Thursday, April 9, 2015

एकंकार

त्या दिवशी तो आणि त्याची प्रेयसी लवकर उठून कुठेतरी जायला निघाले. लोन्ग वीकेंड होता. त्याने आणि तिने जोडून ४ दिवस सुट्टी काढली होती. त्यामुळे धमाल करायची या हिशेबाने गेले २-३ दिवस तयारी सुरु  होती. बोट घेऊन समुद्रात मनसोक्त भटकायचा मनसुबा होता. त्याने त्याची बोट त्याच्या गाडीला जोडली. दोघांनी २ सायकली घेतल्या. समुद्रावर निवांत बसायला म्हणून दोन खुर्च्या आणि एक उभट छत्री घेतली. त्याच्या मित्राने त्याला एक समुद्रातले ठिकाण सांगितले होते. ते एक निर्मनुष्य बेट असून त्याची माहिती खूप कमी लोकांना होती. दोघांच्याही मनात अनामिक चाल-बिचल चालू होती. निर्मनुष्य बेटावर आयुष्यातली सर्व सुखे सोबत घेऊन निवांत पडून राहण्याने देखील स्वर्गात असल्याचा आनंद मिळणार होता. सचैल, स्वैर आणि उन्मत्त होता येणार होते. बंधन कसलेच नव्हते. सुमारे दोन अडीच तास गाडी चालवून ते दोघे समुद्राच्या किनाऱ्यावर पोचले. जेट्टी पाशी बोट सोडली आणि पुढचा पाण्यातला प्रवास सुरु झाला.

अतिशय रमणीय परिसर होता. किनाऱ्यावर भणाण वारा सुटला होता. दोघांची वृत्ती फुलु लागली होती. वाऱ्यावर उडणारे तिचे सोनेरी केस पाहून त्याचा धीर सुटत चालला होता. एका बाजूने बऱ्याच आत पर्यंत डोंगर समुद्रात घुसत गेला होता. त्याचे सुटणारे कडे विलोभनीय वाटत होते. बोट वेगात चालली होती. त्या डोंगराच्या एका बाजूने पुढे गेल्यावर मुख्य समुद्र लागणार होता. निळे मोकळे आकाश, त्याचे पाण्यात पडलेले तितकेच निळे नितळ रुपडे पहात दोघेही एकमेकांना घट्ट बिलगून बसली होती. पाणी इतके नितळ होते कि त्यातल्या वनस्पतींची अलगद हालचाल मोठी मोहक वाटत होती. त्यात चाललेली माशांची चल-बिचल अगदी स्पष्ट दिसत होती. त्यातले काही मासे तर मधेच पाण्याच्या वर उडी मारत होते. सूर्याचे उभे किरण आडव्या-तिडव्या लाटांवर आणि उडणाऱ्या माशांवर मनसोक्त पडत होते आणि मग भली मोठी रांगोळी चमकून उठत होती. त्यांना बघता बघता किनारा कधी दिसायचा बंद झाला ते कळलेही नाही. आता सर्व बाजूनी फक्त जड निळे पाणी दिसू लागले होते. पाण्याच्या दबाव इतका होता, कि एकेका लाटेबरोबर, बोट अगदी लीलया वर खाली होत होती. अचानक कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला वळत होती. पण त्याचे त्या दोघानाही काहीही नव्हते. इथे कुणाला धडकायची किंवा कुणाच्या अंगावर जाण्याची कसलीच भीती नव्हती. अथांग समुद्रावर मुक्त विहार करता येणार होता. आकाश कुठे संपते आणि पाणी कुठे चालू होते हे देखील कळेनासे झाले होते. अखंड निळ्या गोलकात कुठल्याही दिशेला कसेही जाण्याचा अनुभव जगावेगळा होता. ते दोघे सोडले तर फक्त आकाशातला सूर्य जुन्या ओळखीचा होता. समुद्राचा वारा शहारे आणत होता आणि सुर्य उबेची पांघर देत होता. बाकी सर्व नवीन होते. अजून बराच प्रवास बाकी होता. त्याने बोटीचा वेग आणि दिशा पक्की केली आणि दोघेही बोटीत निवांत पडून राहिले. आता संध्याकाळ होत आली. सूर्याने एका बाजूला आकाश रंगवायला घेतले. त्याचे रंग तुरळक आणि विरळ ढगांनी आपल्याला लावून घेतले आणि त्यांची लालसर केशरी रंगांची झुंबरे झाली. त्यांच्या नक्ष्या बघत दोघेही आकाश पहात राहिले. हळु हळु सूर्य दिसेनासा झाला. एका बाजूने चांदण्या दिसायला लागल्या. आत्ता पर्यंत निळे दिसणारे पाणी आता काळेभोर दिसू लागले. बोटीचे दिवे सोडले तर