पाय वगैरे धुवायला एक मोरी होती. त्यात एक रांजण असायचा. नंतर मग कुणा बिऱ्हाड करुनं सोयीसाठी अंघोळीचा एक दगड तिथं बसवला होता. या इथच उजव्या बाजूला आजीची खोली होती. आजीच्या खोलीत एक पलंग होता. एक रॉकेल वर चालणारा वातीचा स्टोव होता. ४-२ भांडी ठेवायला एक लाकडी पंपाळ होतं आणि कपडे ठेवायला एक मोठी पत्र्याची ट्रंक होती. भिंतीवर पांडुरंगाचा एक फोटो असायचा. आजी कधी त्याला हार घालायची तर कधी नुसतच एखादं फुल ठेवलेलं असायचं. त्याच्याच बाजूला आजोबांचा फोटो असायचा. त्याला गंध उगाळून लावलेलं असायचं. काळी गोल टोपी, तसल्याच रंगाचा काळा कोट, पांढरा सदरा आणि काळ्या जाड काड्यांचा चष्मा. आजीच्या मानाने आजोबा खूप शिकलेले, टापटीप असावेत.

त्याची शाळा गाव भागातच होती. तो आणि त्याचा मित्र न चुकता मधल्या सुट्टीत या आजी कड जायचे. तिला खूप आनंद व्हायचा. मुलं आली की त्याना पलंगावर बसवून, आजी स्टोव पेटवायला घ्यायची. मग कधी त्याच्यावर कांद्याचे पोहे, कधी उप्पीट तर कधी खरपूस भाजलेला रव्याचा शिरा व्हायचा. तो पहिल्यांदा गेलो तेव्हा आजीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. खरबरीत, भेगाळलेली बोटं चेहर्यावरून फिरवत तिच्या नातवाला म्हणाली 'कोण रे हा?'. मग त्यानं त्याची ओळख करून दिली. आजी म्हणाली 'छान. आता रोज येत जा. तू मला माझ्या नातवासारखाच!'  तो देखील हो म्हणाला. मग रोजचच येणं जाणं सुरु झालं. रोज हातात भरलेली ताटली ठेवून आजी प्रेमानं डोक्यावरून तिचा तोच खरबरीत, भेगाळलेला हात फिरवायची. आणि खाऊन संपेपर्यंत शेजारी उभी राहायची. खाऊन झाल्यावर कृष्णा माईचा प्रसाद म्हणून खोबऱ्याचा एक तुकडा आणि खडीसाखर हातावर ठेवायची. 
तिचा दिवस भल्या पहाटेच सुरु व्हायचा. शुचिर्भूत मनानं ती कृष्णा-माईच्या देवळात जायची. सकाळची काकड आरती झाली की प्रसन्न मनाने ४-२ भूपाळ्या नाहीतर हरिपाठ म्हणायची. त्यानंतर मग दुपारी ११-१२ वाजेपर्यंत फुलवाती वळत बसायची. फारशी कुणाशी बोलायची नाही. कुणी अगदीच ओळखीचं गाठ पडलं तर मात्र हसून चौकशी करायची. हातावर एखादा खडी साखरेचा खडा ठेवायची. तिच्याशी ही फारसं कुणी आपणहून बोलायला जायचं नाही. तिच्या बरोबर नेहमी एक पट्ट्यापट्ट्याची नायलॉनची पिशवी असायची. त्यात थोड़ी खड़ी साखर, सुंठ, एखादं हळकुंड, रक्तचन्दनाच्या खोडाची काळी बाहुली, बुक्का अशा गोष्टी असायच्या. केव्हा कुणाला काय लागेल काही सांगता यायचं नाही. कृष्णा-माईच्या देवळात खुप मुलं यायची. एखाद दुसरं मूल खेळताना पडायचं. खोक पडायची. रक्त यायचं. रक्त पाहिलं की आजी खुळ्या सारखी करायची. धावत जावून त्या मुलाला आधी रक्तचन्दन लावायची. थोड़ी सुंठ चाटवायची. आणि मग त्या मुलाची आई आली की तिला भरपूर रागो भरायची. ती आई आणि ते मूल निघून गेले तरी आजी नंतर बराच वेळ स्वतःशीच बोलत बसायची. तिला मुलं फार आवडायची. प्रत्येक मुलामधे तिला तिचा श्रीधर दिसायचा. असाच २-३ वर्षाचा असताना आजी-आजोबा, श्रीधर आणि श्रीधरची बहिण असे चौघे त्या देवळात आले होते. दिवाळी होती. नविन कपडे घालून श्रीधर इकडं  तिकडं धावत होता. आजी-आजोबा कृष्णा माईची ओटी भरत होते. आणि तेवढ्यात कुणीतरी धावत आले. आणि विचारले, "तो लहान मुलगा तुमचा आहे का?". आजी ला काही सुचेना. ओटीचे ताट तसेच ठेउन ती धावत सुटली. पाहतो तर श्रीधर अगदी खालच्या पायरीवर निपचित पडला होता. डोक्याला खोक पडली होती. पायरीवर बरच रक्त सांडलं होतं. आजोबानी नाडी पाहिली आणि डोक्यावरची टोपी काढून खिशात ठेवली. श्रीधर बोलत का नाही म्हणून तिनं आजोबाना खुप वेळा विचारलं. पण श्रीधर चे श्वास संपले होते आणि आजीच नशीब! चांगला चाललेला संसार रुसला. आजोबा सैर भैर झाले. कुणाशी बोलेनात. त्यात कुणीतरी बुवा त्याना सन्यास घ्यायचं बोलून गेला. आणि एक दिवस खरच आजोबा घरातून नाहीसे झाले. कुठे गेले कुणालाच माहित नाही. पोटाशी तान्ही लेक आणि फाटलेलं आकाश घेउन तिनं परत नवा अध्याय सुरु केला. जगी ज्यास कोणी नाही त्यास कधी कधी देव पण लाभत नाही. समाजाच्या नजरा, अठरा विश्वे दारिद्र्य, पोटाशी तान्ही पोर, श्रीधरची खोक आणि कृष्णामाईची न भरलेली ओटी इतकं शिल्लक राहिलं. रेशमासारखं तलम आयुष्य अचानक मांजरपाटा सारखं खरबरीत झालं. आजोबा निघून गेल्यावर गाठिला होतं त्यावर थोड़े दिवस गेले. मग मात्र तांदूळ अक्षतेलाही उरले नाहीत. नवऱ्याचं होतं नव्हतं ते नातलगानी काढून घेतलं. डोक्यावरचं छप्परही गेलं. आणि मग ती पुरतीच बोडकी झाली. शिक्षण नाही. अनुभव नाही. अर्थात अशी वेळ येइल याचा कधी विचार सुद्धा केलेला नव्हता. सुखवस्तू घरात देताना तिच्या वडीलाना जग जिंकल्या सारखं झालं होतं. मिळवता नवरा, घर, शेती, भावंडं सगळं पाहून त्याना अगदी भरून पावलं होतं.
आल्या वेळेला तोंड देण्या शिवाय गत्यंतर नव्हतं. तिनं चार घरी धुणी-भांडी करायला सुरुवात केली. लेकीला पोटाशी घेउन अनवाणी पावलानी दारोदार हिंडू लागली. टीचभर पोटासाठी आणि २ वाट्या दुधासाठी पायाला भेगा पडू लागल्या. हजार जिभानी नशीब काळजाला घरं करू लागलं. अब्रू झाकायची की भूक असा प्रश्न रोज पडायला लागला. काही दिवसानी तिला एका कार्यालयात काम मिळाले. २ वेळच्या खाण्याचा प्रश्न सुटला. राहायला एक खोली मिळाली. दोन वेळच्या अन्नाला किती लागतं? कधी कधी अगदी सहज मिळतं. पण कधी कधी अगदी पायाचे शीता इतके तुकडे व्हावे लागतात. गहिवर, भावना, आठवणी साऱ्याचा विसर पडावा लागतो. अंत:करणातले सगळे अश्रू वाहून गेले की मग कधीतरी हा वैश्वानर शांत होतो. जगताना तक्रारी करून चालत नाही. पैशाला पैशा जोडत तिनं पोर मोठी केली आणि पहिल्याच मुहूर्ताला उजवून टाकली. खांद्यांवरचा एक भार हलका झाला. म्हातारीला आभाळ थोडं झालं होतं. सगळ्या गाव भर सांगून आली. मोठ्या जिकिरिनं गाडा इथवर आणला होता. पण दुर्दैव पाठ सोडेना. पहिल्याच खेपेला काहीतरी झालं आणि तिची लेक तिला सोडून निघून गेली. जाताना एक श्रीधर सारखाच नातू सोडुन गेली. त्या पोराकडं पाहून आजीचा जीव तिळतिळ तुटायचा. आता परत नव्यानं सुरुवात करायची तिची हिम्मत नव्हती. हात-पाय थकले होते. डोळे पलीकडच्या तीराला लागले होते. पण पोर म्हटलं कि जीव कासावीस व्हायचा तिचा. त्यात आई विना वाढणारं ते पोर पाहून तर तिचा घास घशाखाली उतरायचा नाही. गेल्या लेकीच्या नवऱ्यानं दुसरं लग्न करून त्याचा पुरुषार्थ दाखविला आणि पोर अगदीच निराधार झालं. परत नव्या जोमानं आजी उठली. तिला जमेल तेवढ तिनं केलं. पण त्याचं त्याला काही फारसं सोयरसुतक नव्हतं. आजी छापखान्यातून जुने तपकिरी कागद आणायची. ते दुमडून, मध्ये शिवून  त्याच्या वह्या त्याला करून द्यायची. लोकांना त्यांच्या मुलांची जुनी पुस्तकं बाजूला ठेवायला सांगायची. त्याच्यावर त्याचं शिक्षण झालं. पण तो त्याच्याच नशिबावर रुसलेला असायचा. शाळेत गेल्यावर रॉकेलचा वास येतो म्हणून पोरं त्याला चिडवायची. त्याच्या मित्रांच्या मोठ्या मोठ्या पांढऱ्या शुभ्र वह्या, नवीन कोरी वासाची पुस्तकं, अभ्यासाच्या खोल्या, खुर्च्या हे सगळं त्याला हवं होतं. होता होईल तो घरातून बाहेर राहायला लागला. नगर वाचनालयात अभ्यासाला जायचा. आजीला न सांगता बाहेर कुठे तरी काम करायला लागला. त्यातल्या पैशातून फी, पुस्तके, वह्या घेता कधी-मधी एखादी विडी ओढायला लागला. चंद्र वेगळा होत गेला आणि आजी परत एकटी होत गेली. त्याचा तो मित्र कधी मधी घरी यायचा. आजी जवळ बसायचा. तिला काहीतरी आणून द्यायचा. कधी एखादी भाजीची पेंडी नाहीतर कधी एखादी सोलापुरी चादर घेऊन यायचा. आजीला तेवढच भरून यायचं.  

