Monday, April 16, 2018

गाज

जडत्वाची प्रौढी मिरवत धरतीचे दूत, सागराला आव्हान देत अखंड उभेच असतात, अव्याहत पणे.
तितक्याच स्पृहेने सागर देखिल आपल्या अगणित करांनी या धरतीच्या दूतांना खेळवत बसलेला असतो. आणि प्रत्येक क्षणाला जलाच्या प्रवाही वृत्ती पुढे धरतीचे जडत्व झीजत जात राहते.
सागराला चिरतारूण्याचे वरदान आहे. त्याला भेदाचा शापही नाही आणि वेळेचे बंधन सुद्धा. त्याचा प्रत्येक थेंब हे चिरतारूण्य घेऊन, अखंड होवून, अभेद्य होऊन नाचत राहतो अनादी कालापर्यंत निष्पाप, निर्व्याज मनाने!!
वास्तविक ज्या धरेने संपूर्ण सागराला धारण केले, त्या धरेचे हे सागराने केलेले कृतकृत्य पादप्रक्षालन आहे की आकाशात दूरवर निघून गेलेल्या चंद्राच्या ओढीने संतप्त होऊन केलेले निश:ब्द आक्रमण, हे सागरा इतकेच प्रशांत असे कालातीत गूढ आहे.
इवली इवली पाखरे त्यांच्या बोटभर पंखात मावेल तेवढं, चिमूटभर आकाश साठवून सागरावरून उडत जातात. तरी सागरापेक्षा त्यांचा जीव आकाशाच्या अथांगतेत जास्त रमत असावा. कधी लागलीच एखादी धाप, तर टेकवतात त्यांची करडी पाऊले त्या दूतांच्या अंगाखांद्यावर. पण ती देखिल या दूतांना सागराविषयी कधीच काहीच सांगत नाहीत. क्षणिक एक मूक साक्ष ठेवून, शेवटची भेट घेत असल्यासारखा कटाक्ष टाकत, आकाशातल्या अनंताकडे निघून जातात. त्यांच्या सावल्यांची रांगोळी दूतांच्या अंगावर काही क्षण उमटते दूतांच्या भविष्यासारखी आणि पुन्हा नाहीशी होते.
पाण्यातल्या माशांची देखिल काही वेगळी स्थिती नसते. क्षणिक पाण्याच्या पृष्ठावर येवून ते बिचारे एखाद क्षण किनारा न्याहाळत असतील देखिल. पण लगेचच, सूर्याच्या तेजाची अंगावर पडलेली चांदणी पाहून, दिपून जात, परत एकदा विहंगम लाटेत तोल जावून समतल अनंतात अदृश्य होत राहतात.
नाही म्हणायला सागरातल्या मृत वनस्पती थांबतात घटकाभर किनाऱ्याची वास्त पुसायला. कदाचित प्रशांत सागराच्या अंतरंगातली अविरत घुसमट, किनाऱ्यावर स्तब्ध उभ्या असलेल्या दूतांना त्या सांगत देखिल असतील त्या घटकेत. पण सागरावर धरेने केलेल्या उपकरांचे उन्मत्त वारे प्यायलेल्या त्या भ्रमिष्ट दूतांना ते निर्वाणीचे आर्त स्वर ऐकू तरी येत असतील का?
पुढच्याच लाटेत, आपले गुह्य उघड होण्याच्या अनामिक भीतीने सागर त्या मृत वनस्पतींना देखिल परत आपल्या अथांगात ओढून घेत राहतो हापापल्यासारखा.
अनिमिष नेत्रानी, सागरा सारखेच विशाल, निवळशंख तरीही हतबल आकाश, सागराला थोपवत राहते एका बाजूने. सूर्य आणि चंद्र हा अविरत योग फक्त पहात राहतात त्रयस्था सारखे, अस्फुट, अविचल!!
आता सागराची गाज सोडली तर इथे कुणीही कुणाला काहीच सांगू शकत नाही. धरतीचे दूत झीजतच राहतात अंता पासून अनंता पर्यंत...

~निखिल कुलकर्णी


No comments:

Post a Comment