इतर कुठलाच प्रकाश नव्हता. त्यामुळे नित्य नवा रस्ता काढत पुढे चालल्या सारखे वाटत होते. त्याला आपण अंधारही पहिल्यांदाच पहात आहोत असा त्याला भास होत होता. उघड्या डोळ्यांनी अंधार पाहून त्याला त्याचीही गम्मत वाटली. बोटीमध्ये कसला तरी आवाज आला म्हणून त्याने उठून पाहिले. त्याचे ठिकाण आता जवळ आले होते. जीपीएस मध्ये त्याचा अलार्म वाजत होता. दोघेही गडबडीने उठले. सवईने अंगावरचे कपडे  ठीक करताना दोघानाही आपलेच हसू आले. एका बाजूला छोटासा डोंगर पुसट दिसू लागला. हेच आपले ठिकाण असल्याची दोघांचीही खात्री झाली. तिने सामानाची बांधा बांध केली आणि त्याने बोट किनाऱ्याला लावायला घेतली. मित्राने सांगितल्या सारखे त्याने त्या डोंगराच्या एका बाजूला बोट वळवली. त्या बाजूला झाडांच्या मुळ्या पाण्यात उतरल्या होत्या. त्याच्यात त्याने बोट घुसवून ठेवली. आणि एकेक करत दोघेही त्या बेटावर उतरली. काही मुळ्या खूप बारीक असून त्यांची जाळी तयार झाली होती. अहोरात्र समुद्राचा वारा पिउन त्यावर हिरवट काळपट शेवळ्याचा थर चढला होता. कसला तरी उग्रट वनस्पतीचा वास सगळीकडे भरून राहिला होता. समुद्राच्या लाटांचा आवाज सोडला तर इतर कसलीही जाग नव्हती. अंधारात अंदाज घेत आधी ती त्या बेटावर उतरली. मुळ्यां च्या जाळी मध्ये बोट बांधून तो ही अलगद पणे त्या बेटावर उतरला. प्रत्येक अनुभव नविन  होता. यातले काहीही त्यांनी या आधी कधीही अनुभवले नव्हते. निर्मनुष्य, निर्जन जागेचा वास त्याला पहिल्यांदाच जाणवत होता. निराकार शांततेत त्याचे कान नेहमीच्या आवाजांचा शोध घेत होते आणि ते ओळखीचे आवाज न मिळाल्याने चुकल्यासारखे वाटून पुन्हा शोध घ्यायला लागत होते. शांततेलाही एक विषण्ण असा आवाज असतो हे देखील त्याला पहिल्यांदाच जाणवत होते. बत्तीच्या प्रकाशात देखील आपण नेमके काय धरत आहोत हे दिसत नव्हते. त्याचा परिणाम म्हणून दोघेही अगदी मुके असल्यासारखे शुन्य होऊन एकेक पाय मोजून ठेवत होते. इतक्यात तिने धरलेली एक मुळी अचानक वळवळली. तिने जीवाच्या आकांताने दुसऱ्या हातातील कुऱ्हाड झपाट्याने त्या वेली वर मारली. आणि क्षणात एक फुत्कार झाला आणि तिच्या अंगावर कसल्यातरी द्रवाचा सडा पडला. त्याने बत्तीच्या प्रकाशात पाहिले एका मोठ्या सापाचे तुकडे एका मुळी वर लोंबत होते. दोघांनी एकमेकांना टाळी दिली आणि त्यांची पाऊले अधिक विश्वासाने पडायला लागली. थोडे अंतर चढून गेल्यावर खडकाळ भाग लागला. समुद्र आता खूप खाली दिसत होता.लाटांचा आवाज देखील बराच क्षीण झाला होता. तिथे मग दोघांनी जमिनीला पाठ टेकली. चंद्र स्वच्छ धुवून, घासून पुसून ठेवल्यासारखा शुभ्र दिसत होता. आकाशातले तारे देखील नवीन  कोरे दिसत होते. काळ्या मखमली वर हिऱ्याची नक्षी  काढल्या सारखे दिसणारे ताऱ्यांचे पुंजके पाहून त्या दोघांचेही भान हरपून गेले. तारे आणि डोळे यातील अंतर संपून ते तारे अगदी जवळ असल्या सारखा भास होऊ लागला. डोळे मग त्या ताऱ्या मध्ये ओळखीचे आकार शोधू लागले. कुठे मेंढीचा तर कुठे माशाचा आकार स्पष्ट दिसू लागला. मधेच एखादा तारा सुटून दिसेनासा होत होता. त्याच्या जाण्याने नक्षी परत बदलत होती. त्याचाच त्याला एक चाळा होऊन बसला. अचानक पायावर काहीतरी मुंगी सारखे चालते आहे असे वाटून त्याने पाय झटकून पाहिले. थोड्यावेळाने परत काहीतरी अंगावर चालत आहे असे वाटले म्हणून त्याने अंदाजाने पायावर हात