आयुष्य म्हणजे सुताच्या रिळासारखं संपत गेलं. काय जोडलं, कुठं टाके घातले कधी कळलच नाही. कुठले टिकले, कुठले तुटले ते देखील तिला कधी दिसले नाहीत. आयुष्याची ऋणच इतकी जबरदस्त होती कि तिला बिचारीला बंध मोजायला सवडच झाली नाही.    

त्या दिवशी वाड्या बाहेर बरीच गर्दी जमली होती. आजी सोलापुरी चादरीत शांत झोपली होती. एका हातात तिनं चादर घट्ट धरून ठेवली होती. कृष्णामाईच्या प्रसादाला मुंग्या लागल्या होत्या. 

Wednesday, January 8, 2014

सचिन निवृत्त होतोय...

सचिन निवृत्त होतोय. घरातल्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी जसे वाटते तसे वाटते आहे. 
  
वास्तविक मी स्वतः कधी फार क्रिकेट खेळलो नाही पण पाहिले मात्र भरपूर!! अगदी उद्या वार्षिक परीक्षा असताना देखील आज पूर्ण दिवस क्रिकेट पाहिले. त्यातून मग व्हायचा तो परिणाम वेळोवेळी झालेला आहे. पण त्याची फारशी खंत वाटत नाही. उलट त्यातलेच काही काही सामने तर अगदी आजही पूर्णपणे आठवतात. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा असाच एक सामना. दुसर्या दिवशी MQC चा पेपर. तरी गल्लीतल्या वासू काकाने बोलावले सामना बघायला. वासू काका म्हणजे मुलखाचा मऊ माणूस!! म्हणाला "अरे शेंगदाणे आणि गुळ पण आणुन ठेवला आहे." त्याचा आग्रह मोडणे ब्रह्मदेवालाही जमायचे नाही. म्हटले जाऊ १ तास!! जाउन पाहतो तर तिथे अख्खी गल्ली जमली होती. धनु दादा, राणा दादा, प्रताप फाटक, नाना, नंदू आणी शेखर कोडोलीकर, मंदार महाजन, कलंदर आणि गोट्या आगलावे, शेखर काका, त्याची मुले, सुनील आणि तान्या कागवाडे, अमित आणि अवधूत बोडस अशी सगळी मंडळी जमली होती. वास्तविक या सर्व लोकांच्या घरी TV  होता. पण महत्वाचा सामना असला कि सगळी गल्ली वासू काका कडे जमायची. मग एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या निघायच्या. सामना कोण जिंकणार याच्या पैजा लागायच्या. तेंडल्या किती मारणार याच्यावर पैजा लागायच्या. द्रविड खूप हळू रन काढतो. त्याला काढून टाका. अझरूद्दीन ची फिल्डिंग एकदम भारी. वगैरे अनेक मत-मतांतरे प्रकट व्हायची. प्रत्येकाला मत मांडायचा पुर्ण अधिकार होता. एकेक जण मग अगदी तल्लीन होऊन त्याचे त्याचे आख्यान लावायचा. इतकच काय तर तेंडूलकर चे काय चुकते आणि त्याने काय करायला हवे याच्यावरही एखादे बौद्धिक व्हायचे. जावेद मियांदाद ने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या सिक्सर चे स्मरण व्हायचे. लगेच कुणीतरी चेतन शर्माची बाजू घेऊन त्याच्या वर्ल्ड कप मधल्या hat-trick ची आठवण काढायचे. मग कपिल देव चे स्मरण ठरलेले. मग ८३ चा वर्ल्ड कप. विवियन रिचर्डस. मोहिंदर अमरनाथ. श्रीकांत, गावस्कर हे सगळे ओळीने चर्चेला यायचे. त्या प्रत्येकाचे कौतुक हि व्हायचे आणि त्यांच्या चुकाही शोधल्या जायच्या. एखाद्या वेळी करायला काही हरकत नाही. पण प्रत्येक सामन्यात हे सारे आलटून पालटून व्हायचे. पहिल्या १०-१२ ओवर हा सगळा किल्ला चालत असे. मग आपली ब्याटिङ्ग असली आणि १-२ जण लवकर घरी गेले कि मग वातावरण तणावपूर्ण व्हायचे. मग थोडा वेळ मंडळी शेंगा खाण्यात गुंग असल्या सारखी दाखवायची. या शांततेत जो कोणी पहिला बोलेल त्याची काही खैर नसायची. "बोलू नको रे बाबा!! आउट बिऊट व्हायचा तो!!" असली वाक्ये सर्रास यायची. यालाच बहुधा समाधी म्हणत असावेत. 
मग एक २-४ खणखणीत चौके नाहीतर छक्के बसले कि मग मंडळी पुन्हा जमिनीवर यायची. त्या बॉलरचा उद्धार व्हायचा. थोड्या जास्त विकेट गेल्या असतील तर त्याचे आई-वडील देखील निघायचे. आणि ते झाले कि आता त्याचे काय चुकले याची चर्चा सुरु!! आता तो पुढच्या वेळे पासून घरी जाणार काय? याच्यावर एक छोटेखानी परिसंवाद व्हायचा. मग हळुच कुणीतरी वासू काकाच्या बायकोला चहाची ऑर्डर द्यायचा. वासू काका कोकणस्थ आणि काकू देशस्थ!! आणि याचा सगळा फायदा तिथे जमलेली लबाड मंडळी लगोलग करून घ्यायची. "वहिनी करा तुम्ही चहा. दाखवून द्या देशस्थ कसे असतात ते." असा कुणीतरी देशस्थ आक्रोश करायचा. वाहिनी चहा घेऊन यायची. आणि मग एखादा कोकणस्थ शहाजोग पणे म्हणायचा "अरे वासू बिस्किटे आण. दाखवून दे कोकणस्थ काय चीज असते ते." यथास्थित चहा आणि मारी बिस्किटे खाउन पुन्हा चर्चा सुरु. देशस्थ श्रेष्ठ कि कोकणस्थ? मग सावरकर कोकणस्थ होते. बर मग रामदास देशस्थ होते. बर मग टिळक कोकणस्थ होते. बर मग ज्ञानेश्वर देशस्थ होते. मग सेनापती बापट, सी डी  देशमुख, धनंजयराव गाडगीळ, बाजीराव पेशवे, पंत प्रतिनिधी अशा सर्व थोर विभूतींचे स्मरण व्हायचे. आणि हे सगळे चालू असताना अचानक कुणीतरी आउट व्ह्यायचा आणि मग परत एकदा सगळे शांत! "च्याइला तरी तुम्हाला सांगत होतो जरा गप्प बसा म्हणून!! पण ऐकतील तर शप्पथ!! आता आउट झाला न द्रविड. बसा आता बोम्बलत त्याच्या नावाने." असा कुणीतरी सणसणीत बार काढायचा. परत कुणीतरी फुसकुली सोडायचा "ए द्रविड देशस्थ का कोकणस्थ रे?" त्याच्यावर दुसरा कुणीतरी वार करायचा "मुसल्मान. तुला काय करायची रे द्रविड ची जात?" मग अजून कुणीतरी म्हणायचे "द्रविड आणि मुसलमान? छे शक्यच नाही. अरे द्रविड म्हणजे आर्य आणि द्रविड मधला द्रविड!!" मग थोडा वेळ आर्य आणि द्रविड याच्यावर चर्चा व्हायची. मग मराठी म्हणजे आर्य का द्रविड याच्यावर चर्चा व्हायची. एकुण रोजच्या जगण्यातल्या चिंतांना इथे वाव नसे. हि एक धर्म सभाच म्हणायची. धर्म फक्त क्रिकेट आणि त्याचा महादेव म्हणजे सचिन!! आणि जेव्हा हा महादेव ब्टिङ्ग करायला यायचा तेव्हा हीच खिल्ल्या उडवणारी मंडळी अगदी चिडीचूप असायची. सचिन ला टाकलेला प्रत्येक चेंडू हा साक्षात ईश्वरी संकेत असल्यासारखी मंडळी झपाटून बघायची. आणि त्याचा प्रत्येक फटका हा ईश्वरी प्रसाद असल्यासारखा स्विकारायची. ज्या मंडळीना पूर्ण दिवस मैफिलीला यायला जमायचे नाही ते सुद्धा सचिन खेळायला आला कि हटकून हजार व्हायचे. पण मग दाराची बेल वाजली तरी उघडायला कुणीही उठायचे नाही. सगळा समाधीचाच भाग होता. सचिन चा प्रत्येक फटका म्हणजे एखादे शिल्प असायचे आणि ते पाहताना हि तमाम जनता मुग्ध होऊन जायची. प्रत्येक चेंडूला मनात धास्ती असायची. अपेक्षा एकाच "आउट नको होऊ बाबा आता या बॉलवर!!"… सचिन ने खेळत राहिले पाहिजे. भले मग त्याने फटकेबाजी केली नाही तरी चालेल. पण त्याने तिथे क्रिझ वरती असले पाहिजे. असा साधा विचार माझ्या मनात असायचा. देवाबद्दल देखील आपल्याला असेच काहीतरी वाटते नाही का? अर्थात काही लोक जसे देवाला चार आणे टाकून लाटरीचे लाखाचे तिकीट लागावे म्हणून प्रार्थना करतात तसे वासू काकाच्या घरी देखील "आम्ही गप्प बसतो. पण तू खेळ आणि चांगल्या १०० रन तरी काढच. " अशी प्रार्थना करणारे हि होते. सचिन वर सगळ्यांचा हक्क होता. सचिन म्हणजे सगळ्यांची स्वप्नांची खाण होती. सचिन म्हणजे धावांचे यंत्र होते. सचिन म्हणजे क्रिकेटच सर्व श्रेष्ठ तंत्र होते. सचिन म्हणजे विजयाचे मंत्र होते. देव, देऊळ, पुजारी, मंत्र, प्रार्थना आणि प्रसाद सगळे सगळे सचिन तर होता !!! त्यावर ह्या भाबड्या लोकांनी जिवापाड प्रेम केले. यांचा सगळा जोश सचिन असे पर्यंत च असायचा. एकदा सचिन गेला कि मग हळु हळू एकेक देशस्थ कि कोकणस्थ काहीतरी कारणे सांगून काढता पाय घेत. अर्ध्या तासात वासू काकाचे घर रिकामे व्हायचे. मग घर खायला उठते असे वाटुन काका गल्लीच्या चौकात येउन उभा राहायचा. 
आज सचिन चा शेवटचा सामना!! आता मी काही मिरजेत नाही. त्यामुळे वासू काकाच्या घरी किती गर्दी जमली आहे ते मला ठाऊक नाही. पण आता पुढच्या सामान्यांना वासू काकाचे घर असेच भरेल याची मात्र मला खात्री नाही. 

