Saturday, August 30, 2014

अमदूभाई

गुरुवार पेठेत सगळी मुसलमानाची घरं होती. मीरासाहेबाच्या दर्ग्याच्या आजूबाजूला सगळी अगदी दाटीवाटीनं राहायची. एकाला एक लागून असे मोहल्ले होते. मधेच कुठे पांढरे शुभ्र रंगवलेले मशिदीचे मिनार दिसायचे. मिनारावर सगळ्यात उंच एक चांद तारा आणी दोन बाजूला दोन असे लाऊड स्पीकर असायचे. मोठ्या पांढऱ्या शुभ्र उंच भिंतींची मशीद असायची. त्याच्यातून दिवसातून ५ वेळ न चुकता नमाज पढला जायचा. मशिदीत आत जायच्या आधी हात पाय धुवायला मोठी जागा असायची. मशिदीच्या बाजूला अगदी चिकटून चिकटून हिरव्या रंगात रंगवलेली २ किंवा ३ मजली घरे असायची. त्यावर खालच्या मजल्यावर कसली कसली दुकाने असायची. त्याच्यात अगदी सूरीला धार करून देण्यापासून ते वासाच्या अत्तरापर्यंत सगळा माल मिळायचा. त्यात एखादे अगदी मळकट पाटी लावलेले हॉटेल असायचे. हॉटेलवाला रस्त्यावरच भजी नाहीतर शेव तळत बसलेला असायचा. त्याच्या स्टोवचा आवाज आणि त्याच्याशी स्पर्धा करणाऱ्या आवाजात हिंदी सिनेमातली गाणी लावलेली असायची. वरच्या मजल्यावर कुटुंबे रहायची. बाहेर त्यांचे कपडे वाळत घातलेले असायचे. बायका वरूनच त्यांच्या पोरांना आरोळ्या ठोकून बोलवायच्या. दोन घरांच्या मध्ये अगदी अरुंद बोळ असायचे. त्यातून माणसांची, वाहनांची गिचमिड गर्दी असायची. बहुतेक सगळ्या घरांना नावं दिलेली असायची. अमुक मंजिल, तमुक मंजिल वगैरे नावे लिहून त्याच्यावर झकपक लायटिंग लावलेले असायचे. मधेच कुठे तरी कोंबड्यांची खुराडी असायची. दारा समोर ४-२ बकऱ्या बांधलेल्या असायच्या.  त्या अगदी मरण येईपर्यंत काहीतरी चघळत बसलेल्या असायच्या. त्यांचे अखंड ब्या ब्या चालू असायचे. एखाद दुसरी भाग्याची लेकुरवाळी आपल्या पिल्लाला दुध पाजत उभी असायची. त्यांचा निसर्ग दारातच पडलेला असायचा. मधेच एखादे तांबटाचे घर असायचे. त्याच्या घरातून अखंड अव्याहतपणे तांब्याच्या, पितळेच्या नाहीतर स्टीलच्या भांड्यांवर ठोके पडल्याचा आवाज येत राहायचा. घरातली १०-१२ मंडळी त्याच धंद्यात असायची. त्यामुळं दिवसाच्या कुठल्याही वेळेला हे असे ४-५ ४-५ च्या गठ्ठ्याने ठोके ऐकू यायचे. त्या ठोक्यांचा एक अगदी विशिष्ट ताल असायचा. बाजूला एखादा हातमाग असायचा. त्याच्यावर दिवस रात्र अखंड धोटा फिरत असायचा. बाजूला एखादी प्रिंटींगची प्रेस असायची. त्याच्यावर अव्याहत कसली न कसली तरी छपाई चालू असायची. याच्या मध्ये तमाशाच्या बोर्डाच्या जाहिराती पासून ते गणॆशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकापर्यंत सगळे काही छापले जायचे. मधेच पिठाची गिरणी असायची. त्यात काम करणारा मिया तर अखंड पिठात न्हालेला असायचा. डोळ्याच्या पापण्या देखील पिठूळ झालेल्या असायच्या. त्याच्या गिरणीचा आवाज त्याच्यात सामील व्हायचा. मध्येच एखाद्या घरी बायका आणि पोरे 'युसुफ' नाहीतर 'इब्राहीम' कंपनीच्या विड्या वळत बसलेली असायची. गुरुवार पेठेत 'युसुफ' ला 'इसूब' आणि 'इब्राहीम' ला 'बाबा' म्हणायचे. कुठे एखादा बागवान चिंचेचा नाहीतर जांभळाचा ढीग लावत बसलेला असायचा. त्याच्या बाजूला स्कुटर दुरुस्तीचे दुकान असायचे. त्या दुकानात तर म्हणजे अगदी तिसरी चौथी मधली पोरे सुद्धा गाड्या दुरुस्त करत बसलेली असायची. दुरुस्त झालेल्या स्कुटर परत परत चालू करून बघितल्या जायच्या. त्याच्यातून भयंकर धूर यायचा आणि पेट्रोल च्या धुराचा खरपूस खमंग वासही!! एक पोर स्कुटरच्या किक वर उभे रहायचे आणि दुसरे त्या स्कूटरचा कान पिळायचे. एकदा का ती चालू झाली मग अगदी खुशाल मनाला येईल तितक्या वेळेला त्या स्कुटर चा कान पिळला जायचा. मग कधीतरी त्या दुकानाचा मालक तिथे येउन त्या पोरांना न भूतो न भविष्यती अशा शिव्या द्यायचा. त्याला बघून पोरं सैरावैरा ओरडत पळून जायची. एखादे पोर हातात सापडले तर मालक ते चांगले ठोकून काढायचा. तो एकदा गेला कि परत येरे माझ्या मागल्या चा खेळ सुरु!! शेजारी सिनेमाचे थेटर होते. त्याच्यात दुपारी १२ वाजता अचकट विचकट सिनेमे लागायचे. त्याच्या दारात सोडा वाटर च्या बाटल्या वाले बसलेले असत. रात्री ७ नंतर अगदी ठराविक अंतराने त्यांच्या बाटल्यांचा चित्कार चालू व्हायचा. तो थेट रात्री १-२ पर्यंत चालायचा. 

रस्त्याच्या थोड्या कडेला भरपूर सजवलेल्या रिक्षा मोठमोठ्याने गाणी लावून नुसत्याच विश्रांतीला उभ्या असायच्या. त्याच्या वर अगदी ठळक आणी भडक शब्दात चकचकीत रंगात कसली कसली नावे लिहिलेली असायची. कसल्या कसल्या नक्ष्या काढलेल्या असायच्या. रिक्षाच्या आत हिरवे, निळे, लाल वगैरे दिवे लावलेले असायचे. त्या रिक्षाला मोटारीसारखे दार असायचे. या रिक्षा फक्त उभे राहण्यासाठीच असायच्या.  
कुणी कुठे येतो का विचारल्यावर अगदी स्पष्ट शब्दात नकार दिला जायचा. 

पठाणी विजारी नाहीतर मोठ्या चौकड्याच्या लुंग्या लावलेले बहुतेक पुरुष मिशा कापून टाकून भली थोरली दाढी ठेवायचे. डोक्यावर भरगच्च केस अगदी खाली खांद्यापर्यंत लांब वाढलेले असायचे. दाढीला आणी केसाला मेंदी लावून ते गडद लाल केलेले असायचे. डोक्यावर जाळीची पांढरी गोल टोपी असायची. डोळ्याला चकचकीत गॉगल आणि गळ्याभोवती लाल नाहीतर पारव्या रंगाचे रुमाल असे बारीक घडी करून गुंडाळलेले असायचे. एकेका घराच्या बाजूला १०-१० २०-२० पोरांचा गिल्ला चालू असायचा. पोरं अगदी बिनधास्त घाणेरड्या घाणेरड्या शिव्या देत एकमेकांच्या आई-बापाचा अगदी मुक्तपणे उद्धार करत फिरत असायची. एखाद्या वेळी एखाद्याचा बाप चुकून त्या शिव्या ऐकायचा आणि त्या पोरांनी दिलेल्या शिव्या काहीच नाहीत अशा शिव्या देत त्या पोराना बुकलुन काढायचा. मग पुढच्या वेळी पोरं या नव्या शिव्यापण द्यायला घ्यायची. बायका काळे बुरखे घालून ३-३ ४-४ च्या घोळक्यात फिरायच्या. मधेच एकमेकिकडे पाहून मान हलवायच्या आणि हसायच्या. 

अत्तराच्या दुकानातून येणारा वास, भजीच्या नाहीतर शेवेच्या तळपाचा वास, शेळ्या, कोंबड्या यांचे निसर्ग, हातमागातून उडणारं गरम-गरम बारीक सूत, गिरणीतून उडणारी अनेक प्रकारची पिठं, विडयाची तंबाखू, उघड्या गटारी, त्या तुंबू नयेत म्हणून त्यातून बाहेर रस्त्यावरच काढून ठेवलेले केशरघन या सगळ्याचा मिळून एक अगदी सणसणीत उग्र दर्प सगळ्या मोहल्ल्यात भरून राहिलेला असायचा.

कुणी शांत बसून एखादे पुस्तक वाचतोय किंवा कुणी एखादे चित्र काढतोय किंवा कुणी छान गाणे गातोय वगैरे असला प्रकारच नाही. जो दिसतोय तो कसल्या तरी घाईत. भयंकर शक्ती लावून सगळ्या गोष्टी चाललेल्या असत.  प्रत्येक व्यक्तीला आणि त्याच्या प्रत्येक कृतीला स्वतःचा असा एक वैशिष्ठ्य पुर्ण असा आवाज होता!! 

गुरुवार पेठेचे विधिनिषेधच वेगळे होते. एकाच्या गोंगाटाशी दुसऱ्याला काहीही देणं घेणं नव्हतं. यातले कुणी फारसे संवादी नसले तर ते वादी हि नव्हते आणि प्रतीवादीही नव्हते. त्याला कसले एक सूत्र नव्हते इतकेच. जगण्याची रीतच वेगळी होती. 
              
या सगळ्या विसंवादी स्वरात एक स्वर्गीय स्वर मात्र त्याची ओळख जपून होता. तो स्वर होता सतारीचा. गुरुवार पेठेच्या अगदी टोकाला अगदी ब्राम्हणपुरीला लागून सतार मेकरची काही घरे होती. त्याला सतारमेकर गल्लीच म्हणायचे. हि घरे मात्र गुरुवार पेठेतल्या इतर घरांपेक्षा फार वेगळी होती. गुरुवार पेठेच्या कोपऱ्यावर ब्राम्हणपुरीला लागून अमदूभाईचं घर होतं. अमदूभाईचं खरं नाव अहमद नसीर मिरजकर. पण सुरांच्या संगतीत बापाच्या हाताखाली सतारीच्या तारा बांधताना कधीतरी त्याचा अमदु झाला आणि नंतर कधीतरी जशी केसाला मेंदी लागली तसा त्याचा अमदुभाई झाला. पांढरा नाहीतर मोतिया रंगाचा स्वच्छ कुर्ता, पांढरी आखूड विजार, धुळीच्या रापानी भरून गेलेली पायावरच्या भेगांची नक्षी, ओठावर अगदी बारीक मिशांची रेघ, गालावरून गोल कोरलेली मेंदीने रंगवलेली खुरटी दाढी, डोक्यावर वेल्वेटची काळी रामपुरी नवाबी टोपी आणि हातातल्या जवळ जवळ सगळ्या बोटात घातलेल्या सतारीच्या नख्या, तोंडात शिल्लक राहिलेले ४-२ दात आणि त्याच्या सोबतीला भिजत घातलेली सुपारीची ४-२ खांडके. एवढ्या भांडवलावरती हा माणुस बादशहा सारखा जगला. हि बादशाही सोन्या-चांदीची, हिऱ्याची-मोत्याची नव्हती. हि बादशाही होती मोठ्या मनाची. रागातल्या एकेका जागेची. भीमसेन जोशींच्या मालकंसाची. बडे गुलाम अली खान साहेबांच्या धृपद धमाराची. अमीर खान साहेबांच्या बडा खयाल ची. बाळकृष्णबुवा क्षीरसागरांच्या दरबारीची. हि बादशाही होती केसरबाई केरकारांच्या मुलतानीची. गंगुबाई हंगलाञ्च्या मल्हाराची. बादशाही कसली? खरे तर हि फकीरीच. पण फकीरीसुद्धा अब्दुल करीम खां साहेबाच्या समाधीची!! स्वर आणि ताल याला बांधून जन्माची नाव लहानपणीच सोडून दिली होती. हाताला काय लागले याचा कधी विचार केलाच नाही. कानात एकदा प्राण आणून ठेवले कि मग हातापायाला काही लागतही नाही. उभा जन्म सतारीच्या तारा लावण्यात आणि तरफा बांधण्यातच गेला. तारेच्या प्रत्येक झणत्कारात नाद ब्रम्हाचा आस्वाद घेताना तारा बांधताना फाटलेली, रक्ताळलेली बोटे कधी आठवलीच नाहीत. 

पंढरपूरच्या बाजूला कुठेतरी सतारीचे भोपळे मिळायचे. वर्षा-सहा महिन्यातून एकदा ते रिक्षातून भरून घेऊन यायचे. त्याला पुष्कळ दिवस लागायचे. तोपर्यंत तो भोपळा कसल्यातरी तेलात आणि सरसात भिजत घातलेला असायचा. त्या सरसाचा आणी तेलाचा गोड गुळमट वास घर भर पसरलेला असायचा. त्याचे २ तुकडे करून जो चांगला गोल असेल तो ठेवायचे आणी मग अर्धा कापलेला लाकडाचा लांब ओंडका त्याच्यावर ठेवून चांगला घट्ट बसेल असे करून ते एकमेकात अडकवून बांधून घालायचे. आतून बाहेरून छोट्या छोट्या पट्ट्या चिकटवून ते चांगले एक संध करून घेतले मी मग अमदु भाई त्याला साज चढवायला घ्यायचे. सुरुवातीच्या काळात बारीक हस्ती दंतांची जरी बुट्टी काढली जायची. हस्तिदंताचे मणी आणि बदके लावायचे. पण नंतर नंतर हस्ती दंतांची जागा पांढऱ्या प्लास्टिक ने घेतली. अमदुभाई ला काही ते फारसे आवडायचे नाही. कुणीतरी विचारायचे हस्ती दंत लावता का म्हणून. अमदु भाई मजेत म्हणायचे "उससे अच्छा मेराच दात लगाते है।". कुणी जुनी सतार देऊन नवीन सतार घ्यायला यायचा. त्याच्या सतारीवरचा हस्तीदंत पाहून अमदुभाई ना भरून यायचे. त्याला अगदी परोपरीने जुनी सतार विकू नको म्हणून सांगायचे. वास्तविक नवीन सतार विकली तर अमदु भाईला ४ पैसे जास्त मिळायचे. पण इथे पैशाचा सवालच नव्हता. निर्जीव भोपळ्यातून, लाकडाच्या ओंडक्यातून आणि रोज्लो च्या तारांमधून जेव्हा स्वर्गीय स्वर निघायचे तेव्हा अमदु  भाई जिंकायचा. इथे पैशाचा प्रश्न येतोच कुठे!! त्या गिऱ्हाईकाची जुनी सतार अमदु भाई ठेवून घ्यायचे. तिच्यावर एखाद्या पोटाच्या पोरासारखे उपाय चालू व्हायचे. सगळ्या तारा, तरफा बदलून बघायचे. सतारीच्या तारां वरची बदके आणि मणी बदलून बघायचे.  भोपळ्याला कुठे भोक आहे का नाहीतर भोपळ्याला जिथे सतारीची दांडी जोडलेली असते तिथे एखादा सांधा सुटलाय कि काय ते बघायचे. सतारीची घोडी बदलून पोलिश करून घ्यायचे. एखादी खुंटी निसटली आहे का ते बघायचे. जवारी काढायचे. एखादा तज्ञ सर्जन जितक्या तन्मयतेनं आपल्या पेशंट कडे बघत नसेल तितक्या तन्मयतेने हे काम दिवस रात्र चालू असायचे. तोंडाने एखाद्या रागातली बंदीश गुणगुणायचे. जेवण खाण कशाचीही शुद्ध नसे. त्या सतारीतून मनासारखा खर्ज आणि मनासारखी मिंड निघे पर्यंत हा योगी निश्चल आणि अटल योग करायचा.                   

