Monday, April 16, 2018

प्रत्येकाचा क्षण

गेल्या वसंताच्या आठवणीने कष्टी होऊन, अविरत निश्चलतेनं, चैतन्यहीन होऊन, आपल्याशीच कुढत बसलेल्या, पायाखाली स्मशानातील भुतांच्या गुंतवळी प्रमाणे अविरत घुटमळत राहणाऱ्या अतीशीत अशा पयाचा मनस्वी तिटकारा येवून, निळ्याशार आकाशातून, खाली पृथेचा उत्सव पाहात उभ्या असलेल्या, बघ्या वृत्तीच्या जलधींना, आपल्या असंख्य पिंजारलेल्या हातांनी लहलहा करून हुसकावून देवून, आपल्या अशा निर्वस्त्र, बेढब आणि कुरूप अशा अस्तित्वाकडे कुणीही पाहू देखिल नये अशा इर्षेने, एखाद्या क्रुद्ध आणि शापीत समंधासारख्या संत्रस्त झालेल्या, तळ्याकाठच्या या आत्ममग्न वृक्षाला कल्पना तरी आहे का की, त्याच्याच पायाशी, शिशिराच्या कडाक्यात देखिल हिरवट खुरट गवताच्या पात्यांवर सूर्याचे कण होऊन बहरलेली ही पिवळसर फुले, जणू त्यांच्या स्वर्गीय पाकळ्यांच्या क्षणिक अस्तित्वाचा सोहळा अनाहूतपणे साजरा करत, वाऱ्याच्या प्रत्येक तरंगाला सोबतीला घेत, स्वत:ला आकाशाच्या कुशीत आश्वस्त होऊन मनसोक्त झोकून देत आहेत? की ज्या तळ्याच्या थेंबांवर ही इवलीशी सृजनाची प्रतिके उमटली, त्या थेंबांना सूर्याकडून उसने घेतलेले हळदीचे वाण देवून, आपल्या जडत्वहीन बहराचे शिंपण घालत, कृतकृत्य होऊन आलिंगन देत आहेत?

प्रत्येक क्षण तर वेगळा आहेच. पण कदाचित प्रत्येकाचा क्षण हा त्याहूनही वेगळा आहे..

~ निखिल कुलकर्णी



सहवासी

मंतरलेल्या प्रत्येक सकाळी, नव्या लाटा घेवून जुनेच प्रश्न परत परत विचारत का बसलेला असतोस त्याच मुक्या आकाशाला, कधीतरी बोलेल आकाश तुझ्याशी तुझ्या अस्तित्वाविषयी असे वाटून? खरेतर प्रत्येकाचेच अस्तित्व स्वत:ला निर्गुण करुणे मधे शोधत बसलेले असते अहोरात्र, वाळूच्या एकेकट्या कणांसारखे, अथांग अपरंपार निष्ठेने...एवढी साधी गोष्ट तुला कळू नये?

एकेक थेंब मिळून झालेला अजस्त्र थेंब ही तुझ्या कुरूप अस्तित्वाची ओळख तुला पुरेशी नाही का? आणि काय करायचे आहे तुला तुझ्या जन्माचे गुह्य ऐकून? अरे त्या निराकार आकाशा सारखा तुझा जन्म देखिल अपरंपार असहायतेतूनच झाला असेल कदाचित. तुझ्या जन्मासाठी कुणीही कसलाही यज्ञ केला नसेल किंवा तुझ्या जन्माचा कुणी कुठेही उत्सव देखिल साजरा केलेला नसेल. कदाचित पृथेचा लाडका चंद्र जेव्हा रागाच्या भरात तिला सोडून कायमचा निघून गेला असेल त्या दिवशी अशाच ब्राम्हमुहूर्तावर ती रडली असेल एकटीच काळ्या कुट्ट अंधारात, गोठ्यातल्या वासरू हरवलेल्या गाई सारखी, सूर्याची चाहूल लागण्यापूर्वी, ताऱ्यांच्या संगतीत रमलेल्या आपल्या लाडक्या कोरीतल्या चंद्राकडे पहात आणि भरली असेल तिची रिती ओटी तिच्याच अथांग अश्रुंनी..या अपार दु:खाची आठवण म्हणून वागवत असेल ती तुला तिच्या अंगाखांद्यावर अपार करुणेने. त्याची थोडी तरी आठवण ठेव कृतघ्ना आणि थांबव ते भयंकर निष्ठूर आसूड...सहवासी हो, प्रगल्भ हो, प्रशांत हो..आकाशासारखा..

