Tuesday, March 27, 2012

ग्रेस

बुधवार दि २८ डिसेंबर २०११. डॉ पुरुषोत्तम काळे यांचा फोन आला. "'ग्रेस' नी वेळ दिली आहे ९.३० नंतरची. लगोलग निघ." हातात फक्त ३० मिनिटे होती. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. वेळ मिळाली याचा आनंद होता. दिवसेंदिवस उन्हा-तान्हात चालणारा वारकरी वाखरी पासून पुढे खूप हळू हळू चालतो असे म्हणतात. त्याचे पाय जड होतात. मन भरून येते. आणि कसा दिसेल माझा विठ्ठल याच्या विचारात त्याची चाल मंदावते. या कवितेच्या वारकर्याला सुद्धा आता साक्षात विठ्ठल भेटणार म्हटल्यावर तसेच काहीसे झाले. शिवाय ग्रेस ची तब्बेत नाजूक आहे. फार बोलले की त्यांना त्रास होतो. कधी कधी ५-१० मिनिटात ते लोकांना निघायला सांगतात. या सर्व विचारांनी राहून राहून वाटत होते 'ग्रेस आपल्याला भेटतील का? आणि भेटले तर बोलतील का?' ज्यांना भेटण्याचे, ज्यांच्याशी बोलण्याचे स्वप्न कळायला लागल्या पासूनच्या वयापासून जपले होते, ते ग्रेस आता काही मिनिटात भेटणार होते. ग्रेसच्याच भाषेत सांगायचे तर भीतीची सावली पायापासून कण भर देखील दूर होत नव्हती. एखाद्या विचित्र रांगोळी टिंबागत ती पाया खालीच घोटाळत होती.

पुरुषोत्तम म्हणाला एखादा बुके आणि थोडे पेढे घेऊन जाऊ. पण माझ्या मनाला अजून काहीतरी ्यायचे होते. बुके आणि पेढे काय कुणाला पण देतो आपण. त्यात "ग्रेस फुल" काय? ग्रेस ला काय द्यावे? ज्याने आजवर संध्येची सूक्ते अलगद मांडली, त्या विश्वव्यापी कवीला, ज्या महाकवीने आपल्या गहीवरानी अमूर्त दुःखाची प्रतिमा साकारली त्या शब्द प्रभूला आपल्या खुज्या हातानी आपण काय देऊ शकतो? पण मग एक विचार मनात आला. ज्याने सगळ्यात मोठे तत्वज्ञान विश्वाला दिले तो कृष्णच ग्रेस ला द्यावा. मग एक कृष्णाची छान शी मूर्ती घेतली आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला गेलो. सकाळची वेळ असल्याने पेढ्याचे एकही दुकान उघडे नव्हते. पुरुषोत्तम बुके घेऊन आला आणि मी कृष्ण. पुरुषोत्तम बरोबर महेंद्र मुंजाळ देखील होता. वास्तविक महेंद्रने ही भेट ठरविण्यात खूप मदत केली होती. मी दिनानाथ मध्ये जात असतानाच वाटेत मला हे दोघे उभे दिसले. त्यांना गाडी लावतो असे सांगून पार्किंग शोधायला लागलो. खूप गर्दी होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्या लावलेल्या होत्या. मनातली धाक धुक संयम खोटा करत होती. शेवटी सेवा सदन च्या अगदी दारात, खेटून, एक जागा मिळाली. कशी बशी गाडी लावून जवळ जवळ धावतच सुटलो. हॉस्पिटल पर्यंत येईतोवर चांगली धाप लागली होती. दोघांना घेऊन लगेच ग्रेसच्या खोली कडे निघालो. सहाव्या मजल्यावर एका निवांत खोलीत तितक्याच निवांत पणे ग्रेस बसले होते. पोलो टी-शर्ट, सैलशी दवाखान्याची विजार आणि डोक्याला काळी लोकरीची टोपी. डोळ्यावरचा चष्मा. हातात २-३ वेग-वेगळ्या प्रकारांची आणि धातूंची कडी. त्यांचा एका विशिष्ठ लयीत होणारा आवाज. तोच ग्रेस. दाढी, मिशा आणि केस मात्र काळ घेऊन चाललेला.

