गाडीवान दादा
~ निखिल कुलकर्णी
~ निखिल कुलकर्णी
अमेरिकेत गाडी घेणे ही एक प्रकारची तपश्चर्या आहे असे आमचे मत होत चालले आहे.
आम्हाला शंकर व्हायचा तेव्हा आम्ही जुनी कॅमरी घेतली होती आमच्या एका मित्रा कडून. वास्तविक आम्ही कधीच गाडी वगैरे घेण्याचा विचार देखिल केला नव्हता. किंबहुना तसे स्वप्न देखिल कधी पडून घामेघूम होत दबकून उठल्याचे पण आठवणीत नाही.
आमचे पेटंट स्वप्न म्हणजे, अशी रात्रीची वेळ आहे. आम्ही दुसरी पाळी करून सायकलला डबा लावून रेल्वे लाईनी जवळच्या आमच्या घरी निघालेले आहोत. रस्त्यावर साधे चिटपाखरू देखिल नाही. आम्ही तोंडाने मोठमोठ्याने रामरक्षा म्हणत आहोत. आणि अचानक वीस बावीस मोकाट कुत्र्यांनी आम्हाला घेरलेले आहे. एकेक कुत्रा म्हणजे साक्षात यमदूतासारखा आमच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहात आहे. वास्तविक अशा अवघड वेळी, २०-२२ कुत्र्यांच्या मधोमध सायकल हातात धरून उभे राहून, त्यांना “ए हाड कुत्र्या” असे म्हणून दाखवणाऱ्या इसमास “श्वान देव” नाहीतर “श्वानेंद्र” च म्हणावे लागेल. तर ते एक असो. तर अशा श्वान महर्षींना, आमच्या किरकोळ देहयष्टी कडे पाहून तोंड उघडून भुंकायची सुद्धा गरज वाटत नाही. नुसतेच वरचे आणि खाल्ले ओठ मागे घेऊन दात दाखवत “गुर्र् गुर्र् गुर्र्” असे आवाज काढत उभी असत. आपली कसलीही हालचाल ही प्रत्यक्ष मृत्यूला दिलेली हाळी आहे, या विचारात स्वप्नात सायकलचे हॅंडल आणि प्रत्यक्षात पलंगाचे दांडू असे बराच वेळ घट्ट धरून लाकडासारखे स्थिर होऊन पडलेले असायचो. “अहो काय होतय तुम्हाला?” असं आमच्या सौ नी म्हटलेले वाक्य त्या २०-२२ श्वान महर्षीं पैकीच कुणीतरी म्हणतय असे वाटून, प्रचंड भीतीने आम्ही दचकून जागे होत असू. भोके पडलेला गंजीफ्राक घामाने भीजून गेलेला असे.
मायदेशात असताना जिथे आम्ही कामगार होतो ती सूत गिरणी सोडली तर कुठेही जायचे असेल तर आम्ही बस किंवा रेल्वेने जायचो. “वाट पाहीन.. पण PMT ने जाईन!!” असेच आमचे धोरण होते. याचा अर्थ आमची महत्वाकांक्षा कमी होती किंवा आम्ही दैववादी होतो असे अजिबात नाही. “कधी ना कधी PMT येईलच आणि (एखाद तास उशिरा का असेन) आम्ही ईप्सित ठिकाणी पोहोचून दाखवूच”, असा दुर्दम्य आशावाद आणि “करून दाखवले” अशी कडवी, विजयी वृत्ती होती. तर ते एक असो.
तर आमचे परममित्र तेव्हा भारतात परत चालले होते. त्यांची बायको फारच गयावया करू लागली होती. तिचे बारीक तोंड पाहून आमच्या सौ ना देखिल गहिवरून आले. “भांडीकुंडी, ताटवाट्या, मंगलच्या चड्ड्या आणि उरलेले डायपर इतकेच काय पण घरातले टाॅयलेट पेपर देखिल विकून झाले हो वहिनी. आता राहीली ती ही फक्त कॅमरी. वहिनींच्या मते अगदी अशातले म्हणजे १९८० चे माॅडेल बरं!! लगेच आमच्या सौ नी खपली काढलीच की म्हणजे “फक्त” वीस वर्ष जुनी म्हणून!! मग वहिनींचे डोळे टचकन भरून आले.