मारला. त्याच्या हाता खाली चिरडून काहीतरी मेले आणि त्याचा गोड गुळ्मट वास आला. त्याने हात पुसून घेतले आणि पिशवीतून कसली तरी बाटली काढून ते बसले होते त्या जागेभोवती गोल रिंगण तयार केले. आणि तिला म्हणाला "कसल्या तरी मुंग्या आहेत असे दिसते. या स्प्रेच्या पुढे यायच्या नाहीत." तिने हसून मान हलवली. एका बाजूने आकाश परत रंगू लागले होते. तांबूस गुलाबी रंगाच्या छटा विखरून दिसायला लागल्या. अशा अज्ञात जागी परत एकदा ओळखीचा सूर्य पाहून दोघेही हरखून गेले. अजून हवा ओलीच  होती. त्यात धुक्याचा कुंद पणा ही जाणवू लागला. मग त्यांनी पिशवीतून तंबूचे सामान काढून छोटासा निवारा तयार केला. आणि अंगावर पांघरूण घेऊन दोघेही पडून राहिले. पूर्व क्षितिजावर सूर्य दिसायला लागला तसे त्यांचे कुतूहल चाळवले. दोघेही तंबूतून बाहेर येउन त्यांनी खाली एक नजर टाकली. खूप खाली समुद्र दिसत होता. त्याच्या लाटा बेटावर धडकत होत्या. त्या लाटांवर त्यांची बोट एखाद्या ठिपक्या सारखी हिंदकाळत होती. हा एवढा मोठा कडा आपण रात्री कसा चढून आलो याचे त्यांना आश्चर्य वाटले. थोड्याच अंतरावर काळपट पिवळसर सापाचे तुटलेले दोन तुकडे त्यांना दिसले. दोघांनी हसून एकमेकांना आलिंगन दिले. एकूण एक अनुभव नविन होता. प्रत्येक क्षणाला काहीतरी नविन दिसत होते. ऐकू येत होते. त्यांनी त्या टेकडीवर फेरफटका मारायला सुरुवात केली. सर्व बाजूनी अजस्त्र समुद्र होता. त्याच्या वरच्या अविरत हलणाऱ्या लाटा पाहून क्वचित तो श्वास घेत आहे कि काय असा भास होत होता. त्या समुद्राच्या तुलनेत ते बेट इतके छोटे दिसत होते कि एखादी मोठी लाट सुद्धा त्याला गिळून टाकेल का काय असे वाटत होते. चालत चालत दोघे बेटाच्या दुसऱ्या टोकाला आले. तिथून खाली पाहिले असता त्यांना वाळूचा किनारा दिसला. पांढरी शुभ्र वाळू सर्वत्र पसरली होती. सदोदित आदळणाऱ्या लाटांनी तिची किनार सारखी बदलत होती. टेकडीच्या वरून खाली कापूस पसरून ठेवल्या सारखा दिसत होता. मध्येच शिंपल्याच्या कवचांची नक्षी दिसत होती. मित्राने सांगितलेली ओळख पटली आणि दोघेही परत तंबू कडे धावत सुटली. तंबू आणि इतर सामान गुंडाळून घेऊन गुंडाळून धावतच परत आली. आणि अतिशय अधीर पणे टेकडी उतरू लागली. त्या बाजूला टेकडीची चढण देखील पहिल्या बाजू पेक्षा खूप कमी होती. बघता बघता दोघेही त्या वाळूच्या किनाऱ्यावर पोचली. वाळूचा मऊ थंडगार स्पर्श अंगावर रोमांच आणत होता. प्रत्येक पावलागणिक किनाऱ्या वर त्यांच्या पायांच्या ठश्यांची नक्षी तयार होत होती. त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांचे त्यांनाच हसू आले. एका मागोमाग चालत आलेले २ पायांचे २ जोड मोठे गमतीदार दिसत होते. परत एकदा समुद्राचा आवाज जाणवू लागला. हातातले सामान टाकून दोघेही धावतच समुद्रात गेले. मनसोक्त, सचैल डुंबले. कसलाही आवाज नव्हता. कसलीही चाहूल नव्हती. कसलेही बंधन नव्हते. दोघे मनसोक्त पाण्यात खेळले आणि मग किनाऱ्यावर येउन पडले. मौ ओल्या वाळूवर पडून सूर्य त्यांनी आधीही पाहिला होता पण आज त्या निर्मनुष्य बेटावर तो सूर्य हि नवीन दिसत होता. त्या वाळूत गाडून घेतले असता बरेच रोग नाहीसे होतात असे त्याचा मित्र त्याला म्हणाला होता. त्याची त्याला आठवण झाली म्हणून त्या दोघांनी खड्डा करायला घेतला. आता समुद्राचा आवाज जाणवेल इतका वाढला होता. लाटा मोठ्ठ्या दिसत होत्या आणि