Sunday, February 27, 2022

आश्वस्त

आश्वस्त 

~ निखिल कुलकर्णी

तो गेला त्यालाही आता बरीच वर्षे झाली. त्याला तिच्या बद्दल नेमकं काय वाटत होतं ते नक्की तिलाही ठाऊक नव्हते. पण तिचं त्याच्यावर प्रेम होतं हे निश्चित. तिने बऱ्याच वेळेला ते सांगायचा प्रयत्न देखील केला.

पण त्याला पाहिले की, तिचे शब्द कृष्णेच्या घाटावरच्या पायऱ्यांसारखे तिच्याच विचारांच्या लाटांमध्ये बुडून जात.

मग ती नुसतीच त्याच्या कडे मुग्ध होऊन पाहत राहायची. तो देखिल तिच्याकडे काहीसा गोंधळूनच काही क्षण पाहायचा.

पण तिच्या तशा मुग्धतेचा अर्थ लावण्याची कसलीही तसदी न घेता पुढे निघून देखील जायचा.

तो गेला की, बोलायचे राहून गेलेले तिचे शब्द झरझर ओसरणाऱ्या पाण्यातून एकेक करत वर येणाऱ्या पायऱ्यांसारखे तिला पुन्हा आठवू लागत.

आणि मग ती स्वत:वरच चरफडे.

आपण इतके कसे वेंधळे? असे वाटून स्वत:लाच दोष देई.

आता परत जेव्हा तो भेटेल तेव्हा त्याला सगळं सगळं एकदा सांगूनच टाकायचे अशा विचाराने ती पुन्हा चालू लागायची,
सूर्य निघून गेल्यावर पृथ्वी जशी अंधारात चाचपडत राहते तशी...

त्या दिवशी तो जो गेला तो परत आलाच नाही.

ती कितीतरी वेळ त्याची वाट पाहत समुद्रावर उभीच होती.

पृथ्वीचे दूत आकाशाशी स्पृहा करत, समुद्रात खोल वर जाऊन युद्धाच्या पवित्र्यात उभेच होते.

त्यांची पाण्यात हरवलेली पाऊले मात्र समुद्राच्या लाटांनी केव्हाच हतबल करून टाकलेली होती.

त्यांची पाण्यात खोलवर रुतत चाललेली पाऊले पाहून तिला खूप वाईट वाटले.

आकाशातून उडत जाणारे पक्षी देखील त्यांच्या पराभवाकडे पाहून छद्मी हसत आहेत की काय असे वाटून ती काहीशी क्रुद्ध देखील झाली.

समुद्रावरच्या बोचऱ्या वाऱ्याने तिचे केस एव्हाना पार विस्कटून टाकले होते.

आपल्या मनासारखे कधीच काहीच होणार नाही का? या विचाराने ती खिन्न होत चालली.

समुद्राच्या वाळूवरून दिशाहीन पावले टाकत असताना तिला दिसली काही जांभळी फुले.

ही फुले इथे काय करत आहेत? या रखरखीत वाळूत ही का उगवली आहेत?

समुद्र आणि पृथ्वी मधल्या अनंत संगराच्या या कुरुक्षेत्रावर या सुंदर पाकळ्या कुणाला हव्या आहेत?

इथे कुठलीही नव यौवना ती फुले तिच्या केसात माळणार नाही.

इथे कुणी त्यांना कुठल्या देवतेच्या पायावर देखील घालणार नाही.

पण मग ती फुले इतकी आनंदात का आहेत?
वाऱ्याच्या प्रत्येक झोता सोबत ती कुणासाठी गांधर्व गान गात आहेत?

कदाचित तीच त्यांची वृत्ती असावी...

आपल्याच रंगात रंगावं, सृष्टीनं दिलेलं दोन थेंबांचं दान पिऊन, फुलून यावं रखरखीत वाळूत सुद्धा...

आपले इवलेसे पाय रोवून, खाऱ्या बोचऱ्या वाऱ्यात, लाटांच्या भीषण रौद्र खर्जात देखिल, उमलून यावं, कृष्णविवरातून बाहेर पडणाऱ्या उषेच्या अमोघ किरणासारखं...

आसमंत भेदत शिरावं अनंताच्या गर्तेत, आपल्याशीच संवाद करत...

वाटेत भेटेल त्या अस्तित्वाच्या प्रत्येक जड कणाला आपल्याच रंगाचा दुबोटी गंध लावत, उजळून टाकावीत त्यांची ललाटे, टिपावे क्षणिक स्मित आणि जातच रहावे परत एकदा अनादी अनंताकडे, अलगद, हळूवार, पंखात परागकण अडकलेल्या फुलपाखरासारखे...

मग करू दे त्या मग्रूर सागराला त्याच्या उन्मत्त लाटांचा हिशेब...
मोजू देत त्या नेभळत कड्यांना त्यांच्याच वाळूंचे डोंगर...
वाहू देत त्या गर्विष्ठ वाऱ्याला त्याच्या सामर्थ्याची प्रौढी मिरवत आभाळभर...

नेल्या दोन चार पाकळ्या त्या वाऱ्याने त्याच्या हिडीस खांद्यावरून तर नेऊ देत त्याला ही...

कधीतरी त्याही पाकळ्या पडतीलच परत पृथेच्या मायेने, पृथेच्या पार्थिवावर, पृथेच्याच अनंतयात्रेसाठी...
मग तिने त्यातलीच एक पाकळी उचलून घेतली आणि पुन्हा चालू लागली एकमग्न होत, उगवत्या सूर्याकडे निघालेल्या "आश्वस्त" पृथे सारखी...
"आश्वस्त"

~ निखिल कुलकर्णी