Friday, August 11, 2017

आपटे बाई

जुलै च्या पहिल्या आठवड्यात प्रोजेक्ट संपायचा होता. अक्खा जून महिना दिवस रात्र कामात होतो. कधी कधी तर रात्रीचा १ वाजायचा घरी यायला. अंगात संचार झाला होता. काय, कधी आणि कुठे जेवतोय, याचा देखील पत्ता लागेनासा झाला होता. घर, मुले, मित्र, आई-बाबा यांचा कसलाही विचार करायला सवडच नव्हती. "उसंत हरवणे" म्हणजे काय तसे झाले होते. आणि अचानक बाबाना दवाखान्यात नेल्याची बातमी कळली. म्हणजे एकदम सिरीयस. अमेरिकेचे बाकी सगळे चांगले असले तरी अमेरिका थोडी भारताच्या जवळ असती तर जरा बरे झाले असते असे मला सारखेच वाटत आले आहे. 

मी आईला फोन करून बाबांच्या तब्बेतीची चौकशी केली. सांगितले कि मी कधीही निघू शकतो आणि ३०-३५ तासात घरी पोचतो. ती नकोच म्हणत होती. घरातले इतर पण म्हणाले कि मी यायची काही गरज नाही म्हणून! मग मी थांबलो. शेवटी ५ जुलै ला एकदाचा प्रोजेक्ट संपला आणि माझी जबाबदारी संपली. तात्काळ भारताचे तिकीट काढले १३ जुलै ला निघण्यासाठी. आणि सामानाची आवरा आवर करायला सुरुवात केली. 

तिकीट मिळाले. भारतात जायचे. आई-बाबा भेटणार. मॅन्युअल गियर वाली माझी २० वर्षे जुनी Zen, मनसोक्त हॉर्न वाजवत, पौड रोड, युनिव्हर्सिटी रोड आणि सिंहगड रोड वर रात्री बेरात्री झन्नाट चालवायला मिळणार. पहाटे ४ वाजता सिंहगडावर जायला मिळणार. "सुभद्रा" मध्ये उत्ताप्पा. "वैशाली" मध्ये SBDP. औरंगाबादेला "तारा" पान पट्टीवर पान खायचे. सांगलीला सच्या कोरे बरोबर वालचंद कॉलेजच्या टपरीवर भेटायचे. विचार करू तेवढा थोडा होता. मन म्हणजे एकदम स्वैर वाऱ्यासारखे हुंदडायला लागले होते. बराच वेळ दावणीला बांधून ठेवलेले गायीचे खोंड, धारेच्या वेळेला कासरे सोडले कि, जसे सैरभैर होऊन भलती कडेच, चौखूर पळत सुटते, अर्थात त्याला पळणे म्हणतच नाहीत, कारण त्याला कुठली एक ठराविक दिशा नसतेच, त्याला हुंदडणेच म्हणतात, अगदी तसे, त्या खोंडासारखे चालले होते. असंख्य विचार आणि आनंदाच्या उकळ्या!!

आणि अचानक एका ग्रुप वर कुणीतरी मेसेज पाठवला कि आपटे बाई गेल्या म्हणून!! मला आधी विश्वासच बसेना. एक तर आज काल ग्रुप वर काय वाट्टेल ते चालू असते. त्याच्या आदल्याच दिवशी कुणीतरी बाबासाहेब पुरंदरे गेले म्हणून कंडी पिकवली होती. म्हणून मी २-४ जणांना फोन करून खात्री करून घेतली. आणि सुन्नच झालो. तात्काळ निघावे आणि बाई ना शेवटचे भेटावे असाही एक विचार आला. पण आता काढलेले तिकिट बदलून मिळेना. लवकरात लवकरचे तिकीट १० तारखेला होते. हताश होऊन, अमोलला फोन केला. ५-६ वेळा तरी फोन केला असेल. पण एकतर बिझी असे. नाहीतर कव्हरेज च्या बाहेर. काय करणार बिचारा तो तरी!! वेळच वाईट होती.  