बऱ्याच वेगाने किनाऱ्या वर आदळत होत्या. दोघांना त्याचे आता काही वाटेनासे झाले. चांगला पुरुषभर उंचीचा खड्डा तयार झाला. शेजारी वाळूचा डोंगर तयार झाला. त्यातून गडबडीने खेकडे बाहेर पडत होते. सुरवातीला अचानक खेकडे पाहून दोघेही दचकले. पण नंतर त्यांनी सपासप फावडे चालवून त्या खेकड्यना मारून टाकले. शेजारी मेलेल्या खेकड्यांचा खच पडला होता. आता तो त्या खड्ड्यात उतरला. त्याचे फक्त डोके  जमिनीच्या वर दिसत होते. गम्मत म्हणून त्याने एक दोन वेळा खड्ड्यातून आत बाहेर करून पाहिले. सर्व व्यवस्थित आहे याची खात्री झाली आणि मग तो परत खड्ड्यात उतरला. तिने मग शेजारच्या ढिगातली वाळू त्याच्या भोवती खड्ड्यात टाकायला सुरुवात केली. बघता बघता त्याच्या आजूबाजूची जागा पूर्ण भरून गेली. आता त्याचे संपूर्ण धड वाळूत होते आणि डोके वाळूच्या बाहेर!! त्याची त्याला मोठी गम्मत वाटत होती. हात पाय असून ते हलवता न येण्याचा अनुभव तो पहिल्यानेच घेत होता. शिवाय जमिनीच्या इतक्या जवळून वाळू आणि समुद्र पाहून तो हरकून गेला होता. वाळूचा एकेक कण खूप मोठा दिसत होता आणि समुद्राच्या लाटा विचित्र दिसत होत्या. तिला देखील तो वेगळाच दिसत होता. तंबूचे सामान लावावे म्हणून ती वळली आणि अचानक एक खूप मोठी लाट भिंती सारखी किनाऱ्यावर येउन आदळली. काही कळायच्या आत सर्व बेट पाण्याने भरून गेले. आणि पुढच्याच लाटेबरोबर त्या बेटावरचे बरेचसे समुद्रात वाहून गेले. याच्यात ती सुद्धा वाहून गेली. थोड्या वेळाने समुद्र शांत झाला. काही वेळातच बेट पुन्हा पहिल्या सारखे दिसू लागले. वाळूचा किनाराही महापुरात धोपटून निघालेल्या नदीच्या काठा सारखा दिसू लागला. त्याचे डोकेही स्पष्ट दिसू लागले. नाका तोंडात पाणी जाउन तो बेशुद्ध झाला होता. त्याच्या भोवती सागरी वनस्पतींचे गचपण झाले होते. मेलेल्या माशांचा खच पडला होता. बऱ्याच वेळाने सूर्याची तिरीप पडून आणि माशांचा वास असह्य होऊन त्याला शुद्ध आली. 

पाहतो तो त्याच्या आजूबाजूला सर्वत्र सागरी वनस्पतींचा वेढा पडला होता. अगदी डोळ्याच्या समोर मेलेले मासे देवमाशासारखे मोठे दिसत होते. त्याने घाबरून धावण्यासाठी पाय हलवून पाहिले. पण त्याच्या खड्ड्यातली वाळू पाण्याने अजून पक्की झाली होती. आता त्याचे पाय तसूभरही हलले नाहीत. त्याचे त्यालाच वैषम्य वाटले. अतिशय रागाने बेभान होऊन त्याने हात हलवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे हातही हलेनात. त्याने त्याच्या प्रेयसीला जोरजोराने हाका मारायला सुरुवात केली. पण त्याला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. समुद्राच्या लाटा तितक्याच निर्विघ्नपणे आवाज करत किनाऱ्यावर आदळत राहिल्या. अतिशय संतापाने तो खूप जोराने ओरडू लागला. ओरडून ओरडून त्याच्या शिरा फुटतात कि काय असे वाटू लागले. आपली सर्व हालचाल संपली आहे याचा अनुभव त्याला पहील्यांदाच येत होता. 

त्या जाणिवेने त्याला रडू यायला लागले. पण त्याच्या समोरची एकही वनस्पती टिचभर देखील हलली नाही. बराच वेळ झाल्यानंतर तो शांत झाला. आपले हात-पाय कसे अडकून बसले, आपली प्रेयसी कुठे गेली, हि एवढी मोठी लाट का आली, या वनस्पती माझ्या भोवती कशा आल्या यासारखे असंख्य प्रश्न त्याला पडू लागले. देवाचा धावा करू लागला. स्वत:शीच मोठ मोठ्याने बोलायला लागला. बोलता बोलता अति श्रमाने कधीतरी त्याला झोप लागली. 

