Tuesday, February 18, 2020

गाडीवान दादा

गाडीवान दादा
~ निखिल कुलकर्णी
अमेरिकेत गाडी घेणे ही एक प्रकारची तपश्चर्या आहे असे आमचे मत होत चालले आहे.
आम्हाला शंकर व्हायचा तेव्हा आम्ही जुनी कॅमरी घेतली होती आमच्या एका मित्रा कडून. वास्तविक आम्ही कधीच गाडी वगैरे घेण्याचा विचार देखिल केला नव्हता. किंबहुना तसे स्वप्न देखिल कधी पडून घामेघूम होत दबकून उठल्याचे पण आठवणीत नाही.
आमचे पेटंट स्वप्न म्हणजे, अशी रात्रीची वेळ आहे. आम्ही दुसरी पाळी करून सायकलला डबा लावून रेल्वे लाईनी जवळच्या आमच्या घरी निघालेले आहोत. रस्त्यावर साधे चिटपाखरू देखिल नाही. आम्ही तोंडाने मोठमोठ्याने रामरक्षा म्हणत आहोत. आणि अचानक वीस बावीस मोकाट कुत्र्यांनी आम्हाला घेरलेले आहे. एकेक कुत्रा म्हणजे साक्षात यमदूतासारखा आमच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहात आहे. वास्तविक अशा अवघड वेळी, २०-२२ कुत्र्यांच्या मधोमध सायकल हातात धरून उभे राहून, त्यांना “ए हाड कुत्र्या” असे म्हणून दाखवणाऱ्या इसमास “श्वान देव” नाहीतर “श्वानेंद्र” च म्हणावे लागेल. तर ते एक असो. तर अशा श्वान महर्षींना, आमच्या किरकोळ देहयष्टी कडे पाहून तोंड उघडून भुंकायची सुद्धा गरज वाटत नाही. नुसतेच वरचे आणि खाल्ले ओठ मागे घेऊन दात दाखवत “गुर्र् गुर्र् गुर्र्” असे आवाज काढत उभी असत. आपली कसलीही हालचाल ही प्रत्यक्ष मृत्यूला दिलेली हाळी आहे, या विचारात स्वप्नात सायकलचे हॅंडल आणि प्रत्यक्षात पलंगाचे दांडू असे बराच वेळ घट्ट धरून लाकडासारखे स्थिर होऊन पडलेले असायचो. “अहो काय होतय तुम्हाला?” असं आमच्या सौ नी म्हटलेले वाक्य त्या २०-२२ श्वान महर्षीं पैकीच कुणीतरी म्हणतय असे वाटून, प्रचंड भीतीने आम्ही दचकून जागे होत असू. भोके पडलेला गंजीफ्राक घामाने भीजून गेलेला असे.
मायदेशात असताना जिथे आम्ही कामगार होतो ती सूत गिरणी सोडली तर कुठेही जायचे असेल तर आम्ही बस किंवा रेल्वेने जायचो. “वाट पाहीन.. पण PMT ने जाईन!!” असेच आमचे धोरण होते. याचा अर्थ आमची महत्वाकांक्षा कमी होती किंवा आम्ही दैववादी होतो असे अजिबात नाही. “कधी ना कधी PMT येईलच आणि (एखाद तास उशिरा का असेन) आम्ही ईप्सित ठिकाणी पोहोचून दाखवूच”, असा दुर्दम्य आशावाद आणि “करून दाखवले” अशी कडवी, विजयी वृत्ती होती. तर ते एक असो.
तर आमचे परममित्र तेव्हा भारतात परत चालले होते. त्यांची बायको फारच गयावया करू लागली होती. तिचे बारीक तोंड पाहून आमच्या सौ ना देखिल गहिवरून आले. “भांडीकुंडी, ताटवाट्या, मंगलच्या चड्ड्या आणि उरलेले डायपर इतकेच काय पण घरातले टाॅयलेट पेपर देखिल विकून झाले हो वहिनी. आता राहीली ती ही फक्त कॅमरी. वहिनींच्या मते अगदी अशातले म्हणजे १९८० चे माॅडेल बरं!! लगेच आमच्या सौ नी खपली काढलीच की म्हणजे “फक्त” वीस वर्ष जुनी म्हणून!! मग वहिनींचे डोळे टचकन भरून आले.
अठरा वर्षे जुनी असताना त्यांनी ही कॅमरी का घेतली ते सांगितले. मग “कॅमरीला की नाही अगदी १०० वर्षे काही होत नाही हो!”, “ जी कध्धी कध्धी मरत नाही ती कॅमरी” वगैरे वाक्ये देखिल म्हणून झाली. त्या सुरात सूर मिसळत, “१०० वर्षे म्हणजे आत्ताशी कुठे कॅमरी जवान होते आहे” असे म्हणून आमचे मित्रवर्य, आम्हाला टाळी देऊन, गडागडा, दक्षिणी खलनायकासारखे विकट हसले होते. आम्हाला पुढे बऱ्याच वर्षांनी या वाक्यांचा अर्थ समजला तरी यातला विनोद अजून समजलेला नाही.
“तर ती कॅमरी एकदा विकली गेली की आम्ही भारतात परत जायला मोकळे!!” असे म्हणून वहीनींनी धोसरा काढला होता. ती कॅमरी विकायची राहीली म्हणून रडत होत्या की आमच्या मित्राचा विसा अमेरिकेने नाकारला म्हणून रडत होत्या ते एक विश्वंभराला ठाऊक!!
