Friday, July 3, 2015

श्रीमंत योगी - राजा शिवछत्रपती

श्रीमंत योगी - राजा शिवछत्रपती

निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू  ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

श्रीमंत आणि योगी हे तसे पाहिले तर बऱ्याच अंशी विरुध्द अर्थी शब्द!! जो श्रीमंत आहे, सर्व ऐहिक सुखांचा मालक आहे, ज्याच्या पायाशी सर्वश्री विराजमान आहे आणि तरी देखील जो एखाद्या योग्या प्रमाणे दैदिप्यमान अशा ध्येयासाठी बद्ध आहे, ज्याचा निर्धार अखंड आहे, ज्याच्या  निश्चय मेरुपर्वता इतका विराट आहे आणि म्हणून असेल कि काय  त्याच्या या भव्य अस्तित्वाचा अनेकांना आधार वाटतो आहे, अशा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज मी बोलणार आहे. 

प्रभू रामचंद्राञ्च्या या पावन भूमीत आजवर अनेक राजे, राजवाडे होऊन गेले आहेत. वास्तविक मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा इतिहास देखील खूप प्राचीन आहे. रामदेव राय यादवापासून अनेक शक कर्त्या सम्राटांनी या भूमीवर राज्य केले आहे. त्याच्यात शक आहेत. चालुक्य आहेत. हूण आहेत. चौल आहेत. ज्यांच्या साम्राज्यावार कधीही सूर्य मावळत नव्हता त्यांची साम्राज्येही लयाला गेली आहेत. पण गेली कित्येक शतके मराठी मनावर अविरत गारुड करणाऱ्या आपल्या शिवबाचे  साम्राज्य अबाधित आहे. मराठी मनाची नाळ जितकी शिवबाच्या हिंदवी स्वराज्याशी जोडली गेली आहे तितकी क्वचितच इतर कुठल्या  सत्तेशी जोडली गेली असेल. 

शिवबाच्या या अलौकिक कारकीर्दीवर आज वर अनेक मान्यवर लेखकांनी, इतिहासकारांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अनेक शाहिरांनी आपल्या अलौकिक काव्य प्रतिभेतून या प्रगल्भ राजाची महती असंख्य पोवाड्यातून गायली आहे. थोरले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस या सारख्या शूर, वीर आणि लढवय्या सेनानीना शिवबाच्या चरित्रातूनच लढण्याची आणि लढत-लढत शत्रूला नेस्तनाबूत करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शिवबाचे चरित्र म्हणजे चालता बोलता महामंत्र आहे. चमत्कार वाटावा अशा असंख्य घटनांनी ते ओतप्रोत भरलेले आहे. आपल्या जिवलग सोबत्यांना साथीला घेऊन केलेली तोरण्यावरची चढाई असो किंवा अत्यंत मुत्सद्दी पणाने केलेली शहाजी महाराजांची सुटका असो. प्रचंड हिमतीने आणि चातुर्याने केलेला अफझलखानाचा वध असो किंवा सिद्धी जौहरच्या तावडीतून केलेली सुटका असो. शाइस्तेखानावरचा धाडसी छापा असो किंवा मिर्झा राजा जयसिंगा बरोबर केलेली तहाची यशस्वी बोलणी असोत. सुरतेची लुट असो किंवा कडेकोट बंदोबस्त असून देखील अत्यंत सावधपणाने आणि धोरणीपणाने करून घेतलेली आग्र्याची सुटका असो, यातल्या प्रत्येक प्रसंगात या महान राजाच्या एकेका महान गुणाचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही. अखंड सावध राहून अत्यंत प्रतिकूल परीस्थिती मध्ये देखील निश्चल राहण्याचा हा अदम्य पराक्रम आपला शिवबाच करू शकतो.