बाहेरून विचारले 'आत येऊ का सर?' त्यांनी पण अगदी आमचीच वाट पाहत असल्या सारखे आत बोलावले. म्हणाले 'या सर..' मला कसेतरीच वाटले. ग्रेस नि आपल्याला सर म्हणावे? छे!

'सर प्लीज पण तुम्ही मला सर म्हणू नका.' मी. त्यावर ग्रेस म्हणाले

'का बरे? खरे तर तुम्हाला सर म्हणण्याने मीच मोठा होत असतो. एवढी साधी गोष्ट लोकांना का समजत नाही ते मला माहित नाही.' ग्रेसना वाकून नमस्कार केला. एका मोठ्या दिग्गज कवी आणि तात्विकाला स्पर्श करताना थेट पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवल्यासारखे वाटत होते. ग्रेस म्हणाले 'बसा. पण मी असा वाकून नमस्कार फक्त माझ्या आई-वडिलांना करतो.' काय बोलावे सुचत नव्हते. खूप भारावून गेल्यावर कधी शब्द हरवून तरी जातात किंवा कधी एखादा बांध फुटावा तसे वेडे वाकडे भळाभळा वाहू तरी लागतात. शिवाय काहीतरी कमी अधिक बोललो तर ग्रेस ना काय वाटेल याची धास्ती होतीच.

"तुटलेली ओळख विणता प्राणांची फुटते वाणी, पायांतून माझ्या फिरतो अवकाश निळा अनवाणी."

मी म्हणालो 'सर कोवळ्या मनावरचे ठसे खूप खोल असतात. शाळेत असताना तुमचा 'चिमण्या' नावाचा धडा असाच एक ठसा ठेवून गेलाय. खूप खोल.' ग्रेस हसले. 'शिवाय सांगू का सर माय देशापासून हजारो मैल जेव्हा दूर गेलो तेव्हा सोबतीला होती फक्त मातृभाषा. ती आई सारखीच वाटते तिथे आणि तिचे लेखक आणि कवी वडील होऊन येतात.' ग्रेस यावर अगदी मनापासून हसले. खूप छान वाटले. पिशवीतला कृष्ण काढून त्यांना दिला. बराच वेळ ग्रेस कृष्णाकडे पहातच राहिले. त्यांना मूर्ती तर खूपच आवडलेली दिसत होती. पण कदाचित कसला तरी विचार करत असावेत. डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. अवचित म्हणाले 'तुम्ही माझा मोठाच सन्मान केलात. मला कृष्ण दिलात. माझा आजचा दिवस खूप चांगला साजरा झाला. पण एक विचारू का? तुम्ही मला कृष्ण का दिलात?' मी म्हणालो 'सर तुम्ही मराठी भाषेला जो संध्यामग्न पुरुष दिला, तुम्ही जो कृष्ण दिला तो अमर आहे. त्याचेच हे छोटेसे प्रतिक!'. त्यावर कौतुकाने मान हलवत ग्रेस पुन्हा म्हणाले 'Its great honor. You made my day!' माझ्या आयुष्यातला हा खरेच एक सफल क्षण होता. ज्याने आज वर आपल्याला मूर्तिमंत आनंद दिला, त्या फनकाराला आपण एक क्षण का होईना आनंदी केले याचे मला अतिशय समाधान वाटले.

मग ग्रेसनी सर्वाना त्यांच्या कडचा पेढा खिलविला. त्यातही त्यांनी एक अजोड योग साधला. एक लेडी डॉक्टर तिथे आल्या होत्या. त्यांना ग्रेसनी हाक मारून बोलावून घेतले. त्यांची आम्हाला ओळख करून दिली. आणि शेवटी त्यांच्या हस्ते त्यांनी तो पेढा आम्हाला दिला. आणि त्या डॉ ना म्हणाले सुद्धा 'अहो घराच्या स्त्रीने हातावर गोड ठेवण्याचा योग आहे. आता आम्ही इथे तुमच्या घरी आहोत. तेव्हा तुम्हीच थोडी मदत करा.'