अतिशय उत्साहाने आपण मखर तयार करतो. त्यात गणपतीची प्रेमळ मूर्ती बसवतो. पूजा-अर्चा सारे मनातले जे काही पवित्र म्हणुन असते ते सगळे त्या गणपतीला वाहतो. त्याच्या बहिणीला बोलवतो. मोदकाचा नैवेद्य दाखवतो. आणि एक दिवशी आरती म्हणून त्याचे विसर्जन करतो. नदी पर्यंत जाई तोवर मारे मोठ मोठ्याने म्हणत जातो "१ २ ३ ४, गणपतीचा जय जय कार".  घरी येताना पाय दिशा हरवून बसतात. आवाज फुटतच नाही. रिकाम्या माखाराकडे पाहून आतल्या आत जीव घुसमटत राहतो "गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला". 

आणि मग भाबडी समजूत काढत म्हणतो 
"गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या" 

एका वर्षाची गोष्ट

नवीन वर्ष चालू झाले. वर्ष २०१४. गंमत म्हणून २०१३ कडे वळून पहिले तर पोटात गोळा आला. एक अविस्मरणीय वर्ष!! असंख्य अनुभवांनी खचाखच भरलेले वर्ष!! आम्हा सर्वाना अनेक वर्षांनी मोठे आणि अनेक वर्षांनी तरुण करून गेलेले वर्ष!!! त्याची हि गोष्ट!!  