अठरा वर्षे जुनी असताना त्यांनी ही कॅमरी का घेतली ते सांगितले. मग “कॅमरीला की नाही अगदी १०० वर्षे काही होत नाही हो!”, “ जी कध्धी कध्धी मरत नाही ती कॅमरी” वगैरे वाक्ये देखिल म्हणून झाली. त्या सुरात सूर मिसळत, “१०० वर्षे म्हणजे आत्ताशी कुठे कॅमरी जवान होते आहे” असे म्हणून आमचे मित्रवर्य, आम्हाला टाळी देऊन, गडागडा, दक्षिणी खलनायकासारखे विकट हसले होते. आम्हाला पुढे बऱ्याच वर्षांनी या वाक्यांचा अर्थ समजला तरी यातला विनोद अजून समजलेला नाही.
“तर ती कॅमरी एकदा विकली गेली की आम्ही भारतात परत जायला मोकळे!!” असे म्हणून वहीनींनी धोसरा काढला होता. ती कॅमरी विकायची राहीली म्हणून रडत होत्या की आमच्या मित्राचा विसा अमेरिकेने नाकारला म्हणून रडत होत्या ते एक विश्वंभराला ठाऊक!!
अमेरीकेत आलेले भारतीय एका विशिष्ठ आणि उच्च गुणवत्तेचे Diplomat (म्हणजे “खोटारडे” असे समजू नये!) असतात असे देखिल आमचे एक मत झाले आहे. त्या डिप्लोमसीच्या गुणवत्तेच्या परिक्षेची सुरूवात अमेरिकन विसाच्या मुलाखती पासून होते. इथे “तुमच्या अकाउंट मधे किती पैसे आहेत?” या प्रश्नापासून मंडळींचे “नाना फडणवीस” होऊ लागतात. काका, मामा, ओळखीचे, नातेवाईक (बायकोचे सुद्धा चालतात हो अशा अवघड वेळी), यांच्या कडून अक्षरश: दहा-दहा रुपये गोळा करून (अर्थात उधारीवर) ही मंडळी त्यांच्या अकाऊंट मधे प्रचंड पैसा आहे असे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. एकदा का ती अमेरिकन विसाची मुलाखत झाली की, अलमट्टीतून पाणी सोडल्यावर जशी कृष्णा काठची गावे पाण्यातून बाहेर येतात, तसे यांचे दहा लाखाचे अकाऊंट परत एकदा अचानक बारा रुपये तीस पैशांचे होत असते. चांगल्या वाईटाचा प्रश्नच नाही. आमचे फक्त एवढेच सांगणे आहे की ही वैश्विक डिप्लोमसीची भरारी ही इथून सुरू होत असते.
तर आमचे एक परममित्र अमेरिकेत शिकण्यासाठी म्हणून आले होते. ते काय शिकले ते आम्हास ठाऊक नाही. पण आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते शिकागो विद्यापीठांत रात्र पाळीचे वाॅचमन म्हणून काम करत होते. आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. भला घरचा माणूस. याचे वडील रिटायर्ड मामलेदार होते. पण आम्ही विचारायच्या आधीच त्यांनी कानापर्यंत हासत आपणहूनच “फावल्या वेळेत काय करायचे, म्हणून करतो हे काम झालं!” असे सांगितले होते. एक तर रात्र, अंधार आणि आपण एकटे आहोत ही कल्पनाच आम्हाला सहन होत नाही. तेव्हा रात्रभर काठ्या आपटत अंधाऱ्या जागेतून फिरायचे हे काम “फावल्या वेळेतील काम कसे?” या प्रश्नाने देखिल आम्हाला दचकून जाग येत असते. अर्थात जागेपणी हे उत्तरदेखिल त्या वैश्विक डिप्लोमसीचा भाग असावा म्हणून आम्ही त्याच्या कडे कानाडोळा करत आलेले आहोत.
