Wednesday, February 17, 2010

पारध्याची माय ....

उघडयावरच्या संसाराला
लाज आनता कशाला
झोपली पोरं बिलगून रातीला
चुड लावता फुलाला

जलमापासून पोट जाळतो
विस्तु लागला पोटाला
अर्धी भाकर वाटुन खाल्ली
कालवन मागच्या सालाला

जत्रे मधल्या बांगड्या तांबडयां
माझ्या पोरीनं ल्यायलेल्या
पिवळं फाटकं चिरगुट
माझ्या पोराच्या कमरेला

दादला गेला परगावाला
गुरं झोपली दावलां
चणं-फुटाणं खाऊन पोरं
कंदील जागा उशाला

उतू नका मातु नका
आक्रीत तुम्ही करू नका
पाया पड़ते माय पारध्याची
झोपड़ी तुम्ही पेटवू नका

राख पाहिली जल्मा पासून
राख फुलांची करू नका
झोपलीत शांत भांडून तंडून
चुड कुडाला लावू नका..

पाया पड़ते माय पारध्याची ..