Sunday, September 3, 2017

विल्यम कचरू डिसूझा

एक नविन लघु कथा "विल्यम कचरू डिसूझा" 

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर शंभरेक बसक्या कुडाच्या घरांची एक वस्ती होती 'वड्डी' म्हणून. बरीचशी घरे कानडीच होती. त्यांना मराठी पण येत असे. गावाच्या जवळून एक वाळत घातलेला ओढा कृष्णेला जाऊन मिळत असे. त्या ओढ्याच्या अंगाला वसलेली घरे म्हणून त्याला 'वड्डी' असे नाव मिळाले असावे. या ओढ्याला पाणी आलेले कधी कुणी पाहिलेले नाही. एक मोठाच मोठा लांब, तापलेल्या वाळूचा आणि खडकांचा ओबडधोबड असा तो अजगरासारखा पसरलेला पट्टा होता इतकेच! त्याच्यात गावातली पोरे खड्डे करून पाणी मिळवायची. गुरे मोकाट हिंडत असत. गावाच्या खालच्या बाजूला तर ओढ्याचा निव्वळ हागणदारी साठी उपयोग केला जाई. त्याच्या बाजूलाच एक पत्र्याची शेड करून घेतली होती. मागच्या वेळी आमदार साहेब आले होते तेव्हा त्यांनी 'हिंदू स्मशानभूमी' असा एक पत्र्याचा बोर्ड लावून त्याचे उदघाटन केले होते. गावातली बहुतेक घरे हिंदूच होती. तरणी ताठी लोकं कधीच गाव सोडून पोटापाण्यासाठी मोठ्या मोठ्या शहराकडे निघून गेली होती. आता बहुतेक सगळी म्हातारी, खंगलेली, पोटे पाठीला लागलेली मंडळी गावात राहिली होती. 

गावाचा मुख्य व्यवसाय शेती. सगळा कोरडवाहूच कारभार होता. गावातली खवट म्हातारी तर रंगात आली कि म्हणायची "त्या वड्याचे पानी तर धुवायला दिकून पुरत नाही!!". दुसरा व्यवसाय होता चामडी कमावण्याचा. गावात तशी गुरे कमीच. पण आजूबाजूच्या गावात कुठेही जनावर मेलं कि त्याला चाकाच्या गाडीवर घालून गावात आणायचे. मग त्याची खांडोळी करून त्याचे वाटे केले जायचे. आणि मग त्याची चामडी काढून ती सरसाच्या द्रवात भिजत घातली जायची. त्याचा उग्रट, कुबट दर्प वस्ती मध्ये भरून राहिलेला असे. नवख्या माणसाला तर त्या वासाने जागेवर उमाळून यायचे. गावाच्या बाजूने एक मोठा रस्ता जात असे. त्या रस्त्यावरून जाणारी माणसे देखील गाव सुरु झाले कि नाक बंद करून प्रवास करीत असत. पण गावातली अर्ध्याहून अधिक घरे याच व्यवसायात राबत असत. कमावलेले चामडे मग घड्या करून अथणीला नाहीतर कोल्हापूरला पाठवले जायचे. त्याच्यातून काय कमाई होईल ते सगळे गाववाले वाटून घेत असत. ज्याच्या त्याचा वाटा ज्याच्या त्याच्या जाती प्रमाणे ठरलेला होता. गावात म्हसोबाचे एक टेकडे होते. त्याच्या बाजूला मोठा वड होता. शनिवारी, अमावास्येला, पौर्णिमेला काहींना काही निमित्त काढून म्हसोबाला कोंबडे कापले जायचे. त्या कोंबड्यांच्या पिसांनी सगळा पार भरून गेलेला असे. किती तरी नवस कोंबडा मारून फेडले जात. एखादा जीवघेणा आजार सुद्धा म्हसोबाला कोंबडे कापून बारा होतो अशी गावाची श्रद्धा होती. गावात एखादे लग्न झाले कि नवीन जोडपे म्हसोबाला पाया पडून नैवेद्य दाखवून येई. गावातले कुणी गेले तरी देखील त्याच्या तेराव्याला म्हसोबाला कोंबडा ठेवला जायचा. 

म्हसोबाला वळसा घालून थोडे पुढे गेल्यावर एक सतीची समाधी होती. कधीतरी सोळाव्या शतकात कुठलीतरी बाई इथे सती गेली होती. तिची आठवण म्हणून वाल्मिकची बाई निर्मला इथे रोज दिवा लावून जात असे. या सतीच्या समाधीवर वर्षातून एकदा साफसफाई करून तांबडीभडक काव लावली जाई. त्याच्यावर चुन्याची स्वस्तिके आणि गाईची खुरे काढली जायची. सतीच्या समाधीवरून स्मशानात जळणारी चिता अगदी स्पष्ट दिसत असे. 

निर्मला बोलवाडची. वड्डी पासून गाडीने वट्ट एखादा तास लागायचा. घराची शेती वाडी होती. गुरं ढोरं  होती. येताना तिच्या बापानी तिला चांदीचे मंगळसूत्र करून घातले होते. निर्मलाचं वाल्मिक बरोबर लग्न झालं तेव्हा निर्मला होती ९ वर्षाची आणि वाल्मिक होता २३ वर्षाचा!! त्यांचा जोडा भलताच विजोड दिसत होता. गावातली सगळी लोकं हसायची. ओढ्यावर पाणी भरायला गेली तर सगळ्या बाया निर्मलाला फिदीफिदी हसत. घालून पडून बोलत. "वाल्मिक तिचा बाप शोभतो" असं म्हणत. आधी आधी निर्मलाला खूप वाईट वाटत असे. घरी येऊन वाल्मिकच्या आईच्या मांडीवर डोके ठेवून ती रडायची. कधी कधी वाईट वाटून घेऊन घेरी येऊन बेशुद्ध पडत असे. मग वाल्मिक आणि त्याची माय तिची समजूत घालत. वाल्मिक तिला सायकलवर घालून रेल्वे रुळाच्या बाजूला फिरवून आणायचा. सतीच्या समाधीच्या बाजूला एक सोनचाफ्याचे झाड होते. त्याला मुबलक फुले लागत. त्या झाडाखाली बसून दोघे मग फुले गोळा करत. त्याचे दोन गजरे करत. एक सतीला वाहत आणि एक निर्मलाच्या केसात!! मग हसत हसत दोघे अंधारायच्या आत घरी जायची. 

वाल्मिकचं घर म्हणजे तरी काय, तर दोन खोल्यांचं एक कुडाचं झोपडं होतं. जागोजागी ठेपे लावून छप्परावरचे, वाळलेले गवताचे भारे असे थोपवून धरलेले असत. पावसाच्या महिन्यात वाल्मिक त्याच्यावर मोठी ताड पत्री घालत असे. तरी त्याच्या भोकातून सगळभर गळत असे. भिंती आणि जमीन शेणमातीने सारवलेली असायची. भिंतीवर कसल्या कसल्या नक्षा काढलेल्या असत. बाजूला चुलखंड होतं. त्याच्या बाजूला सुक्या लाकडाच्या ढलप्या ठेवलेल्या असत. वाल्मिकची आई सकाळी चाराला उठे आणि तेव्हापासून घर धुराने भरून जायचे. बाजूला दोरीवर कपडे वाळत घातलेले असायचे. जुनी धडुते आणि चिरगुटे जोडून जोडून गोधड्या शिवलेल्या असायच्या. वाल्मिकच्या आईला हि कला अवगत होती. ती निर्मलाला बरोबर घेऊन दिवसभर शेजार पाजारच्या गावातून चिंध्या, जुनी फाटकी कापडे गोळा करून आणायची. ती धुवून घेत. त्याचे बारीक बारीक चौकोनी तुकडे करून, मग परत वेगवेगळ्या रंगांचे तुकडे एकमेकांना शिवून घेत. वाल्मिक जेव्हा चामडे विकायला शहरात जायचा तेव्हा निर्मला त्याच्या बरोबर अशा ४-२ गोधड्या घेऊन जात असे. त्याचे पैसे बघून निर्मलाचे डोळे चमकून उठत असत. मग वाल्मिकच्या आईला नवीन लुगडं, नाहीतर एखादी नवीन परात नाहीतर एखादे पितळ्याचे भांडे बाजारातून घेऊन ती घरी यायची. 

पुढं मग निर्मलाला दिवस गेले. पहिला मुलगा झाला. गुरुवारी झाला, म्हणून त्यांनी त्याचं नाव ठेवलं दत्तू. मग दोघे दत्तूला घेऊन बाजारला जायला लागले. बाजार झाल्यावर त्याला सुरकी, टोपडी घेत. हिरवे, तांबडे खुळखुळे घेत. त्याच्या पायात घालायला चांदीचे तोडे करून घेतले तेव्हा तर निर्मलाला आभाळ ठेंगणे झाले होते. "म्हसक्याच्या घरातला तु पहिलाच बरं पायात चांदीचे तोडे घालणारा!!" असं वाल्मिक त्याला कौतुकानं म्हणायचा. वाल्मिकची माय पण तोंड भरून दत्तूचे कौतुक करत असे. त्याला नजर लागेल का काय म्हणून काजळ, तीट, बटटू लावायची. मीठमोहऱ्या ओवाळून टाकायची. त्याच्या वाढदिवशी म्हसोबाला कोंबडं देऊन यायची. 

दत्तू चार वर्षाचा झाल्यावर निर्मलाला परत दिवस गेले. यावेळी मात्रं लक्षण वेगळं दिसत होतं. निर्मलाला खूप दम लागायचा. मधेच डोके गच्चं धरून बसायची. श्वास कोंडल्यासारखे व्हायचे. कुणाला सांगायची देखील सोय नव्हती. वाल्मिकच्या म्हातारीने अंथरूण धरले होते. ती दिवस रात्र खोकून बेजार व्हायची. कण्हायची, रडायची, भेकायची. आणि शेवटी एक दिवस तिने डोळे मिटले. ती गेली तेव्हा सगळा गाव गोळा झाला होता. बाजूच्या गावातून देखील बाया येऊन बघून जात होत्या. शेवटी तिला खुर्चीवर बांधून बसवून नेलं स्मशानात. तेव्हा तर पार सतीच्या ओट्या पर्यंत गर्दी झाली होती. आठ महिन्याचं पोट घेऊन निर्मला देखील सतीच्या ओट्या पर्यंत जाऊन आली. डोळ्याची धार थांबत नव्हती. घरी आल्यावर एका कुडाला पाठ टेकून वाल्मिक शुन्याकडे बघत बसून होता. समोरच्या कुडाला टेकून निर्मला बसली होती भिंतीवरच्या गोधडी कडे बघत!!

या वेळी निर्मला फार दडपून गेली होती. छातीवर कसले तरी मणाचे ओझे असल्यासारखी हापत होती. वाल्मिक म्हसोबाला नवस बोलून आला होता. तरी निर्मलाची अवस्था बघून त्याला काही सुधरत नव्हते. जशी वेळ जवळ आली तशी वाल्मिक ने बाजूच्या गावातली सुईण बोलावली आणि निर्मलाची सुटका केली. बाळ आणि बाळंतीण दोघी सुखरूप बघून वाल्मिकच्या डोळ्यातून धारा लागल्या होत्या. लगोलग नवसाची फेड करून आला. मोठ्याच अडचणीतून सुटका झाली असे वाटून त्याचे नाव ठेवले "उत्तम"!!

हळूहळू जगण्याचा धीर वाढू लागला. निर्मला मग परत सतीला दिवा लावायला जाऊ लागली. एकेक इयत्ता करत दत्तू शाळा पास होत गेला. गावातली शाळा संपली म्हणून तालुक्याला मिरजेच्या शाळेत गेला. तिथून शहरात गेला. आणि शेवटी एकदा मुंबईच्या मोठ्या कॉलेजमध्ये त्याला शिकण्यासाठी प्रवेश मिळाला. त्याची प्रगती बघून वाल्मिक खुळा व्हायचा राहिला होता. गावात भेटेल त्याला सांगायचा कि "माझा दत्तू मुंबईला आता मोठा साहेब होनार म्हणून!!". निर्मलाही हरकून जायची. पण त्याच्या शिक्षणाचा खर्च, प्रवासाचा, राहायचा खर्च कसा करायचा याच्या विचाराने तिला रात्र रात्र झोप लागत नसे. वाडवडिलार्जित जमिनीचा तुकडा विकून टाकला. त्यातून पैसे आले त्यातून दत्तूला सफारी शिवली होती. तेव्हा देखील वाल्मिक कौतुकाने म्हणाला कि, "म्हसक्याच्या घरातला तु पहिलाच बरं सफारी घालणारा!!". त्याचा खर्च भागावा म्हणून आता निर्मला अजून चार गावात जाऊन चिंध्या गोळा करायला लागली. त्याचे भारेच्या भारे डोक्यावरून, उन्हातान्हातून घेऊन यायची. रात्र रात्र जागून त्याच्या गोधड्या शिवायची. अंगुस्तान घालून घालून तिच्या बोटातून रक्त निघायचे. बसून बसून पाठीचा कणा पार वाकून गेला होता. 

इकडे उत्तमचे काही अभ्यासात लक्ष नसायचे. तो आपला दिवसभर शेळ्या घेऊन ओढ्याच्या बाजूला हिंडत बसायचा. मधेच ओढ्यात खड्डे काढून त्याच्यात खेकडे धरायचा. त्याच्यात त्याच्या एका दोस्ताने त्याला साप पकडायला शिकवले. मग त्याचाच नाद घेऊन बसला. सतीच्या बाजूला सोनचाफ्याच्या गचपणात तासंतास दबा धरून बसायचा. एखादी धामण, नाहीतर घोणस बघून ठेवायचा. मग तिचा माग काढत काढत तिच्या बिळापर्यंत जायचा. आणि नकळत एखादी वाळलेली काटकी उचलावी तसा तो साप जिवंत पकडायचा. गावातल्या पोरांना त्याचं कौतुक होतं. पण निर्मलाला भारी भीती वाटायची. "काय सांगा एखादवेळी नेम चुकला तर संपलाच खेळ!!" या विचाराने ती खूप घाबरी व्हायची. पण बोलायची सोय नव्हती. आणि एक दिवस उत्तमचा मित्र धनाजी कुडाकडे धावत आला आणि त्याने निर्मलाला सांगितले कि उत्तमला साप चावला म्हणून!! 

त्या बातमीने निर्मलाचे अवसानच गळून गेले. डोळ्यापुढे अंधारी आली. आणि ती उभ्या जागी दारातच कोसळली. मग धनाजीने वाल्मिकला बोलावून आणले. गावातली ३-४ माणसे पुढे आली. निर्मला बोलत नव्हती. काही हालचाल होत नव्हती. मग सगळ्यांनी गाडी करून तिला मिरजेला हॉस्पिटल मध्ये न्यायचे ठरवले. हा सगळा गलका चालू असताना तिकडून उत्तम चालत आला. निर्मलाला गाडीत घालताना बघून तर त्याला काही कळेचना. त्याला बघितल्यावर तर वाल्मिकने त्याला मिठीच मारली. मग उत्तमने  त्याला सगळी हकीकत सांगितली कि तो आणि धनाजी एक साप धरत होते म्हणून. धनाजीचा चुकून त्या सापावर पाय पडला आणि तो साप उत्तमला चावला. ते बघून धनाजी पळत सुटला. पण उत्तम ने धीर करून त्या सापाला धरले. आणि मग कळले कि ती धामिण होती म्हणून!! आणि एवढे सांगून उत्तम हसायला लागला. वाल्मिकला काही सुधारत नव्हते. त्याने उत्तमच्या खांद्यावर हात ठेवला आणि दोघे जण निर्मलाला घेऊन गाडीत बसले.

मिरजेत एक अगदी नावाजलेले हॉस्पिटल होते. निष्णात डॉक्टर, सेवाभावी नर्स आणि अद्ययावत मशिनरी होती. या दवाखान्याला अमेरिकेतून आणि युरोपातून पैसा मिळायचा. त्यामुळे मिरजेच्या आजूबाजूच्या गावातून बहुतेक गोरगरीब लोक इथेच उपचाराला यायचे. त्याची ख्याती ऐकून वाल्मिक निर्मलाला घेऊन इथे आला. डॉक्टर जॉर्ज म्हणून कुणीतरी होते. त्यांनी निर्मलाला तपासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि तिच्या हृदयाला एक भोक आहे म्हणून. त्यांनी वाल्मिकला बोलावून घेतले. त्याला सगळ्या परिस्थीतीची कल्पना दिली. खूप मोठे आणि अवघड ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले. वाल्मिक खाली मान घालून ऐकत होता. सारखा डॉक्टरांच्या पाया पडत होता. डोळे पुसत होता. मानेने होकार देत होता. बोलता बोलता डॉक्टरांनी त्याचा धर्म, त्याची जात, त्याची आर्थिक स्थिती याचा अंदाज घेतला आणि मग डॉक्टरनी गोर्डे म्हणून एक नर्स होत्या त्यांना बोलावून घेतले.
 
गोर्डे बाईंबरोबर डॉक्टर काय बोलले ते वाल्मिकला कळले नाही. मग डॉक्टर गेल्यावर गोर्डे बाईंनी वाल्मिकला समजावून सांगायला घेतले. त्याला त्यांनी सांगितले कि हे खूप खर्चिक ऑपरेशन आहे म्हणून. आणि ते अगदी लवकरात लवकर करावे लागेल म्हणून. त्या साठी लाखो रुपये लागतील. ते सगळे ऐकून वाल्मिक अगदी सुन्न होऊन गेला. आता हे सगळे कसे जमायचे या एकाच प्रश्नाने त्याला ग्रासून टाकले होते. 