अमेरीकेत आलेले भारतीय एका विशिष्ठ आणि उच्च गुणवत्तेचे Diplomat (म्हणजे “खोटारडे” असे समजू नये!) असतात असे देखिल आमचे एक मत झाले आहे. त्या डिप्लोमसीच्या गुणवत्तेच्या परिक्षेची सुरूवात अमेरिकन विसाच्या मुलाखती पासून होते. इथे “तुमच्या अकाउंट मधे किती पैसे आहेत?” या प्रश्नापासून मंडळींचे “नाना फडणवीस” होऊ लागतात. काका, मामा, ओळखीचे, नातेवाईक (बायकोचे सुद्धा चालतात हो अशा अवघड वेळी), यांच्या कडून अक्षरश: दहा-दहा रुपये गोळा करून (अर्थात उधारीवर) ही मंडळी त्यांच्या अकाऊंट मधे प्रचंड पैसा आहे असे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. एकदा का ती अमेरिकन विसाची मुलाखत झाली की, अलमट्टीतून पाणी सोडल्यावर जशी कृष्णा काठची गावे पाण्यातून बाहेर येतात, तसे यांचे दहा लाखाचे अकाऊंट परत एकदा अचानक बारा रुपये तीस पैशांचे होत असते. चांगल्या वाईटाचा प्रश्नच नाही. आमचे फक्त एवढेच सांगणे आहे की ही वैश्विक डिप्लोमसीची भरारी ही इथून सुरू होत असते.
तर आमचे एक परममित्र अमेरिकेत शिकण्यासाठी म्हणून आले होते. ते काय शिकले ते आम्हास ठाऊक नाही. पण आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा ते शिकागो विद्यापीठांत रात्र पाळीचे वाॅचमन म्हणून काम करत होते. आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. भला घरचा माणूस. याचे वडील रिटायर्ड मामलेदार होते. पण आम्ही विचारायच्या आधीच त्यांनी कानापर्यंत हासत आपणहूनच “फावल्या वेळेत काय करायचे, म्हणून करतो हे काम झालं!” असे सांगितले होते. एक तर रात्र, अंधार आणि आपण एकटे आहोत ही कल्पनाच आम्हाला सहन होत नाही. तेव्हा रात्रभर काठ्या आपटत अंधाऱ्या जागेतून फिरायचे हे काम “फावल्या वेळेतील काम कसे?” या प्रश्नाने देखिल आम्हाला दचकून जाग येत असते. अर्थात जागेपणी हे उत्तरदेखिल त्या वैश्विक डिप्लोमसीचा भाग असावा म्हणून आम्ही त्याच्या कडे कानाडोळा करत आलेले आहोत.
तर अशा वैश्विक डिप्लोमसीचा डिप्लोमा घेतलेले आमचे मित्र आणि त्यांच्या अर्धांगिनी, यांनी बोलता बोलता त्यांची वीस वर्षांची नवयुवती कॅमरी आमच्या गळ्यात घातली. तरी आम्ही शेवटपर्यंत “रंग थोडा विटलाय का?” किंवा “असा का आवाज येतोय?” वगैरे प्रश्न विचारून तो व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करून पाहीला. पण एकतर आमच्या सौ ना सहावा महीना लागला होता. आणि मग त्यांना सारखे गाडीचे डोहाळे लागू लागले. त्यांचं आपलं सारखं “बाळ गाडीत बसायचं म्हणतोय” वगैरे चालू झाले. आमच्या चतुर मित्राच्या चौकस नजरेतून ते सुटले नाही. त्यांनी एक दिवशी आम्हालाच दम भरला की, “वेळ आली की बायकोला काय बस मधून दवाखान्यात नेणार आहेस का म्हणून!!” आणि बाजूला वहिनींनी आमच्या सौ ना त्यांच्या कॅमरीला दोन गिर्हाईक सांगून आली आहेत म्हणून सांगितले. डिप्लोमसी!! मग काय करणार! शेवटी एकदाचा मानेनेच होकार दिला. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी! आमच्या कडे गाडी चालवायचाच काय पण सायकलला लावायच्या राॅकेलच्या दिव्याचा देखिल परवाना नव्हता. आम्हाला पडणाऱ्या, कुत्र्यांच्या भीतीदायक स्वप्नांचे हे देखिल एक कारण असावे. मग मित्रवर्यांनीच त्यांची गाडी आमच्या दारात आणून सोडली. गाडी सोडून ते जेव्हा परत गेले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अगदी तोफांचे गोळे ऐकल्यावर बाजी प्रभू देशपांड्यांच्या चेहऱ्यावर होते तसे तेज आले होते.
