Sunday, June 18, 2017

बटाटा

बटाटा हा या पृथ्वीतलावरील एक चमत्कार आहे असे आमचे मत होत चालले आहे.
जावा, बाली, सुमात्रा बेटापासून, रशिया, चीन, या सारख्या खंडप्राय देशांपर्यंत तसेच रवांडा, युगांडा, नायजेरिया, अल्जिरीया करत करत इंग्लंड, अमेरिका आणि आॅस्ट्रेलिया सारख्या विकसीत देशात देखिल मनुष्य मात्राच्या भुकेला धावून येण्याची बटाट्याची स्पृहा हि केवळ अवर्णनीय आहे.
इतक्या वेगवेगळ्या भूभागातल्या माणसांच्या ठेवणीत मुलभूत फरक आहे. तापमान वेगळे आहे. राहणीमान वेगळे आहे. भूगोल वेगळा आहेच पण त्यांचा इतिहास देखिल वेगळा आहे. त्याच्या आवडी-निवडी वेगळ्या आहेत. एका भूभागात रोज खाल्ले जाणारे प्राणी दुसऱ्या देशात अगदी निषिद्ध आहेत. आता कुठे सापाची सोल कढी करून खातात तर कुठे झुरळाचे लोणचे!! याच पृथ्वीतलावर कुठेना कुठे कासव आणि ससा दोघेही माणसाच्या पोटातच जात आहेत. कुणीही शर्यत जिंकली तरी!! कुठे कुठे तर चांगल्या तांबड्या मुंग्या जिवंतच कचा कचा चावून खातात. आधी मुंग्या आपल्याला जिभेला चावतात. मग आपण त्यांना चावायचे. डेलिकसी...दुसरे काय?
याच्या अगदी विपरीत परिस्थिती इतर ठिकाणी असते. अशा ठिकाणी "अभक्ष", "अखाद्य" किंवा "अब्रम्हण्यम्" अशा सदरातली भली मोठी यादी असते. काही काही ठिकाणी तर उच्छवासातल्या गरम हवेने, हवेतले अदृश्य कीटक मरू नयेत याची देखिल काळजी घेतली जाते. देवा-नारायणाला, पशु-पक्षांच्या इतक्या जाती-जमाती तयार करून झाल्यावर, करायला काही शिल्लक राहिले नसावे. म्हणून मग त्याने माणसा मध्ये जाती, प्रजाती, धर्म वगैरे तयार करायचा प्रोजेक्ट सुरु केला असावा.
तर अशा सगळ्या विसंवादी अन्नसंस्कृती मधे आपली मळकट, मातकट साल आणि पांढरट पिवळसर गर घेऊन, यत्र-तत्र-सर्वत्र हा बटाटा मोठ्या आत्मविश्वासानं संचार करतो आहे.
बऱ्याच वेळेला बटाट्याला कांद्याच्या बरोबरीने स्थान दिले जाते. बाजारात किंवा मंडई मधे बहुतेक वेळेला एकच बागवान, कांदे आणि बटाटे एकत्र विकताना दिसतो. फुले मंडई पासून ते अगदी वालमार्ट मधे देखील कांदे आणि बटाटे एकत्र विकायला ठेवलेले असतात. घराघरातून देखिल कांदे आणि बटाटे एकाच बुट्टीत नाहीतर टोपलीत ठेवले जातात.
ज्या मुलाला काहीही येत नाही, त्याच्या डोक्यात देखील कांदे आणि बटाटे एकत्र भरलेले असतात असा एक गैरसमज आहे. ते तसे का? हे मात्र कळायला मार्ग नाही. इतकेच नव्हे तर हा बटाट्यावरील जातीय अन्याय आहे असे आमचे मत आहे. या दोन भाज्यांचा जन्म जमिनीखाली झाला आहे एवढे एकच साम्य त्यांच्या मध्ये आहे. परंतु एखाद्याच्या जन्मस्थळावरून त्याची जन्मभराची पात्रता आणि योग्यता ठरवावी आणि ती पिढ्यांपिढ्या टिकावी हे अन्यायकारक आणि दु:खदायक आहे.
वास्तविक बटाटा हे एक पूर्णान्न असून त्याची सांस्कृतिक, वैचारिक आणि अध्यात्मिक पातळी हि कांद्याहून पूर्ण पणे वेगळी आहे. बटाटा हा सर्वस्वी आपपरभावातून मुक्त झालेला आहे. टर्की सोबत येणारा, ग्रेव्ही मध्ये आकंठ बुडालेला मॅश पोटॅटो हा देखील, साबुदाण्याच्या खिचडीतून विखुरलेल्या आणि शेंगदाण्याच्या कुटाने माखलेल्या बटाट्याच्या तुकड्यांइतकाच आनंददाई असतो. गरम बटाट्याच्या भजीची जितक्या प्रकर्षाने आठवण होते तितक्याच प्रकर्षाने मॅकडोनाल्ड मधल्या खारट fries ची देखील अवचित आठवण होते.
कोल्हापूरच्या बसस्टँड वरच्या भजीच्या गाडीवाल्याचा संसार जितका या बटाट्यावर अवलंबून आहे तितकाच मॅकडोनाल्डच्या मालकाचा संसार देखील या fries वर अवलंबून आहे. किंबहुना असे म्हणतात कि मॅकडोनाल्डने जर fries बंद केल्या तर त्यांचे valuation एका रात्रीत अर्ध्यापेक्षा कमी होईल. पेप्सी सारख्या जागतिक ख्याती असलेल्या कंपनीला त्यांच्या अंध:कारमय भवितव्यात बटाट्याचाच आधार वाटतो आहे. वर्षानुवर्षे अनेकानेक "अमृततुल्य" रसायने विकून झाल्यावर, आता एकामागून एक, बटाट्याच्या चिप्स तयार करणाऱ्या कंपन्या, विकत घेण्याचा सपाटा पेप्सी कंपनीने लावला आहे. या साक्षात्कारातच बटाट्याच्या अफाट लोकप्रियतेची आणि सामर्थ्याची प्रचिती यावी.
अशा जागतिक ख्याती असलेल्या बटाट्याची कांद्या बरोबर होणारी तुलना आणि त्यायोगे होणारी फरफट खेदजनक आहे. वास्तविक कांदा हा लसूण या उग्रट प्रवर्गातील आहे. त्याचे वागणे बऱ्याच वेळेला Rightist वाटते. कांद्यावर सूरी फिरवली असता, जमेल तितका प्रतिकार तो करतो. सुरीची दिशाभूल करणे, "चर चर" असे आवाज काढणे या सर्व क्लृप्त्या करून झाल्यावर, शेवटी आपला पराभव अटळ आहे अशी जेव्हा त्याची खात्री पटते, तेव्हा सुडाने आणि द्वेषाने कांदा पेटून उठतो आणि त्याच्या लपलेल्या विषाच्या कुप्या कापणाऱ्याच्या डोळ्यात फवारतो. कदाचित कापणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आल्याने तो आपल्याला कापणे थांबवेल असा त्याच्या मागील विचार असावा. इतके प्रयत्न करून देखील जेव्हा कांद्याला माणसाच्या मुख गुहेत चिरविश्रांती साठी पाठवले जाते, तिथे देखील त्याच्या रागाचा, द्वेषाचा आणि सूडाचा दर्प पुढे बराच काळ रेंगाळत राहतो. हे अतिशय दुष्ट आणि सूड बुद्धीचे लक्षण आहे.