६ जानेवारी २०१३ ला मी San Jose विमानतळावरून पिओरिआला निघालो. सकाळी ५ वाजता अस्मिता, अर्चिस आणि रेनिसा ला घेऊन सोडायला आली होती. खूप वाईट वाटत होते. दोघी गाडीत झोपल्या होत्या. कसाबसा तिथून निघालो. दुपारी डल्लास ला पोचलो. आणि रात्री उशिरा पिओरिआला पोचलो. सगळे घर आवरायचे होते. सगळ्या सामानाची विल्हेवाट लावायची होती. उरले-सुरले भावनिक बंध तोडून सगळे सोडून निघायचे होते. १५ जानेवारीला ह्यूस्टन मधला प्रोजेक्ट सुरु व्हायचा होता. त्याच्या आत होता होईल तितके आवरायचे होते. असंख्य गोष्टी मना विरुद्ध जाऊ शकणार होत्या. गेल्या-गेल्या पेंटर ला बोलावून घेतले. जमेल तितके सगळे सामान खालच्या मजल्यावर आणून ठेवले. वरचा मजला जवळ जवळ रिकामा केला. भाडेकरू मुले रहात होती त्यांना जागा सोडायला सांगितली. जमतील तितके माझे कपडे ब्यागेत भरले. क्लोसेट मधले सामान ग्यारेज मध्ये ठेवायला घेतले. वाल्मार्ट मधून रिकामी खोकी आणली. त्यात बरेचसे सामान भरले आणि टेप लावून बंद केले. जवळ जवळ अर्धे ग्यारेज भरेल इतके सामान झाले होते. मग किचन मधले सामान भरले. प्रत्येक गोष्टीवर अर्चिस, रेनिसा नाहीतर अस्मिताची काही न काही आठवण होती. एखादा प्लास्टिक चा डबा टाकून द्यायचे ठरवले तर लगेच त्या डब्यात भडंग खाणारी नाहीतर तो डबा घेऊन शाळेला निघालेली अर्चिस दिसायची. कि लगेच डबा टाकून द्यायचा विचार रद्द !! इतकेच काय पण अर्चिस ची उंची मोजायला अस्मिताने एक कागद आमच्या मास्टर बेड मध्ये भिंतीला लावून ठेवला होता. तो काढताना तर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले. अडीच फुटापासून ते थेट चार फुटापर्यंतच्या खुणा त्याच्यावर होत्या. नंतर काही सुचेना. मग गाडी घेऊन घरातली सगळी साठलेली चिल्लर घेऊन वाल्मार्ट मध्ये गेलो. Coinstar च्या मशीन मध्ये ती सगळी चिल्लर टाकली. सगळे मिळून १४८ डॉलर झाले. मशीन ने विचारले कि नोटा हव्यात, गिफ्ट कार्ड हवे का डोनेट करायचे म्हणून!!आधीच हळवा झालो होतो त्यात unicef चे चित्र पाहून अजून भावूक झालो. रस्त्यावर उपाशी झोपणारी उघडी-नागडी पोरं दिसायला लागली. पावाच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या झिंज्या धरून अंगभर ओरबाडणारी त्यांची मातकट बोटे दिसायला लागली. आणि क्षणात सगळे पैसे unicef ला डोनेट करून टाकले. खूप मोकळे वाटायला लागले. बरेच काही गेले होते अजून थोडे आपण हून दिल्यावर मात्र खूप मोकळं वाटलं. ढीगभर चिल्लर देऊन चिमुट्भर आनंद घेऊन घरी परत आलो. असं म्हणतात कि मन आपल्या शरीरात राहते. या गोष्टीनंतर मात्र मला असं वाटायला लागलं कि मन सगळ्या विश्वाला व्यापून राहते. आपण मात्र आपल्याला हवे तेव्हा, हवे तितके ते आपल्यात साठवून ठेवतो. 

७ वर्षे उभा केलेला चिमणीचा संसार मोडायला आणि गुंडाळून न्यायला ७ दिवस मिळाले होते. अर्चिस ला काय ठेवायचे आहे? अस्मिता ला काय ठेवायचे आहे ? रेनिसा ला काय ठेवायचे आहे? याचा कसलाही निर्णय मला घेता येईना. याच्यात मग तुटलेली खोडरबरे होती. अर्ध्या शिसपेन्सिली होत्या. वाळलेली स्केच पेन होती. बाहुल्या होत्या. निळ्या-तांबड्या बांगड्या होत्या. चित्रं होती. अर्चिस ने आई-बाबांना आपल्या हातानी करून दिलेली ग्रीटिंग कार्ड होती. त्याच्यावर लिहिलेली आणि काळजात खोलवर कोरलेली वाक्यं होती "I love you Daddy!!" "I love you Mommy!!" आणि त्याच्या शेजारी आई बाबांची काढलेली चित्रे देखील होती. मुलं जवळ असती तर कदाचित हे सगळे कचरा म्हणुन फेकता आलेही असते. पण ती जवळ नसताना ह्या कागदांची अगदी सोनपाने झाली. सगळेच ठेवले शेवटी!!

पेंटर बरोबर जावून नवीन पेंट घेऊन आलो. घर रंगवायला सुरुवात झाली. आम्ही घर घेतले तेव्हा मोठ्या हौसेने light banana रंग दिला होता. तो थोडासा bright होता. कदाचित आमच्या भावी भाडेकरूला तो आवडणार नाही म्हणून मग आता winter wheat द्यायला घेतला. एकदम neutral color. एकेक भिंत जशी रंगून होत होती तसे माझेच घर मला वेगळे वाटायला लागले. घराला लागलेला आमचा रंग संपत चालला होता. घर हळुहळु परकं होत चाललं होतं. 

