Wednesday, December 30, 2015

मनातल्या मोरपिसाची..

पाडगावकर गेले म्हणतात. मला काही खरे वाटत नाही. जगण्याच्या हर एक प्रसंगात, अगदी गटारातल्या लेंडी पासून ते तिरडीच्या दांडी पर्यंत, अगदी हरेक प्रसंगात हा कवी रसरसून जगला आहे. आयुष्याच्या अनेकानेक प्रसंगात त्याची मोकळी-ढाकळी सोबत झालेली आहे. असे म्हणतात कि मेंदूच्या आत जे nurons असतात, 'if they fire together, they wire together'. त्या न्यायाने मराठी मनाच्या अगणित nurons बरोबर हा कवी आणि त्याने निर्माण केलेले भावविश्व अगदी कायमचे बांधून, जोडून, बिलगून गेले आहे. ते विश्व कधी कुठे जाईल काय!! 

जुईच्या फुलांनी काढलेल्या चांदात, भुईच्या चंद्रोत्सवाला घेऊन जाणाऱ्या अलौकिक प्रतिभेचा धनी कधी कुठे जाईल का!! भातुकलीच्या खेळातल्या राजा-राणीला अजरामर करून त्यांच्या कुठल्याही गावातल्या आणि कुठल्याही वयातल्या राजा-राणीच्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहणारा हा कवी कुठे जाईल का!! मस्त संध्याकाळी विस्कीचा ग्लास ओठाला लावताना शेजारी बसून आश्वस्त करणारा आणि "यांच असं का होतं कळत नाही यांना कळतं पण वळत नाही" असे म्हणून सभ्यतेच्या धुवट कल्पनांना उडवून लावणारा विचारवंत कधी कुठे जाईल का!! तिच्या बटाना जोवर हा मुजोर वारा उधळत राहील तोवर हा कवी कुठेही जाणार नाही. हातात हात घेताना आणि तोच चंद्र नविन होऊन पाहताना हा अवलिया तिथे नक्की असेल. कधी स्मृतीच्या अगणित पाखराना घेऊन हा कवी भेटेल. आणि त्यातलेच एखादे पाखरू त्याच्याही स्मृतीचे असेल. त्या पाखराला पाहून डोळे भरून येतील कदाचित!! पण मग हा कवी "डोळे कशासाठी" ते सांगत राहील. "डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी" म्हणत आसवात देखील "मी पापण्यात माझ्या हि झाकिली विराणी" म्हणत सोबतच राहील.  

आयुष्याच्या छोट्या-छोट्या प्रसंगांचे असे सोहळे करून जगायला शिकवणारा हा कवी कधी कुणाला एकट्याला सोडून कुठे जाइल हे मला तरी खरे वाटत नाही!! 

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे 

हळू हळू काजळताना सांज हि सुरंगी, तुझे भास दाटुनी येती भास अंतरंगी 
या उदास आभाळाची शपथ तुला आहे, दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे 
मनातल्या मोरपिसाची..

~ लेखक - निखिल कुलकर्णी 

Tuesday, December 22, 2015

संजय उवाच

काल संजय लीला भंसाळीचा "बाजीराव मस्तानी" पाहिला. लोकांच्या टीका, पिंगा गाणे, बाजीराव पेशव्यांनी केलेला नाच, खुद्द ज्या गावात हे कथानक घडले त्या गावात सिनेमाच्या प्रक्षेपणावर लादली गेलेली बंदी या सगळ्या मुळे उत्सुकता खूपच ताणली गेली होती. शिवाय पहिल्या दिवशी अमेरिकेत देखिल सिनेमा हाउस फुल होता. तिकिट मिळाले नाही. त्यामुळे अजून जास्त उत्कंठा वाढली. अमेरिकेतल्या गर्दीचा पूर्वानुभव लक्षात घेत २ तास आधीच थिएटर मध्ये पोचलो होतो. तरी देखील रांगेचा भला मोठा नागोबा पुढे होताच. एकूणच इथली गर्दी बघता इथे देखील तिकिटांचा काळा बाजार सुरु व्हायला फार वेळ लागेल असे दिसत नाही. तर ते एक असो.

पण मला सिनेमा आवडला. खूप आवडला. संजय लीला भंसाळीचे अभिनंदन!!

मुळात पेशवे आणि त्यांची कारकीर्द यांच्या बद्दल मला जरां जास्तच आकर्षण आहे. त्यामुळे या विषयीची मिळतील ती जवळ-जवळ सर्व पुस्तके मी परत परत वाचली आहेत. त्यातून काय मिळाले हा भाग वेगळा. पण हि पुस्तके वाचल्या मुळे शनिवारवाड्याच्या बुरुजाच्या आत जो प्रचंड कार्यखाना होता, तो प्रत्यक्ष कसा असेल याचे जबरदस्त कुतूहल जागे झाले हे मात्र नक्की! त्या मोडून पडलेल्या जोत्यावर अनेक वेगवेगळे महाल कसे उभे असतील, त्यातल्या कुठल्या महालात बाजीरावसाहेब चिमाजीआप्पा बरोबर दौलतीचे हिशेब पाहत बसले असतील, त्यातल्या कुठल्या जोत्यावर आरसे महाल उभा असेल, कुठल्या जोत्यावर मस्तानीचा महाल असेल, कुठल्या महालात मल्हारराव होळकर तंबाखूचा बार आणि मिशीला पीळ भरत बसले असतील, कुठल्या महालात नानासाहेब, रघुनाथराव, जनार्दनराव, समशेरबहाद्दर आणि सदाशिवरावभाऊ सोंगट्या खेळायला नाहीतर श्लोक म्हणायला एकत्र जमत असतील, तो सात मजली महाल कुठे असेल, पार्वती बाई कुठल्या खिडकीतून सदाशिवरावभाऊच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील असे असंख्य प्रश्न पडत राहिले. कितीही वेळा त्या वाड्यात फिरलो तरी याची उत्तरे मिळाली नाहीत.

संजय लीला भंसाळीचे अभिनंदन खरे तर त्यासाठी कि ज्याने हा आज नसलेला वाडा उभा करून दाखवला. ज्या वाड्यातली लक्ष्मी आणि दिवा कित्येक शतकांपूर्वी इंग्रजाने जाणिवपूर्वक विझवून टाकले, त्या वाड्यात पुन्हा एकदा रांगोळ्या काढल्या जाताना पाहणे हा खरेच एक अप्रतिम अनुभव होता. त्यातले चौक, प्रवेशद्वारे, सज्जे, खिडक्या, झुंबरे, संगमरवरी फरशा, भिंतीवर काढलेले रामायण आणि महाभारता मधले प्रसंग… सगळेच अतिशय समर्पक वाटले. ज्या वास्तूची आज राख देखील शिल्लक नाही ती वास्तू केवळ कल्पनेने उभी करणे आणि त्याच्यात तोच आब आणि तीच पुण्याई ओतणे हे सोपे काम नाही. Great Job!!

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा हिंदी माणुस हिंदी भाषेमध्ये मराठी माणसावर सिनेमा काढतोय हे देखील काही कमी नाही. ज्या गावातून औरंगझेबाच्या नावाचे रस्ते आहेत त्या गावात लहान मुलांना शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवाजी आणि बाजीराव यांना गुंड आणि लुटरु म्हणून शिकवत असले तरी नवल वाटायला नको. तर अशा पार्श्वभूमीवर एखाद्या हिंदी दिग्दर्शकाने बाजीरावावर सिनेमा काढावा याचेही कवतिक करावेच लागेल.

बाकी कामाच्या बाबतीत काशीबाई (प्रियांका चोप्रा) सर्वात अव्वल!! प्रियांका चोप्रा ला अभिनय करता येतो हे प्रथमच पाहिले. त्या खालोखाल राधाबाईनी झकास काम केले आहे. छत्रपती शाहू (महेश मांजरेकर) देखील अप्रतिम. एक दोन-तीन अपवाद वगळले तर मस्तानी आणि बाजीराव देखील उत्तम! अर्थात रणवीर ची तुलना नकळत मनोज जोशी बरोबर करण्याचा अनावश्यक मोह होतो हे मात्र खरे! मनोज जोशी आणि स्मिता तळवलकर यांनी केलेला मराठमोळा बाजीराव आणि काशीबाई लोकविलक्षण होते यात वादच नाही. तरी देखील "तुलना अनावश्यक" हे इथे लक्षात घेतले पाहिजे.

बहुतेक सर्व प्रसंग, संवाद खिळवून ठेवणारे आहेत. एकमेद अपवाद म्हणजे मस्तानी ची बाजीरावांनी केलेली delivery!! बाजीरावांनी मस्तानीला lamaze (म्हणजे प्रसुतीच्या वेळी घ्यायचे श्वासाचे विशिष्ठ तंत्र) चे training दिले ते पाहून अंमळ हसू आले इतकेच!! पण काय सांगा त्यांनी दिलेही असेल. (नाही म्हणणाऱ्यानी तसे training न दिल्याचा पुरावा शनिवारात नाहीतर कोतवालीत उद्या दुपार पर्यंत जमा करणे.)
तर संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

आता काही आक्षेपांबद्दल. अर्थात मी काही सिनेमाचा तज्ञ वगैरे नाही. तरी पण एक सामान्य माणूस म्हणुन जे काही वाटले ते असे.…

पिंगा गाण्यात खरे तर गैर काहीच वाटले नाही. उलट त्यातून काशीबाईच्या आणि अर्थात पर्यायाने मराठी मनाचा मोठेपणा ठळकपणे जाणवला. कपडेपट थोडासा झाकीव असता तरी चालले असते. पण राणीवशात कुणी, कसले, कधी आणि किती कपडे घातले असतील याचे कसलेही पुरावे उपलब्ध असतील असे वाटत नाही. (असतील तर शनिवारात नाहीतर कोतवालीत उद्या दुपार पर्यंत जमा करणे.) तर ते एक असो. एकूण गाणे कथेला अगदी समर्पक आणि आवश्यक वाटते.
तर संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

बाजीराव साहेबांनी केलेला मल्हारीच्या नावाचा भंडार्याचा नाच!! मला याच्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. शेवटी तो शिपाई गडी. त्यात युद्ध मारून आलेला. त्यांचा मित्र मल्हारबा होळकर कि ज्यांचे दैवत म्हणजे मल्हारी मार्तंड. केला असेल मित्राच्या संगतीने नाच. आता गणपतीच्या मिरवणुकीत सर्व जातीचे आणि धर्माचे लोक रात्र भर नाचतात. काय त्यांचे सर्वांचे दैवत गणपती असते का काय? नाच हे बेधुंदपणाचे एक व्यवच्छेदक लक्षण आहे. विजयाने माणूस बेधुंद होणे स्वाभाविक हि आहे. आणि अशा बेधुंद वेळी 'आपले दैवत काय' याचा कोता विचार करत बसण्यापेक्षा ज्यांनी आज आपल्याला विजयी केलं त्या आपल्या भोळ्याभाबड्या मराठी-धनगरी गड्यांच्या दैवताचे स्मरण बाजीरावाने केले असेल तर त्यामुळे माझ्या लेखी बाजीरावांच्या प्रती आदरात वाढच झाली आहे. हे देखील जाणत्या आणि नेणत्या नेत्याचे लक्षण म्हणावे लागेल.

बर असेही नाही कि बाजीराव कंबर उडवत "मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है" च्या अंगाने नाचला आहे. उलट मी तर म्हणेन कि हे गाणे म्हणजे Team Work आणि Coordination चा एक उत्कृष्ठ नमुना आहे. किमान ३०० पेक्षा जास्त लोकांना घेऊन नाच करायचा हे अवघड काम आहे. या गाण्याला आक्षेप घेणार्यांनी हवे तर त्यांच्या गल्लीतल्या १०-१२ धडधाकट पुरुषांन घेवून एखादा नाच बसवून बघावा. आणि हातीपाई वाचलात तर पुढचा आक्षेप घ्यावा.

तर संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

तर एकूण सिनेमा एकदम झकास आहे. मराठी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो आहे. सिनेमाच्या थिएटर मध्ये माझ्या शेजारी खूप हिंदी भाषिक मंडळी बसली होती. त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून तर बाजीरावाचा, शिवाजीचा आणि मराठी साम्राज्याचा अतिशय अभिमान वाटत होता. आणि उगाचच आपण मराठी आहोत म्हणजे जणू आपणही त्या बाजीचेच अंश आहोत असेही वाटत होते. एकाच वेळी मराठी आणि अमराठी लोकांना आनंद देण्याचा हा चमत्कार करणाऱ्या संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

राहता राहिला प्रश्न इतिहासामधल्या त्रुटींचा!! तर एक लक्षात घेतले पाहिजे कि ज्या "राऊ" या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे, त्याच्या प्रस्तावनेत स्वत: ना. सं. इनामदारांनी लिहिले आहे कि "हि एक ऐतिहासिक कादंबरी आहे. ऐतिहासिक बखर किंवा दस्तावेज नव्हे". तेव्हा प्रसंगानुरूप एखादे पात्र घातले असेल. एखादा संवाद वगळला असेल. एखाद्या प्रसंगात फेर फार देखील केला असेल. उद्या एखादा तज्ञ (कि तद्दन?) इतिहासकार म्हणेल कि "बाजीरावसाहेबानी ८ ऑकटोबर १७२९ रोजी घोड्यावर बसून पवन मुक्तासन केले होते. त्याचा सिनेमात कुठेही उल्लेख नाही.". तर त्यावर इतकेच म्हणावे लागेल कि ते घोड्यावर बसून मक्याची कणसे खात असल्याने कदाचित एखाद वेळी अवचितपणे घोड्यावर पवन मुक्तासन केले देखील असेल. पण जिथे मुदलात कणीस खाण्याचाच प्रसंग दाखवलेला नाही त्यामुळे पवन मुक्तासनाच्या प्रसंगालाही फाटा दिला आहे. तेव्हा हे ऐतिहासिक तद्दनानो जरा थंड घ्या. शास्त्रीबुवा बसा खाली!!

तेव्हा संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

अर्थात हे काही मी संजय लीला भंसाळीला सांगावेच असे नाही. पण तरी देखील राहवत नाही म्हणून सांगतोच.

हे संजया,

या टीका करणाऱ्याकडे ढुंकूनही पाहू नको. अरे त्यांनी खुद्द प्रत्यक्ष बाजीरावास जिथे सोडला नाही तिथे ते तुला सोडतील कि काय!!

या लोकांनी ज्ञानेश्वरावर टीका केली आहे. समर्थ रामदासांवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका केली आहे. त्यांचे महाप्रतापी चिरंजीव छत्रपती संभाजी महाराजांवरही टीका केली आहे. इतकेच काय पण त्यांचे चरित्र लिहून मराठी माणसाला शिवाजीचा आदर्श घालून दिलेल्या बाबसाहेब पुरंदरे नाही त्यांनी सोडलेले नाही.

हे टीकाकार जगातले सर्व श्रेष्ठ टीकाकार आहेत. चंद्रावरचे डाग त्यांना आधी दिसतात. सूर्याची भोके दिसतात. यांना भीमसेनचा षड्ज चुकतो आहे असे देखील वाटू शकते. हरीजीना देखील "आता बासरी थांबवा" असे सांगायला हे कमी करत नाहीत. हे गांधींजीची टिंगल करतात आणि नथुरामला देखील शिव्या घालतात. तिथे तुझ्या सिनेमाची काय गोष्ट!!

यांच्या या सवई मुळेच, ७०० वर्षे झाली तरी दुसरा ज्ञानेश्वर निर्माण करता आलेला नाही. ४०० वर्षात दुसरा शिवाजी नाहीतर संभाजी तयार करता आलेला नाही. आणि ३०० वर्षे झाली तरी एखादा प्रती बाजीराव देखील तयार करता आलेला नाही. पण या रणगाझी बाजीचा दिग्विजय समस्त भारत वर्षातील लोकांना आज तुझ्या मुळे बघायला मिळाला आहे. मराठी माणसाचा भव्य दिव्य पराक्रम आणि मराठी माणसाचे तितकेच उत्कट प्रेम सगळ्या भारतीयांना तुझ्यामुळे पाहायला मिळाले आहे. मुंबईच्या रस्त्यावर गुजराण करणाऱ्या उत्तर भारतीयांना धमकावून आणि मारून स्वत:ची पोटे भरणाऱ्या आचरट बंधूनी मराठी माणसाची जी अब्रू वेशीला टांगली आहे ती या सिनेमा मुळे थोडी तरी परत मिळाली आहे हे नक्की!! हे खरे तर मोठेच काम आहे. आणि त्याबद्दल मी तुझा आभारी आहे.

तेव्हा संजय लीला भंसाळीचे पुन्हा एकदा अभिनंदन!!

लेखक - निखील कुलकर्णी

Thursday, November 26, 2015

रे भाऊ, 'सहिष्णू' म्हणजे रे काय?

(दोन भाऊ वय ७ आणि ५ एकमेकांशी संवाद करत आहेत. अगदी "वाऱ्यावरची वरात" मधल्या गहन संवादासारखा!!) 

बाबू : रे भाऊ, 'सहिष्णू' म्हणजे रे काय? 
भाऊ : रे 'ससSSशीष्णू' म्हणजे एक प्रकारचे मादक असे पेय आहे. 

बाबू : म्हणजे दुध का रे भाऊ? 
भाऊ : रे नव्हे रे!! जे पिले असता मनुष्य सतत बड बड बड बड करतो त्याला 'ससSSशीष्णू' असे म्हंटात. 

बाबू : म्हणजे आपले गुर्जी का रे भाऊ? 
भाऊ : रे नव्हे रे. कसे सांगावे तुला बरे आता!! रे 'ससSSशीष्णू' म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन जाणे. 

बाबू : म्हणजे आपले नेते का रे भाऊ? 
भाऊ : रे नव्हे रे. तू म्हणजे अगदीच हे आहेस बोवा. कसे बरे सांगावे तुला? एखाद्याने काहीही केले असता, त्याला काहीही, काहीही, न बोलणे त्याला 'ससSSशीष्णू' असे म्हंटात. 

बाबू : म्हणजे आपले पोलिस का रे भाऊ? 
भाऊ : नव्हे रे. कसे सांगावे तुला बरे आता ? जे केले असता उगाचच 'पूर पूर पुरस्कार' मिळतो त्याला 'ससSSशीष्णू' असे म्हंटात. 

बाबू : म्हणजे आपले लेखक का रे भाऊ? 
भाऊ : बरोबर. तू खूपच हुशार आहेस बोवा!! 

बाबू : मला देखील "सहिष्णू" व्ह्यायला खुप आवडते. मी मोठा झाल्यावर 'कदम बरी' लिहिणार आहे. 
भाऊ : अरे वा. हे म्हणजे फारच छान झाले. चल आता सूत काढायला जावूयात. (पडदा) 

पुढे काही वर्षांनी श्री. बाबू यांनी एक कादंबरी लिहिली तिचे नाव होते "सर्वधर्मसमभाव आणि माझा बाप अख्खा गाव". त्यांना लगोलग "सहिष्णू विचारजंत" पुरस्कार मिळाला. मग पुढे त्यांनी Country सोडून विदेशी चा ध्यास घेतला. 

या नाट्य प्रवेशाचे लेखक : ज्ञानपीठ, अकादमी वगैरे पुरस्कार मिळण्याची आणि त्यातले २-३ परत देण्याची इच्छा असलेले (थोर) नाटककार/लेखक/दिग्दर्शक/विचारवंत झालेच तर तत्त्वज्ञ - निखिल कुलकर्णी 

विशेष विनंती : "हिंदू समाज मनाची कवाडे, कोनाडे, आडणे आणि खुंट्या" आणि "रामदास - एक तत्त्वचिंतन" (इथे रामदास म्हणजे आठवले हे वेगळे सांगायला नको) हे आमचे दोन नविन ग्रंथ लवकरच बाजारात येत आहेत. तेव्हा अवश्य (विकत घेऊन) वाचावेत हि विनंती!!

Friday, July 3, 2015

श्रीमंत योगी - राजा शिवछत्रपती

श्रीमंत योगी - राजा शिवछत्रपती

निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू  ।।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।।

श्रीमंत आणि योगी हे तसे पाहिले तर बऱ्याच अंशी विरुध्द अर्थी शब्द!! जो श्रीमंत आहे, सर्व ऐहिक सुखांचा मालक आहे, ज्याच्या पायाशी सर्वश्री विराजमान आहे आणि तरी देखील जो एखाद्या योग्या प्रमाणे दैदिप्यमान अशा ध्येयासाठी बद्ध आहे, ज्याचा निर्धार अखंड आहे, ज्याच्या  निश्चय मेरुपर्वता इतका विराट आहे आणि म्हणून असेल कि काय  त्याच्या या भव्य अस्तित्वाचा अनेकांना आधार वाटतो आहे, अशा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज मी बोलणार आहे. 

प्रभू रामचंद्राञ्च्या या पावन भूमीत आजवर अनेक राजे, राजवाडे होऊन गेले आहेत. वास्तविक मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा इतिहास देखील खूप प्राचीन आहे. रामदेव राय यादवापासून अनेक शक कर्त्या सम्राटांनी या भूमीवर राज्य केले आहे. त्याच्यात शक आहेत. चालुक्य आहेत. हूण आहेत. चौल आहेत. ज्यांच्या साम्राज्यावार कधीही सूर्य मावळत नव्हता त्यांची साम्राज्येही लयाला गेली आहेत. पण गेली कित्येक शतके मराठी मनावर अविरत गारुड करणाऱ्या आपल्या शिवबाचे  साम्राज्य अबाधित आहे. मराठी मनाची नाळ जितकी शिवबाच्या हिंदवी स्वराज्याशी जोडली गेली आहे तितकी क्वचितच इतर कुठल्या  सत्तेशी जोडली गेली असेल. 