मग गप्पांना सुरुवात झाली. म्हणाले 'ग्रेस म्हातारा झालेला नाही. तो तितकाच तेजस्वी आहे. त्याच्या तेजात काहीही फरक झालेला नाही. तुम्ही ग्रेस ची कोणतीही एक कविता वाचलेली असेल, कोणताही एक लेख वाचलेला असेल तर तुम्हाला तिथे ग्रेस भेटला असेल. आणि तो ग्रेस तितकाच तेजस्वी असेल जितका मी आज तेजस्वी आहे. त्याला इंग्रजी मध्ये एक फार सुंदर शब्द आहे instantaneous immortality. क्षणिक अमर्त्यता. मी आणि हृदयनाथ ने आज वर किमान २७ कार्यक्रम एकत्र केले. मी कधी कुठल्या कार्यक्रमाची तयारी वगैरे केली नाही. भाषण लिहून वगैरे काढले नाही. जो जसा ग्रेस आहे तो तसा व्यक्त करत गेलो. सारी वाक्ये सुचत जातात. एका मागोमाग एक. त्यांची संगती लागलेलीच असते. किंबहुना आता कुठले वाक्य येणार याचा योग जुळत आलेला असतो. आता आपण भेटलो हा देखील एक योग नाही का? तो योग तेजस्वी असतो. त्यात फरक पडणार नाही. माझी स्वतःची मुले डॉ. आहेत. पण मी त्यांच्या कडे जाण्यापेक्षा इथे आलो. हा योग नाहीतर दुसरे काय आहे? माझी पत्नी सुद्धा डॉ होती आणि माझ्या पेक्षा १५ वर्षांनी मोठी होती. हा देखील योगच आहे. नाही का?' आम्ही कानात प्राण आणून ऐकत होतो.

जाण्याच्या आधी एक गोष्ट नक्की केली होती की ज्याने ग्रेस ला त्रास होईल, असे कसलेही प्रश्न विचारायचे नाहीत. या मध्ये ग्रेस च्या तब्बेतीची चौकशी करायची नाही हे पण निश्चित केले होते. पण बोलता बोलता ग्रेस नी स्वतःच विषय काढला. 'आता माझा cancer. आधी घशाला झाला म्हणून इथे आलो. त्याला काढून टाकला आणि परत गेलो. सहज म्हणून डॉक्टर ना म्हटले पोटात थोडे दुखते. तर त्यांनी तिथे पण एक cancer शोधून काढला. अर्थात हे स्वतंत्र राजे आहेत. आधीच्या cancer चे मांडलिक राजे नाहीत. ते एक चांगले. पण एक महिना लागेल म्हणून मी इथे येऊन पडलो. आणि आता पुरे ५ महिने झाले. अजून हलण्याची लक्षणे नाहीत. आता एक दोन महिन्यात निघायचं विचार करतो आहे. पण तुम्हाला सांगू का? माझ्या या खोलीचे दर सदैव उघडे असते. मी मध्यात आहे आणि माझ्या भोवतीची सारी दारे मला उघडीच ठेवायची आहेत. नागपूरला असताना मी दररोज सकाळी ४ वाजता उठतो. ४.३० वाजता मी पाण्यात असतो. मग भलेही कितीही थंडी असो. आणि इतरांची चाहूल लागण्याच्या आधी मी घरी परतलेला असतो. कोणाचीही चाहूल नसते तेव्हा मी माझी प्रार्थना करतो. आता इथे आल्या पासून साऱ्यात खंड पडला आहे.'

ओघ थांबला म्हणून पुरुषोत्तम ने विचारले 'सर तुम्ही एकदा भीमाशंकर ला या. तिथे एक गेस्ट हौस आहे. तिथे तुम्ही मुक्कामाला या. एखादा छान कार्यक्रम करू. अगदी मोजके लोक बोलावू म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.' यावर ग्रेस म्हणाले 'मी जरूर येईन भीमाशंकर ला. पण डॉक्टर गर्दी हा माझ्या लेखी प्रश्नच उरत नाही. मी एकांतवासी नाही. निर्मनुष्य शांततेत मी जर एकटा असेन तर मी वेडा होईन. 'being alone' आणि 'lonliness' या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. मला स्मशान शांतता नको आहे. मला सहवासातला एकांत हवा आहे. ज्या माणसाबद्दल मला विचार करायचा आहे, त्याच्या सोबत राहणेच मी पसंत करेन. मी पक्षी नाही. प्राणी नाही. म्हणून मला त्यांच्या बरोबर राहता येत नाही. आणखी एक भाग असा आहे की I am a traveller and not a tourist. I travel within. मला एखादे ठिकाण पाहायला प्रत्यक्ष तिथे जाण्याची जरुरी नाही. मी माझ्यात बसून तिथे जाऊ शकतो. मी कुठेही जाऊ शकतो. गंगेचे वर्णन करायला मला गंगेवर जावे लागत नाही. पण मग अशी गंगा परकर घालून माझ्या पुढे उभी राहते. आणि मग मी तिचे वर्णन करू लागतो.'

थोडी उसंत पाहून मी त्यांना विचारले, "सर एकदा अमेरिकेला माझ्या कडे राहायला या. तुमच्या कवितांचा एखादा छान कार्यक्रम करू. सर तुम्ही बोला आम्ही ऐकत राहू. अमेरीका पाहू." त्यावर ग्रेस हसले. बराच वेळ काही बोललेच नाहीत. मग हातातल्या कड्यांचा विलक्षण आवाज करत म्हणाले, "सर मी अमेरिकेला जरूर येईन. खरे सांगू का? तर मला अमेरिकेला येवूनच मरायला नक्की आवडेल." मला आश्चर्य वाटले आणि मी विचारले, "मरायला कशाला सर? जगायला आलात तरी चालेल की!" यावर ग्रेस अगदी दिलखुलास हसले. म्हणाले "त्याचे असे आहे की या भूमीने मला जन्म दिला आहे. तिनेच माझे पालन पोषण केले आहे. आता तिच्यावर मरून तिच्या उपकारांची फेड अपकाराने मला करायची नाही. तिचे केवढे ऋण आहे माझ्या वर. म्हणून म्हटले की मला अमेरिकेला मरायला यायचे आहे. " अलगद ग्रेस च्याच ओळी आठवल्या

"गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही; अलगद भरुनी यावे."

ग्रेस च्या या वाक्याने सारेच मुके झालो होतो. मग ग्रेसनीच थोडा वेगळा विषय काढायचा म्हणून विचारले "बर मला एक सांगा तुमच्या अमेरिकेत महाराष्ट्र फौन्डेशन म्हणून एक संस्था आहे आणि बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणून एक संस्था आहे. माझ्या मते दोन्ही मराठी माणसांनी चालवलेल्या संस्था आहेत. त्यांच्यात नेमका फरक काय?"

आता बोलायची माझी पाळी होती आणि प्रश्न मोठाच बाका होता. एकाला चांगले म्हणावे तर दुसरा रागावतो. हे म्हणजे आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना सारखे झाले. शेवटी मनात २-४ वाक्ये जुळवून सुरुवात केली. "काय आहे सर वास्तविक या दोन्ही संस्था मराठीच आहेत. आणि माझ्या मते त्या एकाच नाण्याच्या २ बाजू आहेत. आता त्याच्यातला फरक म्हणाल तर माणसाच्या आयुष्यात जी काही विसंगती आहे ती का आहे याचा शोध घेण्याचा आणि शक्य तितकी ती विसंगती कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र फौन्डेशन करत असते. आणि माणसाच्या आयुष्यात जी सुसंगती आहे ती जास्तीत जास्त वृद्धिंगत कशी करता येईल याचा प्रयत्न बृहन महाराष्ट्र मंडळ करत असते."
हुश्श!! मला हे वाक्य संपता संपता श्वास लागतो की काय असे झाले होते.

