Saturday, August 18, 2018

अटलजी

अटलजी
~ निखिल कुलकर्णी 

अटलजी गेले. एक असामान्य नेता, वक्ता, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, कवी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हृषीकेशाच्या गंगे इतका स्वच्छ राजकारणी गेला. वय आहे. आजारी होते. कधीतरी जाणार होते हे मान्यच आहे. पण कुठे तरी मानाचा एक भला थोरला कप्पा रिकामा झाल्यासारखे वाटते आहे. नेमकं काय हरवलंय ते कळत नाही. 

त्यांची पहिली सभा मी ऐकली तेव्हा मी चौथीत होतो. मिरजेच्या अमर खड्ड्यात त्यांची सभा झाली होती. प्रचंड गर्दी, आकाशाला भिडलेले मातीचे लॉट, अटलजींचे मिरज जंक्शन वरचे भव्य स्वागत, रस्त्या रस्त्यांवर अशोक खटावकरनी रात्र रात्र जागून स्वत:च्या हाताने रंगवलेले मोठे मोठे कट आउट्स या पलीकडे फारसं काही आठवत नाही. अटलजी काय बोलले ते काही कळायचे ते वय ही नव्हते आणि ते बोलले हिंदी मध्ये. आणि तेव्हा हिंदी हि एक भाषा आहे याच्या पलीकडे दुसरे त्यातले काहीही कळत नव्हते. पण कदाचित तेव्हा जे काही प्रश्न पडले त्या प्रश्नांनी या नेत्याची माझ्या मनाने तेव्हा पासूनच एक उंचच उंच अशी प्रतिमा रंगवायला घेतली असावी. नंतर मग घडत गेलेल्या प्रत्येक घटनेने त्या प्रतिमेत रंग भरत गेले असावेत. 

इंदिरा गांधी गेल्याची बातमी रेडिओवर ऐकली होती. तो प्रसंग अजून हि जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. गांधी वधानंतर झालेल्या बेफाम जातीय दंगलीचा आणि लुटीचा अनुभव पाठीशी असल्याने गल्लीतली कर्ती माणसे एकमेकांना "इंदिराजींची हत्या कुणी केली?" हा प्रश्न परत परत विचारून खात्री करत होती. पोलिसांच्या गाड्या गल्लीच्या चौका-चौकात उभ्या होत्या. घरांचे, वाड्यांचे दरवाजे कडेकोट बंद झाले होते. खिडकीचे दरवाजे किलकिले उघडून आम्ही रस्त्यावर काय चालू आहे याचा अंदाज घेत होतो. रस्त्यावर शुकशुकाट होता. मधेच एखादी पोलीस गाडी जायची तेवढीच काय ती हालचाल. शेवटी रात्री खूप उशिरा जेव्हा कुणी खून केला याची पक्की बातमी रेडिओवरून आली, तेव्हा लोकांच्या जीवात जीव आला. बाजीरावाच्या देशात आणि पटवर्धनांच्या गावात ब्राह्मणांना जीव मुठीत धरून जगायची वेळ आणणाऱ्या सरकारांचे, त्यांच्या पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण मूळ मुद्दा माहितीचे प्रसारण किती तोकडे होते हा आहे. कशाचा कशाला धरबंध नव्हता.      

नंतर मग देखण्या राजीव गांधींचा शपथविधी झाला. याच्या नंतर कधीतरी गल्लीत TV आला होता. वासू काका बोडसांच्या घरी अक्खी गल्ली, पोरे बाळे घेऊन रोज संध्याकाळी TV  बघायला जमायला लागली. चित्रहार, बातम्या, साप्ताहिकी आणि ये जो है जिंदगी बघता बघता रात्रीचे ९ वाजायला लागले. काही काही सोकावलेली मंडळी तर "चांगला आहे, चांगला आहे" म्हणून रात्री दहाचा प्रणव रॉय यांचा "The world this week" कार्यक्रम पण बघत बसायची. वासू काकाची आई कधी कधी संतापून म्हणायची कि उद्या येताना गाद्या आणि उश्या पण घेऊन या म्हणून!! एक चांगले म्हणजे तेव्हा वासू काकाचे लग्न झाले नव्हते. अर्थात पुढचा फायदा लक्षात घेऊन गल्लीतल्या जाकीट नेहरूंनी, वासू काकाला, "लग्न का करू नये?" हे पटवून दिले असावे असाही एक मत प्रवाह आहे. पण धमाल यायची. कित्येक नविन नविन गोष्टी बघायला मिळू लागल्या. माहितीचे नविन दालन नुकतेच उघडत होते. अनेक गोष्टी घडायच्या होत्या. अनेक प्रश्न पडायचे होते. अनेक उत्तरे मिळायची होती. 

हळू हळू मग नाना महाजनांकडे TV आला. मग पटवर्धनांकडे TV आला. आणि मग बघता बघता TV घेण्याची स्पर्धा सुरु झाली. नंतर कधीतरी आमच्याही तीर्थरुपांना आपल्याकडे TV नसल्याने आपले चिरंजीव गावात वरावरा हिंडत असतात असे वाटून असेल कि काय पण मग आमच्या पण घरी एकदाचा TV आला. मग त्याला लाकडाची केस काय, त्याच्या वर टाकायला कसला कसला काशिदा काढलेले फडके काय, काही विचारायची सोय नाही. मग मधूनच ते चित्र हलायला लागायचं. मग कौलावर चालून तो अजस्त्र अँटेना हलवणे, खालून कुणीतरी "आलं आलं" असं ओरडे पर्यंत मग ते फिरवत राहायचं. आणि सगळं करून खाली आलो कि वर परत एक कावळा जाऊन बसायचा कि खाली परत सगळे नेते, क्रिकेटर, सलमा सुलताना वगैरे जगच्या जागी नाचायला लागायच्या. पण त्यांना परत सरळ करायचा हट्ट फार मोठा होता. त्यावेळेला मला कावळ्यांचा फार राग यायचा. तर या TV  ने घरी बातम्या आणल्या. हिंदी भाषा आणली. माझं तर असं मत आहे कि जर तेव्हा TV आला नसता, तर मराठी लोकांना पण आज तामिळ्यांना जेवढी हिंदी येते तेवढीच हिंदी आली असती. तर हिंदी भाषेची ओळख करून गोडी लावल्या बद्दल खरे तर वासू काकाचे आणि TV चे आभार मानायला हवेत. मग पुढं या हिंदी भाषेनेच आपण केवढ्या मोठ्या देशाचे नागरिक आहोत याची जाणीव करून दिली. हि भाषा जिथे बोलली जाते तिथले नेते हे संपूर्ण देशावर कसे गारुड करतात याची ओळख व्हायला लागली. मग त्यातूनच पुढे व्ही पी सिंग, बुटासिंग, ग्यानी झैलसिंग, गुलाम नबी आझाद (हे गृहस्थ चंद्रशेखर आझाद यांचे नातेवाईक आहेत असेच मला वाटत आले होते. पण ते नातेवाईक नसून त्यांचे चंद्रशेखर आझादांशी नाते वाईट आहे हे नंतर TV पाहूनच कळत गेले.),  एन डी तिवारी, चंद्रशेखर, इंदर कुमार गुजराल, एल के अडवाणी हि नावे ऐकू यायला लागली. आणि मग व्ही पी सिंगांचे सरकार आले. त्यांची ती फरची टोपी, चष्मा, जयपुरी कोट काय रुबाबदार माणूस होता! त्यांच्या बातम्या, त्यांचे वर्तमान पत्रातले फोटो, सत्तेत येण्यासाठी आणि आल्यावर ती टिकवण्यासाठी त्यांची अद्वितीय धडपड, सगळेच अद्भुत वाटत होते. मग त्यांनी राखीव जागांचा मंडल आयोग लागू केला. त्याची प्रतिक्रिया म्हणून तरुण मुले मुली आत्मदहन करायला लागली. हे सगळेच इतके दाहक होते कि कधी कधी हे सर्व आपण का पाहिले असेही वाटते. TV  ने हि सगळी परिस्थिती अगदी घरात आणून ठेवली. एकच चॅनेल लागायचे. त्यामुळे मुले बघताहेत म्हणून चॅनेल बदलायचा प्रश्न नव्हता. आणि भरीस भर म्हणून रिमोट नसल्याने प्रत्यक्ष उठून TV  बंद करायला लागायचा. त्यामुळे न जाणो TV  बंद करताना अँटेनाच्या वायर ला धक्का लागला तर परत TV लागायचाच  नाही या भयाने लोक एकदम रात्री सगळे कार्यक्रम संपल्यावर, मुंग्या दिसायला लागल्यावरच TV बंद करत असत. 

तेव्हा जे दिसेल ते सर्व बघणे हा एकच पर्याय होता. त्यामुळे इच्छा असो नसो हा सगळा देशी लोकशाहीचा अफलातून अविष्कार बघायला मिळाला. आज काय व्ही पी सिंग पंतप्रधान होते. मग त्यांनी कुणावर तरी कसले तरी कॅमेरे लावले. आणि मग त्यांचा पाठींबा गेला. मग अचानक त्यांच्या जागी चंद्रशेखर पंतप्रधान झाले. हे म्हणजे थोडेसे "ये ग साळू, दोघी लोळू" सारखं चाललं होतं. मग आम्ही गल्लीत एकेक पंतप्रधान आणि त्यांच्या बोलण्याची नक्कल करायचो. एवढंच नाही पण गोट्या खेळताना ज्याच्यावर तंगीचा डाव यायचा, त्याचा "व्ही पी सिंग" झाला असे म्हणण्या पर्यंत आमची मजल गेलेली होती. अहो हातात, पुठ्ठयाचे कव्हर घालून आणि गळ्यात म्हशीचे कासरे गुंडाळून, गल्लीतून अमिताभ बच्चन च्या "शहेनशहा" सारख्या फिरणाऱ्या आम्हाला TV ने राजकीय पात्रे पण आमच्या विश्वात आणून ठेवलीच होती.

त्याच्या नंतर परत एकदा आक्रीत झालं. एका सभेत राजीव गांधी गेले. अर्थात यावेळी TV ने चांगलेच बाळसे धरले होते. तीन तीन भाषांतून दिवसातून दोन तीन वेळा बातम्या मिळत होत्या. पण याचा परिणाम असेल कि काय पण ते जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे पर्यंत कुठल्याही दलाची डाळ अजिबात शिजली नाही. आणि पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले. मला हा माणूस विलक्षण आवडायचा. एक तर अत्यंत संयमी, धीरगंभीर असे व्यक्तिमत्व होते. आणि ते कुणाचे तरी पुत्र, नातू, पणतू होते म्हणून पंतप्रधान झालेले नव्हते. शिवाय त्यांना १३ भाषा अस्खलित बोलता यायच्या. त्यांच्या महाराष्ट्रातल्या सभेत ते कित्येक वेळेला मराठीत बोलायचे. TV वर ते पाहताना अचंबा वाटायचा. आता आमच्या ओठांवरती पण काळी रेघ दिसायला लागली होती. वर्गात कोण आधी दाढी करतो याची चुरस लागायला लागली. 

आणि त्याच वेळेला अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्रश्नाची धग वाढत गेली. आडवाणीनी रथ यात्रा काढली. तिला इतका अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला कि देश ढवळून निघाला. ती रथयात्रा  जनता दल "इ" का "फ" वाल्यानी बिहार मध्ये अडवली (हे जनता दलदलीतून नंतर मग म्हशीचा चारा खाल्ला म्हणून तुरुंगात जाऊन आले. काय चुकून खाल्ला कि मागचा जन्म आठवला देव जाणे!!). मग तर काय अजूनच प्रकरण चिघळले. देऊळ बांधायचा घोष चालूच होता. त्याच्यात "रथ सोडा" च्या आरोळ्या पण सामील झाल्या. आमच्या गावात एक रामाचे देऊळ होते. पण आमच्या पैकी कुणी फारसे तिकडे फिरकत नसे. आमच्या गावात रामापेक्षा दत्ताची आणि गणपतीची चलती होती. रामाच्या देवळाची फुटलेली कौले देखील बदलायला पैसे मिळत नसत. देवळाचे पुजारी राम नवमीच्या आधी गयावया करून वर्गणी गोळा करत. तेवढ्या एक दिवशी देऊळ गजबजून उठे. पुढे पुजारी जाणोत आणि खुद्द राम जाणोत.. पण अचानक लोक राम भक्त व्हायला लागले. कारसेवेच्या नावाखाली पैसे जमा होऊ लागले. आणि अचानक रेल्वे भरून भरून माणसे अयोध्येला जायला लागली. कल्याण सिंग, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, झालच तर कुठल्या कुठल्या साध्वी जोरजोरात भाषणे देऊ लागल्या. गल्लोगल्ली एकच ध्यास दिसू लागला "अयोध्या"! मी तर म्हणतो कि प्रत्यक्ष भगवान राम, राज्य करत असताना देखील भरतखंडाला अयोध्येची एवढी आस लागली नसेल. याच्या मध्ये जे प्रत्यक्ष कार सेवेला चालले होते किंवा जाऊन आले होते ते कार सेवेला न जाणाऱ्या लोकांकडे इतक्या तुच्छतेने पाहत कि त्या माणसाला त्याच्या पुरुषत्वाचीच  शंका यावी. आणि मग तो हि लगोलग "तिकीट कसे काढायचे" वगैरे चौकशी करायला लागायचा. गर्दीने जे करायचे ते सगळे पुढे केलेच. पण हे सगळं होत असताना दोन माणसं मात्र पहाडासारखी अविचल होती. एक होते देशाचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि दुसरे अटलजी.. रावांचे एक समजू शकतो कि ते सत्तेत होते. पण अटलजींनी एकही भडकावू भाषण केले नाही. कसल्याही घोषणाही दिल्या नाहीत. उलट ते वेळोवेळी संयमाची आठवण करून देत होते. त्यांच्या पक्षातील काही लोकांना कदाचित ते आवडले नसेलही. पण माझ्या या नेत्याच्या चित्रात मात्र वेगळेच रंग भरत गेले. त्याच्या नंतरच्या प्रत्येक घटनेने या माणसा बद्दलचा माझा आदर वाढत गेला. मग त्यांच्या कवितांची पुस्तके साहित्य संमेलनातून विकत घेतली. एकाहून एक कविता. 

बाधाएँ आती है आये, 
धीऱे प्रलय की घोर घटाये 
पावों के नीचें अंगारे,
सीर पर बरसें यदि ज्वालाएं 
निज हाथों में हंसते हंसते,
आग लगाकर जलना होगा |  
कदम मिलाकर चलना होगा | 

हास्य रुदन में, तूफानों में, 
अमर असंख्यक बलिदानों में, 
उद्यानों में, वीरानों में ,
अपमानों में, सम्मानों में, 
उन्नत मस्तक, उभरा सीना 
पीड़ाओं में, पलना होगा | 
कदम मिलाकर चलना होगा | 
उजियारों में, अंधकार में, 
कल कछार में, बीच धार में, 
घोर घृणा में, पूत प्यार में,
क्षणिक जीत में, दीर्घ हार में, 
जीवन के शत शत आकर्षक,
अरमानो को दलना होगा | 
कदम मिलाकर चलना होगा | 
 
काय स्थितप्रज्ञता आहे!! हातात निखारे असतील, पायाखाली निखारे असतील. मित्रा पण आपल्या साठी एकच मार्ग आहे चालत राहण्याचा.. आणि ते देखील हसत हसत.. कुणी तुझी निंदा करतील.. कुणी तुझी स्तुती करतील. अपमान होतील. सन्मान होतील. विजय होतील आणि पराजय हि होतील. पण मित्रा आपल्याला फक्त चालत राहायचं आहे आणि ते देखील ताठ मानेने आणि वाघा सारखी छाती काढून! 
 
हे एखादया राजकीय पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरचा नेता सांगतोय याच्यावर मुळात माझा विश्वासच बसेना. मग मी अजून वाचत गेलो. केवढा दुर्दम्य आत्मविश्वास आहे, केवढी अविचल वृत्ती आहे, केवढा ध्येयवाद आहे..प्रत्येक माणसाला जगताना एक तरी आदर्श लागत असतो. माझा तो शोध नुकताच संपला होता.
 
मंदिर बांधायचे ठरत नव्हते. पण मशीद मात्र पडली होती. मशीद पडली तेव्हा मला तरी वैयक्तिक रित्या थोडे वाईटच वाटले होते. काळाने केलेल्या सम्राट बाबराच्या नामुष्कीची आणि पराभवाची एक अस्सल निशाणी आपण आपल्या हातानी पुसून टाकली असे मला वाटले होते. मग त्यानंतर मुंबईच्या दंगली झाल्या. मग मुंबईचे 
बॉम्ब स्फोट झाले. 

हत्तीच्या टकरीमध्ये कुठला हत्ती जिंकतो ते माहित नाही. पण मोडलेल्या फांद्यावरची चिमण्यांची घरटी मात्र अधांतरी होतात हे मात्र नक्की. अनेक संसार मोडले. अनेक वस्त्या उद्ध्वस्त झाल्या. अनेक चिमुकली अनाथ होऊन वाटेला लागली. काही कायमची आंधळी पांगळी झाली. युद्धच कशाला हवंय, पण मला तरी प्रत्येक संघर्षात आणि रक्तपाता मध्ये Tolstoy स्वत:च मरतो आहे असेच वाटत आले आहे. तर ते एक असो. 

पण त्याच्या नंतर देशात राजकीय चक्रे गतिमान झाली. आणि भारतीय जनतेने भारतीय जनता पक्षाला लोकसभेत सर्वात मोठा पक्ष बनविला. त्याचे नेते म्हणून अटलजींची पंतप्रधान म्हणून निवड झाली. मला अतिशय आनंद झाला. एक अत्यंत हळव्या अशा कवी मनाचा, सर्वाना बरोबर घेऊन पुढे जाण्याची मानसिकता असलेला, स्वच्छ प्रतिमेचा नेता, देशाचे नेतृत्व करणार होता. अतिशय मनापासून आनंद झाला होता. अगदी किती आनंद झाला होता हेच मोजायचे झाले, तर वाजपेयी पंतप्रधान होणार या खुशीत आम्ही आणि आमच्या समस्त रिकामटेकड्या मित्रानी Walchand Engineering College च्या बाहेरच्या चहा गाडीवाल्याची, त्याचं नाव "मंज्या" होतं, तर त्याची सगळी, म्हणजे सगळी, गेल्या सहा-आठ महिन्यांची उधारी, एका दमात फेडून टाकली होती. अतिशय आनंद!! आता देशात परत एकदा कायद्याचे राज्य येणार. कायद्यासमोर सर्व समान असणार. समाजातल्या सर्व घटकांना समान संधी मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवीन सरकार पाकिस्तान वर अणू हल्ला करून पाकिस्तान बेचिराख करणार. पण मग तसे झाले तर पुन्हा भारत पाकिस्तान क्रिकेटच्या मॅच कशा होणार? असा पण एक प्रश्न चर्चेला येऊन गेलेला होता. या आणि अशा विचाराने आम्ही सातव्या अस्मान मध्ये मुक्कामाला गेलो होतो. वयच ते होतं. पण एक नक्की कि आमच्यातल्या प्रत्येकाला तो स्वत:च पंतप्रधान झाल्यासारखा भास होत होता. त्यात भरीस भर म्हणजे महाराष्ट्रात देखील वर्षानुवर्षे बसून बसून पुठ्ठ्यावर खुर्चीचे छाप उठलेल्या खादीतल्या पांढऱ्या बगळ्यांना देखील पब्लिक ने घरी बसवले होते. संघर्ष यात्रा, जोशी-मुंडे सरकार, प्रमोद महाजन, नितीन गडकरी.. वाह!! आता बारामतीत देखील सांगली सारखे लोड शेडींग मुळे दिवस दिवस दिवे जायला लागणार, या कल्पनेने तरअंगावर रोमांच आले होते. एन्रॉनचा प्रकल्प बुडवण्यासाठी मुंडे साहेब तो प्रकल्प समुद्रापर्यंत नेणार कसा? असे काही अनुत्तरित प्रश्न होते, नाही असं नाही. पण प्रत्येक दिवस म्हणजे असा उत्साहाने रसरसून भरूनच उगवत होता. सकाळी उठल्यावर काय करू आणि काय नको असे व्हायचे. एका युगाचा अंत झाला असे खात्रीने वाटत होते. 

पण हा आनंद एक आठवडाभरच टिकला. त्याच्या नंतर बातमी आली की जरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी देखील त्यांच्या कडे बहुमत सिद्ध करण्यासाठी लागतील इतके खासदार नाहीत. आता काय करता येईल हा मोठाच प्रश्न होता. तेवढ्यात कुणीतरी मंज्याचे पैसे द्यायची एवढी घाई करायची जरुरी नव्हती, असाही एक मुद्दा मांडला. पण हा घाव जिव्हारी लागलेल्या एका गणूने त्याला लगोलग, इथे राष्ट्राच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आणि तुला चहाच्या उधारीची काय पडली आहे अशा आशयाचा दम भरून विषय तिथेच संपवला. अटलजींचे सरकार कसे वाचवता येईल? याचा सगळ्यांनाच पेच पडला होता. कुणी कुणाशी फारसे बोलेना. तरी एक चांगले म्हणजे महाराष्ट्रातले युती सरकार भक्कम उभे होते. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार अशीच आमची भावना होती. त्यात बाळासाहेब काहीतरी जादू करतील असेही वाटायचे. आमच्यातल्या कुणाचाही कुठल्याही राजकीय पक्षाशी कसलाही संबंध नव्हता. त्यामुळे आम्हाला काय वाटावे हे आमचे आम्हीच ठरवत असू. तर शेवटी एकदा तो दिवस आलाच ज्याची सगळ्यात जास्त भीती वाटत होती. अटलजींनी राजीनामा दिला. जो तो आपल्या वाटेने निघून गेला. हाता तोंडाशी आलेली आणि एवढ्या महत्प्रयासाने मिळवलेली सत्ता अशी कसल्या तरी तांत्रिक कारणाने जावी हे म्हणजे पेपरात सगळी गणिते बरोबर सोडवून देखील केवळ नावात खाडाखोड केली म्हणून नापास होण्यासारखे होते. त्या रात्री मंज्याच्या गाडीवरची संसद निपचित झाली होती. 

