Monday, September 24, 2018

ओढ

ओढ
~निखिल कुलकर्णी 

विश्वाच्या काळवंडलेल्या गर्भगृहात, विश्वाची निर्मिती करणाऱ्या पुरुने मुक्त हस्ताने बहाल केलेले उषेचे अमूर्त तेज घेऊन, अनंत अस्तित्वाचे आत्मरुप होत, बेभान होऊन अनिमिषपणे चमचमणाऱ्या, पृथेच्या य:कश्चित दिनकराहून सहस्त्र पटीने प्रदीप्त अशा शुभ्रधवल तेजोनिधीला, त्या दिवशी उल्का होण्याची ओढ का वाटली असावी? 

दूर कुठेतरी मायेच्या अथांगात, आत्मभान हरवून स्वतःशीच भरकटत, क्षीणशा, दुय्यम वाटावे अशा तेजाने, तांबूस पिवळसर दिसणाऱ्या लोहगोलाच्या भोवती एकलग प्रदक्षिणा काढत बसलेल्या त्या निळसर, ओलसर, वेडगळ पृथेत, त्या महान तेज:पुंजाने काय पाहिले असावे? तेजोमय अहंकाराची राजस वृत्ती कायमची सोडून द्यायला लावणारा, अवकाशाच्या अथांग पोकळीतला अनभिज्ञ आणि आत्मघातकी प्रवास त्या नभोत्तमाला ठाऊक नसेल काय? नक्षत्रांच्या स्वर्गीय रांगोळी मधले स्वत:चे अढळ स्थान कायमचे सोडून देऊन पृथेच्या भेटीला जाताना होणाऱ्या अतिउष्ण तलखीची त्याला कल्पना आली नसेल काय? या प्रवासात वाटेत जागोजागी थांबलेले काळ्याकुट्ट मायेचे लोट, त्याचे स्वतंत्र आणि स्वयंप्रकाशीत तेजाचे अस्तित्व आपल्या चिकटलोळ पदरांनी कायमचे झाकोळून टाकतील याची त्याला यत्किंचीतही तमा वाटली नसेल काय?

कदाचित त्याने कधीतरी ब्राम्हमुहूर्तावर आपल्याच अन्हिकात रमलेल्या पृथेवरचे प्राजक्ताचे महादान पाहिले असावे. आकाशातल्या इवल्या इवल्या दहिवराच्या साकळलेल्या थेंबांनी, पाकळी-पाकळी गहिवरून आलेला, अहम विसरून, एकटाच धरेकडे झेपावणारा भाबडा प्राजक्त त्याने साक्षेपी नेत्रांनी पाहीला असावा. संपूर्ण अस्तित्व ज्या मायेने दिले तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहात, अलगदपणे विलग होऊन, आपल्याच पाकळ्यांचे पंख करत, जमिनीवरच्या चंद्रस रांगोळीतला एक कण म्हणून अजरामर होण्याची प्राजक्ताची अलौकिक ओढ त्याने अनुभवली असावी. स्वत:चे अहंमन्य अस्तित्व संपवून, पृथेच्या पार्थिवावर असंख्य प्राजक्तांनी एकच एक होत घातलेली पांढरी तांबडी पाखर त्याला भावली असावी. आणि मग जन्मापासून मोक्षा पर्यंतचा, तो, केवळ काही पळांचा कृतकृत्य, एकमग्न, मनस्वी प्रवास त्या नभश्रेष्ठास आकाशातल्या तेजोमय अनंत अढळतेहून श्रेष्ठ भासला असावा.

ओढ वैश्विक आहे..

~निखिल कुलकर्णी


No comments:

Post a Comment