Wednesday, October 18, 2017

नवसहस्त्र कोट

नवसहस्त्र कोट 
~ निखिल कुलकर्णी 

गेल्या वर्षी आपल्या नव्या पेशव्यांनी पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बंद केल्या. खूप वाईट झाले. आमचा नव सहस्त्र रुपयांच्या “काळ्या नोटा” (“काळा पैसा” नव्हे!!) कशा खपवाव्यात , याच्या विचारात गेले सहा महीने मेंदू कुरतडून गेला आहे. कधीतरी शुक्रवारी संध्याकाळी, व्हिस्कीचे २-३ पेग पोटात गेल्यावर उगाचच त्या नव सहस्त्रांची आठवण होते. वाईट वाटते. रिझर्व बॅंकेने स्वत: छापलेल्या नोटा, जेव्हा खुद्द रिझर्व बॅंकेने देखिल स्विकारल्या नाहीत, तेव्हा आम्हास, किंवा आमच्या नोटास, अगदी अनाथ आणि पोरके झाल्यासारखे वाटलेले आहे..

“मै धारक को पाच सौ रूपये अदा करने का वचन देता हूं।” असे त्या नोटांवर “हिंदी” मधे लिहीलेले वाक्य आणि खाली "नाना फडणवीस" अशी स्वाक्षरी, आम्ही खुद्द रिझर्व बॅंकेच्या दारावर बसलेल्या “माननीय, महोदय, साहेब वगैरे” असलेल्या,  चार फुटी इसमास वाचून देखिल दाखविले.  उगाच कुठल्या कुठल्या सेनेचे कार्यकर्ते आहोत असे वाटू नये म्हणून आम्ही, आम्हाला अवगत असलेल्या, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती, बंगाली वगैरे इतर सर्व राष्ट्रभाषा टाळून, “हिंदी” ची निवड केली होती. पण ते साहेब मराठी सारख्या भाषेतूनच गुरकावले. “रिजर बॅंकेच्या गोरनर कडे गेलात तरी तुमची नोट बदलून मिळाची नाय आता.. टायम संपला कवाच.. काय? निगा आता, टायम वेष्ट नका करू!!” असा अस्सल कोकणी आणि इंग्रजी मिश्रीत मराठी मधे आमच्यावर वार काढला. त्याचा चढलेला आवाज पाहून आजूबाजूचे २-३ बंदूक वाले पोलीस देखील तिथे दाखल झाले. त्यांच्या दंडावर काढलेली "म. पो." (म्हणजे "महाराष्ट्र पोलीस"!! "मला पोसा" नव्हे!) हि अक्षरे पाहून आम्ही अधिक धारिष्ट्य केले नाही. "वैष्णव जन तो तेणे कहिये जी..." असे गुणगुणत, गांधी खिशात मारत तिथून काढता पाय घेतला. साऱ्या प्रकाराने आम्हाला अगदी मेल्याहून मेल्या सारखे झाले. आमच्या नोटांना आणि त्यावरच्या गांधींना तर खिशात परत लोटले जात असताना, भर रस्त्यात आई-बापाने ओळख दाखवण्यासही नकार दिलेल्या, केस वगैरे पिंजारून, चकचकीत गॉगल लावून, गावात मोकाट फिरणाऱ्या मवाली पोरासारखे वाटले. आमचे तर असेही मत झाले आहे कि गांधी वध हि एक निव्वळ घटना नसून ती एक अखंड चाललेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेची सुरुवात फक्त नथुरामाने केली आणि त्यानंतर हरेक ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा मधून गांधी हत्येचे परमिट मिळू लागले आहेत. त्याच्यात विशेष म्हणजे "खादी" आणि "खाकी" वाल्याना तर हे परमिट विनामूल्य उपलब्ध आहे. असेही आमचे एक मत झाले आहे.   