तेवढ्यात गोर्डे बाईंनी एक कागद समोर धरला. आणि सांगितले कि जर वाल्मिकने त्या कागदावर सही केली तर त्याला कशाचीही काळजी करायची गरज नाही. त्याने जर सही केली तर निर्मलाचे ऑपरेशन अगदी विनामूल्य आणि लगोलग होईल असेही आश्वासन दिले. वाल्मिकला काही सुचेना. हा कसला कागद आहे? याच्यावर काय लिहिले आहे? माझी जमीन तर मी कधीच विकली. आता माझ्या जवळ लिहून देण्यासारखे काय आहे? याची उत्तरे त्याला सापडेनात. मग गोर्डे बाईंनी त्याला सांगितले कि तो धर्मांतराचा कागद आहे म्हणून!! वाल्मिकने फक्त लिहून द्यायचा अवकाश कि तो धर्मांतराला तयार आहे म्हणून आणि लगोलग निर्मलावर उपचार सुरु होणार होते. वाल्मिक क्षणभर चरकला. पिढ्यांपिढ्या जो धर्म लावला तो आज अचानक सोडून द्यायचा या विचाराने त्याला अपराधी वाटले. तो विचार करत होता तेवढ्यात उत्तम तिथे आला आणि वाल्मिकने त्याला त्या कागदविषयी विचारले. उत्तम म्हणाला कि उठवा बिनधास्त अंगठा म्हणून!! नाहीतर "हिंदू म्हणून काय पेढे बर्फी खायला मिळती आहे का काय तुम्हाला?" असेही विचारून गेला. उत्तमचा सल्ला आणि निर्मलाचे मिटलेले डोळे पाहून वाल्मिकने त्या कागदावर डाव्या हाताचा अंगठा उठवला. गोर्डे बाईंचा चेहरा उजळून निघाला. त्यांनी तात्काळ फर्मानं सोडली. वार्ड बॉय आले. नर्स आल्या. त्यांनी निर्मलाला स्ट्रेचरवर घालून लगबगीने ऑपरेशन थेटर कडे नेले. डॉक्टर जॉर्ज देखील ऑपरेशन चा सूट घालून काही मिनिटात हजर झाले. वाल्मिकच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रभू येशू दयाळू आहे. आणि तो सर्वांची काळजी घेतो म्हणून सांगून गेले. वाल्मिक काही कळण्याच्या पलीकडे गेला होता. ऑपरेशन थेटर चे दार बंद झाले आणि वाल्मिक आपल्याच घोणेत मुंडी घालून मुसमुसत बसून राहिला. कसला धर्म? आपला धर्म कोणता होता? आपल्या मायला, हिंदूच्या स्मशान भूमीत नेऊन जाळण्याच्या पलीकडे आपण हिंदू धर्माचे म्हणून काय केले? आज आपण ख्रिश्चन झालो म्हणजे काय झाले? कागदावर अंगठा उठवल्यावर अचानक सगळे खर्च कसे काय माफ झाले? येशू कोण? तो अचानक दयाळू कसा झाला? असे असंख्य प्रश्न त्याला पडले होते. पण त्याहून महत्वाचा प्रश्न होता निर्मला बारी होईल ना हाच होता. त्याच विचारात त्याचा कधीतरी डोळा लागला. 

त्याला जेव्हा जाग आली तेव्हा डॉक्टर जॉर्ज त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला उठवत होते. निर्मला कशी आहे? निर्मला कशी आहे? असे तो परत परत विचारत होता. तेवढ्यात स्ट्रेचर वरून निर्मलाला वार्ड बॉय बाहेर घेऊन येत होते. निर्मला तशीच शांत झोपली होती. तिला बाहेर येताना पाहून वाल्मिकचा बांध फुटला. आणि तो हमसून हमसून रडू लागला. बाजूलाच गोर्डे बाई पण उभ्या होत्या. येशूने कृपा केली. सगळे व्यवस्थित पार पडले म्हणून सांगत होत्या. हळू हळू निर्मलाची तब्बेत सुधारत होती. टाके आणि जखमा भरून निघत होत्या. महिन्याभरात ती हिंडू फिरू लागली. आता डॉक्टर कधी एकदा घरी जायला सांगतात त्याची सगळे वाट बघत होते. 

आणि अचानक एक पाद्री निर्मलाला भेटायला म्हणून आला. पांढरा शुभ्र पायघोळ झगा, गळ्यात चार दोन काळ्या मण्यांच्या माळा, त्याच्यावर एक चार दोन क्रॉस असा सगळा पोशाख भरून वाल्मिक गडबडूनच गेला.  मग त्या पाद्रीने वाल्मिकला पुढचा कार्यक्रम सांगितला. दोन दिवसांनी वाल्मिक, उत्तम आणि तो पाद्री इचलकरंजीला गेले. तिथे विजापूर रस्त्यावर जरा आड बाजूला एक पाण्याचा तलाव होता. तिथे फारशी रहदारी नसायची. त्या तलावात गुडघाभर पाण्यात २ पाद्री आणि २ सिस्टर उभ्या होत्या. वाल्मिक सारखे इतरही बरेच जण तलावाच्या बाजूला रांगेत उभे होते. तो तलावातील पाद्री एकेकाला नाव घेऊन पाण्यात बोलावत होता. एकेक करत त्यांनी वाल्मिकला पाण्यात बोलावले. त्याला एका वाटीतून वाईन प्यायला दिली. मग एक अत्यंत कुबट वासाचा पावाचा तुकडा त्याला खायला दिला. डोक्यावरून तांब्याभरून कसले तरी पाणी ओतले. त्यातल्याच एका पाद्र्याने वाल्मिकला सांगितले कि आज पासून त्याचे नाव "विल्यम कचरू डिसुझा" झाले आहे म्हणून!! आणि मग सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या.