एक खूप मोठा, ६०-६२ वर्षे अव्याहत पणे चालत आलेला प्रेमळ श्वास कायमचा थांबला होता. कसल्या कसल्या रांगोळ्या, नक्षा, काशिदे काढणारा हात शांत झाला होता. सगळे भरून पावल्या वर, अगदी तृप्त झालेल्या चित्त वृत्तीतून, व्यक्त होणारे प्रसन्न स्मित, आता अव्यक्ताच्या पसाऱ्यात कुठेतरी कायमचे लुप्त झाले होते. डोळे भरून आले. माझीच आई गेल्या सारखे काळीज तुटून गेले. शद्ब तोकडेच असतात. त्यांना व्यवहाराचे भान कदाचित सांभाळता येत असेलही. पण भावनेच्या महापुरात ते बापडे हरवूनच जातात. जरी अमोल ने फोन घेतला असता तरी मी काय बोललो असतो त्याला? त्याची समजूत काढली असती का त्यानेच माझी समजूत काढली असती? मला बोलायला शब्द सापडले असते? शरद काकानी फोन घेतला असता तर? सगळेच अवघड प्रश्न आहेत. काही क्षणा पूर्वी ते चौखूर हुंदडणारे ते खोंड आता एका कोपऱ्यात आपल्याच्या खुरात तोंड खुपसून निपचित पडले होते. 

मी आपटे बाईंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी मोजून ६ वर्षांचा होतो. "आपले पोर म्हणजे दुसरा आइनस्टाइन आहे" असा आमच्या तीर्थरुपांचा लहानपणा पासून एक गैरसमज होता. म्हणजे त्यांच्या लहानपणा पासून कि आमच्या, तो अजून एक संशोधनाचा विषय होईल, पण सध्या आमच्याच  लहानपणा पासून असे धरून चालू या. तर "आपले हे बिरमुटे चिरंजीव हे अत्यंत हुशार असून त्यांना सर्व विषयाचे अतिशय व्यापक आकलन आहे". असा त्यांनी ग्रह करून घेतला होता. त्यामुळे अशा या "छोट्या आइनस्टाइन" ला जगातील सर्वात उत्कृष्ट शाळेत घालून, त्याला दिवस रात्र अभ्यास करायला लावून, त्याला "मोठा आइनस्टाइन" करायचा त्यांनी विडाच उचलेला होता. त्याच वेळेला माझाही माझ्या बद्दल वेगळाच गैरसमज होता. मला सारखे असे वाटायचे कि मी "छोटा मारुती माने" आहे म्हणून!! आणि मग मोठा "मारुती माने" होण्यासाठी काय काय करावे लागेल याचा मला प्रश्न पडलेला असे. 

वास्तविक मिरज हे गाव म्हणजे कुणीही प्रेमात पडावे असे गाव!! प्रत्येक गावाला स्वत:ची अशी एक खास प्रतिमा असते. त्या गावाला स्वत:चे असे खास व्यक्तिमत्व असते. त्या प्रतिमेला धरून त्या गावाचे व्यवहार होत असतात. काही प्रतिमा मांजरपाटा सारख्या रखरखीत असतात. काही खादी सारख्या खडबडीत असतात. काही रेशमा सारख्या असतात. तर काही कागदासारख्या हलक्या असतात. काहींना त्यांचे स्वत:चे रंग असतात. ढंग असतात. आवडी असतात. निवडी असतात. चांगल्या-वाईटाच्या कल्पनाही वेग-वेगळ्या असतात. 

कोल्हापुरात मित्राची विचारपूस करताना देखील शिवी हासडून वाक्याची सुरुवात करायची एक पद्धत आहे. तशी शिवी तुम्ही पुण्यात एखाद्याला द्याल, तर तुमची पोलिसात तक्रार करून तुम्हाला कोतवालीची सफर घडवून आणायला देखील "पुणेकर" मागे-पुढे बघणार नाहीत. त्यात आता "पुणेकर" ह्या संकल्पनेची लोकसंख्या दिसा-मासाने वाढतच आहे. त्याच्यात सांगली, कोल्हापूर पासून ते चंद्रपूर, गडचिरोली वरून आलेले लोक आताशा सामील होत आहेत. आणि सदाशिव, नारायण, शनिवार आणि कसब्यातून राहिलेले मुळचे "पुणेकर" हे विशेषण, आता पार मुळशी, भूगाव पासून ते खराडी, बालेवाडी पर्यंत आणि वडगाव-धायरी पासून ते मांजरी-बुद्रुक पर्यंत कुठेही आणि कसेही राहणाऱ्या मनुष्य प्राण्यास लागू होऊ लागले आहे. त्यामुळे आता नेमके "पुणेकर" कुठले? बारामतीत राहणारे बारामतीकर हे "पुणेकर" ठरतात का नाही? किंवा बारामतीत राहणाऱ्या  "पुणेकर" या बारामतीकर कि पुणेकर? असे असंख्य संभ्रम तयार झाले आहेत. हि असली अजस्त्र  गावे त्यांचा चेहरा हरवून बसलेली असतात. मग सगळीच माणसे त्यांच्या सोयीचे नकली चेहरे लावून व्यवहार करत राहतात. आणि नकली चेहऱ्या सोबत असली निष्ठा नाही राहू शकत. मग असल्या गावात तरुण मुलींकडे मुले चांडाळ चौकड्या करून बघतात आणि चौका चौकात पोलिसांना CCTV कॅमेरे बसवावे लागतात. 

