Thursday, April 19, 2012

चेहरा

त्याने तिकीट काढले आणि त्याच्या नेहमीच्या सीट वर जाऊन बसला. आज गाडीला विशेष गर्दी नव्हती. २-४ बाके भरली होती. बाकी बहुतेक बस रिकामीच होती. त्याने त्याच्या भाच्यांसाठी एक लाकडाचा घोडा घेतला होता. दर महिन्याला बहिणीकडे गेल्यावर त्याची भाचरे त्याच्या भोवती जमायची. मामा-मामा करून गिल्ला करायची. मला काय आणले म्हणून त्याच्या हाताला धरून लोंबकाळायची. गेल्या वेळी त्याने ठरवले होते की पुढच्या वेळी काहीतरी नक्की घेऊन जायचे. त्याच्या घराशेजारी एक सुताराचे दुकान होते. त्याच्या कडून त्याने एक घोडा करून घेतला. त्याला बसायला एक मऊ कापसाचे सीट करून घेतले. त्याला त्याची भाचरे त्याच्यावर बसलेली दिसायला लागली. त्यांचे निरागस चेहरे त्याला आठवले आणि तो मनातून हरकून गेला. रात्रीचा प्रवास म्हणून त्याने गाडीत बसण्या पूर्वीच जेवण आटोपून घेतले होते. आता निवांत पणे सकाळ पर्यंत झोप काढू. अशा विचाराने त्याने अंग सैल करायला सुरुवात केली. सबंध दिवस भरात काय काय घडले ते एकेक करून त्याला आठवू लागले. तो साहेब, त्याचा सेक्रेटरी, घर मालक, शेजारी राहणारा गणपा घेवारे, त्याची दिवस भर दारू पिऊन चालणारी टकळी, त्याच्या नावाने शंख करणारी त्याची बायको आणि वयात आलेली सुंदर मुलगी, गल्लीच्या तोंडावर राहणारा पांढर्या कोडाचा विजय मुद्रस. एखादा सिनेमा असावा तसे चेहरे त्याच्या समोरून सरकत होते. त्यांचे आवाज, बोलण्याच्या सवयी, त्यांच्या चेहऱ्यावरचे वांगाचे आणि कोडाचे डाग सारे स्पष्ट दिसत होते. मग तोच त्याचा चाळा होऊन बसला. एका मागोमाग एक गोष्ठी तो आठवू लागला. आणि हे करता करता त्याचा कधी डोळा लागला ते कळलेच नाही. बस निघून देखील आता बराच वेळ झाला होता. आतले-बाहेरचे दिवे कधीच बंद झाले होते. अंधार एकेक करत प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार सांगत होता. १-२ गावे येऊन गेली. गाडीतली इतर माणसे एकेक करत उतरली. आता तो अगदीच एकटा उरला होता. अचानक कसला तरी आवाज आला आणि त्याला जाग आली. त्याने खिडकीतून बाहेर पहिले तेव्हा, त्याला खूप दूर कुठे तरी लहान लहान दिवे दिसत होते. बाकी सर्वत्र अपूर्व काळोख होता. बस थांबली आणि कंडक्टर त्याच्यापाशी येऊन त्याला म्हणाला "साहेब तुमचे गाव आले. उतरा." तो म्हणाला "एवढ्यात? कसे शक्य आहे? माझे गाव तर उद्या सकाळी यायचे आहे. तेव्हा स्वच्छ उजेड असणार आहे." कंडक्टर ने शांत पणाने त्याचे सामान गाडीतून खाली नेऊन ठेवले. आणि पुन्हा त्याच्या पाशी येऊन त्याला म्हणाला "तुम्हाला उतरावे लागेल. हेच तुमचे गाव आहे. ते सामोरे दिवे दिसतात तिथे तुमची बहिण राहते. तिथे तुम्हाला आता जाता येईल."