Tuesday, April 9, 2019

शाहीर

शाहीर
~निखिल कुलकर्णी
त्या दिवशी सकाळीच कोडोलीकर गल्लीच्या रस्त्यावर दुतर्फा गर्दी जमा व्हायला लागली होती. गल्लीचे रस्ते झाडून घेतले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूना पाणी शिंपडून घेतले होते. गल्लीतली तरुण पोरे दादासाहेब कोडोलीकरांच्या देखरेखीखाली एकेक काम निमूटपणे करत होती. इतकी गर्दी असून देखील कसलाही आवाज, गोंगाट नव्हता. मुक्याने तिरडीच्या काठ्या बांधायचे काम चालू होते. मधेच एखाद्याला हुंदका अनावर व्हायचा तेवढाच काय तो आवाज. हार, फुले, पांढरी कापडे, डोंबलाचे मडके एका बाजूला आणून ठेवले होते. गल्लीतली मोठी मोठी माणसं सुद्धा रस्त्याच्या कडेला घोणेत मुंडी घालून मिशन हॉस्पिटलच्या दिशेकडे डोळे लावून शाहिरांची वाट बघत बसली होती. शाहीर वामनराव आज सकाळी देवाघरी गेले. "धन्य तो धन्य शिवाजी झाला" म्हणत डफावर मारलेली मर्द मावळ्याची थाप आज कायमची शांत झाली होती. महाराणा प्रतापाचा, अफझलखान वधाचा, राणी चेन्नम्माचा, वीर सावरकराचा आणि हुतात्मा भगतसिंगाचा पोवाडा कायमचा थांबला होता. मिरज नगरपालिकेची गाडी वामनरावांना घेऊन आली. तिचं मागच्या बाजूचं दार उघडलं तसं गर्दीचा लोंढा खिन्न मनाने एक एक करत आत शिरू लागला. कित्येक म्हातारे तर गाडीची पायरी सुटून धडपडले देखील. पण आपले शांत झोपलेले शाहीर पाहून त्या गर्दीला कशाचंही भान राहिलं नव्हतं. वामनरावांचा तो पिवळाफटक चेहरा पाहून तर बायका पुरुष धाय मोकलून रडू लागली. कुणाचंच चित्त थाऱ्यावर नव्हतं. गर्दी इतकी झाली कि वामनरावांची पत्नी, जिला सगळी "जीजी" म्हणायची, तिला देखील आत जाता येईना. शेवटी तिनं दारातूनच शाहिरांना पाहिलं.. त्यांच्या पावलांवर हात ठेवून काहीही न बोलता तशीच बसून राहिली शून्यात पाहात कितीतरी वेळ..
वास्तविक वामनराव मुळचे, कोल्हापूर जवळ हेर्ले म्हणून गाव आहे तिथले कुलकर्णी. तिथं थोडी जमीन होती. शेतात एक विहीर होती. एक दोन खणाचं दोन खापी घर होतं. खायला, प्यायला आणि पांघरायला काही कमी नव्हतं. सख्खे, सावत्र, चुलत, दत्तक, पै, पाव्हणा म्हणत शंभर एक डोकी एका छताखाली नांदत होती.

पण पुढं काय झालं कुणास ठाऊक पण नंतर कधीतरी शेतात मोकाट गुरं घुसली आणि घरात भाऊबंदकी. शेवटी गावातल्या दंडेलीला आणि हडेलहप्पीला शरण जाऊन वामनरावांच्या तीर्थरुपांनी हेर्ले कायमचेच सोडले आणि मग वामनराव आणि त्यांची ५ भावंडे सगळी मिरजेला येऊन राहिली. जमीनदारांचे दारोदार झाल्यावर जे भोगवटे मिळायचे ते एकास दहा होऊन मिळत गेले. वामनरावांचे आजोळ मिरजे जवळच्या ढवळीला होते. पोरं वेळ मिळाला कि ढवळीला चालत नाहीतर बैलगाडीनं जात. निवांत कृष्णेच्या शांत खोल डोहात उड्या मारत. मामाची गुरं माळावर आणि टेकाडावर वळायला नेत. करमणुकीचे आणि शिक्षणाचे बहुतेक सगळे अविष्कार निळ्या आकाशाच्या खाली मोकळ्या बेभान वाऱ्याच्या साथीत मिळत गेले.

कधी एखाद्या वेळेला रंगात आला कि मामा त्याच्या या देशोधडीला लागलेल्या भाचरांना, वगाला नाहीतर तमाशाला घेऊन जात असे. तिथल्या ढोलकीच्या चाटीशी, डफाच्या थापेशी आणि तुणतुण्याच्या तारांशी जी सलगी जमली, ती कायमचीच. सरस्वतीची हि सोंगं एकदा काढली कि एकतर पुढे जन्मभर पाठ सोडतही नाहीत आणि लक्ष्मीला तर सोप्यातून पुढं माजघरात देखील येऊ देत नाहीत.

पुढे मग दिनकर, वसंत, निळकंठ हि भावंडं जशी कर्ती झाली तशी एकेक आपल्या मार्गानं निघून गेली.
कुणाचा देवी डॉक्टर झाला. कुणाचा पोस्टमन झाला. कुणी पांडबाच्या भट्टीत गडी म्हणून कामाला लागला.
वामनरावांच्या डोक्यात मात्र वेगळंच वारं शिरलं होतं. नोकरी, पैसा, कुटुंब यांच्यात रमणारं ते खोडच नव्हतं.
साताप्पा, सगनभाऊ, अमर शेख, होनाजी बाळा, राम जोशी, पट्ठे बापूराव हि दैवतं झालेलीच होती. त्यांनी आता दिवसा आणि रात्री सुद्धा डोळ्यापुढं फेर धरला होता. उत्तम हस्ताक्षर, मोडी लिपीवर प्रभुत्व आणि कवनाची जाण या भांडवलावर गुरूचा शोध सुरु झाला. आणि तो लवकरच संपलाही. पलूसच्या शाहीर दीक्षितानी गंडा बांधला.
मिरजेचा मुक्काम पलूसला हलवला. घरून विरोध व्हायचं कारणच नव्हतं.

पलूस म्हणजे किर्लोस्कर वाडीच्या अगदी जवळ कृष्णेच्या काठापासून थोडंसं बाजूला वसलेलं जेमतेम २०० घरांचं एक गाव. निस्तब्ध आणि निशंक. कसली गडबड नाही. धावपळ नाही. गोंगाट नाही. कैकदा तर दुपारच्या वेळेला पिंपळाच्या सळसळीशिवाय दुसरा आवाज देखिल यायचा नाही. खाली पळसाच्या तलावात पाखरे पाण्यात चोच मारून मासे पकडत त्याचाही आवाज अगदी वर पर्यंत ऐकू येत असे.

पलूस, आमणापूर, औदुंबर, भुवनेश्वरवाडी, भिलवडी या गावांना जोडणारा रस्ता म्हणजे तर पाचूचा हारच शोभावा. दोन्ही बाजूनी हिरवी गार शेते आणि त्याच्या बाजूने उंच दांडगी अवाढव्य वाढलेली चिंचेची झाडे. त्याच्या एका बाजूने शेतांच्या पलीकडे खाली खोल, लफ्फेदार वळणे घेत हळू हळू वाहत जाणारी कृष्णामाई तर अगदी तृप्त होऊन निवांतपणाने माहेरपणाला येवून दुपारच्या वेळेला डोळा लागलेली लेकुरवाळीच वाटायची. भुवनेश्वर वाडीच्या आणि नदी पलीकडच्या औदुंबराच्या देवळातल्या घंटांचे नाद तिची झोपमोड होणार नाही अशा सावधपणाने हळुवार समाधीचे संगीत वाजवत राहत. आसमंतात एक असीम अशी तृप्तता होती. एकसलग अशी संगती होती.

अभ्यासाला सुरवात झाली. परब्रम्ह, नादब्रम्ह, विश्व, निर्मिती, संगीत, इतिहास, काव्य, रचना, प्रार्थना, पाठांतर, कथासूत्र, मांडणी असा सर्वव्यापी अभ्यास सुरु झाला. जुन्या ऐतिहासिक ग्रंथांचे वाचन, बखरी, जुनी मोडीतली पत्रे, शिलालेख यांची छाननी चालू झाली. वग, गवळण, तुर्रे वाले, कलगी वाले, नागेश बाळी, ज्ञान बाळी, नाथ संप्रदायाची कवने यांचा अभ्यास चालू झाला. आवाजाच्या तयारी साठी, ओंकाराची साधना चालू झाली. आणि एक दिवशी कृष्णेच्या काठावर वामनरावांच्या मुखातून नमनाची पहिली प्रार्थना उमटली,

ओम नमो शारदापते, नमो गणपते, पार्वतीपुत्रा पार्वतीपुत्रा ।
वंदुनी चरण, आधी तुझे । धरितो कथासूत्रा । जी जी जी ।।

खणखणीत, गगनभेदी आवाज, तितकाच रुबाबदार चेहरा, सरळसोट लांब धारधार नाक, भेदक, करारी नजर, पाय जमिनीत पुढे मागे असे घट्ट रोवून उभे राहण्याचा मराठमोळा बाज, हातातला डफ, कमरेचा शेला, हातातली सलकडी आणि डोक्यावरचा फेटा.. शिवबाचा सवंगडीच जणू. त्याच्या तोंडून "करू वंदन शिवाच्या नंदना' असं नमन ऐकताना दीक्षित गुरुजींना शाहिरी परंपरेला कोहिनुर मिळाल्याचा भास झाला. आणि त्याच आनंदात त्यांनी वामनरावांना कडकडून मिठी मारली. माजघरातून दीक्षित गुरुजींची एकुलती एक कन्या, मालती, डोळे भरून हा प्रसंग पाहत होती. भरल्या डोळ्यात साठवत होती. मनातल्या मनात काहीतरी ठरवत होती.