आम्हाला गांधी अत्यंत प्रिय आहेत. आमच्या स्मरणात असल्या पासून, हिरवा असो कि लाल, गांधींवर ताबा मिळवणे हे एक परम संतोषदायक असे ध्येयच आहे. मागच्या खेपेला देश सोडला तेव्हा शरयूच्या आजीने (म्हणजे आमच्या सासूबाई) शंकर आणि शरयूच्या हातावर एकेक हिरवा गांधी ठेवला आणि “विमानतळावर गोळ्या आणि बिस्किटे खा हं!” असे म्हणाली. आता तिला कशाला सांगायचे की विमानतळावर गोळ्या बिस्किटे मिळत नाहीत म्हणून!! मिळताहेत दोन गांधी तर का सोडा असा विचार करून आम्ही मनातून जाम खूष झालो होतो. रिक्षात बसल्या बसल्या आम्ही ते ताबडतोब आमच्या ताब्यात जवळजवळ हुसकूनच घेतले. शंकऱ्याने त्याची नोट लगेच दिली. पण शरयूने, तिला तिच्या आजीने सांगीतल्या सारखे "गोळ्या पाहीजेत" म्हणून हट्ट करायला घेतला. विमानतळावर भोकाड पसरले. "गोळ्या खाऊन दात किडतात" वगैरे सांगून बघितले. शेवटी तिथल्या बंदूकवाल्या 
"म. पो." ची भीती दाखवली. मग मात्र तिने मोठ्या नाखुशीनेच तिची नोट आम्हाला दिली होती. कुठल्याही स्थळी गांधींच्या हस्तांतरणासाठी बंदूकवाल्या "म. पो." ची गरज लागते याची आता आम्हाला खात्री पटलेली आहे. अर्थात नोट ताब्यात घेतल्यावर आम्हाला मात्र चंद्रावर चालल्या सारखे हलके हलके वाटत होते. अशा लेकरा-बाळांच्या तोंडातून काढून घेतलेल्या नोटांची आणि त्या वरच्या गाधींची त्या कारकुंड्याने रिझर्व बॅंकेच्या आवारात बंदुकीच्या जोरावर हत्या केली त्याचे वाईट वाटते.

आम्हाला गांधी अत्यंत प्रिय आहेत. गांधींनी देशासाठी "काय केले" किंवा "काय काय केले" हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग आहे. पण आमच्या साठी बापू हे पानपट्टीपासून ते विमानतळावरच्या Duty Free दुकानांपर्यंत कायमच सोबत करत आलेले आहेत. त्या काळी साठ पैशाची गाय छाप घेऊन आम्ही राजरोसपणे दहा रूपयाचा गांधी पुढे करत असू. तेव्हा संभा पानट्टीवाला कळवळून विचारत असे की “साहेब सुट्टे नाहीत का?” म्हणून!! मनात विचार यायचा की काय करंटा माणूस आहे हा, गांधी दिले तर सुट्टे मागतोय हा!! मग आम्ही तांबडे गांधी परत आमच्या खिशात ठेवून, त्याला “मांडून ठेव” असा आदेश देवून पुढे कूच करायचो..संभाने मांडून ठेवले की नाही ते एका विश्वंभरास ठाऊक! परंतु आजही आम्हाला जेव्हा जेव्हा संभा पानपट्टीवाला आठवतो, तेव्हा देखील गांधी सोडून सुट्टे मागणारा संभा हा तितकाच दयनीय आणि दळभद्री वाटत आलेला आहे. त्याला भेटून त्याचे थकलेले खाते एकदाचे देऊन टाकावे कि काय, असाही एक विचार मनात येत असतो. परंतु केवळ गांधी प्रेमा पोटी आम्ही असे आत्मघातकी विचार मागे टाकत आलेले आहोत.