मिरजेचे तसे नाही. हे एक असली चेहऱ्याचे गाव आहे. इथल्या निष्ठाही दणदणीत आहेत. "शरीर माध्यम खलु धर्म साधनं" या सुभाषितावर या गावाचा ठाम विश्वास आहे. हे एक अतिशय प्राचीन गाव आहे. अगदी शिलाहार राजांपासून या गावाचा उल्लेख आढळतो. त्यानंतर यादवांचे राज्य होते. मग बहामनी राज्यात हे एक महत्वाचे ठाणे होते. आदिलशहाच्या ताब्यात असताना तर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना देखील हे गाव तीन महिने झुंजून देखील जिंकता आले नव्हते. या गावावर पटवर्धन सरकारांचे गेली कित्येक वर्षे राज्य होते. आणि त्यांनी देखील गावाची राजधानी सारखी बडदास्त ठेवलेली होती. वास्तविक पटवर्धन हे पेशव्यांचे सरदार!! थोरल्या माधवराव पेशव्यांनी, हैदरवरच्या स्वारीत केलेल्या जबरदस्त कामगिरीवर खुश होऊन, मिरजेची जहागीर पटवर्धनांना बहाल केली. कृष्णे पासून ते खाली तुंगभद्रे पर्यंतचा सगळा प्रदेश  त्यांना मिळाला. आणि तिथून  हे गाव पटवर्धनांचं झालं. या चित्तपावन राजानं गावाची अगदी लेकरासारखी काळजी घेतली. ब्रिटिश सत्तेचा कसलाही जाच इथल्या जनतेला जाणवू दिला नाही. गावातल्या कित्येक होतकरू मुलांना शिकण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या. गावातली मुले पार लंडन मध्ये जाऊन शिकायला जाऊ लागली. या राजाला जसे सरस्वतीचे प्रेम होते, तसेच हनुमानाचे ही!! गावात ठिकठिकाणी तालिमी उभ्या राहिल्या. त्यातून शौकीन पैलवानकी करायला लागले. जोर-बैठका, कुस्त्या, मल्लखांब यातून गावाची वेगळीच ओळख तयार झाली. कदाचित जगात मिरज हे असे एकच गाव असेल जिथे अर्ध्याहून अधिक घरे ब्राह्मणांची होती. गावाच्या एका मोठ्याच मोठ्या भागाला 'ब्राह्मणपुरी" असेच नाव होते. आणि तो ब्राम्हण देखील घणघणीत आणि दणदणीत होता. त्यात देवलांच्या सर्कशीने तर मिरजेचे नाव पार रशिया, अमेरिका आणि युरोप मध्ये नेऊन ठेवले. देवल सर्कस म्हणजे मिरजेचा मानबिंदू होता. अगणित प्राणी, त्यांच्या कडून कसरती करून घेणारे रिंग मास्टर, मैदानी खेळ करणारे तरुण-तरुणी सगळंच जगावेगळं होतं. या सर्कशीची तर प्रत्यक्ष गांधी आणि नेहरूंनी देखील स्तुती केली होती. ब्राह्मणांच्या एखाद्या प्रयोगाचे गांधी आणि नेहरूंकडून कौतुक व्हावे म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. त्या सर्कशीच्या नादाने गावात gymnastic चे प्रयोग सुरु झाले. इथला जवळ जवळ प्रत्येक ब्राम्हण म्हणजे मल्लच!! प्रत्येकाची तर्हा न्यारी. दादा महाबळांना तीन वाघा सारखे मुलगेच होते. एकाहून एक दणकट!! सहा फुटाच्या वर उंची आणि तब्बेत देखील तशीच आडवी!! प्रभाकर जोशी होता. लाल्या नातू होता. राणा आणि प्रताप फाटक म्हणून होते. जोगळेकर म्हणून एक तब्बलजी होता. त्याला तबल्याचा एवढा शौक होता कि त्या तबल्याच्या नादात तो ९ वेळेला दहावी नापास झाला होता. कुणी ताटभर जिलब्या खायचा. कुणी कुंडाभरून श्रीखंड खायचा तर कुणी १०० वाट्या बासुंदी प्यायचा. या मंडळींना अशक्य असलेल्या गोष्टींची यादी खूपच लहान होती. गल्लीतले एखादे माणूस गेले तर अर्धे मिरज गोळा व्हायचे. ज्याचे आई नाहीतर वडील गेलेले असायचे, त्याला कळायचे देखील नाही कि लाकडाचे पैसे कुणी दिले आणि नगरपालिकेचा पास कुणी काढला ते!! मंडळी शरीराने सुडौल होतीच पण मनानेहि तितकीच सुदृढ होती. कुणीतरी कौलगुड कुठल्या तरी जोगांच्या नाहीतर बोडसांच्या घरी सकाळी सकाळी शेतावरून काढून आणलेली राजगिऱ्याची पेंडी सोडून जायचा. नाहीतर कुणी एखादा वाटवे कुठल्यातरी गद्र्यांच्या नाहीतर चिप्पलकट्टीच्या घरी द्राक्षांची पेटी ठेऊन यायचा. यांच्यात मोठे प्रथितयश डॉक्टर होते. मोठे नामांकित वकील होते. सरकारी अधिकारी होते. शिक्षकही होते. एवढेच काय पण एखादा उदय जोशी, प्रिंटिंग प्रेस चालवायचा आणि त्याचा भाऊ पांडुरंग जोशी पेट्रोल पंप!! गद्रे म्हणून एक कंपाउंडर होते. तरी सगळे गाव त्यांना डॉक्टर गद्रे म्हणायचे. आणि हे गद्रे डॉक्टर लोकांना त्यांच्या घरी जाऊन इंजेक्शन वगैरे द्यायचे. पेशंटच्या नातेवाईकांना धीर द्यायचे. कुणाला कुणाच्या व्यवसायाचा गर्व नव्हता. वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन प्रसंग निभावून न्यायला प्रत्येक जण समर्थ होता. एक प्रकारचा हुंबपणाच तो!! पण त्याचं कुणालाच काही वाटायचे नाही. सगळे गाव एकजीव होऊन जगत होते. 

