Thursday, August 10, 2017

मी मिरजकर

मी निखिल कुलकर्णी. तुम्हाला सर्वांना स्नेह मेळाव्याच्या अगदी मनापासून शुभेच्छा!!

मला प्रत्यक्ष यायला खूप आवडलं असतं. तुम्हाला तर माहीतच आहे कि मी मुळचा मिरजेचा आणि मिरजेला जायची संधी मी अशी सोडली नसती.   

वास्तविक मिरज सोडून देखील आता किमान २५ वर्षे तरी झाली असतील. पाचवीत असतानाच मी सांगलीला सिटी हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला आणि एका अर्थाने मिरज सोडले. मग पुढे बऱ्याच गावात राहिलो. काही वर्षे सांगलीत होतो. मग पुढे पुण्याला एक १० वर्षे होतो. आता गेली १३-१४ वर्षे अमेरिकेत आहे. इथे सुद्धा बऱ्याच गावात होतो. इथे आलो तेव्हा २००३ मध्ये न्यू जर्सी मध्ये होतो. मग अटलांटा, लॉस अन्जीलीस, पिओरिया इलिनोइस असे करत करत आता गेली ३ वर्षे स्यान होजे कॅलीफोर्निया मध्ये राहतो आहे. मला २ मुली आहेत. पहिलीचं नाव आहे आर्चिस. ती आता चौथीत आहे. आणि दुसरीचं नाव आहे रेनिसा. ती किण्डर गार्डन मध्ये आहे. 

म्हणजे मी बरोबर माझ्या मोठ्या मुलीच्या वयाचा होतो मिरज सोडले तेव्हा!! म्हणजे मिरज सोडून आता आख्खी एक पिढी लोटली असे म्हणायला काहीच हरकत नाही. 

पण सांगू का मंडळी, अजूनही कुणी विचारलं कि "where are you from" तर पटकन तोंडात येतं कि "I am from miraj!!" काय कुणास ठाउक पण मला माझे सांगली आणि पुण्यातले मित्र देखील कायम म्हणतात मी मिरजे पेक्षा सांगली किंवा पुण्यामध्ये जास्त राहिलो आहे. माझी मुलगी तर म्हणते कि "बाबा तू आता भारता पेक्षा अमेरिकेतच जास्त राहिला आहेस" त्याचं म्हणणं हि खरं आहे. पण माझा प्रश्न एवढाच आहे कि इतके सारे असून मी स्वत:ला मिरजेचा का समजतो?

त्याचं काय आहे कि या गावानं मला जे आठवणीचं गाठोडं दिलय ते फार मोठं आहे.चांगल्या वाइट खूप आठवणी त्याच्यात आहेत. याच्या मध्ये तिसऱ्या मजल्यावरून उडवलेल्या पतंगाच्या आठवणी आहेत. 

केसरखान्याच्या विहिरीवर मोटेवरुन मारलेल्या गठ्ठ्यांच्या आठवणी आहेत. 

कोडोलीकर गल्ली मध्ये भर दुपारी १२ च्या उन्हात गोट्या, चिन्नी दांडू नाहीतर लपंडाव खेळायचो त्याच्या आठवणी आहेत. 

चिंचेच्या झाडावरून मारलेल्या उड्याच्या आठवणी आहेत. मित्रांचे मोडलेले हात आणि पाय आठवतात.  

सायकलचे नाहीतर स्कूटर चे टायर घेऊन मिरजेच्या गल्ल्या पालथ्या घातल्या त्याच्या आठवणी आहेत.          

दर्गा आठवतो. तिथला उरूस आठवतो. उरुसात, चंद्रावर बसून काढलेले फोटो आठवतात. अंबाबाईचे नवरात्र आठवते. तिथे विकत घेतलेल्या पिपाण्या आठवतात. आणि त्या पिपाण्या शाळेत वर्गात वाजवून बाईंचे खाल्लेले फटके पण आठवतात.      

शंकर तत्त्वज्ञान आठवते. त्याच्या सळीवर बसलेल्या गोट्या मनगोळी आणि केद्या वाटवे आठवतो. जोशी बाई आणि दाते बाई आठवतात. वाटवे गल्ली आठवते. अंबाबाई तालीम, भानू तालीम, संभा तालीम आठवते. तिथे केलेले मल्लखांब, सुर्य नमस्कार, जोर-बैठका आणि कुस्त्या आठवतात. गोरे, दत्त, गजानन, काशीकर मंगल कार्यालये आणि तिथल्या जिलब्या आठवतात. अशोक खटावकर आठवतो.        

रात्र रात्र भर फिरून पाहिलेले गणपती आठवतात. त्यांच्या २६ आणि ३० तास चालणाऱ्या मिरवणूका आणि गणेश तलावात केलेलं विसर्जन आठवते.    

अमर खड्डा, त्याच्या जवळचे ग्राम्या चे घर, दुध डेरी, सगळे मस्त आठवते.    

लक्ष्मी मार्केट मधला भाजीचा वास आठवतो. त्याच्या  समोरची बाग आठवते. तिथे खाल्लेली भेळ आठवते. तिथे मागे २-३ मोर आणि लांडोर होते ते आठवतात.

किल्ला आठवतो. त्याचे ते मोठे मोठे बुरुज, मोठा गणेश दरवाजा आणि त्याच्या वरचा नगारखाना, त्या दरवाज्याला लावलेले मोठे खिळे आठवतात. किल्ल्या मधले आशिष गोगटे चे घर आठवते. राजा कोरे, उम्या मंडले, शरद खोत वगैरे मंडळी किल्ल्यात रहायची. त्यांची घरे आठवतात. 

