Wednesday, December 30, 2015

मनातल्या मोरपिसाची..

पाडगावकर गेले म्हणतात. मला काही खरे वाटत नाही. जगण्याच्या हर एक प्रसंगात, अगदी गटारातल्या लेंडी पासून ते तिरडीच्या दांडी पर्यंत, अगदी हरेक प्रसंगात हा कवी रसरसून जगला आहे. आयुष्याच्या अनेकानेक प्रसंगात त्याची मोकळी-ढाकळी सोबत झालेली आहे. असे म्हणतात कि मेंदूच्या आत जे nurons असतात, 'if they fire together, they wire together'. त्या न्यायाने मराठी मनाच्या अगणित nurons बरोबर हा कवी आणि त्याने निर्माण केलेले भावविश्व अगदी कायमचे बांधून, जोडून, बिलगून गेले आहे. ते विश्व कधी कुठे जाईल काय!! 

जुईच्या फुलांनी काढलेल्या चांदात, भुईच्या चंद्रोत्सवाला घेऊन जाणाऱ्या अलौकिक प्रतिभेचा धनी कधी कुठे जाईल का!! भातुकलीच्या खेळातल्या राजा-राणीला अजरामर करून त्यांच्या कुठल्याही गावातल्या आणि कुठल्याही वयातल्या राजा-राणीच्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहणारा हा कवी कुठे जाईल का!! मस्त संध्याकाळी विस्कीचा ग्लास ओठाला लावताना शेजारी बसून आश्वस्त करणारा आणि "यांच असं का होतं कळत नाही यांना कळतं पण वळत नाही" असे म्हणून सभ्यतेच्या धुवट कल्पनांना उडवून लावणारा विचारवंत कधी कुठे जाईल का!! तिच्या बटाना जोवर हा मुजोर वारा उधळत राहील तोवर हा कवी कुठेही जाणार नाही. हातात हात घेताना आणि तोच चंद्र नविन होऊन पाहताना हा अवलिया तिथे नक्की असेल. कधी स्मृतीच्या अगणित पाखराना घेऊन हा कवी भेटेल. आणि त्यातलेच एखादे पाखरू त्याच्याही स्मृतीचे असेल. त्या पाखराला पाहून डोळे भरून येतील कदाचित!! पण मग हा कवी "डोळे कशासाठी" ते सांगत राहील. "डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी" म्हणत आसवात देखील "मी पापण्यात माझ्या हि झाकिली विराणी" म्हणत सोबतच राहील.  

आयुष्याच्या छोट्या-छोट्या प्रसंगांचे असे सोहळे करून जगायला शिकवणारा हा कवी कधी कुणाला एकट्याला सोडून कुठे जाइल हे मला तरी खरे वाटत नाही!! 

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, मनातल्या मोरपिसाची शपथ तुला आहे 

हळू हळू काजळताना सांज हि सुरंगी, तुझे भास दाटुनी येती भास अंतरंगी 
या उदास आभाळाची शपथ तुला आहे, दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे 
मनातल्या मोरपिसाची..

~ लेखक - निखिल कुलकर्णी 

No comments:

Post a Comment