Friday, June 30, 2017

आमचा "जावईशोध"

आमचा "जावईशोध"
असं म्हणतात कि आईची चप्पल मुलीला बसायला लागली कि बापाची खटपट सुरु होते चांगला जावई मिळवण्याची. त्यांनी तसे करावे किंवा कधी करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याच्या त्याच्या मुलींचा तोंडवळा, ज्याची त्याची आर्थिक कुवत, ज्याचा त्याचा सामाजिक स्तर यावर देखील त्याचे उत्तर बऱ्याच वेळेला अवलंबून असते. हल्ली बऱ्याच कुटुंबात मुली या मुलांसारख्याच किंबहुना त्याहून जास्त शिकलेल्या असतात. त्या नोकरी देखील करत असतात. अशा वेळी त्यांना अनुरूप जावई शोधून काढणे हे खरे म्हणजे जसे (बापाचे आणि मुलींचे) वय वाढेल तसे जरा जास्तच जिकिरीचे होत असावे. त्यामुळे "शुभस्य शीघ्रम" या न्यायाने हे महत्कर्म दिवसेंदिवस लवकरात लवकर सुरु होताना दिसते. किंबहुना मुलींचे शिक्षण, मुलींच्या आणि मुलांच्या वाढत्या आणि बदलत्या अपेक्षा, बदलत जाणाऱ्या समाजमान्यता आणि रूढी, वाढती धावपळ आणि त्या योगे बदलत जाणाऱ्या अपेक्षांची उतरंड याने देखील वधू पित्याना बऱ्याच ठिकाणी जेरीला आणलेले दिसते आहे.
आम्हालाही बऱ्याच कन्या आहेत. "मुलगा होईल" आणि अनायासे आमच्या हजारो वर्षांची भव्य दिव्य परंपरा असलेल्या "जत्तेकर-इनामदार" खानदानाला "दिवा" मिळून जाईल या एका प्रामाणिक उद्दिष्टाने गेली आठ वर्षे आम्ही "निष्काम" पणे आमचे कर्तव्य, केवळ कर्तव्य भावनेने पार पाडत आलो आहोत. अर्थात देव दयेने आम्हाला आठही वेळेला कन्या रत्न होऊन अजूनही "जत्तेकर-इनामदार" खानदानाला "अंधारातच" ठेवले आहे. प्रत्येक वेळी निराश न होता, "यंदा योग्य नव्हता" अशा विचाराने त्यांची नावे आम्ही "बबिता", "योगिता", "सीता", "गीता", "नीता", "समता" आणि "ममता" अशी ठेवली आहेत. पण आठव्या खेपेनंतर सरकारांनी मनाच केल्याने शेंडे फळाचे नाव "खुशाली" ठेवले आहे. आता स्वत:च्या "दिव्याचा" नाद सोडून इतरांचे "दिवे" कसे गळाला लागतील याचा अभ्यास सुरु केलेला आहे.
सांप्रत काळ मोठा विपरीत आलेला आहे. एकानेक कारणाने अनेक भाषा बोलणारे, अनेक जातीचे, अनेक वर्णाचे लोक आता अनेक देशातून अमेरिकेतल्या मोठ्या-मोठ्या शहरातून एकत्र येत आहेत. आम्ही देखील मागच्याच वर्षी Computer Programmer म्हणून आमच्या परंपरागत "जत्ते-हरणाक्ष" या गावातून "New York" ला सहकुटुंब सहपरिवार येऊन ठेपलो आहोत. यायोगे पोटा-पाण्याचा प्रश्न सुटेल आणि आमच्या गावातल्या पडत आलेल्या वाड्याचे वासे, तुळया आणि ठेपे बदलता येतील हि एक माफक अपेक्षा आहे.
आमच्या कडून या प्रचंड परंपरेच्या खानदानाला "दिवा" जरी देता आला नसला, तरी ज्या वंश परंपरागत वाड्यात एकाहून एक अशे अनेक "दिवे" लागले, ज्यांची नावे देखील आज इतिहासाला ठाऊक नाहीत (उद्या या यादीत कदाचित आमच्या नावाचा देखील समावेश होईल!!), तर अशा वाड्याची इमारत आमच्या डोळ्यात प्राण असे पर्यंत तरी उभी असावी अशी देखील आमची एक प्रामाणिक इच्छा आहे.
त्यामुळे व्हिसाचे अर्ज, त्याची खोलीभर कागद पत्रे, आमचे, आमच्या कुटुंबाचे आणि ८ मुलींचे पासपोर्ट वगैरे जबरदस्त जामानिमा केला आहे. अमेरिकन व्हिसा अधिकाऱ्याने दिलेले कुत्सित हास्य, आमच्या दिवंगत मोठ्या काकांच्या पत्नीचे आणि त्यांच्या बोलघेवड्या मुलींचे कुजकट सल्ले आणि विमानतळावरच्या लोकांनी दिलेले कुतूहल मिश्रीत कटाक्ष या कडे 'इदं न मम' अशा न्यायाने पाहात, सुमारे ४८ तासांच्या जग प्रवासानंतर आम्ही एकदाचे "New York" ला सहकुटुंब सहपरिवार येऊन ठेपलो आहोत.
विमानातून येताना तर जवळ जवळ एका अक्खा पंखावर, या "जत्तेकर-इनामदार" कुटुंबाची पडलेली छाप पाहून आमच्या कर्तबगारीचे आम्हालाच अप्रूप वाटत आले आहे.
सध्या तरी आम्ही "एतद्देशीय भारतीय" "तपकिरी" दिव्यांचाच फक्त विचार करत असून वेळ पडलीच तर "पांढऱ्या", "काळ्या", "पिवळ्या" तसेच "किरमिजी" दिव्यांचाही विचार करण्याचा मानस आहे.
तेलुगू -
हे लोक सर्व क्षेत्रात पुढे आहेत. बँका, सरकारी कार्यालये, सॉफ्टवेअर कंपन्या सर्व क्षेत्रात यांचा वावर आहे. तेलुगू हि जागतिक भाषा असून ती सगळ्यांना येतच असते असा त्यांचा समज असतो. त्यामुळे समोरचा माणूस ओळखीचा असो किंवा नसो, ते त्याची "एंट दी गारु?" अशी सुरुवात करतात. ते ऐकून समोरचा गार पडतोय असे वाटले कि मग "how are you?" वगैरे विचारून वेळ मारून नेतात. दोन तेलुगू जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा तर "आजी म्या ब्रह्म पाहिले" अशा थाटात गडाबडा लोळायलाच घेतात. यांच्या चर्चेचा मुख्य विषय "अमेरिकेत नोकऱ्या कुठे कुठे उपलब्ध आहेत?" असा असतो. यांचे नेटवर्क अतिशय जबरदस्त असते. एखाद्या तेलुगू माणसाचा job जातोय असे कळायच्या आत हे त्याला नवीन जॉब मिळवून देतात. विशेष म्हणजे सर्व तेलुगू लोकांना सर्व programming languages अस्खलित पणे लिहिता येतात. त्यांना सर्व प्रकारचे डाटाबेस तसेच सर्व प्रकारच्या ERP हे जन्मापासूनच येत असते. कधी कधी ते तेलुगू मधून Computer Programming, Technology वगैरे बद्दल पण बोलत असतात. याचा मुख्य अर्थ "इकडचा कोड घेऊन तिकडे कॉपी करून टाक" असा असतो. मग ऐकणाराही हे पहिल्यांदाच ऐकत असल्या सारखे हात वारे करतो. मग दोघेही मोठ्याने हसून एकमेकांना टाळ्या देतात. सगळाच निर्मळ आनंदाचा प्रकार असतो.