तर अशा वैश्विक डिप्लोमसीचा डिप्लोमा घेतलेले आमचे मित्र आणि त्यांच्या अर्धांगिनी, यांनी बोलता बोलता त्यांची वीस वर्षांची नवयुवती कॅमरी आमच्या गळ्यात घातली. तरी आम्ही शेवटपर्यंत “रंग थोडा विटलाय का?” किंवा “असा का आवाज येतोय?” वगैरे प्रश्न विचारून तो व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करून पाहीला. पण एकतर आमच्या सौ ना सहावा महीना लागला होता. आणि मग त्यांना सारखे गाडीचे डोहाळे लागू लागले. त्यांचं आपलं सारखं “बाळ गाडीत बसायचं म्हणतोय” वगैरे चालू झाले. आमच्या चतुर मित्राच्या चौकस नजरेतून ते सुटले नाही. त्यांनी एक दिवशी आम्हालाच दम भरला की, “वेळ आली की बायकोला काय बस मधून दवाखान्यात नेणार आहेस का म्हणून!!” आणि बाजूला वहिनींनी आमच्या सौ ना त्यांच्या कॅमरीला दोन गिर्हाईक सांगून आली आहेत म्हणून सांगितले. डिप्लोमसी!! मग काय करणार! शेवटी एकदाचा मानेनेच होकार दिला. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी! आमच्या कडे गाडी चालवायचाच काय पण सायकलला लावायच्या राॅकेलच्या दिव्याचा देखिल परवाना नव्हता. आम्हाला पडणाऱ्या, कुत्र्यांच्या भीतीदायक स्वप्नांचे हे देखिल एक कारण असावे. मग मित्रवर्यांनीच त्यांची गाडी आमच्या दारात आणून सोडली. गाडी सोडून ते जेव्हा परत गेले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी तोफांचे गोळे ऐकल्यावर बाजी प्रभू देशपांड्यांच्या चेहऱ्यावर होते तसे तेज आले होते.
प्रसंग मोठाच बाका होता. दारात गाडी झुलत उभी होती. पण परवाना नसल्याने (आणि अर्थात चालवता पण येत नसल्याने) नुसते बघत राहण्यापलिकडे काहीही करता येत नव्हते. शिवाय आमच्या सौ ना दम धरवत नसे. त्या सारख्या गाडीत जावून दार वगैरे उघडून, थोडा वेळ नुसत्याच बसून येत. “असं कशाला गाडीत जावून बसायचं?” असं आम्ही विचारल्यावर उत्तर मिळे की “बाळ गाडीत बसायचं म्हणत होता म्हणून!!”..आता काय कपाळ बोलणार याच्यावर!!. पण आमच्याशी सांपत्तिक, व्यावहारीक, बौद्धीक अशा हर तऱ्हेची स्पर्धा करणाऱ्या आमच्या नतद्रष्ट शेजारांच्या नजरेतून हा प्रकार कसा सुटावा? आमच्या सौ गाडीत बसायला निघाल्या की या शेजाऱ्यांच्या कुटाळ बायका त्यांच्या त्यांच्या हाता एवढ्या गॅलरीत पेशवीण बाईंसारख्या येवून उभ्या राहात आणि एकमेकींना खुणा करून तोंड झाकून फिदीफिदी हसत असत. एकदा तर आमच्या सौ गाडीत बसून परत येत असताना यातलीच एक टवळी खौट पणानं म्हणाली होती की “काय वहिनी कशी झाली चक्कर म्हणून!!”..रागच आला होता आम्हाला त्यांचा!! मनात म्हटले सुद्धा की, “तुमचं काळं, ढोलं, मंगळसूत्र बसलं असेल कुठल्यातरी रेल्वेत नाहीतर बशीत लोंबत, शेळीच्या गळ्यासारखं. त्याला जाऊन विचारा, कशी झाली त्याची चक्कर ते!!” पण बोलणार कुणाला!! काळ वेळ काही सांगून यायचा नाही. म्हणून मग आम्ही असले संवाद मनातच म्हणायचो. आणि आपल्याला गाडी चालवता येत नाही याचा दोष उगाच लोकाला कशाला द्यायचा? आम्ही आपले आमच्या कर्मावर चरफडत बसायचो. बहुतेक जण तेव्हा न्यू जर्सी तून न्युयाॅर्क पर्यंत कामाला रेल्वेनेच जात. शनिवार-रविवारी कुणी एखादा गाडीवाला ओळखीचा “भेटतो का” (“पावतो का” हे जास्त योग्य