Sunday, June 18, 2017

नाव नावाची गोष्ट

आपल्या मुलाचं किंवा मुलीचं नाव काय ठेवावं, हा वास्तविक ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. असे किती जरी म्हटले तरी, ज्या समाजात माणूस राहतो, त्या समाजाचा मुलांच्या नावावर आणि उलटपक्षी त्या नावांचा त्या समाजावरही परिणाम होतच असतो. बऱ्याच वेळेला या आई वडिलांनी दिलेल्या नावांमुळे, "नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा" याचा प्रत्यय येत असतो. प्रत्येक नावाला एक प्रकारचे सामाजिक वलय अाणि प्रतिमा असते. मग ते नाव धारण करणाऱ्या माणसाची इच्छा असो अथवा नसो, त्याला ती समाजमान्य प्रतिमा सिद्ध करावी लागते. काही काही माणसे इतकी कर्तबगार असतात की ती त्या नावाला एका वेगळ्या उंचीवर घेवून जातात. पण काही माणसे जन्मभर त्या प्रतिमेच्या आगे-मागे घुटमळत राहतात.
परवा एक राजकीय नेते तावातावाने बोलत होते की ब्राम्हण लोकात मुलाचे "शिवाजी" असे नाव ठेवत नाहीत. आणि याचे कारण म्हणजे ब्राम्हण समाजाचा "शिवाजी" ला असलेला छुपा विरोध हे दिले होते. खरेखोटे माहीत नाही. पण माझ्या माहितीत तरी "शिवाजी जोशी", "शिवाजी लेले" किंवा "शिवाजी देशपांडे" आढळात नाही. पण जसा "शिवाजी" नाही, तसा सांप्रत काळी कुणी "बाजीराव जोशी", "बाजीराव लेले" किंवा "बाजीराव देशपांडे" देखिल आढळात नाही. अर्थात आमचे मर्यादीत वर्तुळ हे देखिल त्याचे एक कारण असू शकेल. पण त्यामुळं ब्राम्हणात "शिवाजी" नाव नसायचं कारण काहीतरी वेगळं असणार असे आमचे एक ठाम मत आहे. कदाचित ब्राम्हण समाजाला "शिवाजी" या नावाबद्दल इतका जास्त आदर असू शकतो, कि जोपर्यंत आपले "कारटे" त्या योग्यतेचं काम करत नाही, तो पर्यंत त्याला "शिवाजी" म्हणून हाका मारणं त्यांना संयुक्तिक वाटत नसावे.
"हनुमंतराव" किंवा "मारोतराव" हे असेच एक भारदस्त नाव आहे. हे नाव धारण करणारा माणूस हा घणघणीत तब्बेतीचा आणि भारदस्त आवाजाचा असावा ही एक माफक अपेक्षा असते. बऱ्याच वेळेला, या "हनुमंतरावांचा" किंवा "मारोतरावांचा" जन्म देखिल हनुमान जयंती किंवा राम नवमी या दिवशी झालेला असतो. तेव्हा आपले अपूर्ण राहीलेले पैलवानकीचे स्वप्न आपले चिरंजीव पूर्ण करतील, अशा आशेने वडिलांनी, काकांनी नाहीतर मामांनी यांचे नाव, "हनुमान", "हनुमंत", "जांबुवंत" किंवा मारुती" असे शक्तीचे आराध्य दैवत असणारे असे ठेवलेले असते. पण पुढे मग त्या मुलाच्या एकूण कर्तबगारीला अनुसरून, त्याचे एकतर, "हनुमंतराव", "मारोतराव" होते किंवा मग सरकारी आॅफिसातून आरोळ्या ऐकू येत राहतात "मारूती, ती चौदा नंबरची फाईल घेऊन ये" किंवा शेताच्या बांधावरून हुकूम सुटतात की "हणम्या, ए हणम्या रं, बैलं सोड गड्याभाऊ!!". अर्थात या "मारूती" किंवा "हणम्या" चे क्वचित प्रसंगी, त्यांच्या मुलाच्या किंवा पुतण्याच्या लग्नात, मानपानाला धरून, मुलीकडची मंडळी मांडवात असे पर्यंत, अचानक "मारोतराव" किंवा "हणमंतराव" होत असतात. पण तो त्यांचा मूळ पिंड नसल्याने, परत संध्याकाळी मिरवणूक संपली की कुणीतरी सांगत येतो की "मारत्या पिऊन गटारीत पडलय" म्हणून!! असे घनगंभीर नाव धारण करून, ते नाव सार्थ करून दाखवणारे, "खासदार जांबुवंतराव धोटे" किंवा "हिंदकेसरी पैलवान मारुतीराव माने" अशी उदाहरणे फारच कमी दिसतात.
"राजा" या नावाचाही मराठी मनावर चांगलाच पगडा आहे. राजा गोसावी, राजा परांजपे यांनी एक काळ खरेच "राजा" सारखा गाजविलेला आहे. जयसिंगपूरात एका वक्तृत्व स्पर्धेसाठी राजा गोसावी, प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. इतर वक्ते राहीले राहीले बाजूला. राजाभाऊंनी पहिल्या वाक्यात सभा जिंकून टाकली. म्हणाले, " नमस्कार मंडळी, मी राजा गोसावी. म्हटलं तर राजा नाहीतर गोसावी"..इतकी राजस वृत्ती राजाचीच असायची.
"शरद" या नावाचीही मराठी माणसाला भारी हौस. या नावाला जातीचे वावडे नाही. तळवळकर, जोशी, पवार, पाटील असा यत्र-तत्र-सर्वत्र असा वावर आहे. बर ही सगळी मंडळी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात आभाळाएवढी मोठी आहेत. त्यांनी या नाम महात्म्यात भरच घातली आहे.
"रघुनाथ" या नावाची तऱ्हा थोडी वेगळी आहे. वास्तविक हे पुर्ण पुरुषोत्तम असलेल्या प्रभू रामचंद्राचे नाव आहे. त्यामुळे ते सर्वात जास्त प्रचलित असायला काहीच हरकत नव्हती. आता उद्या कोणी असेही म्हणेल की राम क्षत्रिय होता. म्हणून ते नाव ब्राम्हणात ठेवत नाहीत. परंतु मधल्या पेशवाईच्या काळात प्रत्यक्ष थोरल्या बाजीरावांच्या पुत्राने, राघोबादादानी हे नाव धारण करून त्याला एक वेगळेच महत्व प्राप्त करून दिलेले दिसते. ज्या मराठ्यांच्या गादीचा आपण अभिमान बाळगतो, तिचे, "मराठेशाही" मधे रूपांतर करायचे श्रेय, खरे तर बाजी-रघुनाथ या पिता-पुत्रांचे! त्यातही जरीपटका अटकेपार गेला तो तर प्रत्यक्ष रघुनाथरावांच्या अंबारीवरून!! इतका मोठा पराक्रम केल्यावर मराठी घराघरातून एक तरी रघुनाथ दिसायला हवा होता. पण कदाचित नंतर च्या पेशवाईच्या पडत्या काळात एकानेक कारणांमुळे कदाचित या नावाचा करिष्मा संपत गेला असावा.
"गोपाळकृष्ण" या नावाची गंमत वेगळीच आहे. वास्तविक गोपाळ हे विशेषण असून कृष्ण हे नाम आहे. पण "कृष्ण" पेक्षा "गोपाळ" हे निदान महाराष्ट्रात तरी अधिक प्रचलित आहे. कृष्णाचे जरासे ग्राम्य रूप "किसन" असे असले तरी "किसना" मधून कृष्णाचा खट्याळ, लडिवाळ चेहरा दिसत राहतो. या उलट "गोपाळ" नाव धारण करणारी मंडळी, लवकरच "गोपाळराव" पदाला पोचतात असेही एक निरीक्षण आहे.
मागे मी एका बॅंकेत गेलो होतो. तिथल्या शिपायाचं नाव होतं "दशरथ". हा "दशरथ" अतिशय डिमांड मधे होता. क्षणाक्षणाला त्याला हाका सुटत होत्या. "दशरथ, ते फॅारेन एक्सचेंज चे लेजर आण.", "दशरथ, या पासपोर्ट च्या दोन काॅपीज काढून आण", "दशरथ, ते डेबिट कार्ड चे रजिस्टर घेवून ये", "दशरथ, साहेबांना पाणी आण.", "दशरथ ८ नंबर वर थोडी कॅश आणून दे.". माझ्या ३० मिनिटांच्या वास्तव्यात, अगणित वेळा "दशरथ" या नावाचा पुकारा झाला. माझे ऊर अभिमानाने भरून आले. अनेक कामे लिलया पार पाडत, "इदंम् न मम" असा निर्विकार चेहरा करून झेराॅक्स मशिनपाशी उभा राहून काॅपीज काढणारा "दशरथ" पाहून मला त्याचा अपार अभिमान वाटला. ज्या महान व्यक्तीचे नाव त्याने धारण केले होते, त्या प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या वडिलांपेक्षा तो मला कर्तबगार वाटू लागला.