तेलुगू माणूस हा कधीही एक तेलगू माणुस म्हणून जगतच नाही. "समस्त तेलुगू मेळवावा, तेलुगू धर्म वाढवावा" असा श्लोक तेलुगू मध्ये आहे कि नाही ते माहित नाही. पण यांचे वागणे अगदी याला अनुसरूनच असते.
हे लोक राहतात मात्र अतिशय स्वच्छंदी!! आधीच गडद काळपट रंग, त्यात महिना महिना दाढीला पाणी लागत नाही. अधून मधूनच आंघोळीची तसदी घेतली जाते. डोकीस कसली कसली हैद्राबादी वासाची तेले लावून खुशाल "हे विश्वची माझे घर" अशा थाटात विहरत असतात. यांच्या मोज्यांना बऱ्याच वेळेला भयंकर वास येत असतो. पण हे चलाख लोक समोरच्यालाच सल्ला देतात कि "मोजे धुवत चला" म्हणून!!
हे लोक शक्यतो Public Transport ने प्रवास करतात. एकदा का रेल्वेत देह कोंबला कि त्यांना मुक्तीचा भास होतो. मग कानाला फोन लावून खुशाल जोरजोरात बोलत आणि हसत बसतात. ते इतक्या जोरात बोलत असतात कि त्यांनी फोन ठेवून दिला तरी ऐकणाऱ्याला ऐकू येतच राहील असेहि आमचे एक मत आहे. हि एक अत्यंत पुरुष प्रधान संस्कृती आहे. इथे स्त्रीयांच्या मताला फारसा वाव नाही. स्त्रियांना त्यांनी खर्च केलेल्या प्रत्येक डॉलर चा हिशेब पुरुषांना द्यावा लागतो. त्यामुळे त्या स्त्रिया क्वार्टर टाकून पाण्याची बाटली सुद्धा विकत घेताना १० वेळा विचार करतात.
हे लोक अतिशय धार्मिक असतात. Computer वर रन होणारा कोड हा सुद्धा काही दैवी शक्ती मुळेच रन होतो अशी त्यांची ठाम समजूत असते. गुरुवारी साई बाबांच्या देवळात झुंडीने जातात. कसल्या कसल्या मराठी आरत्या म्हणतात. तोंडाने जप करतात. भल्या मोठ्या दर्शनबारीत उभे राहून, कसले कसले चेहरे करत, काहीतरी पुटपुटत असतात. बऱ्याच वेळेला त्याचा अर्थ "मला ग्रीन कार्ड मिळू दे" असा असतो. साई बाबांच्या पुतळ्याची दाढी कुरवाळतात. पाय चाटून स्वच्छ करतात. स्वत:चे कान धरून उठा-बशा काढतात. साई बाबाना चिलमीच्या ऐवजी पाईप चा प्रसाद दाखवतात. शनिवार आणि रविवारी यांच्या बायका इथल्या दिवस भर देवळातले संडास वगैरे स्वच्छ असतात आणि पुरुष घरी तेलुगू टीव्ही वर गाणी बघत बसलेले असतात. भारतातल्या तुरुंगातून सुटलेले बाबा-बुवा जेव्हा अमेरिकेत येत असतात, तेव्हा त्यांना घरी ठेवून घेण्याचा, त्यांची पाद्य वगैरे पूजा करण्याचे सर्वाधिकार तेलुगू लोकांकडेच आहेत.
इतकेच काय पण यातले काही काही लोक अमेरिकेतील तुरुंगात देखील जाऊन पोचले आहेत. सर्वच क्षेत्रात आघाडी घेण्याच्या यांच्या ओढीने, अमेरिकेत देहदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय होण्याचा मान देखील यांना नुकताच मिळालेला आहे.
यांच्या याच "सबसे आगे, सबसे तेज" राहण्याच्या ओढीपायी तेलुगू घरात लेक द्यायची का? या विचाराने मन अधूनमधून भयभीत होत असते.
बंगाली -
यांचे सगळेच भालो भालो असते. बंगाली भाषेपासून ते बंगाली नायिकांपर्यंत सर्वच आम्हाला आवडतच आलेले आहे. शिवाय हि सर्वच बंगाली माणसे देखील, प्रत्यक्ष रवींद्रनाथ टागोर, त्यांचे सक्खे चुलत मामा असल्यासारखी, सदैव आनंदी आणि प्रेमात न्हाऊन निघालेली दिसतात. यांचे बोलणे गोड. मिठाई गोड आणि बंगाली वहिनी तर फारच गोड!! अशा सगळ्या गोडांब्या मध्ये सुभाषचंद्र बोस कसे काय जन्मले याचे राहून राहून आश्चर्य वाटते आहे. पण भलतीच मिठ्ठास!! वास्तविक फाळणीचे सगळ्यात जास्त चटके पंजाब आणि बंगालला बसले. दुःखाचे डोंगर पाठीशी घेऊन हि माणसे अमेरिकेत येऊन राहिली. पण त्यांनी लोकांना फक्त आनंदच दिलेला आहे. मासे आणि सिगारेटचे यांचे प्रेम अमेरिकेत देखील टिकून आहे. इथे स्त्रियांना अतिशय सन्मान दिला जातो. संगीत, नाटक, साहित्य यांची याना विशेष आवड असते. यांना लक्ष्मी पेक्षा सरस्वतीचीच गोडी जास्त!! त्यातल्या त्यात सतार ह्या वाद्यावर बंगाली माणसाचा फार जीव असतो. निखिल बॅनर्जी, सत्यजित रे, मन्ना डे, RD बर्मन, आशा भोसले, लता मंगेशकर, तेंडुलकर आणि गांगुली हे यांचे अगदी जिव्हाळ्याचे विषय!! तासनं तास बोलत बसतील. कधी पेटीवर रवींद्रनाथांची गाणी वाजवत बसतील. कधी पंडित रोणू मुजुमदारांनी बासरी वर बनारसच्या घाटावर पंडित किशन महाराजांच्या स्वर्गीय पखवाजाच्या साथीत वाजवलेल्या "अहिर भैरव" च्या आठवणीने गहिवरून जातील. कधी तुटलेल्या बंगालची आठवण काढत त्यांच्या ढाक्यातल्या नाहीतर चितगाव मधल्या जुन्या घराच्या आठवणी मध्ये रमून जातील.
या लोकांकडे पाहून साहेबाने त्याची राजधानी कलकत्त्याला का केली ते कळून चुकते. एक अतिशय रुबाबदार आणि अत्यंत हवा हवासा वाटणारा समाज आहे. यातला एखादा "दिवा" आमच्या आठ पैकी एका गळाला लागला तर आनंदच होणार आहे.
तामिळ आणि केरळी -
वास्तविक आम्हाला अमेरिकेत येई पर्यंत या दोघात काही फरक असतो हे मान्यच नव्हते. उलट आमचे तर असेच मत होते कि बेळगावच्या दक्षिणेला जो मुलुख आहे तो सगळा एकच एक प्रदेश असून त्याला दक्षिण भारत म्हणतात. तेव्हा तिथे चार वेगळी राज्ये असून त्यांना स्वत:च्या प्रतिमा आहेत याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यातल्या त्यात केरळ आणि तामिळनाडूची भौगोलिक सलगता पाहून आणि भारताच्या नकाशात उंदराच्या काना एवढे दिसणारे हे केरळ हे वेगळे राज्य तामिळनाडूला का जोडून टाकत नाहीत असाही एक प्रश्न पडत असे. याच्या भाषा म्हणजे भरलेल्या पाण्याच्या तांब्यात सागरगोटे टाकल्यावर येतो तासला होणारा ध्वनी, जिलब्या किंवा चकल्या एकमेकांना जोडून ठेवल्या सारख्या त्यांच्या लिप्या, नारळाची, पोफळीची झाडे, केळीच्या पानावरचे डोसे आणि उत्तप्पे , इडल्या आणि मेदू वडे आणि गरम कॉफी!! हे सर्व या दोन राज्यात समान होते असेच वाटायचे. अर्थात अमेरिकेत येऊन देखील आमच्या यांच्या बद्दलच्या ज्ञानात फारशी भर पडलेली आहे असे नाही. पण निदान हि दोन राज्ये वेगळी असून त्यांच्या प्रादेशिक अस्मिता वेगळ्या आहेत हे कळले आहे.
तामिळ लोक स्वत:ला संपूर्ण पणे वेगळे राष्ट्र मानत आले आहेत. आणि केरळी लोक त्यांच्या "विशाल" राज्याला "Gods own country" म्हणत आले आहेत. त्यांचा तो हेका, अमेरिकेतही कायम आहे. अत्यंत फटकून वागतात. अतिशय बुद्धीमान आहेत. कर्तबगार आहेत. पण त्यांच्याच विश्वात पुरेपूर गुरफटून गेले आहेत. "भरतनाट्यम" ला "बरतनाट्यम" म्हणतात आणि "बबिता" ला "बबिथा"!! यांचा नेमका प्राॅब्लेम काय आहे तेच कळत नाही. ना यांच्या कडे कानड्यांसारखे अभिजात संगीत आहे, ना गर्व करावा असे साहित्य!!
कपाळावर कसले कसले पांढरे चट्टे काढतात. ही मंडळी शर्ट पॅंट मधे असली तरी सदैव एक अदृश्य लुंगी घातल्यासारखी, पायातल्या पायात, दुडकी पावले टाकत चालतात. मस्त मर्दासारख्या टांगा टाकल्या तर लुंगी सुटेल कि काय अशी भीती वाटत असावी. आपण त्यांची भाषा शिकायचा प्रयत्न केला तर आपल्यालाच तोंडभर हसतात. स्वत: भात मुठीत घेऊन खातात. पण तामिळनाडू मध्ये आधी इडली खातात का मेदू वडा, याच्यावर संस्कार वर्ग देतात. हिंदीत बोललो तर जसे काही एखादी गाय मारल्यासारखे डोळे मोठे करून नुसते बघतच बसतात. आणि नंतर "No hindi you know!!" म्हणत विक्राळ हसतात. जसं काही तामिळनाडू म्हणजे अमेरिकेतच आहे!!
अशाच एका तमिळ मंडळाच्या कार्यक्रमात आम्ही आमच्या पहिल्या तीन कन्यांना घेऊन गेलो होतो. त्यांची पाटी वाचली तर त्यांवर "Tamiz" असे लिहीले होते. म्हटले चला सापडली यांची चूक!! आम्ही मोठ्या उत्साहाने मंडळाच्या अध्यक्षांना भेटून ते सांगितले. तर त्यांनी आम्हाला वेड्यातच काढले. "तामिळ" चे इंग्रजी स्पेलिंग "Tamiz" होते हे पहिल्यांदाच कळत होते. त्याचे कारण विचारले तर त्यांनी घशातल्या घशात काहीतरी खाकरल्या सारखे करून, अगम्य उच्चार करून दाखवले आणि म्हणाले, "So did you get it no?".. आम्ही फक्त हसून मान हलवली.. मग त्यांनी आमच्या कन्येचे नाव विचारले. म्हटले आता ही संधी सोडायची नाही. आम्ही सांगितले की पहिलीचे नाव "ब्याबझी", दुसरीने नाव "यागझी" आणि तिसरीचे नाव "सीझी" म्हणून!! म्हाताऱ्याला फेपरे यायची वेळ आली. मराठी मुलींची नावे "ब्याबझी", "यागझी" आणि "सीझी"?
मनात म्हटले "तंब्या, लेका शेंड्या लावतोस होय मला? आता विचार ब्याबझी, यागझी आणि सीझी यांची स्पेलिंगं?"
या लोकांचे खाद्य पदार्थ सोडले तर व्याही म्हणून यांच्याशी फारसे जमेल असे सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे सध्या तरी आम्ही यांवर विचार करणे थांबवले (खरे तर "तांबवले" असेच म्हणणार होतो!!) आहे.
उडिया -
समस्त जग हे आमच्या विरोधात असून आता आमची भाषा, संस्कृती, रीती रिवाज सर्व धोक्यात आले आहे. असा एक विचार यांच्या डोक्यात सतत येत असतो. त्यांचे इतर कुठल्याच देशी आणि परदेशी भाषिकांशी फारसे पटत नाही. हि मंडळी आपल्याच जगात जास्त रमत असतात. त्यातल्या त्यात दक्षिण भारतातल्या लोकांबद्दल यांना विशेष पूर्वग्रह असतो. मराठी आणि गुजराती माणसाविषयी त्यांना विशेष आत्मीयता असते. त्यांच्या मताप्रमाणे सम्राट अशोकाने, दंडकारण्य तोडून तो भाग आपल्या साम्राज्याला जोडण्यासाठी त्याच्या सैन्यातल्या महा रथ्यांना आणि गज रथ्यांना आज्ञा केली. महा रथ्यांनी जंगल तोडावे. तिथली हिंस्त्र श्वापदे करावीत. आणि गज रथ्यांनी त्यांना वाण सामानाचा व्यापार करावा असा त्याने नियम घालून दिला. यातल्या महा रथ्यांचे पुढे मराठी झाले आणि गज रथ्यांचे पुढे गुजराती झाले. या योगे मराठी आणि गुजराती हे दोघेही मुळचे उडिया असल्या बद्दल त्यांची पूर्ण खात्री पटलेली दिसते.