~निखिल कुलकर्णी


दैवी: स्वस्तिरस्तुन:

आकाशाशी स्पृहा करणाऱ्या काळ्या कभिन्न कड्यावरच्या एकुटक्या धारेतल्या उगमापासून, ते सहस्त्र भुजांनी अजस्र सागराला उत्कट आलिंगन देणारी, शीतोष्ण पयाच्या अगणित बिंदूंनी काढलेली, अनेकानेक गहीवरांनी, उन्मादांनी, प्रपातांनी आणि कल्लोळांनी काठोकाठ भरलेली एक रेघ. ही रेघ त्यातल्या पाण्याइतकीच अखंड होऊन, उगमा इतकाच उत्साह घेऊन अव्याहत वाहात राहते, महादाना पर्यंत..

धारोष्ण उग्रट ज्वालामुखीच्या संगतीने अहंकाराच्या गर्तेत आकंठ बुडालेल्या, नाही तर कदाचित नभांगणातला एखादा स्वयंप्रकाशी तारा होण्याचं स्वप्न कायमचं भंगल्याने, निराशेच्या गर्तेत थिजून, अकालीच प्रौढत्वात गेलेल्या जडत्वाच्या ठिपक्यांना, ती अहोरात्र ऐकवत राहते शैशवाचे गान, तांबड्या रिबीनी लावलेल्या परकरातल्या पोरीसारखी, उत्शृंखलपणे गजग्यांचा खेळ खेळत हातातल्या बांगड्यांची अविरत किणकिण करत, अगदी ठिपक्यांच्या अंतापर्यंत..

या क्षणांची आठवण म्हणून नेते ती सोबत त्या ठिपक्यांचे काही कण गाठीला बांधून आणि मग आपल्याच आनंदात हरकून दिसू लागते नवयौवनेसारखी अधीर, आसक्त तरीही अव्यक्तच. हा जडत्वाचा समागम वाढवत राहतो तिचा आवेग क्षणाक्षणाने आणि अलगद एखाद्या प्रपातावर, अनावर होत देहाची कुरवंडी करून झोकून देते ती स्वत:ला बेफाम, बेलगाम, बेफिकीर होत आकाशाच्या प्रतलावर, अनावर विश्वव्यापी ओढीने. आणि मग जिवंत होतो तिचा प्रत्येक कण, आकाशाला धरून हिंदोळताना आणि स्वत:च्याच अस्तित्वाची ओळख विसरून स्वच्छंद विहार करू लागतो, यथेच्छ रानवारा पिऊन कळपाचे भान सुटलेल्या चौखूर उधळलेल्या वासरा सारखा..

गुरूत्वाच्या प्रभावाने जशी ही धुंदी उतरते तेव्हा हे अवखळ बाष्पाचे वारू परत एकदा निर्गुण निराकार होत आकाशाची संगत सोडून धरेला जावून बिलगतात आणि निष्पाप होउन करू लागतात सलगी, त्याच साकळलेल्या ठिपक्यांच्या कणांशी आणि चालू लागतात आपल्याच धुक्याचा पदर डोक्यावरून ओढून घेत, समाधिस्त अस्तित्वाच्या संगतीने, चिरकालासाठी..

भेटतात तिला वाटेत काहीएक जीवांची कोंडाळी, घाटांवरच्या आपल्याच जळमटात रमलेली. येत राहतात त्यांचे कृतघ्न हात आणि जिव्हा, अनभिषिक्त रिक्तता घेऊन, जन्मभराची. ती मात्र पुरवत राहते त्यांची तृषा, जो जे वांछील तो ते लाहो असे माऊलीचे काळीज घेऊन..

एखाद वेळी तिच्या कुशीत आकंठ डुंबणारी पोरं पाहून हसते स्वत:शीच, कड्यावरचं तिचे शैशव आठवून आणि मोहरून उठते परत एकदा आपल्याच सृजनाच्या जाणिवेने. भरलीच कोणी ओटी तर लावून घेते हळदी कुंकवाचे ठसठशीत डाग कपाळावर आणि ठेवून घेते चार तांदूळ, तिच्या, देवळांच्या गोपूरांच्या नक्षांनी आणि नंदीच्या घंटांनी सजलेल्या, हिरव्यागार पाचूच्या पदरात..

कधी आकाशात दूरवर, उंच उंच गेलेल्या, तिच्या कर्तबगार लेकुरवाळ्यांची, निरतिशय कौतुकाने, पुसत राहते वास्त, त्यांच्या, जमिनीच्या अंतरंगात खोलवर गेलेल्या पायाशी बसून, त्यांना ठिपक्यांचे लिंपण लावत आणि विसावते त्यांच्याच विशाल सावल्यांमधून माध्यान्हीची धाप टाकत पळभरासाठी..