आहे खरे तर!) याची आशाळभूत पणे वाट बघत आपल्या अपार्टमेंट, अमेरिकेत चाळीतल्या खोलीला “अपार्टमेंट” म्हणतात. अर्थात हे थोडेसे मारवाड्याच्या वाणसामानाच्या दुकानातल्या दिवाणजीने स्वत:ला “श्रीमंत पेशवे” म्हणवून घेण्यासारखेच आहे. पण अमेरिकेतल्या बहुतेक गोष्टींचे थोडे-बहूत असेच आहे. इथे एखाद्याला नोबेल मिळाले तरी त्याला “ग्रेट” म्हणतात आणि एखाद्या मोती कुत्र्याने खांबावर तीर्थ प्राशन केले तरी देखिल त्याला “ग्रेट” च म्हणतात. तर ते एक असो!! तर अशा दीड वितीच्या “अपार्टमेंट” मधे, आपआपल्या गावातले “हिज हायनेस” “राजेरजवाडे” येवून राहात असतात. आणि अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही खुद्द भगवान श्रीकृष्णानी आपल्या “कपिलध्वज रथातून” (म्हणजे आताच्या काळात २० वर्षे जुनी कॅमरी मधून) वालमार्ट (प्रचलित कुरुक्षेत्र) पर्यंत लिफ्ट द्यावी (फुकट) अशी त्यांची माफक अपेक्षा असायची. “Are you going to Walmart today?” अशी बारीक तोंड करून आणि नसलेले खांदे पाडून, भीक सर्रास मागितली जात असे. हे वाक्य ऐकले की आम्हाला आमच्या बालपणी भर दुपारी दारावर येणाऱ्या बोटं झडलेल्या महारोग्याची “वाढता का ताई?” अशी आरोळी आठवत असे. काही कमी मिळतंय असा भाग नसायचा. पण नखं खाऊन पोट भरायची घाणेरडी सवय लागली होती सगळ्यांना!! हे आमचे शेजारी, तीन त्रिकाळ गिळणे, आठ तास कामाच्या जागेवर बसून येणे, आणि दर दोन वर्षांनी “साई कृपा, साई कृपा” म्हणत काळी, फेंगडी पोरे काढणे याशिवाय दुसरे काही करायचेच नाहीत. कधी हॉटेलात जाणे नाही. कधी एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाणे नाही. (स्वत:च्या) बायकोला बरोबर घेवून थेटरात जावून एखादा सिनेमा बघणं नाही. कधी एखाद्या बार मधे जावून, स्वत:च्या पैशाने चार पेग लावून,आकाशामधे प्रत्यक्ष चंद्राने केलेला शृंगार
बघणे नाही. कधी स्वत:चे चार पैशे लावून जुगार खेळायचे नाहीत.
बघणे नाही. कधी स्वत:चे चार पैशे लावून जुगार खेळायचे नाहीत.
नुसते घरकोंबड्या सारखे घरात बसून स्वत:च्या बायकोला शिव्या घालायच्या, मित्रांच्या बायकांचे कौतुक करायचे, परत स्वत:च्या बायकोने केलेले भात आणि सांभाराचे मुटके मुठीने पोटात सारायचे आणि बुड वर करून पडायचे, एवढेच यांना ठाऊक होते. आणि यांच्या टवळ्या बायका देखिल “रांधा, वाढा, आणि उष्टी काढा” याच्या पलिकडे गेलेल्या आमच्या तरी आढळात नाहीत.
(क्रमश:)
~निखिल कुलकर्णी

आपल्या (अनेक फजिती पैकी फक्त) एका फजितीचे हे कोड कौतुक छानच उतरले आहे. आम्ही देखील इकडे स्वदेशी अफाट मायाजलातून असे काहीतरी चमकदार वाचून बिचून आतल्या आत गुदगुल्या गोंजारत शेवटी बुड वर करून पडणार, ते सोडा!
ReplyDeleteपण निखिलराव,तुम्ही तुमच्या या भन्नाट प्रतिभेचं विरजण घालून नका ठेऊ.अहो ते अधून मधून बाहेर काढत जावा की. तशात न्यू जर्सी मध्ये असे अनेक मराठी (रत्ने की नमुने) जण असणार तुमच्या अवती भवती.मग विषयांना तोटाच नाही...
लिहित रहा, बघा किती मोकळं मोकळं वाटेल.
ही आज्ञा अ(ति) परिचयात अवज्ञा असल्यासारखी वाटेल पण राहवले नाही म्हणून हा अट्टाहास!
जाता जाता
मंदार भारदे यांचेही लेख वाचा मिळाले तर...
धन्यवाद 🌿