उडिया लोक संख्येने देखील फार नसल्याने अमेरिकेतील बहुतेक सर्व उडिया लोक एकमेकांना व्यक्तिगत रित्या ओळखत असतात. भुवनेश्वर हा यांचा वीक पॉईंट असतो. कोणार्क, जगन्नाथ पुरी या विषयी भरभरून बोलतात. क्वचित प्रसंगी उडिया वहिनी "ओडिसी" नृत्यात पारंगत देखील असतात. "पण काय, मुलं झाल्यानंतर बंदच केलं" वगैरे मराठी सारखी वाक्ये तिथे देखील ऐकू येतात. पण तो नृत्य प्रकार हा एक अतिशय सर्वांग सुंदर असा प्रकार आहे. त्याच्या मध्ये सर्व प्रकारचे भाव, सर्व प्रकारचे राग, सर्व प्रकारच्या वेळा, सर्व प्रकारचे आनंद आणि सर्व प्रकारची दुःखे व्यक्त करण्यासाठी अतिशय समृद्ध अशा मुद्रा दिलेल्या आहेत. हे नृत्य इतके बहारदार असते, कि त्या त्या मुद्रेच्या वेळी प्रत्यक्ष तो तो भाव प्रकट होताना दिसतो. नर्तिकेचा कपडेपट, रंगपट सगळेच अतिशय समृद्ध आणि मनमोहक असते. नर्तिकेचे हाव-भाव हे इतके उमदे असतात कि तिने "कामभाव" जरी प्रकट केला तरी तो जराही ओंगळ वाटत नाही. अत्यंत निखळ आणि संकेतांच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारा विराट अनुभव असतो.
यांचे खाणे, कपडे, भाषा, राहणीमान सगळेच अभिजात वाटते. पण तरीही ते कानडी सारखे उग्रट वाटत नाही. एक सौम्य अस्मिता घेऊन, छोटे छोटे हट्ट करत हि मंडळी आपला हेका घेऊन ठाम उभी असतात.
एक हट्टी तरी पण जीव लावणारा समाज आहे. यातला एखादा "दिवा" आमच्या आठ पैकी एका गळाला लागला तर आनंदच होणार आहे.

बिहारी -
हा एक अतिशय महान समाज आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण या भूमीत जन्मले. वाढले. त्यांची बरीच कारकीर्द देखील इथेच झाली. त्यामुळे यांचा ऐतिहासिक वारसा अद्वितीय आहे यात शंकाच नाही. तरी देखील आज घडीला हा भारतातला एक सर्वात मागे पडलेला समाज समजला जातो. कदाचित भगवान श्रीकृष्णाच्या आशिर्वादापेक्षा त्यांच्या नंतरच्या यादवीचा प्रभाव अधिक ताजा असावा. तरी देखील एक अत्यंत घरंदाज समाज! अर्थात या समाजातून जे लोक अमेरिकेत येतात आणि इथे स्थायिक होतात, ते कमालीचे बुद्धिमान असतात यात शंकाच नाही. टोकाची बुद्धिमत्ता, त्याच्या जोडीला कमालीची चिकाटी आणि पिंपळाच्या रोपट्यासारखी कुठेही उगवून येण्याची यांची जिद्द कमालीची आहे. हि मंडळी सर्व क्षेत्रात आहेत. अत्यंत उच्च्च पदावर आहेत. आणि कमालीची लाघवी आहेत. बिहारी माणसाशी शत्रुत्व घेणे हि माझ्या दृष्टीनं फारच अवघड गोष्ट आहे. कारण तशी वेळ ते आपल्यावर येऊच देत नाहीत. एक नितांत गप्पिष्ट, खवैय्या आणि आयुष्याच्या सगळ्या गोष्टीत रस घेऊन जगणारा समाज आहे.
यांना वावडे असलेल्या गोष्टींची यादी फार छोटी आहे. मद्य-मदिरा, धूम्रपान, तंबाखू, पत्ते, नाच, गाणे-बजावणे सगळे अगदी मनसोक्त केले जाते. उगाच "मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली" असला बनाव नाही. बहुतेक बिहारी घरांमधून हुक्का असतो. गुडगुडी असते. कॅरम बोर्ड असतो. बोरिक पावडरचा डबा असतो. भला मोठा TV आणि त्याहून मोठी म्युझिक सिस्टीम असते. इथे स्रीया अगदी बंगाली सारख्या सत्तेत नसल्या तरी त्यांचा शब्द सहसा खाली पडू दिला जात नाही. त्यांना बहुतेक समारंभात जोडीने मान दिला जातो.
बिहारी माणसाचा मुख्य छंद म्हणजे गप्पा मारणे. या गप्पात थेट श्रीकृष्णा पासून ते अगदी लालू परशादांपर्यंत कुणीही सुटत नाही. बिहारी माणसाची प्रत्येक गोष्टीवर ठाम मते आहेत. कृष्णाचे काय चुकले, अशोकाचे काय चुकले, बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ आहे इथं पासून ते राज ठाकरे कसे चुकीचे आहेत किंवा लालू प्रसाद हे कसे अवलिया पुरुष आहेत यावर त्यांची अगदी ठाम अशी मते आहेत. आमचे एक बिहारी स्नेही दरभंगा नावाच्या गावातून लहानाचे मोठे झाले. त्यांच्या बोलण्यात तर हे गाव इतक्या वेळेला येते कि काही विचारायची सोय नाही.
रेल्वे मधून प्रवास करताना तिकीट घ्यायचे असते, हा नियम फक्त महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांना लागू असून, भारत वर्षातल्या इतर सर्व राज्यात रेल्वे हि मोफत सेवा आहे असे देखील बिहारी लोकांचे ठाम मत आहे. किंबहुना शाळा कॉलेजात असताना, रेल्वेतून विना तिकीट प्रवास करत असताना, "कृपया टीकट मांग कर शरमिंदा न करें।" अशी पाटी हातात घेऊन कसे जायचो याचे किस्से बिहारी बाबूंनीच सांगावेत. एकदा तर आमच्या या स्नेह्यांनी लालू प्रसादांची त्यांच्या गावात एक सभा झाली होती त्याची मोठी हृद्य आठवण सांगितली होती. ज्या गावात सभा होती ते गाव नदीच्या पलीकडे होते. तिथे देशी हात भट्टीचा मोठा कारभार चालत असे. म्हणजे गावातील जवळ जवळ सर्वच जण त्याच एका उद्योगामध्ये काम करत असत. लालूजी नावेत बसून तिथे गेले. सभा जमली. लालूजीना कुणीतरी सांगत होते कि नदीवर जर पूल बांधला तर जाणे येणे सोईचे होईल. मुलांना शाळेत जाता येईल. महापुरात देखील नदी ओलांडून जाता येईल. याच्यावर लालूंनी मोठा नामी प्रश्न विचारला कि, "देखो भाई हम तो कबसे कह रहा हूं कि इस गाव मी पूल क्यो नाही? पर देखो भाई, अगर पूल बन जायेगा, तो पूल से पुलिस भी आ जायेगी और इ गाव का धंदा चौपट कर देगी। तो अब बताओ, कब से शुरु करना है पूल काम?" आणि मग लोकांनी ओरडून ओरडून "पूल नको" म्हणून कसे सांगितले याचा किस्सा त्यांच्याच तोंडून ऐकावा. खास बिहारी हेल काढत, समजावत समजावत सांगायची क्षमता इतर कुठल्या भाषेत असेल असे आम्हास वाटत नाही.