अशा गावात जगायला मिळायला खरे तर भाग्य असावे लागते. 

तर एकूण गावाचा तोंडवळा बघता आणि विशेष करून आमची शरीर सौष्ठव संपन्न मित्र मंडळी बघता, आमचा आमच्या बद्दलचा "छोटे मारुती माने" हा गैर समज आमच्या तीर्थरुपांच्या, आमच्या बद्दलच्या "छोटे आइनस्टाइन" या गैर समजापेक्षा कमी गैर होता असे आमचे आजही मत आहे.
तर या दोन भिन्न प्रकृतीच्या गैर समाजातून जे व्हायचे तेच होत होते. PhD करणे, scientist होणे, अमेरिकेला जाणे अशी लौकिक उद्दिष्ठे ठेवणाऱ्या गावातल्या हुशार मुलांपेक्षा ७५० जोर मारणे. १००० बैठका मारणे, ५०० सूर्य नमस्कार घालणे अशी अलौकिक उद्दिष्ठे ठेवणारे महावीर हे आमचे दोस्त झाले होते. त्यामुळे स्वाभाविक पणे ते ज्या शाळेत जातील तिथेच मला पण जायचे होते. अर्थात ती शाळा सरकारी होती. म्हणजे एकूण शिक्षणाचा दर्जा जेमतेमच. तीर्थरूपांस ते काही मानवणारे नव्हते. त्यांनी गावातली त्या वेळेची सर्वात चांगली खासगी शाळा शोधून काढली आणि माझे तिथे नाव पण घातले. आता त्या शाळेत गावातील सर्व श्रीमंत लोकांची मुले-मुली यायची. ती फक्त अभ्यास वगैरे करायची असे मी ऐकून होतो. गांगरूनच गेलो होतो. पण इयत्ता पहिली असल्याने आणि तीर्थरुपांच्या मिशांचा पीळ आणि केसांचा रंग गडद काळा असल्याने बंडखोरी करण्याचा विचार तूर्तास रद्द केला होता. बिचकत बिचकत वडिलां बरोबर शाळेत गेलो आणि तिथे कळले कि माझ्या वर्ग शिक्षिका आपटे बाई म्हणून कुणीतरी आहेत!! 

