Sunday, August 24, 2014

गुंडू काका

मिरजेच्या संभा तालमी पाशी मोठा घोळका जमला होता. यात अगदी शेंबड्या पोरापासून ते थेट उभ्या उभ्या मान लकलक हलणारे म्हातारेही होते. तालीम अगदी घासून पुसून स्वच्छ केली होती. गेलेले बल्ब काढून नवे दुधी बल्ब लावले होते. आखाड्यातली तांबडी माती उकरून त्यात घागर भर ताक घालून चांगली मळून घुसळून घेतली होती. आखाड्याच्या बाजूनी निखळलेल्या शहाबादी फारश्या दुरुस्त करून घेतल्या होत्या. भिंतीचे पोपडे खरवडून काढून नवीन चुन्याचा हात दिला होता. कोपऱ्यात उत्तरेकडे तोंड करून एक दगडी मारुतीची मूर्ती ठेवलेली होती. तिला नवीन शेंदूर चढवला होता. जाळ्या-जळमटे काढून टाकली होती. छपराच्या तुळया देखील लखलखित केल्या होत्या. फुटलेली मंगलोरी कौले काढून तिथे नवीन काचे सारखी कौले बसवली होती. या कौलातून आत येणारा प्रकाश बघणाऱ्याचे डोळे दिपवून टाकत होता. तालमीत एक मोठे दगडी चाक होते. लाकडाच्या  २०-२५ गदा होत्या. शिवाय एका मोठ्या लाकडी ओंडक्याला एका बाजूला हात जाईल अशा खाचा करून घेतल्या होत्या. तो ओंडका इतका जड होता कि त्याच्या खाचेत हात घालून त्याला उचलायला म्हणजे प्रत्यक्ष मारूतीच लागायचा. आखाड्याच्या बाजूला एक छोटासा मल्लखांब होता. त्यालाही जवसाचे तेल लावून चांगला चकचकीत केला होता. तालीम अगदी लख्ख झाली होती. हि सगळी तयारी गुंडू काका साठी असायची. 

गुंडू काका कुठेतरी कोकणात राहायचा. दर वर्षी जोशांच्या घरी रहायला यायचा. जोशी काकांचा कुठूनतरी लांबचा नातेवाईक लागायचा म्हणे. पण त्याचे नेमके नाते काय होते कुणालाच ठाऊक नव्हते. दर वर्षी उन्हाळ्याच्या आणि हिवाळ्याच्या सुट्टीत गुंडू काकाची स्वारी मिरजेत जोशी वाड्यात मुक्कामाला यायची. जोश्यांची सोवळी म्हातारी तर त्याला भोपळ्याचं फुल म्हणायची. त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची. त्यांला उनउन भाकऱ्या करून घालायची. रोज वाटीभर साईचं दही घालायची. वर दुपारी इवलं नाचणीचं अंबील करून ठेवायची. वाड्याच्या पडवीत एक वैरणीची जुनी खोली होती. तिथे गुंडू काकाचा मुक्काम असायचा. गुंडू काकाचे सामान म्हणजे सगळे मिळुन ४-२ कपडे . त्याच्यात २ अंगरखे, पायघोळ विजारी, एखादी पैलवानी लाल पिवळ्या फुलांची लुंगी, एखादा राजापुरी पंचा आणि ४-२ लंगोट! ते बोचके कोपऱ्यात ठेवून स्वारी दिवस भर कुठेना कुठे तरी भटकत असायची. अख्खे मिरज त्याच्या ओळखीचे. गुरुवार पेठेतल्या अमदु सतारमेकर पासून ते ब्राम्हणपुरीतल्या बेहेरे गुरुजी पर्यंत आणि दिंडीवेशेच्या महादू मालगावे पासून ते म्हैसाळवेशेच्या बसाप्पा लिन्ग्रस पर्यन्त सगळे याचे दोस्त! कुणाशी मधेच कानडीत बोलावे तर कुणाशी अस्सल गावरान मराठी मध्ये शिव्या द्याव्यात. कुणाशी अगदी पुणेरी मराठी मध्ये स्पष्ट आणि स्वच्छ बोलावे नाहीतर कुणाशी उर्दू आणी हिंदीच्या छातीत सुरा खुपशीत निवांत चर्चा करावी. खाक्या पैलवानी!! गावातली सगळी मोठी माणसे तर त्याला पैलवान म्हणुनच बोलवायची. गुंडू काका म्हणजे साक्षात मारुतीच!! बलदंड शरीर. एकेक दंड म्हणजे असा शिसवी कांबी सारखा! पहाडी कप्प्यांची छाती, पाठीला अगदी चिकटलेले पोट, भरदार मांड्या आणि बेडकी सारख्या नाचणाऱ्या पिंडऱ्या. सगळेच ताशीव, घोटीव. मारूतीच तो! काखा फुगवून एखाद्या झोकदार तुरेवाल्या कोंबड्यासारखा चालायचा. 

गुंडू काका रोज सकाळी ४ वाजता उठायचा. लुंगी लावून केसरखान्याच्या विहिरीवर पोहायला जायचा. मोटेच्या काठावरून सरळ एखादा सूर नाहीतर गठ्ठा मारायचा. विहिरीतली पारवळे, कबुतरे घाबरून तिथल्या तिथेच फडफड करायची. विहिरीतून मोठा गिल्ला ऐकू यायचा. हिरव्या जाड पाण्यावर तास भर मनसोक्त हात मारून झाले कि विहिरीतच जोरजोरात मनाचे श्लोक म्हणायला घ्यायचा. त्यातल्या 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे' हा श्लोक म्हणताना त्याचा आवाज कमालीचा कातर व्हायचा आणि पुढच्याच ओळीला परत वर जायचा. या अशा समर्थांच्या समर्थ शिष्याकडे वाकड्या नजरेने पाहणारे हि कोणी नव्हते. मग तिथून चालत, तोंडाने मनाचे श्लोक म्हणत तालमीकडे निघायचा. तालमीच्या एका बाजूला एक लाकडाची वखार होती. तालमीत यायला एक छोटा लाकडी दरवाजा होता. तालमीला  फक्त एक कडी लावलेली असायची. कडी काढून उंबऱ्याला वाकून नमस्कार करायचा. आणी मग आत जावून भल्या मोठ्या आवाजात भीमरूपी म्हणायचा. त्याच्या आवाजाने अख्खी गल्ली जागी व्हायची. तरणी पोरे पटापटा तालमीत जमा व्हायची. आणि मग सुरु व्हायची मारुतरायाची आरती! 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी,  करी डळमळ भूमंडळ शिंधूजळ गगनी'. मनसोक्त टाळ्या आणि झांजा वाजवत आरती व्हायची. मग नारळ फोडून त्याच्या खोबऱ्याचे तुकडे आणि सुंठ तालमीत फिरायची. मग सुरु व्हायची तालीम. गुंडू काका पारवळासारखे घुमत ५०० जोर आणि ५०० बैठका काढायचा. त्याच्या जोरात तर अशी नजाकत होती कि पोरे नुसती बघत रहायची. कधी दमलाय, कधी श्वास लागलाय असला प्रकारच नाही. एका तालात आणि एका दमात सगळा प्रकार चालायचा. घामेघूम व्हायचा आणि त्याच्याच घामात त्याचे बलिष्ठ स्नायू चमकून निघायचे. त्याची मोजायची पण एक विशिष्ठ पद्धत होती. एका कोनाड्यात गारीचे १२ खडे ठेवेलेले असायचे. ते १२ खडे तो असे काही विशिष्ठ पद्धतीने मोजायचा कि त्याचे २४, ३६ अशा सरीने १०८ कधी व्हायचे ते बघणाऱ्याला कळायचे देखील नाहीत. बैठकांचीही तीच तऱ्हा. मग तिथल्या गदा घेऊन फिरवायचा. लाकडाचा तो ओंडका तर फक्त गुंडू काकाच उचलू शकायचा. बाकीची पोरं नुसती बघायची. साक्षात मारुती जिवंत होऊन उभा राहायचा. मनसोक्त कसरत झाली कि मग गुंडू काका आखाड्यात उतरायचा आणि मग सुरु व्हायची समर्थ सेवा. 
                                          