बरेचसे फर्निचर अस्मिता तिच्या बरोबर घेऊन गेली होती. जे राहिले त्यातली ट्रेडमिल विकली गेली पण अजून त्याने नेली नव्हती. सोफा विकला गेला. माझी मोटारसायकल विकली गेली. आता राहिली होती एक गादी, २ खुर्च्या, जुना TV, व्यायामाचा बेंच आणि रिक्लायनर! ब्याग भरून मी ठरल्याप्रमाणे १५ तारखेला ह्युस्टन ला जॉईन झालो. एक आठवडा ह्युस्टन मध्ये राहून परत पिओरिआ ला जायचे होते. काही कामे बाकी होती.  Caterpillar मध्ये कामाचा handover द्यायचा होता. हि मात्र घरी राहण्याची शेवटची संधी असणार होती. २३ तारखेला ह्युस्टन airport वरून strategy class ची assignment submit केली आणि कसा बसा धावत पळत विमानात पोचलो. पिओरिआ मध्ये पोचेपर्यंत अर्धी रात्र संपली होती. घरी जावून बघतो तर घराला कुलूप. पेंटर जिथे किल्ली ठेवतो म्हणाला होता तिथे किल्ली नव्हती. घरात दिवे चालू होते. तडक रात्री १ वाजता पेंटर च्या घरी गेलो. बघतो तर त्याला फ्लू झालेला. त्याच्या कडून किल्ली घेतली. घरी जाउन बघतो तर पेंटिंग चे काम अर्धवट झाले होते. कागद, वस्तू, रंगाचे डबे इतस्ततः पडले होते. घर भर रंगाचा वास पसरला होता. या सगळ्याचा विचार करता करता कधी तरी झोप लागली. सकाळी उठून बघितले तर अंगात उठायचे त्राण शिल्लक नव्हते. अशक्य खोकला येत होता. काही खावेसे वाटत नव्हते. तसाच उठून डॉक्टर कडे गेलो. २ तास वाट बघितल्यावर माझा नंबर आला. blessing in disguise म्हणजे डॉक्टरनी strep throat म्हणून सांगितले. म्हणजे फ्लू नव्हता. मग २४ आणि २५ घरीच पडुन राहिलो. २६ ला परत एकदा सुरुवात केली. आता ग्यारेज मधले सामान गाडीत भरायला घेतले. BMMPeoria चे सगळे सामान, कागद, फ़ाइल वगैरे सगळे भोसले काकांना देऊन आलो. त्या दोघांना भेटलो. बराच वेळ बोललो. आशीर्वाद घेऊन निघालो. ट्रेडमिल वाला ट्रेडमिल घ्यायला आला. अद्वैत जोशी ला बरोबर घेऊन ते धूड बेसमेंट मधून कसेबसे बाहेर काढले. महेंद्र आणि दिपेश ला घेऊन व्यायामाचा सेट पण बाहेर काढला आणि महेंद्र च्या घरी नेउन ठेवला. ग्यारेज मधले बरेचसे सामान पण महेंद्र च्या घरी नेउन ठेवले. आता जरा थोडी जागा झाली. मग बॉक्सेस गाडीत भरायला घेतले. दिपेश ने फार मदत केली. जुना TV साफ-सफाई करणार्या बाईना देऊन टाकला. त्यांना अगदी आभाळ गवसल्याचा आनंद झाला.          
सगळं घर vaccum करून घेतले. बेस्मेंट क्लीन केले. आणि बसेल तसे, किंवा घुसेल तसे सामान गाडीत भरत राहिलो. शेवटी गाडी इतकी भरली कि गाडीत ड्रायवर ला सुद्धा जायला जागा शिल्लक नव्हती!!! माझीया मना जरा थांबना, तुझे चालणे अन मला वेदना असा काहीसा प्रकार झाला होता. 

आता अगदी शेवटचा दिवस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ ची flight होती. म्हणजे ५ वाजता airport वर जायचे होते. त्याच्या आधी गाडी महेंद्रच्या घरी सोडायची होती. मग विचार केला कि गाडी रात्रीच महेंद्र कडे सोडू आणि रात्रीच दिपेश कडे झोपायला जाऊ. पण घर काही मला सोडायला तयार नव्हते. united मधून fone आला. धुक्यामुळे flight cancel झाली आणि त्यांनी मला ८ च्या flight चे तिकिट दिले. मग ते निमित्त करून मी अजून एक रात्र घरीच झोपलो. दिपेश थोडा नाराज झाला. पण मला त्याची पर्वा नव्हती. प्रेम आंधळे असते ते असे. या रात्री मात्र घर अगदी स्वच्छ झाले होते आणि माझे मन सुद्धा!!!

सकाळी अगदी लवकर उठून गाडी महेंद्र कडे सोडली. महेंद्र ने मला परत घरी आणून सोडले. कॅब दारात थांबलीच होती. घराला कुलूप लावले आणि कुठून कुणास ठाऊक ते 'साधी माणसं' सिनेमातलं गाणं आठवलं 

'अखेरचा हा तुला दंडवत, सोडुन जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देउळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले हसले, कडीकपारी अमृत प्याले 
आता हे परी सारे उरले, उरलं मागं नाव 

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता 
कुणी न उरला वाली आता, धरती दे ग ठाव'

शब्दनशब्द खरा वाटत होता. मराठी माणुस त्रिखंडात गेला तरी त्याचं मन मावळ्याचं आणि ते राहतही मावळातच!! त्या मातीची गाणी खूप खोल गेलेली असतात आणि मग अशा कातर वेळी तीच गाणी आठवत राहतात. कधी हसवतात. कधी रडवतात. 

धुक्यात लपलेली पिओरिआ मग मला फारशी दिसली नाही. आधी शिकागो ला आणि नंतर ह्युस्टन ला कधी पोचलो ते देखील कळले नाही. जाता जाता पिओरिआ airport वर १० मिनिटे वाजवलेली बासरी मात्र आठवते. आणि त्या बदल्यात  just as a token of appreciation म्हणून एयरलाइन च्या स्टाफ ने दिलेले फर्स्ट क्लासचे अपग्रेड आठवते. 

आम्ही पिओरिआ वर खूप प्रेम केलं आणि अगदी आम्ही जाईस्तोवर पिओरिआने देखील आमच्यावर तेवढंच प्रेम केलं. पुलंच्या 'रावसाहेब' मध्ये 'कशाला आला होता रे बेळगावात!!' हे ऐकल्यावर जसे वाटते तसेच काहीसे वाटत राहिले. आम्ही भाग्यवान खरेच!!

मग ह्युस्टन मधल्या कामाने वेग घेतला. बरीच मोठी जबाबदारी होती. MBA अजून चालूच होते. त्याचे वाचन, भारतातली टिम, अमेरिकेतली टिम यातून मग विचार करायला सवड नव्हती. मग दर २ आठवड्यांनी San Francisco च्या फेऱ्या सुरु झाल्या. पोरं परत भेटायला लागली. परत एकदा गाडीनं वेग घेतला. साधारण एप्रिल मध्ये नव्या नोकरीचा शोध सुरु केला. आता MBA संपले होते. नव्या आत्मविश्वासाने पाऊले पडायला लागली.  Amazon, Ernst & Young, Google, Apple, Deloitte, PwC, IBM मध्ये प्रयत्न चालू केले. पण माझी अगदी मनापासून पहिली पसंती Ernst & Young ला होती. एक तर It is one of BIG 4 consulting in the world plus its very well known for its corporate culture. या वर्षी जगातल्या सर्वोत्कृष्ट employers मध्ये Ernst & Young चा जगात दुसरा क्रमांक वगैरे आलेला होता. आणि कॉलेज मध्ये असल्या पासून मला असे वाटायचे कि  Ernst & Young मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट लोक काम करतात. माझ्या बऱ्याच सिनियर मित्रांनी पण सांगितले होते कि 'working at Ernst & Young is a qualification in it self'. शिवाय 'Management Consulting' चे खूळ डोक्यात होते. तेव्हा माझा विचार अगदी पक्का होता. Infact त्याच्यासाठीच तर MBA चा घाट घातला होता. 'याची साठी केला अट्टाहास, शेवटचा दिन गोड व्हावा'!!