यांचे संगीत अलौकीक आहे. ग्रामीण भागातले संगीत थोडे फार आपल्या कडच्या पोवाड्या सारखे आहे. मर्दानी आणि माहिती पूर्ण!! खाण्या-पिण्यावर देखील यांचा स्वतंत्र असा ठसा आहे. "खाट" आणि त्या खाटेवर बसून केलेलं जेवण हा अलौकिक अनुभव आहे. गावातल्या सरपंचाला वडिलकीचा मान आहे. शिक्षणाविषयी विलक्षण तिटकारा आहे. मर्दानी खेळामध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण एकूण लोक व्यवस्थेवर एक प्रकारच्या खट्याळ पणाची छाप आहे. इतकी, कि कदाचित भगवान श्रीकृष्ण जेव्हा इथून द्वारकेला गेले तेव्हा बहुतेक ते त्यांचा सगळा खट्याळ पणा याच मातीत सोडून गेले असावेत असे वाटते.
आमच्या आठ पैकी एका गळाला बिहारी "दिवा" लागला तर आम्हाला आनंदच आहे.
गुजराती आणि मारवाडी -
देशी हॉटेल आणि देशी किराणा सामानाची दुकाने थाटून "काय ताई कसे काय? तुमचे ते काका कसे हाये आता? सोकरी कोणत्या स्कुल मंदी जाते?" वगैरे चौकशी करून आधी गिऱ्हाईकाला खिशात टाकायचे. आणि नंतर त्याचा खिसा रिकामा करून घ्यायची, हे यांचे देशी उद्योग इथेही तसेच चालू आहेत. "कुठून आले तुम्ही?" याचे उत्तर "महाराष्ट्र" असे दिले कि त्यांचे डोळे चकाकतात. कदाचित त्यांना "मोरारजी भाई", "मुंबई", "गरवी गुजरात", "संयुक्त महाराष्ट्र", "अत्रे", "शिवसेना" वगैरे असल्या अप्रिय गोष्टी एकदम आठवत असाव्यात.
बाकी हि माणसे हिशेबात चोख!! घ्यायचे पैसे कधीहि विसरणार नाहीत आणि द्यायच्या पैशाचा विषय आपणहून कधीही काढणार नाहीत. यांचं सगळं चक्र पैशाभोवती फिरत राहतं. चांगलं-वाईट ठाऊक नाही. पण हे खरं आहे.
तेलुगू लोकांप्रमाणेच हे देखील कधीच एकटे एकटे जगत नाहीत...ते नेहमी गुजराती समाज म्हणून जगत असतात. दोन तेलुगू जेव्हा एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्या चर्चेचा विषय असतो, "अमेरिकेतील नोकऱ्या".. तसे दोन गुज्जू जेव्हा भेटतात तेव्हा त्यांचा विषय असतो "अमेरिकेतील देशी ग्रोसरी स्टोर्स"...कुठल्या गावात किती देशी लोक राहतात, तिथे किती दुकाने आहेत, कुठल्या गावात अजून दुकान नाही? हि सगळी आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते. त्याच प्रमाणे पुढच्या वर्षभरात गुजरात मधून कोण कोण अमेरिकेला फॅमिली व्हिसा वर येतो आहे, त्याला कुठल्या गावात दुकान काढायला पाठवायचे? कुणाचे दुकान नीट चालत नाही? मेक्सिको वगैरे मधून अजून स्वस्तात माल मागवता येईल का? अशी त्यांची विचारचक्रे चतुरस्र फिरत असतात. त्यामुळे कधी कुठे एखादा गुजराती किंवा मारवाडी, हतबल होऊन, निराश मनाने "दुकान विकणे आहे" असा बोर्ड लावताना आम्ही तरी पाहिलेला नाही. कुणी एखादा गुज्जू भाई नुकसान मंदी छे असा सुगावा लागला कि लगेच दुसरा गुज्जू भाई त्याच्या मदत ला धावून जाते नी!! दोन महिन्यात परिस्थिती एकदम चोकस!!
आमच्या मते भारतात एक गुजराती, मारवाडी आणि तेलुगू सोडले तर अशी मुंग्यांसारखी रांगेत चालायची आणि एकमेकांच्या मदतीला धावून जायची वृत्ती इतरत्र कुठेही दिसत नाही.
अर्थात हे लोक इतर अनेक क्षेत्रात देखील आहे. पण गुजराती माणूस अगदी Ernst and Young मध्ये नाहीतर PwC मध्ये अगदी Partner जरी असला तरी आम्ही त्याला "शेठ" च म्हणत आलो आहोत. किंबहुना तेच नामाभिधान त्यांना सर्वाधिक शोभून दिसते. डॉक्टर पटेल किंवा श्रीयुत अगरवाल म्हणण्या पेक्षा पटेल शेठ किंवा अगरवाल शेठ म्हणणे अधिक संयुक्तिक वाटते. किंबहुना त्यांना देखील तेच आवडते असेही आमचे एक निरीक्षण आहे. गमतीचा भाग म्हणजे हे जरी Ernst and Young मध्ये नाहीतर PwC मध्ये Partner जरी असले, तरी बहुतेक वेळेला यांचे वडील नाहीतर काका नाहीतर मामा यांचे भावनगर मंदी भंगारचे मोठे दुकान असते. नाहीतर सुरतेला रेशमाची पेढी असते. काही काही जणांचा तर डायमंड मंदी बिजनेस असते. हे लोक आपला देश आणि तिथली पिढीजात संपन्नता सोडून इथे घाटी लोकांसोबत दारोदार नोकऱ्या शोधत का येतात हे एक मोठे कोडेच आहे. पण अर्थात त्याचे आम्हाला कौतुकही आहेच. उगाच "मराठा सरदार" म्हणून एका जागी बसून पिढ्यानपिढ्या गाद्या उबवण्यापेक्षा हे लाख पटीने चांगले!!
