Wednesday, August 31, 2011

मी गत-जन्मीची सखी

लेक लाडकी मी तुझी
ओळख मजला पुससी
शोध बापड्या जन्मांतरी
मी गत-जन्मीची सखी


गत जन्मी तू कृष्ण कानडा
राधा मी तर साधी भोळी
जीव लावूनी अज्ञाताला
निघून गेलास अवचित वेळी


त्याच क्षणी मी परब्रम्हाला
केली एक विनंती
फिरून दोघा जन्म मिळावा
याच धरती वरती


प्रियकर होणे पुरले मजला
लेक लाडकी झाले मी
लळा लावूनी जन्म भराचा
अवचित निघून जाईन मी


नाव राहिले लावायाचे
राधा विनवी पकडून बाही
कृष्ण कन्हैया पुरवीन ओढी
म्हणून जन्मले तुझ्याच पोटी


लेक लाडकी मी तुझी
ओळख मजला पुससी
शोध बापड्या जन्मांतरी
मी गत-जन्मीची सखी

मी गत-जन्मीची सखी

@@@@@@@@@@@@@@@@

निखील कुलकर्णी

Friday, August 5, 2011

निष्प्राण लटकती पितरे...

दुष्काळा मुळे आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाची व्यथा

निष्प्राण लटकती पितरे, पाउस गोठला होता |
सर्पणात विरती गहिवर, डोळ्यात दाटला होता ||१||

माय माती विव्हळते, भेगात आक्रंद होता |
ग्रीष्मात हरवली प्रतिमा, तो चंद्र शोधीत होता ||२||

दग्ध कोरडी नक्षत्रे, हा भोग राहिला होता ||
रथसप्तमी उराशी, तो स्तन्य जाळीत होता ||३||

सूर्यात पोळली पाने, हा कोंब पोरका होता |
तापत्र वेढल्या स्मशानी, तो सांब निपचित होता ||४||

Tuesday, August 2, 2011

भागीचे भारुड

भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||धृ.||

गावाकडली मंडळी पुण्याला आली
पुण्याकडची मंडळी अमेरिकेला आली
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||१||

डॉक्टर मंडळी पहिल्या गाडीनं आली
इंजनेर मंडळी मागल्या गाडीन आली
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||२||

बैलगाडीतली भागी मोटारीत बसली
मोटार सोडून मग इमानात बसली
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||३||

म्हातारी आजी मारून गेली
घराची कौलं बी उडून गेली
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||४||

अरा रा रा रा रा रा
बर मग फुडं ?

फुडं ?
लुगड्या मधली भागी झग्यात आली
कुकू गेलं आन टिकली बी गेली
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||५||

केरसुणी सोडून व्हाकुम फिरवती

भले भले

केरसुणी सोडून व्हाकुम फिरवती
केर तसाच तिनं वायर जोडलीच न्हाई
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||६||

विकेंडला दसरा आन विकेंडला दिवाळी
विकेंड सोडून एकादशी आलेली
भागीचा उपास ऱ्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||७||

अरा रा रा रा रा रा
बर मग फुडं ?

फुडं ?
अशी आमची भागी मग दोन पोरांची आई झाली

भले भले

अशी आमची भागी मग दोन पोरांची आई झाली
एकाच नाव ख्रिस आणि दुसरा झाला ह्यारी
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||८||

ख्रिस आणि ह्यारी, जोडी लई न्यारी पर
त्यास्नी म्हराटी येतच न्हाई
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||९||

ख्रिस म्हणतो भागीला, माय इंग्रजी बोलू नको
ह्यारी म्हणतो भागीला, आय म्हराटी बोलू नको
आता भागीला भाषाच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||१०||

गाव सोडलं आन माया मेली
पोरं झाली आन भाषा गेली
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||११||

बर मग फुडं?

भागीच्या दादल्याच अप्प्लीकेशन एकदाच रद्द झालं

रद्द झालं?

अरा रा रा रा
फुडं?

फुडं काय फुडं?

दादल्याची स्वारी बिघडली
त्यांनी गावाची तिकिट काढली
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||१२||

पोर म्हणाली भागीला, तुम्ही दोगं जावा गावाला
आमचं आमी बगतो, आता गाव न्हाई आमाला
भागी डोळ्याला पदर लावी
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||१३||

पोरं माय म्हणतील म्हणून,
पोरं माय म्हणतील म्हणून, मन मारून जगली
दादला सोबती जन्माचा म्हणून, पुन्हा गावाला चालली
त्येचा भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||१४||

अर्ध आकाश आन अर्धी जीमीन
भागीच्या जल्माची तर्हा हि कठीन
आता भागीला पत्याच न्हाई
तिच्या दादल्याला ग्रीनकार्ड न्हाई ||१५||