एप्रिल मध्ये त्यांचे २ interview मिळाले. दोन्ही चांगले झाले आणि मग त्यांनी शिकागो ला in person interview ला बोलावले. मी अगदी तिकिट सुद्द्धा काढले आणि अचानक त्यांचा फोन आला कि काही कारणाने interview पुढे ढकलावा लागला. बराच हिरमोड झाला. गाव अगदी जवळ आलं असं वाटत असताना अचानक मध्ये एखादा डोंगर यावा किंवा ते ठिकाण दूर निघून जावे तसे झाले. पण मग माझीच समजूत काढली कि त्यांनी नाही म्हणून तर सांगितले नाही न!! आगे बढो!! जीना इसीका नाम है वगैरे!! शेवटी ३ आठवड्यांनी त्यांनी परत बोलावले आणि मी धन्य झालो. 

गुरुवार ९ मे २०१३.  मी बुधवारी रात्रीच ह्युस्टन हून शिकागो ला पोचलो होतो. रात्री शिकागो downtown मध्ये जाऊन नविन बूट घालून interview ची जागा प्रत्यक्ष पाहून आलो. बरीच वर्षे जवळ बाळगलेले स्वप्न होते ते!! 155 N Wacker Dr, Chicago. २४ व्या मजल्यावर interview होता. E&Y चे ४ पार्टनर (इथे पार्टनर म्हणजे सर्वेसर्वा) एकामागोमाग एक असे भेटणार होते. प्रत्येकाबरोबर ३०-४० मिनिटे धरली तरी साधारण अंदाजे ४ तासांचा कार्यक्रम ठरला होता. सकाळी उठलो आणि साधारण १० वाजता बाहेर पडलो. डोळ्यासमोर येत होता शनिवारवाड्या समोरचा बाजीरावांचा पुतळा! हातातल्या भाल्याच्या जोरावर अगदी अनभिज्ञ अशा मुलुखात बेडर पणे भगवा नाचवणारा सच्चा मराठा!! बादशाहीची पिसे काढून अटकेपार अगदी पेशावरा पर्यंत भीमथडी तट्टे झोकात फिरवून आणणारा माझ्या मुलुखाचा राजा!! त्यांच्या महत्वाकांक्षेला तर तोडच नव्हती पण इतरही घेण्यासारखे खूप काही होतं. मला माझ्या इंजिनियरिंग कॉलेज चे दिवस आठवले. तेव्हा मी पुण्यात राहायचो. प्रत्येक पेपर च्या आदल्या दिवशी, सगळा अभ्यास झाला कि मी आणि आशिष वाटवे रात्री शनिवारवाड्या वर जायचो. दिल्ली दरवाज्याच्या पायरीवर बसून सगळा विषय पूर्ण revise करायचो. सगळे Formula, सगळी Derivations, सगळ्या concepts एकमेकांना सांगायचो. आणि मराठ्यांच्या त्या राजधानीतून रग्गड आत्मविश्वास घेऊन रात्री १२-१ ला घरी जायचो. पेपर चांगले गेले. चांगल्या मार्कांनी पास झालो. नोकऱ्या मिळाल्या. पण आज E&Y च्या interview ला जाताना मात्र आपलं मर्म कशात आहे, आपली प्रेरणा कुठून येते, आपल्याला आत्मविश्वास कुठून मिळतो याची जाणीव पहिल्यांदाच होत होती. त्याच विचारात 155 N Wacker Dr च्या दारात पोचलो. 

आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस!! सगळ्यात मोठा interview!! अर्थात सगळे चारही interview अगदी यथासांग पार पडले. अगदी मनासारखे!! आपल्या मनाइतका दुसरा प्रामाणिक आरसा सापडायचा नाही. मला अगदी खात्री वाटत होती. चारही पार्टनर खुश होते. कुठे काही चुकले, काही कमी पडले, काही बोलायचे राहिले, काही बोलायची गरज नव्हती असे काहीच वाटत नव्हते. त्यामुळे मी सुद्धा खुश होतो. लगेच ओहेर एयरपोर्ट ला गेलो. जेवलो आणि ह्युस्टन च्या flight मध्ये बसलो. मस्त ४ तासांची flight  होती. बाण सुटला होता आता चिंता कसली !! अगदी बिनघोर स्वस्थ चित्ताने झोपलो. संध्याकाळी ८ वाजता ह्युस्टन मध्ये पोचल्यावर फोन चालू केला. त्यावर E&Y च्या HR मधून फोन येउन गेलेला दिसला. अतिशय अधीर होऊन मेसेज ऐकला. 

"Hello Nik This is Whitney from Ernst and Young. Congratulations!! I got the feedback on your interview and all the 4 partners are very impressed with you. You will receive formal offer early next week. I just thought to give you good news before the week end. Once again Congratulations!"    

माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता. मी तो मेसेज ३, ४, ५ आता मला आठवत नाही मी किती वेळा ऐकला ते. शेवटी अस्मिता ला फोन केला. तिला मेसेज forward केला आणि तिला पण ऐकायला सांगितले. काय सांगा तिला काही वेगळे ऐकायला यायचे. पण तिने पण confirm केला. मग मात्र माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. आज पर्यंत इतका आनंद कशानेच झाल्याचे मला तरी आठवत नाही. अस्मिता ला फोन केल्यावर मी फोन वर इतक्या जोरात बोलत आणि हसत होतो कि कॅब चा ड्रायवर घाबरला. त्याने २-३ वेळ आरशात पाहिले. माझ्या handsfree मुळे त्याला सेल फोन कानाला लावलेला दिसला नाही. मग तो अजूनच घाबरला. त्याला वाटले मी एकटाच बोलतो आहे!! त्याने आतले दिवे लावले आणि गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. शेवटी त्याला मी फोन वर बोलतोय हे सांगितले आणि मग गाडी पुढे निघाली. 