इथे तालमीत येणारा प्रत्येक जण पैलवान! कुणी काडीचा तर कुणी दाढीचा. लहान लहान पोरं सुद्धा ओळीनं जोर काढायची. कुणी मग १० काढून ५० मोजायचा आणि मग बाकीची पोरं त्याला हसायची. एका बाजूला मोठी पोरं असायची. कुणी गदा फिरवायला घ्यायचा. कुणी बैठका काढायचा. कुणाच्यात कुस्त्या लागायच्या. आणि या सगळ्याच्या म्होरक्या असायचा गुंडू काका. एखाद्या पोराला लंगोट कशी लावायची इथे पासून ते एखाद्या कसलेल्या पैलवानाला पाट कसा काढायचा इथे पर्यंत सगळ्याचे शिक्षण अगदी मनापासून चालायचे. गुंडू काकाची दैवते २. एक मारुती आणि दुसरे समर्थ रामदास. दोघेही ब्रम्हचारी. गुंडू काकाने तालमीच्या भिंतीवर मनाचे श्लोक लिहून काढले होते. पांढऱ्या  भिंतीवर निळीने,  श्लोक आणि इतर अशीच वचने लिहून काढली होती. पण गुंडू काका रंगात आला कि म्हणायचा 'काढेङ्गा जोर तो बनिन्गा मोर'. ते पोर वर बघून हसायचं आणि गुंडू काका पाठीवर एक थाप द्यायचा. सगळा मजेचा मामला. गल्लीतली सगळी पोरं म्हणजे गुंडू काकाची मालमत्ताच झाली होती. लहान लहान पोरं तर त्याच्या हाताला लोम्बकळायची. उजव्या हाताला २ आणि डाव्या हाताला २ पोरं घेऊन गुंडू काका चालत जायचा. पोरं फार जीव टाकायची आणि गुंडू काका तर त्याची पोरं असल्यासारखा वागायचा. 

या गर्दीत तालमीत गल्लीतलं एकच पोर यायचं नाही. रंगा भटजींचा नातू सदाशिव. त्याला सगळी सदा म्हणायची. रंगा भटजी मिरजेत लोकांच्या घरी पूजा घालायचे. त्यांचा एकुलता एक मुलगा सैन्यात होता. कुठेतरी सियाचीन का कुठेतरी गेला. सदा वर्षाचा असेल तेव्हा. गेला तो परत आलाच नाही. बरीच वर्षे वाट बघून शेवटी रंगा भटजींनी सुनेला सोवळी केली. आता घरात रंगा भटजी, सोवळी गोदा आणि मुका सदा एवढे तिघेच राहिले. घरात कुणी कुणाशी काही बोलायचंच नाही. सोवळी गोदी चुली जवळच बसून  असायची. तिथेच सदा खेळत पडलेला असायचा. रंगा भटजी कडे १८०० साला पासूनची जुनी पंचांगे होती. भटजी त्यातले कुठलेतरी पंचांग काढून मुलगा कुठे गेला याचा शोध घेत बसलेले असायचे. मधेच कुणीतरी लग्नासाठी पत्रिका जुळवायला घेऊन यायचे. रंगा भटजी अगदी मोजक्या शब्दात त्याचा फडशा करायचे आणि मग घर पुन्हा शांत होऊन पडायचे. कसला आवाज नव्हता. कसली जाग नव्हती. सकाळी भटजी लवकर उठून अंघोळ करून पवमान म्हणायचे तेवढीच काय ती जाग. नंतर दिवसभर सगळा घुसमटलेला श्वास शिल्लक राहायचा. महिन्यातून एकदा  बाळबा न्हावी गोदीच्या हजामतीला यायचा. शून्यात बसलेल्या गोदीची नजर हि मरून गेली होती आणि आडावरची तुळसही! पुढे सदा ५ वर्षाचा झाला तरी बोलेना. रंगा भटजींनी परत एकदा पंचांगे शोधायला सुरुवात केली. अशात एक दिवस गुंडू काकाला कुणीतरी सदा बद्दल सांगितले. गुंडू काकाला फार वाईट वाटले. तो तडक भटजींकडे गेला. सदा अंगणात खेळत होता. त्याच्या हालचाली विचित्र होत्या. त्याची नजर शून्यात होती. गुंडू काकाने त्याला जवळ घेतले तसे तो भोकाड पसरून रडायला लागला. गुरुजी घरात नव्हते. गोदीला बाहेर येत येईना. शेवटी गुंडू काका परत जायला निघणार इतक्यात गुरुजी घरी परत आले. गुंडू काकाला पाहून गुरुजी चकितच झाले. गुंडू काकाच्या कडेवर बसलेल्या सदा कडे पाहून गुरुजींचे डोळे भरून आले. आणि त्यांनी गुंडू काकाला बसवून घेऊन सदाची सगळी हकीकत सांगितली. कधीतरी ३-४ वर्षाचा असताना सदाला ताप आला होता. बघता बघता पार मेंदूत गेला. सदा कसा बसा वाचला. पण त्यानंतर त्याला काही कळायचेच बंद झाले. ऐकू येईना. बोलता येईना. गोदी आणि गुरुजी सोडले तर तो कुणाकडे जाईना. घरातली उरली सुरली जाग देखील संपून गेली. गुरुजी सांगत होते. गुंडू काका ऐकत होता. मधेच कधीतरी माज घरातून एक हुंदका ऐकू आला. पण नंतर लगेच जळत्या लाकडावर टाकलेल्या पाण्याच्या आवाजात तो हुंदका विरूनही गेला. कधी नव्हे ते गुंडू काकाचे डोळे ओले झाले आणि त्याने सदाला घट्ट मिठी मारली. सदाची जबाबदारी गुंडू काकाने घेतली.    