आता वामनराव शाहीर दीक्षितांच्या फडातून तुणतुणे धरून उभे राहू लागले. अधून मधून एखाद दुसरी चाल घ्यायला मिळू लागली. एखादा प्रसंग सांगायला मिळू लागला. उभ्या रंगात आलेल्या फडात अचानक, "सुभेदार तान्हाजी गडावर चढून आलेला आहे” असं खणखणीत वाक्य दांडपट्ट्या सारखं फेकू लागले. आणि लोकांच्या डोळ्या समोर तो अंधारातला कोंढाणा, त्याची घोरपड आणि पाठीला तलवार बांधलेला, फेंदारलेल्या मिशांचा मर्द तानाजी उभा राहू लागला. त्याच्या हातातली तलवार अंधारात चमकू लागली आणि कधी एकदा त्या उदेभानाला जीवे मारतो याची उत्कंठा शिगेला पोचून मायबाप प्रेक्षक बसल्या जागी खिळून राहायला लागलं. उदेभानाची खांडोळी उडताच टोप्या, पटके हवेत फेकले जाऊ लागले. बेभान होऊन शिट्ट्या ऐकू यायला लागल्या. आणि पुढच्याच क्षणाला आपलं सुभेदार पडल्याची वार्ता येऊन तेच शिट्ट्या वाजवणारे प्रेक्षक चिडीचूप होऊन अगदी आत्ता काही क्षणापुर्वी सुभेदार पडल्यासारखं सुन्न होऊन जायला लागलं. क्वचित प्रसंगी हुंदकेही ऐकू यायला लागले. प्रसंग जिवंत होत गेले. शिवाजी, तानाजी, बाजी, मुरार प्रेक्षकांना परत परत भेटायला यायला लागले. आधी कित्येक वेळा तो पोवाडा ऐकला असला तरी या वेळेला कोंढाण्यावर काय होणार याची उत्कंठा लागलेली असायची. आज उदेभानानं कसला फेटा बांधलाय?, आज तानाजीचा शेला तांबडा आहे का पिवळा?, घोरपड नीट वर गेली का? याची उत्कंठा लागून राहिलेली असायची. प्रेक्षकांची हि अवस्था, तर असा प्रसंग जिवंत करणाऱ्या शाहिरांचे काय सांगावे! समोरचा श्रोतृवर्ग आपल्या बरोबर कधी कोंढाण्यावर, कधी पुरंदरावर तर कधी पन्हाळ गडावर येणार आहे या जाणिवेनेच वामनरावांच्या अंगावर रोमांच उठायचे. छाती फुलून जायची. आणि डफावर नव्या दमाची थाप उमटायची आणि या पहिल्या थापेनेच फडावरची सरस्वती प्रसन्न होऊन जायची. मग पुढं फड संपेपर्यंत सरस्वतीच व्यक्त होत राहायची वामनरावांच्या शाहिरीतून...

वामनरावांची कामगिरी आणि शाहिरी वरची अपरंपार निष्ठा पाहून शाहीर दीक्षित अतिशय समाधानी होते. त्यांनी त्यांचा फड वामनरावांच्या समर्थ हाती सोपवला. हे सारे होत असतानाच एक अतिशय निष्पाप आणि सकस अशी प्रेम कथा कृष्णेच्या काठावर जन्म घेत होती. शाहिराच्या पोटी जन्मलेल्या मालतीने आपला हात देखील एका शाहिराच्याच हाती देण्याचं नक्की केलं. औदुंबराच्या साक्षीनं कृष्णेच्या घाटावर आणा भाका घेतल्या गेल्या. वचने दिली गेली. गाठी पक्क्या झाल्या. शाहीर दीक्षितांच्या कानावर जेव्हा हि गोष्ट गेली तेव्हा त्यांनी मालतीला बोलावून घेतलं. शाहिराची पत्नी होणं हि सती परीक्षा आहे. याची कल्पना दिली. काळ बदलतोय. बदलत्या काळाच्या चक्रात शाहीर अजून पिळून निघू शकतो याचाही विचार करायला सांगितलं. तिचा विचार काही बदलला नाही. मग दीक्षितांनीही अधिक विचार न करता वामनरावांना विचारले. स्वत:चं राहत घर देखील देऊन मोकळे झाले. लग्न झालं. आणि वामनराव संसारात पडले.

पोवाड्याच्या सुपाऱ्या मिळत गेल्या. मिरजेचे पटवर्धन सरकार किल्ल्यावर वरचे वर बोलावू लागले. कोल्हापूरचे आणि साताऱ्याचे छत्रपती, औंधचे पंतप्रतिनिधी, फलटणचे नाईक.. कित्येक सुपाऱ्या फोडल्या. फड गाजवले. शाहीर वामनराव म्हणजे नामांकित झाले. यश, टाळ्या आणि सत्कार वामनरावांची सोबत करू लागले. आकाशवाणी सांगली, आकाशवाणी पुणे, इथे त्यांचे कार्यक्रम परत परत लागू लागले. सगळे चांगलेच होते. विजयाची धुंदी होतीच. पण त्याच्या जोडीला जसा लक्ष्मीचा वावर वाढायला हवा होता तसा काही तो वाढला नाही. मिरजेच्या पटवर्धनांच्या किल्ल्यात पोवाडा झाल्यावर वास्तविक राजे साहेब ११ रुपये, शेला आणि पागोटं बिदागी म्हणून देत. त्यातला १ रुपया, शेला आणि पागोटं ठेवून बाकीचे १० रुपये वामनराव किल्ल्यातल्याच नरसिंहाच्या देवापुढे नेऊन ठेवत. गावात कुणाचं पोर चांगलं तबला वाजवतंय असं कळलं तर वामनराव त्याला तबला वाजवून दाखवायला सांगत आणि नंतर ख़ुशी म्हणून त्याला कोटाच्या खिशातून बिदागीचा राहीलेला रुपया देखिल काढून देत. इथं सरस्वतीने लक्ष्मीला माजघरातच काय पण वामनरावांच्या सोप्यात देखील फिरकू दिलं नाही. .

वामनरावांचे पोवाडे आणि त्यांचे मालती वरचे प्रेम पाहून त्यांची मित्र मंडळी मालतीला “जीजी" म्हणू लागली.
या दरम्यान वामनरावांच्या घरात चार वेळा पाळणा हलला. हळू हळू घरात शेल्या पागोट्याना ठेवायला जागा पुरेना आणि मालतीला घर चालवायला लक्ष्मी!! दीक्षितांची भविष्यवाणी काही खोटी ठरायची नव्हती. भारत सरकारने या राजांचे तनखे बंद केले आणि मग तर या सुपाऱ्या यायच्या पण बंद झाल्या. शाहिराचा संसार म्हणजे विस्तवाशी खेळ. आता दोन वेळेच्या जेवण्याची भ्रांत पडू लागली. पोरांच्या अंगावर गरिबी दिसायला लागली. एकेक करत अंगावरचे सगळे डाग सोनाराकडे निघून गेले. जरी काठाची लुगडी नेसलेली जीजी आता विरलेल्या जागी गाठी मारायला लागली. शेवटी एक दिवस मनाचा हिय्या करून जवळच्या शाळेत हेड मास्तरांना भेटून आली. जीजी चांगली मॅट्रिक शिकलेली होती. हेडमास्तरांनी तिला शाळेत बालवाडीच्या वर्गाला शिकवायला सांगितलं. मुलांचे हाग-मूत काढायचे काम तिला मिळाले. पण तिने अनमान केला नाही. घरची चार, तशी दारची चार असा विचार करून ती मिळेल तो पैशाला पैसा जोडत राहिली. तोंडाला घास भरवत राहिली. कधी एखाद्या दिवशी खूपच वाईट वाटलं तर ती दीक्षितांनी वामनरावांना मारलेली मिठी आठवायची. तिला हसू हि यायचं आणि रडू हि...

पुढं काळ बिघडतच गेला. नाही म्हणायला अधून मधून सरकारातून बोलावणं यायचं कि एखादा दारूबंदी नाहीतर हुंडाबळी वर वग लिहा म्हणून. पण सिनेमा, नाटके, रेडिओ, दूरदर्शन अशा नव्या दमाच्या माध्यमांपुढे शाहिरी मागे पडायला लागली. लोकांसमोर तिकिटे लावून शाहिरी करून पैसा मिळवणे याच्यात व्यवसायाशी प्रतारणा वाटायला लागली. मग वामनराव फुकटच पोवाडे करायचे. त्यांची मित्र संपदा देखील अफाट होती. शंतनुराव किर्लोस्कर, यशवंतराव चव्हाण, दादासाहेब कोडोलीकर, जगाकाका कोल्हटकर, मारुती माने, नागनाथ अण्णा नायकवडी अशी मोठी मोठी मंडळी त्यांच्या उठबशीत होती. हि मंडळी केव्हाही भेटली तर त्या रात्रीचा कार्यक्रम म्हणजे शाहिरांचे पोवाडे. आणि मग रात्र भर शाहीर कुठल्या कुठल्या गडांची, कुठल्या कुठल्या युद्धांची, कधी क्रांतिकारकांची भेट घडवून आणायचे. सगळा आनंदाचा मामला असे. शाहिराला गाणाऱ्या गळ्याखाली एक पोट देखील असतं याचं कुणालाच स्मरण राहायचं नाही. मित्रांना आणि वामनरावांनाच काय पण जीजीला सुद्धा!! या मेळ्यात एखाद्या राजपुत्रासारख्या दिमाखात उभ्या असलेल्या आपल्या राजबिंड्या प्रियकराला पाहून प्रेक्षकात बसलेली जीजी आनंदानं मोहरून जायची. वामनरावांची एकेक थाप, एकेक चाल आणि एकेक मुद्रा बघून ती कृतकृत्य होऊन जायची..त्या वेळी तिचा आनंद पाहून तिच्या बरोबर आलेली गरिबी अंग चोरत तिच्याच पावलाखाली सावलीसारखी दबून, घाबरून बसलेली असायची.