यावर देखील अगदी मोकळे पणाने ग्रेस नी दाद दिली. त्यांना विचारले की २०१३ साली बोस्टन ला बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून याल का म्हणून. ग्रेस म्हणाले "अहो तुम्ही बोलवा. मी कुठेही येईन. तुमच्या घरात वळचणीला हाडे पसरण्या पुरती जागा मला दिलीत तरी मला चालेल."

"गेले उकरून घर, नाही भिंतीना ओलावा; भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा."
"आण लिंबोणी सावल्या, नाही आढ्याला छप्पर; वळचणीच्या धारांना लावू चंद्राची झालर "

असा पाचूचा गिलावा करणारा आणि चंद्राची झालर लावणारा महाकवी हाडे पसरण्या पुरती जागा मागत होता.
म्हणालो "सर घर तुमचेच आहे. माझी बायको तुम्हाला हवे ते करून घालेल. माझ्या मुली तुमच्याशी खेळतील. तुम्ही त्यांना कविता म्हणून दाखवा. छान मजा करू." मी मनाने ग्रेस ना घरी घेऊन गेलो होतो.

अचानक ग्रेस म्हणाले "तुमचा स्वेटर फारच छान आहे. मला खूप आवडला. इथे खूप थंडी असते. आणि मी काही विशेष कपडे देखील घेऊन आलो नाही. हे म्हणाले ४-५ दिवस लागतील आणि आता पुरे ५ महिने होत आलेत. असा स्वेटर इथे मिळत नाही. हा अमेरिकेचा आहे का?" मी म्हणालो "हो सर. पुढच्या वेळेला येताना मी तुमच्या साठी एक स्वेटर जरूर घेऊन येईन." खूप छान वाटत होते. उद्या एखाद्या वारकर्याला विठोबा म्हणाला की पुढच्या वर्षी येशील तेव्हा तुझ्या गावचा पेढा मला घेऊन ये तर त्या वारकर्याला काय वाटेल? माझ्या बरोबर जाताना माझ्या २-३ कविता घेऊन गेलो होतो. ग्रेस चा अभिप्राय घ्यायचा होता. "काहीही येत नाही तुला" असे जरी ग्रेसनी म्हटले असते तरी चालणार होते. पण ग्रेस नी कविता ओझरत्या वाचल्या. म्हणाले "माझ्या जवळ ठेवून जाल का? मी निवांत वाचून तुम्हाला अभिप्राय लिहून देतो." कृतकृत्य होणे म्हणजे काय याचा अनुभव मी आयुष्यात पहिल्यांदाच घेत होतो.
मग ग्रेसनी त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार वितरण कार्यक्रमाची माहिती सांगितली. त्यांची एक मुलाखत महेंद्र मुंजाळ घेणार होते. त्याची थोडी चर्चा झाली. मग त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ग्रेसनी स्वतः मला आणि पुरुषोत्तम ला दिली. पण मी ३० तारखेला अमेरिकेला परत जाणार असल्याने कार्यक्रमाला जावू शकणार नव्हतो. मग ग्रेस नी पुरुषोत्तम ला आग्रहाने कार्यक्रमाला यायला सांगितले. वर म्हणाले " डॉ भेटत चला वरचे वर. जमले तर नागपूरला एकदा माझ्या घरी राहायला या. म्हणजे मग तुम्हाला ग्रेस कसा जगतो ते अनुभवता येईल. ग्रेस नेमका कशातून निर्माण होतो ते देखील समजेल. निर्मितीच्या मागची पार्श्वभूमी पहिली की मग निर्मितीची खरी मौज कळते. तेव्हा नागपूरला जरूर या."

बराच उशीर झाला होता. ग्रेसची विश्रांतीची वेळ झाली होती. त्यांच्या पुस्तकांवर त्यांचे आशीर्वाद आणि स्वाक्षरी घेतल्या आणि एक फोटो काढण्याची विनंती केली. तेव्हा ग्रेस म्हणाले "ती माझी टोपी आणता का? त्या टोपी शिवाय ग्रेस नाही." मग ती टोपी घालून अतिशय प्रसन्न मनाने २-३ फोटो काढले. पुन्हा एकदा ग्रेस ना वाकून नमस्कार केला. आणि शक्य तितक्या लवकर ग्रेस ना अमेरिकेत घेऊन जायच्या गोष्टी मनात रंगवत ग्रेस चा निरोप घेतला.

नंतर एकदा महेंद्र शी फोन वर बोललो. ग्रेस च्या तब्बेतीची चौकशी केली. तर महेंद्र म्हणाला "तु दिलेल्या कृष्णावर ग्रेस जाम खुश असतात. त्यांनी तो कृष्ण अगदी सारखा डोळ्यासमोर राहील असा ठेवून घेतला आहे. आणि जो कोणी भेटायला येईल त्याला माझ्या अमेरिकेतल्या मित्राने माझ्या साठी कृष्ण आणला म्हणून मोठ्या अभिमानाने सांगतात. का आणला ते पण सांगतात. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात तोच १५-२० वर्षांपूर्वीचा ग्रेस दिसतो."
मला पुढचे ऐकवले नाही. ज्या स्वर्गीय कवीने माझ्या लहान पणा पासून अवघे आयुष्य पुरेल इतका आनंद भरभरून दिला, त्याला शेवटचे काही दिवस का असेना माझ्या भेटीमुळे आनंद होत होता. मला जन्म सार्थकी लागल्याचे समाधान वाटले.

गेला आठवडाभर खूप कामात होतो. रोज ठरवत होतो की आता ग्रेस घरी गेले असतील. त्यांना फोन करू. १-२ दिवसात फोन करणार होतो. आज अचानक सकाळी प्राजक्ताचा फोन येऊन गेला. तिने मेसेज ठेवला होता."ग्रेस गेले. तुझी आठवण झाली. फोन कर." दुपारी जेव्हा तिचा मेसेज ऐकला तेव्हा कसेतरीच वाटले. अमेरिकेची भेट राहिली. स्वेटर द्यायचा राहिला. मुलीना कविता म्हणून दाखवायच्या राहिल्या.

एक स्वर्गीय आनंदयात्री कायमचा कैलासाला निघाला. दुःखाचा महाकवी दुखः मुक्त झाला. अनंताचे दान देऊन मुक्त हस्ताने वैकुंठाला चालला.
"पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने; हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने."
"डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती; रक्ताचा उडाला पारा या नितळ उतरणीवरती."
"पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला? तार्यांच्या प्रहरापाशी पाउस असा कोसळला."
"संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा; माझ्याच किनार्यावरती लाटांचा आज पहारा!"

ती गेली तेव्हाही पाऊस निनादत होता. हा पाऊस ग्रेस अमर करून गेला. ग्रेसची "चन्द्रधून" दूर कुठून तरी ऐकू येत होती.

"मावळता रंग पिसाटे भयभीत उधळली हरीणे; मुद्रेवर अटळ कुणाच्या अश्रूंच्या उतरली किरणे."
"पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले; ते जिथे थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले."
"ते वृक्ष पांढरे झाले. ते वृक्ष पांढरे झाले."

4 comments:

  1. सुंदर आठवणी! वाचतांना सगळे प्रसंग डोळ्यासमोर जिवंत झाल्यासारखे वाटतात.

    ReplyDelete
  2. lekha vachala.navinch Grace disale. dolyatun tachakan ashru oghalale. krishana bhet denya magacha apala hetu.gr8. likhan style sunder oghavati .kavitacha chapkhal vapar.

    ReplyDelete