प्रसंग मोठाच बाका होता. दारात गाडी झुलत उभी होती. पण परवाना नसल्याने (आणि अर्थात चालवता पण येत नसल्याने) नुसते बघत राहण्यापलिकडे काहीही करता येत नव्हते. शिवाय आमच्या सौ ना दम धरवत नसे. त्या सारख्या गाडीत जावून दार वगैरे उघडून, थोडा वेळ नुसत्याच बसून येत. “असं कशाला गाडीत जावून बसायचं?” असं आम्ही विचारल्यावर उत्तर मिळे की “बाळ गाडीत बसायचं म्हणत होता म्हणून!!”..आता काय कपाळ बोलणार याच्यावर!!. पण आमच्याशी सांपत्तिक, व्यावहारीक, बौद्धीक अशा हर तऱ्हेची स्पर्धा करणाऱ्या आमच्या नतद्रष्ट शेजारांच्या नजरेतून हा प्रकार कसा सुटावा? आमच्या सौ गाडीत बसायला निघाल्या की या शेजाऱ्यांच्या कुटाळ बायका त्यांच्या त्यांच्या हाता एवढ्या गॅलरीत पेशवीण बाईंसारख्या येवून उभ्या राहात आणि एकमेकींना खुणा करून तोंड झाकून फिदीफिदी हसत असत. एकदा तर आमच्या सौ गाडीत बसून परत येत असताना यातलीच एक टवळी खौट पणानं म्हणाली होती की “काय वहिनी कशी झाली चक्कर म्हणून!!”..रागच आला होता आम्हाला त्यांचा!! मनात म्हटले सुद्धा की, “तुमचं काळं, ढोलं, मंगळसूत्र बसलं असेल कुठल्यातरी रेल्वेत नाहीतर बशीत लोंबत, शेळीच्या गळ्यासारखं. त्याला जाऊन विचारा, कशी झाली त्याची चक्कर ते!!” पण बोलणार कुणाला!! काळ वेळ काही सांगून यायचा नाही. म्हणून मग आम्ही असले संवाद मनातच म्हणायचो. आणि आपल्याला गाडी चालवता येत नाही याचा दोष उगाच लोकाला कशाला द्यायचा? आम्ही आपले आमच्या कर्मावर चरफडत बसायचो. बहुतेक जण तेव्हा न्यू जर्सी तून न्युयाॅर्क पर्यंत कामाला रेल्वेनेच जात. शनिवार-रविवारी कुणी एखादा गाडीवाला ओळखीचा “भेटतो का” (“पावतो का” हे जास्त योग्य आहे खरे तर!) याची आशाळभूत पणे वाट बघत आपल्या अपार्टमेंट, अमेरिकेत चाळीतल्या खोलीला “अपार्टमेंट” म्हणतात. अर्थात हे थोडेसे मारवाड्याच्या वाणसामानाच्या दुकानातल्या दिवाणजीने स्वत:ला “श्रीमंत पेशवे” म्हणवून घेण्यासारखेच आहे. पण अमेरिकेतल्या बहुतेक गोष्टींचे थोडे-बहूत असेच आहे. इथे एखाद्याला नोबेल मिळाले तरी त्याला “ग्रेट” म्हणतात आणि एखाद्या मोती कुत्र्याने खांबावर तीर्थ प्राशन केले तरी देखिल त्याला “ग्रेट” च म्हणतात. तर ते एक असो!! तर अशा दीड वितीच्या “अपार्टमेंट” मधे, आपआपल्या गावातले “हिज हायनेस” “राजेरजवाडे” येवून राहात असतात. आणि अर्जुनाप्रमाणेच आपल्यालाही खुद्द भगवान श्रीकृष्णानी आपल्या “कपिलध्वज रथातून” (म्हणजे आताच्या काळात २० वर्षे जुनी कॅमरी मधून) वालमार्ट (प्रचलित कुरुक्षेत्र) पर्यंत लिफ्ट द्यावी (फुकट) अशी त्यांची माफक अपेक्षा असायची. “Are you going to Walmart today?” अशी बारीक तोंड करून आणि नसलेले खांदे पाडून, भीक सर्रास मागितली जात असे. हे वाक्य ऐकले की आम्हाला आमच्या बालपणी भर दुपारी दारावर येणाऱ्या बोटं झडलेल्या महारोग्याची “वाढता का ताई?” अशी आरोळी आठवत असे. काही कमी मिळतंय असा भाग नसायचा. पण नखं खाऊन पोट भरायची घाणेरडी सवय लागली होती सगळ्यांना!! हे आमचे शेजारी, तीन त्रिकाळ गिळणे, आठ तास कामाच्या जागेवर बसून येणे, आणि दर दोन वर्षांनी “साई कृपा, साई कृपा” म्हणत काळी, फेंगडी पोरे काढणे याशिवाय दुसरे काही करायचेच नाहीत. कधी हॉटेलात जाणे नाही. कधी एखाद्या संगीताच्या कार्यक्रमाला जाणे नाही. (स्वत:च्या) बायकोला बरोबर घेवून थेटरात जावून एखादा सिनेमा बघणं नाही. कधी एखाद्या बार मधे जावून, स्वत:च्या पैशाने चार पेग लावून,आकाशामधे प्रत्यक्ष चंद्राने केलेला शृंगार
बघणे नाही. कधी स्वत:चे चार पैशे लावून जुगार खेळायचे नाहीत.
नुसते घरकोंबड्या सारखे घरात बसून स्वत:च्या बायकोला शिव्या घालायच्या, मित्रांच्या बायकांचे कौतुक करायचे, परत स्वत:च्या बायकोने केलेले भात आणि सांभाराचे मुटके मुठीने पोटात सारायचे आणि बुड वर करून पडायचे, एवढेच यांना ठाऊक होते. आणि यांच्या टवळ्या बायका देखिल “रांधा, वाढा, आणि उष्टी काढा” याच्या पलिकडे गेलेल्या आमच्या तरी आढळात नाहीत.
(क्रमश:)
~निखिल कुलकर्णी

Thursday, January 16, 2020

मेहदी हसन - इक खलिश को

मेहदी हसन - इक खलिश को
~ निखिल कुलकर्णी
एखाद्या शायराच्या अंत:करणातून निघालेली वेदनेची लकेर मेहदी हसन यांच्या स्वर्गीय आवाजातून जेव्हा शब्द होऊन अवतरते तेव्हा ती श्रोत्यांच्या अंत:करणात हलकेच उतरते. तिथेच घोटाळत राहते. कधी अश्रू होऊन अर्ध्य देत राहते. कधी उसासे होऊन अनंतात विलीन होत राहते. आणि इथे एका वेदनेचा अस्वस्थ करत जाणारा प्रवास पूर्णत्वास जातो. ज्ञानोबा माऊली ज्या वैश्विक समभावाने "ये हृदयीचे ते हृदयी" याची संकल्पना मांडते, त्याच प्रगल्भतेची हि उर्दू प्रचिती. इथला शद्बनशब्द, गझल गायकाच्या प्रत्येक तानेगणिक नज्मकाराच्या अंत:कारणाचे व्याकुळ रंग सदैव आपल्याबरोबर घेऊन जसाच्या तसा श्रोत्याच्या काळजावर भावनांची नक्षी उमटवत जातो. मग कवी आणि गायक हे सरस्वतीचे दूत, कुठेतरी अज्ञातात अदृश्य होत जातात आणि रसिकाकडे शिल्लक राहते फक्त एक सबीज संप्रज्ञात समाधी. पतंजलीने त्याच्या एका योग सूत्रात या अवस्थेचे वर्णन केले आहे. तो म्हणतो,
वितर्कविचारानन्दास्मितानुगमात् संप्रज्ञात: ।।
इथे वितर्क म्हणजे रसिकाची अगदी खासगी आणि व्यक्ती सापेक्ष अशी कारणमीमांसा. रसिक, कवीचे अंतरंग आपल्या मनाच्या तळाशी ठेवून मग त्यात तो स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागतो. या मनाच्या तळ्यात कधी आनंदाचे डोह भरून वाहतात. कधी दुःखाचे उमाळे येत रहातात. आणि शेवटी इथे उरतात फक्त दोघेच. एक तो रसिक आणि त्याच्या जन्मापासून त्याच्या बरोबर आलेली त्याची अस्मिता...
आणि मग हलकेच त्याच्या अस्मितेचे सोनेरी रेशमी वस्त्र असंख्य धाग्यांचे जाळे होऊन त्याच्या समोर येते. यातला प्रत्येक धागा स्वतंत्र असतो. त्याचे दुसऱ्या कुठल्या धाग्याशी कसलेच नाते नसते. आणि मग तो बिचारा त्यातला एकेक धागा उचलून त्याच्याशी असलेली आपली जुनी ओळख तपासून पाहत राहातो. आधी केलेल्या बऱ्या-वाईट अनेक कृत्यांची त्याला आठवण होते. भेटलेली आणि सोडून गेलेली माणसे, त्यांचे चेहरे, त्यांनी मायेने नाहीतर क्रोधाने उगारलेले हात, कधी प्रेमाने तर कधी प्राणांतिक भीतीने मारलेल्या हाका, त्यांचे आवाज, त्यांचे श्वास आणि उच्छवास, केसात अडकलेल्या कुस्करून गेलेल्या फुलांचे वास, दिलेली, घेतलेली आणि मोडलेली वचने, नदीच्या पात्रातून चाललेली नाव, हातात हात घेऊन पाहिलेले सूर्योदय आणि सूर्यास्त, मोरपिसे, मुक्तीच्या अंतिम क्षणाची वाट पाहत ताटकळत बसलेल्या पुस्तकातल्या वाळून गेलेल्या पाकळ्या आणि त्यांनी पानापानावर उमटवून ठेवलेले त्यांचे तांबूस गहिवर... सगळे आठवते. भावनांची कारंजी उसळत राहतात. आणि त्या योगाने त्याच्याच जुन्या अस्मितेची नवीन ओळख त्याला पटत जाते. प्रत्येक वेळी..
अर्थात अशी समाधी लागायची तर तिथे कवी आणि गायकाचे वेगळे अस्तित्व असून लागी नाही. कवी आणि गायकाला त्या तळ्याच्या पाण्याच्या रंग धारण करावा लागतो. विश्वाच्या विहंगम अंतरंगात अनेकानेक वायूंच्या धारणेतून नुकत्याच निर्माण होत असलेल्या नव्या ताऱ्यासारखे जडत्वशून्य अस्तित्व होऊन राहावे लागते. अर्थात इथे कवी प्रत्यक्ष नसतोच. असतात ते त्याचे शब्द. त्यामुळे रसिकाची हि समाधी मग त्या गायकाचेच उत्तरदायित्व होऊन बसते. यासाठी गायकाला स्वत:च्या अस्मितेचा संपूर्ण विसर पडावा लागतो आणि रसिकाच्या संप्रज्ञात समाधीशी त्याला तादात्म्य साधावे लागते. हि खरे तर एक तपश्चर्याच आहे. किंबहुना कलेच्या इतर कुठल्याही तांत्रिक बाबींपेक्षा आणि आपले "गुण" किंवा त्यायोगे आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यापेक्षा रसिकांशी तादात्म्य पावणे हे सगळ्यात जास्त अवघड काम आहे. यासाठी त्या कलाकाराकडे एक निर्लेप वैराग्य असावे लागते.
तत् परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्ण्यम् ।।
याचा थोडक्यात अर्थ असा आहे कि ज्याची त्या महानतम पुरुषश्रेष्ठाची भेट झालेली आहे आणि त्यामुळे ज्याला आता कशाचीच, अगदी सत्व, रज आणि तम यातल्या कुठल्याच गुणांचीही कसलीही ओढ शिल्लक राहिलेली नाही तो खरा मुक्त आहे. आणि जो गायक, वादक, नर्तक, अभिनेता, शिल्पकार, चित्रकार हे करू शकतो, त्याची कला हि प्रत्येक आवृत्तीनंतर रसिकाला अधिकाधिक रुचत जाते. आणि मग नंतर कधीतरी तो सरस्वतीचा दूत हलकेच रसिकाच्या त्या मनातल्या तळ्याचाच एक भाग होऊन जातो. तीच त्याची खरी ओळख आणि तीच त्याची मुक्ती...
अर्थात हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. बहुतेक वेळा रसिकाची प्रत्येक दाद कलाकाराचा अहं सुखावत जाते. हरेक अविष्कारागणिक त्या कलाकाराचा अहं वर्धिष्णूच होत राहतो. आणि मग हळूहळू त्याची कला हि रसिकाच्या समाधीपेक्षा त्याच्या अहंकाराच्या वृद्धी साठी खर्ची पडू लागते. हा खरे तर कलाकाराचा आणि कलेचा देखील ऱ्हासच आहे. पण हे जाणणारी फार थोडी माणसे आहेत. आणि मेहदी हसन हे त्यात अग्रणी आहेत असे मला वाटते. त्यांच्या प्रत्येक तानेत एक निरागसता आहे. तब्बलजी बरोबर अधून मधून चाललेली विचारपूस, मधूनच श्रोत्यांमधल्या कुणाला तरी, "चाय हो गयी?" असा विचारलेला प्रश्न आणि त्यावर हसून, "इधर हो गयी" म्हणून खळखळून हसून दिलेले उत्तर. श्रोत्यांना वाटतच नाही कि, स्टेज वर कुणीतरी ख्यातकीर्त गायक गातोय असे. आपलाच कुणीतरी पुरानावाला यार सांगतोय गोष्टी त्याच्या हरवलेल्या क्षणांच्या आणि पुसतोय आपलीही वास्त डोळे पुसत पुसत असेच वाटत राहते. मग असे जीवाचे जोवलग भेटल्यावर काळीज भरून यायला वेळ नाही लागत.
अब के हम बिछड़े तो शायद कभी ख़्वाबों में मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले
पुस्तकातल्या फुलांच्या वाळून गेलेल्या पाकळ्यांची ओळख सांगून मैफिलीला सुरुवात होते. हरवून गेलेली प्रत्येक गोष्ट रुखरुख होऊन अस्मितेचे वस्त्र उसवू लागते. ते उसवलेले धागे, कोळ्याचे जाळे होऊन समोर फेर धरून उभे राहतात. असं का झालं, तसं का झालं याचा विचार करायची हि वेळच नाही. ती वेळ, ती गेली तेव्हाच निघून गेली. आता फक्त ढाळायचे दोन अश्रू आणि पाहत राहायचे आपलेच प्रतिबिंब..
ढूंढ उजड़े हुए लोगों में वफ़ा के मोती
ये खज़ाने तुझे मुमकिन है ख़राबों में मिले
कशाला शोधतोय मी कि, तिचं चुकलं कि माझं? काय फरक पडणार आहे? फरक पडणार नसेल कदाचित. पण मला शोधायला हवेत ते शपथांचे हरवलेले शुभ्र पाणीदार मोती काळाच्या तडाख्याने उद्ध्वस्त होऊन मोडून पडलेल्या या पडक्या वाड्यात. अरे कदाचित तुला ते सापडतील हि एखादया उकिरड्यावर... नाहीतरी त्या शपथांना आणि निष्ठांना आता विचारतोय कोण तुझ्या-माझ्या शिवाय!!
गम-ए-दुनिया भी गम-ए-यार मे शामील कर लो।
नशा बढता है शराबे जो शराबो में मिले ।।
मित्रा, ऐक माझे. तुझं थोडं दुःख ठेवून जा माझ्या कडे. माझे दुःखाचे समुद्र खूप खोल आहेत. आणि अरे हा समुद्र तुझाही आहेच कि...त्याला दुःखाची सवय आहे. व्यसनच आहे म्हण हवे तर. तुझी दुःखे मिळाली तर हे माझे समुद्र झाले तर थोडे आनंदीच होतील. थोडं दुःख ठेवूनच जा माझ्या कडे.
तू खुदा है, न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनों इन्सां हैं तो क्यों इतने हिजाबों में मिले
आणि असं बघ कि, अरे अश्रू लपवायला तू काय स्वत:ला देव-बिव समजतोस का काय? आणि माझं प्रेम म्हणजे सुद्धा कुठला ईश्वरी संकेत-फिंकेत अजिबात नाही रे बाबा. अरे साधी माणसे आहोत आपण. गोशातून बाहेर पड..माणसासारखा रडून घे एकदा... कसलीही फिकीर न बाळगता...
इथे माणूस स्वत:ला हरवून पुन्हा स्वत:लाच शोधत बसला नाही तरच नवल वाटावे अशी अवस्था आहे.
अब ना वो मै, ना वो तू है, ना वो माझी है फराझ
जैसे दो शक्स "तमन्नाओ के सराबो" मे मिले...
