Thursday, September 18, 2014

आळ्या

डोंगरामधल्या अंधारलेल्या घळई मधे असंख्य आळ्या एकमेकांच्या अंगावरून हलत होत्या. त्यांचा रंग पिवळसर काळा असून त्यावर सुरवंटा सारखी लव होती. त्या जागेला उजेडाचा कधी स्पर्शही झालेला नव्हता. भिंतींवर बुरसट शेवाळे साचून राहिले होते. कुठेतरी डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचे थेंब टपकत असायचे. त्या ओलीने हवा अधिकच रोगट झालेली असायची. इथे कधी वारा हलला नाही कि कुठले पाखरू कधी अवचित थांबले नाही. लांबून वाहणाऱ्या नदीचा आवाज सोडला तर इतर कसला आवाज देखील कधी इथे पर्यंत पोहोचला नाही. कसला तरी सडका कुबट वास मात्र कायमचा होता. किंबहुना तो वास हि त्या जागेची ओळख होती. कधीतरी चार दोन माणसे मेलेले कुत्रे नाहीतर मांजर आणून टाकायची आणि कसलाही आवाज न करता निघून जायची. त्यावर मग पुढे बरेच दिवस जायचे. या आळ्या इथे कित्येक शतकांपासून रहात होत्या. पिढ्या मागून पिढ्या चालू होत्या. या आळ्या इथे यायच्या आधी इथे खूप सुरवंट रहात. या आळ्यामधल्या कुठल्यातरी महापराक्रमी आळीने त्या सुरवंटाना इथून हुसकून लावले होते आणि यांचे बस्तान बसवले होते. आलेल्या मेल्या शरीरावर मनसोक्त आहार करत आळ्यांच्या पिढ्या पुढे जात होत्या. त्याच्या मध्ये अगदी छोटी पिल्ले होती. तरुण मंडळी होती. आणि वयोवृद्ध शरीराने थकलेल्या आणि वळवळ जवळ थांबलेल्या आळ्याही होत्या. संपूर्ण सुरक्षित आणि अभेद्य अशा त्या कृष्ण विवरात त्यांचे विश्व होते. अहोरात्र असंख्य जन्म होत होते. जुने जीव नवीन शरीरे घेऊन नव्या अवतारात प्रकट होत होते. आणि तेवढ्याच संख्येने वृद्ध संसाराचा निरोप घेत होते. इथे जन्माचे विशेष नव्हते. नव्या आळ्या जन्म घेताना त्या संख्येने इतक्या प्रचंड असत कि कुणी त्यांचा जन्म उत्सव घालून साजरा केला नाही. आणि विशेष म्हणजे त्या विवरात मेलेली आळी कधी कुणी पाहिली नाही. आळी जेव्हा अगदी म्हातारी होऊन तिला चालणे देखील अवघड व्हायचे, तेव्हा चार दोन आळ्या तिला उचलून त्या घळई मधून अंगावरून उचलून बाहेर घेऊन जात. त्या आळीचे फुलपाखरू झाले कि मग इतर आळया घळई मधे परत येत. दिवसातून असंख्य आळ्या अशा बाहेर नेल्या जात. चार दोन चार दोन च्या गट्ठ्याने पोचवायला गेलेल्या आळ्या  परत येत. त्यामुळे आळी गेल्याचाही उत्सव साजरा करायला इथे सवड नव्हती. 

ह्या असल्या कुजत कुबट जागेत का राहायचे, असले लिबलिबीत बेढब शरीर घेऊन का जगायचे,  याचा नेमका अंत काय आणि त्याचा नेमका अर्थ काय असे प्रश्न प्रत्येक छोट्या आळीला पडत होते. शेवटी फुलपाखरू व्हायचे असेल तर हा जन्म जगालाच पाहिजे असे त्याचे उत्तर होते. 

प्रत्येक आळीला फुलपाखराचे वर्णन पाठ होते. फुलपाखराचे विविध रंग प्रत्येक आळीला खुणावायचे. पिवळसर काळ्या आळ्याना पिवळे पंख फुटल्याची आणि त्यावर काळे मोहक ठिपके गोंदल्याची स्वप्ने पडायची. एक मेकांच्या अंगावरून सरपट चालताना मधेच कधीतरी डोळ्यात फुलावरून उडत असल्याची चमक चमकून जायची. अंगाला लागलेले रक्ताचे आणि मांसाचे तुकडे पाहताना पंखाला चिकटलेले परागकण दिसायचे. स्वप्न इतकं प्रबळ होतं कि त्यामुळं किळसवाण्या वास्तवाची जाग देखील शिल्लक राहत नव्हती. जो तो एका धुंदीत जगत होता. प्रत्येक वृद्ध आळीला पोचवून येताना आता आपलाही दिवस जवळ येत आहे याचा मूक आनंद प्रत्येक आळीला होत होता. त्यामुळे अतिशय अनासक्त पणे सर्व व्यवहार निमुट्पणाने चालू होते. उद्याचा दुवा इतका प्रगल्भ होता कि त्याने आजचा दिवसच पुसून टाकला जात होता. 

वास्तविक कोणत्याही आळीने दुसऱ्या अळीचे फुलपाखरू झालेले प्रत्यक्ष पाहिलेले नव्हते. वृद्ध आळीला पोचवायला जाणाऱ्या आळ्या एका उंच डोंगराच्या टोकावर जात. त्या टोकावर त्या वृद्ध आळीला फुलपाखरू होण्यासाठी ठेवून घळई मध्ये परत जात. त्या डोंगरावर जाण्याची वाट अतिशय उभट असून तिला जागोजागी वळणे होती. पडणाऱ्या पाण्याने रस्ता निसरडा झालेला असायचा. शिवाय पोचवायला निघालेल्या आणि पोचवून परत निघालेल्या आळ्याची चिक्कार गर्दी असायची. त्यामुळे आळ्या निमुटपणे वृद्ध आळीला टोकावर ठेवून लगेचच खालच्या मानेने परत यायच्या. डोंगराच्या टोकावर देखील फुलपाखरू होण्यासाठी आलेल्या वृद्ध आळ्याची पुष्कळ गर्दी असे. त्या जवळ जवळ निपचित पडलेल्या असत. त्यांचे डोळे जवळ जवळ बंद झालेले असायचे. कसलीही हालचाल करण्याची शक्ती किंवा इच्छा त्यांच्याकडे शिल्लक नसे. उभा जन्म कुबट विवरात काढून आता त्या मोकळ्या वाऱ्यात आणि स्वच्छ प्रकाशात आलेल्या असत. आता कोणत्याहि क्षणी पंख फुटून आपण हवेवर आरूढ होणार या स्वप्नात रममाण असतानाच वाऱ्याच्या झोताने त्या हवेत उंच उडून जात. उडत असताना त्यांना पिवळे पंख फुटल्याचा भास होत असे. 

डोंगराच्या तळाशी, तसल्याच एका दुसऱ्या कृष्ण विवरात या पिवळ्या वृद्ध आळ्यांचा खच पडलेला होता. त्यावर हिरव्या आळ्या गर्दी करून चालत होत्या.   

1 comment: