Tuesday, April 9, 2019

पु. ल. - देवाघरचे देणे

पु. ल. - देवाघरचे देणे
~ निखिल कुलकर्णी
महाराष्ट्र साहित्य परिषदे कडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या साहित्य पत्रिकेत जानेवारी-मार्च त्रैमासिक अंकात माझा पु. ल. देशपांडे यांच्यावरचा एक लेख प्रकाशित झाला आहे. हा माझ्या साठी मोठाच सन्मान आहे. मराठी भाषेचा एक मानदंड असलेल्या या प्रकाशनात, मराठी भाषेच्या सगळ्यात लाडक्या लेका विषयी मला लिहू देण्याची संधी दिल्याबद्दल साहित्य परिषदेचे मुख्य संपादक डॉक्टर पुरुषोत्तम काळे, तसेच निवड समितीचे इतर सन्माननीय सदस्य यांचा मी ऋणी आहे. तो लेख इथे देत आहे.
सोबत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अंकाची प्रत देखील जोडत आहे.
सोमवार, १२ जून २०००, संध्याकाळी ऑफिस मधून घरी परत येत होतो. तेव्हा मी फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर राहायचो. आणि संध्याकाळच्या बिबवेवाडीहून दुचाकी चालवत येणे हा काही फारसा सुखाचा मामला नसायचा. वैताग, त्रागा, राग, अशा सगळ्या भावनांचं एक विचित्र मिश्रण डोक्यात तयार झालेलं असायचं. अनंत वाहने, त्याहून जास्त स्पीड ब्रेकर, सगळी कडे भरून राहिलेला धूर, वाहने गप्पा मारत आहेत असे वाटावे इतके अव्याहत हॉर्न, चालणारी माणसे, मधेच थांबणाऱ्या रिक्षा, PMT, त्यांचे फाटलेले पत्रे, अखंड चेहरा रुमालाने बांधून घेऊन त्यावर गॉगल चढवून पाठीवर बाळाऐवजी कॉलेजची सॅक लावून बाणासारख्या तडक निघालेल्या लक्ष्मीबाईच्या लेकी, हे सगळं चुकवत, ऐकत, धडकत यायचं म्हणजे अगदी नको होत असे. त्याच्यात त्या वेळेला फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता हे दुहेरीच होते. त्यामुळे त्याच्यावर अखंड दुतर्फा वाहनांचा नद थांबलेला असे. तर त्या दिवशी मी गुडलक चौकापाशी पोचलो. तिथे भयंकर गर्दी दिसत होती. गाड्या सर्व बाजूनी थांबलेल्या होत्या. बरेच पोलीस शिपाई, इन्स्पेक्टर वगैरे उभे होते. माझं घर अगदी हाकेच्या अंतरावर आलं असताना आता अचानक काय झालं या विचारानं भयंकर अस्वस्थ व्हायला झाले होते. गर्दीच इतकी होती कि गाडी हलवणे देखील अशक्य होते. शेवटी एक पोलीस मामा तिकडे चालत आले त्यांना काय झाले ते विचारले. त्यांनी जे उत्तर सांगितले ते ऐकून धक्काच बसला. बाजूच्या प्रयाग हॉस्पिटल मधे पु ल गेले काही दिवस ऍडमिट होते. ते आज गेले. एक अत्यंत सुन्न करणारी घटना होती. गाडी बाजूला लावून अंत्यदर्शन घेणे पण शक्य नव्हते. ज्या माणसाचे मराठी भाषेवर अलौकिक प्रेम होते आणि तितकेच किंवा त्याहून थोडे जास्तच मराठी भाषकांचे ज्यांच्यावर प्रेम होते असा एक अवलिया श्वास आज थांबला होता. काय बोलावं.. सुन्न होऊन बॅरिकेड मधून दवाखान्यात काही दिसतंय का ते बराच वेळ पाहत बसलो होतो. अशी घुसमट पहिल्यांदाच झाली होती.
मराठी भाषा समृद्धच आहे. लेकुरवाळी आहे. तिला कितीतरी सर्वमान्य आणि लोकोत्तर अशी साजरी अपत्य आहेत. अगदी मुकुंदराज, माउली पासून सुरु होत, एकनाथ, तुकोबाराय, समर्थ, छत्रपती, शंभूराजे, लोकमान्य, स्वातंत्र्यवीर असे करत करत खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा, नेमाडे यांनी त्यांच्या मायेची श्रीमंती वर्धिष्णूच ठेवलेली आहे. पण इतकं सगळं उदंड वैभव असून देखील असून तिचा सगळ्यात लाडका लेक मात्र पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडेच असावा असं एक मला वाटत आलेलं आहे. आपापल्या क्षेत्रात पारंगत असलेल्या मोठ्या-मोठ्या भावंडामध्ये, सरस्वतीच्या बहुतेक सगळ्या आविष्कारात मनसोक्त संचार करून देखील, देवळातली घंटा वाजवणाऱ्या बापाच्या धोतराचा सोगा ओढून पळून जाणाऱ्या पोराइतकं निरागस राहिलेलं हे शेंडेफळ, माय मराठीलाच काय पण ती भाषा कळणाऱ्या प्रत्येकालाच लाडकं आणि अगदी आपल्या घरचंच वाटत आलेलं आहे. त्यांच्या विषयी मी खरं तर काय लिहावं हा प्रश्नच आहे. माझी ती पात्रताच नाही. तरी त्यांच्या साहित्याचा एक सामान्य वाचक म्हणून चार शब्द लिहिण्याची आगळीक करत आहे.
