Monday, June 25, 2018

मेपल

मेपल

~ निखिल कुलकर्णी

Listen to "Maple" here

आज पियोरातल्या आमच्या मित्राने आमच्या पियोरियातल्या घराचे काही फोटो पाठवले. पियोरियातून काहीही आलं, एखादा फोन, ईमेल किंवा अगदी गेलाबाजार पियोरिया काउंटीचं टॅक्स भरायचं स्मरणपत्र जरी आलं, तरी मला म्हणजे अगदी त्रासलेल्या सासुरवाशीणीला माहेरगावचं माणूस आल्यासारखं वाटत आलेलं आहे. माझ्यासारख्या “मारुती छाप” माणसाला हळवं करणाऱ्या ज्या काही थोड्याच गोष्टी आहेत त्यातली पियोरीया ही एक आहे.
वास्तविक माझा जन्म आणि आयुष्यातली जवळ जवळ पंचवीस एक वर्षे तर भारतातच गेली. त्यामुळे भारतातल्या एखाद्या गावाविषयी अशी ओढ वाटणं हे अगदी नैसर्गिक आहे. मिरज, सांगली, फलटण, पुणे, बारामती, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक अशा ठिकाणी या ना त्या कारणाने छोट्या मोठ्या कालावधीसाठी राहण्याचा योग आलेला आहे. त्याने यातल्या एखाद्या गावाशी भावनिक बंध जुळलेले समजण्यासारखे आहे. त्यातल्या त्यात मिरजेच्या तर जवळजवळ प्रत्येक घराशी काहीना काही आठवण चिकटलेली आहे. कित्येक घरातले खाष्ट आजोबा, नाहीतर कशावर तरी जन्माच्या रागावून बसलेल्या, एकेकट्या म्हाताऱ्या, त्यांना दुपारच्या वेळेत बारीकशी सुद्धा झोप लागू नये यासाठी आमच्याच वयातल्या, आमच्या गुरु आणि गुरूबंधूंना सोबत घेऊन केलेल्या नानाविध क्लृप्त्या, चिंच, वड, पिंपळ अशा वेगवेगळ्या झाडावर चढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आणि एका झाडावर चढून, दोन तीन म्हाताऱ्यांना यथेच्छ त्रास देऊन, दुसऱ्या भलत्याच झाडावरून खाली उतरण्याचे आकाशमार्ग, मर्कटमार्ग म्हणू हवे तर, वगैरे आठवले की हसू येते. आणि एक एक करत एकेक आजी आजोबा गेल्याच्या बातम्या कळल्या की वाईटही वाटतं. कधीकळी माणसांनी गजबजलेले वाडे रिकामे झाल्याची कल्पनाच सहन होत नाही. मग मी मिरजेला जायचं टाळत राहतो.
सांगलीची वेगळीच तऱ्हा.. या गावातल्या सगळ्या आठवणी तरूण!! सकाळी पाच ते सहा आणि नंतर आठ ते नऊ अशा दोन शिकवण्यांच्या मधल्या वेळेत, कृष्णेच्या काठावर, शाळेतल्या ड तुकडीतल्या मुलांबरोबर केलेला अजस्त्र व्यायाम.. म्हणजे ती मंडळी व्यायाम करत आणि आम्ही नुसते बाजूला उभे राहून त्यांच्या कडे बघून उगाच खूष होत असू. म्हणजे अगदीच काही व्यायाम केला नाही असे नाही. पण त्यांच्या दहा जोरा मागे आपण एक जोर मारावा आणि उरलेल्या वेळी त्यांना प्रोत्साहन द्यावे असा प्रकार!! शाम सोनावणे, राजा मुंढे, गड्डया पवार वगैरे मंडळी म्हणजे दृष्ट लागावी अशी एकेकाची शरीरयष्टी. यातल्या शाम्याने तर पुढे, न थांबतां सलग दहा हजार जोर मारून, जगात सगळ्यात जास्त जोर मारायचं जागतिक रेकाॅर्ड केलं. त्याची गिनीज बुकात नोंद देखील झाली. एकूण मित्रसंपदा अफाट. एकतर अ तुकडीतला मुलगा, अभ्यास वगैरे असल्या क्षुल्लक बाबी सोडून, आपल्या बरोबर व्यायामाला येतो याचेच त्यांना कौतुक वाटत असणार. काय असेल ते असो. ती मंडळी पण “या पैलवान. काल दिसला नाही तालमीवर!” किंवा “परवा ऐकला तुमचा रेडीओ वरचा प्रोग्राम” वगैरे विचारत. वाह वाह, अजून काय हवे होते महाराजा!! आपण अ तुकडीत असून आपल्याला लोक “पैलवान” म्हणतात हा एक अत्यंत सुखद आणि उगाचच शंभर पटीनं आत्मविश्वास वाढवणारा असा अनुभव असायचा.
नंतर मग संध्याकाळी मारुती रोड वरची चालती बोलती प्रेक्षणीय स्थळे पाहावीत. त्यातल्या एखादीचा भाऊ कुठल्या तालमीत जातो त्याचा माग काढून ठेवावा. अशा सगळ्या अतिशय छान आणि चिरतरुण आठवणी सांगलीच्या. पण त्यातलीच काही स्थळे आमच्याच काही अ आणि ब तुकडीतल्या ढोंगी मित्रांनी आमच्या डोळ्यादेखत फूस लावून पळवून नेलेली होती. त्यामुळे न जाणो, सांगलीत गेल्यावर तिच्या त्या फसव्या राव्याची सावली हातात घेऊन ती दिसलीच तर तिचे काजळात बुडालेले चंद्र आपल्याला पाहणे जमेल का? अशा अवेळीच दाटून आलेल्या अंधाऱ्या विचाराने मी सहसा सांगलीला जायचं देखील टाळत आलेला आहे..
इतर गावांचे योग तसे अगदीच जुजबी. नातेवाईक होते म्हणून नाते होते अशातला काहीसा प्रकार. औरंगाबादमधली असंख्य थडगी आणि बुरूज, कोल्हापूरातला जुना राजवाडा आणि जाधवांची भेळ, बारामतीतली नवी MIDC आणि तिथले दृष्ट लागावी असे स्वप्नील रस्ते, फलटणातला “टिप्या” नावाचा कुत्रा असल्या छोट्या छोट्या आठवणी सोडल्या तर काही फारसं जोडून ठेवेल असं काही नाही. पुण्याची तर तऱ्हाच न्यारी. काहीएक वर्षे इथल्या समुद्रातला एक अव्यक्त थेंब होऊन दररोज गर्दीच्या काठाला धडकत राहीलो आणि एक दिवशी एका लाटेने समुद्रातून हाकलून लावले. यापेक्षा जास्त काही आठवत नाही. आणि ज्या गावात महत्वाकांक्षे शिवाय दुसरं काहीच जोपासल नाही, त्या गावाविषयी यापेक्षा जास्त काही आठवूही नये.
अशा पुण्यप्रभावातून तावून सुलाखून निघालेल्या या थेंबाने मग देशाबाहेरची अनेक गावे पाहीली. न्यूयाॅर्क, शिकागो, डेट्राॅइट, मिनीयापोलीस, अटलांटा, डॅलस, ह्युस्टन, लाॅस एंजेलिस, फिनिक्स, सॅन होजे, सॅन फ्रान्सिस्को, एकाहून एक दिपवून टाकणारी श्रीमंत गावे.. तिथल्या उंचच्या उंच इमारती, लांबच लांब सरळसोट विस्तीर्ण आणि वेगवान रस्ते, भव्य पटांगणे, नद्यांवरचे अजस्त्र पुल, सगळंच दिपवून टाकणारं! प्रत्येक गावाची तऱ्हा न्यारी. ही गावे रात्री एखाद्या सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यासारखी दिसतात आणि दिवसा एखाद्या उत्तुंग शिल्पासारखी!! प्रत्येक गावाला स्वत:चं असं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक इमारतीला तिचा इतिहास आहे. बांधणाऱ्या अभियंत्यांचं कसब लेवून एकेक भींत वर्षानुवर्षे दिमाखात उभी आहे. यातल्या एखाद्या इमारतीतल्या चाळीसाव्या मजल्यावरून खालून वाहणाऱ्या रस्त्यांवरच्या गाड्या पाहणे आणि किनाऱ्यावर बसून दुरवर तरंगणारी जहाजे पाहणे हे दोन्ही अनुभव मला तरी सारखेच वाटत आलेले आहेत. कारण