रामचंद्रांच्या वडिलांनी, रथात केवळ उभे न राहता, या बॅंकेतल्या दशरथाप्रमाणे, अखंड सावधानता दाखवली असती, तर कदाचित त्यांना, शत्रुचा वेढा पडला नसतां. कैकेयीची मदत घ्यावी लागली नसती. मग तिला वर द्यावे लागले नसते. त्या वरांमुळे प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला नसता. भरतावर कसलेही राजकीय आणि सामाजिक दडपण आले नसते. लक्ष्मणाचा संसार सुखाचा झाला असता. सीतेला रावण पळवून नेऊ शकला नसतां. कदाचित रामाची आणि सुग्रीवाची भेट झालीच नसती. त्यामुळे कदाचित आपल्याला हनुमान, जांबुवंत वगैरे कोण हे कळले देखिल नसते. त्यामुळे कुणीही त्यांच्या मुलाचे नाव "मारोती" किंवा "हनुमंत" ठेवलेही नसते. त्यामुळे अशा सर्व "मारोती" आणि "हनुमंत" यांचे, नावापुढे "राव" लावण्याच्या जीवघेण्या खटपटीतून कायमची सुटका झाली असती. विचार करू तेवढा थोडाच आहे.
मागे कानपूर का लखनौमधे पोलिसांनी एका पाकीटमाराला पकडल्याची बातमी वाचली. त्यात त्या पाकिटमाराचं नाव होतं, "दिलीप गुप्ता"!! मोठी गंमत वाटली. प्रभू रामचंद्रांचे एक महापराक्रमी पूर्वज होते त्यांचे नाव होते "दिलीप"...आणि भारतवर्षातली छोटी छोटी स्वतंत्र राज्ये संघटीत करून त्यांचे गणराज्य स्थापन करणारे राजघराणे होते "गुप्ता".. प्रत्यक्ष आर्य चाणक्यानी ज्याला शिकवून अखंड भारत वर्षांचा सर्व सत्ताधीश सम्राट केले, त्या चंद्गगुप्ताचे हे "दिलीप गुप्ता" वंशज!! या अशा, एक महान नाव धारण केलेल्या "दिलीप गुप्तांची" नव्या सरकार दरबारी नोंद एक पाकीटमार म्हणून होणे, हे समाजाच्या अधोगतीचे व्यवच्छेदक लक्षण नाही काय?
हे म्हणजे जिल्हे इलाही, माबदौलत, सल्तनत-ए-हिंद, शहेनशाह अकबर यांच्या सहाव्या किंवा सातव्या पिढीतील "इसरत बेगम" किंवा "फातिमा बेगम" नावाच्या सुनेने, लाल किल्ल्याच्या बाहेर वडा-पावची गाडी चालवण्यासारखेच आहे.
वास्तविक अमेरिकेला वावडे असलेल्या गोष्टींचा यादी खूपच छोटी आहे. पण त्यात "ॲडाॅल्फ" हे अगदी वाळीत टाकण्यात आलेले नाव आहे. हे नाव अमेरिकेत धारण करायला कायदेशीर बंदीच आहे. ठीकच आहे. ज्याच्या उच्चाराने लाखो माणसांच्या कत्तलीचे स्मरण होते, असले नाव ठेवायची गरज ही नाही. भारतात "नथुराम" या नावाचे देखिल हेच झाले असावे. वास्तविक सीताराम, राजाराम, सावळाराम, जलाराम तसेच नथुराम हे पण एक राम नामच..पण या राम नामाने "हे राम" चे महत्व वाढवून स्वत:चा शेवट ओढवून घेतलेला दिसतो.
अमेरिकेत येवून राहीलेल्या भारतीय, त्यातल्या त्यात मराठी लोकांमधे, कुठले कुठले संस्कृत शब्द, नाव म्हणून ठेवायची स्पर्धा लागलेली दिसते. ह्या संस्कृत शब्दांचा उच्चार थोडासा वेगळ्या पद्धतीने केला की एखादे इंग्रजी नाव वाटावे याची देखिल खबरदारी घेतलेली असते. परवा एका भारतीय मुलीची आई तिला "हे डियाना", "हे डियाना" म्हणून हाक मारत होती. आम्ही न राहवून आश्चर्याने आणि कौतुकाने, मुलीचे शुद्ध इंग्रजी नाव ठेवल्याबद्दल त्या बाईंचे अभिनंदन केले. त्यांवर त्या बाईनी आम्हाला वेड्यातच काढले. त्यांनी "डियाना" हा संस्कृत शब्द असल्याचे सांगून, हल्ली कसली कसली "असंस्कृत" माणसे अमेरिकेत येतात असा झणझणीत कटाक्ष टाकला (म्हणजे मराठीत "लूक दिला"). मी संपूर्ण शरणागतीनं त्यांना त्याचा अर्थ विचारला तर म्हणाल्या की, "तिचं खरं नाव की नाही "ध्याना" आहे. पण आम्ही सगळे तिला "डियाना" च म्हणतो. वाटतय की नाही अमेरिकन?" आम्ही चाटमचाट!! प्रश्न फक्त असा पडला होता की या अमेरिकन मराठी मुलीने "ध्याना" होण्यासाठी मेहनत घ्यायची की "डियाना"?
"सिद्धार्थ" चे "सिद" झाले आहेत. "विक्रम" चे "विकी" झाले आहेत. "अशोक" चे "एशाॅक" झाले आहेत. या मुलानी देखिल नेमके कोणाकडे पहात मोठे व्हायचे हा प्रश्नच आहे.
अामचे एक स्नेही, अर्थात संस्कृत, मराठी आणि इंग्रजी भाषा कोविद!! त्यांनी त्याच्या मुलाचे नाव ठेवलय "व्यास". ते ऐकून मला भरून आले. मत्स्यकन्येचा मुलगा, पुढे मोठी दाढी, जटा वगैरे वाढवलेले, "व्यासंग" हा शब्द ज्यांच्या नावामुळे तयार झाला असे विद्वान पुरूष, वेदमूर्ती माझ्या डोळ्यांसमोर आले. आणि अचानक आतल्या खोलीतून वहीनींचा आवाज आला की "अरे व्यास चे डायपर संपत आले आहेत. आज काॅस्टकोत जावेच लागेल."
३२,००० फुटांवर असताना आमचे कल्पना विश्व, "व्यासांचा डायपर" नामक पक्षाला धडकून, अचानक जमिनीवर आदळले. मग पुढे "व्यास आता रात्री दर ३ तासांनी उठतो", "व्यासला आम्ही एनफामिलचा फाॅर्म्युला देतो", "व्यासला शाॅट द्यायचे आहेत", "अले लब्बाड, व्याशू!!", "व्यासचे केस किती लांब आहेत", "अगं व्यासला ओकी झाली वाटतं" वगैरे वाक्ये ऐकू येत होती. पण त्याचे काहीही वाटायचे बंद झाले होते.
याहून गमतीचा प्रकार म्हणजे आमचे दुसरे स्नेही, हे देखिल, संस्कृत, मराठी आणि इंग्रजी कोविद!! (अमेरिकेचा विसा मिळवला की देशी लोक या किमान तीन भाषात आपोआप कोविद होतात.) तर त्यांनी त्यांच्या बछड्याचे नाव ठेवले आहे "भीष्म"!! ते ऐकून, आणि आमचा "महर्षी व्यासांचा" पूर्वानुभव लक्षात घेऊन, पितामहांचे डायपर, पितामहांच्या शी-शू करण्याच्या वेळा वगैरे मौलिक चर्चा सुरू होण्याआधीच तिथून लगोलग सटकलो.
परंतू सांप्रत काळात यातल्याच एखाद्या "आरव मुनींचे", "महर्षी व्यासांचे" किंवा "पितामह भीष्मांचे", चि. सौ. कां. "डियाना" हीज बरोबरच्या शुभ-विवाहाची निमंत्रण पत्रिका कधी पहायला मिळते याची उत्कंठा लागून राहीली आहे.

No comments:

Post a Comment