चेहऱ्यावर काहीतरी मुंगी सारखे चालते आहे असे वाटून त्याने झोपेतच हात हलवण्याच्या प्रयत्न करून पाहिला आणि त्याला परत जाग आली. त्याच्याभोवती लालसर काळपट मुंग्या एका ओळीत चालल्या असून क्वचित एखादी मुंगी रांग मोडून बाजूला जात होती. त्याला पाहून पुन्हा रांगेत सामील होत होती. त्या मुंग्याना काल रात्रीच्या मुंगी सारखाच गोड गुळमट वास येत होता. मुंगी पाहताच त्याचे हात शिवशिवत होते. हात हालत नाहीत याची जाणीव झाल्यावर पळून  जाण्यासाठी त्याचे पाय धडपडू लागले. परंतु यातले काहीही हलणार नव्हते. संतापाने त्याच्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या. जीवाच्या आकांताने तो ओरडला. त्याचे डोळे लालभडक झाले. डोळ्यांच्या पापण्या, ओठ आणि जीभ सोडली तर सर्व काही जखडून गेले होते. या तिन्ही पैकी कशाचाही त्याला कसलाही उपयोग होणार नव्हता. त्याने आकाशाकडे पाहिले तर सूर्य उगवत होता. परत एकदा आकाश तसेच केशरी गुलाबी रंगानी सजून आले होते. पक्षी त्यावर कसल्या कसल्या नक्षा काढत उडत होते. पण आता त्याला तेही परके वाटू लागले. जीवाच्या आकांताने तो त्या खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. आपण पक्षी असतो तर कदाचित बरे झाले असते असे त्याला वाटले. आपल्याला हात-पायांच्या ऐवजी पंख असते तर असे आपणही या गचपणातून उंच उडालो असतो असे त्याला वाटले. त्याच विचारात असताना त्याने ओरडून पक्षाना बोलावण्याचा प्रयत्न केला. वाऱ्याच्या आणि समुद्राच्या घनगंभीर आवाजात त्याचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. पक्षी आले तसे उडत निघून गेले. पक्षी गेले त्या दिशेकडे तो बराच वेळ पहात होता. आपल्याच दातांनी  करकचून चावून त्याचे ओठ रक्तबंबाळ झाले होते. त्यातून सांडणारे रक्त ओघळाने वाळूत जात होते. त्याला मुंग्या लागल्या होत्या. 

पोटात अन्नाचा कण नाही. पाण्याचा थेंब नाही असे २ दिवस गेले. प्रत्येक क्षण खूप मोठा वाटत होता. सूर्य नियमाने उगवत होता. डोक्यावर येत होता आणि मावळत होता. परंतु आता त्याची शक्ती अतिशय क्षीण झाली होती. ज्याचा त्याला अजूनही विश्वास वाटत होता तो आवाज हि आता फुटायचा बंद झाला. हळू हळू दृष्टी क्षीण होऊ लागली. त्याला कुणीतरी हाक मारते आहे असा भास झाला म्हणून त्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. अर्धमेल्या डोळ्यांनी त्याने पाहिले तर एक मुंगी त्याच्या समोर येउन थांबली होती. मुंगीचे डोळे विक्राळ दिसत होते. तिच्या एका चाव्याने देखील आता आपण गतप्राण होऊ कि काय अशी त्याच्या मनाची घालमेल चालली होती. आता जे काय होईल होईल ते होईल अशी मनाची तयारी करून त्याने परत एकदा डोळे मिटले. इतक्यात त्याला आवाज ऐकू आला "जागा झालास का मित्रा?" त्याचा त्याच्या कानावर विश्वास बसेना. क्षणभर त्याचा मित्र त्याला न्यायला आला कि काय असेल असे वाटून तो हरखून गेला. त्याचे आभार मानायचे का त्याला शिव्याची लाखोली घालायची याची मनात घुसमट झाली. पण हा आवाज त्याच्या मित्रा सारखा वाटत नव्हता. म्हणून त्याने जीवाच्या कराराने डोळे उघडले. पाहतो तर त्याच्या भोवती असंख्य मुंग्या जमल्या होत्या. 

त्यातलीच एक मुंगी त्याला म्हणाली, "मित्रा कसा आहेस? वास्तविक बरेच दिवस तुझ्याशी बोलायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत." त्याच्या घशातून कसली तरी खरखर ऐकू आली. त्यावर ती मुंगी म्हणाली "तू इथे आलास तेव्हाच आम्हाला असे वाटले होते कि आपला कधीतरी संवाद होणार आहे.". तो म्हणाला "संवाद? मुंग्यांशी? मला वेड लागते आहे काय? मी हे काय बोलतोय? मुंग्या माणसाशी बोलतील काय?" त्यावर एक मुंगी म्हणाली "का नाही मित्रा? गेल्या २-३ दिवसात घरातून निघाल्या पासून तू असंख्य नवीन अनुभव घेतले आहेस. हाही एक नवीन अनुभव!!" असे म्हणून त्या मुंग्या हसू लागल्या. त्यावर तो म्हणाला " मी इथे डोक्यावर सूर्य घेऊन आणि डोळ्यासमोर अजस्त्र समुद्र घेऊन, हात-पाय  बद्ध झालेल्या अवस्थेत असताना तुम्हाला आज माझ्याशी  बोलावेसे का वाटते आहे? हात-पाय बांधलेला माणूस बघून तुमची भीती चेपलेली दिसते. आता मला अजून कसली भीती दाखवणार आहात?". तो काहीच बोलत नाही हे पाहून परत एक मुंगी म्हणाली "एक लक्षात घे. आम्ही छोट्या असलो तरी संख्येने असंख्य आहोत. वास्तविक हात आणि पाय बांधून घातलेल्या तुझ्यावर हल्ला करून तुझा जीव घेण्या इतके सामर्थ्य आमच्यात नक्कीच आहे. मनात आणले तर आम्ही तुझ्या डोक्याच्या आणि हे खेकडे तुझ्या शरीराच्या राई-राई एवढ्या चिंधड्या करू शकतो." हे एकून तो त्वेषाने म्हणाला "मग का मारत नाही? मारून टाका. म्हणजे सुटेन मी यातून!" त्यावर एक मुंगी म्हणाली "तुझी वेळ आली कि  तुझी सुटका होईलच. पण आमचे त्यासाठी प्रयोजन नाही. तुझी सुटका अथवा तुझा मृत्यू याच्याशी आम्हाला काहीही घेणे-देणे नाही." यावर तो अजून डिवचला गेला. 