दुसऱ्याच दिवसापासून सदाला गुंडू काकाची तालीम चालू झाली. बाकीच्या पोरांची तालीम झाली कि तालमीतून कुणीतरी सदाला घेऊन यायचे आणी मग सदा आणि गुंडू काका यांची दुसरी तालीम सुरु व्हायची. गुंडू काका कसली कसली तरी चुर्ण, पाले, मुळ्या कुठून कुठून आणायचा आणि सदाला द्यायचा. सदाला काही आवडायची. काही आवडायची नाहीत. मग गुंडू काका त्याच्यात गुळ घालून नाहीतर गुलकंद घालून त्याला चाटवायचा. कसली कसली आसने शिकवायला लागला. एखादी कोंबडी धरावी तसा सदाला खाली डोके वर पाय करून धरून तासन तास भर उभा असायचा. सदाच्या डोळ्यात रक्त उतरायचे. डोकं आणि कान लाल बुंद व्हायचे. गुंडू काकाचे काही मुसलमान मित्र होते. त्यांच्या कडून कसला कसला धूप घेऊन यायचा आणि त्याची सदाला धुरी द्यायचा. हळु हळु सदा मध्ये फरक दिसायला लागला होता. तो आता माणसे ओळखायला लागला. ४-२ शब्द बोलायला लागला. सदाची प्रगती सांगायला कधी कधी गुंडू काका रंगा भटजींच्या घरी जायला लागला. भटजींना फार बरे वाटले. गोदीला उगाचच आडा जवळच्या वाळलेल्या तुळशीला पाणी घालावेसे वाटले. बाळबाची न्हाव्याची पिशवी यावेळी पहिल्यांदाच रिकामी परत गेली. 

गुंडू काका कोकणात परत गेला आणि वखार वाल्या मामूनी वखार कुठल्यातरी शेठाला विकायला काढली. शेठ येउन जागा बघून गेला. वखार आणि मुख्य रस्ता याच्या बरोबर मध्ये तालीम होती. शेठाने तालमीची चौकशी केली. कुठला तरी ट्रस्ट तालमीचा मालक होता. शेठाने सगळे ट्रस्टी शोधून काढले. अर्थात गुंडू काकासाठी सगळा व्यवहार अडून बसला. शेवटी दिवाळीच्या आधी आठ दिवस गुंडू काका परत आला. जोश्यांची सोवळी म्हातारी परत साईचे दही लावायला लागली. तालमीतल्या मारुतीला नवा शेंदूर लागला. 'सत्राणे उड्डाणे' ची आवर्तने चालू झाली. सदाची तालीम देखील परत चालू झाली. दिवाळीच्या बरोबर दोन दिवस आधी शेठ रंगा भटजीच्या घरी जावून आला आणि दुसऱ्या दिवशी गुंडू काकाचे बोचके जोश्यांच्या म्हातारीने रस्त्यावर आणून ठेवले. बोचके बघून गुंडू काकाने म्हातारीच्या खोलीची कडी वाजवून बघितली. आतून कसलाच आवाज आला नाही. खालच्या मानेने त्याने बोचके उचलले आणि तो चालू लागला. दिवाळीच्या आदल्या रात्री रंगा भटजीच्या आडात काहीतरी पडल्याचा आवाज झाला. वाळलेली तुळस आडात पडली होती. इकडे तालमीची चौकट काढायला भाड्याची माणसे जमा झाली होती. 

2 comments:

 1. shevat kalala nahi.......Baki vatavaran Nirmiti chan!
  Anu

  ReplyDelete
  Replies
  1. मित्रा, माझ्या मते निखिलजींना कथेत सांगायचे ते असे - गुंडू काकांना गोदी भावली. ज्या म्हातारीकडे ते उतरायचे तिला ते रुचले नाही. गोडीने आत्महत्या केली. गुंड्या काकांची तालीमही गेली. शेवटी काय या कथेतली सगळीच पात्रे अभागी राहिली. निखिलजी बरोबर आहे ना माझं ?

   Delete