त्याच्या पुढे दुसरा इलाज नव्हता. एका हातात घोडा घेऊन तो निमूटपणाने बस मधून खाली उतरला. अर्धवट झोप होती. कुठे उतरलो याचा काहीच अंदाज लागत नव्हता. काही क्षणात त्याच्या समोरून त्याची बस त्याच्या वर धूळ उडवत निघून गेली. साराच उजेड निघून गेला. मगाशी जे दिवे दिसत होते, ते देखील आता दिसेनासे झाले. अमूर्त अशा त्या अंधारात तोही विरत चालला. एखाद्या महाकाय गुहेत शिरतो आहोत असा त्याला भास झाला आणि त्यानंतर त्याला काहीच दिसेना. कसलाही आवाज ऐकू येईना. त्याने ओरडून देखील पाहिले. पण त्याला त्याचाही आवाज ऐकू आला नाही. जीवाच्या आकांताने त्याने ज्या दिशेला बस गेली तिकडे धावायला सुरुवात केली. पण आता त्याला कसलीच दिशा दिसत नव्हती. तो धावून धावून परत तिथेच येऊन पडत होता. किती तरी वेळेला त्याच्याच सामानाला ठेच लागून पडत होता. ठेचकाळून त्याचे अनवाणी पाय रक्ताने भरले होते. पण त्याला आता कसलीच जाणीव राहिली नव्हती. तो ओरडत सुटला. आपल्याच हातानी आपलेच केस ओरबाडत सैरावैरा धावत सुटला. यातून सुटका नाही याची त्यालाही कल्पना होती. अंगावरच्या कपड्यांचा फाटून चिंध्या झाल्या होत्या. आणि जवळ जवळ विवस्त्र होऊन एका अनामिक भीतीने जडत्वा पासून स्वतःला सोडवण्याचा तो प्रयत्न करत होता. काही वेळानी त्याला भलतेच आवाज ऐकू येऊ लागले. त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी सुद्धा सर्व बाजूनी त्याला ऐकू येऊ लागला. मनातल्या जाणीवा फुलाच्या पाकळ्या सुट्या व्हाव्यात त्या प्रमाणे एकेक करून विलग होऊ लागल्या. भान सुटलेच होते आता काहीही आठवेनासे देखील झाले. तो कोण आहे, कुठे चालला, का चालला, कुठून आला, सारे बंध तुटत चालले. काही क्षणातच तो अगदी एकटा-एकटा झाला. त्याची पावले आता आपोआप चालू लागली. तोही निर्विकार पणे त्यांच्या मागून ओढल्या सारखा जाऊ लागला. आता तो ही अंधारच झाला होता. चालत असताना त्याला मधूनच फांद्यांना फुटलेले, रक्ताळलेले, विद्रूप चेहरे दिसत होते. त्यांचे शोध घेणारे भेदक डोळे त्याला पाहत होते. हे सारे काय आहे? हे कसले चेहरे आहेत? मी कोण आहे? याचा विचार त्याला अस्वस्थ करत होता. आणि अचानक त्याच चेहर्यान्मधला एक चेहरा त्याच्या कडे पाहून हसू लागला. म्हणाला "थांब मित्रा! कुठे चाललास?" त्याच्या पायातले बळच निघून गेले. जणू पाय नसल्या प्रमाणेच तो मटकन खाली बसला. तो जिथे बसला होता, तिथे जागा बरीच थंड आणि लिबलिबीत लागत होती. त्याने हाताने चाचपून पहिले तर खाली सर्वत्र साप पसरले होते. तो आकांताने किंचाळला. तो चेहरा पुन्हा हसू लागला. शेवटी त्याने त्या चेहर्याला विचारले 'तुम्ही कोण? मी ओळखले नाही आपल्याला.' चेहरा तितक्याच निर्विकार पणाने म्हणाला, 'मला ओळखले नाही म्हणतोस? तु तुला तरी ओळखतोस का? कोण तु? कुठून आलास? कुठे चाललास? कशाला चाललास? या जागी तु आत्ता या अवेळी काय करतो आहेस? तु कुठे पोचलास ते तरी तुला ठाऊक आहे का? तु कशावर बसला आहेस?' त्याला यातल्या एकाही प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. उलट त्याला नवीनच प्रश्न पडू लागले. 'मी कोण हे देखील मला ठाऊक नसताना मला भीती का वाटती आहे? हे चेहरे कोण हे ठाऊक नसताना त्यांच्या पासून मी का पाळतो आहे? या चेहऱ्यांची शरीरे कुठे गेली? ज्या सापांवर मी उभा आहे, वास्तविक त्यातील एकही साप मला अजून चावलेला नाही. पण मला त्यांची भीती का वाटते आहे? त्यांचा थंड, ओला, लिबलिबीत स्पर्श मला ओंगळ का वाटतो आहे?' त्याचे त्यालाच हसू यायला लागले. तो निर्धास्त मनाने त्या विद्रूप चेहऱ्याशी बोलायला लागला. 'तुम्ही कोण? मला कशाची ओढ लागली आहे? मला कशाची भीती वाटते आहे? मी कशा पासून पाळतो आहे?' बाजूचे चेहरे लक्ष देऊन त्याच्या कडे पहात होते. एक चेहरा म्हणाला, 'ओढ ही कशाची तरी असते. ओढ लागण्यासाठी काहीतरी असावे लागते. ओढ लागण्यासाठी द्वैताचे अस्तित्व सिद्ध व्हावे लागते आणि द्वैत हे स्वत्वाशिवाय सिद्ध करता येत नाही. तुझ्या जवळ काय आहे? तुला तुझेच अस्तित्व नाही. तुला तुझी ओळख नाही. तु म्हणजे नेमके काय याची व्याख्या देखील तुला करता आलेली नाही. तरी तुला ओढ लागते म्हणतोस?' तो म्हणाला 'हो. काही क्षणांपूर्वी मला भीती वाटत होती. कसली तरी ओढ वाटत होती. कुणा बद्दल तरी प्रेम वाटत होते. मला असे वाटत होते की मला माझी ओळख आहे. माझा चेहरा, माझे शरीर, त्याचे हाव-भाव यामधून मी व्यक्त होत होतो.'एका चेहऱ्याने आपले भेसूर डोळे त्याच्या वर रोखले आणि म्हणाला 'चेहरा हे जर अस्तित्व असेल तर आम्ही जिवंत आहोत का? आणि चेहरा हे जर अस्तित्व नसेल तर आम्ही कोण आहोत?' यावर सारे चेहरे पुन्हा रक्त ठिबकत हसले. तो पुन्हा विचार करू लागला. थोड्या वेळाने त्याने निरागसपणे त्या चेहर्याला विचारले 'चेहऱ्यांना अस्तित्व नसते का? चेहऱ्यांना ओळख तर असते. ओळख आणि अस्तित्व यात काही फरक आहे का?' एक चेहरा उद्वेगाने म्हणाला, 'चेहऱ्यांना स्वतःचे अस्तित्व देखील नसते आणि ओळख देखील नसते. चेहरे शरीराला ओळख देतात. आणि शरीर हे अस्तित्व मानून जगणार्यांना ते आभास देखील देतात. कपडे बदलले म्हणून माणूस बदलत नाही. तसेच हे आहे. शरीरे बदलतात आणि चेहरे त्यांना फक्त ओळख देतात. अस्तित्व हे पुन्हा वेगळेच उरते. ओळखीसाठी प्रकाश असावा लागतो. अस्तित्वासाठी कशाचीही गरज नसते. ते चिरकाल टिकणारे असते. आणि म्हणून त्याला कशाचीही गरज नसते.' यावर तो म्हणाला, 'म्हणजे अस्तित्व दुबळे नव्हे का? अस्तित्वाला ओळखीची सतत गरज लागत असणार. माझी बहिण इथेच कुठे तरी राहते. तिचे अस्तित्व तिचा चेहरा ठरवतो. तिच्या मुलांना देखील चेहरा आहे. आणि चेहरा आहे म्हणूनच ते मला ओळखतात आणि मी त्यांना ओळखू शकतो. या अंधारात जिथे माझी ओळख नष्ट झाली आहे, तिथे मी कुणालाही ओळखू शकत नाही आणि मलाही कुणी ओळखू शकत नाही. या अशा अस्तित्वाचा काय उपयोग आहे? म्हणूनच म्हणालो की अस्तित्वाला चेहरा हवाच.' 'उपयोग?' दुसरा एक चेहरा बोलू लागला. 