चिकोडीकर वाड्याच्या परड्यात गल्लीतली १०-१५ पोरे रोज जमायची. चिकोडीकरांचा सरदारी वाडा पार ३०० वर्षे जुना होता. त्याला किल्ल्याला असते तसले लाकडाचे भले मोठे दार होते. त्याला मोठ्या मोठ्या लोखंडी पट्ट्या लावून तो इतका जड झाला होता कि तो दरवाजा उघडायला आणि लावायला ३-४ माणसे तरी लागायची. त्या दरवाज्याला भल्या मोठ्या, हत्तीच्या पायात असतात तसल्या लोखंडी साखळ्या होत्या. भले मोठे कडी कोयंडे होते. तो दरवाजा लावला कि आधी त्याच्या साखळ्या लावून घ्यायचे. त्याच्या मागे भिंतीत खोल गेलेला मोठा चौकोनी लाकडी आडणा होता. त्या आडण्याला ओढून बाहेर काढण्यासाठी लोखंडाच्या जडशीळ कड्या होत्या. एकदा दरवाजा लावला कि मग शेजारच्या भिंतीतून तो आडणा ओढून ठेवून देत. म्हणजे जरी चुकून एखाद्या वेळेस हत्तीच्या वगैरे धडकेने दरवाजाच्या कड्या उघडल्याच तरी दरवाजा आडण्यावर धडकून पुन्हा बंद व्हायचा. त्या दरवाज्याला एक दिंडी दरवाजा होता. तो दिंडी दरवाजा देखील इतका मोठा होता, कि लहान पोरंच काय पण थोडी बुटकी मोठी माणसे देखील त्याच्यातून न वाकता सरळ ताठ चालत जायची. तो दरवाजा एकदा उघडला कि त्याला अडसर म्हणून मोठे २ तोफांचे दगडी गोळे तिथे ठेवलेले असायचे. मुख्य दरवाज्यातून आत गेलं कि मोठी पडवी होती. त्यात एक जुने सुपारीचे झाड होते. त्याला सुपाऱ्या लागलेल्या कधी कुणी पहिल्या नाहीत. त्याला काही सावलीही नव्हती. उगाच आपल्या ४-२ झावळ्या उंच कुठेतरी वाऱ्यावर मिरवत बसलेल्या असायच्या. पण बरीच वर्ष झाली तरी कुणी ते झाड तोडले नाही. सुपारीच्या झाडाला लागून मोठा सोपा होता. त्या सोप्याला काळी कुळकुळीत अगदी मऊ शहाबादी फारशी घातलेली होती. सोप्याच्या एका बाजूला गुरे बांधायचा गोठा होता. वास्तविक वाडा जेव्हा बांधला तेव्हा कदाचित तिथे घोडे बांधत असावेत. सोप्यातच एक पितळी नक्षीदार साखळ्यात बांधलेला एक शिसवी झोपाळा होता. कडिपाटाच्या फळ्या एकमेकात गुंतवून त्याचा मोठा पाट केला होता. त्याच्या चार कोपऱ्यात प्रत्येकी एक असे पितळ्याचे तगारीच्या फुलासारखे एकेक फुल उलटे लावलेले असून त्या फुलातून साखळ्या ओवून घेवून त्या छताला लावलेल्या असत. सोप्याच्या खाली वास्तविक एक मोठे अंधारलेले पेव होते. पूर्वी याच्यात धान्य वगैरे ठेवत असावेत. त्या पेवाचे एक तोंड बरोबर झोपाळ्याच्या खाली उघडत असे. त्याच्यावर एक लाकडी पाट टाकून ते बंद करून घेतलेले होते. झोपाळ्यावर बसले कि त्या लाकडी पाटावर पाय लागायचा. त्या पाटाचा आणि पितळेच्या कड्यांच्या एक विशिष्ठ गोड आवाज येत राहायचा. लहान लहान तान्ही मुलं तर झोपाळ्यावर बसली कि लगेच झोपून जायची. कित्येक आया, पोर अगदीच ऐकेनासे झाले कि त्याला झोपवायला या झोपाळ्यावर यायच्या. वाडा पोराला आवडायला लागायचा!
सोप्याच्या पुढे एका बाजूला माजघर होतं आणि त्याच्या समोर बाळंतीणीची अंधारी खोली होती. बाळंतीणीची खोली इतकी अंधारी होती कि डोळ्यात बोट घातले तरी दिसायचे नाही. माजघराच्या एका बाजूला देवाची वेगळी खोली होती. माज घराच्या पुढे मग जेवणाची जागा होती आणि त्याला लागूनच मोठे स्वयंपाक घर होते. इथे खूप मोठी मातीची चूल होती. त्याच्या बाजूला पुरुष भर उंचीची तांब्याची घंघाळी होती. स्वयंपाक घराच्या एका बाजूला मोठे तुळशी वृंदावन होते आणि त्याच्या मागे न्हाणीघर होते. या न्हाणीघरात देखील पाणी तापवायला म्हणून तांब्याचे मोठे घंघाळ होते. लाकडाच्या धगीने तापून तापून ते काळे करंद झाले होते. त्याच्या बाजूला पाण्याचा एक मोठा हौद होता. न्हाणीघराच्या मागे परडे होते. खूप मोठी मोकळी जागा होती. एका बाजूने वैरणीच्या खोल्या होत्या. एका बाजूला खूप खोल आणि चौकोनी आड होते. त्या आडावर एक रहाट होते. बरेच दिवस न वापरल्याने ते गंजून गेले होते. आड खूप खोल होते आणि त्यात विशेष पाणी नसायचे. त्यामुळे वरून बघितले तर फक्त काळा गुढ चौकोन दिसायचा. अंत नसलेला!! या आडाला आणि वाड्याच्या भिंतीला लागून वडासारखी अजस्त्र चिंचेची झाडे होती. एकेका झाडाचा घेर प्रचंड होता. त्यांचा विस्तार देखील असा होता कि जमिनीवरून वेगवेगळी उगवलेली हि झाडे आकाशात अगदी हातात हात घालून उभी होती. यातल्या कुठल्याही एका झाडावर चढून कुठल्याही झाडावरून खाली उतरता येत असे.
दर रोज दुपारी गल्लीतली १०-१५ पोरं तरी इथे हजर असायची. सकाळची शाळा आटोपली कि पोरं आपल्या घरी शाळेचे दप्तर टाकून तडक चिकोडीकर वाड्याच्या परड्यात हजर व्हायची. मग सुरु व्हायचा खरा दिवस!! सर्वात आधी झाडावर चढून चड्डीच्या एका खिशात थोड्या कच्च्या आणि दुसऱ्या खिशात गाभुळलेल्या चिंचा भरल्या जायच्या. मग त्या चिंचा खात खात पुढच्या खेळाची तयारी सुरु व्हायची. कधी लपंडाव, कधी सूरपारंब्या, कधी गोट्या नाहीतर कधी चिन्नी दांडूचा निश्चय व्हायचा. पण यातला सगळ्यात आवडता खेळ म्हणजे चिंचोके. या खेळाचे मुख्य भांडवल म्हणजे चिंचोके. मुबलक चिंचा खाउन त्याचे चिंचोके आधी गोळा करावे लागत. जो जास्त चिंचा खाईल त्याचे भांडवल जास्त! त्यासाठी मग पोरं बराच वेळ झाडावरच असत. पोट भरे पर्यंत किंवा चिंचोक्यानी खिशे भरे पर्यंत पोरं झाडावरच असायची. त्यात एखाद दुसरे पोर हात सुटून झाडावरून पडायचे देखील!! पण पडून लागले म्हणून इतर तसल्याच शेम्बड्या पोरांसमोर रडायची त्याची काय बिशाद होती!!कुणी झाडावरून पडले तर त्याचे स्वागत मोठमोठ्याने हसून आणि बोटे दाखवून व्हायचे. पोर पडल्या पडल्या बाकीच्या भाग्यवंतांचा झाडावरून मोठा गिल्ला व्हायचा. त्यापुढे पडल्याचा आवाज देखील दबून जायचा. पोरं मोठमोठ्यानं हसायची. खिदळायची. एकमेकांना तोंड वेडावून दाखवायची. या सगळ्याचा परिणाम म्हणून पडलेले पोरं जणू काही झालेच नाही अशा तोऱ्यात उठायचे आणि परत तडक जिथून पडले होते तिथे जावून बसायचे. हात नाहीतर पाय ठणकत असायचा पण सांगायची सोय नसायची. जोरात लागले म्हणून रडावे तर 'रडू बाई रडू कोपऱ्यात बसू' म्हणून गिल्ला व्हायचा. घरी निघून जावे तर 'भित्री भागूबाई' असा गिल्ला व्हायचा. चिडून एखादाला शिव्या घालील तर लगेच झाडावरून गाणे सुरु व्हायचे 'चिडका बिब्बा चिडला. झाडावरून जाऊन बसला. झाडाखाली सुपारी. तुझे लग्न दुपारी. लग्नाला आले पाहुणे. ते तुझे मेहुणे. मेहुण्यांनी आणले काळे कुत्रे. ते तुझे मंगळसूत्रे'. पार त्याचे काळ्या कुत्र्याशी लग्न लावून पोरं मोकळी व्हायची. या सगळ्या पेक्षा काही झालेच नाही अशा थाटात परत झाडावर चढणे आणि तितक्याच जोमाने चिंचा खायला घेणे एवढा एकच पर्याय त्या पडलेल्या पोराकडे शिल्लक असायचा. यातलं एक जरी पोर एखाद्या दिवशी खेळायला आलं नाही तर ४-२ पोरं त्याला त्याच्या घरी जाऊन त्याला उचलून घेऊन यायची.
त्या झाडात एक विलायती चिंचांचे झाड होते. त्याच्या चिंचा या नागमोडी आकाराच्या असून त्यांना हिरवी नाहीतर लाल टरफले असायची. हि चिंच स्वत:भोवती गिरक्या घेत वाढायची. टरफल काढून टाकले कि आत पांढरी बुटुके असायची. हे पांढरे बुटुक थोड्या तुरट खोबऱ्या सारखे लागायचे. त्या प्रत्येक बुटुकात एक काळीकुट्ट बी असायची. त्या काळ्या बी ला एका बाजूला एक डोळा असायचा. त्या डोळ्याला थोडेसे नखलले तर हळूच काळे सालपट वेगळे व्हायला लागायचे. त्याच्या आत तपकिरी रंगांचे मखमली सारखे मऊ कवच असायचे. ते सगळे
काळे सालपट नखाने काढून अख्खीच्या अख्खी बी तपकीरी दिसे पर्यंत हा उद्योग चालायचा. हे बी तपकिरी करायचे प्रकरण फार नाजूक हातांनी करावे लागायचे. जरा जरी नख जोरात लागले तरी ते तपकिरी आवरण फाटायचे आणि बीच्या अंतरंगातला पिवळा गर बाहेर यायचा. बी जरा जरी पिवळी दिसली तरी सरळ गटारीत फेकून दिली जायची. अशा पूर्ण तपकिरी झालेल्या बिया हे चिंचोक्याच्या खेळातले एक चलन होते. १०० साधे चिंचोके देऊन अशी एक तपकिरी बी मिळायची. पोरं त्या तपकिरी बिया जीवापाड सांभाळून ठेवायची. कुणी कुणी तर रिकाम्या काड्याच्या पेट्या घेऊन त्यात या तपकिरी बिया ठेवायचे.
मग पसाभर चिंचोके गोळा झाले कि पोरं झाडावरून खाली उतरून चौकात खेळायला घ्यायची. त्याच्यात देखील बेंबीच्या देठा पासून आरडायची. दगडाच्या कापरीने एखाद्याचा नेम बरोबर लागायचा आणि आखलेल्या चौकोनातून ठरलेला चिंचोका बरोबर चौकोनाच्या बाहेर पडायचा. मग चौकोनात इतर पोरांनी लावलले सगळे चिंचोके त्या पोराला मिळायचे. मग तो वेड्या सारखा नाचायचा. १०० पेक्षा जास्त चिंचोके जमा झाले असतील तर कुठल्या तरी कालच्या नाहीतर परवाच्या डावातल्या शेठाला ते देऊन त्याच्या बदल्यात एक तपकिरी बी घ्यायचा. १०० चिंचोके ठेवायचा ताप नको म्हणून!!
परड्याच्या दुसऱ्या टोकाला एक भिंत होती आणि भिंतीला लागून हिरेमठाचा पडका वाडा होता. त्या वाड्याच्या बहुतेक सगळ्या खोल्या पडायला आलेल्या होत्या. खालच्या मजल्यावर १-२ खोल्या शिल्लक होत्या त्यात कुणीतरी बिऱ्हाडकरू रहायचे. आणि वरच्या मजल्यावर एका खोलीत वाड्याची विधवा मालकीण नागव्वा रहायची. नागव्वाला तिच्या वाड्या बाहेर पडलेले कित्येक वर्षात कुणी पाहिलेले नव्हते. वाडाच काय पण ती कधी तिच्या खोलीच्या देखील बाहेर पडत नसे. खालच्या बिऱ्हाडकरू पैकी कुणीतरी तिला आठवड्यातून एकदा पीठ-मीठ, तेल, भाजी वगैरे आणून द्यायचा. वर्षानुवर्षे घरात राहून राहून नागव्वा पांढरी फटक पडली होती. सदैव खिडकीतून बाहेर बघत बसलेली असायची. तोंडाने आपल्याशीच काही काही पुटपुटायची. तिचे डोळे बेडकासारखे मोठे असून तिचा गळा सोललेल्या केळीच्या सोटा सारखा दिसायचा. नऊ वारी इरकली लुगड्याचा टोप पदर काढून, डाव्या पायाचे फतकल मारून, उजवा गुडघा छातीशी धरून, नागव्वा खिडकीतून नाहीतर दरवाज्यातून बाहेर बघत स्वतःशीच काहीतरी बरळत बसलेली असायची. दरवाजातून तिला तिचा पडलेला वाडा दिसायचा. तिच्या खोली समोर थोडे अंतर गेल्यावर लिंगाप्पाची पडकी खोली होती. त्या खोलीला कुणीतरी जुने गंजलेले कुलूप लावून ठेवले होते. पण बाजूच्या भिंती पडून गेल्याने नुसती चौकट आणि चौकटीला लावलेले कडी-कुलूप शिल्लक राहिले होते. आतल्या भिंतीतली कपाटे आणि देवघराचे कोनाडे बाहेरून दिसायचे. त्या कोनाड्यावर लिहिलेली कानडी अक्षरे आणि नक्षी धुळीने गिळून टाकली होती. एखाद दुसरे स्वस्तिक नाहीतर गोपद्म शिल्लक राहिले होते. जागो जागी तुळया निखळल्या होत्या. दानाप्पाच्या खोलीच्या तर दारातच तुळई मोडून पडली होती. खोलीतून थोडे खाली पाहिले तर खालच्या चौकात बसवेश्वराचे छोटे चौकोनी देउळ दिसायचे. त्या देवळात तेल-फुल लागून वर्षे उलटून गेली होती. देवळात गार जुनी फरशी होती. त्याच्या गारव्याला एखादं साप किरडू हमखास गाभाऱ्यात मुक्कामाला आलेलं असायचं. देवळाच्या बाहेरच्या कोनाड्यात एक ताईबाईचा दगड होता. हा दगड बराच लांबट असून त्याला डाव्या बाजूला एक टेंगुळ आला होता. तिच्यावर कधीतरी लाल शेंदूर लावून त्याला पांढऱ्या कवड्यांचे डोळे करून बसवलेले होते. ते सगळे रूप अगदी उग्र आणि भीतीदायक दिसायचे. पोरे तर त्या बाजूला फिरकत देखील नसत. हि ताईबाई लहान पोरांना रडवायची. म्हणून एखाद्या बिऱ्हाडकरुचं पोर फारच रडायला लागलं तर अमावास्येला त्या ताईबाईला कुणीतरी नारळ फोडायचं आणि खोबरं तिथच ठेवून निघून जायचं. असल्या नारळांची वाळलेली भकलं आणि करवंट्याचे तुकडे तिथे पडलेले असायचे. मोठ्या मोठ्या घुशी ते खोबरे कुरतडत बसलेल्या असायच्या. दिवसा देखील रात किडे फेर धरून आरडत बसलेले असायचे. वाड्यात जिकडे तिकडे रानटी गवत वाढले होते. नागव्वाच्या खोलीत जायला तर जेमतेम एक पाय वाट काय ती शिल्लक राहिली होती. नवऱ्याच्या मागे नागव्वाची पोरं तिला एका मागोमाग एक सोडून आपल्या पोटाच्या मागे निघून गेली होती. त्यांच्या आठवणी काढून काढून नागव्वा कासावीस व्हायची. लिंगाप्पा निघाला तेव्हा तिने साजूक तुपाचा दिवा बसवेश्वराच्या देवळात लावला होता. पुढं काही वर्षं लिंगाप्पा वर्षातून एखादा दिवस तरी घरी येउन जायचा पण पुढे ते देखील हळु हळु बंदच झाले. दानाप्पाच्या बाईचे आणि नागव्वाचे काही कधी जमलेच नाही. दानाप्पाने त्याच्या आवडीने एका अनाथ पोरीशी सूत जुळवले होते. मंगसूळीच्या देवळात जावून लग्न केले. नागव्वाला काही ते पटले नाही. शिवाय दानाप्पाच्या बाईची उजव् या हाताची दोन बोटं थिटी होती. म्हणून नागव्वा तिच्या हातचे पाणी देखील प्यायची नाही. पुढं दानाप्पाला गोड पोरं देखील झाली. दानाप्पाने खूप सांगून बघितले. पण ते जमायचं नव्हतच. एक दिवस दानाप्पाची बायको काही न सांगता पोरं घेऊन निघून गेली. तिला आणायला म्हणून दानाप्पा गेला तो परत आलाच नाही. त्याच्या नंतर आठवण्याच्या पलीकडे नागव्वाच्या आयुष्यात दुसरे काही घडलेच नाही. जळून गेलेल्या निखाऱ्यासारखी नागव्वा धुमसत बसलेली असे. चिंचेवर पोरं चढली कि तिच्या रागाला पारावार रहायचा नाही. पोरांच्या अंगावार मोठ-मोठ्यानं आरडायची. कानडीतून शिव्या द्यायची. दोन हात एकमेकावर घासत तळपट करायची. तिच्या अवताराला बघून पोरं जास्तच चेकाळायची. तिला तोंडे वेडावून दाखवायची. तिच्या खिडकीच्या बाजूला जावून रिकामी पत्र्याची डबडी जोरजोरात वाजवायची. कधी कधी फटाक्याची एखाद्याची माळ झाडावर लावून द्यायची. सगळी माळ उडून झाली कि परत गिल्ला करायची. नागव्वाच्या नावाने शिमगा करायची. हा खेळ रोजचाच होऊन बसला होता. नागव्वाच्या वाड्यात राहणारा अजित देखील त्याच्यात सामील असायचा. अजित ची आई अधून मधून आजारी असायची.
वाड्याच्या दुसऱ्या बाजूला मुख्य रस्ता होता. मनसोक्त चिंचा खाऊन झाल्यावर पोरं रस्त्यावर यायची आणि गोट्या, चिन्नी-दांडू खेळायची. दुपारच्या वेळेला त्या रस्त्यावरून काखेला जुनाट बोचके लावून केरी चालत जायची. हिरवे नऊ वारी विरलेले लुगडे गुडघ्या वर गेलेले असायचे. त्याला ठिकठिकाणी ठिगळे लावलेली असायची. जागोजागी दंड घातलेले असायचे. जुनाट कागवाडी खणाची चोळी असायची. ती देखील कुठे कुठे फाटलेली असायची. केरीने अंघोळ कधी केली ते तिला देखील आठवायचे नाही. लांबून देखील आंबूस मळका धुळकट वास यायचा. केसांच्या जटा झाल्या होत्या. केरी त्या जटा कापडाच्या एका खोळीत भरून ठेवायची आणि त्या खोळीला गाठ मारून ठेवायची. हाता पायाची कातडी फुटलेली असायची. कधीं कधी त्यात जखमा होऊन त्यातून रक्त येत असायचे. तिच्या कातडीला सापा सारखे खवले पडले होते. अखंड उन्हात, पावसात आणि थंडीत राहून केरी अगदी निबर दिसायची. तोंडात मिश्रि लावलेली असायची. बारीक खाचांसारखे खूप खोल गेलेले, आडासारखे डोळे, सारखे भिरभिर फिरत असायचे. नजर कधी स्थिर नसायची. सारखे काहीतरी शोधत असायची. कुणाकडे पाहून केरी कधी हसली तर तिचे कोळश्यासारखे काळे कुट्ट दात दिसायचे. तिच्या डोळ्याच्या बाजूला चेहऱ्यावर विलक्षण सुरकुत्या पडायच्या. कपाळाला भले मोट्ठे कुंकू लावलेले असायचे. तिच्या पायात कुठल्यातरी जुन्या बंद तुटलेल्या स्लीपर असायच्या. प्लास्टिकच्या रिकाम्या पिशव्या एकातएक ओवून त्याचे बंद करून स्लीपरला बांधलेले असायचे. डाव्या बगलेत एक मोठे बोचके असायचे. त्यात असंख्य वस्तू असायच्या. केरी दिवसभर गावात चालत फिरत असायची. कुठे कुठे काय काय मिळेल ते बोचक्यात भरून ठेवायची. त्याच्यात प्लास्टिकच्या भिंगऱ्या असायच्या. काचेच्या आणि गारेच्या गोट्या असायच्या. पतंगाचा मांजा असायचा. चकचकीत सिगारेटच्या पाकिटातले कागद असायचे. लाकडी भोवरे असायचे. केरी दिसली कि मोठी मोठी पोरे तिच्या भोवती गोल करून तिला काहीतरी मागायची. केरी आधी दाद लागू द्यायची नाही. मग कुणीतरी वांड पोर गल्लीतले कुत्रे केरीच्या अंगावर सोडायची भीती घालायचं. केरी घाबरायची आणि मग पोरं काय मागतील ते बोचक्यातून काढून द्यायची. केरी कुठून तरी बाजूच्या कर्नाटकातून आली होती. कृपामयी हॉस्पिटल मध्ये वेड्यांच्या वार्डात तिला तिची लेक सोडून गेली ती परत आलीच नाही. त्यालाही आता खूप वर्षे झाली होती. वाट पाहून डॉक्टरनी तिला शेवटी घालवून दिले. अंबाबाईच्या देवळाच्या बाजूला एक धर्मशाळा होती. तिथे केरी रहायची. त्या धर्मशाळेला ना दार होते ना खिडकी! तीन बाजूनी बांधून काढलेली एक ओवरी होती. लाकडाच्या खांबाना टेकून छप्पर उभे होते. त्याच्यावर देशी मातीची कौले घातली होती. तिथेच छपराला टांगून अंबाबाईची जडशीळ पालखी बांधलेली असायची. ती पालखी इतकी जड होती कि ती उचलायला किमान आठ दहा तरी माणसे लागायची. त्या पालखीच्या खाली केरी अंग मुडपून झोपायची. रात्रभर डोळ्यासमोर तिला पालखीचे ताळ दिसायचे. दिवसा गावभर फिरून कुणी एखादी भाकरी नाहीतर वाडगाभर भात आणि पिठले दिलेले असायचे. त्यातली थोडी उद्या साठी ठेवलीच तर एखाद दुसरा भुकेला भिकारी यायचा. केरी त्याला उरलेले देऊन टाकायची. संचय असा कशाचाच नव्हता. तिला मागचे काही आठवत