वाल्मिकला वास्तविक त्याचे काहीच वाटले नाही. त्याला परत घरी जायचे वेध लागले होते. संध्याकाळी तो परत मिरजेला आला. आणि २-३ दिवसात निर्मलाला घेऊन परत वड्डीला आला. गावात आल्यावर दोघेही म्हसोबाला डोकं टेकवून आली. नवस बोलला होता तसा एक तुर्रेवाला काळा कोंबडाही त्याने दिला. गाव जेवण घातले. त्या दिवशी वाल्मिक आणि निर्मला खूप खुश दिसत होती. गावात कुठेतरी बोलताना उत्तमने मग घडलेली हकीकत त्याच्या मित्रांना सांगितली. निर्मलाला मिरजेला कसं नेलं, तिथल्या डॉक्टरनी कसं तपासलं, मग कसल्या फॉर्म वर सही घेतली, मग ऑपरेशन कसं झालं आणि हे झाल्यावर त्याने गंमत म्हणून इचलकरंजीची गोष्ट पण सांगितली. ते पाद्री कसे बुटके होते आणि त्यांनी कसले घाणेरडे पाव खायला दिले ते पण सांगितले. याचा व्हायचा तो परिणाम झाला. गावातल्या पंचांनी वाल्मिककडे चौकशी केली. त्याचे नाव "विल्यम" झाले का ते विचारले. घाबरत घाबरत वाल्मिकने जे सुचेल ते सांगून टाकले. मग पंचांनी जात पंचायत बोलावली. झाल्या प्रकारची चौकशी झाली. त्या दिवशी उत्तम पण चौकशीला हजर होता. त्याने पंचांना अर्वाच्य शिव्या दिल्या. निर्मला दवाखान्यात मरणाच्या दारात ताटकळत होती तेव्हा कुठे होती तुमची जात पंचायत म्हणून तो वाट्टेल ते बोलला पंचांना. वाल्मिकने पंचांची माफी मागून बघितली. पाया पडून बघितले. कशाचा काही उपयोग झाला नाही. आणि त्या दिवशी वाल्मिकला पंचांनी जातीतून काढून टाकले. सगळे एकेक करत घरी निघून गेले तरी वाल्मिक आणि निर्मला बराच वेळ तिथेच बसून होती. 

झाल्या प्रकाराने उत्तम मात्र भडकला होता. तशात त्याच्या मित्रांनी पण त्याला 'बाटगा, बाटगा' म्हणून हिणवयाला सुरुवात केली. त्याने तो अजूनच धुमसायला लागला. अशाच तिरीमिरीत त्याने मिरज गाठले. तिथल्या पाद्रीला जाऊन त्याने सगळी कहाणी सांगितली. पाद्रींने त्याला येशू दयाळू आहे. तो सर्व ठीक करेल वगैरे सांगून बघितले. पण उत्तम काही ऐकेना. उत्तम ने त्याला वड्डीला घेऊन जायचा हट्ट धरला. शेवटी एका रविवारी वड्डीला येण्याचे आश्वासन घेऊन उत्तम घरी परतला. आता उत्तम त्या पाद्र्याच्या स्वागताची तयारी करू लागला. तो कधी एकदा येतोय आणि आपण कधी एकदा गावातल्या लोकांचे  उट्टे काढतोय असे त्याला झाले होते. शेवटी एकदाचा तो पाद्री उत्तमच्या घरी आला. त्याने त्याला सगळा गाव हिंडून दाखवला. कोण कुठे राहतो, काय करतो याची बित्तम्बात त्याला पुरवली. गावातल्या लोकांनी देखील उत्तमला त्या पाद्री बरोबर फिरताना पाहिले. आता तो पाद्री दर रविवारी गावात यायला लागला. गावात अजून ४-२ जणांना त्यांनी ख्रिश्चन करून टाकले. त्यांच्या संगतीने त्यांनी एका जागेवर कुंपण घातले आणि त्याच्यावर पत्र्याची पाटी लिहिली कि "ख्रिश्चन स्मशानभूमी" म्हणून! मग त्या नंतर गाववाल्यानी उत्तमला अजूनच त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी याच्यावर उपाय म्हणून त्या पाद्र्याने उत्तमला आणि त्याच्या नवीन ख्रिश्चन मित्रांना घरातले देवाचे फोटो आणि मूर्ती गटारीत नेऊन ठेवायला सांगितल्या. आणि ज्या रविवारी पाद्री यायचा होता, त्या दिवशी उत्तमने त्याच्या घरातले देव, घरा समोरच्या गटारीत मांडून ठेवले. ते बघून तर गावातल्या लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. आणि त्यातल्याच काही धडधाकट माणसांनी उत्तमची आणि त्या पाद्र्याची गचांडी धरली. पाद्री जीव वाचवून पळून गेला आणि उत्तमला लोकांनी मरेपर्यंत मारला. उत्तम कसा तरी खुरडत खुरडत घरी येऊन पोचला. त्याची अवस्था पाहून शेवटी वाल्मिकने दत्तूला तार करून बोलावून घेतले. दत्तू आला आणि मग त्याला हि धर्मांतराची बातमी गावातल्याच कुणीतरी सांगितली. दत्तूला दुःख झाले. आपल्या अपरोक्ष एवढ्या घटना घडल्या म्हणून तो आधी वाल्मिकवर भडकला. दत्तूने त्याची चांगलीच खरड काढली. वरतून त्याला हे पण सुनावले कि केवळ वाल्मिकने धर्म बदलला म्हणून दत्तूचा धर्म बदलला असे होत नाही. त्याची हि मग्रूर उत्तरे पाहून शेवटी उत्तमने त्याला निर्मला दवाखान्यात होती तेव्हा तू आणि तुझा धर्म कुठे होतात म्हणून विचारले. हे सगळे असह्य होऊन निर्मलाने डोळे मिटून घेतले ते कायमचेच!! दुसऱ्या दिवशी सकाळी वाल्मिक जेव्हा निर्मलाला उठवायला गेला तेव्हा त्याला कळले आणि त्याला शब्दच फुटेनात. 
बऱ्याच वेळाने त्याने उत्तम आणि दत्तूला निर्मला गेल्याची बातमी सांगितली. तरी दोघेही त्यांच्याच तंद्रीत होते. उत्तमने गावातली ख्रिश्चन मित्र बोलावले आणि दत्तूने हिंदू. मग त्यांनी मिळून निर्मलाची अंत्य यात्रा काढली. जेमतेम सतीच्या समाधीपर्यंत पोचले असतील नसतील, मग त्यातल्याच एकाने शंका काढली कि निर्मलाला हिंदू स्मशानात न्यायाचे कि ख्रिश्चन स्मशानात!! परत एकदा वादाला तोंड फुटले. निर्मलाच्या देह सतीच्या समाधीवर ठेवून जोरजोरात तंडायला सुरुवात झाली. काठ्या आणि तलवारी निघाल्या. रक्ताचे सडे पडायला लागले. 

वाल्मिकीने निर्मलाचे डोके मांडीवर घेतले. तिच्या गळ्यातले मंगळसूत्र आणि त्या पाद्र्याने दिलेला क्रॉस दोन्हीही काळवंडून गेले होते. आता वाल्मिकला काहीही ऐकू येत नव्हते. काहीही दिसत नव्हते. त्याने तिथलीच सोनचाफ्याची फुले गोळा केली. काही फुले सतीला घातली आणि काही निर्मलाला!! त्याच्या बाजूने एक काळीकुट्ट धामिण सळसळत निघून गेली.  

~निखिल कुलकर्णी