त्यावर एक मुंगी म्हणाली, "तुझी आम्हाला कसली भीती रे! आम्हाला तू मारशील याची? छे! मरणाची किंवा कसलीच भीती आम्हाला नाही. जिथे मी तुझ्या पासून वेगळा आहे हा विचार सुरु होतो तेव्हा मला माझ्या अस्तित्वाची काळजी वाटू लागते. आणि त्यातून पुढे भीती जन्म घेते. आणि एकदा का मेंदूने भीतीची चव घेतली कि त्याला ती आवडते आणि तो भीतीचा व्यसनी होऊन जातो. तर ते एक असो. पण आता तुझे हात पाय बध्द झाले. त्याने तुझे विकार शांत झाले  असतील असे आम्हाला वाटले होते निश्चित. पण तुझा अवतार बघून असे वाटते कि अजून तुझे विचार आणि शंका शाबूतच आहेत मित्रा!!" हात-पाय बद्ध होण्याचा आणि राग शांत होण्याची संगती लागल्याने तो विचलित झाला. 

मुंगीच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ तो मनातल्या मनात लावू लागला. त्याच्या कपाळावर आणि डोळ्यांच्या बाजूला असंख्य आठ्या पडल्या. कपाळावरची शीर तट्ट फुगली. ते पाहून एक मुंगी म्हणाली "घाबरू नकोस. आम्ही तुला काहीही करणार नाही. तू अशा अवस्थेत आहेत कि ज्याच्यात तुला आम्ही काही करण्याची गरज देखील नाही. आम्हाला फक्त तुझ्याशी बोलायचे आहे. आज आम्ही तुला आमची गोष्ट सांगणार आहोत. ऐकशील का?" त्याने नुसतीच बारीकशी मान हलवली. ते पाहून एक मुंगी म्हणाली "अरे आम्ही पण या बेटावर बाहेरूनच आलो. कित्येक शतकांपूर्वी आमचे पूर्वज कुठल्या तरी ओण्डक्यावर बसून इथे आले. तेव्हा पासून आम्ही इथेच आहोत. कित्येक पिढ्या आम्ही याच बेटावर आहोत. आमच्या काही पूर्वजांनी माणसात असतो तसा देव देखील तयार करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. ती जी उंच टेकडी तू आधी पाहिलीस त्यावर एक खूप मोठे मुंगीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक प्रचंड अशी मुंगीची मूर्ती होती. त्या मुंगीला एक हजार डोकी होती. आठ हजार पाय होते. तिच्या एकेका हातात साखरेच्या गोण्या होत्या. कित्येक पिढ्यांनी त्या मूर्तीची देव म्हणून पूजा-अर्चा केली. आरत्या केल्या. महाप्रसाद घातले. आणि एक दिवशी अचानक परवा सारखीच एक मोठी लाट आली आणि त्यात त्या मूर्ती सहित ते देउळ देखील वाहून गेले." मुंगीची हि कथा ऐकून त्याही अवस्थेत त्याला वीट येवू लागला. त्यावर दुसरी एक मुंगी म्हणाली "अरे मुंग्यांचे काय घेऊन बसलास, ते खेकडे तू पाहिलेस ना? त्यांचे देखील याच टेकडीवर देउळ होते. त्यांनी देखील अशीच मूर्ती बसवली होती. त्यांचे देउळ देखील दुसऱ्या एका लाटेने वाहून गेले." आता त्याचा राग अनावर झाला. "मला तुमच्या आणि त्या खेकड्यांच्या देवाशी काहीही घेणे देणे नाही. तुम्ही मला हे काय सांगताय? मी इथे अशा अवस्थेत अडकुन पडलो आहे आणि तुम्ही मला कसल्या गोष्टी सांगताय?" त्यावर एक मुंगी म्हणाली "अरे मित्रा तुझी गल्लत इथेच होते आहे. तू अतिशय मोठ्या संकटात आहेस हे तर खरेच आहे. तुला असेही वाटत असेल कि आम्ही तुला या संकटातून बाहेर काढू. सर्वात आधी तू तुझ्यातली शक्ती वापरून पाहिलीस. त्याचा उपयोग होईनासा झाल्यावर तू आधी इतरांना आणि नंतर देवाला हाका घातल्यास. त्यातून  काही निष्पन्न झाले नाही तेव्हा तू तुझ्या नशिबाला दोष द्यायला घेतलेस. पंख हवे होते असे म्हणालास. या सर्वातून जेवढे निष्पन्न व्हायचे तेवढे झाल्यावर तू निवृत्त होण्याच्या मार्गावर लागलास. नेमक्या त्याच क्षणी आम्ही तुला हाक मारली तेव्हा तुला परत आशा उत्पन्न झाली असेल कदाचित कि आम्ही तुला वाचवू. त्या शिवाय का तू आम्हाला बोलू दिले असतेस?" एवढे बोलून मुंग्या परत हसू लागल्या. 

