Saturday, October 8, 2011

राणी झाली जेर

स्त्री-भ्रूण हत्या हा भारतासाठी एक चिंतेचा विषय होत चालला आहे. भारतामध्ये मुलींचे प्रमाण दर १००० मुलांमागे ९१३ झाले आहे. १९७४ साली हेच प्रमाण ९७४ होते. परंतु याहून सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे स्वतःला प्रगत समजणाऱ्या महाराष्ट्रातील मुलींचे प्रमाण हे दर १००० मुलांमागे ८८३ झाले आहे. दर हजारी मुलींच्या प्रमाणात आता भारतात महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा क्रमांक लागत असावा.
याच मराठी मातीत कधी रुक्मिणी, कधी जिजाऊ तर कधी दिव्य पराक्रमी झाशी राणी जन्मली. आनंदीबाई जोशी, पंडिता रमाबाई रानडे, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर यांच्या सुधारक विचारांच्या महाराष्ट्रात आज सर्वात जास्त प्रमाणात मुलीला जन्म नाकारला जातो आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

डोक्यावरती फेटा भरजरी
मोत्याचा शिरपेच
पाठीवरती राजकुमार
तिला राज्याचा पेच

राणी लढली प्राण पणाने
ती वीर मराठी लेक
तलवार मराठी भाला घेउनी
बुरुजा वरुनी झेप

गोऱ्या हाती गवसे राणी
डाव साधते दैव
कपट पर-धार्जिण दुही
राज्य लोपवी कर्म

राणी गेली राज्य ही गेले
दुर्मिळ झाले वीर
मराठी मातीत पुन्हा न जन्मणे
आता राणी झाली जेर

रस्तोरस्ती आता बसती
राणीचे खाटिक
राणी जन्मली कधी गर्भी
तर भ्रुणावरती शस्त्र

इंग्रज मारी राणीला तो तर
राज्यासाठी त्रस्त
मराठी मारतो हरेक राणी
आता झाले षंढ विवस्त्र

झाले षंढ विवस्त्र
आता राणी झाली जेर

@@@@@@@@@@@@@@@@@@
निखील कुलकर्णी
@@@@@@@@@@@@@@@@@@