याच्या तुलनेत बटाट्याचे वागणे अत्यंत संयमी आणि धीरोदात्त असते. बटाट्यातून सूरी फिरत असताना मुळात बटाट्याकडून कसलाही विरोध होत नाही. कुठेही मरणभयाने अश्रुंचे बांध सुटत नाहीत. जणू कापणाऱ्याच्या हाताला कसलीहि इजा न होवो असाच प्रामाणिक संकल्प बटाटा सिद्धीला नेत असतो.
बटाट्याचे पदार्थ देखील अत्यंत मवाळ, लडिवाळ आणि रसाळ असतात. बरीच स्थळे पाहून जेव्हा मुलीचे लग्न जमत नाही तेव्हा मुलीची एखादी चतुर आत्या नाहीतर मावशी पुढच्या स्थळाला बटाटे पोहे करायचे सुचवते. बाजूला बटाट्याच्या चिप्स नाहीतर बटाट्याचे तिखटा-मिठाचे वेफर्स ठेवते आणि बघता बघता लग्न जमवून टाकते. याचे जन्माचे श्रेय मात्र त्या आत्या नाहीतर मावशीला फुकट मिळून जाते आणि बटाट्याला फक्त जावई क्षुधानिवारणाचे पुण्य!!
हे जसे लग्नात, तसाच प्रकार अगदी युद्धात देखील होतो. लढाईवर जाताना सैनिक खिशातून उकडलेले बटाटे नेतात. वेळ प्रसंग काही सांगता येत नाही. एखाद्या ठिकाणी किती दिवस थांबावे लागेल ते ठाऊक नाही. अशा वेळी हे सैनिक बटाट्यावर कित्येक दिवस काढतात. अचानक एखाद्या वेळी शत्रूची गोळी लागून म्हणा कि अपघाताने म्हणा, तो सैनिक बेशुद्ध झाला कि लगेच बाकीचे लोक नाकाला कांदा फोडून लावतात. मग सैनिक शुद्धीवर आला कि पुन्हा त्याचे श्रेय कांद्याला!!
वास्तविक या कांद्याने जसे कपणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे तसेच त्याने अनेक वेळेला त्याला तयार करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यातही पाणी आणले आहे. पोती-पोती कांदा रस्त्यावर फेकून द्यावा लागला आहे तर कधी कधी पिशवी भर पैशे देऊन खिशातून कांदे आणायला लागले आहेत. आजवर असा बेभरवशी पणा बटाट्याने एकदाही केल्याचे आमच्या ऐकिवात नाही. याला देखील बटाट्याची "मा कश्चित दु:ख भाग भवेत" हि वैचारिक बैठक कारणीभूत असावी असे आमचे मत आहे.
बटाट्याचे माणसावर इतके प्रेम आहे, कि खाणाऱ्या मध्ये तो पूर्ण समरसून जातो. खाणारा देखील आपल्या सारखाच दिसावा अशी त्याची आंतरिक तळमळ असते. पण त्याच्या या प्रामाणिक तळमळीचा, मुळातच काही इतर कारणां मुळे बटाट्या सारखी दिसणारी लबाड माणसे त्यांना सोयीचा अर्थ लावतात. त्यांच्या बटाटा सदृश रुपड्याचा बोल ते बटाट्याला लावत असतात.अशा लोकांचे शरीरं बटाट्यासारखे ओबडधोबड आणि बेडौल असून त्यांचे मन कांद्या दुष्ट आणि सूडकरी असते.
अशाच लबाड लोकांनी, त्यांची थेरे चालवण्यासाठी "कांदे नवमी" सारखे भेदभाव सुरु केले आहेत. यावर तातडीचा उपाय म्हणून "बटाटे शुद्ध षष्टी" आणि "बटाटे कृष्ण षष्टी" लगोलग चालू करावी असे आम्हास वाटते.
पिढ्यांपिढ्या जमिनीखाली वाढून अखिल मानव जातीचे केवळ हीत इच्छिणाऱ्या बटाट्याचा तो उचित सन्मान होईल असे आम्हास वाटते.
लेखनसीमा

No comments:

Post a Comment