एका मुंगीला आपल्याला वाचवण्याची किंवा मारण्याची संधी मिळावी या पेक्षा अजून दुर्दैव ते काय या विचारात तो असताना एक मुंगी म्हणाली "हे पहा वाईट वाटून घेऊन नकोस. पण या अनवट जागी तू तुझ्या पायाने आला आहेस. हा डोंगर तू तुझ्या हाताने चढला आहेस. तुला ठाऊक आहे काय कि रात्री तू आणि तुझी प्रेयसी ज्याला धरून चढलात ते सगळे सापच होते. रात्रीच्या अंधारात तुला त्या झाडांच्या मुळ्या वाटल्या होत्या. वास्तविक तुझ्या प्रेयसीचा तोल जातोय असे वाटून एक साप तिला आधार देण्यासाठी जागचा हलला तर तुम्ही दोघांनी मिळून त्याचे तुकडे केलेत. इतकी कसली भीती तुला वाटते? वास्तविक हा खड्डा देखील तू तुझ्या मर्जीने काढला आहेस. तुला आठवते? हा खड्डा काढताना इथे तुझ्या आधी राहत असलेले शेकडो खेकडे, ज्यांनी या आधी कधीही सूर्य पाहिला नव्हता, ते देखील आपण होऊन बाहेर पडले होते. पण तू त्यांना देखील निर्दयीपणे मारून काढलेस. एवढा कशाचा राग येतो तुला? सगळे तर तूच आणि तुला वाटेल तसेच करत आला अहेस. तुझ्या या अवस्थे बद्द्ल तुला तुझ्या पेक्षा अजून कुणी जास्त दोषी दिसतो का? खड्ड्यात बंदिस्त झाल्यावर आकाशातल्या पक्षांचे पंख तुला हवे होते असे वाटते. पण आकाशात आपल्याच पंखांनी फिरणाऱ्या पक्षाला गोळी मारून त्याचे पंख निरुपयोगी करताना तुला काहीच कसे वाटत नाही?" 

इतक्यात एका लाटे बरोबर काहीतरी जड वहात येउन किनाऱ्यावर आदळले. त्याने निरखून पाहिले तर तो हाडांचा सांगाडा होता. हाताचा थोडासा भाग सोडला तर बाकी सारे शरीर माशांनी टोचून टोचून खाल्ले होते. हाडांना ठीक ठिकाणी मांसाचे आणि कपड्यांचे लाल पांढरे तुकडे अडकले होते. तो डोळे फाडून त्याच्या कडे पहात होता. तो त्याच्या प्रेयसीचा सांगाडा होता. त्याला अतोनात दु:ख झाले. सर्व शक्ती एकवटून त्याने पुन्हा एकदा हात-पाय झटकण्याचा प्रयत्न करून पाहीला आणि शक्तिपात होऊन पुन्हा बेशुद्ध झाला. रात्री बऱ्याच उशिरा विजांचा कडकडात होऊ लागला आणि अधून मधून पावसाच्या झडी पडू लागल्या. त्याचे पाणी चेहऱ्यावर हजारो सुया एकदम टोचाव्यात तसे टोचू लागले. त्याने तो जागा झाला. आता त्याच्यात कसलेच त्राण शिल्लक राहिले नव्हते. पावसाचे पाणी आडवे-तिडवे तोंडात घुसले आणि त्यानेही त्याला हुशार वाटू लागले. ढग बाजूला गेल्यावर लपलेला चंद्र दिसू लागला आणि त्याच्या प्रकाशात थोडे थोडे दिसू लागले. हाडांचा सांगाडा बाजूलाच पडला होता. त्याच्यावरच्या मासाच्या तुकड्यांना असंख्य मुंग्या लागल्या होत्या. तो जीवाच्या आकांताने ओरडला "हेच का तुमचे तत्त्वज्ञान? मेलेल्या माणसाचे मास खाताना कुठे गेल्या तुमच्या मगाच्या गप्पा? भोंदू लेकाचे!!" नंतर त्याचे त्यालाच हसू आले. आपण कुणाशी बोलतोय असे वाटुन त्याला पुन्हा रडू  आले. पण त्याचा आवाज ऐकून काही मुंग्या त्याच्या जवळ आल्या. त्यातली एक मुंगी त्याला म्हणाली " मित्रा आमच्याशी बोललास ते ऐकून खूप छान वाटले. तुमच्या माणसामध्ये कुणीतरी ज्ञानी होऊन गेल्याचे ऐकले होते. विश्वाला स्वधर्माचा सूर्य मिळो अशी प्रार्थना त्याने केली होती. एका जीवाचे इतर जीवाशी मैत्र जडो अशी प्रार्थना त्याने केली होती. तुला खरे सांगू का? त्याची ती प्रार्थना ऐकल्यावर आम्ही परत देउळ बांधायचा विचार सोडून दिला. आम्हाला आमचा धर्म समाजला. तेव्हा पासून आम्हाला माणसाशी बोलायचे