"तमन्नाओ के सराब" म्हणजे आकांक्षांचे आभास..आता तू हि ती राहिलेली नाहीस, मी पण तो राहिलेला नाही... आणि क्षुल्लक अपेक्षा आणि आकांक्षांच्या आभासांनी बरबटलेला आपला तो भूतकाळ, तो देखील मला दिसेनासा झाला आहे.
एक तर हि भाषा इतकी आर्त आहे कि, त्यातले साधे साधे शद्ब देखील खूप आत पर्यंत जातात. एकाच अर्थाचे अनेक शब्द जेव्हा आलटून पालटून डोकावून जातात, तेव्हा आत मध्ये काहीतरी तुटत राहतं. काहीतरी एकलग जळत राहतं.
प्रत्येक भाषेची काही बलस्थाने असतात. व्याकरण असतंच. पण त्याहून म्हणजे प्रत्येक भाषेचं एक स्वतःचं असं अभिजात संगीत असतं. तिला लय असते. नाद असतो. आणि ऐकणाऱ्याच्या कानातून थेट त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याची एक अगदी विशिष्ठ अशी लकब असते. मिरजेसारख्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या गावात हे भाषेचे संगीत अगदी प्रकर्षाने जाणवते. अर्ध्याहून अधिक घरे कानडीतून बोलतात आणि उरलेली मराठी. भाषा संपूर्णपणे वेगळी असली तरी संवाद होतच राहतो. हे मला तरी अतिशय विस्मयकारक वाटते. मराठी शाळेत शिकणाऱ्या कुणाची आजोळं कर्नाटकात असतात तर कुणाची महाराष्ट्रात. कितीतरी मराठी मुली कानडी घरात सून होऊन जातात. कितीतरी मराठी घरात कानडी सुना येतात. संपूर्णपणे वेगळ्या विश्वात आणि वेगवेगळ्या भाषा घेऊन जगलेली दोन भिन्न भाषिक माणसे रक्ताची नाती तयार करत पुढे जन्मभर एकत्र राहतात. अतिशय कौतुकास्पद आहे.
संस्कृतची तर्हा याहून वेगळी आहे. तिचा स्वत:चा असा एक रुबाब आहे. स्वभावत: थोडीशी फटकळ वाटली तरी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ व्यक्त करण्यात वाचकाला कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त समृद्ध करत जाण्याची ओढ जाणवते.
पूर्वी गणेश चतुर्थीला आमचे आजोबा आमच्या घरी वैदिक ब्राह्मण बोलवायचे. तेव्हा मी पहिली-दुसरीत असेन. या वार्षिक कार्यक्रमाचे नाव मोठे चमत्कारिक होते. त्याला म्हणायचे "म्हणणे म्हणणे". यातला पहिला "म्हणणे" काय म्हणायचे ते सांगतो आणि दुसरा "म्हणणे" काय करायचे ते सांगतो. तर मला या कार्यक्रमाच्या नावापासूनच जबरदस्त कुतुहूल आणि आकर्षण वाटायचे. वर्षभर मी या कार्यक्रमाची वाट पाहात असायचो. सकाळी गणपती बसवून झाले कि, दुपारी जेवण वगैरे झाल्यावर मिरजेतले पाच-सहा त्रिवेदी नाहीतर चतुर्वेदी घनपाठी वेदमुर्ती आमच्या घरी येत. एकाहून एक विद्वान मंडळी घरी आल्यावर गणपतीचे दर्शन घेत. आणि नंतर गणपती पुढे बसून पवमान म्हणत. नंतर पुरुषसूक्त, श्री सूक्त आणि मग शेवटी नारायण सूक्ताने याची सांगता व्हायची. दोन-तीन तासांचा कार्यक्रम चालत असे. या वेळात घरातले एकूण एक सगळे व्यवहार बंद झालेले असत. आजोबांच्या परिचयातले इतर लोक पण ऐकायला येऊन बसत. पण मंत्रोच्चार सोडले तर इतर कुठलाही आवाज होत नसे. वास्तविक ते काय म्हणायचे त्याचा अर्थ मला कळायचा नाही. पण त्या भाषेचे संगीत इतके प्रभावी आहे कि, ते नुसते ऐकत बसावे असे वाटायचे. त्याची लय, त्याचा नाद, त्याच्यातली विश्रांतीस्थळे, आपले प्राण, समान, व्यान, उदान आणि अपान हे पंचप्राण कानात आणून साठवून ठेवत असावेत असं वाटायचं. आणि इतर सर्वाचा अर्थाअर्थी विसर पडायचा. एक प्रकारचा योगच आहे हा. योग म्हणजे
योगश्चित्तवृत्तिनिरोध: ।।
चित्ताच्या वृत्ती म्हणजे मनाच्या अवस्था आपल्या संपूर्ण ताब्यात ठेवणे म्हणजे योग...त्यामुळे भाषेचं संगीत हि ती भाषा जरी भाषा म्हणून एखादेवेळी समजली नाही तरी त्यातून चित्त वृत्तींचा ताबा मिळवणे अगदीच शक्य आहे.