घरची परिस्थिती गरीबच होती. इथे लक्ष्मीपेक्षा सरस्वतीला मान मोठा होता. कुणा गिर्हाइकाचा मुलगा नाहीतर मुलगी एखादे तंतू वाद्य शिकतो म्हणाला की अमदु भाई त्याला ते वाद्य अगदी फुकट आणुन द्यायचे. कधी मग ते त्याच्या कडेच तयार असायचे नाहीतर कधी आपल्याच भाऊबंदाच्या दुकानातून उधार आणून द्यायचे. याच्यात कधी सतार असायची. कधी एखादा सूर सोटा नाहीतर कछुवा असायचा. कधी वीणा असायची. कधी सूर बहार असायचा. कधी कधी तर अगदी वायोलिन सुद्धा आणून द्यायचे. पैसे किती द्यायचे विचारले तर म्हणायचे ' पहिले इसकू बजाने ते देओ। देखो कैसा जमता है।नाही जमा तो वापस देओ।'. अमदु भाई च्या मते वाद्याचं आणि वादकाचं नातं हे लग्नासारख. एकदा सुत जमलं कि झालं. जन्मासाठीच्या गाठी. तेव्हा ते जमतंय का हे बघायला ते कधी विसरायचे नाहीत. त्यांचा प्रश्न असायचा 'किसके पास जाते हो बेटा?' मग त्याच्या गुरूची, त्या गुरूच्या घराण्याची, गुरूच्या गुरूची सगळी बारीक सारीक माहिती सांगायचे. त्या गुरुकडून काय काय शिकता येईल ते पण सांगायचे. त्या घराण्याच्या काय लकबी आहेत ते सांगायचे. त्या घराण्याचे मोठे प्रसिद्ध गायक आणि वादक कोण ते सांगायचे. त्यांचे कुठले राग त्यांना आवडतात, कुठली एखादी विशिष्ठ बंदिश आवडत असेल तर ते सांगायचे. ते पोर म्हणजे अगदी भारावून जायचे. खरेतर त्याच्याहून जास्त अमदु भाई भारावून गेलेले असायचे. एक नवीन शागीर्द हिंदुस्तानी संगीत शिकायला घेतोय आणि ते पण तंतू वाद्याचे म्हटल्यावर अमदुभाई खुश!!हे सांगताना त्यांच्या डोळ्यात कसलीतरी विलक्षण चमक दिसायची. 