होते. तुला ठाऊक आहे का तो ज्ञानी?". त्याला काय बोलावे ते कळेना. पण त्याची वृत्ती शांत झाली होती. तो म्हणाला "मला मान्य आहे कि मी जिथे आहे त्याला फक्त मीच जबाबदार आहे. पण त्याची शिक्षा माझ्या प्रेयसीला का देताय? त्या समुद्रातल्या दुष्ट माशांनी तिची हत्या केली आता तुम्ही तिची विटंबना का करताय?". बराच वेळ कुणीच काही बोलले नाही. मग एक मुंगी म्हणाली, "मित्रा ज्याला तू शिक्षा म्हणतोस असे काही अस्तित्वात असते का? तुझ्या सोबतीने तुझी प्रेयसी इथे आनंदी होण्यासाठी आली होती. आणि अचानक लाटेच्या झोकात समुद्रात ओढली गेली. तिने सुद्धा तुझ्या सारखे वाळूत गाडून घेतले असते तर कदाचित ती देखील आत्ता तुझ्या बाजूलाच मरणाची वाट बघत बसली नसती काय? हा सगळा जर-तर चा भाग आहे. ती वाळूत नव्हती. मला असे वाटते कि इथे प्रत्येकाने आपला धर्म पाळला आहे. खड्डा काढून तुझ्या आनंदात सामील होण्याचा धर्म तिने पाळला. जमिनीवर ओढ घेऊन परत समुद्रात जाण्याचा धर्म लाटेने पाळला. आल्या जीवास चिरविश्रांती देण्याचा धर्म पाण्याने पाळला. मृत शरीराला भक्ष करून जगण्याचा धर्म समुद्रातील जीव-जंतूनी पाळला आहे आणि त्याचीच पुढची वृत्ती आम्ही करतो आहोत. याच्यात चूक, शिक्षा, हत्या, विटंबना कुठे आली? झाडाचे फुल उमलताना कधी पाहिले आहेस काय? कळी जेव्हा तिचे हिरवे आवरण फोडून बाहेर येते तेव्हा त्यातून कधी रक्त आलेले पाहिलेस काय? पाकळी उमलताना झाड हसतच असते. पिकलेले फळ झाडावरून सुटून पडताना कधी पाहिले आहेस काय? फळ सुटून पडल्यावर झाडाला आनंदच होतो. दु:ख नाही. मुळात झाड, फळ, फुल हे वेगळे नाहीतच. त्यामुळे एका पासून एक वेगळे होत नाही. आणि करताही येत नाही. आणि म्हणून एकाला त्याचे काहीही वाटत नाही. तो सूर्य इतका शक्तिशाली आहे कि मनात आणेल तर क्षणात सर्व पृथ्वी दग्ध करू शकेल. हा समुद्र इतका समर्थ आहे कि मनात आणेल तर समस्त पृथ्वी व्यापून टाकू शकेल. पण तसे होत नाही. दिवस भराच्या तापाने पृथ्वी दमली असेल या विचाराने संध्याकाळी जाताना तो हा चंद्र पृथ्वीला देऊन जातो. एखाद्या वेळी लाट मोठी झाली तर पुढच्या वेळेस तेवढीच मोठी लाट समुद्र आत ओढून घेतो. सुई सारखे टोचणारे असले तरी त्याच तुषारांनी तुला जागे करून जिवंत ठेवले आहे." त्यानंतर बराच वेळ कोणीच काहीही बोलले नाही. मग कण्हण्याच्या खूप खोल गेलेल्या आवाजात तो म्हणाला, "माझी चूक मला मान्य आहे. पण माझा स्वधर्म मला कसा पाळता येईल?" त्यावर एक मुंगी म्हणाली "तू ज्याच्या पासून निर्मिला गेला आहेस त्याची साधी आठवण जरी ठेवलीस तरी तुला तुझा धर्म पाळता येईल. तू काय, आम्ही काय, हे खेकडे किंवा हे साप सारे ज्या माती पासून तयार झाले आहेत ती माती एकच आहे. या मातीच्या वेगवेगळ्या मूर्ती मध्ये जे मुंगी एवढे तत्त्व आहे, ते देखील सर्वामध्ये सारखेच नाही काय? याची जाणीव जरी तुला झाली तरी त्याहून अधिक तुला काय हवे आहे? हा समुद्र, हि माती, हा सूर्य , हा चंद्र आणि हा पाऊस हे सारे तुझेच भाग आहेत आणि तू त्यांचा भाग आहेस. याची साधी जाणिव जरी झाली तरी जन्म आणि मरण हे दोन्ही तुला सारखेच वाटू लागतील. " त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वहात होते. रक्ताळलेले ओठ थरथरत होते. वाऱ्याचा एक मोठा झोत आला आणि सारे एकंकार झाले. मुंगी कुठेतरी उंच उडुन गेली.

3 comments: