Tuesday, December 28, 2010

राव बाजी तुमी मस्तानी मी

राव बाजी तुमी मस्तानी मी
रात केवड्या रुतून बसा || धृ ||

कटी मेखला, जशी चंचला
लवलवती पातीला |

चांद साथीला, मेघ सावळा
नजर लावी मला ||

नवी कंचुकी, चौखण ल्याली
बंध घातला ज्वानीला |

कशी थांबवू , इश्क उभारी हा
मदन जाळी मला ||

गोरी मोरी, काया माझी
जशी लकाकी पुनवला |

चांद कसा बघ, पाहे रोखून
दुजा चांद कधी उगावला ||

सोळा सरली, लाजही विरली
चापून पट्टी लुगडयाला |

या रम्भेच्या, रंगमहाली
मदन पाही मला ||

नवी पैठणी, बावनखणी
येवल्यातला मोर पहा |

बाजूबंद मज, सोनसळी तुम्ही
हात माझा हळूच कसा ||

काया माझी, शुभ्र साय ती
हात लावला लाल ठसा |

विडा घेउनी, गोविंदाचा
घुटक्या संगे लाल घसा ||

सती सोडली, प्रीत जोडली
रंग महाली धुंद असा |

राव बाजी तुमी, मस्तानी मी
रात केवड्या रुतून बसा ||

Wednesday, April 7, 2010

आता जौल नाही इजनार ....

काल गिरान जळून गेली
चुलान कोन घालनार ....

वात फर फर करू लागली
गळा कोन काढनार ....

गाव सोडलं गावकी सोडली
ह्या गिरनी साटी भावकी मोडली ...

जमीन गेली गाय गेली
मागल्या साली माय बी गेली ...

जुनी फाटकी चिंदी लेवून
पोरं गुमान धाव धावली ...

मुंबई गिरनी घाव घालून
कंबर कना पिचवून गेली....

फुटकं मडकं राहिलय शिल्लक
त्यात पानी किती असनार ??

करून बघ प्रेयत्न
पर आता जौल नाही इजनार ....

इजली तर इजल वात
पर आता जौल नाही इजनार ....
आता जौल नाही इजनार ....

Wednesday, February 17, 2010

पारध्याची माय ....

उघडयावरच्या संसाराला
लाज आनता कशाला
झोपली पोरं बिलगून रातीला
चुड लावता फुलाला

जलमापासून पोट जाळतो
विस्तु लागला पोटाला
अर्धी भाकर वाटुन खाल्ली
कालवन मागच्या सालाला

जत्रे मधल्या बांगड्या तांबडयां
माझ्या पोरीनं ल्यायलेल्या
पिवळं फाटकं चिरगुट
माझ्या पोराच्या कमरेला

दादला गेला परगावाला
गुरं झोपली दावलां
चणं-फुटाणं खाऊन पोरं
कंदील जागा उशाला

उतू नका मातु नका
आक्रीत तुम्ही करू नका
पाया पड़ते माय पारध्याची
झोपड़ी तुम्ही पेटवू नका

राख पाहिली जल्मा पासून
राख फुलांची करू नका
झोपलीत शांत भांडून तंडून
चुड कुडाला लावू नका..

पाया पड़ते माय पारध्याची ..