या दोन्ही वेळी आपण गर्दीत असून देखील गर्दीत नसल्याचा आभास हा सारखाच आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींचं आकर्षण घेवूनच आम्ही “जगाची बौद्धीक राजधानी” सोडली होती. तेव्हा लाॅस एंजेलिस मधे होतो आणि अचानक साहेबाचा फोन आला की दोन तीन आठवड्यांसाठी पियोरियाला जायचे आहे म्हणून. ह्या गावाचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले होते. नकाशात नेमके कुठं आहे ते देखील नीट सापडले नाही. मग ते अमेरिकाच्या बर्फाळ भागांत असून तिथं जायला थेट विमान नसल्याने भयंकर वेळ लागतो असे कळले. तेव्हा “हमारे दो” नसल्याने कुठेही जायची अडचण अशी नव्हती. तरी नविन गाव, अप्रचलित ठिकाण, बर्फ या सगळ्या शंका होत्याच. तरी मी आपला “दोन तीन आठवड्यांच्या” भरवशावर हो म्हणालो होतो.
लाॅस एंजेलिस सोडले त्या दिवशी सकाळी विमानतळावर तुफान गर्दी होती. सुरक्षेच्या रांगेत थांबून राहीलो आणि दहाचे विमान चुकले. मग शेवटी काहीतरी करून दुपारी चारचे विमान मिळाले. त्याने शिकागोत पोचायला रात्रीचे बारा वाजले. मग आता तिथून रात्री पियोरियाला जायला टॅक्सी केली. त्यालाही काही माहिती नाही आणि आम्हालाही काही माहिती नाही. त्याला वाटले, असेल इथंच कुठेतरी पियोरिया म्हणून. आमचा तर पत्ताच गुल झालेला होता. टॅक्सीत झोपायला तरी मिळेल या विचाराने मी बसून होतो. हळू हळू शिकागोमधून बाहेर पडलो. रस्त्यावरचे दिवे संपत गेले. आणि मग महाकाय अंधारात टॅक्सी एकटीच चालू लागली. आमच्या शिवाय त्या अखंड रस्त्यावर कोणीही नव्हते. लांब दूरवर कुठेतरी मिणमिणते दिवे दिसायचे आणि परत अदृष्य व्हायचे. बराच वेळ झाला तरी हा प्रकार चालूच होता. मला तर ते मरतुकडे दिवे पाहून कसली अवदसा आठवली असे वाटायला लागले होते. मजल दर मजल थांबत आणि पत्ता शोधत शेवटी सकाळी चार वाजता पियोरियात पोचलो. ते झोपलेलं, “रुकडी छाप” गाव पाहून भयंकर अपेक्षाभंग झालेलाच होता. पण त्या टॅक्सी वाल्याचे बील ऐकून मी भूतो न भविष्यति हादरलो होतो. त्याने चारशे डाॅलर मागितले. जेव्हा महिन्याचा पगार चार हजार डाॅलर होता तेव्हा चारशे डाॅलरची टॅक्सी म्हणजे सायकलवरून घरोघरी जावून, सोलापूरी चादरी वगैरे विकून महिन्याकाठी शंभरेक रुपये मिळवणाऱ्या इसमाने, “हाॅटेल ताज रेसिडेन्सी” मध्ये जावून तीस रुपयाचा चहा पिल्यासारखेच होते. काही इलाज नव्हता. “रात्र के समय तुम ऐसे कैसे पैसे मांग सकते हो?” अशा आशयाचं इंग्रजी वाक्य मी त्याच्यावर फेकून बघीतलं. पण त्या घटोत्कचावर कसलाही परिणाम झाला नाही. शेवटी सगळे खिसे, पर्स, बॅगा सगळे उघडून अक्षरश: वेचून वेचून एकूण तीनशे नव्वद डाॅलर त्याला दिले. आणि “when you come to India, you will have a friend there in our form” वगैरे थापा मारून त्याला बिदा केला. पण हे करताना या राधेयाची तीनशे नव्वद डाॅलर मधे साठलेली अमोघ शक्ती संपून गेली होती हे वेगळे सांगायला नकोच.