त्यांना भेटलो. प्रसन्न हसरा गोल चेहरा, थोड्याश्या बुटक्या आणि अतिशय आश्वस्त करणारा त्यांचा अविर्भाव मला एकदम आवडला. आपटे बाई एकदम आई सारख्याच दिसत होत्या. मग एक नवीन प्रवास चालू झाला. आजूबाजूला सर्व श्रीमंत मुले, मुली, त्यांचे भारी-भारी कपडे, दप्तरे, वह्या, पाट्या, सगळे बघता बघता मला घाम फुटायचा. एका डॉक्टरांच्या मुलीला शाळेत सोडायला तिच्या घराची गाडी यायची. शाळा सुटल्यावर तो ड्राइवर युनिफॉर्म घालून शाळे बाहेर वाट बघत उभा असायचा.   काही काही मुलींना शाळेत सोडायला आणि घरी न्यायला रिक्षा यायची. मी आपला अवाक होऊन ते बघत राहायचो. कारण त्या काळात कुठेही जायचे असेल तर चालत, असाच समज होता. अगदी लांब असेल, म्हणजे सांगलीला वगैरे जायचे असेल तर बस! रिक्षात मी फक्त वर्षातून एक-दोन वेळाच बसायचो. ते देखील कधीतरी रेल्वेने दुसऱ्या गावात जायचे असेल तर रेल्वे स्टेशन पर्यंत रिक्षाने जायचो. इथे सगळा अजब प्रकार होता. या मुली आणि मुले शाळेत मोठ्या मोठ्या कॅडबरी घेऊन यायच्या. देवा देवा!! तेव्हा आमच्या घरात म्हणजे एक तीळ सात जणात वाटून खायची प्रथा होती. त्या न्यायाने एक कॅडबरी ७०० जणात!! आणि ती मुले तर अख्खी कॅडबरी खायची. मी दिवसेंदिवस खचत चाललो होतो. 
आपण म्हणजे अगदी 'हे' आहोत असे वाटायला लागले होते. पण सगळी चांगली मंडळी होती. त्यांची कॅडबरी मला द्यायची. शप्पथ सांगतो, त्यावेळी मी जर माझी स्वत:ची  कॅडबरी आणली असती तर कुणाच्या बापाला हि दिली नसती, एक तुकडा सुद्धा!! पण मी त्यांची कॅडबरी, बिस्किटे मनसोक्त हाणायचो. त्यांनाही त्याची गम्मत वाटत असणार. त्यांचे आई-बाबा अधून मधून शाळेत येऊन बाईंना भेटून जायचे. बाई पण त्यांच्याशी खूप वेळ बोलायच्या. त्यांचे कौतुक करायच्या. आमचे पण तीर्थरूप अधून मधून डोकावून जायचे. त्यांच्याशी पण बाई बोलायच्या. "थोडासा हूड आहे. पण हुशार आहे. अभ्यास करतो. " वगैरे चांगलेच सांगायच्या. त्यामुळे जीवात जीव यायचा. आपटे बाई म्हणजे मला तरी तारणहार वाटू लागल्या होत्या. या बाईंच्या जागी जर दुसऱ्या कोणी बाई असत्या, आणि त्यांनी जर खरी परिस्थिती विशद केली असती तर मोठाच अनावस्था प्रसंग उभा राहिला असता. कारण आमचे उद्योगच तसे चालू असायचे. 

आपटे बाई म्हणजे वर्गाचा प्राण होत्या. प्रत्येक मुलाला आणि मुलीला असे वाटायचे कि तोच त्यांचा सगळ्यात लाडका विद्यार्थी आहे म्हणून!! बाईंनी कधी कुणाला शिक्षा केलेली आठवत नाही. आणि जरी एखाद्याला केलीच तर ते पण सगळे हसण्यावारी न्यायचे प्रकरण. शाळा बुडवावी असे कधी वाटलेच नाही. एकतर बाईंचा मुलगा अमोल पण आमच्याच वयाचा होता. पण आईच्या वर्गात मुलगा नको म्हणून असेल कि काय पण तो दुसऱ्या तुकडीत होता. मधल्या सुट्टीत बाईंना भेटायला यायचा. आम्हाला फार अप्रूप वाटायचे. आपटे बाईं सारखी आई म्हणजे अमोलची काय धम्माल येत असेल असे वाटायचे. असे म्हणतात कि वर्गातल्या दंग्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर सगळ्यात जास्त दंगेखोर मुलावर दंगा थांबविण्याची जबाबदारी सोपवावी. त्या न्यायाने बऱ्याच वेळेला वर्गावर लक्ष ठेवायचे काम माझ्याकडे असायचे. मग त्याच्याच एक भाग म्हणून मला गोष्टी सांगायला लावायच्या. भाषणे म्हणून  दाखवायला लावायच्या. निबंध लिहायला सांगायच्या. आणि विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीचे कौतुक करायच्या. पुढे कधीतरी डेल कार्नेगीचे "how to win friends and influence people" जेव्हा वाचले तेव्हा राहून राहून आपटे बाईंचीच आठवण येत होती. हे पुस्तक त्या आमच्या बरोबर पहिलीतच प्रत्यक्ष जगल्या होत्या.    