त्याच्या नंतर दिल्लीत जो निर्लज्ज प्रकार झाला त्याने तर मला आज हि संताप येतो. अटलजींसारख्या एका देखण्या, सज्जन, ज्ञानी माणसाला, अत्यंत दुःख देऊन तुम्ही बाजूला काढलत. आणि आणलं कुणाला तर देवेगौडांना? तेव्हा पासून, न्यायासारखी सत्ता देखील आंधळी असते यावर आमचा अगदी गाढ विश्वास बसला. तो अजून उतरलेला नाही. मग पुढे बहुतेक त्या सकलविद्यामंडित, मदनरूप  अशा  देवेगौडांनी कुणालातरी रागवलेलं असावं. एक तर ते कानडी अप्पा. त्यांनी साधं "काय कस काय चाललंय?" असं जरी विचारलं कानडीतून, तरी समोरचा खजील होऊन टकामका बघायला लागतो. त्यात या बुवांना झोपेचं भारी वेड! जिथे जातील तिथे झोपत. दोन भाषणांच्या मध्ये तर ते झोपतच. पण एकाच भाषणाच्या दोन वाक्यात देखील झोपत असावेत असाही एक प्रवाद होता. तर अशा गृहस्थाबद्दल "बोलले असतील झोपेत एखाद दुसरा शब्द" म्हणून दुसर्यांनी तरी सोडून द्यायचं कीं नाही? तर नाही.. ते अडून बसले. जे झोपेत सुद्धा बोलणार नाहीत असे बुवा गादीवर बसवा म्हणाले. मग लागला इंदर कुमार गुजरालांचा नंबर. हे गृहस्थ काय बोलले हे अजूनही एक कोडंच आहे. किंबहुना ते पंतप्रधान असताना "देश चालवायला खरेच पंतप्रधान लागतात का? आणि नसले तर काय होईल?" यावरही एक परिसंवाद झालेला आठवतो आहे. 
त्यांची दाढी मात्र मला अतिशय आवडली होती. पण तशी दाढी आपण ठेवली तर मंज्याच्या गाडीवरचे "संसदीय सहयोगी" आपल्याला "गुजराल" म्हणतील या विचाराने ती ठेवता पण येईना. पण एकूण हा आमच्या साठी एक अत्यंत दुःखद असा कालखंड होता. मग ते इंदर कुमार पण गेले आणि मग सगळी लोकसभाच बरखास्त करून टाकली. पण या राजकारणी लोकांच्या "मला नको. तुला पण नको. घाल कुत्र्याला." या वृत्तीचा अतिशय संताप आला होता. देशाचा पैसा वापरून हा काय गोरखधंदा चालवला आहे असे आमच्या सारखेच देशातल्या जवळ जवळ प्रत्येकालाच वाटले असावे. जमेची बाब एवढीच होती कि अटलजी १३ दिवस का होईना देशाचे पंतप्रधान झालेले होते. घोर घृणा में, पूत प्यार में, क्षणिक जीत में, दीर्घ हार में, कदम मिलाकर चलना होगा | 

आता नव्या निवडणुकाआल्या. परत एकदा प्रमोद महाजनांची तोफ चौफेर धडाडू लागली. ममता, समता, जयललिता सगळे एका झेंड्याखाली एक आले. "अटलजी आदी.. आता लै झाली खादी" असल्या घोषणा आम्ही पण तयार केल्या होत्या. अर्थात त्या दिल्या नाहीत हे हि खरेच आहे. पण निकाल लागला.  जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे पर्यंत सगळे भुई सपाट झाले. आणि अटलजी परत एकदा पंतप्रधान झाले. मागच्या खेपेचा अनुभव लक्षात घेऊन पानपट्टीवाल्या स्वामीची उधारी लगोलग देण्याचा मोह सर्वानी मिळून टाळला होता. देशातल्या विरोधी पक्षांवरचा, त्यांच्या उद्दिष्ठावरचा विश्वास सर्वात कमी झालेला होता. कधी काय भानगडी करून परत अटलजीना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतील याचा काही नेम नव्हता. अटलजी हे भारतीय मनाचा मानबिंदू झालेले होते. आणि त्यांना विरोध करणारे गुन्हेगार! शेवटी सहा महिन्यांनी सगळे व्यवस्थित चालले आहे असे बघून परत एकदा स्वामीची उधारी फेडण्यात आली. देर हैं अंधेर नही.. अयोध्या तो झाकी है,  काशी मथुरा बाकी हैं वगैरे नव्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या. माझ्या पोटात गोळा आला होता. एक अयोध्येचं नाव काढलं तर इथं रामायणापेक्षा मोठं रामायण झालं. आता हे लोक काशी मथुरा म्हणू लागले. मनात म्हटले कि हे काही बरोबर नाही. आम्ही मनातच म्हणायचे. पण त्या बाईंच्या डोश्याच्या पिठात कुणी कणिक घातली काय ठाऊक, पण अचानक जयललितानी बोट बदलली. परत एकदा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आणि अटलजींना परत राजीनामा द्यावा लागला. 

मध्ये एकदा अटलजी पुण्याला आले होते. फर्गुसन कॉलेज मध्ये त्यांची सभा होती. त्यावेळी अपक्ष म्हणून कलमाडी उभे होते आणि त्यांना भाजप ने पाठिंबा दिला होता. मला फार वाईट वाटले होते. कारण एक तर दुसरे उमेदवार होते अविनाश धर्माधिकारी. आता अविनाश धर्माधिकारी यांच्या सारखा स्वच्छ चरित्राचा, तरुणाईचा आदर्श असा  उमेदवार असताना खरे तर भाजप ने त्यांनाच पाठिंबा द्यायला हवा होता असे मला अगदी मनापासून वाटले होते.पण तसे व्हायचे नव्हते. सभेला प्रचंड गर्दी होती. मैदान तुडुंब भरले होते. मुंगीला देखील शिरायला जागा नव्हती. जबरदस्त पोलीस बंदोबस्त होता. मला मिरजेची सभा आठवली. इतकी वर्षे निघून गेली. इतके पक्ष आले आणि गेले. इतक्या घटना झाल्या. इतके नेते होऊन गेले. प्रश्न बदलले. लोकांचे राहणीमान बदलले. पण गर्दीने अटलजींची पाठ कधी सोडलीच नाही. 

रिवाजा प्रमाणे कलमाडींनी त्यांच्या सुस्पष्ट मराठी (?) मध्ये त्यांचे निवडणूक चिन्ह "घडियाल" म्हणून सांगितले. त्याच्यावर अटलजींनी त्यांना सावरून घेत, "मंडळी, हि हिंदी मधली घडियाल नाही.. मराठी मधले घड्याळ" म्हणून सांगितले आणि एकाच हशा पिकला. त्यांच्या भाषणात त्यांनी अविनाश धर्माधिकारी यांना देखील अत्यंत सन्मानाने त्यांचा उल्लेख करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. आपण एकाच ध्येयासाठी काम करतो आहोत. मग वेगवेगळे आणि एकमेकांशी लढण्यात काय हशील आहे असा प्रश्न देखील त्यांनी विचारला होता.अर्थात झालेही तसेच.. तेव्हा कलमाडीही पडले आणि धर्माधिकारी सुद्धा!!  मोठ्यांचं मोठेपण हे दुसऱ्यांना मान देण्यात असतं हे अटलजींकडून शिकावं. हास्य रुदन में, तूफानों में, कदम मिलाकर चलना होगा | 

पण मेलं कोंबडं जाळाला अजिबात भीत नाही. नंतर परत निवडणुका झाल्या आणि या वेळेला मात्र स्पष्ट बहुमत घेऊन अटलजी पंतप्रधान झाले. या सगळ्या मनस्ताप देणाऱ्या प्रकारात त्यांची लोकसभेतील भाषणे TV वर पाहाणे  हा एक अत्यंत नितांत सुंदर असा अनुभव असे. ते त्यांच्या विरोधकांना देखील इतक्या आर्ततेने, मैत्रीच्या नात्याने  विनवणी करत आणि न्यायाची आणि सत्याची बाजू उचलून धरायची विनंती करत कि आमच्या तर डोळ्यात पाणी यायचे. आणि असले जबरदस्त मुद्देसूद भाषण ऐकून सुद्धा त्याचा स्वतः:वर काहीही परिणाम होऊ न देणारे समोर बसलेले काँग्रेस आणि  जनता दल "अ", "ब", "क", "ड", "इ", "ह", "च", "फ", "ग" वगैरे ची मंडळी अत्यंत रडीचा डाव खेळत आहेत याची खात्रीच पटली होती. मला तर वाटतंय अटलजी या प्रत्येक पराभवाच्या वेळेला खचून न जाता उलट कणभर जास्त उत्साहाने उसळून येत होते. उन्नत मस्तक, उभरा सीना,पीड़ाओं में, पलना होगा । कदम मिलाकर चलना होगा |     

एवढा सगळा खटाटोप यांनी का केला याचं उत्तर पुढच्या पाच वर्षात मिळालं. पोखरण मध्ये दुसरी अणुचाचणी करून राष्ट्राची शस्त्रसिद्धता सिद्ध केली. अशी तुलना करू नये पण अमेरिकेच्या उपग्रहांना चकवून हे काम घडवून आणणं हे अधिक कठीण काम होतं. एका बाजूला दिल्ली लाहोर बस सेवा सुरु करून एखाद्या पौराणिक योध्याच्या दिलदार वृत्तीनं चिवट आणि जुनाट शत्रूलाही आपलंसं केलं आणि पुढं त्याच शत्रूने आगळीक करताच त्याचा सामना देखील एखाद्या कसलेल्या सेनापतीच्या करारी पणाने केला. वरदान नहीं मांगूंगा, हो कुछ पर हार नहीं मानूंगा!!
देशात वेगवान रस्त्याचं जाळं विणायला सुरुवात केली. देशातल्या नद्या एकमेकींना जोडायला सुरुवात केली. देशाला काय काय हवंय याचा आराखडा तयार केला. आपत्ती निवारणासाठी देश पातळी वर नवी यंत्रणा उभी केली. त्यांच्याच काळात गुजरातेत दंगे झाले. त्यावेळी आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावायला देखील त्यांनी कसलाही अनमान केला नाही. नंतर मग परत एकदा सत्ता बदल झाला. मग प्रमोद जी पण गेले आणि आता अटलजी पण गेले. मंज्याच्या गाड्यावरची संसद आज पोरकी झाली. 
    
अटलजींच्या जनतेवर आणि जनतेचा अटलजींवर एक अतूट विश्वास होता. सन्मान आणि विश्वास या गोष्टी कधी मागून मिळत नसतात. त्या मिळवाव्या लागतात. जपाव्या लागतात. त्यासाठी कुठल्या पक्षाची, धर्माची आणि भाषेची  बांधिलकी लागत नाही. किंवा कुठल्या हाय कमांडचा आदेश पण लागत नाही. अशा नेत्याला एकाच वेळी देशाचं पितृत्व घ्यावं लागतं. एखादी तुरट औषधाची मात्रा एखाद्या वेळेला द्यावी लागते. एखाद्या वेळेला स्वप्नांची दुलई द्यावी लागते. कधी बागुलबुवाची तर कधी राजा राणीची गोष्ट सांगावी लागते. काळीज आभाळाएवढं करून कधी खोटी खोटी सावली देखील करावी लागते. आणि हे सगळं करताना स्वत:ची दमलेली पावलं आणि डोळ्यातलं पाणी आपल्यापाशीच ठेवून, कुंतीचा कर्ण होऊन जगावं लागतं. आपल्याच मनाशी खूप खूप बोलावं लागतं श्वास संपेपर्यंत. 

अटलजी म्हटले कि मला पुरुषसुक्तात वर्णन केलेल्या पुरुचे रूप आठवते. कधीकाळी आकाशाला भिडलेल्या धुळीच्या लोटा मधून उमटलेली हि प्रतिमा, हि खरे तर पुरुषोत्तमाची आहे हे स्पष्ट उमटू लागले आहे. त्याचे सहस्त्रशीर्ष, सहस्त्र अक्ष, ज्याने जमीन, समुद्र, आकाश आणि अंतरिक्ष व्यापला आहे आणि तरी देखील जो दशांगुळे शिल्लकच उरलेला आहे. या पुरुनेच या विश्वाची निर्मिती केली आहे. तरी देखील या विश्वाच्या समष्टीसाठी स्वत:च्या पूर्णाहुतीसाठी त्याने स्वत:लाच यद्नवेदीला बांधून घेतले आहे.
या पुरुषोत्तमाचे सामर्थ्य, महाकाय अस्तित्व आणि ते सर्वस्व वाटून टाकण्याची त्याची मनीषा आणि संयम पाहून एकच म्हणावेसे वाटते, 

वेदा॒हमे॒तं पुरु॑षं म॒हान्तम्॓ । आ॒दि॒त्यव॑र्णं॒ तम॑सः॒ पर॑स्तात् ।
तमे॒वं वि॒द्वान॒मृत॑ इ॒ह भ॑वति । नान्यः पन्था॑ विद्य॒ते‌உय॑नाय ॥

(अर्थ - मी अशा एका पुरुषाला पाहिलं आहे कि ज्याचं तेज सूर्यापेक्षा किंचित जास्तच आहे आणि हेच तेज घेऊन ज्याने अज्ञान आणि अनास्थेचा शेवट केला आहे.  या अशा तेज:पुंज पुरुषोत्तमाला केवळ ओळखण्यामुळेच मला अमर्त्य असे ज्ञान झाले आहे. आता मला मोक्षासाठी दुसरा कोणता मार्ग किंवा धर्म किंवा शिकवणीची कसलीही गरज उरलेली नाही..)

लेखनसीमा     
~ निखिल कुलकर्णी   

No comments:

Post a Comment