सकाळचे पाच वाजले. सात वाजता मिटींग होती. मग न झोपता तसाच तयार झालो. पण आता काॅफी साठी देखील डाॅलर नव्हता. साहेबाला फोन केला की आपण त्याच्या गाडीत जरा मिटींगची तयारी करू वगैरे. मग तो मला घ्यायला आला. आणि मग पहिला दिवस साजरा झाला. पियोरियाने केलेले जंगी स्वागत जन्मभर लक्षात राहील असे होते.
पण हा एक दिवस सोडला तर या गावाने आमच्यावर फार प्रेम केले. “दोन तीन आठवडे” म्हणून आलेले आम्ही नंतर तब्बल नऊ वर्षे या गावात राहीलो यातच सगळे आले. बरे वाईट सगळेच अनुभव होते. पण या गावात झोप छान लागली. इथे उंच इमारती नव्हत्या. भले मोठे रस्ते नव्हते. गजबजलेली डाऊनटाऊन नव्हती. पण गाव चांगलं होतं. या गावात परत एकदा मी माणसात मिसळलो. अगदी सांगली मिरजेत असल्यासारखा!! खूप माणसं भेटली. मराठी मंडळ काढलं. मुलांसाठी मराठी शाळा चालवली. मुलांची नाटके बसवली. खूप कार्यक्रम केले. तुकारामांची गाथा अखंड वाचून त्याच्यावर एक दीड तासाचा कीर्तनासारखा कार्यक्रम केला. नाट्यसंगीतावर एक विवेचनात्मक कार्यक्रम केला. लक्ष्मणराव देशपांड्यांच्या “वऱ्हाड निघालय लंडनला” चे प्रयोग केले. जुन्या कवितांचे कविसंम्मेलन केले. असंख्य गोष्टी केल्या. कुणाला आवडल्या. कुणाला कदाचित काही गोष्टी आवडल्या नसतीलही. पण मी माझ्यासाठी माझ्यापुरता या गावात अगदी भरभरून जगलो.
याचं गावात “हम दो” चे “हम दो हमारे दो” झाले. मग आर्चिसच्या पहिल्या वाढदिवशी हे घर घेतलं होतं. अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण तेव्हा पियोरीयात कॅटरपिलरचे एम्प्लाॅई असणे हे अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जायचे. आणि तेव्हा आम्ही दोघेही साधे कन्सल्टंट होतो. मग “कन्सल्टंटनी घर घ्यावे का?” (म्हणजे इथे “कन्सल्टंट” हे “भिकार कन्सल्टंट” असे वाचावे.)
यांवर काही घरात रात्रीची चर्चा सत्रे झाल्याचे आम्हास ठाऊक होते. पण मेलं कोंबडं जाळाला भीत नाही. पहिल्याच दिवशी चारशे रुपयांची टॅक्सी केलेली असल्याने आमची पैशाची आणि ते संपल्याची भीती तेव्हाच संपलेली होती. अर्थात गंमत अशी की अशा भिकार कन्सल्टंटनी घर घेतलेले बघून नंतर बऱ्याच, जवळ जवळ निवृत्तीला पोचलेल्या (ही ज्ञानोबांची निवृत्ती नव्हे!!) आणि वैचारिक गुंत्यात अडकलेल्या एंप्लाॅईंनी पटापट घरे घेऊन टाकली. होऊ नयेत पण कितीही म्हटले तरी अशा गोष्टीनी मनाला गुदगुल्या व्हायच्या त्या होतातच.
तर अशा कन्सल्टंटच्या घरात आता झाड लावायचे ठरवले. इतर लोकांनी कुठून कुठून तीनशे चारशे डाॅलर देवून झाडे विकत आणून लावली. ती झाडे आणली तेव्हाच तीन चार फुटांची होती. चांगली खात्यापित्या घरची वाटायची. आम्ही थोडा वेगळा विचार केला. म्हटले कुठेतरी दुसरीकडे मोठे वाढलेले झाड उपटून आणण्यापेक्षा एखादे रोपटे लावून बघू. एका कॅनाॅलच्या शेजारी एक झाडांचे गचपण होते. अतिशय अंधारलेल्या जागेत मेपलची दोन चार रोपे जीवाचा आटापीटा करून सूर्याच्या शोधात वेडी वाकडी वाट काढत वाढत होती. ती अशा ठिकाणी उगवली होती की त्यांना सूर्य दिसणे अवघडच नाही तर अशक्य होते. तरी त्यांच्यातल्या कोंबाचा संघर्ष अलौकिक होता. मी काहीही विचार न करता त्यातले एक रोप हळूवार पणे उपटले आणि घरी घेवून आलो. तसेही त्या गचपणातल्या अंधारात ते बोटभर अस्तित्व मेलंही असतं आपल्याशीच कुढत. पण आता मी त्याला उपटून आणल्याने त्याच्या प्रत्येक श्वासाचा विश्वस्त मी झालो होतो. त्याला घरी आणून एका स्वच्छ, मोकळ्या जागी लावले. आर्चिस रोज पाणी घालायची. पण का कुणास ठाऊक त्याची पाने गळायला लागली. जन्मापासून अंधारात राहीलेल्या त्या जीवाला दिवसभराचा स्वच्छ सूर्यप्रकाश सहनच होईना. त्याच्या पानांना विचित्र भोकं पडायला लागली. आर्चिसच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हे सुचायचे नाही. मी आपलं काहीतरी सांगून तिची समजूत काढायचो. पण एकामागोमाग एकेक पाने गळून गेली. शेवटचे पान गळाले तेव्हा तर मला फारच अपराधी वाटलं. बाहेर उन्हात त्या रोपाची काडी तशीच एकटी उभी होती. शेवटी काहीतरी सांगायचे म्हणून मी आर्चिसला रविंद्रनाथांची शांतिनिकेतनाची गोष्ट सांगितली. मग ती पण त्या काडीपाशी जावून बोलत बसायला लागली. “लवकर लवकर मोठा हो” म्हणायची. त्याला हात लावून “I love you!!” म्हणायची. प्रत्येक क्षणाला माझी घुसमट वाढत होती. मला बऱ्याच जणांनी सांगितले की ते झाड काही परत येणार नाही म्हणून. पण आर्चिसचा भाबडेपणा मला ते काढू देईना. आणि तिची समजूत कशी काढावी तेही कळेना.
आणि शेवटी एक दिवशी त्या काडीवर एक कोवळी फुट फुटताना दिसायला लागली. आणि मला आभाळ थोडे झाले. रोपाला कोंब येणे ही काही विशेष बाब नाही. पण त्या रोपाचा कोंब हा रविंद्रांच्या अलौकिक अस्तित्वाची प्रचिती होता की आर्चिसच्या असीम भाबडेपणाला आलेलं यश होतं हे सांगणे अवघड आहे.
आज दहा वर्षे झाली तो मेपल अगणित हिरव्यागार पानानी डवरला आहे. खरे तर आता तो घरापेक्षाही उंच झाला आहे. आता त्याला त्याचे अस्तित्व आहे. व्यक्तित्व आहे. त्याची मुळे कुठे कुठे खोल गेलेली आहेत. त्यांना देखील मायेचे असीम ओलावे सापडले आहेत. एका बाजूला वसुधेला घट्ट धरून ठेवत तो असंख्य डोळ्यांनी आकाशातल्या ताऱ्यांना त्याच्या अस्तित्वाचा डौल समजावून सांगतो आहे. आपल्याच पानातून ऐकू येणारं रविंद्रसंगीत ऐकून तृप्त होतो आहे. अंधारलेल्या गचपणात प्रकाशाच्या शोधात त्याच्या बुंध्याच्या तळाशी झालेली थोडी वेडीवाकडी वाढ सोडली तर गतजन्माची अशी कोणतीच खूण आता त्याच्या अंगावर शिल्लक नाही.
आम्हाला पियोरिया सोडून देखील पाच वर्षे होवून गेली आहेत. त्याला आता आमची काही गरज देखील वाटत नसेल कदाचित. आम्हालाच वाटत राहते जावू कधीतरी पियोरियाला म्हणून. आता ते घर आम्ही त्याच्यासाठीच ठेवले आहे.

स भूमिं विश्वतो वृत्वा। अत्यतिष्ठद्दशांगुलम ।।


~निखिल कुलकर्णी

No comments:

Post a Comment