अर्थात हे सगळे नाजूक काम आहे. अगदी तुपात तळलेल्या इमरती सारखे!! इथे धसमुसळेपणा, रानगटपणा, रासवटपणाला अजिबात वाव नाही. त्यांची भाषाच इतकी मऊ-मऊ मखमली आहे, कि बोलताना एखादे शांत संगीत ऐकत आहोत असा भास होतो. हे लोक त्यांच्या मराठी वगैरे नोकर लोकाना रागावतात ते सुद्धा ऐकायला इतके लोभस वाटते कि हे रागावत आहेत का शाबासकी देत आहेत ते बराच वेळ कळत नाही. यांच्या टिपऱ्या घेऊन केलेल्या दांडियाची तुलना, "बल्ले बल्ले" म्हणत केलेल्या भांगड्याशी करून पहा. म्हणजे यांच्यातली नजाकत कळून येईल. हे लोक कधीही मराठी किंवा बंगाल्यांसारखे बंदुका वगैरे घेऊन "ठीश ठीश ठीश्याव" करण्यात आपला वेळ फुकट घालवत नाहीत. त्यामुळे यांच्या समाजातून सावरकर, चाफेकर, बिपीनचंद्र पाल, सुभाषचंद्र बोस, बंकिम चॅटर्जी वगैरे जहाल क्रांतिकारी न तयार होता, एकदम बापू आणि कस्तुरबा तयार होतात.
असे जरी असले तरी या लोकांचे राजकीय मत कोणाला? याचा अजिबात थांगपत्ता लागत नाही. ज्यावेळेला इथे गांधी तयार होतात, त्याच वेळेला निजामाला आणि जुनागढ च्या नबाबाला सैन्याच्या जोरावर हुसकून लावणारे सरदार पटेल हि तयार होतात. जसे सामाजिक न्यायाची हाक देणारे मोरारजी पंतप्रधान होतात तसेच प्रखर हिंदुत्वाची हाक देणारे नरेंद्रभाई देखील पंतप्रधान होतात.
अचंबा वाटतो आणि कौतुकही!!
यांच्याकडे सरस्वती पेक्षा लक्ष्मीला मान जास्त!! घरातल्या मुलींची, सुनांची नावे हमखास लक्ष्मी, धन, भरभराट, लाभ, फायदा अशा गोष्टी सूचित करत असतात. हे लोक बहुतेक एकत्र कुटुंबात राहतात. त्या घरात ५-६ भावंडे, त्यांच्या बायका, त्यांची २-३, २-३ पोरं, नोकर चाकर असं सगळं मिळून एक मोठं बारदान असतं. या घरात सुनांना फारसा मान मिळत नाही. पण या ५-६ मुलांची जी आई असते, ती सर्व सत्ताधीश असते. तिचा शब्द अंतिम असतो. बऱ्याच वेळेला हे घर परंपरावादी असते. त्यामुळे, घुंघट, बिंदी, मंगळसूत्र वगैरे सगळे यथोचित ठिकाणी पाहायला मिळते. यांच्यात एखादा मुलगा काही संगीत वगैरे शिकायला निघाला, तर त्याला त्यातून पैसे कसा मिळवशील? असा प्रश्न विचारून त्याला थंड केले जाते. म्हणजे प्रश्न पैशाचा कधीच नसतो. फक्त लक्ष्मीच्या सेवेसाठी जन्मलेला आपला एक शागीर्द सरस्वतीच्या नदी लागून हातचा जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
गुजराती जेवणाचे तर काय सांगावे!! गुजराती थाळी किंवा काठियावाडी थाळी म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे. एकाहून एक सरस (वास्तविक "सरस" हा गुजराती शब्द आहे कि मराठी यावर वाद घालून घाट्यानी रंगाचा बेरंग करू नये) भाज्या, उसळी, उंधियो, कोशिंबिरी अगदी बोट सुद्धा आत जाणार नाही अशा छोट्या छोट्या वाट्यात घालून देतात. त्या बरोबर बाजरीची भाकरी, तूप आणि गुळाचा खडा म्हणजे पाहता क्षणी प्रेमात पडावे अशी अवस्था होते. मुगाच्या डाळीची खिचडी मराठी लोक पण करतात. पण त्यांची वाढायची पद्धत म्हणजे "गिळा मुकाट्यानं पुढे बघून" असा असतो. इथे म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी म्हणजे एक पक्वान्न असून ते फक्त नशीबवंतास लाभते अशा थाटात ते कढीच्या वाटी शेजारी वाढले जाते. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे मिठ्ठास श्रीखंड!!
शरीराला सुख, मनाला शांती आणि आत्म्याला समाधान एकाच वेळी मिळवून देण्याची ताकद फक्त गुजराती आणि काठियावाडी थाळीत आहे असे आमचे मत झाले आहे.
खावे गोड, राहावे गोड,
करावे गोड, सकळ जना...
कानड्याना मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहून मूळव्याध उपटलेल्या आमच्या सारख्या घाट्याना अशा गोडा घरी एखादी लेक गेली तर ते हवेच आहे हे वेगळे सांगणे न लगे!!! जै श्रीकृष्णा!!
कानडी -
यांचे दुकान पूर्ण पणे वेगळे चालू असते. इतर भाषिकांहून हि मंडळी स्वत:ला चार आणे श्रेष्ठ समजत आली आहेत. त्यांच्या मते इतर सर्व भाषा आणि संस्कृती यांच्या पासून यांची भाषा आणि संस्कृती हि अधिक ठाशीव, उठावदार आणि प्रगल्भ आहे. त्यामुळे त्यांचे संगीत, त्यांची लिपी आणि त्यांची भाषा याचा त्यांना अतिशय ठाम आदर आहे. त्यायोगे इतर सर्वांचा ते यथोचित अनादर देखील करत असतात. यांचे कुणाशीही फारसे पटत नाही. मराठी लोकांशी कृष्णेवरून वाद, तेलगू लोकांशी पुनश्च कृष्णे वरून वाद, तामिळ लोकांशी कावेरी वरून वाद आणि केरळी लोकांशी जंगलातल्या सीमेवरून वाद!! वाद हे कानडी लोकांचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे असे आमचे मत आहे. त्यात त्यांची भाषा इतकी आघात युक्त आहे कि ते प्रेमाने जरी बोलत असले तरी आता एकमेकांचा जीव घेणार असे वाटत राहते. म्हणजे अगदी देवदास आणि पारू मधला संवाद देखील नळावरच्या भांडणासारखा वाटतो.
वास्तविक कानडी साहित्य हे सर्व भारतीय भाषांमध्ये अग्रगण्य मानले गेले आहे. एक अतिशय अभिजात अशी भाषा, तिचे व्याकरण, तितकीच अगम्य अशी लिपी त्यांना लाभलेली आहे. या भाषेचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे यांच्यात लिंग भेद केला जात नाही. आमचे एक मराठी स्नेही आहेत ज्यांची अर्धांगिनी कानडी आहे, त्यांना एकदा दुपारी फोन केला होता. स्नेह्यांचा अंमळ डोळा लागला होता. म्हणून त्यांच्या कानडी औव्वेने फोन उचलला. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे कशाला उगाच त्रास म्हणून उचलला असेल वहिनींनी फोन. वहिनींनी नुकतेच मराठी शिकायला घेतले होते. त्यांनी फोन उचलला आणि म्हणाल्या, "नमस्कार्री सरी".. आम्ही म्हणालो, "नमस्कार नमस्कार वाहिनी.. काय म्हणताय? आहे का सचिन?" त्यावर वाहिनी जे बोलल्या त्याने आमची दातखीळच बसली. वाहिनी म्हणाल्या, "मी मजेत असतंय बगा की. सचिन नव्हे? ते झोपलंय बगा यिळसरी!!"... "सचिन झोपलंय?" स्वत:च्या नवऱ्याला अरे-तुरे म्हणणे इथे पर्यंत आम्ही पण मॉडर्न आहोत. पण म्हणून त्याच्या विषयी नपुंसकलिंगी क्रियापद ऐकून आम्हाला अक्षरश: घाम फुटला होता.
कानडी संगीत हे देखील तितकेच अभिजात आहे. त्यांचे राग वेगळे, स्वर वेगळे, श्रुती वेगळ्या, ताल वेगळे, मात्रांची ठिकाणे वेगळी, माधुर्याच्या व्याख्या वेगळ्या!! सर्व काही वेगळे!! हिंदुस्थानी म्हणून जे काही आहे, त्याच्याशी उभा दावा मांडून तितक्याच समर्थपणे उभी असलेली हि एक प्राचीन संस्कृती आहे. हे कितीही जरी खरे असले तरी कानडी मातृभाषा असलेले आणि केवळ आपल्या तानेवर भारतरत्न पदाला पोचलेले पंडित भीमसेन जी कदाचित या उग्रट पणाला कंटाळूनच मराठीत रमले असावेत.
कानडी घरातून बहुतेक वेळेला पुरुष प्रधान संस्कृती असते. तसे जरी असले तरी कानडी वहिनी, यांना "औव्वा" म्हणतात, तर या औव्वा" या अतिशय खमक्या स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांचे परिस्थितीवर अतिशय चांगले नियंत्रण असते. बहुतेक कानडी घरातून राघवेंद्र स्वामींचा एक तरी फोटो असतोच. त्याच्या समोर तप्त मुद्रांकित असे वैष्णव कानडी अण्णा, भले मोठे दुबोटी गंध ओढून, अंगावर ठीक ठिकाणी गंधाचे पट्टे ओढून, जानवं हातात घेऊन जोर जोरात विष्णू सहस्त्रनाम म्हणत बसलेले असतात. इथे सोवळे-ओवळे अतिशय कडक!! तडजोड खपवून घेतली जात नाही. आम्हाला तरी असेच वाटत आले आहे कि "तडजोड" या शद्बाला समानार्थी शब्दच कानडी मध्ये नसावा.
एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावी लागेल ती म्हणजे कानडी जेवणाची!! कानडी औव्वेच्या हातात साक्षात अन्नपूर्णा राहते असे आमचे मत आहे. काय एकेक एकाहून एक अप्रतिम पदार्थ केले जातात. अळुच्याच भाजीचे १०-१२ तरी प्रकार करतात. सुकवलेल्या डाळीचे वाटण, हिरव्या मिरच्या वाटून केलेली पीठ लावलेली भाजी, डाळीच्या पिठाचे गोळे घालून केलेली गवारीच्या शेंगांची भाजी, पांढरा सुट्टा सुट्टा भात, त्याच्यावरचे गूळ घातलेले वरण!! याच्या इतके सुंदर जेवण स्वर्गात देखील मिळत नसेल!! आणि विशेष म्हणजे या जेवणाचा वास पुढचे कित्येक दिवस जात नाही आणि आठवणी तर कित्येक वर्षे!!
पण का कुणास ठाऊक, कानडी घरात लेक द्यायची म्हणजे जरा छाती दडपून जाते. आमच्या आडनावातील "कर" पाहून तर काही काही कन्नडिगांच्या बोटातल्या अंगठ्या देखील घट्ट झालेल्या आम्ही पाहिले आहे. अशी माणसे संभाषणाची सुरुवातच मुळात "आता विसरून जावा बगा बेळगाव तुमी!!" अशा अस्मितेला हात घालणाऱ्या वाक्याने करत असतात. त्यांचा तो अजागळ अवतार बघून मग आम्ही देखील छत्रपतींचे, एन. डी. पाटलांचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे स्मरण ठेवून "भालकी, बिदर, बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!" हि आरोळी (मनातल्या मनात) देऊन आमचे मराठीपण आणि लढाऊ बाणा जपत आलेलो आहोत.
त्यात आता कृष्णेवरच्या अलमट्टी नामक धरणाने आमची वडिलोपार्जित जमीन दर वर्षी पाण्याखाली जायला लागली आहे. पाव एकराचा, वाडवडिलांनी कसलेला जमिनीचा तुकडा, दर वर्षी पाण्याखाली जात असताना, पहात राहण्याशिवाय आम्हाला दुसरे काहीही करता येत नाही. त्यामुळे कुठेही कानडी दिसला कि त्याला याचाही जाब विचारण्याचा मोह आवरता आवरत नाही.
"आता बघाच तुम्ही कानड्यानो...सुप्रीम कोर्टात केस चालू आहे म्हणून जास्त बोलत नाही. नाहीतर दाखवला असता तुम्हाला मराठी हिसका!!" वगैरे वाक्ये मनात जुळवत बसलेलो असतो. ती बोलायचा संकल्प सिद्धीला जायच्या आतच आम्हाला आमच्या अष्ट कन्यांची आठवण होऊन आम्ही आमची अदृश्य तलवार म्यान करत आलेले आहोत.
पंजाबी -
हे लोक भारतात ट्र्क चालवतात आणि अमेरिकेत पेट्रोल पंप!! वास्तविक दोन्ही व्यवसाय हि मंडळी एकाच देशात का करत नसावीत हा देखील आम्हाला न उलगडलेला प्रश्न आहे. पण बंगाल्यांप्रमाणे हे लोक देखील फाळणीचे खूप मोठे ओझे घेऊन अमेरिकेत आलेले असतात. अमेरिकेत अनेक क्षेत्रात त्यांचा वावर आहे. यातले बहुतेक लोक शीख धर्माचे असून, ते कितीही शिकले, सवरले तरी एक धार्मिक बाब म्हणून, ते दाढी आणि केस राखतात. आमची त्या बद्दल काहीच तक्रार नाही. पण बहुतेक गुरु गोविंद सिंगांनी काही वेगळेच सांगितले असावे आणि यांनी काही वेगळेच ऐकले असावे असे आम्हाला कायमच वाटत आले आहे. कदाचित गुरु गोविंद सिंग जी म्हणाले असतील कि "सीखो और बल बढाओ" आणि यांनी ऐकले कि "शिखो और बाल बढाओ".. असो.
पण माणसे सोन्या सारखी असतात हे खरेच!! आपण कुणाच्या तरी उपयोगाला पडले पाहिजे यावर त्यांचा सगळा भर असतो. हे करत असताना, ते भान हरपून जातात. मागे मी एकदा कॅब केली होती तिचे सारथ्य एक सरदार जी करत होते. प्रचंड गर्दी होती. बहुतेक सगळ्या लेन मध्ये गाड्या जवळ जवळ थांबलेल्याच होत्या. अर्थात मलाही काहीही घाई नव्हती. पण सरदारजींना होती. त्यांनी हळू हळू एग्झिट च्या लेन मध्ये गाडी आणली आणि जोरात दामटली. मी हादरलोच. म्हटले, "प्राजी, अराम से जायेंगे. कोई जल्द नही।".. तर प्राजी मला जवळ जवळ रागावलेच. "सर जी, आप हमे मत सिखावो जी। आप पीछे अराम करो। बाकी हम है।".. वास्तविक पोलिसांनी बघितलं असतं तर या प्राजीना भक्कम तिकिट लागलं असतं. पण त्याचं त्यांना काहीही भय नव्हतं. परिस्थिती हातात घेऊन त्याच्यावर मालकी गाजवायची यांची खोड फार प्राचीन आहे. मग भले त्याच्यात त्यांचे नुकसान झाले तरी त्याची यांना पर्वा नसते. बघता बघता हजारो गाड्यांची गर्दी पालथी घालून मोजून १० मिनिटात यांनी घरी आणून सोडलं. पण त्यांचा एकूण अवतार बघून आमचीच त्यांना परत आज पर्यंत सारथ्याला बोलावण्याची हिम्मत झालेली नाही.. "तुसी ग्रेट हो प्राजी"...
पंजाबी जेवण म्हणजे तर "त्वाडा ज्वाब नही पुत्तर!!". मक्के दि रोटी आणि सरसों दा साग तो बस नसीब वालों दा मिले है। अजवन वाले प्राठे, अम्रीत्सरी कुल्चे आणि दाल मखनी हि तर खाण्याच्या पदार्थांची नावे नसून, स्वर्गातल्या अप्सरांची नावे आहेत असेही आमचे मत आहे. काय अदभूत स्वाद!! आणि त्यापेक्षा हे जेवण खिलवणाऱ्या भाभीजीची तर काय गोष्ट सांगावी!! इथे नाजूकपणाला वावच नाही. सगळा "घे मार आणि दे ठाय" प्रकार!! इतक्या प्रेमाने आणि आग्रहाने, मी तर म्हणेन हक्काने, दुसरीकडे कुठे जेवायला घालत असतील असे आमच्या तरी ऐकिवात नाही.
बाकीचे जेवू घालतात तर कुणी जेवण वाढतात. पंजाबी भाभी मात्र जेवण "खिलवतात"..फार फरक आहे. जी गोष्ट पंजाबी घरातल्या जेवणाची तीच गुरुद्वाऱ्यातल्या लंगरची!! सगळे स्वयंसेवक फुकट दिवस रात्र राबत असतात. कुणी तुमचे काढलेले बूट पोलिश करून ठेवतो. कुणी पाय पुसायला टॉवेल धरून उभा असतो. "सेवा" या शद्बाचा अर्थ समजावून घायचा असेल तर काही वेळ गुरुद्वाऱ्यात जाऊन राहावे असे आमचे मत आहे.
नाच, गाणे, बजावणे यांनी पंजाबी माणूस बेधुंद होऊन जातो. प्रसंग कुठलाही असो. फेर धरून एक भांगड्याचा झोल केल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. आणि गम्मत म्हणजे पंजाबी माणूस तामिळ किंवा केरळी मित्रांच्या लग्नांत देखील नाचताना भांगडाच करतो. आता त्या बिचाऱ्या तामिळ किंवा मल्लूनी, पांढरी शुभ्र लुंगी लावून भांगडा कसा करावा हा देखील आम्हाला पडलेला प्रश्नच आहे. तामिळ किंवा मल्लू माणसाला भांगडा करायला लावणे म्हणजे करकोच्याला बशीतून सूप प्यायला दिल्यासारखेच आहे!!
पण पंजाबी माणूस आत कुठेतरी दुःखी असावा असे वाटते. कदाचित दुलिपसिंगानी, व्हिक्टोरिया राणीला देऊन टाकलेल्या "कोहिनुर" हिऱ्याच्या आठवणीने त्याचे मन शोकाकूल होत असेल. कदाचित १८५७ मध्ये लाल किल्ल्याच्या लाहोर दरवाज्यावर बहादूर शहा जफरच्या स्वातंत्र्य सैनिकांवर, केलेल्या दुर्दैवी गोळीबाराच्या आठवणीने तो कष्टी होत असेल. कदाचित ते फाळणीचे दुःख असेल. पाकिस्तानात गेलेल्या गुरु नानकजींच्या गुरुद्वाऱ्याची आठवण येत असेल. ज्या गावावर जीवापाड प्रेम केलं ते "लाहोर" एका क्षणात कायमचं तुटलं याचंही दुःख असेल. कदाचित इंदिराजींच्या प्रसंगाचे वाईट वाटत असेल. जनरल अरुणकुमार वैद्यांविषयी काही मत मतांतरे असतील. कदाचित पंजाबातल्या व्यसनी आणि दिशाहीन युवकाकडे पाहून त्याला रडू येत असेल. काहीतरी आहे खास!! मला तरी प्रत्येक हसता खेळता पंजाबी आत कुठेतरी कण्हत असल्यासारखाच दिसतो.
वाघाचं काळीज आहे, म्हणून तर नियतीचे इतके बेभान फटके त्यांना सोसता आले आहेत. इतर कुणी असता तर त्याचा जगण्यावरचा विश्वास कधीच उडून जायचा!!
यातलच एखादं वाघरू आमच्या आठ पैकी एका गळाला लागलं तर आम्हाला आनंदच होणार आहे.
इतर भाषिकांचा शोध सुरूच ठेवणार आहे. भारतातच राहिलो असतो तर कदाचित कुंडली, गोत्र, नाड, जात हे बघून, तेवढ्याच वर्तुळात हे आठही नग खपवून मोकळा झालो असतो कदाचित!! ४-२ कुलकर्णी, ४-२ देशपांडे आणि उरलेले जोशी जावई करून, पडणाऱ्या वाड्यात, पडून राहिलो असतो झालं...
आपल्याच देशात इतक्या प्रकारचे जावई मिळू शकतात याचा "जावईशोध" खरे तर अमेरिकेत आल्यावरच लागलेला आहे. त्यामुळं अमेरिकेचे मनापासून आभार!!
कोणता जावई कधी आणि कितव्या क्रमांकाला मिळेल यावर खरे तर आमचे काहीच नियंत्रण नाही. चांगल्या वाईटाचाही हा प्रश्न नाही. आपण फक्त बघत राहायचं. कोण मिळालं तर काय होईल याची चौकट आधीच आखून घ्यायची इतकंच!!
शेवटी "ईश्वरेच्छा बलियसी"!! काय म्हणता?