Tuesday, December 28, 2010

राव बाजी तुमी मस्तानी मी

राव बाजी तुमी मस्तानी मी
रात केवड्या रुतून बसा || धृ ||

कटी मेखला, जशी चंचला
लवलवती पातीला |

चांद साथीला, मेघ सावळा
नजर लावी मला ||

नवी कंचुकी, चौखण ल्याली
बंध घातला ज्वानीला |

कशी थांबवू , इश्क उभारी हा
मदन जाळी मला ||

गोरी मोरी, काया माझी
जशी लकाकी पुनवला |

चांद कसा बघ, पाहे रोखून
दुजा चांद कधी उगावला ||

सोळा सरली, लाजही विरली
चापून पट्टी लुगडयाला |

या रम्भेच्या, रंगमहाली
मदन पाही मला ||

नवी पैठणी, बावनखणी
येवल्यातला मोर पहा |

बाजूबंद मज, सोनसळी तुम्ही
हात माझा हळूच कसा ||

काया माझी, शुभ्र साय ती
हात लावला लाल ठसा |

विडा घेउनी, गोविंदाचा
घुटक्या संगे लाल घसा ||

सती सोडली, प्रीत जोडली
रंग महाली धुंद असा |

राव बाजी तुमी, मस्तानी मी
रात केवड्या रुतून बसा ||