साहित्य, कला, संगीत, नाट्य, अभिनय, दिग्दर्शन, कथाकथन, वक्तृत्व या सगळ्या क्षेत्रातला त्यांचा समर्थ आणि तितकाच सहज वावर पाहिला कि हा एकच मनुष्य होता यावर विश्वास बसणं कठीण आहे. एक अत्यंत बहू आयामी आणि तरीही तितकंच निगर्वी माणूस माझ्या तरी माहितीत नाही. पु ल नी मराठी भाषेला दिलेल्या प्रत्येक गोष्टीची मराठी मनाला भुरळ पडलेली आहे. मग त्यांचे वाऱ्यावरची वरात असो, बटाट्याची चाळ असो किंवा अपूर्वाई/पूर्वरंग असो , जसच्या तसं चित्र शब्दातून उभं करण्याची त्यांची हातोटी अद्वितीय आहे. यातले विनोद हे कालातीत आहेत. त्यांना कुठल्याही वेळेचं, काळाचं, कुठल्या बातमीच किंवा इतर कशाचच बंधन नाही. अमेरिकेतले शेक्सपिअरचे थडगे असो कि बाळ-गोपाळांनी रंगवलेला 'दारू म्हणजे काय रे भाऊ' चा फार्स असो. समाजातल्या अनिष्टतेवर आणि व्यंगावर बोट ठेवून, खपली न काढता अलगद उपचार करण्याची किमया पुलं इतकी कुणाला साध्य झाली असेल असे मला तरी वाटत नाही.
रंजन हे खरं तर कलाकाराचे पहिले ध्येय असले पाहिजे. लोकांना तुमचं आवर्जून ऎकावं, वाचावं, पाहावं असं वाटायला हवं. तरच ते ऐकतील, वाचतील आणि पाहतील. आणि मग त्यातूनच पुढे तुम्हाला एक विचारवंत म्हणून जे सांगायचे आहे ते तुम्ही सांगितले तर ते त्यांच्या पचनी देखील पडते. म्हणजे एका अर्थाने रंजन हे साध्य जरी नसले, तरी जे साध्य करायचे आहे त्याच्या साठी साधन म्हणून रंजनाचा मोठया खुबीने उपयोग करत आला पाहिजे. आणि तो पु लं नि अतिशय सार्थपणे केलेला आहे. किंवा तो कसा करता येऊ शकतो याचा दंडकच घालून दिलेला आहे असेच म्हणावे लागेल.
पुलं चं असा मी असामी असो,अंतू बर्वा असो कि नारायण असो, सामान्य माणूस खिळून जातो. मनमुराद हसत जातो. मन लावून ऐकत जातो. आणि अचानक 'ते गुरुदेव हाय नी, ते हिमालय मंदी एक टांग वर करून तप करते' च्या रूपाने हळूच एक विचार मनात उतरतो. अंतू बर्वा जेव्हा थोट्या पांडूचा उल्लेख करतो, तेव्हा मनातल्या मनात काहीतरी टोचत राहतं. नवऱ्या मुलीला निरोप देणारा नारायण डोळ्यापुढे दिसू लागतो आणि त्याचे इंग्रजी ऐकून हसावं कि रडावं तेच सुचत नाही. खान साहेबांच्या सतारीवर जीव ओवाळून टाकणारे रावसाहेब आपल्या समोर जिवंत होऊन उभे राहतात. त्यांचं "जिम्या भडव्या ये कि तिच्या XXX" हे प्रत्यक्ष ऐकू यायला लागतं. मी आणि माझा शत्रुपक्ष मधला कुलकर्णी आणि त्याच्या पुढे हातात वीट घेऊन उभे असलेले पुल दिसू लागतात. गुलमर्गचे फोटो बघताना ते घोडं आणि त्या घोड्यावर बसलेल्या यजमानीण बाई दिसू लागतात. हसू येतच. यायलाच हवं. पण आपण काय करू नये याची बारीकशी जाणीव देखील होऊन जाते. आणि ती कायमची लक्षात देखील राहते. हा एक प्रकारचा संस्कारच आहे.
उगाचच कुणीतरी नागपूरचा माणूस भेटल्यावर आता हा संत्री खायला नागपूरला कधी बोलावतो याची वाट पाहिली जाते. कुठल्याही पानपट्टी वर गेल्यावर तिथे कुठे तो चित्रांनी भरलेला आरसा दिसतो का ते नकळत पाहिले जाते. तिथे गेल्यावर, खुद्द वैकुंठाला निघालेल्या श्रीकृष्णाला देखील न मिळणाऱ्या तंबाखूची महती प्रकर्षाने जाणवते. कुठल्याही पारशाला बोलताना पाहून पेस्तनजीच दिसू लागतो. कुठल्यातरी लग्नात गेल्यावर तिथला नारायण कोण हे आपण शोधू लागतो. आणि नकळतच मग त्याच्या पोराला उगाचच एखादी आईसक्रीमची कांडी नाहीतर एखादे चॉकलेट घेऊन द्यावेसे वाटू लागते. एखाद्या थकलेल्या म्हातारबुवांना पाहून हरितात्या आठवतात. मग त्यांच्याशी दोन गोष्टी बसून बोलाव्याशा वाटतात. पायाला हात लावून नमस्कार करावासा वाटतो. बेळगाव, लेडी सिटारीस्ट, मांडी खाजवणारा तब्बलजी, उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका, मुलाला मारलेली मास्टर शंकर हि हाक, नानू सरंजामे आणि त्याची मी झोपतो करून हिमालयाची उशी, लग्नाला जातो मी म्हणणारा नारद, मी आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला म्हणणारा गटणे, दुसऱ्या बाजीरावाचे हस्ताक्षर किंवा या एकदा.. दाखवीन मजा, कोटाचे माप घेणारा शिंपी,काबुलीवाला, ऋग्वेदी आजोबा, इकडून तिकडे जाणारी दोस्त राष्ट्रांची विमाने, हाय अल्ला ये उर्दू से बचाव, अर्जुनाला कशाला पाठवला? साला कंडम माणूस किंवा पोलीस नाहीतर काय चोर हाय?, प्रेमलताबाई सद्रे, ढोशा कडक भाजना, चितळे मास्तर, एका हौदालाSSS, यमी पेक्षा दहापट गोरी ह्या अशा घटना, पात्रे आणि संवाद वेळी-अवेळी आठवत राहतात. जगाच्या कुठल्याही पाठीवर वेगवेगळ्या रूपात भेटत राहतात. आयुष्याच्या अनेकानेक प्रसंगातून काळवंडून गेलेल्या मनाचा एक मोठाच मोठा कप्पा हि पात्रे निरागस करत राहतात.
आइनस्टाइन त्याच्या सेमिस्टरच्या शेवटच्या तासाला मुलांना एक प्रश्न विचारायचा कि तुम्ही गेल्या वर्ष-सहा महिन्यात माझ्या विषयातलं काय शिकलात म्हणून. मुलं काही काही उत्तरे द्यायची. अमुक सूत्र शिकलो, तमुक प्रमेय शिकलो वगैरे. मग आइनस्टाइन त्यांना सांगायचा कि ती सगळी माहिती झाली. शिक्षण नव्हे. त्याची शिक्षणाची व्याख्या मोठी विलक्षण होती. तो सांगायचा कि, "यावर्गात आपण जे शिकलो त्यातलं बहुतेक सगळं तुम्ही पुढच्या वर्षभरात अगदी ठार विसरून जाल.आणि त्याच्या नंतर देखील जे तुमच्या लक्षात राहील आणि ज्याचा तुम्ही प्रत्यक्ष वापर कराल ते तुमचे शिक्षण!!"...शिक्षणाच्या या व्याख्येने बघितलं तर आज वयाच्या चाळीशीत देखील इयत्ता दुसरीत असताना कॅसेट प्लेयर वर ऐकलेली म्हैस आठवते. रावसाहेब आठवतात. नारायण आठवतो. आणि मन नकळत हळवं होऊन जातं. एखाद्या लेखकाने, फनकाराने अजून काय द्यायचे असते समाजाला?
पुल हे मला तरी मराठीतले सांता क्लॉज वाटतात. भली मोठी पांढरी शुभ्र दाढी, लाल भडक कपडे, तसलीच साळढाळ टोपी, तुंदिलतनु आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याचे "हो हो हो" करून मोठमोठ्याने दिलखुलास हसणे..यातल्या प्रत्येक गोष्टीत एक निरागसता आहे. सांता क्लॉज प्रत्यक्ष आहे कि नाही ते ठाऊक नाही. पण त्याच्या असण्याची कल्पना देखील त्याच्या इतकीच निरागस आहे. तो ख्रिसमसच्या आदल्या दिवशी रात्री बरोबर १२ वाजता घराच्या धुराड्यातून आत येतो. वर्षभर चांगल्या वागलेल्या मुलांसाठी खाऊ, खेळणी, कपडे ठेवतो. ग्लास भर दूध पितो. आणि आल्यापावली त्याच्या रुडॉल्फ नावाच्या लाल नाकाच्या रेनडिअरच्या गाडीत बसून निघून देखील जातो. कुठून तरी देवाघरून येतो. आणि कुठे तरी देवाघरी परत जातो.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या, ख्रिस्तमस ट्रीच्या खालची खाऊ, खेळणी आणि कपडे धावत जाऊन घेताना आणि रिकामा झालेला दुधाचा ग्लास बघताना हरकून गेलेल्या डोळ्यातून त्याची निरागसता मात्र ठेऊन जातो. तेच त्याचं चिरायू अस्तित्व..
लेखनसीमा
~निखिल कुलकर्णी

No comments:

Post a Comment