Tuesday, February 17, 2015

आबा

आबा गेले. फार वाइट झाले. एक अतिशय उमद्या मनाचा आणि खिलाडू बाण्याचा सच्चा मराठा गेला.

माझा आणि आबांचा पहिला परिचय झाला १९९४ साली. आबांच्या वाढदिवसा निमित्त तासगावला एक मोठी जंगी वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. माझा एक मित्र होता उत्तम पाटील. तो आबांचा गाववाला. गाव वाला म्हणजे अगदी शिवाराला शिवार आणि भिंतीला भिंत लागून!! बऱ्यापैकी भाषणे वगैरे करायचा. खाक्या एकदम राजकीय!! आम्ही दोघांनी बऱ्याच स्पर्धा एकत्र केल्या होत्या. त्यानेच मला सांगितले या स्पर्धे बद्दल. पहिले बक्षीस होते १००० रुपये. १९९४ साली १००० रुपये म्हणजे १ लाख रुपयाइतके मोठे होते. तेव्हा स्पर्धांची बक्षिसे म्हणजे पहिल्या क्रमांकाला १०१ रुपये म्हणजे डोक्यावरून पाणी!! अर्थात तेव्हा १० रुपयाला राइस प्लेट मिळायची आणि ६० पैशाला तंबाखूची पुडी!! तेव्हा १००० रुपये बक्षिस म्हणजे कळस होता. त्यात स्पर्धा तासगावला. म्हणजे सांगली पासून वट्ट अर्ध्या तासावर. बसचे तिकीट २ रुपये २५ पैसे. मनात विचार केला कि सव्वा दोन रुपये भांडवलावर जर १००० रुपये बक्षीस मिळाले तर काय धमाल येईल!! पुढे किमान वर्ष भर तरी प्रवासाची आणि वर खर्चाची चिंता नाही. अगदी हरखून गेलो होतो. त्या दिवशी सकाळी ९ वाजता तासगावला पोचलो. तासगावच्या गणपतीच्या देवळाच्या बाजूच्या शाळेच्या पटांगणात स्पर्धा होती. स्पर्धेला तोबा गर्दी होती. १००० रुपये बक्षीस म्हटल्यावर अगदी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून स्पर्धक आले होते. श्रोतृ वर्गामध्ये बहुतेक सगळी मंडळी पांढरे झब्बे घालून डोक्यावर पांढरे फेटे नाहीतर गांधी टोप्या घालून बसले होते. भरगच्च मिशा, अखंड पान-सुपारी खाऊन कायमचे लाल झालेले दात आणि डोळ्यावर जुन्या वळणाचे काळ्या जाड काड्यांचे चष्मे असा जमा निमा करुन मंडळी 'भाशनं कवा सुरु व्हायाची?' याची आपसात चर्चा करत सुपारी कातरत बसली होती. हि स्पर्धा कमी आणि भाषणांचा फड जास्त होता. स्पर्धेचे विषय पण अगदी सणसणीत होते. मृदू मउ आवाजात भाषणे करणाऱ्या वक्त्यांची हि स्पर्धाच नव्हती. साहित्यिक मुल्य वगैरे असल्या गोष्टीना फारसा भाव मिळणे अवघड दिसत होते. तेव्हा मनात विचार केला कि काहीही झाले तरी इथे नंबर यायचा असेल तर प्रत्येक वाक्याला टाळी मिळाली पाहिजे. एक वाक्य जरी बिना टाळीचे गेले कि झाले काम!! थोडक्यात शब्दांची कुस्ती रंगवायची होती. अर्थात त्या दरम्यान माझे बोलायचे पट्ट विषय म्हणजे राजकारणा शी अगदी जवळचे असायचे. पण माझी बोलायची पद्धत बरीच ब्राम्हणी होती. मुद्देसूद, एका मागून एक विचार मांडत, बऱ्यापैकी मध्यम लई मधे बोलायचो. माझ्या भाषणाला टाळ्या मिळायच्या ते भाषण संपल्यावर. असा शब्दांचा धबधबा आणि त्याच्या मागून येणारा टाळ्यांचा कडकडाट या आधी कधी केला नव्हता. पण आज काही खैर नव्हती. श्रोते इतके बोलके होते कि एखाद्या रटाळ वक्त्याला 'ए आता बस खाली बाबा' असे म्हणायला सुद्धा मागे-पुढे पाहणार नव्हते. माझा काहीतरी १८ वा का १९ वा नंबर होता बोलायचा. एका मागोमाग एक भाषणे चालू होती. बहुतेक अगदी सपशेल पडत होती. एक वक्ता बोलता बोलता 'लोकशाहीचा तौलनिक अभ्यास' वगैरे काहीतरी म्हणाला. आणि श्रोतृ वर्गामध्ये 'तौलनिक म्हंजी काय?' याच्यावर एक मस्त परिसंवाद रंगला. मग त्या वक्त्याचे भाषण संपले कधी आणि त्याच्या नंतरच्या वक्त्याचे भाषण सुरु कधी झाले ते कळले देखील नाही. एक एक करत माझा नंबर आला. संयोजकांनी माझे नाव पुकारले. 'निखिल कुलकर्नी'. आता निखिल या नावाला ग्रामीण महाराष्ट्रात काही फारशी इमेज नाही. पण 'कुलकर्नी' ह्या नावाला जबरदस्त इमेज आहे. येउन जाउन 'कुलकर्नी' पोष्टात, रेल्वे स्टेशन मध्ये नाहीतर शाळेत मास्तर असायचा!! त्यामुळे 'कुलकर्नी' कसा असतो आन त्यो काय काय बोलू शकतो याची गाव वाल्यांना चांगली कल्पना होती. असंच एखादं पुणेरी थाटाचं 'तौलनिक' वगैरे शब्द घालून भाषण होणार म्हणून मंडळी चर्चेच्या तयारीत बसली होती. बऱ्याच दिवसांनी व्यासपीठावर जाताना माझ्या पोटात जबरदस्त बाक-बुक होत होती. देवाचे नाव घेतले आणि खणखणीत आवाजात सुरुवात केली "राम राम मंडळी राम राम …. आज या ठिकाणी आपल्या लाडक्या आबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही मंडळीनी फुडाकार घेऊन हि भाषणं लावली त्याबद्दल सर्व तासगावकर मंडळीचे मनापासून आभार!!" आणि काय आश्चर्य पहिल्या वाक्या पासून टाळ्याना सुरुवात झाली. त्याच्यात शिट्ट्या पण वाजायला लागल्या. मग मी पण अजिबात हटलो नाही. मनातल्या मनात रामदास फुटाण्याना स्मरून एका मागोमाग एक अशी धमाल कोटेशन पेरत गेलो. 'खुर्ची माझी माता, खुर्ची माझा पिता, बहिण बंधू चुलता, खुर्ची माझी!!' 'मै भी नकटा, तू भी नकटा, ये नकटो का मेला है, इसमे जो नाक वाला, वो भी उनका चेला है"असल्या कोटेशन वर टाळ्या शिट्ट्या मिळायच्या. मग त्याच्या नंतर थोडी लांब पल्लेदार तालात वाक्ये घालायचो. '१५ ऑगष्ट १९४७ साली भारत नावाच्या देशाने लोकशाही नावाच्या एका मेलेल्या बाळाला जन्म दिला. त्या लोकशाहीचं प्रेत दिल्लीच्या माळावर पडलेलं असतं. त्याच्या भोवती हि राजकीय पक्षांची गिधाडे रोज जमतात. त्यातलं एक गिधाड म्हणतं, अरे प्रेत फार मोठं आहे. एकदा खाउन संपायचे नाही. त्याच्या वर दुसरे गिधाड म्हणतं, 'आत्ता जाइल तेवढं खाऊ. उरलं तर रात्रीला बांधून नेउ. तरी पण उरलं तर त्याला जाळून टाकू. राखेतून जसा जपान जन्माला आला तशी उद्या पुन्हा लोकशाही जन्माला येईल. ती पुन्हा मेलेलीच असेल. आपण पुन्हा खाऊ. उरलेलं बांधून नेऊ. राहिलं तर जाळून टाकू. आपण अगदी मजेत राहू!!' पुढे पुढे मग कॉंग्रेसवर सडकून टिका केली, ' मंडळी मला सांगा गेल्या ५० वर्षात या कॉंग्रेसनं आपल्याला काय दिलं? पहिली दिली ती 'खादी' आणि 'खादी म्हणजे खा आदी'. त्याच्या नंतर दिला 'चरखा'. आता 'चरखा' म्हणजे काय तर 'चर' आणि 'खा'. त्याच्या नंतर दिली 'खाकी'. आता मला सांगा खाकी म्हणजे काय 'खा कि' ' लेका घाबरतोस कुणाला'. याच्या नंतर मंडळी बेभान होऊन टोप्या उडवायला लागली. त्यांच्या प्रतिसाद बघून मी हि पेटत गेलो. म्हणालो 'पंडित नेहरू नावाच्या डोंबाऱ्याने शेख अब्दुल्लाह नावाच्या माकडाच्या हाती काश्मीरचा कोलीत दिला.' थोडा वेळ एक पॉज घेऊन म्हणालो 'आणि आज, आणि आज कोळसा बघितला कि, आम्हाला काश्मीर ची आठवण येते'. पब्लिक येडं झालं होतं. ती वाक्येच तशी होती. वास्तविक सांगली काय आणि तासगाव काय, 'पश्चिम महाराष्ट्र' म्हणजे कॉंग्रेसचे माहेर!! तरी देखील लोक पक्ष भेद विसरून एक गम्मत म्हणून माझे बोलणे ऐकत होती. एकामागोमाग एक एका ठेक्यात येणाऱ्या वाक्यांनी ती जास्त आनंदी झाली होती. अखंड पंधरा मिनिटे टाळ्या घेऊन जेव्हा खाली उतरलो तेव्हा काय आनंद झाला म्हणून सांगू!! अजून बरेच स्पर्धक बोलायचे होते. तेव्हा अगदी पहिला जरी नाही तरी पहिल्या ३ मधला एक तरी नंबर मिळणार याची खात्री झाली होती. तिसऱ्या क्रमांकाला बक्षीस होते ५०० रूपये. तेव्हा सव्वा दोन रुपयावर ५०० रुपये म्हणजे काही कमी नाहीत असा अप्पलपोटा विचार करून मी आनंदी झालो होतो. त्याच्या नंतर एका मागोमाग एक भाषणे झाली. दुपारी ४ च्या सुमारास स्पर्धा संपली. आता उत्सुकता निकालाची होती. त्या श्रोत्यामधला जवळ जवळ प्रत्येक जण मला भेटायचा प्रयत्न करत होता. उगाचच 'shake hand' करायचा प्रत्येकाचा प्रयत्न चालला होता. माझा म्हणजे एकदम पुढारीच झाला होता. मी मग उगाचच दोन हात जोडून नमस्कार करत होतो. माझेच काय? पण ती मंडळी इतकी भाबडी होती कि उत्तम पाटीलचा देखील नेता झाला होता. लोक त्याला देखील भेटायला उत्सुक दिसत होते. ते सगळे पाहून माझ्या मनात एक छद्मी विचार येत होता 'कि अरे जमले कि या पब्लिकला गंडवायला!!'

संध्याकाळी ६ वाजता आबा आले. त्यांच्या बरोबर त्यांचा लवाजमा आला. श्रोते मंडळी चिडीचूप झाली. आता परीक्षक निकाल सांगणार एवढ्यात त्या गर्दीतला एक बबनराव उठून म्हणला 'आबा ते निकालाचं नंतर बघू. पर तुमी एक डाव आपल्या कुलकर्नीचं भाशन ऐका राव. ओ कुलकर्नी या फुडं. होऊन जाऊ द्या परत एकांडाव!!' माझ्या डोळ्या समोर काजवे चमकले. आबा आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कोण कोण मामलेदार, तहसीलदार आणि पोलिसांच्या समोर नेहरू ना डोंबारी म्हणायचे? माझी बोबडी वळली होती. हाता-पायाला घाम सुटला होता. नाही म्हणावे तरी पंचाईत आणि होय म्हटले तर तुरुंगातच जायचे बाकी!! बराच वेळ मी जागेवर बसूनच राहिलो. मग आबानी हाक मारली 'या कुलकर्णी. होऊन जाऊ द्या.' आईला न भूतो न भविष्यति हादरलो होतो. आयुष्यात पहिल्यांदाच भाषण करत असल्यासारखे पाय कापत होते. शेवटी गेलो. जाताना आबांना वाकून नमस्कार केला. मनात म्हटले आता फक्त हा नमस्कार जरी पावला तरी चालेल. मी स्टेज वर गेलो तसे पब्लिक परत सुटले आणि त्यांना बघून मी पण! सगळी भीड बाजूला ठेवून बिंधास्त कॉंग्रेसची टवाळी केली. परत एकदा कोटेशन आणि पल्लेदार वाक्ये चमकून निघाली. भाषण संपल्यावर आबांनी पाठीवर थाप दिली. म्हणाले "कुलकर्णी अहो झकास बोलताय कि!! येता का आमच्या बरोबर? येणार असाल तर बघा." आयुष्यातली सगळ्यात मोठी शाबासकी होती ती!! तेव्हा आबा म्हणजे लक्षवेधी आमदार म्हणून गाजत होते. आबांच्या प्रश्नाने विधानसभा हडबडून जागी होत होती. सत्ताधारी असून देखील योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य असा आबांचा न्याय होता. त्यांच्या सडेतोड प्रश्नाने कित्येकदा त्यांच्याच पक्षाचे मंत्री चकित होत होते. आबा म्हणजे वक्त्यांचा आदर्श होते. मुळात अतिशय निगर्वी माणूस. कशाचा अभिमान नाही. कशाचा तोरा नाही. समोर बसलेल्या भाबड्या जनतेचा तो मानबिंदू होता. त्या जनतेच्या गळ्यातला ताईत होता. आबांच्या एका हुकुमावर तो समोरचा जनार्दन काहीही करायला तयार होता. अशा आबांनी माझं कौतुक केलं होतं. माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. आता इतके सगळे झाल्यावर स्पर्धेचा निकालाची काय उत्सुकता राहणार होती!! परीक्षकांनी निकाल दिला. माझा पहिला क्रमांक आला होता. पण त्यावेळी देखील ज्या १००० रुपयांसाठी हा सगळा खटाटोप केला, त्या १००० रुपयाचं आबांच्या शाबासकी समोर काहीच वाटत नव्हते.

