Sunday, May 24, 2009

कोम्ब एकटा होता....

कापला बुंधा तरी
कोम्ब एकटा होता
मूळ गेले अंतरी
धरेत गारवा होता.....

निष्पर्ण ही काया परी
देह झाकला होता
अवकाश रिक्त झाले
अंधार साचला होता....

नाते स्मरे धरेला
दाटून थेम्ब झरला
कापला बुंधा तरी
कोम्ब थांबला होता.....

Friday, April 24, 2009

मी बळी तो बळी...

मी बळी तो बळी
कोळ्याची जाळी
नागवे पोर शोधी
अडकलेली मासोळी....

अनंत धागे
अनंताचा जीव
जाळ्यातला मासा
पाकोळी पाकोळी.....

नात्यांचे धागे
जाळ्याचे धागे
तगमग कशाची
नेभळी नेभळी....

जळी तोच
स्थळी तोच
तर्हा त्याची
वेगळी वेगळी.....

Tuesday, March 24, 2009

एक होती आजी ....

कापुसलेल्या केसांची
कर्दमलेल्या शालीची
सुरकुतलेल्या मायेची
एक होती आजी ....

जुन्या पुराण्या पोथ्यांची
चुडा भरल्या हातांची
टोप पदरी लुगडयाची
एक होती आजी ....

तुकोबाच्या गाथेची
मनाच्या श्लोकांची
हरीच्या पाठाची
एक होती आजी ....

वाकलेल्या पाठीची
आजोबांच्या काठीची
सुन्ठेच्या चिमटीची
एक होती आजी ....

साखरेच्या खड्याची
खारकेच्या तुकड़याची
बोटभर गुलकंदाची
एक होती आजी ....

साठलेल्या क्षणांची
गोठलेल्या व्रणांची
सोनसावळ्या कणांची
एक होती आजी ....

एक होती आजी
आठवांच्या गाठोड्याची
आसवांच्या उशाशी
डोइवरल्या हाताची
एक होती आजी ....

Sunday, March 22, 2009

यक्ष कधीचा उभा...

अगणित क्षणात काल राहिला

काल संपला आज उगवला

यक्ष कधीचा उभा...

हिरवी राने करपून गेली

रान पाखरे परकी झाली

यक्ष कधीचा उभा...

धुक्यात निजली रान शिवारे

अलगद वारे बकुळ शहारे

यक्ष कधीचा उभा...

उंच धुमारे गगन सावरे

घरट्या मधले भ्रूण भुकेले

यक्ष कधीचा उभा...

पापणीतली अल्लड नाती

काजळ वाती मिटून जाती

यक्ष कधीचा उभा...

Thursday, February 12, 2009

दाटलेल्या कंठास

दाटलेल्या कंठास खुलवू नकोस आता

थांबलेला झुला तू झुलवू नकोस आता...

पहाटेची कळी उमलायचीच नव्हती

काजळात चंद्र कधीचा बुडाला ....

प्रारब्ध चांदण्यांचे विसरून आज जा तू

लाटातले रवि बिम्बही झाले निस्तब्ध आता ....

घरटे मनीचे रिकामे खग कधीचा उडाला

पोकळीत पिसारा उडवू नकोस आता .....

व्याकूळश्या स्वरानी भिजले उदास गाणे

संवादीनी पुराणी हलवू नकोस भाता .....

दाटलेल्या कंठास खुलवू नकोस आता

थांबलेला झुला तू झुलवू नकोस आता...

Tuesday, February 10, 2009

रात्रीच्या गडद अंधारात

रात्रीच्या गडद अंधारात दुनिया जेव्हा गाढ झोपते

तेव्हाच त्याला जाग येते .....

तो चोर नाही दरोडेखोर नाही घुबड तर नाहीच नाही

पण त्याला झोपलेली दुनिया आवडते .....

अशा रात्री रस्ते फक्त त्याचेच असतात

बागेतले रस्त्या कडेचे बाक

त्याच्या साठीच उभे असतात ......

मग तो फिरत रहातो

दुनियेची मौज लुटत रहातो ......

भिकपती असला तरी

दुनियेचा अधिपती असल्या सारखा जगतो .......

त्याचं साम्राज्य खुप मोठं

मोजता मोजता रात्र संपते

मग हां रात्रीचा अधिपती

की दिवसाचा भिकपती

दिवसाच्या गर्भात शिरतो आणि वाट पाहतो दिवस भर

साम्राज्याच्या उषःकालाची.....

Thursday, January 29, 2009

आसक्त चांदण्यांचा...

आसक्त चांदण्यांचा प्रच्छन्न नाच पाहे
ती मूकही परन्तु हलकेच वाट चाले ......


विश्वस्वधर्म सूर्ये व्याकूळ गूढ़ गाजे
अनिलासवेच अश्रु लाटात मुक्त वाहे .....


तिमिरासवेच आता निमिषार्ध तु रमावे
ते रम्य बिम्ब क्षितीला नेत्रात साठवावे .....


क्षण एकटा कधीचा बिलगून आस राहे
ती मूकही परन्तु हलकेच वाट चाले ......


विश्वस्वधर्म सूर्ये व्याकूळ गूढ़ गाजे
ती मूकही परन्तु हलकेच वाट चाले ......

Sunday, January 25, 2009

काळाचिये गती

काळाचिये गती

दिनांच्या आहुती

दिन की दीन

दोही समान गती ....

व्यापिली समष्टी

भोगली यथार्थी

अस्थीची निष्पत्ती

दोही समान गती ....

Tuesday, January 20, 2009

नाग म्हणाला उंदराला

नाग म्हणाला उंदराला
दोघ जावुया जेवायला ...........


तुला मस्त दाणे देतो
गरम चणे फुटाणे देतो
तु घाबरतोस कशाला? ...........


उंदीर म्हणाला नागाला
माझा बा तुझ्या बानं
अन आजा तुज्या आज्याने खाल्ला
आता तु खाणार मला ...........


नाग लागला हसायला
हल्ली शिवाच्या गळ्यात बसतो
अहिंसा सत्य अस्तेय
उंदीर खात नाही म्हणाला ...........


घाबरू नको भिऊ नको
बिळात लपून बसू नको
मी तर तुझा मित्र
इकोनोमी डाउन म्हणाला ...........


उंदीर भोळा खुळवला
चण्या साठी चटावला
बीळ सोडून मागे बघत
फुटाणे शोधायला निघाला ...........


कसले चणे
कसले फुटाणे
चुकून दात लागला ...........


कसला शंकर
कसली इकोनोमी
बिचारा उंदीर
जय गणेश म्हणाला ...........

Monday, January 5, 2009

घर एकले

घर एकले आसुसलेले


आठवणीँच्या वाटेवरले.....


या वाटेची रीत आगळी


उगम अंत मज साठी जहाले


पोटामागे बांधून सारे


सर्वही माझे वाहून नेले


घर एकले आसुसलेले .....




Sunday, January 4, 2009

राजहंस ना गरुडही नाही...

राजहंस ना गरुडही नाही
काकबळीचा धनी मी
उच्चकुळीचा नाही
रूप रंग ना तानही नाही
एकाक्ष मजला
अर्ध सत्य पाही
पंख तोकडे झेपही नाही
मर्यादांचे पाश कितीही
मम आत्मा कुंठीत नाही
मुक्त मी निवृत्त मी
दोन शीतांची रीत जगाची
वसे आसक्ती जीवांची
साकल्य मी अभुक्त मी
राजहंस ना गरुडही नाही
मम आत्मा कुंठीत नाही

तारकेस आज

तारकेस आज

उल्का व्हावे वाटले

चमचमत्या नभापरी

धरेत जावे वाटले.....


युगे युगे आकाशाला

तेज बहु वाहिले

नजरेगणिक धरे संगे

गहिवर ते दाटले.....


अंधाराची वाट तिला ठाउक नव्हती काय

अंधाराचा अंत तिला ठाउक नव्हता काय


तेज तेच तरी तिजला

अन्तर आज उमजले

नभही तेच तरी तिजला

अधांतर गवसले.....


तारकेस आज
उल्का व्हावे वाटले

तारकेस आज

उल्का व्हावे वाटले.....








एकलं पान कुठेतरी...

एकलं पान कुठेतरी
एकटं एकटं चाललं होतं
गळालं होतं कधीतरी
उन्हानेही वाळलं होतं.....


कुणी मग त्याला सोबत केली
त्यानेही गती थोडी कमी केली
जीवाशिवाची साक्षही निघाली
अन वाट बापुडी एकली झाली .....
पान वळालं की वारं फिरलं
क्षणिक नातं क्षणात विरलं
वाटे संगे युगायुगांचं
गान फिरून भरून आलं .....
एकलं पान कुठेतरी
एकटं एकटं चालु लागलं......



Saturday, January 3, 2009

दिव्य कणांचे संध्यासमयी..

दिव्य कणांचे संध्यासमयी सम्मेलन दाटे

निरोप घेत्या मित्राचे ते व्याकुळपण वाटे ...

अल्लड बाळे आवर शोके पुन्हा उद्या मी येत असे

रात्रीसमयी विरहावेळी चंद्र तुला मी देत असे ....

तप्त सुरानी दग्ध करानी दमलीस ग तु आज धरीत्रे

चंद्र तुला बघ हसवील फसवील पुन्हा उद्या मी येत असे ....

जमू लागले खग अंतरी निरोप देण्या आतुर झाले

इवलेसे ते परही त्यांचे क्षणाक्षणानी भरून आले ....

ऐक मैत्रयी उगाच रुसणे विरहाविण का प्रेम असे

अल्लड बाळे आवर शोके पुन्हा उद्या मी येत असे ....

दिव्य कणांचे संध्यासमयी सम्मेलन दाटे
निरोप घेत्या मित्राचे ते व्याकुळपण वाटे ...

Thursday, January 1, 2009

आम्ही लटिके ना बोलु

थोड़े मनातले थोड़े जनातले बोलु
चला मराठीत बोलु
आम्ही लटिके ना बोलु

साहित्य आमुचा श्वास रसिकावरी विश्वास
आम्हा शब्दांचा ध्यास
आम्ही लटिके ना बोलु
ज्ञानाची सखी तुकयाची आवडी
आम्हा मराठीत गोडी
आम्ही लटिके ना बोलु
शब्द शस्त्र आम्हा राही शब्दची शास्त्र
शपथ शब्दाची आम्हा
आम्ही लटिके ना बोलु
शूर वीर जगती विरती ऎसी मराठी माती
वेचू माणिक मोती
आम्ही लटिके ना बोलु
एके हाती रमणी अन दूजे हाती धरणी
ठाव मागतो रसिकाचरणी
आम्ही लटिके ना बोलु