शिवबाच्या या अलौकिक कारकीर्दीवर आज वर अनेक मान्यवर लेखकांनी, इतिहासकारांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अनेक शाहिरांनी आपल्या अलौकिक काव्य प्रतिभेतून या प्रगल्भ राजाची महती असंख्य पोवाड्यातून गायली आहे. थोरले बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस या सारख्या शूर, वीर आणि लढवय्या सेनानीना शिवबाच्या चरित्रातूनच लढण्याची आणि लढत-लढत शत्रूला नेस्तनाबूत करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शिवबाचे चरित्र म्हणजे चालता बोलता महामंत्र आहे. चमत्कार वाटावा अशा असंख्य घटनांनी ते ओतप्रोत भरलेले आहे. आपल्या जिवलग सोबत्यांना साथीला घेऊन केलेली तोरण्यावरची चढाई असो किंवा अत्यंत मुत्सद्दी पणाने केलेली शहाजी महाराजांची सुटका असो. प्रचंड हिमतीने आणि चातुर्याने केलेला अफझलखानाचा वध असो किंवा सिद्धी जौहरच्या तावडीतून केलेली सुटका असो. शाइस्तेखानावरचा धाडसी छापा असो किंवा मिर्झा राजा जयसिंगा बरोबर केलेली तहाची यशस्वी बोलणी असोत. सुरतेची लुट असो किंवा कडेकोट बंदोबस्त असून देखील अत्यंत सावधपणाने आणि धोरणीपणाने करून घेतलेली आग्र्याची सुटका असो, यातल्या प्रत्येक प्रसंगात या महान राजाच्या एकेका महान गुणाचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही. अखंड सावध राहून अत्यंत प्रतिकूल परीस्थिती मध्ये देखील निश्चल राहण्याचा हा अदम्य पराक्रम आपला शिवबाच करू शकतो.

पण मंडळी, जसे आपल्या शिवबाने  अदम्य अशा पराक्रमाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले तसे नेपोलिअन बोनापार्ट, तैमूरलंग,चेंगीझखान आणि अलेक्झांडर यांनी देखील त्यांच्या त्यांच्या प्रदेशात राज्य स्थापन केले होते. त्यांनी देखील त्यांच्या शत्रूशी मोठ मोठ्या लढाया केल्या होत्या. नवीन प्रदेश पादाक्रांत केले होते. जगाने देखील त्यांची 'महान योद्धे' म्हणून नोंद घेतली आहे. पण असे असून देखील यातल्या एकाही राजाचे राज्य आज अस्तित्वात नाही. ज्या लोकांसाठी त्यांनी हि राज्ये स्थापन केली त्या लोकांना देखील त्यांचे आज काहीही सोयर-सूतक नाही. आज जगाच्या कुठल्याही भूभागावर नेपोलिअन बोनापार्टाची, तैमुरलंगाची, चेंगीझखानाची किंवा अलेक्झांडरची जयंती साजरी केली जात नाही. यातल्या कुठल्याही राजाच्या आठवणीने आज कुणाचाही उर भरून येत नाही. यातल्या कुठल्याही राजाच्या समाधीवर कुणीही संभाजीराव भिडे दररोज चालत जाउन फुलांचा अभिषेक करत नाही. यातल्या कुठल्याही राजाच्या राजवाड्याची पायरी चढत असताना पायातली वहाण काढून ठेवावीशी वाटत देखील नाही. 

मग प्रश्न असा पडतो कि माझ्या शिवबाने असे काय केले कि ज्याच्या नुसत्या नावावर आज अनेक शतकांनंतर देखील तरुण रक्त पेटून उठते, ज्याच्या साध्या स्मरणाने देखील बाहू स्फुरू लागतात, आणि ज्याच्या समाधीवर डोके टेकले असता डोळे आपसूक भरून येतात!! 
      
शिवरायांच्या आयुष्यातले हे नाट्यमय प्रसंग जितके महत्वाचे आहेत तितकेच किंवा त्याहून काकणभर अधिक महत्वाचा त्यांनी दिलेला विचार आहे. त्यांनी दिलेले ध्येय आहे. त्यांनी घालून दिलेले व्यवस्थापनाचे कौशल्य आहे. त्यांची प्रत्येक कृती हि हिंदवी स्वराज्याच्या ध्येयांनी भारलेली होती. त्याच्यात कसलाही वैयक्तिक स्वार्थ नव्हता. कसलीही वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती. जो होता तो केवळ उद्दात्त राष्ट्रवाद होता! आपल्या प्रजेला न्याय मिळावा याची आत्यंतिक तळमळ होती. स्वधर्माचे रक्षण व्हावे याची कळकळ होती. हिंदवी स्वराज्याच्या या ध्येयातच आपल्या जगण्याचा अर्थ शोधणारी, जीवा-भावाची माणसे त्यांनी जोडली. राजाच्या एका हाके सरशी घरा-दारावर पाणी सोडणारे कान्होजी जेधे जसे होते तसे शेंडीला गाठ मारून दोन हातात दोन  तलवारी  घेऊन तोफेचे  आवाज येईतोवर साक्षात मृत्यूला देखील थोपवून धरणारे बाजीप्रभू देशपांडे होते.  शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझल खानाचा  कोथळा बाहेर काढला  तेव्हा 'दगा दगा' म्हणत सय्यद बंड्याने काढलेला दांडपट्ट्याचा वार जीवा महाल्याने आपल्या तलवारीवर झेलला होता. शाहिस्तेखानच्या लाखाच्या सैन्याला न जुमानता अखंड ४ महिने चाकणचा किल्ला झुंजवणारे फिरंगोजी  नरसाळा होते. दोन हातात दोन तलवारी घेऊन दिलेरखानाच्या हत्तीला पुरंदरावर रोखून स्वामीनिष्ठेची शर्थ करणारे मुरारबाजी देशपांडे होते. केवळ राजाचा शब्द राखायचा म्हणून बहलोल खानाच्या हजारोच्या सैन्यावर केवळ ७ निधड्या छातीच्या मराठी वाघाना घेऊन तुटुन पडणारे सरसेनापती प्रतापराव गुजर होते. मुलाचे लग्न बाजूला सारून रातोरात गडावर छापा मारणारे आणि जीवाची बाजी लावून गड स्वराज्यात आणणारे सुभेदार तानाजी मालुसरे होते. पश्चिमेच्या समुद्रावर स्वराज्याचा धाक बसवणारे दौलतखान आणि दर्यासारंग होते. कुठून आली हि हिऱ्याच्या मोलाची माणसे? या मावळी सिंहानी का स्वीकारली असेल शिवरायाची चाकरी? मंडळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी कि यातल्या एकाही निधड्या छातीच्या वाघाला महाराजांनी कधी त्याची जात विचारली नाही. त्याचा धर्म विचारला नाही. उलट त्यांनी त्यांना हिंदवी स्वराज्याचा मंत्र दिला. भगव्या जरी-पटक्याची ग्वाही दिली. 

ध्येय दिले. अभय दिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्रींच्या इच्छेचे श्रेयही दिले. 

मग या भाबड्या वाघांनी त्यांच्या आयुष्यांच्या ज्योती हसत हसत स्वराज्याच्या दीप माळेत लावल्या आणि महाराष्ट्राचे आसमंत उजळून निघाले. याच्यात मराठे होते. ब्राम्हण होते. कुणबी होते. शिंपी, सुतार, लोहार होते. धनगर होते. मुसलमान होते. फ्रेंच होते. इंग्रज देखील होते. शिवरायाच्या या मोहिमेत सगळे होते. हा कुठल्या एका जातीचा किंवा कुठल्या एका धर्माचा खटाटोप नव्हता. हेतू उदात्त होता आणि यत्न प्रामाणिक होते. 

अवघ्या ५५ वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी एक अलौकिक संप्रदाय निर्माण केला. तळ हातावर शीर घेऊन शत्रूवर तुटुन पडणाऱ्या निधड्या छातीच्या वाघांचा!! याच्यात मग औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणारे संताजी आणि धनाजी होते. राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली जिंजीचा किल्ला वर्षानुवर्षे लढवणारे मुरारराव घोरपडे होते. वयाच्या सतराव्या वर्षी स्वराज्याच्या पेशवेपदाची सूत्रे स्वीकारून मराठी सत्ता दिल्ली पर्यंत नेणारे बाजीराव पेशवे होते. या तरुण पेशव्याची तडफ तर इतकी सरस होती कि जसे साक्षात शिवरायच परत अवतरले असावेत. तीच तडफ़. तोच जोश आणि तोच महामंत्र!! राणोजी शिंदे आणि मल्हारबा होळकरांनी जीव ओवाळून टाकला या ब्राम्हणावर आणि शिवरायाचा जरी-पटका अटकेपार फडकवला. गंगा-यमुना मुक्त झाली. काशी-प्रयाग मुक्त झाले. आसेतु हिमाचल हिंदू भूमी मोकळा श्वास घेऊ लागली. गोठ्यातली गाय आणि माज-घरातील माय निश्चिंत झाली. गो-ब्राम्हण प्रतिपालनाचे शिवरायाचे स्वप्न साकार झाले. 

मंडळी एखादा माणूस जेव्हा स्वत:साठी जगतो तेव्हा तो एकच आयुष्य जगू शकतो. पण शिवरायांसारखा असामान्य नेता जेव्हा एका राष्ट्रीय विचाराने आणि उदात्त ध्येयाने जगून जातो तेव्हा तो अनेक जणांना अनेक पिढ्या पुरेल इतकी उर्जा निर्माण करतो. हि उर्जा, हि शक्ती मग अनेक साम्राज्यांना पुरून उरते आणि हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवते. शिवरायांचे खरे सामर्थ्य याच्यातच आहे असे मला वाटते. 

समर्थांचे शब्द आठवतात 
 
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।। 
शिवरायांचा आठवावा साक्षेप । भूमंडळी !!
      
धन्यवाद!!

Thursday, April 9, 2015

एकंकार

त्या दिवशी तो आणि त्याची प्रेयसी लवकर उठून कुठेतरी जायला निघाले. लोन्ग वीकेंड होता. त्याने आणि तिने जोडून ४ दिवस सुट्टी काढली होती. त्यामुळे धमाल करायची या हिशेबाने गेले २-३ दिवस तयारी सुरु  होती. बोट घेऊन समुद्रात मनसोक्त भटकायचा मनसुबा होता. त्याने त्याची बोट त्याच्या गाडीला जोडली. दोघांनी २ सायकली घेतल्या. समुद्रावर निवांत बसायला म्हणून दोन खुर्च्या आणि एक उभट छत्री घेतली. त्याच्या मित्राने त्याला एक समुद्रातले ठिकाण सांगितले होते. ते एक निर्मनुष्य बेट असून त्याची माहिती खूप कमी लोकांना होती. दोघांच्याही मनात अनामिक चाल-बिचल चालू होती. निर्मनुष्य बेटावर आयुष्यातली सर्व सुखे सोबत घेऊन निवांत पडून राहण्याने देखील स्वर्गात असल्याचा आनंद मिळणार होता. सचैल, स्वैर आणि उन्मत्त होता येणार होते. बंधन कसलेच नव्हते. सुमारे दोन अडीच तास गाडी चालवून ते दोघे समुद्राच्या किनाऱ्यावर पोचले. जेट्टी पाशी बोट सोडली आणि पुढचा पाण्यातला प्रवास सुरु झाला.