अमदुभाईच्या दुकानात अजून एक जण अधूनमधून यायचा. त्याचं नाव नईम. त्याचे पुर्ण नाव कुणालाच माहित नव्हते. नईम तबल्याची ऒढ काढायचा. अनाथच होता त्यात भर म्हणुन मुकाही होता. त्याला घर दार काहीच नव्हते. अशी हनुवटीच्या फक्त खाली दाढी यायची. डोळे खूप आत गेलेले असायचे. केस बरेच वाढलेले आणि विस्कटलेले असायचे. त्याचे कपडे देखील मळलेले आणि फाटलेले असायचे. त्यांच्यावर धुळीचा राप चढलेला असायचा. त्याचे दोन्ही पाय कमरे पासून एकमेकांच्या विरुद्ध दिशेला वळलेले होते. त्यामुळे त्याला ते नीट उचलता पण यायचे नाहीत. चालताना विलक्षण फेंगडी पावले जमिनीवरून खरडत ओढत तो चालायचा. खांद्याला परत एक आडवी झोळी लावून नईम लोकांच्या घरी खुरडत चालत जायचा. तबल्याची ऒढ मात्र उत्तम काढायचा. सांगली आणि मिरजेत त्याच्यासारखी ओढ काढणारा दुसरा कुणीही नव्हता. संगीतातल्या सगळ्या लोकांना नईम हमखास लागायचा. सांगलीला शिवाजी मंडईच्या जवळ एक तमाशाचे थेटर होते. त्या थेटर मध्ये नईम राहायचा. त्याबदल्यात तमाशातल्या ढोलक्यांची फुकट ओढ काढून द्यायचा. ओढ काढायचं काम फार कष्टाच होतं. बैलाच्या कातड्याची जाडी भरडी लांबच लांब वादी असायची. ती दुसऱ्या  एका तसल्याच पिळलेल्या वादीमधून ओवलेली असायची. तबला नाहीतर डग्गा असा पायात धरून ती वादी हातात धरून उर फुटेस्तोवर जोर लावून ओढावी लागायची. प्रत्येक हिसक्याला ती थोडीशी ओढली जायची. जोपर्यंत ती अजिबात ओढली जात नाही तोपर्यंत नईम ती ओढत बसलेला असायचा. घामेघूम झालेला असायचा. कधी कधी हातातून रक्त यायचं. नंतर मग त्या वाढलेल्या वादीची एक मोठी गाठ मारून, खुंट्या परत लावायचा. सगळ्या कामाचे खरेतर आधी १० रुपये ठरलेले असायचे. पण काम झाल्यावर कुणी ५ रुपयेच द्यायचे तर कुणी नुसतेच जेवून जा म्हणायचे. काय मिळेल ते घेऊन, वर एका हाताने नमस्कार करून, त्याची झोळी घेऊन नईम, खुरडत खुरडत पुढच्या घरी जायला निघायचा. तक्रार कसलीच नव्हती. अमदुभाईचा नईम वर जीव होता. एकतर मुका जीव. काय मिळवतो काय खातो कुठे झोपतो कुणास ठाऊक. अमदुभाईच्या मते नईमची संगीताची सेवा फार मोठी होती. कधी कुणी गिऱ्हाईक अमदुभाई कडे नईमची आणि त्याच्या दराची चौकशी करायचे. अमदुभाईचा जीव तिळ तिळ तुटायचा. असल्या फाटक्या तुटक्या नईम बरोबर सुद्धा दराची घासाघीस करणारी गिऱ्हाईके पाहून अमदुभाई खिन्न व्हायचे. 

अमदुभाईची पोरं पण घरीच सतारी बांधत बसायची. अमदुभाईच्या शब्दाच्या बाहेर कधी कोणी गेले नाही. शेवटचा शब्द अमदुभाईचा. अमदुभाई नी एकदा सांगितले कि षड्ज लागत नाही म्हणून की लगेच पोरे पुर्ण बांधलेली सतार उलगडायची. भोपळ्याच्या आत कुठे कुठे लाकडाच्या पट्ट्या लावायची. खुंट्या बदलायची. तारा बदलायची. आणि परत बांधून अमदुभाई ला दाखवायची. अमदुभाईच्या कानात षड्ज पक्का बसला होता. सतार जोपर्यंत तो षड्ज बोलत नाही तोपर्यंत हे अगणित वेळा चालायचे. एकेका सतारीला २-२ ३-३ आठवडे लागायचे. पण कुठेही तडजोड नसायची. अमदुभाईचा वकूब खूप मोठा होता. 