मला जितकी संस्कृत आवडते अगदी तितकीच फ्रेंच ऐकायला आवडते. अत्यंत नाद मधुर भाषा. भाषा कसली? संगीतच ते..आमचे एक इंग्लिश मित्र आहेत. त्यांचा मेहुणा फ्रेंच आहे. आम्ही भेटलो कि, मी त्याला हमखास फ्रेंच मध्ये काहीतरी बोलायला लावतो. तो बोलतो आणि मी डोळे मिटून ऐकत बसतो. हा अनुभव मला "म्हणणे म्हणणे" सारखाच वाटत आलेला आहे. मँडरिन, फिलिपिनो, स्पॅनिश, जापनीज कुठलीही भाषा याला अपवाद नसावी. त्यामुळे मला एक असं वाटतं कि, "तुमची भाषा कुठली?" हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. आणि त्याचबरोबर, "जी भाषा बोलता, लिहिता किंवा वाचता येते, ती तुमची भाषा" हे उत्तर त्याहून चुकीचे आहे. मला असे वाटते कि, जी भाषा तुम्हाला ऐकता येते, ऐकत राहावीशी वाटते आणि ऐकता ऐकता तुमची वाचा हरवून जाते, ती तुमची भाषा...
माणूस हा तीन चतुर्थांश पाण्याने भरलेला आहे. विवेकानंद म्हणतात कि, ध्वनी हा त्या पाण्यावर विशिष्ठ प्रकारचे तरंग निर्माण करत राहतो. काही तरंग आनंददायक असतात. काही दुःखी करतात. काही नविन ऊर्जा निर्माण करतात आणि काही शोषून घेत राहतात. आणि हे संपूर्णपणे व्यक्ती सापेक्ष आहे. त्यामुळे एखाद्याला ज्या भाषेच्या सहवासात समृद्ध झाल्यासारखे वाटते ती त्याची भाषा, असे म्हटले तरी ते चुकीचे होणार नाही.
उर्दू या भाषेविषयी अनेकांची अनेक मते आहेत. काही आत्यंतिक टोकाची आहेत. संस्कृत सारखेच या भाषेला देखील धार्मिक अंबारीत बसवून माणसाची साठमारी चालूच आहे. अर्थात "वाद" हा माणसाचा मूलभूत "छंद" असल्याने त्यांना तो घालू द्यावा. पण माझ्या मते उर्दू हि काळजाच्या खुप जवळची भाषा आहे. हि भाषा वाचली, बोलली, ऐकली तरी अनाहत चक्रे परत परत जागी होत राहतात. आणि माणूस अधिकाधिक हळवा होत जातो. अंतर्मुख होत जातो.
मेहदी हसन यांच्या मैफिलीत जेव्हा पेटीचा पहिला सूर उमटतो तिथून या समाधी गमनाची सुरुवात होते.
इक खलिश को हासील-ए-उमर-ए-रवा रहने दिया
जान कर हमने उन्हे ना-मेहेरबान रहने दिया
मला कळत नव्हते असे नाही कि, तिला माझा तिरस्कार वाटतो ते.. पण मी मुद्दामच तिला ते कधी सांगितले नाही. अहो होतच असतात जखमा प्रत्येकाला आपापली वाट चालत असताना. पण म्हणून काय तिला ती प्रत्येक जखम सांगितलीच पाहिजे का? राहू दिलं तिला तिच्याच समजुतीत आणि मी राहिलो वाट बघत... कसलीही अपेक्षा न ठेवता...
आरजू-ए-कुर्ब भी बक्षी दिलो को इष्क ने
फासला भी मेरे उनके दरमियाँ रहने दिया
दिलाचं कामच ते. एकदा इष्क झाल्यावर त्या दिलाने मला तिच्या जवळीकीची ओढ सुद्धा दिलीच होती. पण या प्रत्येक वेळी मीच ते अंतर कमी होऊ दिलं नाही. नसतात काही गोष्टी घडत त्याने सांगितलेल्या हे त्या वेड्या दिलाला आता कसे सांगणार?
कितनी दिवारोसे साए हाथ फैलाते रहे
इष्क ने लेकिन हमे बे-खानुमा रहने दिया
त्या उंच भिंतींवर कितीतरी सावल्या येऊन गेल्या. हात पसरून आलिंगन देण्यासाठी सांगून गेल्या. पण तुझ्या प्रेमाची बातच न्यारी. आम्ही अगदी आनंदाने आमची फकिरी परत परत ओढून घेत राहिलो. आणि जान कर हमने उन्हे ना-मेहेरबान रहने दिया...
अपने अपने हौसले अपनी तलब कि बात है
चुन लिया हमने तुम्हे सारा जहाँ रहने दिया
कौन इस तर्ज-ए-जफा-ए-आस्मान कि दाद दे
बाग सारा फुंक डाला आशिया रहने दिया
आता हा खरे तर ज्याच्या त्याच्या निष्ठेचा प्रश्न.. पण आम्ही जेव्हा तुझी निवड केली तेव्हा आम्ही साऱ्या जगावर केव्हाच उदक सोडले होते. आता या स्वर्गाच्या न्यायाला कोण काय म्हणणार..
मागच्या वावटळीत बाग केव्हाच उजाड झाली पण एक उदास घरटं मात्र शिल्लक राहिले आहे... काय काय हरवलं याचा शोध घेत...
ये भी क्या जिने मे जिना है बगैर उनके अदिब
शमा गुल कर दी गयी बाकी धुवां रहने दिया
विचार करतो कि, खरेच तिच्या शिवाय जगण्याला काही अर्थ आहे का? कदाचित ती वेळ देखील कधीचीच निघून गेली आहे. दिवा कधीचा शांत झाला होता. आम्ही आपले उगाचच त्याच्या अंधुक धुनीत तिचा चंद्रस चेहेरा शोधात बसलो झाले..