पण मंडळी, जसे आपल्या शिवबाने  अदम्य अशा पराक्रमाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले तसे नेपोलिअन बोनापार्ट, तैमूरलंग,चेंगीझखान आणि अलेक्झांडर यांनी देखील त्यांच्या त्यांच्या प्रदेशात राज्य स्थापन केले होते. त्यांनी देखील त्यांच्या शत्रूशी मोठ मोठ्या लढाया केल्या होत्या. नवीन प्रदेश पादाक्रांत केले होते. जगाने देखील त्यांची 'महान योद्धे' म्हणून नोंद घेतली आहे. पण असे असून देखील यातल्या एकाही राजाचे राज्य आज अस्तित्वात नाही. ज्या लोकांसाठी त्यांनी हि राज्ये स्थापन केली त्या लोकांना देखील त्यांचे आज काहीही सोयर-सूतक नाही. आज जगाच्या कुठल्याही भूभागावर नेपोलिअन बोनापार्टाची, तैमुरलंगाची, चेंगीझखानाची किंवा अलेक्झांडरची जयंती साजरी केली जात नाही. यातल्या कुठल्याही राजाच्या आठवणीने आज कुणाचाही उर भरून येत नाही. यातल्या कुठल्याही राजाच्या समाधीवर कुणीही संभाजीराव भिडे दररोज चालत जाउन फुलांचा अभिषेक करत नाही. यातल्या कुठल्याही राजाच्या राजवाड्याची पायरी चढत असताना पायातली वहाण काढून ठेवावीशी वाटत देखील नाही. 

मग प्रश्न असा पडतो कि माझ्या शिवबाने असे काय केले कि ज्याच्या नुसत्या नावावर आज अनेक शतकांनंतर देखील तरुण रक्त पेटून उठते, ज्याच्या साध्या स्मरणाने देखील बाहू स्फुरू लागतात, आणि ज्याच्या समाधीवर डोके टेकले असता डोळे आपसूक भरून येतात!! 
      
शिवरायांच्या आयुष्यातले हे नाट्यमय प्रसंग जितके महत्वाचे आहेत तितकेच किंवा त्याहून काकणभर अधिक महत्वाचा त्यांनी दिलेला विचार आहे. त्यांनी दिलेले ध्येय आहे. त्यांनी घालून दिलेले व्यवस्थापनाचे कौशल्य आहे. त्यांची प्रत्येक कृती हि हिंदवी स्वराज्याच्या ध्येयांनी भारलेली होती. त्याच्यात कसलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. कसलीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती. जो होता तो केवळ उद्दात्त राष्ट्रवाद होता! आपल्या प्रजेला न्याय मिळावा याची आत्यंतिक तळमळ होती. स्वधर्माचे रक्षण व्हावे याची कळकळ होती. हिंदवी स्वराज्याच्या या ध्येयातच आपल्या जगण्याचा अर्थ शोधणारी, जीवा-भावाची माणसे त्यांनी जोडली. राजाच्या एका हाके सरशी घरा-दारावर पाणी सोडणारे कान्होजी जेधे जसे होते तसे शेंडीला गाठ मारून दोन हातात दोन  तलवारी  घेऊन तोफेचे  आवाज येईतोवर साक्षात मृत्यूला देखील थोपवून धरणारे बाजीप्रभू देशपांडे होते.  शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझल खानाचा  कोथळा बाहेर काढला  तेव्हा 'दगा दगा' म्हणत सय्यद बंड्याने काढलेला दांडपट्ट्याचा वार जीवा महाल्याने आपल्या तलवारीवर झेलला होता. शाहिस्तेखानच्या लाखाच्या सैन्याला न जुमानता अखंड ४ महिने चाकणचा किल्ला झुंजवणारे फिरंगोजी  नरसाळा होते. दोन हातात दोन तलवारी घेऊन दिलेरखानाच्या हत्तीला पुरंदरावर रोखून स्वामीनिष्ठेची शर्थ करणारे मुरारबाजी देशपांडे होते. केवळ राजाचा शब्द राखायचा म्हणून बहलोल खानाच्या हजारोच्या सैन्यावर केवळ ७ निधड्या छातीच्या मराठी वाघाना घेऊन तुटुन पडणारे सरसेनापती प्रतापराव गुजर होते. मुलाचे लग्न बाजूला सारून रातोरात गडावर छापा मारणारे आणि जीवाची बाजी लावून गड स्वराज्यात आणणारे सुभेदार तानाजी मालुसरे होते. पश्चिमेच्या समुद्रावर स्वराज्याचा धाक बसवणारे दौलतखान आणि दर्यासारंग होते. कुठून आली हि हिऱ्याच्या मोलाची माणसे? या मावळी सिंहानी का स्वीकारली असेल शिवरायाची चाकरी? मंडळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी कि यातल्या एकाही निधड्या छातीच्या वाघाला महाराजांनी कधी त्याची जात विचारली नाही. त्याचा धर्म विचारला नाही. उलट त्यांनी त्यांना हिंदवी स्वराज्याचा मंत्र दिला. भगव्या जरी-पटक्याची ग्वाही दिली. 

ध्येय दिले. अभय दिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्रींच्या इच्छेचे श्रेयही दिले. 

मग या भाबड्या वाघांनी त्यांच्या आयुष्यांच्या ज्योती हसत हसत स्वराज्याच्या दीप माळेत लावल्या आणि महाराष्ट्राचे आसमंत उजळून निघाले. याच्यात मराठे होते. ब्राम्हण होते. कुणबी होते. शिंपी, सुतार, लोहार होते. धनगर होते. मुसलमान होते. फ्रेंच होते. इंग्रज देखील होते. शिवरायाच्या या मोहिमेत सगळे होते. हा कुठल्या एका जातीचा किंवा कुठल्या एका धर्माचा खटाटोप नव्हता. हेतू उदात्त होता आणि यत्न प्रामाणिक होते. 

अवघ्या ५५ वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी एक अलौकिक संप्रदाय निर्माण केला. तळ हातावर शीर घेऊन शत्रूवर तुटुन पडणाऱ्या निधड्या छातीच्या वाघांचा!! याच्यात मग औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणारे संताजी आणि धनाजी होते. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली जिंजीचा किल्ला वर्षानुवर्षे लढवणारे मुरारराव घोरपडे होते. वयाच्या सतराव्या वर्षी स्वराज्याच्या पेशवेपदाची सूत्रे स्वीकारून मराठी सत्ता दिल्ली पर्यंत नेणारे बाजीराव पेशवे होते. या तरुण पेशव्याची तडफ तर इतकी सरस होती कि जसे साक्षात शिवरायच परत अवतरले असावेत. तीच तडफ़. तोच जोश आणि तोच महामंत्र!! राणोजी शिंदे आणि मल्हारबा होळकरांनी जीव ओवाळून टाकला या ब्राम्हणावर आणि शिवरायाचा जरी-पटका अटकेपार फडकवला. गंगा-यमुना मुक्त झाली. काशी-प्रयाग मुक्त झाले. आसेतु हिमाचल हिंदू भूमी मोकळा श्वास घेऊ लागली. गोठ्यातली गाय आणि माज-घरातील माय निश्चिंत झाली. गो-ब्राम्हण प्रतिपालनाचे शिवरायाचे स्वप्न साकार झाले. 

मंडळी एखादा माणूस जेव्हा स्वत:साठी जगतो तेव्हा तो एकच आयुष्य जगू शकतो. पण शिवरायांसारखा असामान्य नेता जेव्हा एका राष्ट्रीय विचाराने आणि उदात्त ध्येयाने जगून जातो तेव्हा तो अनेक जणांना अनेक पिढ्या पुरेल इतकी उर्जा निर्माण करतो. हि उर्जा, हि शक्ती मग अनेक साम्राज्यांना पुरून उरते आणि हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवते. शिवरायांचे खरे सामर्थ्य याच्यातच आहे असे मला वाटते. 

समर्थांचे शब्द आठवतात 
 
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।। 
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी !!
      
धन्यवाद!!

2 comments: