Tuesday, September 17, 2019

गुलज़ार - एक एहसास

गुलज़ार - एक एहसास 

~निखिल कुलकर्णी 

एप्रिल का मे मध्ये कुठेतरी ऐकलं कि, गुलजार १४ सप्टेंबर ला मध्ये सॅन होजे मध्ये यायचे आहेत. कार्यक्रमाच्या तिकीटाची शोधाशोध केली. आणि त्याक्षणी पहिल्या रांगेची २ तिकिटे काढली. गेली अनेक दशके ज्याने आलम हिंदुस्तानच्या मनामनावर गारुड केलेला भाषेचा प्रभू, शब्दांचा सम्राट आणि भावनांचा पट उलगडून अलगद काळजाला हात घालणारा अवलिया, प्रत्यक्ष पाहायला आणि अनुभवायला मिळणार होता, या कल्पनेने मी हरकून गेलो होतो. लहान मुलासारखा दर शनिवारी, अजून किती शनिवार राहिले त्याचा देखील हिशेब ठेवत होतो. शेवटी ३-२-१ करत कार्यक्रमाचा दिवस आला. सकाळ पासून एक विलक्षण धाकधूक होती. कपडे काय घालावेत, घरातून किती वाजता निघावे पासून ते बुके कसला न्यावा? अगदी सैरभैर.. लहान मुलासारखी अवस्था झालेली..
.     
वास्तविक मला तिथे जाऊन ऐकण्या पलीकडे काहीही करायचे नव्हते. पण अनेक वर्षे मनात काढलेले कल्पना चित्र आज प्रत्यक्ष प्रकट होणार होते. त्यांचे शब्द पुस्तकातून वाचले आणि गाण्यातून ऐकले होते.  
काय आहे कि, "संत ज्ञानेश्वर" हा मराठी  सिनेमा आणि "आंधी" आणि "अमर प्रेम" या सिनेमातली गाणी, मी चार चौघात बसून बघायची शक्यतो टाळत असतो. या गोष्टी अशा आहेत कि, आपले डोळे आपल्या ताब्यात राहत नाहीत. आणि लोक मग, "तुम्ही फारच हळवे बुवा" म्हणतात. लोकच कशाला पोरं देखील "आई, बाबा रडतोय" म्हणून आरोळ्या ठोकतात. पण झोळी घेऊन दारोदार फिरणारी ती भावंडं आणि रात्रीच्या वेळी हुगळीच्या पात्रात, नदीच्या दोन्ही किनाऱ्यानी नाकारलेल्या होडीला पार लावत बसलेला नावाडी, नाहीतर "दरसल ये बेले नही" म्हणत स्वतःची समजूत काढत बसलेला संजीवकुमार, हे मला कायमच सुन्न करत आलेले आहेत. आता त्या गाण्यांच्या जन्मदात्याच्या पुढ्यात बसून त्याला ऐकायचे हि कल्पनाही सैरभर करायला पुरेशीआहे.  

शेवटी धडपडतच सॅन होजे डाऊनटाऊन मध्ये पोचलो. कुठेतरी गाडी लावली. आणि ऑडिटोरियम मध्ये आलो. आणि पहिला आश्चर्याचा धक्का बसला. पहिल्या रांगेतले तिकीट घेतल्याने आम्हाला काही क्षण गुलज़ारना प्रत्यक्ष भेटायची व्यवस्था केलेली होती. माझे हातपायच गार झाले. मी आणि अस्मिताने जेव्हा पहिल्यांदा त्यांना पाहिले, तेव्हा आमचा एकमेकांवर विश्वासच बसेना. स्वच्छ पांढरा शुभ्र लखनवी कुर्ता, तसलाच पांढरा पायजमा, अंगावर फिक्कट पिवळसर रंगांची तलम काश्मिरी उंची शाल, चौकोनी सोनेरी काड्यांचा चष्मा आणि त्यातून तुमच्या काळजाशी मैत्र करायला आसुसलेले निर्मम डोळे...८६ वर्षाची अंगकाठी युगायुगांचे सार होऊन समोर उभी होती. आमच्या कडे बघून त्यांनाही बहुतेक आश्चर्यच वाटले असावे. कारण तिथे आलेल्या सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ निमंत्रितांमध्ये आम्हीच दोघे काय ते चाळिशीतले फटिंग असू. त्यांना पायाला हात लावून नमस्कार केला. बुके दिला. आणि मग दोन-तीन मस्त फोटो देखील काढले. त्यांनी पाठीवर एक हलकेच थाप दिली. बस अजून काय पाहिजे होते..आजि सोनिंयाचा दिन..   

आता उत्सुकता त्यांना ऐकण्याची. कार्यक्रम थोडा उशीरा सुरू झाला. 

रक्षंदा जलील मुलाखत घेणार होत्या. रक्षंदा जलील म्हणजे उर्दू साहित्यातले मानाचे पान. अधून मधून गुलज़ारांची काही गाणी देखील सादर केली जाणार होती. सभागृह जवळपास २००० लोकांनी खचाखच भरले होते. यांच्यात मराठी होते, हिंदी होते, पंजाबी होते इतकच काय पण पाकिस्तानी देखील होते. अक्षरश: कानात प्राण गोळा झाले होते. 

आणि एका क्षणी गुलज़ार व्यासपीठावर आले. संपूर्ण सभागृह उठून उभे राहिले आणि सुरु झाल्या अखंड टाळ्या. सुमारे ४००० हात आपल्या लाडक्या शब्द प्रभूचा गौरव करण्यात मश्गुल झाले होते. असं म्हणतात कि हात हे थेट हृदयालाच जोडलेले असतात. ज्याच्या कवितांवर कित्येकांचे प्रेम उमलले, कित्येकांना त्यांचे हरवलेले प्रेम न मिळताही सापडले, कित्येकांना जगण्याचा अर्थ लागला, कित्येकांना आपली ओळख पटली, ते प्रत्येक हृदय मुक्त हस्ताने धन्यवाद देत होते.   

गुलज़ारनी त्यांच्या विनम्र नमस्कारांनी या स्वागताचा स्वीकार केला. पण टाळ्या काही थांबत नव्हत्या. शेवटी गुलज़ारनी सांगितले कि हे भूतो न भविष्यती असे स्वागत होते म्हणून...आणि त्यांचा तो धीरगंभीर आवाज ऐकून लोक भानावर आले. तिथून पुढे बराच वेळ त्यांच्या प्रत्येक शद्बाला टाळ्या पडत होत्या. 

मग स्वरदा गोडबोले आणि जितेंद्र अभ्यंकर यांनी मेरी आवाजही पेहेचान है, हे गाणे सादर केले. नंतर पुढे ऋषिकेश रानडे यांनी पण काही अफाट गाणी सादर केली...अप्रतिम आवाज आणि तितकीच अप्रतिम तयारी..    

मग सुरुवात झाली ती या आनंदयात्रीच्या जीवनपटाचा मागोवा घेण्याची. वयाच्या ८६ व्या वर्षी एखाद्याने किती उमदं असावं? तर, "कुठल्या सफर विषयी सांगू म्हणता? इंग्रजी कि उर्दू?" असे विचारत प्रश्न विचारणाऱ्याचीच  फिरकी घ्यावी. 

शब्दातून काढलेल्या चित्रा विषयी गुलज़ार सांगत होते. विहिरीवरच्या काठावरच्या लिंबाची नज्म त्यांनी पेश केली. आणि एकेक शब्दाने तो लिंब, त्याची अगणित पाने डोळ्यासमोर दिसू लागली. त्याचे विहिरीत उतरलेले पाय दिसू लागले. विहिरीच्या ओबडधोबड पायऱ्या, आणि त्याला लागून असलेल्या झऱ्यांच्या शेवाळलेल्या भेगा दिसू लागल्या. इतकच काय पण त्या विहिरीच्या झऱ्यातून एकलग पडणाऱ्या पाण्याचा आणि अचानक त्या विहिरीतून वर उडून दूर कुठेतरी निघून जाणाऱ्या कबुतरांच्या पंखांची फडफड ऐकू देखील यायला लागली. यालाच बहुधा समाधी म्हणत असावेत. आणि हजारो लोकांना अशी समाधी साधून देणारा तो निगर्वी अवलिया हसून म्हणतो कि, चित्र काय किंवा वास्तव काय, त्याची किंमत हि पाहणाऱ्याच्या डोळ्यात ठरत असते. एखादा सुंदर सूर्यास्त पाहताना काही लोक म्हणतात कि, अहाहा किती सुंदर!! अगदी एखादे चित्रंच वाटतं आहे.. आणि सूर्यास्ताचे दुसरे एखादे सुंदर चित्र पाहताना तेच लोक म्हणतात कि, अरे वा हा तर अगदी खरा सूर्यास्त दिसतो आहे... 

"बस नजर काही तो फर्क है।" या प्रतिभावंतांच्या प्रतिभेपेक्षा त्याच्या लीनतेवरच जास्त फिदा व्हावे..काय बोलणार!!  

 "तुमची नज्म नक्की कुठून येते?" काय बोललात रक्षंदाजी!! मेरी उम्र आप को लाग जाये..

आणि याच्यावर त्यांचं उत्तर म्हणजे तर डोळे उघडे ठेवून ऐकणं अवघडच आहे. "मै तो बस बिखरे सपनो का कबाडी हू"... 

तुमच्या उशाशी मोडून पडलेली, तुटून गेलेली ती रंगीबेरंगी स्वप्नं मी गोळा करून ठेवतो. त्याच्या तुटलेल्या काचांची नक्षी तयार करतो आणि ती तुम्हाला दाखवतो. एखाद्या कॅलिडोस्कोप सारखी तुम्हाला परत परत दाखवत रहातो. एखादी नक्षी हसवते. एखादी रडवते. आणि एखादी नुसतीच अस्वस्थ करत राहते.  

आयुष्य चालतच असतं..एकामागून एक क्षण जातच राहतात. गेलेले काही क्षण मी बघत राहतो. त्यातले काही निवडतो. त्यांच्याशी सलगी करतो. मग ते क्षण पाकळ्यांसारखे माझ्या समोर उलगडतात..
काही क्षणांमधून आनंदाची कारंजी उमटतात. 
काही मधून दु:खाचे डोह तर काही मधून फक्त अनुततरीत प्रश्नांचे अथांग अस्वस्थ समुद्र. आणि मग हे कर्मदरीद्री, स्वार्थी समुद्र आपल्याही डोळ्यातून न कळत काही थेब घेऊन जात राहतात जन्मभरासाठी..


"नज्म के बिना मै नंगा हू.".

थंडीत जशी दुलई ओढून घेतो तशी मी माझी नज्म ओढून घेत माझ्या जखमा लपवत राहतो..आजवर कित्येक जखमा, कित्येक वेदना या नज्मखाली लपवून, झाकून ठेवल्या आहेत. माझी नज्म हेच तर माझे अस्तित्व आहे.
आणि मग अशा सर्वव्यापी नज्मकाराला जेव्हा घरातल्या धुळीनं भरलेल्या अडगळीत, पानांच्या अजस्त्र गठ्ठया खाली, प्रकाशनापासून मुद्दाम लपवून ठेवलेली, डावलली गेलेली ती जुनी दुखरी नज्म सापडते, तेव्हा ती नज्म या फनकाराला तिचे अनुत्तरित प्रश्न विचारते कि का मला लपवलंस म्हणून.. मी प्रकाशित झाले असते तर कदाचित तू कसा आहेस ते जगाला कळलं असतं म्हणून? केवळ तुझी ओळख लपविण्यासाठी इतकी वर्षे माझ्यावरती इतक्या पानांचा पहारा बसवलास? 

तो दिवस पाहिलात का? अहो, मला तर तो त्या मदाऱ्याच्या दुरडी सारखा दिसतो आहे. आणि रात्र म्हणजे त्याचे झाकण आहे. सकाळ झाली कि, तो मदारी कुठूनतरी येतो. ती दुरडी उघडतो. त्यातुन कधी ससे काढून दाखवतो, कधी कबुतरे काढून दाखवतो, कधी एखादा साप काढतो तर कधी रंगीबेरंगी पिसांच्या टोप्याच काढून दाखवत बसतो. आणि त्याची वेळ झाली कि तो त्या दुरडीवर रात्रीचे झाकण लावून अंधारात दूर कुठेतरी निघून जातो. "बचपन मे वो मदारी मुझे खुदा लगता था..और आज, खुदा भी मदारी लगता है।"...   

उर्दू नज्म आणि ती सिनेमात कशी बसवली गेली? रक्षंदाजी आपका जवाब नही। 

"यहा पहले दफन खोदा जाता है। बाद मे मुर्दा धुंडा जाता है।"..आणि बऱ्याच वेळेला या कबरीत बसेल असा मुर्दा मिळेलच असे नाही. मग तेव्हा पाहिजे तसा मुर्दा तयार करावा लागतो. माझ्या पहिल्या गाण्यापासून हे चालू आहे. बिमलदा आणि सचिनदा बरोबर पहिल्यांदा काम करायला मिळालं त्याची गोष्ट. त्यावेळी शैलेंद्र गाणी लिहायचे. त्यांनी यावेळी स्पष्ट नाही म्हणून सांगितले. आणि मला म्हणाले कि तू लिही म्हणून. आता काय करणार? माझी पहिलीच खेप होती. मग बिमलदांनी मला गाण्याची चाल सांगितली.. "ड ड डा ड डा ड डा डा" म्हणून.. आता या चालीवर काय कपाळ बसवणार! पण लोकं मागेच लागली.. मग मी पण मागे हटवायचे नाही असे ठरवले आणि लिहिले, "मेरा गोरा अंग लै ले, मोहें शाम रंग दै दे"...   

गुलज़ारांचा प्रत्येक शब्द लोक फुलासारखा झेलत होते. मनापासून हसत होते. माझं एक असं मत आहे कि मराठी माणसे हिंदी आणि उर्दू बोलायची वेळ आली कि थोडी बुजतात. हातचं राखून वागतात. पण इथे म्हणजे द ग्रेट मराठा देखील भैय्यांच्या आणि लाहोऱ्यांच्या मांडीला मांडी लावून "इर्शाद इर्शाद" म्हणत होता. "वाह वाह" आणि "बहोत खूब" ची लड लावत होता...    

लेकिन मिर्झा गालिब के लिये नसिरुद्दीन शाह ही क्यो? आणि इथे रक्षन्दाजीनी गुलज़ारच्या काळजाला हात घातला होता. 

मिर्झा गालिब आणि नासिरुद्दीन म्हणजे दोन्हीही गुलज़ारांची विसाव्याचीच ठिकाणे. इथे गुलज़ार घरचे होऊन जातात. गालिबचे नाव काढल्यावर क्षणाचाही विलंब न करता गुलज़ार दिल्लीच्या त्या पेचिदा गलियों मध्ये शिरले देखील. तेच बल्ली-मारान चे मोहल्ले.. 

गुडगुडाती हुई पान की पिको मे वो दाद वो वाह वाह 
चंद दरवाझो पे लटके हुए बोसिदा से टाट के परदे 
एक बकरी के मीमयाने कि आवाज... 

क्या बात!! एव्हाना सगळे दिल्लीला पोचले होते. आणि खुद्द गुलज़ार बोट धरून आपल्या गुरु गृहाचा पत्ता एकेक करून सांगत होते. 

इसी बेनूर अंधेरी गली कासीम से 
एक तरतीब चराघों कि शुरुआ होती है ।
एक कुरान-ए-सुखान का साफा खुलता है ।
असादुल्लाह-खान-गालिब का पता मिलता है । 

वाह वाह, वाह वाह..आता कुठे गुलज़ारच्या गर्भगृहात प्रवेश मिळाला होता. 

मग नसीरउद्दीनच का? त्याचाही किस्सा सांगायला विसरले नाहीत. निर्माता खरे तर नकोच म्हणत होता. नसिरुद्दीन पैसे फार मागतात असा त्याचा आक्षेप होता. त्याने नसीरुद्दीन आणि गुलज़ारना भेटायला बोलावले. तिथे बरीच गरमा-गरम चर्चा झाली. त्यांना पैसे कमी घेण्याची विनंती करण्यात आली. इतर कलाकारांवर देखील विचार चालू आहे म्हणून सांगितले. पण या सगळ्याचा शेवट म्हणजे नसिरुद्दीन भयंकर भडकले. म्हणाले कि मीच मिर्झा गालिब करणार आणि मी पैसे पण कमी घेणार नाही. आणि तसेच रागाच्या भारत तिथून उठून निघून पण गेले. ते गेल्यावर गुलज़ार निर्मात्यांना म्हणाले, "देखा? ये हैं मिर्झा गालिब!!"... 

मग त्यांनी "मेरा कुछ सामान" या गाण्याची मोठी मजेशीर जन्मकथा आणि त्यातला आशाजींचा सहभाग सांगितला. मग "किताबे" सादर केली.  

किताबो से जो जाती राबता था, कट गया है |
कभी सीने पर रखके लेट जाते थे, 
कभी गोदी मे लेते थे 
कभी घुटनो को अपने रहल कि सुरात बनाकर
नीम सजदे मे पढा करते थे छूते थे जबीन से

वो सारा इल्म तो मिलता रहेगा मगर
वो जो किताबो मे मिला  करते थे सुखे फूल और महके हुए रुकवे 
किताबे  मांगे गिरने उठाने के बहाने
रिश्ते बनते थे उन का क्या होगा? वो शायद अब नही होंगे!...  

त्यांचे शब्द त्यांच्या आवाजात रात्री काढलेला सूर्य होऊन उजळत राहतात आपल्या कॅनव्हास वर. आणि नंतर सकाळी सूर्य तिथून निघून गेला तरी जळत राहतो कॅनव्हास एकटाच आपल्याशीच...
   
"दस्तक" ऐकून तर सुन्न व्हायला झाले. कोण होते ते आत्ता मगाशी येऊन गेले ते? कदाचित सीमेपलीकडून आले असावेत.. माणसेच होती ती.. आपली ओळखीचीच वाटत होती..माझ्या घरी मक्याची मोठी रोटी भाजली त्यांनी इथे अंगणातल्या भट्टीत. आणि येताना काही रिकाम्या हातानी आले नाहीत. तर मागच्या वर्षीचा गूळ घेऊन आले होते माझ्या साठी.. खरं होतं  कि स्वप्न काही कळत नाही. पण बहुतेक स्वप्नच असू देत.. कारण काल सीमेवर गोळीबार झाला म्हणे...असा सीमेवरच्या घावांनी सैरभैर करून सोडणारा कवी कधी तिच्या आठवणीने देखील तितकाच व्याकुळ होतो आणि तिला बोलावताना म्हणतॊ,  

याद हैं एक दिन, मेरी मेज पर बैठे-बैठे
सिगारेट कि डिब्बीया  पर तुमने एक स्केच बनाया था 
आ कर देखो, उस पौधे पर फूल आया हैं...     

नंतर थोडी भाषेची चर्चा झाली. 

भाषाही त्या समाजाचा आरसा असते. हे सांगताना त्यांचीच एक विवाहितेची अप्रतिम व्यथा सादर केली. जेवण झालेल्या ताटात ती रेघोट्या काढते आहे आणि आपल्याशीच म्हणते आहे कि हे इतके सगळे दागिने घालायला लावून मला असे ठिकठिकाणी का जखडून ठेवले आहे ते कळत नाही. आणि हे चालू असताना तिची सासू आतून हुंड्यात कमी दागिने आणले म्हणून तिला शिव्यांची लाखोली वाहत आहे.    

गुलजारच्या मते भाषा कधी मरत नसते. ती काळानुरूप बदलते जरूर. आणि ती बदललीच पाहिजे. पण याचा अर्थ ती भाषा मृत झाली असा होत नाही. याचा दृष्टांत देताना ते म्हणतात कि, 
गालीबच्या वेळेची उर्दू मला नसेल बोलता येत..पण तुम्हाला तरी शेक्सपीयरच्या वेळेची इंग्रजी बोलतां येते का?

आणि आणखी एक गोष्ट म्हणजे कुठलीही भाषा ही समाजाची असते. 
लोकांचीअसते. भाषा कधीच कुणाला धर्म विचारायच्या भानगडीत पडत नाही. ज्याला ती बोलता येते, ती त्याची होते. ज्याला ती लिहीता येते, ती त्याची होते. आणि इतकच काय पण ज्याला ती नुसती समजते, ती त्याची देखील असते आणि तो त्या भाषेचा असतो..
.
उर्दू भाषेबद्दल तर त्यांचा ओढा अलौकिक.
 
ये कैसा इश्क है उर्दू जबान का 
फकिरी भी नवाबी का मजा देती है उर्दू... 
कही कुछ दूर से कानो मे  पडती है अगर उर्दू 
तो लगता हैं कि दिन जाडो के हैं, खिडकी खुली है धूप अंदर आ रही हैं अजब हैं ये जबान उर्दू... 

हि जबान देखील अजब आहे आणि तिचा हा सरस्वती पुत्र देखील तिच्या इतकाच अजब आहे.

गुलज़ार साहेबांच्या पायाशी बसून ते जेव्हा आपल्या कडे बघून त्यांच्या घनगंभीर आवाजात विचारतात कि,
 
"कभी रुह देखी है? रुह को महसूस किया हैं? 
जागते जाते हुए दुधिया कोहरे से लिपट कर 
सांस लेते हुए उस कोहरे को महसूस किया है?"

तेव्हा आपलीच रुह आपल्याला, कायमच्या हरवून गेलेल्या एकेक क्षणाचा हिशेब मागू लागते. गमावलेल्या प्रत्येक नात्याची एकेक आठवण सांगू लागते. तुटलेल्या प्रत्येक धाग्याची साद घालू लागते..आणि मग डोळ्यासमोर तोच तो दुधिया कोहरा आपल्याला सामावून घेण्यासाठी समोरा येत राहतो..आणि लांब कुठून तरी ऐकू येत राहतात गुलज़ारांचे शब्द ..
"जिस्म सौ बार जले तब भी वही मिट्टी है 
रुह एक बार जलेगी तो वो कुंदन होगी 
रुह देखी हैं? कभी रुह को महसूस किया है?" 

रुह देखी है? कभी रुह को महसूस किया है?

~ लेखनसीमा~       
  
गुलज़ार - एक एहसास

~निखिल कुलकर्णी
    No comments:

Post a Comment