दुःख आहेच. अतिशय दुःख आहे...पण त्याची कसलीही तक्रार नाही. कुठे उच्चरवात केलेली आदळआपट नाही. सोडून गेलेल्या तिला, परिस्थितीला, नशिबाला कुठेही कसलाही बोल लावलेला नाही. एखादा शत्रूंनी पूर्णपणे वेढलेला आणि काही क्षणातच धारातीर्थी पडू पाहणारा समर्थ, पण तितकाच दुर्दैवी योद्धा, जितक्या धीरोदात्तपणे शत्रूचे शेवटचे वार अंगावर सहजपणे सोसेल, तितक्याच धीराने हा शायर त्याच्या दुःखाशी गोष्ट करतो आहे.
हि गझल मेहदीजीनी जगभरात अनेक ठिकाणी गायली आहे. त्याची वेगवेगळी रेकॉडरिंग्स पण आहेत. कधी ते बासरी बरोबर घेतात तर कधी सारंगी. वास्तविक बासरी हे खरं तर योगेश्वर कृष्णाचे वाद्य. इतर इतकी सगळी समर्थ वाद्ये असताना त्या योगेश्वराने बासरीच का निवडली असेल याचं उत्तर कदाचित मिळू शकेल इतकी अफाट बासरी या गझलेत वाजवली गेली आहे. असे म्हणतात कि, बासरी वाजवणे हा विश्वाला आणि त्याच्या निर्मात्याला धन्यवाद देण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. इथे ती वाजवणारा या विश्वातून चिमूटभर श्वास उसना घेतो. आणि त्याच्या बदल्यात तो सगळाच्या सगळा श्वास विश्वाला परतही देतो. आणि हे देत असताना तो त्या स्वरातून भाव विश्वाची निर्मिती करतो. आणि त्यातून विश्वाच्या निर्मात्याचे रंजन होत राहते. It is played by the soul, with the soul, and for the soul. इथे शिल्लक काहीच राहत नाही.
या गझलेत जी बासरी वाजवली आहे ती तांत्रिक दृष्ट्या कशी आहे ते मला सांगणे अवघड आहे. कारण मी खूप वेळा प्रयत्न केला तरी हि बासरी नेमकी कुठे सुरु होते, कुठे संपते आणि मेहदीजी कुठे गातात हे कळतच नाही. अतिशय समरस झालेलं आहे. इथे हा बासरी वाला, हा तबले वाला आणि हा गायक असा भेद अवघडच नाही तर अमंगळ देखील आहे. आणि दुसरे असे कि, गणेशवाडीची बासुंदी समोर आली, तर मांजर होऊन डोळे मिटून ती वाटीने प्यावी. त्यात बोटं घालून त्यातले चारोळे, जायफळ आणि वेलदोडे वेगळे शोधून काढण्याचा भलता उद्योग कशासाठी करावा?
वाईट एकाच गोष्टीचं वाटतं कि, जेव्हा कुणीतरी त्यांना "पाकिस्तानी" म्हणते. कागदावर रेघोट्या काढून तारांची कुंपणे घालत, खोट्या-नाट्या अस्मितांचे बिल्ले वाटणाऱ्यांची मला सगळ्यात जास्त भीती वाटते. हे लोक भाषा-भाषांना धर्मांच्या अंबारीत बसवून फिरवतात. हेच लोक कुठल्या कुठल्या तुकड्यांचे "राष्ट्रपिता" होऊन चलनी नोटांवरून मिरवतात. आपल्या बगल बच्च्यांसाठी नवनविन सिंहासने तयार करतात. आणि मग रिकाम्या वेळेत मेहदी हसन सारख्या अविमुक्तेश्वराला कुठल्या तरी एका देशाला, एका धर्माला आणि एका भाषेला बांधायचा अघोचरपणा करतात.
हे लोक एकूणच माणसाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत खूप मागे राहून गेले आहेत याचे अजून वाईट वाटते...
शेवटच्या काही दिवसात, जगभर संचार केलेला हा सरस्वतीचा लाडका लेक अंथरुणावरून उठू सुद्धा शकत नव्हता. लुबाडणाऱ्या लुच्च्या हातानी होते नव्हते ते कधीच ओरबाडून नेले होते. हॉस्पिटलची बिले थकली होती. डॉक्टरांनी उपचार देखील थांबवले होते. आता त्यांच्यापाशी राहिला होता फक्त त्यांचा आवाज. पण आता त्या आवाजाला साथ द्यायला शब्द देखील फुटेनासे झाले होते.
ज्याच्या शब्दांनी कित्येक हृदये स्फुंदून स्फुंदून रडली, मुक्त झाली, त्याचे हृदय आज अश्रू होऊन रडत होते. देशांच्या, भाषेच्या आणि धर्माच्या सीमा केव्हाच उल्लंघलेला तो आवाज, राहून राहून सांगत होता कि, "माझ्या संगीतावर पाकिस्तान इतकाच हिंदुस्थानचा देखील हक्क आहे. हिंदुस्थानने देखील माझ्यावर पाकिस्तान इतकेच प्रेम केले आहे. आणि मी त्यांचा सदैव ऋणी आहे..."
खरं तर कुणी कुणाचे ऋण मानायला हवे हाच प्रश्न आहे.
लेखनसीमा
मेहदी हसन - इक खलिश को
~ निखिल कुलकर्णी