नव्हते. ती इथे कशी आली, तिला कुणी नात्याचे-गोत्याचे होते कि नाही, यातले काही काही आठवायचे नाही. सकाळ झाली कि निमुटपणे ती बोचके घेऊन चालायला लागायची. प्रत्येक दिवस कोऱ्या कागदा सारखा नविन करकरीत होता. गेल्या दिवसांचा आणि त्यातला आठवणींचा त्याच्यावर कसलाही गिरगोटा नसायचा. काय झाले होते कुणास ठाऊक पण कुत्र्याची भीती मात्र शिल्लक होती. दिवसा सरकारी शाळेच्या बाहेर, मधल्या सुट्टीत चिंचा, आवळे, गोट्या घेऊन विकायला बसायची. चिंचांचे कुटुन लाडू करायची. त्याच्यात मिठ आणि साखर घालून, चांगले वळून, पाच पैशाला दोन असे विकायची. वात्रट पोरं तिच्या नकळत चिंचांचे लाडू, आवळे पळवायची. केरीला त्याचे काही नव्हते. दिवसातून कधी एखादा रुपया तिला मिळायचा. त्याची थोडी मिश्रि विकत घ्यायची. त्या दिवशी वाड्यावरून जाताना पोरांनी तिला थांबवले. पोरांचे खिशे चिंचानी भरले होते. रोज केरीला कुत्र्याची भीती दाखवून पोरेही कंटाळली होती. एका पोराने केरीला विचारले "केरे आम्ही तुला चिंचा देतो तू आम्हाला गोट्या देशील का?" केरीचे डोळे चमकले. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिच्याशी सौदा करत होते. भीती शिवाय दुसरे काहीतरी पहिल्यांदाच कुणीतरी तिला देवू करत होते. केरीने सौदा मान्य केला. पोरं खिशे भर-भरून चिंचा द्यायची आणि केरी कुणाला गारेच्या तर कुणाल काचेच्या गोट्या द्यायला लागली. खिसाभर चिंचा काढून पोरे केरीची वाट बघत बसलेली असायची. गोट्यांचा खेळ जोरात चालू होता.
नागव्वाच्या वाड्यात अजितच्या आईची तब्बेत मात्र बिघडत चालली होती. तिला कसला तरी आजार झाला होता. दिवसें दिवस अशक्त होत चालली होती. शेजारच्या गावात सरकारी दवाखान्यात उपचार चालू होते पण फारसा फरक पडत नव्हता. पाली सारखी पांढरी फट्ट पडली होती. हात पाय हलवायला देखील श्रम पडत होते. चार दोन शब्द बोलली तरी धाप लागायची. प्रवासाचा त्रास वाचेल म्हणून अजितच्या वडिलांनी शेवटी गाव सोडायचे ठरवले. सामानाची बांधाबांध करून अचानक एक दिवशी त्यांनी गाव सोडले देखील! पोरांना काही कळलेच नाही.
नागव्वाच्या वाड्यातली उरली सुरली जाग देखील निघून गेली. आता नागव्वा तिच्या तंद्रीत अहोरात्र धुमसत बसलेली असायची. अनेक दिवस वाड्यात दिवा देखील लागायचा नाही. दिवसा पोरांचा चिंचेवरचा दंगा मात्र चालू होता. तो दंगा ऐकून तिची तंद्री तुटायची आणि तिचा तळतळाट व्हायचा. शेवटी मनाशी काहीतरी पक्के ठरवून नागव्वा पोरांना म्हणाली "तुमचं तळपट होईल शिंच्यानो!! माझ्या वाड्यातली ताईबाई गिळेल एकेकाला!! त्या अजितच्या आईला गिळली तशी!!" पोरं डोळे फाडून बघत होती. अजित गाव सोडून गेला त्याने पोरं आधीच सुन्न झाली होती. त्यात त्याच्या आईला नागव्वाच्या ताईबाईने गिळले हे ऐकून तर पोरं पार हबकून गेली. एकेक करून झाडावरून उतरली आणि आपआपल्या घराकडे निघून गेली. सगळे परडे सुन्न झाले. हापापलेल्या डोळ्यांनी नागव्वा बघत होती. तोंडाने काही काही पुटपुटत होती. बऱ्याच वर्षांचा सूड तिच्या डोळ्यातून बाहेर पडत होता.
त्या दिवशी चिकोडीकर वाड्याच्या दाराशी, केरी बराच वेळ थांबली होती. तिने एक दोन वेळा वाड्यात डोकावून देखील पाहिले. आपआपल्या घराच्या खिडकीत बसून पोरं केरीकडे पाहत होती. सगळे सामसूम झाले होते.