नंतर विजेत्या स्पर्धकांना आबांच्या बरोबर जेवण होते. त्या दरम्यान आबांशी खूप गप्पा रंगल्या. आबांनी त्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे काही अनुभव सांगितले. आणि शेवटी बोलता बोलता म्हणाले "कुलकर्णी तुम्ही बोलता छान. पण तुम्हाला अंत:करणापासून सांगू का? तुम्ही जे बोललात तेच जर बोलत राहिलात तर जन्मभर विरोधी पक्षातच बसावे लागेल.' आणि मग आबांच्या नर्म विनोदावर सगळे मनापासून हसले. मी देखील काहीतरी सावरून घ्यायचे म्हणून म्हणालो "नाही आबा ते जरा पब्लिक ला खुश करायचे म्हणून जरा थोडं जास्त झालं". त्याच्या वर आबा म्हणाले "कुलकर्णी अहो हे पब्लिक म्हणजे भाबडा विठ्ठल आहे. गरीब आहे. कष्टकरी आहे. त्यांची कशाचीच मागणी नाही. पोटात एक आणि ओठात एक असला प्रकार इथे नाही. आज तुमच्या भाषणावर पब्लिक खुश आहे. अंत:करणापासून टाळ्या वाजवल्यात त्यांनी. माझे काय म्हणणं आहे अशा पब्लिकला आपण पण देताना देखील अंत:करणापासून द्यायला नको का?" एका क्षणात मी भानावर आलो होतो. आपण जे केले ते निव्वळ पोटार्थी कृत्य होते या विचाराने माझे मलाच अपराधी वाटले. आणि त्याच वेळेला, हा भाबडा विट्ठल या आबावर इतका प्रसन्न का याचेही उत्तर मिळाले. कसं बोलायचं ते मला ठाऊक होतं. पण का बोलायचं याचं उत्तर आबांनी शिकवलं.

नंतर डान्स बार बंद करून आबांनी तडा जात चाललेल्या संकेतांना जणू वज्रलेप करून दिला. मुंबई वर हल्ला करणाऱ्या कसाबाला फासावर लटकावून तर त्यांनी जमिनीचे पांग फेडले. आबांसारखा माणूस राजकारणात कसा याचाच मला कित्येक वेळेला प्रश्न पडायचा. नितळ आकाशाला काळे पांढरे ढगही चालतात, इंद्रधनूच्या सप्त रंगांचे कवडसे ही चालतात, पक्षांच्या नाना तऱ्हेच्या नक्षाही चालतात आणि सूर्याची किरणे हि चालतात. आकाशाची तक्रार कसलीच नसते. नितळता हा त्याचा स्थायी भाव असतो आणि धरतीला पाखर देण्याची जबरदस्त ओढ असते.

यातलंच थोडं आकाश घेऊन जगलेले आबा मग राजकारणात असून देखील राजा सारखे जगतात आणि गेले तरी अनेकांच्या डोळ्यात कायमचे उरतात.