Monday, September 25, 2017

"एनाराय" एक अभिष्टचिंतन

"एनाराय" एक अभिष्टचिंतन
~निखिल कुलकर्णी
"एनाराय" हे "येनार हाय" याचे अमेरिकन रूप आहे असे आमचे मत आहे. तर या "एनाराय" लोकांचे अमेरिकातील योगदान तर स्तंभित आणि अचंबित करणारे असेच आहे. त्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच वैद्यकीय या सर्वच क्षेत्रातील सहज आणि सुगम वावर, त्यांना मिळालेली पदे ही सर्व दृष्ट लागावी अशीच आहेत. त्यांच्या याच ज्ञानाचा, पराकोटीच्या जिद्दीचा, अद्वितीय व्यासंगाचा, धैर्याचा, झालेच तर चिकाटीचा, फायदा आपल्या गरीब देशाला व्हावा, अशा आशेने त्यांची वेडी माय, तिच्या गोतावळ्याला हा आपला परदेशी गेलेला नरपुंगव एक दिवस परत "येणार हाय" "येणार हाय" म्हणून वेड्या आशेने सांगताना आम्ही या कानानी ऐकले होते. तर ते एक असो!!
परंतु सांप्रत काळी, कृत्रिम बुद्धीमत्तेचे अध्वर्यु, राजकुमार, वार्धक्यातही आपल्यातले शैशव जपत आलेले, असे सर्वांग सुंदर देखणे राष्ट्रपुरूष, अमेरिकेत आलेले आहेत. त्यांचा प्रगाढ व्यासंग, इतिहासाची सखोल जाण, देशाबद्दल तसेच अमेरिकेतील भारतीय नागरीकांबद्दल असणारी जाज्वल्य अशा प्रकारची निष्ठा, देशप्रेम, त्याग तसेच आंग्ल भाषेच्या, वाघीणीच्या दुधावर पोसलेली तल्लख बुद्धीमत्ता यांनी तर आसमंत दिपून गेलेला आहे. हा नेमक्या कोणत्या लोकीचा ("लौकीकाचा" असे वाचू नये) राजपुत्र आहे? असा प्रश्न आम्हाला सततच पडत आलेला आहे.
त्यांचा प्रत्येक शब्द हा त्यांच्या अलौकिक विचार मंथनातून बाहेर आलेल्या रत्नासम वाटत आलेला आहे. प्रेझेटेशनला जाणे म्हणजे प्रेझेंट घ्यायला जाणे यासारख्या नव्या नव्या संकल्पना ते अगदी लिलया मांडून जातात. तेव्हा तर या भाषाप्रभूला साष्टांग नमस्कार करावासा वाटतो. परंतु दुष्ट आणि असहिष्णू राज्यकर्त्यांच्या राज्यांत कदाचित या राजकुमाराला नमन केल्या बद्दल आमचीच मान मारली जाईल या भीतीने आम्ही तो मनातल्या मनातच करत आलेलो आहोत.
बांगला देशाच्या निर्मितीचा विषय असो किंवा हाताच्या निवडणूक चिन्हाला सर्व धर्मातील मोठमोठ्या देवानी दिलेल्या पाठिंब्यावरचे त्यांचे विवेचन असो, सर्वच अद्भूत आणि अगम्य आहे. त्या शिवाय मागील सभेत सांगीतलेला चमत्कार काहीच नाही असे वाटायला लावून या सभेत नवा चमत्कार सांगायची त्यांची विजीगीषू वृत्ती हे सुद्धा त्यांच्या क्षात्रतेजाला शोभेल असेच आहे.
याच एकाहून एक उत्तुंग विक्रम करण्याच्या मनस्वीतेतून परवा त्यांनी "एनाराय" या विषयावर देखिल त्यांचे शब्दमौक्तिक मुक्त पणाने उधळले आहेत. वास्तविक "एनाराय" या शब्दाकडे पाहून "एना" हा कानडी शब्द असून "राय" हा बंगाली शब्द वाटतो. त्यामुळे "रोजा" सिनेमातल्या "आसामसे गुजरात तक, बंगाल से महाराष्ट्र तक" याप्रमाणे गेल्या पन्नास एक वर्षात "एना से राय तक" मधल्या अनेकानेक गावातून जे लोक पोटापाण्यासाठी भारता बाहेर गेले ते "एनाराय" असे आम्हाला वाटत आलेले आहे. अर्थात प्रत्येकाच्या बुद्धीचा जोर हा ज्याच्या त्याच्या आई वडिलांच्या बुद्ध्यांकावर अवलंबून असतो असे आम्ही कुठेतरी वाचलेच होते. पण आज राजपुत्राचे बोल ऐकून आम्हाला या बोलाची खात्रीच पटली आहे.
वास्तविक अमेरिकेत राहणारे सगळेच कुठून कुठून आलेले "एनार" च आहेत. कुणी "एनार इंग्लीश" आहे. कुणी "एनार जर्मन" आहे. कुणी "एनार जपानी" आहे तर कुणी "एनार कंबोडीयन" आहे. पण यातल्या एकाही "एनार" जमातीला बापू, चाचा, सरदार तयार करता आलेले नाहीत, हे कळल्या पासून तर "एनाराय" च्या आनंदाला पारावार राहीलेला नाही. वास्तविक सकाळी आठ ते पाच पर्यंत गुगल, ॲपल वगैरे कंपन्यात पडेल ते सर्व "पडेल" काम करून, मुलाला किंवा मुलीला शनिवारी मराठी नाहीतर कानडी शाळेत घेऊन जाणारा आणि त्यांनी "कोलन" चा का असेना, पण डाॅक्टर व्हावे म्हणून त्याच्या शिक्षणाचा खर्च करता यावा म्हणून जुन्या चड्डया आणि मोजे सहा सहा वर्षे वापरणारा "एनाराय" आता अचानक एका वेगळ्याच तेजाने आणि आत्मविश्वासाने झळाळून गेला आहे. या "एनाराय" लोकांचे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान खुद्द राजस मुखातून ऐकून आपण एका केवढ्या मोठ्या तेजस्वी आणि दिव्य परंपरेचे भाग आहोत असे वाटून गहिवरून गेला आहे. आता "त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करत राहणार आहे." अशी प्रतिज्ञा देखिल काहीजणानी घेऊन टाकली आहे.
आमचे एक परममित्र "एनाराय" श्री. गणोजीराव, (गावाकडे यांना "आमचं गण्या" असे म्हणत) यांनी तर हे बोलणे इतके मनाला लावून घेतले आहेत की त्यांनी त्याच्या अमेरिकन चिरंजीवानी, घराबाहेर लावलेला अमेरिकन ध्वज काढून गुंडाळून तळघरात ठेवून दिला आहे. तसेच ते आता त्यांच्या घरापुरता भूभाग हा "स्वतंत्र" झाला आहे असे देखिल सांगू लागले आहेत. याच बरोबर त्यांनी अमेरिकन राष्ट्रध्वज छापलेले बनियन आणि चड्ड्या देखिल वापरायचे थांबवले आहे असे कळते. बुधवारांतून आणलेले लंगोट आणि बंड्या, ॲटीक मधून काढून, धुवून, उन्हात वाळवून, परत वापरायला काढायचा निर्णय निश्चित झालेला आहे.
त्यांच्या "ॲरन" नावाच्या मुलाला ते आता "अरूण" म्हणून हाक मारू लागले आहेत. आणि "स्विटी" नावाच्या मुलीला "स्वाती" म्हणू लागले आहेत. तसेच त्यांची मुले, अरूण आणि स्वाती, त्यांना जेव्हा "डॅड" म्हणून हाक मारतात तेव्हा तर त्यांनी ओ द्यायचे देखिल बंद केले आहे. "तो मी नव्हेच" असा चेहरा करून बसून राहतात.
एकूण या राजकुमाराच्या राजस बोलाने "एनाराय" लोकांमधे एक अत्यंत दुर्दम्य अशा राष्ट्रवाद आणि देशीवाद वाढीला लागला आहे.
या राजपुत्राची आणि त्याच्या बोलाची महती "एनार पाकिस्तानी" लोकांना देखिल पटली असून, "मुस्लिम लिगची" चळवळ देखिल "एनार पाकिस्तानी" लोकांनी चालू केली असे त्यांचेही मत झाले आहे. त्यामुळे तिकडेही "इद-ए-मिलाद" सारखे वातावरण आहे.
इतकेच काय पण अगदी उजव्या विचारांच्या,कडव्या लोकांना देखिल स्वातंत्र्यवीर देखिल "एनाराय" असल्याचे कळल्यापासून, त्यांना देखिल या राजपुत्राबद्दल वाटणाऱ्या असूयेत लक्षणीय घट झालेली आहे.
रस्ताच्या कडेला वडा पावची गाडी लावून, चार घरची धुणी-भांडी करून संसार चालवणाऱ्या एखाद्या दामूला, आणि त्याच्या सखूला, जर अचानक कळले की ते प्रत्यक्ष पेशव्यांच्या वंशातले असून, थोरल्या बाजीराव साहेबांचे तिसरे सुपुत्र, श्रीमंत जनार्दनराव पेशवे, हेच त्यांचे मुळ पुरूष आहेत, तर जी अवस्था होईल, तीच अवस्था आज "एनाराय" ची झालेली आहे. या एका वैचारीक पुनरूत्थानासाठी राजकुमाराचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.
पण आता दोन खोल्याच्या ब्लाॅक मधे राहणाऱ्या या दामूला आपला दरबार कुठे भरवावा, याचीच काय ती चिंता लागून राहीली आहे.
~निखिल कुलकर्णी

No comments:

Post a Comment