काळ हा स्वतंत्र आहे. त्याचं कुणाशी काहीही घेणे देणे नाही. एकेक करत मुले मोठी झाली. आपआपल्या मार्गाने निघून गेली. आणि आता आज तिचा राजकुमार पण तिला सोडून गेला. जीजीला मात्र आत्ताही तीच दीक्षितांनी मारलेली मिठीच डोळ्या पुढे दिसत होती.

पुढे जीजी निवृत्त झाली. आता ती फारच एकटी झाली. मुले करायचे तेवढे करतच होती. दोन चार नातवंडेही अधून मधुन येत जात असायची. गावात एखादं कुणीही काहीही चांगलं गाता वाजवताना दिसलं तर त्याला जीजी देखील शाहिरांसारखाच रुपया काढून द्यायची आणि “शाहिरांनी दिलाच असता कि!!”, म्हणून हसायची.. जीजीचा जीव शाहिरात होता. एकटीच शाहिरांच्या डफांवरून हात फिरवत बसायची. त्यांचे शेले-पागोटी फडताळातून काढून पुढ्यात मांडून त्यांच्याशी घटका घटका बोलत बसायची. हसायची. रडायची सुद्धा!!

जीजी गेली तेव्हा जेमतेम चार माणसे कशी बशी जमली होती. त्यातला एक जण म्हणाला देखील कि, “आटपा लवकर.. उशीर होतोय” म्हणून..

कृष्णा काठचा औदुंबर मात्र त्या दिवशी हळवा झालेला दिसत होता...