परत पुन्हा एकदा उत्फुल्ल मनाच्या, संध्येच्या अविरत ओढीने, तिची पाऊले चालू लागतात अनामिक अगांतुकपणाने, जडावलेला देह घेऊन, अस्ताच्या दिशेने प्रशांताच्या दर्शना साठी. आणि तिचे असंख्य हात आतूर होतात मावळत्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या अखंड महादानासाठी..

उगमा पासून फक्त देतच आलेली ही चिरभरीता सरीता, सर्वव्यापी सागराला देखिल अर्पण करत राहते आपले स्नेहल अस्तित्व, बळीसाठी वेदीला बांधलेल्या अनंत पुरूखासारखे..

तिच्या यज्ञवेदीवरून, कधीच कुणी रीतं जात नाही.. जलधी सुद्धा...

शेवटच्या महादाना वेळी आकाशीचे गंधर्व गात राहतात कल्याणाचे महासूक्त, दैवी: स्वस्तिरस्तुन:, स्वस्तीर्मानुषेभ्य: ...

~निखिल कुलकर्णी



मोरपीस

मोरपीसाला वय नसतच मुळी. असतात त्या असंख्य आठवणी, अमुक्त आणि अनुत्तरीत. आठवणी अमुक्त आहेत की त्या धारण करणारे मन हा मोठाच प्रश्न आहे. पण एखादं मोरपीस मनाच्या अथांग विवरात आठवणींचे तरंग उठवत राहतं, सागराच्या लाटांसारखे, अलगद, अनाहत, अविरत..

वास्तविक ती निघून गेली त्यालाही बरीच वर्षे झाली. तसं तीचं म्हणून काही त्याच्या जगात राहीलेलं देखिल नाही फारसं. तिचे आवाज ऐकू येत नाहीत की तिचे श्वास देखिल जाणवेनासे झाले आहेत कधीपासूनच. आणि तो देखिल तिचे काहीच देणे लागत नाही अशाच अहंकारात दिवसामागून रात्री गुंतवत चालला आहे, अजस्त्र दिशाहीन अर्गलेसारख्या, वर्तमानाच्या अर्वाच्य कोलाहलात..

पण असतं एखादं मोरपीस थांबलेलं, एखाद्या पुस्तकात, अंधारलेल्या धुळकट माळ्यावर, एकटच, निपचीत, तिच्याच आठवणींची संगती लावत बसलेलं. लागलंच कधी ते पुस्तक हाताला, तर त्याच्या हळूवार केसांना चिकटलेल्या असंख्य आठवणी जाग्या होत जातात, एका मागून एक, नागीणीसारख्या, लहलहा करत, मनांतल्या अंधारलेल्या कोपऱ्यातून आणि वर्तमानाचा आसमंत भूताच्या रंगांनी माखून जातो संध्याकाळच्या भळभळीत आभाळासारखा, आरक्त, आसक्त तरीही अव्यक्तच..

सूर्य अज्ञाताला निघून जाणार या कल्पनेने धरती कासावीस होते अंतर्बाह्य. हरेक संध्येला, पिळवटून निघते तिचे अंत:करण विरहाच्या जाणिवेने अस्वस्थ होऊन, संध्यामग्न मित्राच्या ओढीने..

तिच्या भाबड्या मनाची अवस्था, मायावी मारिचयाला विशद करण्याचा मोह, आवरत नाही त्या सर्वव्यापी आकाशाला. आणि मग आकाश त्याचे दिव्य कण, असे अनंत हस्तानी, मुक्तपणे उधळून टाकते आसमंतात, जशा रंगीबेरंगी अक्षतांच्या सरीच पडत राहतात, विचारमग्न तरीही खिन्न, पृथेच्या सर्वांगावर एकामागून एक, अनंत, अगणित, अविरत..

भयाण वाटणाऱ्या शांततेला, घराच्या ओढीनं लगबगीनं उडत चाललेले खग त्यांच्या अस्फुट फडफडीचे संगीत देत निष्ठूर हिरण्यगर्भाची विनवणी करत राहतात केविलवाणी, क्षितीजाच्या रेषेवरून. तरी देखिल तो आदित्य अदृष्यच होत जातो वर्तमानाच्या पानावरुन पुढे...