मीरासाहेबाच्या दर्ग्यात दर वर्षी उरूस भरायचा. दर्ग्याच्या आजूबाजूला खूप तंबूची दुकाने लागायची. खाऊ, रंगीबेरंगी फुगे, झोपाळे, उंचच्या उंच पाळणे, पिपाण्या, रंगीबेरंगी पिसांच्या टोप्या यांची अगदी रेलचेल असायची. रात्री दर्ग्यात शास्त्रीय संगीताच्या मैफिली असायच्या. रात्री १० पासून ते अगदी सकाळी ६ वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालायचा. गायला आणी बजावायला देशातील अगदी नामवंत मंडळी आवर्जून हजर असायची. याच्यात भीमसेन जोशी येवून जायचे. विष्णू दिगंबर पलुस्कर यायचे. निवृत्तीबुवा सरनाईक यायचे. विलायतखान साहेब यायचे. आमिर खान साहेब यायचे. हरिप्रसाद चौरासिया यायचे. झाकीर हुसेन यायचे. निखिल ब्यानर्जी यायचे. रवि शंकर यायचे. गंगुबाई हनगल यायच्या. एकामागोमाग एक अशा मैफिली रंगत जायच्या. सकाळ कधी झाली ते कळायचे देखील नाही. या सगळ्या मंडळीना बोलवायचा जिम्मा असायचा अमदुभाई कडे. अमदुभाईच्या शब्दाला मान देत मंडळी लांब लांब हून यायची. स्वर्गीय स्वरांनी दर्गा आणि गुरुवार पेठ भरून जायची. येणाऱ्या कलाकारांची इतकी गर्दी असायची कि दर्ग्यात गायला मिळाले तरी नशीब अशी अवस्था असायची. छोटे छोटे कलाकार तर दोन मोठ्या कलाकारांच्या मधल्या ५-५ मिनिटात देखील त्यांची कला सादर करायचे. 'दर्ग्यात गायलो' किंवा 'दर्ग्यात वाजवून आलो' हे एक प्रशस्ती पत्रकच होते. हिंदू, मुस्लिम असला कसला हि भेदभाव नसायचा. मुसलमानांच्या दर्ग्यात एखादा हिंदू गायक अगदी बिनधास्त 'माता कालिका' सादर करायचा तर एखादा मुसलमान गायक 'आज राधा ब्रिज को चाले' सादर करायचा. आणि दर्ग्याच्या आत आणि बाहेर जमलेला हिंदू आणि मुस्लिम रसिक कानात प्राण आणुन ते ऐकायचा. टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. 'वाह वा' 'क्या बात है' 'बहोत खूब' असे आनंदाचे कारंजे उसळायचे. त्या आनंदाला ना कुठली जात होती ना कुठला धर्म!!
   