~लेखनसीमा

पु. ल. - देवाघरचे देणे

पु. ल. - देवाघरचे देणे
~ निखिल कुलकर्णी
महाराष्ट्र साहित्य परिषदे कडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या साहित्य पत्रिकेत जानेवारी-मार्च त्रैमासिक अंकात माझा पु. ल. देशपांडे यांच्यावरचा एक लेख प्रकाशित झाला आहे. हा माझ्या साठी मोठाच सन्मान आहे. मराठी भाषेचा एक मानदंड असलेल्या या प्रकाशनात, मराठी भाषेच्या सगळ्यात लाडक्या लेका विषयी मला लिहू देण्याची संधी दिल्याबद्दल साहित्य परिषदेचे मुख्य संपादक डॉक्टर पुरुषोत्तम काळे, तसेच निवड समितीचे इतर सन्माननीय सदस्य यांचा मी ऋणी आहे. तो लेख इथे देत आहे.
सोबत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अंकाची प्रत देखील जोडत आहे.
सोमवार, १२ जून २०००, संध्याकाळी ऑफिस मधून घरी परत येत होतो. तेव्हा मी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर राहायचो. आणि संध्याकाळच्या बिबवेवाडीहून दुचाकी चालवत येणे हा काही फारसा सुखाचा मामला नसायचा. वैताग, त्रागा, राग, अशा सगळ्या भावनांचं एक विचित्र मिश्रण डोक्यात तयार झालेलं असायचं. अनंत वाहने, त्याहून जास्त स्पीड ब्रेकर, सगळी कडे भरून राहिलेला धूर, वाहने गप्पा मारत आहेत असे वाटावे इतके अव्याहत हॉर्न, चालणारी माणसे, मधेच थांबणाऱ्या रिक्षा, PMT, त्यांचे फाटलेले पत्रे, अखंड चेहरा रुमालाने बांधून घेऊन त्यावर गॉगल चढवून पाठीवर बाळाऐवजी कॉलेजची सॅक लावून बाणासारख्या तडक निघालेल्या लक्ष्मीबाईच्या लेकी, हे सगळं चुकवत, ऐकत, धडकत यायचं म्हणजे अगदी नको होत असे. त्याच्यात त्या वेळेला फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता हे दुहेरीच होते. त्यामुळे त्याच्यावर अखंड दुतर्फा वाहनांचा नद थांबलेला असे. तर त्या दिवशी मी गुडलक चौकापाशी पोचलो. तिथे भयंकर गर्दी दिसत होती. गाड्या सर्व बाजूनी थांबलेल्या होत्या. बरेच पोलीस शिपाई, इन्स्पेक्टर वगैरे उभे होते. माझं घर अगदी हाकेच्या अंतरावर आलं असताना आता अचानक काय झालं या विचारानं भयंकर अस्वस्थ व्हायला झाले होते. गर्दीच इतकी होती कि गाडी हलवणे देखील अशक्य होते. शेवटी एक पोलीस मामा तिकडे चालत आले त्यांना काय झाले ते विचारले. त्यांनी जे उत्तर सांगितले ते ऐकून धक्काच बसला. बाजूच्या प्रयाग हॉस्पिटल मधे पु ल गेले काही दिवस ऍडमिट होते. ते आज गेले. एक अत्यंत सुन्न करणारी घटना होती. गाडी बाजूला लावून अंत्यदर्शन घेणे पण शक्य नव्हते. ज्या माणसाचे मराठी भाषेवर अलौकिक प्रेम होते आणि तितकेच किंवा त्याहून थोडे जास्तच मराठी भाषकांचे ज्यांच्यावर प्रेम होते असा एक अवलिया श्वास आज थांबला होता. काय बोलावं.. सुन्न होऊन बॅरिकेड मधून दवाखान्यात काही दिसतंय का ते बराच वेळ पाहत बसलो होतो. अशी घुसमट पहिल्यांदाच झाली होती.
मराठी भाषा समृद्धच आहे. लेकुरवाळी आहे. तिला कितीतरी सर्वमान्य आणि लोकोत्तर अशी साजरी अपत्य आहेत. अगदी मुकुंदराज, माउली पासून सुरु होत, एकनाथ, तुकोबाराय, समर्थ, छत्रपती, शंभूराजे, लोकमान्य, स्वातंत्र्यवीर असे करत करत खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे यांनी त्यांच्या मायेची श्रीमंती वर्धिष्णूच ठेवलेली आहे. पण इतकं सगळं उदंड वैभव असून देखील असून तिचा सगळ्यात लाडका लेक मात्र पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडेच असावा असं एक मला वाटत आलेलं आहे. आपापल्या क्षेत्रात पारंगत असलेल्या मोठ्या-मोठ्या भावंडामध्ये, सरस्वतीच्या बहुतेक सगळ्या आविष्कारात मनसोक्त संचार करून देखील, देवळातली घंटा वाजवणाऱ्या बापाच्या धोतराचा सोगा ओढून पळून जाणाऱ्या पोराइतकं निरागस राहिलेलं हे शेंडेफळ, माय मराठीलाच काय पण ती भाषा कळणाऱ्या प्रत्येकालाच लाडकं आणि अगदी आपल्या घरचंच वाटत आलेलं आहे. त्यांच्या विषयी मी खरं तर काय लिहावं हा प्रश्नच आहे. माझी ती पात्रताच नाही. तरी त्यांच्या साहित्याचा एक सामान्य वाचक म्हणून चार शब्द लिहिण्याची आगळीक करत आहे.
साहित्य, कला, संगीत, नाट्य, अभिनय, दिग्दर्शन, कथाकथन, वक्तृत्व या सगळ्या क्षेत्रातला त्यांचा समर्थ आणि तितकाच सहज वावर पाहिला कि हा एकच मनुष्य होता यावर विश्वास बसणं कठीण आहे. एक अत्यंत बहू आयामी आणि तरीही तितकंच निगर्वी माणूस माझ्या तरी माहितीत नाही. पु ल नी मराठी भाषेला दिलेल्या प्रत्येक गोष्टीची मराठी मनाला भुरळ पडलेली आहे. मग त्यांचे वाऱ्यावरची वरात असो, बटाट्याची चाळ असो किंवा अपूर्वाई/पूर्वरंग असो , जसच्या तसं चित्र शब्दातून उभं करण्याची त्यांची हातोटी अद्वितीय आहे. यातले विनोद हे कालातीत आहेत. त्यांना कुठल्याही वेळेचं, काळाचं, कुठल्या बातमीच किंवा इतर कशाचच बंधन नाही. अमेरिकेतले शेक्सपिअरचे थडगे असो कि बाळ-गोपाळांनी रंगवलेला 'दारू म्हणजे काय रे भाऊ' चा फार्स असो. समाजातल्या अनिष्टतेवर आणि व्यंगावर बोट ठेवून, खपली न काढता अलगद उपचार करण्याची किमया पुलं इतकी कुणाला साध्य झाली असेल असे मला तरी वाटत नाही.
रंजन हे खरं तर कलाकाराचे पहिले ध्येय असले पाहिजे. लोकांना तुमचं आवर्जून ऎकावं, वाचावं, पाहावं असं वाटायला हवं. तरच ते ऐकतील, वाचतील आणि पाहतील. आणि मग त्यातूनच पुढे तुम्हाला एक विचारवंत म्हणून जे सांगायचे आहे ते तुम्ही सांगितले तर ते त्यांच्या पचनी देखील पडते. म्हणजे एका अर्थाने रंजन हे साध्य जरी नसले, तरी जे साध्य करायचे आहे त्याच्या साठी साधन म्हणून रंजनाचा मोठया खुबीने उपयोग करत आला पाहिजे. आणि तो पु लं नि अतिशय सार्थपणे केलेला आहे. किंवा तो कसा करता येऊ शकतो याचा दंडकच घालून दिलेला आहे असेच म्हणावे लागेल.
पुलं चं असा मी असामी असो,अंतू बर्वा असो कि नारायण असो, सामान्य माणूस खिळून जातो. मनमुराद हसत जातो. मन लावून ऐकत जातो. आणि अचानक 'ते गुरुदेव हाय नी, ते हिमालय मंदी एक टांग वर करून तप करते' च्या रूपाने हळूच एक विचार मनात उतरतो. अंतू बर्वा जेव्हा थोट्या पांडूचा उल्लेख करतो, तेव्हा मनातल्या मनात काहीतरी टोचत राहतं. नवऱ्या मुलीला निरोप देणारा नारायण डोळ्यापुढे दिसू लागतो आणि त्याचे इंग्रजी ऐकून हसावं कि रडावं तेच सुचत नाही. खान साहेबांच्या सतारीवर जीव ओवाळून टाकणारे रावसाहेब आपल्या समोर जिवंत होऊन उभे राहतात. त्यांचं "जिम्या भडव्या ये कि तिच्या XXX" हे प्रत्यक्ष ऐकू यायला लागतं. मी आणि माझा शत्रुपक्ष मधला कुलकर्णी आणि त्याच्या पुढे हातात वीट घेऊन उभे असलेले पुल दिसू लागतात. गुलमर्गचे फोटो बघताना ते घोडं आणि त्या घोड्यावर बसलेल्या यजमानीण बाई दिसू लागतात. हसू येतच. यायलाच हवं. पण आपण काय करू नये याची बारीकशी जाणीव देखील होऊन जाते. आणि ती कायमची लक्षात देखील राहते. हा एक प्रकारचा संस्कारच आहे.
उगाचच कुणीतरी नागपूरचा माणूस भेटल्यावर आता हा संत्री खायला नागपूरला कधी बोलावतो याची वाट पाहिली जाते. कुठल्याही पानपट्टी वर गेल्यावर तिथे कुठे तो चित्रांनी भरलेला आरसा दिसतो का ते नकळत पाहिले जाते. तिथे गेल्यावर, खुद्द वैकुंठाला निघालेल्या श्रीकृष्णाला देखील न मिळणाऱ्या तंबाखूची महती प्रकर्षाने जाणवते. कुठल्याही पारशाला बोलताना पाहून पेस्तनजीच दिसू लागतो. कुठल्यातरी लग्नात गेल्यावर तिथला नारायण कोण हे आपण शोधू लागतो. आणि नकळतच मग त्याच्या पोराला उगाचच एखादी आईसक्रीमची कांडी नाहीतर एखादे चॉकलेट घेऊन द्यावेसे वाटू लागते. एखाद्या थकलेल्या म्हातारबुवांना पाहून हरितात्या आठवतात. मग त्यांच्याशी दोन गोष्टी बसून बोलाव्याशा वाटतात. पायाला हात लावून नमस्कार करावासा वाटतो. बेळगाव, लेडी सिटारीस्ट, मांडी खाजवणारा तब्बलजी, उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका, मुलाला मारलेली मास्टर शंकर हि हाक, नानू सरंजामे आणि त्याची मी झोपतो करून हिमालयाची उशी, लग्नाला जातो मी म्हणणारा नारद, मी आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला म्हणणारा गटणे, दुसऱ्या बाजीरावाचे हस्ताक्षर किंवा या एकदा.. दाखवीन मजा, कोटाचे माप घेणारा शिंपी,काबुलीवाला, ऋग्वेदी आजोबा, इकडून तिकडे जाणारी दोस्त राष्ट्रांची विमाने, हाय अल्ला ये उर्दू से बचाव, अर्जुनाला कशाला पाठवला? साला कंडम माणूस किंवा पोलीस नाहीतर काय चोर हाय?, प्रेमलताबाई सद्रे, ढोशा कडक भाजना, चितळे मास्तर, एका हौदालाSSS, यमी पेक्षा दहापट गोरी ह्या अशा घटना, पात्रे आणि संवाद वेळी-अवेळी आठवत राहतात. जगाच्या कुठल्याही पाठीवर वेगवेगळ्या रूपात भेटत राहतात. आयुष्याच्या अनेकानेक प्रसंगातून काळवंडून गेलेल्या मनाचा एक मोठाच मोठा कप्पा हि पात्रे निरागस करत राहतात.
आइनस्टाइन त्याच्या सेमिस्टरच्या शेवटच्या तासाला मुलांना एक प्रश्न विचारायचा कि तुम्ही गेल्या वर्ष-सहा महिन्यात माझ्या विषयातलं काय शिकलात म्हणून. मुलं काही काही उत्तरे द्यायची. अमुक सूत्र शिकलो, तमुक प्रमेय शिकलो वगैरे. मग आइनस्टाइन त्यांना सांगायचा कि ती सगळी माहिती झाली. शिक्षण नव्हे. त्याची शिक्षणाची व्याख्या मोठी विलक्षण होती. तो सांगायचा कि, "यावर्गात आपण जे शिकलो त्यातलं बहुतेक सगळं तुम्ही पुढच्या वर्षभरात अगदी ठार विसरून जाल.आणि त्याच्या नंतर देखील जे तुमच्या लक्षात राहील आणि ज्याचा तुम्ही प्रत्यक्ष वापर कराल ते तुमचे शिक्षण!!"...शिक्षणाच्या या व्याख्येने बघितलं तर आज वयाच्या चाळीशीत देखील इयत्ता दुसरीत असताना कॅसेट प्लेयर वर ऐकलेली म्हैस आठवते. रावसाहेब आठवतात. नारायण आठवतो. आणि मन नकळत हळवं होऊन जातं. एखाद्या लेखकाने, फनकाराने अजून काय द्यायचे असते समाजाला?
पुल हे मला तरी मराठीतले सांता क्लॉज वाटतात. भली मोठी पांढरी शुभ्र दाढी, लाल भडक कपडे, तसलीच साळढाळ टोपी, तुंदिलतनु आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचे "हो हो हो" करून मोठमोठ्याने दिलखुलास हसणे..यातल्या प्रत्येक गोष्टीत एक निरागसता आहे. सांता क्लॉज प्रत्यक्ष आहे कि नाही ते ठाऊक नाही. पण त्याच्या असण्याची कल्पना देखील त्याच्या इतकीच निरागस आहे. तो ख्रिसमसच्या आदल्या दिवशी रात्री बरोबर १२ वाजता घराच्या धुराड्यातून आत येतो. वर्षभर चांगल्या वागलेल्या मुलांसाठी खाऊ, खेळणी, कपडे ठेवतो. ग्लास भर दूध पितो. आणि आल्यापावली त्याच्या रुडॉल्फ नावाच्या लाल नाकाच्या रेनडिअरच्या गाडीत बसून निघून देखील जातो. कुठून तरी देवाघरून येतो. आणि कुठे तरी देवाघरी परत जातो.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या, ख्रिस्तमस ट्रीच्या खालची खाऊ, खेळणी आणि कपडे धावत जाऊन घेताना आणि रिकामा झालेला दुधाचा ग्लास बघताना हरकून गेलेल्या डोळ्यातून त्याची निरागसता मात्र ठेऊन जातो. तेच त्याचं चिरायू अस्तित्व..
लेखनसीमा
~निखिल कुलकर्णी

अर्घ्य

अर्घ्य
मावळतीच्या मित्रालाही काही अर्घ्य द्यायची असतात..
कुठून तरी काळ्या कभिन्न अज्ञात निर्मम गर्भातून उमलून आलेल्या, र्निर्मितीच्या सुवर्णकणांना सोबतीला घेऊन साजरा करायचा असतो, आपल्याच क्षणिक अस्तित्वाचा अंतिम सोहोळा, तांबड्या भडक जास्वंदासारखा..
त्या दिनकराचा उसना घेतलेला रक्तिमा, त्याच्याच समोर धरत, व्याकुळ होऊन करायची असते वास्त..जमलय ना रे मला सगळं?...
कळतही असतील त्या सवित्रयाला हि खोल गहिऱ्या अंतरातून उमटलेली मूक गृहीतके..
दिसतही असतील त्या हिरण्यगर्भाला त्याचे अगणित सोनेरी कण त्या र्निमितीसाठी आसुसलेल्या सोनेरी नगण्य परागांमधून..
पटत असेल ओळख त्यालाही आपल्याच देखण्या चिरतरुण अस्तित्वाची..
आणि त्याच असहाय्य हतबलतेतून, निळसर आकाशाच्या आसमंतात खोळंबून राहिलेल्या विपन्न जलधीच्या आडून, उमटत असेल त्याच्याही अंतरंगातून तसलाच एखादा तांबडा सोनेरी हुंदका...
~निखिल कुलकर्णी