तुम्हाला सांगू का, आमच्या घराचा एक मोठा विचित्र प्रकार आहे. इथे दोन भारतीय पासपोर्ट राहतात आणि दोन अमेरिकन!! 
उगाच सुभाषबाबूंच्या आठवणीने गहिवरून जाल आणि त्या बारक्या मिशीवाल्याची स्तुती कराल तर खबरदार!! तुमचे मुंडके उडवले जाईल मानवतेचे हत्यारे म्हणून!! 
मागे असेच एकदा “आझाद हिंद” सेनेचे गोडवे आम्ही या जीभेने आमच्या घरी गायले होते. "इंफाळचा लढा", "जपानचा पाठिंबा",  जर्मनी, जपान, सुभाषबाबू वगैरे बद्दल त्वेषाने आणि अभिमानाने बोललो. मग काय विचारता महाराजा!! आमचीच खरड निघाली. 
त्यानंतर शरयूने पुढचा एक महिना आम्हाला Netflix वर कसल्या कसल्या documentary बघायला लावल्या. यात बहुतेक ज्यूंचे कसे हाल झाले, जर्मन कसा वाईट होता वगैरे सगळे मुद्देसूद वर्णन होते. डोके सुन्न होऊन गेले. 
देवा नारायणा, या घरात रहावयाचे कसे हाच मोठा प्रश्न आहे..

मागे एकदा आमच्या अमेरिकन शरयूने प्रश्न विचारला होता की तुमच्या देशाचे जाॅर्ज वाॅशिंग्टन कोण म्हणून.. काय उत्तर द्यावे याला!! तिला सांगितले कि बापू हेच आमचे जॉर्ज आहेत आणि म्हणूनच त्यांचे चित्र सर्व नोटांवर छापलेले असते. मग तिने विचारले कि कुठे कुठे युद्धे झाली वगैरे...

शेवटी तिला सांगितले कि 'दे दि हमे आजादी बिना खड़ग बिना ढाल' म्हणून!! मग ती पुढे काही फार बोलली नाही. पण तेव्हा पासून तिचे ब्रिटिशांबद्दलचे मत बदलले आहे. ब्रिटिशांनी भारताला असेच स्वातंत्र्य दिले आणि अमेरिकेला मात्र युद्ध करायला लावले असे वाटून ब्रिटिश हा एक अत्यंत घातकी आणि पक्षपाती माणूस आहे असे तिचे ठाम मत झाले आहे. अर्थात ब्रिटिशांबद्दल आमचे देखील अगदी असेच मत असल्याने, या बाप आणि लेकीमधल्या अभूतपूर्व एकमताबद्दल बापुंचेच आभार मानायला हवेत.     

अर्थात असे जरी असले तरी आमचे देखील मराठी रक्त आहे. मी सुद्धा घरात अमेरिकन पासपोर्ट वाल्याना सांगून टाकले आहे कि या घरात एलिझाबेथ राणीच्या तोतऱ्या बापाचे आणि चर्चिलचे गोडवे गाल तर याद राखा म्हणून!! येता जावळी जाता गोवळी!! शेवटी एकदा वचपा काढलाच. तिला सावरकरांची माहिती सांगितली. सावरकर म्हटले कि आमचा उर अभिमानाने भरून येतो. जितका आम्हाला बापूंबद्दल आदर आहे तितकाच स्वातंत्र्यवीरांविषयी देखिल आदर आहे. मग बोलता बोलता आम्ही तिला अंदमान, काळे पाणी, तिथल्या अभेद्य भिंती, त्या भिंतीवर लिहीलेली 'कमला' सारखी अद्वितीय काव्यें हे देखील सांगून टाकले. मग क्रांतिकारी म्हणजे काय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, चंद्रशेखर आझाद, चापेकर बंधू वगैरे बरीच माहिती सांगितली. ते ऐकून ती म्हणाली कि मग भारताचे खरे जॉर्ज वॉशिंग्टन तर हेच स्वातंत्र्यवीर आहेत. म्हटले चला. भारतीय पासपोर्ट जिंकला एकदाचा!! पण पुढच्याच क्षणी म्हणाली कि यातल्या कुणाचे नोटेवर चित्र कसे नाही म्हणून!! अर्थात याचे उत्तर आम्हालाच काय पण आमच्या इतिहासाच्या मास्तरांना देखील देता येणार नाही याची आम्हाला खात्रीच आहे. शेवटी तिला काहीतरी सांगायचे म्हणून सांगितले कि जर स्वातंत्र्यवीरांनी थोडी अमेरिकेशी दोस्ती केली असती, तर कदाचित तेच भारताचे पहिले पेशवे झाले असते म्हणून!! आणि मग अगदी हजार, दोन हजारच्या नाही तरी २५ पैसे, ५० पैसे, रुपया असल्या चिल्लर नाण्यांवर तरी त्यांचे चित्र आलेच असते. 
अर्थात नंतर असा विचार केला कि त्यांचे चित्र नोटांवर आणि नाण्यांवर नाही ते बरेच आहे. उगाच कशाला लोकांच्या पुठ्ठयाचा सहवास द्यायचा त्यांना!!