अजून २ दिवसांनी UIUC मध्ये MBA चे convocation होते. त्यामुळे परत ह्युस्टन हून शिकागो ला गेलो. अस्मिता, अर्चिस आणि रेनिसा San Jose हून शिकागो ला आले. मग त्या रात्री शिकागो मध्ये राहून दुसऱ्या दिवशी Champaign ला गेलो. एखादे स्वप्न जगत आहोत असे वाटत होते. E&Y ची ऑफर काल मिळाली होती आणि MBA ची degree आज मिळणार होती. गेली २-३ वर्षे जी अव्याहत धावाधाव झाली त्याचे काहीच वाटेनासे झाले. उलट प्रत्येकाचे कौतुक वाटायला लागले. त्या रात्री आम्ही सगळे अगदी अचानक पिओरिआ ला गेलो. अचानक महेंद्रच्या घरी जाऊन छापा घातला. तिथे अपेक्षेप्रमाणे दिपेश आणि गिरीश पण भेटले. जुन्या गप्पा निघाल्या. सकाळी लवकर गाडीत बसून आमच्या घराच्या बाजूनेही एक चक्कर मारली. आपलंच घर परक्यासारखं बाहेरून पाहण्याचा अनुभव देखील नवीनच  होता. खूप नितळ आणि मोकळं वाटत होतं. नुकताच पाउस पडून गेलेल्या आकाशासारखं!!!     

१० जुन ला मी Ernst and Young मधे जॉईन झालो. 303 Almaden Blvd, San Jose वर गाडी पार्क करताना खूप छान वाटले. Ernst and Young च्या reception मध्ये डिजिटल स्क्रीन वर 'Welcome Nik Kulkarni' वाचून तर अभिमान वाटला. आणि मग सुरु झाला घराचा शोध. कॅलिफोर्निया मधे घर म्हणजे वेगळेच प्रकरण आहे. तेव्हा म्हटले ६-७ महिने तरी सहज लागतील घर मिळायला. पण ग्रेस परत एकदा जिंकले. ग्रेस म्हणायचे कि 'योग तेजस्वी असतात. त्यांचे तेज तेच असते ताऱ्या सारखे!!' घराचा योग लगेच जुळून आला. San Jose मधेच एक सुंदर Single Family होम मिळाले. अगदी पहिल्या भेटीत प्रेमात पडावे असे. छोटेसे, टुमदार घर. घराच्या दारात झाडांची गर्द सावली, मागच्या बाजूला निळ्या स्वच्छ पाण्याचा स्विमिंग पूल, त्याच्या मागे घराची भिंत आणि भिंती पलीकडे मस्त टेकडी!! अगदी private!!
 
स्विमिंग पूल पाहून अर्चिस आणि रेनिसा खूप खुश झाल्या. त्यांनी केलेल्या त्यागाची कल्पना असण्याचं त्यांचं वय नाही पण त्यांच्या डोळ्यातून भरून वाहणारा आनंद पाहून मला हलकं वाटत होतं.     

सार्त्र नावाचा एक फ्रेंच तत्वज्ञ होऊन गेला. त्याचे एक प्रसिद्ध वाक्य आहे 'People are condemned to be free.' म्हणजे माणसाला मुक्त राहण्याचा नैसर्गिक वर (किंवा शाप) प्राप्त झालेला आहे. याच्याही पुढे जाउन तो म्हणतो कि 'जगात येउन जगण्याचा अनुभव हा इतर कुठल्याही ऐकीव किंवा सांगीव ज्ञानापेक्षा मोठा आहे. अधिक उत्कट आहे.' सार्त्राचा निरीश्वर वाद जरी बाजूला ठेवला तर मला त्याचे 'अनुभव हा सर्वात श्रेष्ठ आहे' हे मत अगदी अनुभवाने पटले आहे.

दोन मुलांना घेऊन अस्मिताने एकटीने लढलेला किल्ला, तिला मुलांनी दिलेली साथ, अस्मिता आधी कॅलिफोर्नियात गेल्यावर अर्चिस आणि रेनिसा ने माझ्या बरोबर पिओरिआ मधे काढलेला एक महिना, हे सगळेच  खूप मोठे अनुभव आहेत आणि मला असे वाटते कि ते इतर कुठल्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा निर्विवाद श्रेष्ठ आहेत. 

एखादी गोष्ट लक्षात ठेवणे आणि ती गोष्ट समजणे याच्या मध्ये बराच फरक आहे. एखाद्या वेळेस प्रयत्न करून सगळी भगवदगीता पाठ करता येईल. पण ती पाठ झाली, लक्षात राहिली याचा अर्थ ती समजली असा होत नाही.नेमका तोच फरक अनुभवाचे पुस्तक वाचण्यात आणि तो अनुभव प्रत्यक्ष जगण्यात आहे याची मला खात्री पटली आहे. या गेल्या वर्षातल्या अनुभवाने माझ्या मुली माझ्या साठी खूप मोठ्या झाल्या आहेत. त्यांची समज तर वाढलीच आहे पण त्यांच्या बद्दलची माझी समज जास्त वाढली आहे. जी अस्मिता पिओरिआ मध्ये असताना माझ्या शिवाय कधीही कुठेही गेली नाही, तिने या वर्षी एकटीच्या जीवावर कॅलिफोर्निया सारख्या ठिकाणी सारे जमवून आणले. घर शोधण्यापासून, ते मुलींच्या शाळा आणि डे केअर पर्यंत सारे तिने केले. हा अनुभव खूप मोठा आहे.

अर्चिस, रेनिसा, अस्मिता या सर्वानीच अपरंपार समजूत दाखवली आहे. देव व्हायला काय लागते ते मला ठाऊक नाही पण माणूस होणे हे फार अवघड असते याची मला खात्री आहे. आणि हि तीन माणसे माझी आहेत म्हणून मी खूप भाग्यवान आहे. कदाचित यालाच साफल्य म्हणत असावेत. २०१३ ने आम्हा सर्वांना जगण्याचा एक यथार्थ अनुभव दिला आहे. बोथट झालेल्या जाणीवा परत एकदा जाग्या करून दिल्या. मनावर बसलेली नेणीवांची पुटं पुसून टाकली आणि आयुष्याचा अर्थ नव्याने उलगडून दाखवला आहे. 

Thank you 2013!! We will miss you!! We will cherish you!!