Monday, April 16, 2018

दैवी: स्वस्तिरस्तुन:

आकाशाशी स्पृहा करणाऱ्या काळ्या कभिन्न कड्यावरच्या एकुटक्या धारेतल्या उगमापासून, ते सहस्त्र भुजांनी अजस्र सागराला उत्कट आलिंगन देणारी, शीतोष्ण पयाच्या अगणित बिंदूंनी काढलेली, अनेकानेक गहीवरांनी, उन्मादांनी, प्रपातांनी आणि कल्लोळांनी काठोकाठ भरलेली एक रेघ. ही रेघ त्यातल्या पाण्याइतकीच अखंड होऊन, उगमा इतकाच उत्साह घेऊन अव्याहत वाहात राहते, महादाना पर्यंत..

धारोष्ण उग्रट ज्वालामुखीच्या संगतीने अहंकाराच्या गर्तेत आकंठ बुडालेल्या, नाही तर कदाचित नभांगणातला एखादा स्वयंप्रकाशी तारा होण्याचं स्वप्न कायमचं भंगल्याने, निराशेच्या गर्तेत थिजून, अकालीच प्रौढत्वात गेलेल्या जडत्वाच्या ठिपक्यांना, ती अहोरात्र ऐकवत राहते शैशवाचे गान, तांबड्या रिबीनी लावलेल्या परकरातल्या पोरीसारखी, उत्शृंखलपणे गजग्यांचा खेळ खेळत हातातल्या बांगड्यांची अविरत किणकिण करत, अगदी ठिपक्यांच्या अंतापर्यंत..

या क्षणांची आठवण म्हणून नेते ती सोबत त्या ठिपक्यांचे काही कण गाठीला बांधून आणि मग आपल्याच आनंदात हरकून दिसू लागते नवयौवनेसारखी अधीर, आसक्त तरीही अव्यक्तच. हा जडत्वाचा समागम वाढवत राहतो तिचा आवेग क्षणाक्षणाने आणि अलगद एखाद्या प्रपातावर, अनावर होत देहाची कुरवंडी करून झोकून देते ती स्वत:ला बेफाम, बेलगाम, बेफिकीर होत आकाशाच्या प्रतलावर, अनावर विश्वव्यापी ओढीने. आणि मग जिवंत होतो तिचा प्रत्येक कण, आकाशाला धरून हिंदोळताना आणि स्वत:च्याच अस्तित्वाची ओळख विसरून स्वच्छंद विहार करू लागतो, यथेच्छ रानवारा पिऊन कळपाचे भान सुटलेल्या चौखूर उधळलेल्या वासरा सारखा..

गुरूत्वाच्या प्रभावाने जशी ही धुंदी उतरते तेव्हा हे अवखळ बाष्पाचे वारू परत एकदा निर्गुण निराकार होत आकाशाची संगत सोडून धरेला जावून बिलगतात आणि निष्पाप होउन करू लागतात सलगी, त्याच साकळलेल्या ठिपक्यांच्या कणांशी आणि चालू लागतात आपल्याच धुक्याचा पदर डोक्यावरून ओढून घेत, समाधिस्त अस्तित्वाच्या संगतीने, चिरकालासाठी..

भेटतात तिला वाटेत काहीएक जीवांची कोंडाळी, घाटांवरच्या आपल्याच जळमटात रमलेली. येत राहतात त्यांचे कृतघ्न हात आणि जिव्हा, अनभिषिक्त रिक्तता घेऊन, जन्मभराची. ती मात्र पुरवत राहते त्यांची तृषा, जो जे वांछील तो ते लाहो असे माऊलीचे काळीज घेऊन..

एखाद वेळी तिच्या कुशीत आकंठ डुंबणारी पोरं पाहून हसते स्वत:शीच, कड्यावरचं तिचे शैशव आठवून आणि मोहरून उठते परत एकदा आपल्याच सृजनाच्या जाणिवेने. भरलीच कोणी ओटी तर लावून घेते हळदी कुंकवाचे ठसठशीत डाग कपाळावर आणि ठेवून घेते चार तांदूळ, तिच्या, देवळांच्या गोपूरांच्या नक्षांनी आणि नंदीच्या घंटांनी सजलेल्या, हिरव्यागार पाचूच्या पदरात..

कधी आकाशात दूरवर, उंच उंच गेलेल्या, तिच्या कर्तबगार लेकुरवाळ्यांची, निरतिशय कौतुकाने, पुसत राहते वास्त, त्यांच्या, जमिनीच्या अंतरंगात खोलवर गेलेल्या पायाशी बसून, त्यांना ठिपक्यांचे लिंपण लावत आणि विसावते त्यांच्याच विशाल सावल्यांमधून माध्यान्हीची धाप टाकत पळभरासाठी..

परत पुन्हा एकदा उत्फुल्ल मनाच्या, संध्येच्या अविरत ओढीने, तिची पाऊले चालू लागतात अनामिक अगांतुकपणाने, जडावलेला देह घेऊन, अस्ताच्या दिशेने प्रशांताच्या दर्शना साठी. आणि तिचे असंख्य हात आतूर होतात मावळत्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या अखंड महादानासाठी..

उगमा पासून फक्त देतच आलेली ही चिरभरीता सरीता, सर्वव्यापी सागराला देखिल अर्पण करत राहते आपले स्नेहल अस्तित्व, बळीसाठी वेदीला बांधलेल्या अनंत पुरूखासारखे..

तिच्या यज्ञवेदीवरून, कधीच कुणी रीतं जात नाही.. जलधी सुद्धा...

शेवटच्या महादाना वेळी आकाशीचे गंधर्व गात राहतात कल्याणाचे महासूक्त, दैवी: स्वस्तिरस्तुन:, स्वस्तीर्मानुषेभ्य: ...

~निखिल कुलकर्णीNo comments:

Post a Comment