तृप्ती अभ्यंकर, चाऱ्या रामतीर्थकर, सुलक्षणा  घाटगे, श्रीक्या कट्टी, श्रुती साळुंखे, स्वाती शहा, तांबोळी वगैरे हुशार मुले-मुली  आठवतात. तृप्ती ची तर मला अजून सुद्धा धास्ती वाटते. simply great!!
  
माझ्या बरोबर स्कॉलरशिप मिळालेली ईशानी पुजारी आठवते. हि नंतर कुठे हरवली काही कळलेच नाही. कुणाला माहित असेल तर सांगा जरूर!!   

आणि सगळ्यात गम्मत म्हणजे माझ्या बाकावर बसणारी ताशिलदार सुद्धा आठवते. खरे सांगतो पण खूप त्रास दिला मी तिला!!! अर्थात तसा मी बऱ्याच जणांना भरपूर त्रास दिलेला आहे. 

मी पहिलीत असताना चौथीतली मुले आमच्या वर्गात येउन त्रास देतात असे मला वाटले. मग त्यांच्या वर्गात जाउन एकेकाची चांगली पट्ट्याने धुलाई केली. शेवटी शाळेने पट्टा काढून घेतला. मग काय? घरी गेल्यावर तीर्थरुपांनी मी दिलेले सर्व फटके मला सव्याज परत दिले. तर ते एक असो!!
   
पण तरी सुद्धा ताशीला माशी म्हणून दिलेला त्रास जरा जास्तच आठवतो. गम्मत हि वाटते आणि वाइट हि वाटते. कुठे असते ताशी? कुणाला माहिती असेल तर "आपून के वास्ते सॉरी बोलने का क्या!!"
   
आपल्या शाळेच्या मागचा खंदक आठवतो. मला अगदी आठवते कि कुठल्या तरी युद्धात म्हणे मावळ्यांनी खंदकात झोपून पूल तयार केला होता म्हणे. हि गोष्ट ऐकल्या पासून तर मला रोज शाळेत गेल्यावर त्या खंदकात झोपलेले मावळे दिसतात का ते पण मी पाहायचो.
    
हरीभाऊ टांगेवाले, त्यांचा घोडा, टोपी, त्याची हरळी सगळे अजून तसेच आठवते.   
आपल्या शाळेतले बाक, वर्ग, आपटे बाई, म्हस्के बाई, वाटवे बाई, पटवर्धन बाई, नातू बाई, हेर्लेकर बाई आठवतात. 
पन्हाळा ट्रिप, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी चे झेंडावंदन, त्याच्या समोर मी केलेली भाषणे सगळे आठवते.    

अपंग मुलांची शाळा आठवते. तिथे राहणारी मुले आणि मुली आठवतात. त्यांच्या कडे पाहून तेव्हा देखील मला खूप वाईट वाटायचं. त्यांच्या अंधाऱ्या खोल्या, त्याच्यात जमिनीवर पसरलेली त्यांची अंथरुणे, त्याच्या बाजूला ठेवलेली दप्तरे, पुस्तके पाहून वाटायचे अरे आपण किती नशीबवान आहोत!! त्यांच्या फाटक्या स्लीपर पाहून तर मला माझ्या बुटांची लाज वाटायची. त्यांचे जुने, मळके कपडे पाहून दर वर्षी मला मिळणाऱ्या कोऱ्या करकरीत युनिफ़ोर्म ची आठवण यायची. मी एकदा आमच्या आईला त्या शाळेची गोष्ट सांगितली. मग पुढे कधीतरी आमच्या आईच्या कॉलेज मध्ये NSS तर्फे काहीतरी उपक्रम होता. त्याच्या साठी माझ्या आईने मग त्या शाळेची निवड केली. मग त्यातून त्या मुलांना नवीन कपडे, पुस्तके असे काही काही दिले होते. 

आता  त्या मुलांना त्या कपड्या चा किती आनंद झाला ते मला ठाऊक नाही. ती मुले त्या पुस्तकातून किती शिकली ते पण मला  माहित नाही.      

पण मला आपले उगीचच मी काहीतरी केल्याचा आनंद झाला होता. आणि कुणाला तरी काहीतरी देण्याचा आनंद काय असतो ते मी  पहिल्यांदाच अनुभवत होतो. माझ्या शिक्षणाची इथे सुरुवात झाली होती.  
       
इतकी वर्षे झाली तरी यातली एकही आठवण अजून जुनी झालेली नाही. मंडळी, कोवळं मन मउ मेणासारखं असतं. त्याच्यावर काय लिहाल ते पटकन उमटतं. आणि ते मग पुढं कायमचं मनावर कोरलं जातं. मिरजेनं मला एक संवेदनशील मन दिलं. 

गल्लीतल्या, पाय तुटक्या Tommy ला, पोळीचा तुकडा ठेवायला मिरजेनं शिकवलं. दारात येणाऱ्या महारोग्याला भाकरीचा तुकडा वाढायला मिरजेनं शिकवलं. दिवाळीच्या दिवशी अनाथ आश्रमात जाउन फराळ वाटायला N R Phatak यांच्या मिरजेनं शिकवलं.  
     
आता अमेरिकेत कुणाला भिक देता येत नाही. एखादा उपाशी महारोगी दाराशी येत पण नाही.   
पण एखादा जुना शर्ट अजून केरात फेकवत नाही. एखादं पाखरू भर उन्हात चुकून दाराशी आलं तर त्याला एका वाटीत पाणी नेवून ठेवल्या शिवाय आजही चैन पडत नाही. 

एखाद्या गावांनी तरी अजून काय द्यायचं असतं!!

1 comment:

  1. मी ही मुळचा सांगलीचा ( आता मुबंईत असतो )
    छान लिहिले आहे तुम्ही

    आपल्या इकडचे पण ब्लॉग लिहितात हे पाहून खूप छान वाटले

    ReplyDelete