अतिशय रमणीय परिसर होता. किनाऱ्यावर भणाण वारा सुटला होता. दोघांची वृत्ती फुलु लागली होती. वाऱ्यावर उडणारे तिचे सोनेरी केस पाहून त्याचा धीर सुटत चालला होता. एका बाजूने बऱ्याच आत पर्यंत डोंगर समुद्रात घुसत गेला होता. त्याचे सुटणारे कडे विलोभनीय वाटत होते. बोट वेगात चालली होती. त्या डोंगराच्या एका बाजूने पुढे गेल्यावर मुख्य समुद्र लागणार होता. निळे मोकळे आकाश, त्याचे पाण्यात पडलेले तितकेच निळे नितळ रुपडे पहात दोघेही एकमेकांना घट्ट बिलगून बसली होती. पाणी इतके नितळ होते कि त्यातल्या वनस्पतींची अलगद हालचाल मोठी मोहक वाटत होती. त्यात चाललेली माशांची चल-बिचल अगदी स्पष्ट दिसत होती. त्यातले काही मासे तर मधेच पाण्याच्या वर उडी मारत होते. सूर्याचे उभे किरण आडव्या-तिडव्या लाटांवर आणि उडणाऱ्या माशांवर मनसोक्त पडत होते आणि मग भली मोठी रांगोळी चमकून उठत होती. त्यांना बघता बघता किनारा कधी दिसायचा बंद झाला ते कळलेही नाही. आता सर्व बाजूनी फक्त जड निळे पाणी दिसू लागले होते. पाण्याच्या दबाव इतका होता, कि एकेका लाटेबरोबर, बोट अगदी लीलया वर खाली होत होती. अचानक कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला वळत होती. पण त्याचे त्या दोघानाही काहीही नव्हते. इथे कुणाला धडकायची किंवा कुणाच्या अंगावर जाण्याची कसलीच भीती नव्हती. अथांग समुद्रावर मुक्त विहार करता येणार होता. आकाश कुठे संपते आणि पाणी कुठे चालू होते हे देखील कळेनासे झाले होते. अखंड निळ्या गोलकात कुठल्याही दिशेला कसेही जाण्याचा अनुभव जगावेगळा होता. ते दोघे सोडले तर फक्त आकाशातला सूर्य जुन्या ओळखीचा होता. समुद्राचा वारा शहारे आणत होता आणि सुर्य उबेची पांघर देत होता. बाकी सर्व नवीन होते. अजून बराच प्रवास बाकी होता. त्याने बोटीचा वेग आणि दिशा पक्की केली आणि दोघेही बोटीत निवांत पडून राहिले. आता संध्याकाळ होत आली. सूर्याने एका बाजूला आकाश रंगवायला घेतले. त्याचे रंग तुरळक आणि विरळ ढगांनी आपल्याला लावून घेतले आणि त्यांची लालसर केशरी रंगांची झुंबरे झाली. त्यांच्या नक्ष्या बघत दोघेही आकाश पहात राहिले. हळु हळु सूर्य दिसेनासा झाला. एका बाजूने चांदण्या दिसायला लागल्या. आत्ता पर्यंत निळे दिसणारे पाणी आता काळेभोर दिसू लागले. बोटीचे दिवे सोडले तर इतर कुठलाच प्रकाश नव्हता. त्यामुळे नित्य नवा रस्ता काढत पुढे चालल्या सारखे वाटत होते. त्याला आपण अंधारही पहिल्यांदाच पहात आहोत असा त्याला भास होत होता. उघड्या डोळ्यांनी अंधार पाहून त्याला त्याचीही गम्मत वाटली. बोटीमध्ये कसला तरी आवाज आला म्हणून त्याने उठून पाहिले. त्याचे ठिकाण आता जवळ आले होते. जीपीएस मध्ये त्याचा अलार्म वाजत होता. दोघेही गडबडीने उठले. सवईने अंगावरचे कपडे  ठीक करताना दोघानाही आपलेच हसू आले. एका बाजूला छोटासा डोंगर पुसट दिसू लागला. हेच आपले ठिकाण असल्याची दोघांचीही खात्री झाली. तिने सामानाची बांधा बांध केली आणि त्याने बोट किनाऱ्याला लावायला घेतली. मित्राने सांगितल्या सारखे त्याने त्या डोंगराच्या एका बाजूला बोट वळवली. त्या बाजूला झाडांच्या मुळ्या पाण्यात उतरल्या होत्या. त्याच्यात त्याने बोट घुसवून ठेवली. आणि एकेक करत दोघेही त्या बेटावर उतरली. काही मुळ्या खूप बारीक असून त्यांची जाळी तयार झाली होती. अहोरात्र समुद्राचा वारा पिउन त्यावर हिरवट काळपट शेवळ्याचा थर चढला होता. कसला तरी उग्रट वनस्पतीचा वास सगळीकडे भरून राहिला होता. समुद्राच्या लाटांचा आवाज सोडला तर इतर कसलीही जाग नव्हती. अंधारात अंदाज घेत आधी ती त्या बेटावर उतरली. मुळ्यां च्या जाळी मध्ये बोट बांधून तो ही अलगद पणे त्या बेटावर उतरला. प्रत्येक अनुभव नविन  होता. यातले काहीही त्यांनी या आधी कधीही अनुभवले नव्हते. निर्मनुष्य, निर्जन जागेचा वास त्याला पहिल्यांदाच जाणवत होता. निराकार शांततेत त्याचे कान नेहमीच्या आवाजांचा शोध घेत होते आणि ते ओळखीचे आवाज न मिळाल्याने चुकल्यासारखे वाटून पुन्हा शोध घ्यायला लागत होते. शांततेलाही एक विषण्ण असा आवाज असतो हे देखील त्याला पहिल्यांदाच जाणवत होते. बत्तीच्या प्रकाशात देखील आपण नेमके काय धरत आहोत हे दिसत नव्हते. त्याचा परिणाम म्हणून दोघेही अगदी मुके असल्यासारखे शुन्य होऊन एकेक पाय मोजून ठेवत होते. इतक्यात तिने धरलेली एक मुळी अचानक वळवळली. तिने जीवाच्या आकांताने दुसऱ्या हातातील कुऱ्हाड झपाट्याने त्या वेली वर मारली. आणि क्षणात एक फुत्कार झाला आणि तिच्या अंगावर कसल्यातरी द्रवाचा सडा पडला. त्याने बत्तीच्या प्रकाशात पाहिले एका मोठ्या सापाचे तुकडे एका मुळी वर लोंबत होते. दोघांनी एकमेकांना टाळी दिली आणि त्यांची पाऊले अधिक विश्वासाने पडायला लागली. थोडे अंतर चढून गेल्यावर खडकाळ भाग लागला. समुद्र आता खूप खाली दिसत होता.लाटांचा आवाज देखील बराच क्षीण झाला होता. तिथे मग दोघांनी जमिनीला पाठ टेकली. चंद्र स्वच्छ धुवून, घासून पुसून ठेवल्यासारखा शुभ्र दिसत होता. आकाशातले तारे देखील नवीन  कोरे दिसत होते. काळ्या मखमली वर हिऱ्याची नक्षी  काढल्या सारखे दिसणारे ताऱ्यांचे पुंजके पाहून त्या दोघांचेही भान हरपून गेले. तारे आणि डोळे यातील अंतर संपून ते तारे अगदी जवळ असल्या सारखा भास होऊ लागला. डोळे मग त्या ताऱ्या मध्ये ओळखीचे आकार शोधू लागले. कुठे मेंढीचा तर कुठे माशाचा आकार स्पष्ट दिसू लागला. मधेच एखादा तारा सुटून दिसेनासा होत होता. त्याच्या जाण्याने नक्षी परत बदलत होती. त्याचाच त्याला एक चाळा होऊन बसला. अचानक पायावर काहीतरी मुंगी सारखे चालते आहे असे वाटून त्याने पाय झटकून पाहिले. थोड्यावेळाने परत काहीतरी अंगावर चालत आहे असे वाटले म्हणून त्याने अंदाजाने पायावर हात मारला. त्याच्या हाता खाली चिरडून काहीतरी मेले आणि त्याचा गोड गुळ्मट वास आला. त्याने हात पुसून घेतले आणि पिशवीतून कसली तरी बाटली काढून ते बसले होते त्या जागेभोवती गोल रिंगण तयार केले. आणि तिला म्हणाला "कसल्या तरी मुंग्या आहेत असे दिसते. या स्प्रेच्या पुढे यायच्या नाहीत." तिने हसून मान हलवली. एका बाजूने आकाश परत रंगू लागले होते. तांबूस गुलाबी रंगाच्या छटा विखरून दिसायला लागल्या. अशा अज्ञात जागी परत एकदा ओळखीचा सूर्य पाहून दोघेही हरखून गेले. अजून हवा ओलीच  होती. त्यात धुक्याचा कुंद पणा ही जाणवू लागला. मग त्यांनी पिशवीतून तंबूचे सामान काढून छोटासा निवारा तयार केला. आणि अंगावर पांघरूण घेऊन दोघेही पडून राहिले. पूर्व क्षितिजावर सूर्य दिसायला लागला तसे त्यांचे कुतूहल चाळवले. दोघेही तंबूतून बाहेर येउन त्यांनी खाली एक नजर टाकली. खूप खाली समुद्र दिसत होता. त्याच्या लाटा बेटावर धडकत होत्या. त्या लाटांवर त्यांची बोट एखाद्या ठिपक्या सारखी हिंदकाळत होती. हा एवढा मोठा कडा आपण रात्री कसा चढून आलो याचे त्यांना आश्चर्य वाटले. थोड्याच अंतरावर काळपट पिवळसर सापाचे तुटलेले दोन तुकडे त्यांना दिसले. दोघांनी हसून एकमेकांना आलिंगन दिले. एकूण एक अनुभव नविन होता. प्रत्येक क्षणाला काहीतरी नविन दिसत होते. ऐकू येत होते. त्यांनी त्या टेकडीवर फेरफटका मारायला सुरुवात केली. सर्व बाजूनी अजस्त्र समुद्र होता. त्याच्या वरच्या अविरत हलणाऱ्या लाटा पाहून क्वचित तो श्वास घेत आहे कि काय असा भास होत होता. त्या समुद्राच्या तुलनेत ते बेट इतके छोटे दिसत होते कि एखादी मोठी लाट सुद्धा त्याला गिळून टाकेल का काय असे वाटत होते. चालत चालत दोघे बेटाच्या दुसऱ्या टोकाला आले. तिथून खाली पाहिले असता त्यांना वाळूचा किनारा दिसला. पांढरी शुभ्र वाळू सर्वत्र पसरली होती. सदोदित आदळणाऱ्या लाटांनी तिची किनार सारखी बदलत होती. टेकडीच्या वरून खाली कापूस पसरून ठेवल्या सारखा दिसत होता. मध्येच शिंपल्याच्या कवचांची नक्षी दिसत होती. मित्राने सांगितलेली ओळख पटली आणि दोघेही परत तंबू कडे धावत सुटली. तंबू आणि इतर सामान गुंडाळून घेऊन गुंडाळून धावतच परत आली. आणि अतिशय अधीर पणे टेकडी उतरू लागली. त्या बाजूला टेकडीची चढण देखील पहिल्या बाजू पेक्षा खूप कमी होती. बघता बघता दोघेही त्या वाळूच्या किनाऱ्यावर पोचली. वाळूचा मऊ थंडगार स्पर्श अंगावर रोमांच आणत होता. प्रत्येक पावलागणिक किनाऱ्या वर त्यांच्या पायांच्या ठश्यांची नक्षी तयार होत होती. त्यांनी मागे वळून पाहिले आणि त्यांचे त्यांनाच हसू आले. एका मागोमाग चालत आलेले २ पायांचे २ जोड मोठे गमतीदार दिसत होते. परत एकदा समुद्राचा आवाज जाणवू लागला. हातातले सामान टाकून दोघेही धावतच समुद्रात गेले. मनसोक्त, सचैल डुंबले. कसलाही आवाज नव्हता. कसलीही चाहूल नव्हती. कसलेही बंधन नव्हते. दोघे मनसोक्त पाण्यात खेळले आणि मग किनाऱ्यावर येउन पडले. मौ ओल्या वाळूवर पडून सूर्य त्यांनी आधीही पाहिला होता पण आज त्या निर्मनुष्य बेटावर तो सूर्य हि नवीन दिसत होता. त्या वाळूत गाडून घेतले असता बरेच रोग नाहीसे होतात असे त्याचा मित्र त्याला म्हणाला होता. त्याची त्याला आठवण झाली म्हणून त्या दोघांनी खड्डा करायला घेतला. आता समुद्राचा आवाज जाणवेल इतका वाढला होता. लाटा मोठ्ठ्या दिसत होत्या आणि बऱ्याच वेगाने किनाऱ्या वर आदळत होत्या. दोघांना त्याचे आता काही वाटेनासे झाले. चांगला पुरुषभर उंचीचा खड्डा तयार झाला. शेजारी वाळूचा डोंगर तयार झाला. त्यातून गडबडीने खेकडे बाहेर पडत होते. सुरवातीला अचानक खेकडे पाहून दोघेही दचकले. पण नंतर त्यांनी सपासप फावडे चालवून त्या खेकड्यना मारून टाकले. शेजारी मेलेल्या खेकड्यांचा खच पडला होता. आता तो त्या खड्ड्यात उतरला. त्याचे फक्त डोके  जमिनीच्या वर दिसत होते. गम्मत म्हणून त्याने एक दोन वेळा खड्ड्यातून आत बाहेर करून पाहिले. सर्व व्यवस्थित आहे याची खात्री झाली आणि मग तो परत खड्ड्यात उतरला. तिने मग शेजारच्या ढिगातली वाळू त्याच्या भोवती खड्ड्यात टाकायला सुरुवात केली. बघता बघता त्याच्या आजूबाजूची जागा पूर्ण भरून गेली. आता त्याचे संपूर्ण धड वाळूत होते आणि डोके वाळूच्या बाहेर!! त्याची त्याला मोठी गम्मत वाटत होती. हात पाय असून ते हलवता न येण्याचा अनुभव तो पहिल्यानेच घेत होता. शिवाय जमिनीच्या इतक्या जवळून वाळू आणि समुद्र पाहून तो हरकून गेला होता. वाळूचा एकेक कण खूप मोठा दिसत होता आणि समुद्राच्या लाटा विचित्र दिसत होत्या. तिला देखील तो वेगळाच दिसत होता. तंबूचे सामान लावावे म्हणून ती वळली आणि अचानक एक खूप मोठी लाट भिंती सारखी किनाऱ्यावर येउन आदळली. काही कळायच्या आत सर्व बेट पाण्याने भरून गेले. आणि पुढच्याच लाटेबरोबर त्या बेटावरचे बरेचसे समुद्रात वाहून गेले. याच्यात ती सुद्धा वाहून गेली. थोड्या वेळाने समुद्र शांत झाला. काही वेळातच बेट पुन्हा पहिल्या सारखे दिसू लागले. वाळूचा किनाराही महापुरात धोपटून निघालेल्या नदीच्या काठा सारखा दिसू लागला. त्याचे डोकेही स्पष्ट दिसू लागले. नाका तोंडात पाणी जाउन तो बेशुद्ध झाला होता. त्याच्या भोवती सागरी वनस्पतींचे गचपण झाले होते. मेलेल्या माशांचा खच पडला होता. बऱ्याच वेळाने सूर्याची तिरीप पडून आणि माशांचा वास असह्य होऊन त्याला शुद्ध आली. 

पाहतो तो त्याच्या आजूबाजूला सर्वत्र सागरी वनस्पतींचा वेढा पडला होता. अगदी डोळ्याच्या समोर मेलेले मासे देवमाशासारखे मोठे दिसत होते. त्याने घाबरून धावण्यासाठी पाय हलवून पाहिले. पण त्याच्या खड्ड्यातली वाळू पाण्याने अजून पक्की झाली होती. आता त्याचे पाय तसूभरही हलले नाहीत. त्याचे त्यालाच वैषम्य वाटले. अतिशय रागाने बेभान होऊन त्याने हात हलवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे हातही हलेनात. त्याने त्याच्या प्रेयसीला जोरजोराने हाका मारायला सुरुवात केली. पण त्याला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. समुद्राच्या लाटा तितक्याच निर्विघ्नपणे आवाज करत किनाऱ्यावर आदळत राहिल्या. अतिशय संतापाने तो खूप जोराने ओरडू लागला. ओरडून ओरडून त्याच्या शिरा फुटतात कि काय असे वाटू लागले. आपली सर्व हालचाल संपली आहे याचा अनुभव त्याला पहील्यांदाच येत होता. 

त्या जाणिवेने त्याला रडू यायला लागले. पण त्याच्या समोरची एकही वनस्पती टिचभर देखील हलली नाही. बराच वेळ झाल्यानंतर तो शांत झाला. आपले हात-पाय कसे अडकून बसले, आपली प्रेयसी कुठे गेली, हि एवढी मोठी लाट का आली, या वनस्पती माझ्या भोवती कशा आल्या यासारखे असंख्य प्रश्न त्याला पडू लागले. देवाचा धावा करू लागला. स्वत:शीच मोठ मोठ्याने बोलायला लागला. बोलता बोलता अति श्रमाने कधीतरी त्याला झोप लागली. 

चेहऱ्यावर काहीतरी मुंगी सारखे चालते आहे असे वाटून त्याने झोपेतच हात हलवण्याच्या प्रयत्न करून पाहिला आणि त्याला परत जाग आली. त्याच्याभोवती लालसर काळपट मुंग्या एका ओळीत चालल्या असून क्वचित एखादी मुंगी रांग मोडून बाजूला जात होती. त्याला पाहून पुन्हा रांगेत सामील होत होती. त्या मुंग्याना काल रात्रीच्या मुंगी सारखाच गोड गुळमट वास येत होता. मुंगी पाहताच त्याचे हात शिवशिवत होते. हात हालत नाहीत याची जाणीव झाल्यावर पळून  जाण्यासाठी त्याचे पाय धडपडू लागले. परंतु यातले काहीही हलणार नव्हते. संतापाने त्याच्या कानाच्या पाळ्या लालबुंद झाल्या. जीवाच्या आकांताने तो ओरडला. त्याचे डोळे लालभडक झाले. डोळ्यांच्या पापण्या, ओठ आणि जीभ सोडली तर सर्व काही जखडून गेले होते. या तिन्ही पैकी कशाचाही त्याला कसलाही उपयोग होणार नव्हता. त्याने आकाशाकडे पाहिले तर सूर्य उगवत होता. परत एकदा आकाश तसेच केशरी गुलाबी रंगानी सजून आले होते. पक्षी त्यावर कसल्या कसल्या नक्षा काढत उडत होते. पण आता त्याला तेही परके वाटू लागले. जीवाच्या आकांताने तो त्या खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. आपण पक्षी असतो तर कदाचित बरे झाले असते असे त्याला वाटले. आपल्याला हात-पायांच्या ऐवजी पंख असते तर असे आपणही या गचपणातून उंच उडालो असतो असे त्याला वाटले. त्याच विचारात असताना त्याने ओरडून पक्षाना बोलावण्याचा प्रयत्न केला. वाऱ्याच्या आणि समुद्राच्या घनगंभीर आवाजात त्याचा आवाज कुणालाही ऐकू आला नाही. पक्षी आले तसे उडत निघून गेले. पक्षी गेले त्या दिशेकडे तो बराच वेळ पहात होता. आपल्याच दातांनी  करकचून चावून त्याचे ओठ रक्तबंबाळ झाले होते. त्यातून सांडणारे रक्त ओघळाने वाळूत जात होते. त्याला मुंग्या लागल्या होत्या. 

पोटात अन्नाचा कण नाही. पाण्याचा थेंब नाही असे २ दिवस गेले. प्रत्येक क्षण खूप मोठा वाटत होता. सूर्य नियमाने उगवत होता. डोक्यावर येत होता आणि मावळत होता. परंतु आता त्याची शक्ती अतिशय क्षीण झाली होती. ज्याचा त्याला अजूनही विश्वास वाटत होता तो आवाज हि आता फुटायचा बंद झाला. हळू हळू दृष्टी क्षीण होऊ लागली. त्याला कुणीतरी हाक मारते आहे असा भास झाला म्हणून त्याने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. अर्धमेल्या डोळ्यांनी त्याने पाहिले तर एक मुंगी त्याच्या समोर येउन थांबली होती. मुंगीचे डोळे विक्राळ दिसत होते. तिच्या एका चाव्याने देखील आता आपण गतप्राण होऊ कि काय अशी त्याच्या मनाची घालमेल चालली होती. आता जे काय होईल होईल ते होईल अशी मनाची तयारी करून त्याने परत एकदा डोळे मिटले. इतक्यात त्याला आवाज ऐकू आला "जागा झालास का मित्रा?" त्याचा त्याच्या कानावर विश्वास बसेना. क्षणभर त्याचा मित्र त्याला न्यायला आला कि काय असेल असे वाटून तो हरखून गेला. त्याचे आभार मानायचे का त्याला शिव्याची लाखोली घालायची याची मनात घुसमट झाली. पण हा आवाज त्याच्या मित्रा सारखा वाटत नव्हता. म्हणून त्याने जीवाच्या कराराने डोळे उघडले. पाहतो तर त्याच्या भोवती असंख्य मुंग्या जमल्या होत्या. 

त्यातलीच एक मुंगी त्याला म्हणाली, "मित्रा कसा आहेस? वास्तविक बरेच दिवस तुझ्याशी बोलायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत." त्याच्या घशातून कसली तरी खरखर ऐकू आली. त्यावर ती मुंगी म्हणाली "तू इथे आलास तेव्हाच आम्हाला असे वाटले होते कि आपला कधीतरी संवाद होणार आहे.". तो म्हणाला "संवाद? मुंग्यांशी? मला वेड लागते आहे काय? मी हे काय बोलतोय? मुंग्या माणसाशी बोलतील काय?" त्यावर एक मुंगी म्हणाली "का नाही मित्रा? गेल्या २-३ दिवसात घरातून निघाल्या पासून तू असंख्य नवीन अनुभव घेतले आहेस. हाही एक नवीन अनुभव!!" असे म्हणून त्या मुंग्या हसू लागल्या. त्यावर तो म्हणाला " मी इथे डोक्यावर सूर्य घेऊन आणि डोळ्यासमोर अजस्त्र समुद्र घेऊन, हात-पाय  बद्ध झालेल्या अवस्थेत असताना तुम्हाला आज माझ्याशी  बोलावेसे का वाटते आहे? हात-पाय बांधलेला माणूस बघून तुमची भीती चेपलेली दिसते. आता मला अजून कसली भीती दाखवणार आहात?". तो काहीच बोलत नाही हे पाहून परत एक मुंगी म्हणाली "एक लक्षात घे. आम्ही छोट्या असलो तरी संख्येने असंख्य आहोत. वास्तविक हात आणि पाय बांधून घातलेल्या तुझ्यावर हल्ला करून तुझा जीव घेण्या इतके सामर्थ्य आमच्यात नक्कीच आहे. मनात आणले तर आम्ही तुझ्या डोक्याच्या आणि हे खेकडे तुझ्या शरीराच्या राई-राई एवढ्या चिंधड्या करू शकतो." हे एकून तो त्वेषाने म्हणाला "मग का मारत नाही? मारून टाका. म्हणजे सुटेन मी यातून!" त्यावर एक मुंगी म्हणाली "तुझी वेळ आली कि  तुझी सुटका होईलच. पण आमचे त्यासाठी प्रयोजन नाही. तुझी सुटका अथवा तुझा मृत्यू याच्याशी आम्हाला काहीही घेणे-देणे नाही." यावर तो अजून डिवचला गेला. 

त्यावर एक मुंगी म्हणाली, "तुझी आम्हाला कसली भीती रे! आम्हाला तू मारशील याची? छे! मरणाची किंवा कसलीच भीती आम्हाला नाही. जिथे मी तुझ्या पासून वेगळा आहे हा विचार सुरु होतो तेव्हा मला माझ्या अस्तित्वाची काळजी वाटू लागते. आणि त्यातून पुढे भीती जन्म घेते. आणि एकदा का मेंदूने भीतीची चव घेतली कि त्याला ती आवडते आणि तो भीतीचा व्यसनी होऊन जातो. तर ते एक असो. पण आता तुझे हात पाय बध्द झाले. त्याने तुझे विकार शांत झाले  असतील असे आम्हाला वाटले होते निश्चित. पण तुझा अवतार बघून असे वाटते कि अजून तुझे विचार आणि शंका शाबूतच आहेत मित्रा!!" हात-पाय बद्ध होण्याचा आणि राग शांत होण्याची संगती लागल्याने तो विचलित झाला. 

मुंगीच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ तो मनातल्या मनात लावू लागला. त्याच्या कपाळावर आणि डोळ्यांच्या बाजूला असंख्य आठ्या पडल्या. कपाळावरची शीर तट्ट फुगली. ते पाहून एक मुंगी म्हणाली "घाबरू नकोस. आम्ही तुला काहीही करणार नाही. तू अशा अवस्थेत आहेत कि ज्याच्यात तुला आम्ही काही करण्याची गरज देखील नाही. आम्हाला फक्त तुझ्याशी बोलायचे आहे. आज आम्ही तुला आमची गोष्ट सांगणार आहोत. ऐकशील का?" त्याने नुसतीच बारीकशी मान हलवली. ते पाहून एक मुंगी म्हणाली "अरे आम्ही पण या बेटावर बाहेरूनच आलो. कित्येक शतकांपूर्वी आमचे पूर्वज कुठल्या तरी ओण्डक्यावर बसून इथे आले. तेव्हा पासून आम्ही इथेच आहोत. कित्येक पिढ्या आम्ही याच बेटावर आहोत. आमच्या काही पूर्वजांनी माणसात असतो तसा देव देखील तयार करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. ती जी उंच टेकडी तू आधी पाहिलीस त्यावर एक खूप मोठे मुंगीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक प्रचंड अशी मुंगीची मूर्ती होती. त्या मुंगीला एक हजार डोकी होती. आठ हजार पाय होते. तिच्या एकेका हातात साखरेच्या गोण्या होत्या. कित्येक पिढ्यांनी त्या मूर्तीची देव म्हणून पूजा-अर्चा केली. आरत्या केल्या. महाप्रसाद घातले. आणि एक दिवशी अचानक परवा सारखीच एक मोठी लाट आली आणि त्यात त्या मूर्ती सहित ते देउळ देखील वाहून गेले." मुंगीची हि कथा ऐकून त्याही अवस्थेत त्याला वीट येवू लागला. त्यावर दुसरी एक मुंगी म्हणाली "अरे मुंग्यांचे काय घेऊन बसलास, ते खेकडे तू पाहिलेस ना? त्यांचे देखील याच टेकडीवर देउळ होते. त्यांनी देखील अशीच मूर्ती बसवली होती. त्यांचे देउळ देखील दुसऱ्या एका लाटेने वाहून गेले." आता त्याचा राग अनावर झाला. "मला तुमच्या आणि त्या खेकड्यांच्या देवाशी काहीही घेणे देणे नाही. तुम्ही मला हे काय सांगताय? मी इथे अशा अवस्थेत अडकुन पडलो आहे आणि तुम्ही मला कसल्या गोष्टी सांगताय?" त्यावर एक मुंगी म्हणाली "अरे मित्रा तुझी गल्लत इथेच होते आहे. तू अतिशय मोठ्या संकटात आहेस हे तर खरेच आहे. तुला असेही वाटत असेल कि आम्ही तुला या संकटातून बाहेर काढू. सर्वात आधी तू तुझ्यातली शक्ती वापरून पाहिलीस. त्याचा उपयोग होईनासा झाल्यावर तू आधी इतरांना आणि नंतर देवाला हाका घातल्यास. त्यातून  काही निष्पन्न झाले नाही तेव्हा तू तुझ्या नशिबाला दोष द्यायला घेतलेस. पंख हवे होते असे म्हणालास. या सर्वातून जेवढे निष्पन्न व्हायचे तेवढे झाल्यावर तू निवृत्त होण्याच्या मार्गावर लागलास. नेमक्या त्याच क्षणी आम्ही तुला हाक मारली तेव्हा तुला परत आशा उत्पन्न झाली असेल कदाचित कि आम्ही तुला वाचवू. त्या शिवाय का तू आम्हाला बोलू दिले असतेस?" एवढे बोलून मुंग्या परत हसू लागल्या. 

एका मुंगीला आपल्याला वाचवण्याची किंवा मारण्याची संधी मिळावी या पेक्षा अजून दुर्दैव ते काय या विचारात तो असताना एक मुंगी म्हणाली "हे पहा वाईट वाटून घेऊन नकोस. पण या अनवट जागी तू तुझ्या पायाने आला आहेस. हा डोंगर तू तुझ्या हाताने चढला आहेस. तुला ठाऊक आहे काय कि रात्री तू आणि तुझी प्रेयसी ज्याला धरून चढलात ते सगळे सापच होते. रात्रीच्या अंधारात तुला त्या झाडांच्या मुळ्या वाटल्या होत्या. वास्तविक तुझ्या प्रेयसीचा तोल जातोय असे वाटून एक साप तिला आधार देण्यासाठी जागचा हलला तर तुम्ही दोघांनी मिळून त्याचे तुकडे केलेत. इतकी कसली भीती तुला वाटते? वास्तविक हा खड्डा देखील तू तुझ्या मर्जीने काढला आहेस. तुला आठवते? हा खड्डा काढताना इथे तुझ्या आधी राहत असलेले शेकडो खेकडे, ज्यांनी या आधी कधीही सूर्य पाहिला नव्हता, ते देखील आपण होऊन बाहेर पडले होते. पण तू त्यांना देखील निर्दयीपणे मारून काढलेस. एवढा कशाचा राग येतो तुला? सगळे तर तूच आणि तुला वाटेल तसेच करत आला अहेस. तुझ्या या अवस्थे बद्द्ल तुला तुझ्या पेक्षा अजून कुणी जास्त दोषी दिसतो का? खड्ड्यात बंदिस्त झाल्यावर आकाशातल्या पक्षांचे पंख तुला हवे होते असे वाटते. पण आकाशात आपल्याच पंखांनी फिरणाऱ्या पक्षाला गोळी मारून त्याचे पंख निरुपयोगी करताना तुला काहीच कसे वाटत नाही?" 

इतक्यात एका लाटे बरोबर काहीतरी जड वहात येउन किनाऱ्यावर आदळले. त्याने निरखून पाहिले तर तो हाडांचा सांगाडा होता. हाताचा थोडासा भाग सोडला तर बाकी सारे शरीर माशांनी टोचून टोचून खाल्ले होते. हाडांना ठीक ठिकाणी मांसाचे आणि कपड्यांचे लाल पांढरे तुकडे अडकले होते. तो डोळे फाडून त्याच्या कडे पहात होता. तो त्याच्या प्रेयसीचा सांगाडा होता. त्याला अतोनात दु:ख झाले. सर्व शक्ती एकवटून त्याने पुन्हा एकदा हात-पाय झटकण्याचा प्रयत्न करून पाहीला आणि शक्तिपात होऊन पुन्हा बेशुद्ध झाला. रात्री बऱ्याच उशिरा विजांचा कडकडात होऊ लागला आणि अधून मधून पावसाच्या झडी पडू लागल्या. त्याचे पाणी चेहऱ्यावर हजारो सुया एकदम टोचाव्यात तसे टोचू लागले. त्याने तो जागा झाला. आता त्याच्यात कसलेच त्राण शिल्लक राहिले नव्हते. पावसाचे पाणी आडवे-तिडवे तोंडात घुसले आणि त्यानेही त्याला हुशार वाटू लागले. ढग बाजूला गेल्यावर लपलेला चंद्र दिसू लागला आणि त्याच्या प्रकाशात थोडे थोडे दिसू लागले. हाडांचा सांगाडा बाजूलाच पडला होता. त्याच्यावरच्या मासाच्या तुकड्यांना असंख्य मुंग्या लागल्या होत्या. तो जीवाच्या आकांताने ओरडला "हेच का तुमचे तत्त्वज्ञान? मेलेल्या माणसाचे मास खाताना कुठे गेल्या तुमच्या मगाच्या गप्पा? भोंदू लेकाचे!!" नंतर त्याचे त्यालाच हसू आले. आपण कुणाशी बोलतोय असे वाटुन त्याला पुन्हा रडू  आले. पण त्याचा आवाज ऐकून काही मुंग्या त्याच्या जवळ आल्या. त्यातली एक मुंगी त्याला म्हणाली " मित्रा आमच्याशी बोललास ते ऐकून खूप छान वाटले. तुमच्या माणसामध्ये कुणीतरी ज्ञानी होऊन गेल्याचे ऐकले होते. विश्वाला स्वधर्माचा सूर्य मिळो अशी प्रार्थना त्याने केली होती. एका जीवाचे इतर जीवाशी मैत्र जडो अशी प्रार्थना त्याने केली होती. तुला खरे सांगू का? त्याची ती प्रार्थना ऐकल्यावर आम्ही परत देउळ बांधायचा विचार सोडून दिला. आम्हाला आमचा धर्म समाजला. तेव्हा पासून आम्हाला माणसाशी बोलायचे होते. तुला ठाऊक आहे का तो ज्ञानी?". त्याला काय बोलावे ते कळेना. पण त्याची वृत्ती शांत झाली होती. तो म्हणाला "मला मान्य आहे कि मी जिथे आहे त्याला फक्त मीच जबाबदार आहे. पण त्याची शिक्षा माझ्या प्रेयसीला का देताय? त्या समुद्रातल्या दुष्ट माशांनी तिची हत्या केली आता तुम्ही तिची विटंबना का करताय?". बराच वेळ कुणीच काही बोलले नाही. मग एक मुंगी म्हणाली, "मित्रा ज्याला तू शिक्षा म्हणतोस असे काही अस्तित्वात असते का? तुझ्या सोबतीने तुझी प्रेयसी इथे आनंदी होण्यासाठी आली होती. आणि अचानक लाटेच्या झोकात समुद्रात ओढली गेली. तिने सुद्धा तुझ्या सारखे वाळूत गाडून घेतले असते तर कदाचित ती देखील आत्ता तुझ्या बाजूलाच मरणाची वाट बघत बसली नसती काय? हा सगळा जर-तर चा भाग आहे. ती वाळूत नव्हती. मला असे वाटते कि इथे प्रत्येकाने आपला धर्म पाळला आहे. खड्डा काढून तुझ्या आनंदात सामील होण्याचा धर्म तिने पाळला. जमिनीवर ओढ घेऊन परत समुद्रात जाण्याचा धर्म लाटेने पाळला. आल्या जीवास चिरविश्रांती देण्याचा धर्म पाण्याने पाळला. मृत शरीराला भक्ष करून जगण्याचा धर्म समुद्रातील जीव-जंतूनी पाळला आहे आणि त्याचीच पुढची वृत्ती आम्ही करतो आहोत. याच्यात चूक, शिक्षा, हत्या, विटंबना कुठे आली? झाडाचे फुल उमलताना कधी पाहिले आहेस काय? कळी जेव्हा तिचे हिरवे आवरण फोडून बाहेर येते तेव्हा त्यातून कधी रक्त आलेले पाहिलेस काय? पाकळी उमलताना झाड हसतच असते. पिकलेले फळ झाडावरून सुटून पडताना कधी पाहिले आहेस काय? फळ सुटून पडल्यावर झाडाला आनंदच होतो. दु:ख नाही. मुळात झाड, फळ, फुल हे वेगळे नाहीतच. त्यामुळे एका पासून एक वेगळे होत नाही. आणि करताही येत नाही. आणि म्हणून एकाला त्याचे काहीही वाटत नाही. तो सूर्य इतका शक्तिशाली आहे कि मनात आणेल तर क्षणात सर्व पृथ्वी दग्ध करू शकेल. हा समुद्र इतका समर्थ आहे कि मनात आणेल तर समस्त पृथ्वी व्यापून टाकू शकेल. पण तसे होत नाही. दिवस भराच्या तापाने पृथ्वी दमली असेल या विचाराने संध्याकाळी जाताना तो हा चंद्र पृथ्वीला देऊन जातो. एखाद्या वेळी लाट मोठी झाली तर पुढच्या वेळेस तेवढीच मोठी लाट समुद्र आत ओढून घेतो. सुई सारखे टोचणारे असले तरी त्याच तुषारांनी तुला जागे करून जिवंत ठेवले आहे." त्यानंतर बराच वेळ कोणीच काहीही बोलले नाही. मग कण्हण्याच्या खूप खोल गेलेल्या आवाजात तो म्हणाला, "माझी चूक मला मान्य आहे. पण माझा स्वधर्म मला कसा पाळता येईल?" त्यावर एक मुंगी म्हणाली "तू ज्याच्या पासून निर्मिला गेला आहेस त्याची साधी आठवण जरी ठेवलीस तरी तुला तुझा धर्म पाळता येईल. तू काय, आम्ही काय, हे खेकडे किंवा हे साप सारे ज्या माती पासून तयार झाले आहेत ती माती एकच आहे. या मातीच्या वेगवेगळ्या मूर्ती मध्ये जे मुंगी एवढे तत्त्व आहे, ते देखील सर्वामध्ये सारखेच नाही काय? याची जाणीव जरी तुला झाली तरी त्याहून अधिक तुला काय हवे आहे? हा समुद्र, हि माती, हा सूर्य , हा चंद्र आणि हा पाऊस हे सारे तुझेच भाग आहेत आणि तू त्यांचा भाग आहेस. याची साधी जाणिव जरी झाली तरी जन्म आणि मरण हे दोन्ही तुला सारखेच वाटू लागतील. " त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रू वहात होते. रक्ताळलेले ओठ थरथरत होते. वाऱ्याचा एक मोठा झोत आला आणि सारे एकंकार झाले. मुंगी कुठेतरी उंच उडुन गेली.

Friday, March 27, 2015

प्रिय अटलजी

तुम्हाला भारतरत्न मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन!! आज वर अनेकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पण मला असे वाटते कि आज त्या पुरस्काराचाच सन्मान झाला आहे. 

माझ्या पिढी मधल्या कित्येक लोकांना आज आनंद झाला असेल. तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी आहात. सर्व समावेशक नेते आहात. अणुस्फोट करण्याची हिंमत बाळगणारे शक्तिशाली प्रशासक आहात. कारगिल मध्ये पाकिस्तान ला चारी मुंड्या चित करणारे धुरंधर सेनापती आहात. हे सगळे असूनही तुमच्या कडे मेणाहून मऊ असे कवीचे अंतकरण आहे. तुमचे वक्तृत्व भारून टाकते तर तुमच्या कविता गहिवरून टाकतात. आज तुमचीच एक कविता आठवली आणि २ शब्द लिहावेसे वाटले. 

क्या खोया क्या पाया जग में । मिलते और बिछडते मग में ।
मुझे किसी से नही शिकायत । यद्द्यपि छला गया पग पग में । 
एक दृष्टी बीती पर डाले । यादो कि पोटली टटोले ।
अपने हि मन से कुछ बोले । अपने हि मन से कुछ बोले ।

जन्म मरण का अविरत फेरा । जीवन बंजारो का डेरा ।
आज यहां कल वहां कूच है । कौन जानता किधर सवेरा ।
अंधियारा आकाश असीमित । प्राणो के पंखो को तोले ।
अपने हि मन से कुछ बोले । अपने हि मन से कुछ बोले ।

अटलजी तुम्ही अदम्य आहात. अगम्य आहात. सावरकरांनी सांगीतलेले देशभक्तीचे मंत्र तुम्ही जन्मभर जगला आहात. 

भारतमाता जर कुठे खरेच असेल तर आज तिच्याही डोळ्यात पाणी आले असेल!!   

पुन्हा एकदा अभिनंदन !!

Tuesday, February 17, 2015

आबा

आबा गेले. फार वाइट झाले. एक अतिशय उमद्या मनाचा आणि खिलाडू बाण्याचा सच्चा मराठा गेला.

माझा आणि आबांचा पहिला परिचय झाला १९९४ साली. आबांच्या वाढदिवसा निमित्त तासगावला एक मोठी जंगी वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. माझा एक मित्र होता उत्तम पाटील. तो आबांचा गाववाला. गाव वाला म्हणजे अगदी शिवाराला शिवार आणि भिंतीला भिंत लागून!! बऱ्यापैकी भाषणे वगैरे करायचा. खाक्या एकदम राजकीय!! आम्ही दोघांनी बऱ्याच स्पर्धा एकत्र केल्या होत्या. त्यानेच मला सांगितले या स्पर्धे बद्दल. पहिले बक्षीस होते १००० रुपये. १९९४ साली १००० रुपये म्हणजे १ लाख रुपयाइतके मोठे होते. तेव्हा स्पर्धांची बक्षिसे म्हणजे पहिल्या क्रमांकाला १०१ रुपये म्हणजे डोक्यावरून पाणी!! अर्थात तेव्हा १० रुपयाला राइस प्लेट मिळायची आणि ६० पैशाला तंबाखूची पुडी!! तेव्हा १००० रुपये बक्षिस म्हणजे कळस होता. त्यात स्पर्धा तासगावला. म्हणजे सांगली पासून वट्ट अर्ध्या तासावर. बसचे तिकीट २ रुपये २५ पैसे. मनात विचार केला कि सव्वा दोन रुपये भांडवलावर जर १००० रुपये बक्षीस मिळाले तर काय धमाल येईल!! पुढे किमान वर्ष भर तरी प्रवासाची आणि वर खर्चाची चिंता नाही. अगदी हरखून गेलो होतो. त्या दिवशी सकाळी ९ वाजता तासगावला पोचलो. तासगावच्या गणपतीच्या देवळाच्या बाजूच्या शाळेच्या पटांगणात स्पर्धा होती. स्पर्धेला तोबा गर्दी होती. १००० रुपये बक्षीस म्हटल्यावर अगदी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून स्पर्धक आले होते. श्रोतृ वर्गामध्ये बहुतेक सगळी मंडळी पांढरे झब्बे घालून डोक्यावर पांढरे फेटे नाहीतर गांधी टोप्या घालून बसले होते. भरगच्च मिशा, अखंड पान-सुपारी खाऊन कायमचे लाल झालेले दात आणि डोळ्यावर जुन्या वळणाचे काळ्या जाड काड्यांचे चष्मे असा जमा निमा करुन मंडळी 'भाशनं कवा सुरु व्हायाची?' याची आपसात चर्चा करत सुपारी कातरत बसली होती. हि स्पर्धा कमी आणि भाषणांचा फड जास्त होता. स्पर्धेचे विषय पण अगदी सणसणीत होते. मृदू मउ आवाजात भाषणे करणाऱ्या वक्त्यांची हि स्पर्धाच नव्हती. साहित्यिक मुल्य वगैरे असल्या गोष्टीना फारसा भाव मिळणे अवघड दिसत होते. तेव्हा मनात विचार केला कि काहीही झाले तरी इथे नंबर यायचा असेल तर प्रत्येक वाक्याला टाळी मिळाली पाहिजे. एक वाक्य जरी बिना टाळीचे गेले कि झाले काम!! थोडक्यात शब्दांची कुस्ती रंगवायची होती. अर्थात त्या दरम्यान माझे बोलायचे पट्ट विषय म्हणजे राजकारणा शी अगदी जवळचे असायचे. पण माझी बोलायची पद्धत बरीच ब्राम्हणी होती. मुद्देसूद, एका मागून एक विचार मांडत, बऱ्यापैकी मध्यम लई मधे बोलायचो. माझ्या भाषणाला टाळ्या मिळायच्या ते भाषण संपल्यावर. असा शब्दांचा धबधबा आणि त्याच्या मागून येणारा टाळ्यांचा कडकडाट या आधी कधी केला नव्हता. पण आज काही खैर नव्हती. श्रोते इतके बोलके होते कि एखाद्या रटाळ वक्त्याला 'ए आता बस खाली बाबा' असे म्हणायला सुद्धा मागे-पुढे पाहणार नव्हते. माझा काहीतरी १८ वा का १९ वा नंबर होता बोलायचा. एका मागोमाग एक भाषणे चालू होती. बहुतेक अगदी सपशेल पडत होती. एक वक्ता बोलता बोलता 'लोकशाहीचा तौलनिक अभ्यास' वगैरे काहीतरी म्हणाला. आणि श्रोतृ वर्गामध्ये 'तौलनिक म्हंजी काय?' याच्यावर एक मस्त परिसंवाद रंगला. मग त्या वक्त्याचे भाषण संपले कधी आणि त्याच्या नंतरच्या वक्त्याचे भाषण सुरु कधी झाले ते कळले देखील नाही. एक एक करत माझा नंबर आला. संयोजकांनी माझे नाव पुकारले. 'निखिल कुलकर्नी'. आता निखिल या नावाला ग्रामीण महाराष्ट्रात काही फारशी इमेज नाही. पण 'कुलकर्नी' ह्या नावाला जबरदस्त इमेज आहे. येउन जाउन 'कुलकर्नी' पोष्टात, रेल्वे स्टेशन मध्ये नाहीतर शाळेत मास्तर असायचा!! त्यामुळे 'कुलकर्नी' कसा असतो आन त्यो काय काय बोलू शकतो याची गाव वाल्यांना चांगली कल्पना होती. असंच एखादं पुणेरी थाटाचं 'तौलनिक' वगैरे शब्द घालून भाषण होणार म्हणून मंडळी चर्चेच्या तयारीत बसली होती. बऱ्याच दिवसांनी व्यासपीठावर जाताना माझ्या पोटात जबरदस्त बाक-बुक होत होती. देवाचे नाव घेतले आणि खणखणीत आवाजात सुरुवात केली "राम राम मंडळी राम राम …. आज या ठिकाणी आपल्या लाडक्या आबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही मंडळीनी फुडाकार घेऊन हि भाषणं लावली त्याबद्दल सर्व तासगावकर मंडळीचे मनापासून आभार!!" आणि काय आश्चर्य पहिल्या वाक्या पासून टाळ्याना सुरुवात झाली. त्याच्यात शिट्ट्या पण वाजायला लागल्या. मग मी पण अजिबात हटलो नाही. मनातल्या मनात रामदास फुटाण्याना स्मरून एका मागोमाग एक अशी धमाल कोटेशन पेरत गेलो. 'खुर्ची माझी माता, खुर्ची माझा पिता, बहिण बंधू चुलता, खुर्ची माझी!!' 'मै भी नकटा, तू भी नकटा, ये नकटो का मेला है, इसमे जो नाक वाला, वो भी उनका चेला है"असल्या कोटेशन वर टाळ्या शिट्ट्या मिळायच्या. मग त्याच्या नंतर थोडी लांब पल्लेदार तालात वाक्ये घालायचो. '१५ ऑगष्ट १९४७ साली भारत नावाच्या देशाने लोकशाही नावाच्या एका मेलेल्या बाळाला जन्म दिला. त्या लोकशाहीचं प्रेत दिल्लीच्या माळावर पडलेलं असतं. त्याच्या भोवती हि राजकीय पक्षांची गिधाडे रोज जमतात. त्यातलं एक गिधाड म्हणतं, अरे प्रेत फार मोठं आहे. एकदा खाउन संपायचे नाही. त्याच्या वर दुसरे गिधाड म्हणतं, 'आत्ता जाइल तेवढं खाऊ. उरलं तर रात्रीला बांधून नेउ. तरी पण उरलं तर त्याला जाळून टाकू. राखेतून जसा जपान जन्माला आला तशी उद्या पुन्हा लोकशाही जन्माला येईल. ती पुन्हा मेलेलीच असेल. आपण पुन्हा खाऊ. उरलेलं बांधून नेऊ. राहिलं तर जाळून टाकू. आपण अगदी मजेत राहू!!' पुढे पुढे मग कॉंग्रेसवर सडकून टिका केली, ' मंडळी मला सांगा गेल्या ५० वर्षात या कॉंग्रेसनं आपल्याला काय दिलं? पहिली दिली ती 'खादी' आणि 'खादी म्हणजे खा आदी'. त्याच्या नंतर दिला 'चरखा'. आता 'चरखा' म्हणजे काय तर 'चर' आणि 'खा'. त्याच्या नंतर दिली 'खाकी'. आता मला सांगा खाकी म्हणजे काय 'खा कि' ' लेका घाबरतोस कुणाला'. याच्या नंतर मंडळी बेभान होऊन टोप्या उडवायला लागली. त्यांच्या प्रतिसाद बघून मी हि पेटत गेलो. म्हणालो 'पंडित नेहरू नावाच्या डोंबाऱ्याने शेख अब्दुल्लाह नावाच्या माकडाच्या हाती काश्मीरचा कोलीत दिला.' थोडा वेळ एक पॉज घेऊन म्हणालो 'आणि आज, आणि आज कोळसा बघितला कि, आम्हाला काश्मीर ची आठवण येते'. पब्लिक येडं झालं होतं. ती वाक्येच तशी होती. वास्तविक सांगली काय आणि तासगाव काय, 'पश्चिम महाराष्ट्र' म्हणजे कॉंग्रेसचे माहेर!! तरी देखील लोक पक्ष भेद विसरून एक गम्मत म्हणून माझे बोलणे ऐकत होती. एकामागोमाग एक एका ठेक्यात येणाऱ्या वाक्यांनी ती जास्त आनंदी झाली होती. अखंड पंधरा मिनिटे टाळ्या घेऊन जेव्हा खाली उतरलो तेव्हा काय आनंद झाला म्हणून सांगू!! अजून बरेच स्पर्धक बोलायचे होते. तेव्हा अगदी पहिला जरी नाही तरी पहिल्या ३ मधला एक तरी नंबर मिळणार याची खात्री झाली होती. तिसऱ्या क्रमांकाला बक्षीस होते ५०० रूपये. तेव्हा सव्वा दोन रुपयावर ५०० रुपये म्हणजे काही कमी नाहीत असा अप्पलपोटा विचार करून मी आनंदी झालो होतो. त्याच्या नंतर एका मागोमाग एक भाषणे झाली. दुपारी ४ च्या सुमारास स्पर्धा संपली. आता उत्सुकता निकालाची होती. त्या श्रोत्यामधला जवळ जवळ प्रत्येक जण मला भेटायचा प्रयत्न करत होता. उगाचच 'shake hand' करायचा प्रत्येकाचा प्रयत्न चालला होता. माझा म्हणजे एकदम पुढारीच झाला होता. मी मग उगाचच दोन हात जोडून नमस्कार करत होतो. माझेच काय? पण ती मंडळी इतकी भाबडी होती कि उत्तम पाटीलचा देखील नेता झाला होता. लोक त्याला देखील भेटायला उत्सुक दिसत होते. ते सगळे पाहून माझ्या मनात एक छद्मी विचार येत होता 'कि अरे जमले कि या पब्लिकला गंडवायला!!'

संध्याकाळी ६ वाजता आबा आले. त्यांच्या बरोबर त्यांचा लवाजमा आला. श्रोते मंडळी चिडीचूप झाली. आता परीक्षक निकाल सांगणार एवढ्यात त्या गर्दीतला एक बबनराव उठून म्हणला 'आबा ते निकालाचं नंतर बघू. पर तुमी एक डाव आपल्या कुलकर्नीचं भाशन ऐका राव. ओ कुलकर्नी या फुडं. होऊन जाऊ द्या परत एकांडाव!!' माझ्या डोळ्या समोर काजवे चमकले. आबा आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कोण कोण मामलेदार, तहसीलदार आणि पोलिसांच्या समोर नेहरू ना डोंबारी म्हणायचे? माझी बोबडी वळली होती. हाता-पायाला घाम सुटला होता. नाही म्हणावे तरी पंचाईत आणि होय म्हटले तर तुरुंगातच जायचे बाकी!! बराच वेळ मी जागेवर बसूनच राहिलो. मग आबानी हाक मारली 'या कुलकर्णी. होऊन जाऊ द्या.' आईला न भूतो न भविष्यति हादरलो होतो. आयुष्यात पहिल्यांदाच भाषण करत असल्यासारखे पाय कापत होते. शेवटी गेलो. जाताना आबांना वाकून नमस्कार केला. मनात म्हटले आता फक्त हा नमस्कार जरी पावला तरी चालेल. मी स्टेज वर गेलो तसे पब्लिक परत सुटले आणि त्यांना बघून मी पण! सगळी भीड बाजूला ठेवून बिंधास्त कॉंग्रेसची टवाळी केली. परत एकदा कोटेशन आणि पल्लेदार वाक्ये चमकून निघाली. भाषण संपल्यावर आबांनी पाठीवर थाप दिली. म्हणाले "कुलकर्णी अहो झकास बोलताय कि!! येता का आमच्या बरोबर? येणार असाल तर बघा." आयुष्यातली सगळ्यात मोठी शाबासकी होती ती!! तेव्हा आबा म्हणजे लक्षवेधी आमदार म्हणून गाजत होते. आबांच्या प्रश्नाने विधानसभा हडबडून जागी होत होती. सत्ताधारी असून देखील योग्य ते योग्य आणि अयोग्य ते अयोग्य असा आबांचा न्याय होता. त्यांच्या सडेतोड प्रश्नाने कित्येकदा त्यांच्याच पक्षाचे मंत्री चकित होत होते. आबा म्हणजे वक्त्यांचा आदर्श होते. मुळात अतिशय निगर्वी माणूस. कशाचा अभिमान नाही. कशाचा तोरा नाही. समोर बसलेल्या भाबड्या जनतेचा तो मानबिंदू होता. त्या जनतेच्या गळ्यातला ताईत होता. आबांच्या एका हुकुमावर तो समोरचा जनार्दन काहीही करायला तयार होता. अशा आबांनी माझं कौतुक केलं होतं. माझ्या आनंदाला सीमा राहिली नव्हती. आता इतके सगळे झाल्यावर स्पर्धेचा निकालाची काय उत्सुकता राहणार होती!! परीक्षकांनी निकाल दिला. माझा पहिला क्रमांक आला होता. पण त्यावेळी देखील ज्या १००० रुपयांसाठी हा सगळा खटाटोप केला, त्या १००० रुपयाचं आबांच्या शाबासकी समोर काहीच वाटत नव्हते.

नंतर विजेत्या स्पर्धकांना आबांच्या बरोबर जेवण होते. त्या दरम्यान आबांशी खूप गप्पा रंगल्या. आबांनी त्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचे काही अनुभव सांगितले. आणि शेवटी बोलता बोलता म्हणाले "कुलकर्णी तुम्ही बोलता छान. पण तुम्हाला अंत:करणापासून सांगू का? तुम्ही जे बोललात तेच जर बोलत राहिलात तर जन्मभर विरोधी पक्षातच बसावे लागेल.' आणि मग आबांच्या नर्म विनोदावर सगळे मनापासून हसले. मी देखील काहीतरी सावरून घ्यायचे म्हणून म्हणालो "नाही आबा ते जरा पब्लिक ला खुश करायचे म्हणून जरा थोडं जास्त झालं". त्याच्या वर आबा म्हणाले "कुलकर्णी अहो हे पब्लिक म्हणजे भाबडा विठ्ठल आहे. गरीब आहे. कष्टकरी आहे. त्यांची कशाचीच मागणी नाही. पोटात एक आणि ओठात एक असला प्रकार इथे नाही. आज तुमच्या भाषणावर पब्लिक खुश आहे. अंत:करणापासून टाळ्या वाजवल्यात त्यांनी. माझे काय म्हणणं आहे अशा पब्लिकला आपण पण देताना देखील अंत:करणापासून द्यायला नको का?" एका क्षणात मी भानावर आलो होतो. आपण जे केले ते निव्वळ पोटार्थी कृत्य होते या विचाराने माझे मलाच अपराधी वाटले. आणि त्याच वेळेला, हा भाबडा विट्ठल या आबावर इतका प्रसन्न का याचेही उत्तर मिळाले. कसं बोलायचं ते मला ठाऊक होतं. पण का बोलायचं याचं उत्तर आबांनी शिकवलं.

नंतर डान्स बार बंद करून आबांनी तडा जात चाललेल्या संकेतांना जणू वज्रलेप करून दिला. मुंबई वर हल्ला करणाऱ्या कसाबाला फासावर लटकावून तर त्यांनी जमिनीचे पांग फेडले. आबांसारखा माणूस राजकारणात कसा याचाच मला कित्येक वेळेला प्रश्न पडायचा. नितळ आकाशाला काळे पांढरे ढगही चालतात, इंद्रधनूच्या सप्त रंगांचे कवडसे ही चालतात, पक्षांच्या नाना तऱ्हेच्या नक्षाही चालतात आणि सूर्याची किरणे हि चालतात. आकाशाची तक्रार कसलीच नसते. नितळता हा त्याचा स्थायी भाव असतो आणि धरतीला पाखर देण्याची जबरदस्त ओढ असते.

यातलंच थोडं आकाश घेऊन जगलेले आबा मग राजकारणात असून देखील राजा सारखे जगतात आणि गेले तरी अनेकांच्या डोळ्यात कायमचे उरतात.