या सगळ्या मैफिलीचा पहिला सेवक होता अमदुभाई. कलाकाराला त्याची कला सादर केल्याचा जेवढा आनंद व्हायचा तेवढाच आनंद त्याला अमदुभाईला भेटून व्हायचा. सगळे कलाकार अमदु भाईची गळा भेट घ्यायचे. अमदुभाई त्यांना वाकून नमस्कार करायचे. उरुसाचा आशीर्वाद म्हणून एखादी शाल कलाकाराच्या खांद्यावर ठेवायचे. तेवढेही त्या कलाकारांना पुरायचे. कलाकारांच्या निष्ठा हि वेगळ्या होत्या आणि अमदुभाई चे प्रेमही अजब होते. पुढे वर्ष भर अमदुभाई काय काय नवीन वाद्ये तयार करून या कलाकारांच्या घरी जायचा. कुणी मुंबईला राहायचे. कुणी दिल्लीला तर कुणी कलकत्त्याला. अमदुभाई एखादी फर्मास सतार नाहीतर सूर बहार तयार करायचा आणि सरळ रेल्वेत बसून कलकत्त्याला हजर व्हायचा. त्या कलाकाराला ते वाद्य दाखवायचा आणि त्याच्या कडेच ठेवून परत यायचा. पैशाचा प्रश्नच नव्हता. 'उस्ताद आप बजाके तो देखो। अच्छी लगी तो रख लेना। नही तो मै ले के जाने को वापस आता है। ' एवढी एकच प्रेमाची बात असायची. अमदुभाईची बीबी या सगळ्या प्रकाराने फार परेशान असायची. तिला अमदुभाई चे एकच उत्तर असायचे 'देखो उस्ताद विलायत खान दिल्ली और कलकत्तेकि सितार छोड कर के  अपनी मिरज वाली सितार बजाता है। और क्या चाहिये तुझे?' ते प्रेमच वेगळे होते. एक जण निर्जीव लाकडातून जिवंत स्वर तयार करत होता आणि एक जण त्या स्वरातून भावनांचं विश्व उभं करत होता. एका फ़नकाराने तुझ्या फनकाराकडे काय मागावे!! दर्ग्यात गात गात एकेक कलाकार मोठा होत गेला. त्यांची प्रसिद्धी, पैसा, मान-पान सगळे वाढतच गेले. कुणाचा पद्मश्री झाला. कुणाचा पद्मविभूषण झाला. तर कुणाचा भारतरत्न झाला. अमदुभाईचा मात्र अमदुभाईच राहिला.     

त्या दिवशी धारवाडहून कुणीतरी बुवा गायला बसणार होते. हिंदुस्तानी आणि कर्नाटकी अशी जुगलबंदी होती. २-३ तबले आणि १ मृदुंग लागणार होता. कलाकार मंडळी एक दिवस आधीच मिरजेत पोचली. तालमीच्या वेळेला एक तबला चांगलाच उतरला होता. अमदुभाईला सांगावा गेला. अमदुभाईने नईमला सांगलीहून बोलावून घेतले. तो हि खुरडत खुरडत आला. बघता बघता त्याने सगळ्या तबल्याची, डग्ग्याची आणि मृदुन्गाचीही ओढ काढली. कलाकार मंडळी नव्या उत्साहाने तयारीला लागली. रात्री २ ला त्यांची गाण्याची वेळ होती. नईम दर्ग्याच्या बाहेर जाऊन बसला आणि अमदुभाई आत. अप्रतिम गाणे झाले. सगळ्या कष्टाचे चीज झाले. मंडळी दमली होती. गाणे झाल्यावर लगेचच्या गाडीने निघून सुद्धा गेली. नईमच्या पैशाची कुणाला आठवण देखील झाली नाही. अमदुभाईनी बाहेर येउन बघितले तर एका खांबाला टेकून नईम वाळुतच झोपला होता. अमदुभाईला काय झाले कुणास ठाऊक!! त्यांनी धावत जाउन नईमला उठवले आणि घट्ट मिठी मारली. म्हणाले 'नईम बेटा क्या तबला जमाया तूम!! वो बुवा तुम पे इतना खुश हुवा कि तेरे वास्ते मुझे सौ रूपे देके गया।' आणि अमदुभाई नईमच्या खांद्यावर हात टाकून चालू लागले.                                 

6 comments:

  1. Connect Your Blog to http://marathiblogs.in and get more marathi visitors to your Blog.

    मराठी पुस्तके वाचायची आहेत ?
    तुमच्या शहरात मिळत नाहीत ?
    मग भेट द्या की मराठीबोली.कॉम http://marathiboli.com
    सर्व पुस्तकांवर १०% सवलत .
    ना नफा ना तोटा संकल्पनेवर आधारित एकमेव संकेतस्थळ.

    ReplyDelete