Monday, April 16, 2018

मोरपीस

मोरपीसाला वय नसतच मुळी. असतात त्या असंख्य आठवणी, अमुक्त आणि अनुत्तरीत. आठवणी अमुक्त आहेत की त्या धारण करणारे मन हा मोठाच प्रश्न आहे. पण एखादं मोरपीस मनाच्या अथांग विवरात आठवणींचे तरंग उठवत राहतं, सागराच्या लाटांसारखे, अलगद, अनाहत, अविरत..

वास्तविक ती निघून गेली त्यालाही बरीच वर्षे झाली. तसं तीचं म्हणून काही त्याच्या जगात राहीलेलं देखिल नाही फारसं. तिचे आवाज ऐकू येत नाहीत की तिचे श्वास देखिल जाणवेनासे झाले आहेत कधीपासूनच. आणि तो देखिल तिचे काहीच देणे लागत नाही अशाच अहंकारात दिवसामागून रात्री गुंतवत चालला आहे, अजस्त्र दिशाहीन अर्गलेसारख्या, वर्तमानाच्या अर्वाच्य कोलाहलात..

पण असतं एखादं मोरपीस थांबलेलं, एखाद्या पुस्तकात, अंधारलेल्या धुळकट माळ्यावर, एकटच, निपचीत, तिच्याच आठवणींची संगती लावत बसलेलं. लागलंच कधी ते पुस्तक हाताला, तर त्याच्या हळूवार केसांना चिकटलेल्या असंख्य आठवणी जाग्या होत जातात, एका मागून एक, नागीणीसारख्या, लहलहा करत, मनांतल्या अंधारलेल्या कोपऱ्यातून आणि वर्तमानाचा आसमंत भूताच्या रंगांनी माखून जातो संध्याकाळच्या भळभळीत आभाळासारखा, आरक्त, आसक्त तरीही अव्यक्तच..

सूर्य अज्ञाताला निघून जाणार या कल्पनेने धरती कासावीस होते अंतर्बाह्य. हरेक संध्येला, पिळवटून निघते तिचे अंत:करण विरहाच्या जाणिवेने अस्वस्थ होऊन, संध्यामग्न मित्राच्या ओढीने..

तिच्या भाबड्या मनाची अवस्था, मायावी मारिचयाला विशद करण्याचा मोह, आवरत नाही त्या सर्वव्यापी आकाशाला. आणि मग आकाश त्याचे दिव्य कण, असे अनंत हस्तानी, मुक्तपणे उधळून टाकते आसमंतात, जशा रंगीबेरंगी अक्षतांच्या सरीच पडत राहतात, विचारमग्न तरीही खिन्न, पृथेच्या सर्वांगावर एकामागून एक, अनंत, अगणित, अविरत..

भयाण वाटणाऱ्या शांततेला, घराच्या ओढीनं लगबगीनं उडत चाललेले खग त्यांच्या अस्फुट फडफडीचे संगीत देत निष्ठूर हिरण्यगर्भाची विनवणी करत राहतात केविलवाणी, क्षितीजाच्या रेषेवरून. तरी देखिल तो आदित्य अदृष्यच होत जातो वर्तमानाच्या पानावरुन पुढे...

आकाशानी टाकलेल्या या अक्षता हे मोरपीस गोळा करून साठवून ठेवतं त्याच्या रंगीबेरंगी डोळ्यात आणि जिवंत ठेवतं तो विरहाचा विहंगम सोहळा शतजन्मांतरी पुनर्भेटीच्या पळापर्यंत. त्या सोहळ्याचे सूर वर्तमानाचे कोलाहल शांत करत राहतात आणि परत एकदा पृथ्वीचे अंतरंग उमटू लागतात पाण्यावर तरंगणाऱ्या भास्कराच्या डोळ्यांतून...

~निखिल कुलकर्णीNo comments:

Post a Comment