आकाशानी टाकलेल्या या अक्षता हे मोरपीस गोळा करून साठवून ठेवतं त्याच्या रंगीबेरंगी डोळ्यात आणि जिवंत ठेवतं तो विरहाचा विहंगम सोहळा शतजन्मांतरी पुनर्भेटीच्या पळापर्यंत. त्या सोहळ्याचे सूर वर्तमानाचे कोलाहल शांत करत राहतात आणि परत एकदा पृथ्वीचे अंतरंग उमटू लागतात पाण्यावर तरंगणाऱ्या भास्कराच्या डोळ्यांतून...

~निखिल कुलकर्णी



गाज

जडत्वाची प्रौढी मिरवत धरतीचे दूत, सागराला आव्हान देत अखंड उभेच असतात, अव्याहत पणे.
तितक्याच स्पृहेने सागर देखिल आपल्या अगणित करांनी या धरतीच्या दूतांना खेळवत बसलेला असतो. आणि प्रत्येक क्षणाला जलाच्या प्रवाही वृत्ती पुढे धरतीचे जडत्व झीजत जात राहते.
सागराला चिरतारूण्याचे वरदान आहे. त्याला भेदाचा शापही नाही आणि वेळेचे बंधन सुद्धा. त्याचा प्रत्येक थेंब हे चिरतारूण्य घेऊन, अखंड होवून, अभेद्य होऊन नाचत राहतो अनादी कालापर्यंत निष्पाप, निर्व्याज मनाने!!
वास्तविक ज्या धरेने संपूर्ण सागराला धारण केले, त्या धरेचे हे सागराने केलेले कृतकृत्य पादप्रक्षालन आहे की आकाशात दूरवर निघून गेलेल्या चंद्राच्या ओढीने संतप्त होऊन केलेले निश:ब्द आक्रमण, हे सागरा इतकेच प्रशांत असे कालातीत गूढ आहे.
इवली इवली पाखरे त्यांच्या बोटभर पंखात मावेल तेवढं, चिमूटभर आकाश साठवून सागरावरून उडत जातात. तरी सागरापेक्षा त्यांचा जीव आकाशाच्या अथांगतेत जास्त रमत असावा. कधी लागलीच एखादी धाप, तर टेकवतात त्यांची करडी पाऊले त्या दूतांच्या अंगाखांद्यावर. पण ती देखिल या दूतांना सागराविषयी कधीच काहीच सांगत नाहीत. क्षणिक एक मूक साक्ष ठेवून, शेवटची भेट घेत असल्यासारखा कटाक्ष टाकत, आकाशातल्या अनंताकडे निघून जातात. त्यांच्या सावल्यांची रांगोळी दूतांच्या अंगावर काही क्षण उमटते दूतांच्या भविष्यासारखी आणि पुन्हा नाहीशी होते.
पाण्यातल्या माशांची देखिल काही वेगळी स्थिती नसते. क्षणिक पाण्याच्या पृष्ठावर येवून ते बिचारे एखाद क्षण किनारा न्याहाळत असतील देखिल. पण लगेचच, सूर्याच्या तेजाची अंगावर पडलेली चांदणी पाहून, दिपून जात, परत एकदा विहंगम लाटेत तोल जावून समतल अनंतात अदृश्य होत राहतात.
नाही म्हणायला सागरातल्या मृत वनस्पती थांबतात घटकाभर किनाऱ्याची वास्त पुसायला. कदाचित प्रशांत सागराच्या अंतरंगातली अविरत घुसमट, किनाऱ्यावर स्तब्ध उभ्या असलेल्या दूतांना त्या सांगत देखिल असतील त्या घटकेत. पण सागरावर धरेने केलेल्या उपकरांचे उन्मत्त वारे प्यायलेल्या त्या भ्रमिष्ट दूतांना ते निर्वाणीचे आर्त स्वर ऐकू तरी येत असतील का?
पुढच्याच लाटेत, आपले गुह्य उघड होण्याच्या अनामिक भीतीने सागर त्या मृत वनस्पतींना देखिल परत आपल्या अथांगात ओढून घेत राहतो हापापल्यासारखा.
अनिमिष नेत्रानी, सागरा सारखेच विशाल, निवळशंख तरीही हतबल आकाश, सागराला थोपवत राहते एका बाजूने. सूर्य आणि चंद्र हा अविरत योग फक्त पहात राहतात त्रयस्था सारखे, अस्फुट, अविचल!!
आता सागराची गाज सोडली तर इथे कुणीही कुणाला काहीच सांगू शकत नाही. धरतीचे दूत झीजतच राहतात अंता पासून अनंता पर्यंत...

~निखिल कुलकर्णी