पण एकूण चर्चेअंती तिला भारताचा जॉर्ज वॉशिंग्टन एकदाचा सापडला याबद्दल ती खुश झाली आहे आणि "अमेरिकेचे भारतीय स्वातंत्र्य युद्धातील महत्व" ऐकून तर तिच्या अभिमानाला पारावर राहिलेला नाही.
 
आमच्या इथे येण्यामुळे दोन कट्टर अमेरिकन नागरिकांची निर्मिती होणार आहे याची बारीकशी जरी कल्पना असती तर आम्ही देखिल कर्वे रोडच्या पेट्रोल पंपावर गुपचूप रांगेत जाऊन उभे राहीलो असतो. या आमच्या गुन्ह्याबद्दल रायगडावरील छत्रपती आम्हाला कदापिही माफ करणार नाहीत याची आम्हाला खात्रीच वाटू लागली आहे. आम्ही फक्त पोटापाण्यासाठी या देशात आलेली “साधी माणसे” आहोत. गांधी, सावरकर, वॉशिंग्टन आणि हिटलर यांचा आमचा संबंध फक्त इतिहासाच्या पेपरातल्या ४ मार्कां पुरता!! आमच्या साठी नोट हि फक्त देण्यासाठी असते. मग त्याच्यावर बापू असोत, नाहीतर जेफरसन त्याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही.  

त्यातल्या त्यात एक बरे म्हणजे नवसहस्त्र कोट गांधी बगलेत मारून आमचे थोर गांधीवादी गुरुदेव, आंग्लदेशात वानप्रस्थाला वास्तव्याला आलेले आहेत. त्यांचाच आदर्श आम्हीही ठेवून आहोत. आमच्याकडे नवसहस्त्र कोट सध्या उपलब्ध नसल्याने, तूर्तास
आम्ही अंगात कोट घालून त्याच्या खिशात आमच्याकडे कायमचे मुक्कामाला आलेले नवसहस्त्र गांधी ठेवून गुरुदेवांसारखेच आचरण (दिवसा आणि रात्री सुद्धा) करायचे निश्चित केले आहे. 

अर्थात हे थोडेसे, दाढी वाढली म्हणून शिवाजी होऊन फिरण्यासारखे आहे याची देखील आम्हाला कल्पना आहेच!!

~ निखिल कुलकर्णी

1 comment:

  1. भन्नाटच..

    अजूनही "मित्रों..." हा अंगावर काटे आणणारे संबो-धन आठवले की रामदास आणि आठवले अशी एकाच वेळी विरक्ती आणि (उदा. कवितांची) आसक्ती मनात डुचमळते.


    मी ही जरा बेशक होऊन आज तुमच्या ब्लॉगची/ लेखांची (कौतुके करत) लिंक काही मित्रांना(यातील मित्र वेगळे?) पाठवली आहे. या अशाच लाडिगोडीने ५०० प्रतींची पाहिली/दुसरी आवृत्ती खपून अखिल भारतीय मराठी ग्रंथ/साहित्य वैश्विक पातळीवर पोहोचल्याचा 🥂 फील येऊ शकतो तुम्हाला.

    चिअर्स 😀

    ReplyDelete