'ज्या सापांवर तु बसला आहेस त्यांचा उपयोग काय? मित्रा इथेच तुझी गल्लत होते आहे. तु ज्याला अस्तित्व म्हणतो आहेस ती खरे तर ओळख आहे. तु ज्याला प्रेम म्हणतो आहेस, ते प्रेम तुला कुणाच्या तरी बद्दल वाटते आहे. कदाचित तो कुणीतरी कधी तुझा आप्त असेल आणि कदाचित कधी तु स्वतः सुद्धा असशील. तु ज्याला भीती म्हणतोस ती देखील तुला कशाची तरी वाटते आहे. फांद्यांना लागलेले रक्ताळलेले चेहरे तु आधी कधी पाहिले नसशील. म्हणून तुला आमची भीती वाटते आहे. थंड, ओल्या, लिबलिबीत सापांना तु आधी कधी स्पर्श केला होतास का? बहुधा नसेल आणि म्हणून तुला त्या सापांची किळस वाटते आहे. तुझ्या प्रत्येक भावने मागे कोणते तरी साध्य असते आणि मग तु तुझ्या शरीराचे साधन करून त्या साध्याच्या मागे धावत असतोस. आणि हे करण्यात तुझा चेहरा तुला हर घडी मदत करत असतो. मनाची सारी कवाडे चेहऱ्यावर तर असतात. सर्व जगाचे तथाकथित ज्ञान तुला चेहऱ्यावरचे इंद्रिय मिळवून देते. डोळ्यांनी तु पाहू शकतो. नाकाने वास घेऊ शकतोस. जिभेने चव घेऊ शकतोस. त्वचेने स्पर्श करू शकतोस आणि कानाने ऐकू शकतोस. आणि मग तुला भ्रम होतो की हा चेहरा तुला जे मिळवून देतो तेच तुझे साध्य आहे. तो जे देतो त्याची तुला गोडी लागते आणि तु त्यातच रमत जातोस. आणि मग हा चेहरा तुला जी ओळख देतो तेच तुझे अस्तित्व आहे असे देखील तुला वाटायला लागते.' यावर तो म्हणाला 'पण सुखासाठी धावणे यात काही चूक आहे का? चेहरा जे देतो ते अंतरिम समाधान नाही का?' यावर एक चेहरा म्हणाला, 'सुख शांती आणि समाधान यातला फरक तुला ठाऊक आहे का? सुख शरीराला लागते. शांती मनाला हवी असते आणि समाधान आत्मिक असते. आता यातील नेमके तु काय मिळवतोस? काहीही नाही. तु केवळ स्वतःच्या अहं-भावाची हौस पुरवतोस. कुणाला काही दान केल्याने पुण्य मिळते असा तुझा समज आहे. आणि म्हणून तुझ्या डोळ्यांना भिकारी दिसला की तु भिक देऊन मोकळा होतोस. एखादी करून किंकाळी ऐकलीस तर मदत करायला धावतोस. पण या मागे प्रेम निश्चित नाही. कारण तु स्वतःला ओळखलेले नाहीस. भिकारी जेवला असेल या पेक्षा मी भिक दिली याचा तुला अधिक आनंद होतो. एक जीव वाचला असेल या पेक्षा मी जीव वाचवला याचा तुला अधिक आनंद होतो. परंतु मित्रा हा आनंद वांझोटा आहे. त्यातून तु सुख, शांती किंवा समाधान यातील काहीही मिळवू शकत नाहीस. आज या गहन अंधारात तु जो आहेस तेच तुझे खरे अस्तित्व नाही का? तीच तुझी खरी ओळख नाही का? तुझ्या समोर कोणतेही साध्य नाही आणि तुला मागचे काहीही आठवत देखील नाही. तुझ्या अंगावरील वस्त्राची तुला पर्वा नाही की अंगातून वाहणाऱ्या उष्ण रक्ताची देखील तमा नाही. तुला कशाचाही संग शिल्लक नाही. हीच तुझी खरी ओळख आहे.' एवढे बोलून तो चेहरा बोलायचा थांबला. त्याच्या डोळ्यातून आता रक्ताचे अश्रू वाहू लागले होते. त्याचा चेहरा विद्रूप, भेसूर होऊ लागला. त्यांच्या सारखाच, रक्त ठिबकत हसू लागला आणि हलकेच त्याच्या पासून बाजूला होऊन शेजारच्या एका रिकाम्या फांदीवर जाऊन स्थिरावला.

No comments:

Post a Comment