मला अगदी स्पष्ट आठवते कि शाळे मध्ये १५ ऑगस्ट ची तयारी चालू होती. सगळे ग्राउंड स्वच्छ केले जायचे. छोटे छोटे खडे, पाने वगैरे सगळे काढायचो. सगळ्याचे लीडर आम्ही. मग आम्ही आमच्या मर्जीतल्या मुलांना आणि मुलींना चांगली कामे द्यायचो. मग त्यातून वाद व्हायचे. ते सगळे बघून बाईंनी एक नामी युक्ती काढली. या सगळ्या ग्राउंड वगैरेंच्या ढोर कामातून माझी मुक्तता करण्यात आली. आणि मला सांगितले कि तू फक्त शाळेतल्या मुलांसमोर, झेंडा वंदन झाल्यावर भाषण करायचे. माझी पाचावर धारण बसली होती. मी इयत्ता पहिलीत. तिथे झेंडा वंदनाला पहिली ते चौथी चे प्रत्येकी तीन वर्ग. म्हणजे एकूण १२ वर्ग. त्यात प्रत्येकी ५० मुले. म्हणजे एकूण ६०० मुले, त्याच्यावर शिक्षक, मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे सगळं लवाजमा म्हणजे ७०० लोक तरी येणार. आणि त्यांच्या समोर आपण काय बोलणार? मी जरा निगोशिएट करून बघितले पण बाई ऐकायला तयारच नव्हत्या. घरी गेलो. हात पाय वगैरे धुवून देवापाशी जाऊन बसलो. तीर्थरुपांनी ओळखले कि चिरंजीवांनी काहीतरी दिवा लावलेला आहे. 

मग त्यांना सांगितले कि असे असे भाषण उद्या करायचे आहे म्हणून! मग त्यांनी अधिक वेळ वाया न घालवता मला "लोकमान्य टिळक" या विषयावर एक भाषण लिहून दिले. ते मी बसून त्या रात्रीत पाठ केले. म्हणजे १४ ऑगस्ट १९४७ ला नेहरूंनी देखील केली नसे अशी तयारी मी करत बसलो होतो रात्री उशिरा पर्यंत!! चिरंजीव काहीतरी चांगले करत आहेत असे वाटून तीर्थरुपांनी कपड्यांना इस्त्री करून दिली. बुटाला आणि पट्ट्याला पोलिश करून दिले. वा!!  मी मनात म्हटले कि अशी जर सेवा मिळणार असेल तर मी रोज एकेका विषयावर भाषण करायला तयार आहे. तर सगळा जमा निमा करून गेलो. झेंडा वंदन झाल्यावर माझे भाषण होणार असे फळ्यावर लिहिले होते. माझी बोबडी वळली होती. सगळी कडे पाणी फवारून मस्त करून घेतले होते. झेंड्याच्या दांडीपुढे मोठी रांगोळी काढायचे काम काही मुली करत होत्या. सगळ्या शाळेत हिरव्या, पिवळ्या, तांबड्या पताका लावल्या होत्या. सगळे वातावरण अतिशय उत्साही आणि भारून गेलेले होते. एवढे सगळे असून मला श्वास कमी पडतोय असे वाटत होते. पोटात जबरदस्त बाक-बुक होत होती. शाळेतल्या बाई, मुख्याध्यापक वगैरे सगळे माझ्या कडे बघून हसत होते. जणू काही मनात म्हणत होते "आता कसा सापडलास रे माकडा"!! छे!! कधी एकदा झेंडा फडकावतात, आणि ते राष्ट्रगीत होते असे झाले होते. कारण ते झाले कि माझे भाषण!! देवा देवा देवा!! हात पाय गार पडले होते. तोंड कोरडे पडले होते. शेवटी एकदा माझ्या भाषणाची वेळ आली. मी पुढे गेलो. पाय कापतच होते. आणि अचानक आपटे बाईंनी माईक वर बोलायला सुरुवात केली. त्यांनी माझी ओळख करून दिली. मी वर्गात किती छान गोष्टी सांगतो वगैरे सांगितले. ते सगळे ऐकून म्हणजे मला आता रडू येणार का काय असे वाटू लागले. त्यांचा आवाज थांबला आणि मी बोलायला सुरुवात केली. खणखणीत पाठ केलेले भाषण जसेच्या तसे म्हणून ७ मिनिटांनी थांबलो. आणि टाळ्यांच्या कडकडाट झाला. त्या कडकडाटात मला फक्त आपटे बाई दिसत होत्या आणि शाळेच्या पटांगणाच्या बाहेर थांबलेले आमचे तीर्थरूप!! कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी भेटून कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांबरोबर फोटो काढला. अर्थात प्रमुख पाहुणे म्हणजे कुणीतरी मामलेदार का तहसीलदार होते आणि आमच्याच शाळेतल्या कुणाचेतरी पालक होते. त्यांनी लगेच त्यांच्या पण मुलाला भाषणात घ्या म्हणून आपटे बाई ना सांगितले. त्यांचे ते शेळपट शेकरू पण तिथेच "पप्पा पप्पा" करत घुटमळत बसले होते. बाईंनी पण काहीतरी सांगायचे म्हणून उगाच "हो हो" म्हणून सांगितले. मला त्याचा असा राग आला होता!! मनात म्हटले, "लेका बापाच्या गाडीत बसून भाषणे करायला येत नसतात. रात्र भर पाठ करावे लागते. आणि तिथे ७०० लोकांच्या समोर जाऊन पोटातून आतडी बाहेर पडत असली तरी उभे राहून पाठ म्हणून दाखवावे लागते. आलाय मोठा भाषण करणारा!!" ते सगळे संपल्यावर मी आपटे बाई ना परत भेटलो. त्यांनी खूप कौतुक केले. मग त्याचा गैर फायदा घेऊन मी त्यांना त्या पोराबद्दलची नाराजी बोलून दाखवली. मग मात्र बाई थोड्याश्या रागावल्या. म्हणाल्या कि, "आपले नाणे आपण सिद्ध केले पाहिजे. आता २६ जानेवारीला तुझी आणि त्याची मी स्पर्धा घेणार आहे. त्यात जो चांगला बोलेल त्यालाच २६ जानेवारीला बोलायची संधी मिळेल." आता काय बोलणार!! 

वास्तविक अमोल तर बाईंचा मुलगा होता. बाईंना त्याला किती तरी संधी अशाच देता आल्या असत्या. पण त्यांनी तसे कधीही केले नाही. कधी कधी अमोल ला शिक्षा वगैरे पण द्यायच्या त्याच्या वर्गाच्या बाई!! पण कधी आपटे बाईंनी त्याची रदबदली केलेली मी पाहिली नाही. किंवा उगाच घ्या त्याला भाषणात, घ्या त्याला गाण्यात. असलेही कधी केले नाही. त्याचे हस्ताक्षर उत्तम होते. त्याची चित्रकला पण छान होती. तो उत्तम खेळ खेळायचा. त्यासाठी बाईंनी त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. पण कधीही partiality केली नाही. कदाचित त्या वेळी अमोलला ते आवडत देखील नसेल!! पण त्याची पर्वा न करता, शाळेतली सर्वच मुले आपली आहेत अशा समसमान न्यायानेच त्या वागल्या.   

या भाषणानंतर मी असंख्य भाषणे केली. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या. फड गाजवले. पण त्या सर्वांची ऊर्जा आणि प्रेरणा हि या पहिल्या भाषणातूनच येत आलेली आहे.  

अजून एक प्रसंग सांगायलाच हवा. आमच्या वर्गा शेजारी चौथीच्या मुलांचा वर्ग होता. ती मुले वयाने मोठी होती. मग ती आमच्यावर फार दादागिरी करायची. उगाच मुलांना वर्गात ढकल. वर्गाचे दार बाहेरून लावून घे. वर्गाच्या बाहेर येताना मुलांना पायात पाय घालून पाड असे उद्योग चालायचे. एक दिवस त्या पोरांनी मलाच पाडले. पोरं वयानं मोठी असली तरी तब्बेतीने  किरकोळच होती!! म्हटले द्यावा एक दणका ठेवून!! आणि त्या पोरट्याला दिला पण एक सणसणीत!! ते मागे जाऊन पडले बाकावर!! आता पहिलीतल्या मुलाने चौथीतल्या मुलाला ठोकला. हि बातमी शाळा भर पसरली. मग त्याच्या वर्गातली सगळी मुले मला मारायला धावली. आता म्हणजे अगदी पावनखिंडी सारखा प्रकार झाला. लढणे हा एकमेव मार्ग माझ्या समोर होता. पण आता हातात लाकड्याच्या पट्ट्या वगैरे घेतलेल्या १०-१२ मुलांना कसे काय आवरायचे? शेवटी पक्का निर्धार करून कमरेचा पट्टा काढला आणि बाजी प्रभूंचे स्मरण ठेवून पट्ट्याची हात घाई सुरु केली. त्यांच्याच वर्गात, त्यांचे सैनिक जखमी होऊ लागले. बाहेर प्रेक्षक वाढू लागले. गलका बघून मुख्याध्यापिका बाई प्रत्यक्ष आल्या. त्या आल्यात हे बघून ती सर्व मुले एकदम शांत झाली आणि मग ती बहुतेक आपल्या शौर्यानेच शांत झाली असे वाटून मी निकराचा मारा चालूच ठेवला. म्हणजे आता चित्र असे होते कि मी एकटाच मारामारी करतोय!! याला नशीब म्हणतात हे नंतर कळाले. तो सगळा प्रकार बघून शाळेतले शिक्षक, शिपाई पळत आले. आणि अर्थात या सर्व कृष्ण कृत्याचे निर्माते म्हणून आमची रवानगी मुख्याध्यापकांकडे झाली. मग माझी सडकून चौकशी झाली. अर्थात पुढे शाळेने पट्टा काढून घेतला. घरी गेलो. तीर्थरुपांनी विचारले पट्टा कुठे आहे म्हणून!! मी काहीतरी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण त्याने त्या inspector general of police चे काही समाधान झाले नाही. त्यांनी लगोलग आमची पालखी शाळेत नेली. तिथे मुख्याध्यापक बाईंनी त्यांना सांगायची ती बाजू सांगितली. म्हटले आता काही खरे नाही. त्या सगळ्या प्रकाराने तीर्थरूप इतके संतापले कि त्यांनी मला त्या शाळेतून काढून त्या आधीच्या सरकारी शाळेत घालायचा निर्णय घेतला. मला काय होते आहे हे कळायचे ते वय नव्हतेच. पण ते जुने व्यायाम वाले दोस्त भेटणार म्हणून थोडा आनंद देखील झाला होता. पण नंतर कळले कि तिथे आपटे बाई नाहीत. मग मला काही बोलणे सुचेना. डोळ्यातून पाणी यायला लागले. मी तीर्थरुपांना एकाच विनंती केली कि आपण एकदा आपटे बाई ना भेटू म्हणून!! ती त्यांनी ऐकली आणि मला घेऊन ते आपटे बाईंच्या घरी गेले. तिथे बाई जे बोलल्या ते फार महत्वाचे होते. त्यांनी माझे समर्थन केले नाही. पण एक संधी देण्याबद्दल शब्द नक्की टाकला. माफीनामे लिहून घेतले नाहीत कि पाया पडून घेतले नाही. त्यांनी एक जबरदस्त विश्वास दाखवला. झाल्या प्रसंगाने मी देखील खजील झालो होतो. पण नंतर संपूर्ण चार वर्षात बाईंनी त्या विषयी चकार शब्द देखील काढला नाही. प्रत्येक वेळेला शिक्षेची गरज असतेच असं नाही. चूक उलगडून दाखवणे जास्त महत्वाचे!! People forget what you said to them. But they never forget how you made them feel!!  

नंतर पुढे मग कितीतरी वर्षे मकरसंक्रांतीला बाईंना तिळगुळ वगैरे द्यायला जायचो त्यांच्या घरी!! २ वर्षां पूर्वी फेसबुक वरती बाई भेटल्या. खूप आनंद झाला. अमोल कडून त्यांचा नंबर घेऊन त्यांना फोन केला. खूप वेळ बोलल्या. मुलींची, बायकोची चौकशी केली. काय करतोस म्हणाल्या. मिरजेला येऊन जा म्हणाल्या. 

त्यांनी दिलेली संधी मी काही अगदीच वाया घालवली नाही हे बघून कदाचित त्यांना थोडं बरं वाटलं असावं. 

माणसे येतात. प्रसंग घडून जातात आणि शेवटी भास आणि आठवणीच राहतात! 
ग्रेसची एक कविता आठवत राहते. 

सावल्या विसावल्या, विश्वतेज मावळे 
आरतीत नादतील, सजल सांध्य देउळे ।।

सांद्र रंग, सूर संथ, क्षितीज स्फुन्दते अबोल  
मूक वर्तुळात शब्द, शुन्य हा विराट गोल ।।

गगन हे कुठे सरे नि, रंग हा कसा निळा?
दूर पाहतो उदास, संथ भास एकला ।।

मी इथे व्यथालयात, दु:ख सांगतो तुला 
घे मला कुशीत आज, पावलांत शृंखला ।।

संपणार ना कधीही, रात्र घोर पापिणी 
ओंजळीत हि फुले नि, आसवांत पापणी ।।      

गंगे मध्ये सोडलेले दिवे परत येत नसतातच. पण त्यांनी केलेला प्रकाशाचा संस्कार हा चिरकाल टिकणारा असतो. 
त्या प्रकाशाच्या संस्काराला हि फुले ठेवावीशी वाटतात आणि पापण्या ओल्या होतच राहतात. 

 ~ निखिल कुलकर्णी